कुलसूम ज़मानी बेगम...

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
5 Jul 2018 - 5:55 pm

शम्सुल-उलेमा ख्वाजा हसन निज़ामी दहेलवी

Simple, Free Image and File Hosting at MediaFire

आपण फाळणीच्‍या कथा मंटोच्‍या कथांमधून वाचल्या. मी त्या कथांचे भाषांतर येथे केले आहे. इतिहासात ज्या काही महत्त्वाच्या घटना घडल्या, चांगल्या किंवा भीषण, त्‍याच्‍या पार्श्वभूमीवरील कथा या नेहमीच ह्रदयद्रावक असतात. उदा. पानिपतच्या पार्श्वभूमीवरील माझी ‘‘नथ’’ ही कथा. (अवांतर : या कथेवर मी आता इंग्रजीमधे एक कादंबरी लिहिण्यास घेतली आहे, ती होईल तेव्हा होईल.) असो. आज मी एका नवीन कथा मालिकेला सुरुवात करीत आहे. अर्थात हाही अनुवादच आहे पण हिंदीतून मराठीमधे. या कथांचा अनुवाद करण्याचे अजून एक महत्त्वाचे कारण म्हणजे यातही मराठ्यांचा सहभाग आहेच. १८५७ सालचे स्वातंत्र्यसमर. या कथांमधे बादशाह आणि त्याच्या कुटुंबाचे काय हाल झाले याच्या दुर्दैवी कहाण्या आहेत. वाचण्यास वाईट वाटतेच पण जे आहे ते आहे...

या कथांचे मूळ लेखक आहेत शम्सुल-उलेमा ख्वाजा हसन निज़ामी दहेलवी. त्यांचा जन्म झाला १८८० मधे, म्हणजे १८५७ नंतर फक्त २३ वर्षांनी. त्यांच्या कानावर जे पडले ते बर्‍यापैकी खात्रीशीर असावे. त्यांचा मृत्यू झाला स्वातंत्र्य मिळाल्यावर १९५५ मधे. त्यांची वेषभूषा साधारण अशी असे. डोक्यावर सुफी टोपी, अंगात लांबलचक कुडता, खांद्यावर एक फ़किर ओढतात तशी शाल किंवा पंचा. त्यांचे केस लांब राखले होते. त्यांच्या बोलण्यात अमृताची गोडी होती तर डोळ्यात जादू होती.

त्यांनी ५०० हून जास्त पुस्तके लिहिली. त्यांची लेखनशैली मंटोसारखीच आहे. किंवा मंटोची त्यांच्या सारखी आहे असे म्हटले तरी हरकत नाही. छोटी छोटी वाक्ये पण अत्यंत परिणामकारक. छोट्या वाक्यातून एखादे चित्र उभे करण्याचे त्यांचे कसब वाखाणण्यासारखे आहे. त्यांच्या या शैलीमुळे त्यांना ‘‘मुसव्विरे फितरत’’ असे ही म्हटले जाई. मुसव्विर म्हणजे चित्रकार व फितरत म्हणजे स्वभाव, प्रकृती इ. इ. त्यांच्या लिखाणात म्हणींचा सढळ हाताने वापर केलेला दिसतो. अर्थात पुढे ज्या कथा येणार आहेत त्यात बहुधा म्हणी वापरण्यास पुरेसा वाव नसावा असे वाटते.

ख्वाजा हसन निज़ामी उर्दू शिकले ते बादशहाच्या अनेक शहजाद्यांबरोबर. हे नावाचे शहजादे कुचा चलान किंवा हज़रत निज़ामुद्दीन वस्तीत वास्तव्यास असत. त्यांच्या बरोबर राहिल्यामुळे त्यांच्या ह्रदयात त्या शहजाद्यांप्रती थोडीफार प्रेमभावना निर्माण झाली असल्यास त्यांना दोष देता येणार नाही किंवा ते नैसर्गिक आहे असंही म्हणता येईल. त्या भग्न मनाच्या शहजाद्यांवरअणि त्यांच्या कुटुंबीयांवर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली ती भारतात व बाहेरही बरीच लोकप्रिय झाली. त्यातील सगळ्यात प्रसिद्ध पुस्तक होते ‘बेगमात के आंसू’. त्यातील काही कथा पुढे येणार आहेतच.

मुल्ला वाहदीने त्यांची एक आठवण सांगितली - एकदा ख्वाजा हसन निज़ामी भयंकर आजारी पडले. त्यांच्या आईने त्यांना एका दर्वेशीकडे उपचारासाठी पाठवून दिले. हा दर्वेशी शेवटचा बादशाह जफ़रचाही उपचार करीत असे असे म्हटले जाई. त्या तांत्रिकाने त्यांच्या गळ्यात एक नादे अलिचा मंत्रावलेला ताईत अडकवला व त्यांना घरी पाठवून दिले. ते पाहिल्यावर त्यांची आई गर्वाने म्हणाली, ‘‘ माझ्या मुलाला बादशहाने नादे अलिचा ताईत दिलाय !’’ बादशाह या शब्दापाशी ती थोडीशी अडखळली व रडू लागली. ख्वाजासाहेबांनी विचारले, ‘‘ अम्मा, तू का रडतेस ?’’ तिने उत्तर दिले, ‘‘ बेटा आता ते बादशाह नाही राहिले. इंग्रजांनी त्यांचे तख्त व ताज दोन्ही हिसकावून घेतले आहे.’’ ख्वाजा निज़ामी म्हणतात - त्या घटनेने माझ्या ह्रदयात कालवाकालव झाली. ते जेव्हा १९२२ साली मदिनेला गेले तेव्हा त्यांना प्रार्थना केली की - हे दोन्ही जगांच्या परमेश्वरा मी दिल्लीच्या बरबाद झालेल्या शहजाद्यांचा आक्रोश तुझ्यापुढे सादर करतोय. ते तख्त व राजमुकुटासाठी रडत नाहीत. ते आज आहे उद्या नाही. पण आज त्यांना वाळलेली भाकरी आणि लाज झाकण्या पुरते कापड ही मिळणे आज दुरापास्त झाले आहे. त्यांच्या अपमानित आयुष्यालाही काही सीमा आहे. आता तरी त्यांना माफ कर !’’

१९११ मधे जॉर्ज पंचमचा दिल्ली दरबार झाला. त्यात सगळ्या धर्मगुरूंनी त्यांच्यासाठी प्रार्थना केली. ख्वाजा हसन निज़ामींनाही बोलावणे आले होते पण ते म्हणाले, ‘‘ ज्या सिंहासनावरून शाहजहाँ व त्यांच्या वारसांनी जनतेला दर्शन दिले त्या सिंहासनावर जॉर्ज पंचमला बसलेले मला पाहावणार नाही. माझ्या रजईची मजा त्या दरबारापेक्षा केव्हाही जास्त आहे.’’

या मालिकेत एकूण ११ कथा आहेत. हिंदीतून प्रथमच अनुवाद करीत असल्यामुळे चूका अपेक्षित आहेत त्याकडे कृपया दुर्लक्ष करावे...

त्यांच्या (मूळ लेखकाच्या) इतर मतांशी मी सहमत नाही.... हेही अगोदरच सांगतो. विशेषत: त्यांच्या आर्य समाजाबद्दलची जी मते आहेत त्यांच्याशी...

कुलसूम ज़मानी बेगम

ही एका गरीब दर्वेशीणीची दु:खभरी कथा आहे. त्या धामधुमीत तिच्यावर गुदरलेल्या संकटांची ही कहाणी आहे. या बाईचे नाव होते कुलसूम ज़मामी बेगम. ही शेवटचा मोगल सम्राट अबु जफ़र बहादूर शाह ची लाडकी मुलगी.

ही अल्लाला प्यारी होऊन बरीच वर्षे उलटली. मी अनेक वेळा या शहजादीसाहेबांच्या तोडून त्यांची कहाणी ऐकली आहे. आता तुम्ही म्हणाल तुमची आणि हिची गाठ कुठे पडली. तर हिची हुजूर निज़ामुद्दीन औलियांवर अतोनात श्रद्धा होती आणि अनेकवेळा ती त्यांच्या दरबारात हजर व्हायची व मला तिच्या दु:खभर्‍या कहाण्या ऐकण्याची संधी मिळत असे. खाली ज्या कुठल्या घटनांचे वर्णन आले आहे ते एक त्यांनी तरी सांगितलेल्या आहेत किंवा त्यांची मुलगी ज़िनत ज़मानी बेगम हिने सांगितले आहे. ही बेगम अजून जिवंत आहे आणि पंडितांच्या एका मोहल्ल्यांमध्ये राहाते.

तिने सांगितलेली कहाणी -

माझ्या बाबाजानची बादशाही संपुष्टात आली आणि दिल्लीच्या लाल किल्ल्या मधे सिंहासन व राजमुकूट लुटले गेले तेव्हा तेथे एकच भयाण गोंधळ माजला होता. चहूकडे निराशे शिवाय काही दिसत नव्हते. मला तर पांढरे शूभ्र संगमरवर ही काळे दिसू लागले होते. दिवसभर आज कोणी काहीच खाल्ले नव्हते. माझ्या कडेवर माझी दीड वर्षाची मुलगी ज़ीनत दुधासाठी टाहो फोडत होती. काळजीने व चाललेल्या गोंधळाने मला दुध येत नव्हते ना कुठल्या दाईला. आम्ही सगळे चिंताग्रस्त चेहर्‍याने बसलेलो असतानाच जिल्‍ले सूबहानीचा खास दूत (राजाचा) आम्हाला बोलाविण्यासाठी आला. मध्यरात्र, स्मशान शांतता आणि मधेच येणारा तोफांचा गडगडणार्‍या आवाजाने आम्ही दचकत होतो. जीव मुठीत धरुन बसलो होतो. पण सुल्तानी आदेश मिळाल्यावर आम्ही हजर राहण्यासाठी रवाना झालो. बादशाह नमाज़ाच्‍या चटईवर बसले होते. हातात जपाची माळ होती. मी पुढे होऊन तीन वेळा पुढे झुकून मुजरा केल्यावर त्यांनी मोठ्या प्रेमाने मला जवळ बोलावले व म्हणाले, ‘‘ कुलसूम, तुला आता देवाच्या पदरात टाकतोय ! असेल आपल्या नशिबात तर परत भेट होईल. तू आता तुझ्या पतीबरोबर ताबडतोब बाहेर निघून जा. मी पण जाण्याचा विचार करतोय. तुमच्या डोळ्यातील अश्रू आता मला पाहावणार नाहीत पण माझ्याबरोबर राहिलात तर बरबाद व्हाल. मला सोडून गेलात तर खुदाच्या कृपेने कुठेतरी काहीतरी सोय होईल.’’
असे म्हणून त्यांनी आपले थरथरणारे हात मला आशीर्वाद देण्यासाठी वर उचलले व मोठ्या आवाजात परमेश्वराची करुणा भाकली. त्यांच्या आवाजातील दर्द माझ्या ह्रदयाला घरे पाडून गेला.

‘‘ हे खुदावंद, हे बेवारस मुले तुझ्या स्वाधीन करत आहे. या दुनियेत आता यांची मदत करणारे कोणी नाही. महालात राहणारी ही मुले आता जंगलात चालली आहेत. तैमूरच्या नावाची आणि या मुलींची इज्जत राख. हे परवर्दिगार फक्त हीच नाही तर हिंदुस्तानचे सारे हिंदू-मुसलमान माझी लेकरेच आहेत आणि लवकरच या सर्वांवर संकट कोसळणार आहे. माझ्या कर्मामुळे, दुर्भाग्यामुळे यांची परवड नको. सगळ्यांना सुखरूप ठेव.’’

प्रार्थना झाल्यावर त्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला व ज़ीनतला प्रेमाने कुरवाळले. माझ्या नवर्‍याच्‍या (मिर्ज़ा ज्‍यायुद्दीन) हातात काही दागदागिने ठेवले व नूर महल बेगमसाहिबांना निरोप दिला. या त्‍यांच्‍या बेगम.

रात्री आमचा काफिला किल्ल्यातून निघाला. यात दोन पुरुष व तीन स्त्रिया होत्या. पुरुषात एक माझा नवरा होता व दुसरा खुद्द बादशहाचा मेव्हणा होता ‘मिर्ज़ा उम्र सुल्तान’. स्त्रियांमध्ये, मी, दुसरी होती नवाब नूर महल व तिसरी होती हाफिज सुल्तान जी बादशाहाच्या सासुरवाडीची होती. आम्ही जेव्हा रथात चढलो तेव्हा पहाटेचा अंधार दाटून आला होता. आकाशात एकही तारा दिसत नव्हता फक्त दूरवर पहाटेचा तारा चमकत होता. आम्ही आमच्या घरावर व महालांवर शेवटची नजर टाकली तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ते थांबण्याचे नावच घेईनात. नवाब नूर महलचेही डोळे भरून आले होते. त्या अंधूक प्रकाशात ते अश्रू त्या ताऱ्याप्रमाणे चमकत होते.
शेवटी लाल किल्ल्याचा निरोप घेऊन आम्ही कोराली नावाच्‍या गावात पोहोचलो व आमच्या सारथ्‍याच्‍या घरात थांबलो. बाजरीची भाकरी ताकाशी खाल्ली. खोटं कशाला सांगू, त्या वेळेस इतकी भूक लागली होती की महालातील बिर्याणीपेक्षाही ते जेवण मला जास्त रुचकर लागले. एक दिवस तर शांततेत गेला पण दुसर्‍या दिवशी आसपासच्या गावातील जाट व गूजर लोकांच्या टोळ्या कोराली लुटण्यासाठी चाल करून आले. त्यांच्याबरोबर अनेक स्त्रियाही होत्‍या ज्या आमच्या अंगाला झोंबू लागल्या. आमचे सगळे दागदागिने व कपडे या लोकांनी लुटले. जेव्हा या धिप्पाड बायका आमच्या शरीराला झोंबत तेव्हा त्‍यांच्‍या शरीराला व कपड्यांना येणार्‍या वासाने आम्हाला मळमळू लागे.

या लुटीनंतर आमच्याकडे जे काही सामान राहिले त्यात आमचे एका वेळचे जेवणही आले नसते. शिवाय पुढे काय वाढून ठेवले असेल या विचारांनी ही आमच्या जीवाचा थरकाप उडत होता. ज़ीनत तहानेने व्याकूळ होऊन रडत होती. समोरून एक शेतकरी चालला होता. मी असाहय्‍यपणे त्याला हाक मारली, ‘‘ भाईजान इस बच्‍चीको थोडा पानी पिला दे ! मेहरबानी होगी !’’ त्याने ताबडतोब एका सुरईत पाणी भरून आणले व म्हणाला, ‘‘ तू मला भाई म्हणालीस ! आजपासून तू माझी बहीण व मी तुझा भाऊ !’’ हा कोरालाचा एक सधन शेतकरी असावा. त्याचे नाव ‘बस्‍ती’ होते. त्याने आपली बैलगाडी तयार केली व आम्हाला त्यात बसवले व म्हणाला की तो आम्हाला पाहिजे तेथे सोडून येईल. आम्ही म्हणालो, ‘‘ मेरठ जिल्ह्यामध्ये अजारा गावात मीर फ़ैज अली नावाचे शाही हकीम राहतात त्यांच्याकडे आम्हाला सोड. त्यांचे व आमच्या घराण्याचे फार जुने संबंध आहेत.’’ बस्‍ती आम्हाला अजाराला घेऊन गेला खरा पण तेथे मीर फ़ैज अलीने तेथे आम्हाला ज्या प्रकारे वागवले तसा प्रसंग शत्रूवरही येऊ नये. त्यांनी कानावर हात ठेवले, ‘‘ तुम्हाला आसरा देऊन मी माझे घरदार बरबाद करू इच्छित नाही.’’ ( हे पुस्तक जेव्हा मीर फ़ैज अलीच्या मुलांनी वाचले तेव्हा त्यांनी हा आरोप अमान्य केला. त्यांच्या म्हणण्यानुसार त्यांच्या वडिलांनी त्यांना आश्रय दिला होता. असो.)

वातावरण असे होते की कुठेही आशेला स्थान नव्हते. एक तर मागे इंग्रजी फौज येईल या भीतीचे दडपण सतत आमच्या मनावर होते. आमची अवस्था बिकट होती. सगळ्या माणसांची नजर फिरली होती. जी माणसे आमच्या नजरेच्या इशार्‍यावर नाचत, चालत, जे आमच्या हुकूमाची क्षणोक्षणी वाट पाहत असत त्यांना आज आमचा चेहराही नजरेसमोर नकोसा झाला होता. मला त्या बस्‍तीचे खरोखरीच कौतुक वाटतंय ज्याने मानलेले भावाचे नाते शेवटपर्यंत निभावले. शेवटी असहाय्य होऊन आम्ही अजारा सोडले व हैदराबादचा रस्‍ता पकडला. सगळ्या स्त्रिया बस्‍तीच्‍या गाडीत बसल्या होत्‍या व पुरुष मंडळी गाडीबरोबर चालत होती. तिसर्‍या दिवशी एका नदीच्या काठी पोहोचलो. तेथे कोयलच्‍या नवाबाच्‍या फौजेचा डेरा पडला होता. जेव्हा त्यांना कळाले की शाही खानदानाची माणसे आहेत तेव्हा त्याने आमचे चांगले आगत स्वागत केले व हत्तीवर बसवून नदी पार करून दिली. आम्ही उतरलो तेवढ्यात समोरून एक फौज आली व नवाबांच्‍या फौजेशी लढू लागली.

माझ्या पतीने नवाबाच्‍या बाजूने लढण्याचा निर्धार केला तेवढ्यात रिसालदाराचा निरोप आला की त्यांनी स्त्रियांना घेऊन ताबडतोब निघून जावे. ‘ जे काही होईल ते आमचे होईल.’ समोर एक शेत होते ज्यात वाळलेला गहू उभा होता. आम्ही त्यात जाऊन लपलो. आता मला माहीत नाही की आम्ही लपलेले कोणी पाहिले की एखाद्या बंदुकीच्या गोळीने त्या शेताला आग लागली. पण आग लागली खरी. आम्ही सगळे तेथून पळून जाण्याचा प्रयत्न केला पण हाय ! आम्हाला पळताही येत नव्हते. गवतात पाय अडखळत आम्ही धडपडत होतो. डोक्यावरच्या चादरी तेथेच राहिल्या. तसेच बोडक्या डोक्याने धडपडत शेताच्या बाहेर आलो. आमचे तळ पाय त्या आगीच्या धगीने हुळहुळू लागले. उष्णतेने घशाला कोरड पडली व आता जीव जातो की काय असे वाटू लागले. ज़ीनतची तर सारखी शुद्ध हरपत होती. पुरुषांनी कसेबसे आम्हाला सांभाळत बाहेर आणले.

नवाब नूर महल तर बाहेर आल्या आल्या बेशुद्ध पडली. मी ज़ीनतला छातीशी धरुन माझ्या पतीच्या चेहर्‍याकडे केविलवाण्या नजरेने पाहू लागले व मनात परमेश्वराला विचारू लागले, ‘‘ आता कुठे जाऊ? कुठेच आसरा दिसत नाही.’’ नशीब असे पालटले की शाहीची फ़किरी झाली. फ़किर या अवस्थेतही शांत असतात असे म्हणतात, येथे तेही नशिबात नव्हते.

फौजा लढत लढत जरा दूरवर गेल्यावर बस्तीने पिण्यास पाणी आणले. आम्ही नवाब नूर महलच्या चेहर्‍यावर पाणी शिंपडल्यावर ती शुद्धीवर आली व रडू लागली. म्हणाली, ‘‘ मी आत्ताच तुझ्या वडिलांना, बाबा जज़रत ज़िल्ले सुबहानींना स्वप्नात पाहिले. त्यांना साखळदंडात जखडलेले होते. ते म्हणत होते, ‘ आज आमच्यासाठी या काट्यांनी भरलेल्या गाद्या मखमली फर्शीपेक्षा सुखदायक आहेत. नूर महल घाबरू नकोस. जरा हिंमत दाखव. माझ्या नशीबात वृद्धपणी या यातना भोगायचे लिहिले होते त्याला काय करणार ? कुलसूमला एकदा बघण्याची इच्छा आहे. तुरुंगात जाण्याआधी तिला एकदा डोळे भर भरून पाहायचे आहे मला !’

हे ऐकून माझे डोळे उघडले. माझ्या ओठातून एक चित्कार बाहेर पडला. ‘कुलसूम, बादशाहांना खरोखरीच साखळदंडात जखडले असेल का? मी स्वत:लाच हतबलपणे प्रश्न केला. ‘त्यांना खरच एखाद्या सामान्य कैद्याप्रमाणे तुरुंगात पाठवतील का? मिर्ज़ा उम्र सुल्तानने याचे उत्तर दिले ‘‘ या सगळ्या अफवा आहेत. एक बादशाह दुसर्‍या बादशाहा बरोबर असे वागत नाहीत. आदराने वागतात. तू घाबरू नकोस. ते कैदेत असतील पण सुस्थितीत असतील. हाफिज मुलतान म्‍हणाली, ‘‘ या रानटी फिरंग्यांना बादशहाची काय किंमत असणार ? ते तर स्‍वत:च्‍या बादशहाची मुंडकी कापून सोळा आण्यांना विकतात. नूर महल, तुम्ही त्यांना साखळदंडात जखडलेले पाहिले आहे. मी सांगते या बनेल, लबाड पक्‍क्‍या बदमाश व्यापाऱ्यांकडून यापेक्षाही वाईट वागणूक अपेक्षित आहे.’’ पण माझ्या नवर्‍याने सगळ्यांची समजूत काढली व सगळ्यांना शांत केले.

तेवढ्यात बस्‍ती नावेतून गाडी आमच्या किनार्‍यावर घेऊन आला. त्यात बसून आमचा प्रवास परत सुरू झाला. आम्ही थोडे अंतर कापले असे नसेल, संध्याकाळ झाली आणि आमची गाडी एका गावात जाऊन थांबली. या गावात मुसलमान राजपुतांची वस्ती होती. जमिनदाराने एक खोली आमच्यासाठी रिकामी केली ज्यात गवताचे बिछाने होते. ते यावरच झोपत. त्याला ते प्‍याल किंवा पाल म्हणत. आम्हालाही त्याने त्यातल्यात्यात मऊ बिछाना देऊन आमची सरबराई केली.

माझा जीव त्या वातावरणात घुसमटला पण दुसरा काही मार्ग दिसत नव्हता. दिवसभराची धावपळ व कष्‍टांनंतर जरा निवांत क्षण वाट्याला आले होते. मी तशीच असहायपणे त्या गवतावर पडले, लगेचच मला झोप लागली.

मध्यरात्री आम्हाला सगळ्यांनाच एकदम जाग आली. खाली गवत टोचत होते आणि पिसवा सर्वांगाचे लचके तोडत होत्या. त्यावेळी आमचे जे हाल झाले ते फक्त परमेश्वरालाच माहीत ! आम्हाला मऊ मऊ गाद्यागिरद्यांवर झोपण्याची सवय होती त्यामुळे आमची झोप उडाली, नाहीतर गावातील माणसे याच गाद्यांवर झोपली होती. त्या काळोखात चहूबाजूंनी कोल्हेकुई ऐकू येते होती. माझे काळीज भीतीने धडधडले. नशीब बदलायला वेळ लागत नाही हेच खरं ! काही वर्षांपूर्वी जर कोणी सांगितले असते की शहेनशाहे-हिंदची बायका मुले अशी धूळ मातीत लोळत फिरतील तर कोणाचा विश्वास बसला असता? अशा प्रकारे ठिकठिकाणी नशीबाच्या ठोकरा खात शेवटी हैदराबादला पोहोचलो आणि सिताराम पेठमधे एक घर भाड्याने घेतले. जबलपुरात माझ्या पतीने लुटीतून वाचलेली एक जाडजूड अंगठी विकली ज्याने प्रवास खर्च भागला व काही दिवस गुजराण ही झाली. पण शेवटी जवळ जे काही होते ते पूर्णपणे संपले. आता पोट कसे भरायचे हा यक्षप्रश्न समोर उभा राहिला. काय करावे ? माझे पती एक उत्कृष्ट लिपिक होते. त्यांनी दरूद शरीफ (पैगंबाराला उद्देशून केलेली विनवणी) एका कागदावर लिहिली आणि चारमिनार येथे अर्पण करण्यासाठी गेले. त्यांनी आपल्या सुवाच्य अक्षरात ती प्रार्थना लिहिली होती आणि त्याच्या भोवती वेलबुट्टीची नक्षी ही काढली होती. त्यात त्यांना सुंदर शब्दात प्रेषित महंमदाचे आणि त्याच्या कुटुंबियांचे गुणगान गायले होते. तो कागद पाहिल्यावर लोकांनी आश्चर्याने तोंडात बोटे घातली. पहिल्याच दिवशी कोणीतरी तो प्रार्थनेचा कागद ५ रुपायाला विकत घेतला. त्यानंतर असं झाले की ते जे लिहितील ते विकले जाऊ लागले. अशा प्रकारे आमचा उदरनिर्वाह चांगला होऊ लागला. पण मुसा नदीला आलेल्या पूराला घाबरून
आम्ही कोतवाल अहमदच्या घरात राहण्यास आलो. या माणसाची पुष्कळ घरे अशी भाड्याने दिली होती. हा माणूस निजामाचा खास नोकर होता.

काही दिवसांनंतर अशी बातमी पसरली की त्याने ,म्हणजे नवाब लष्करजंगने काही शहजाद्यांना आसरा दिल्यामुळे नवाब लष्करजंगवर इंग्रज सरकारची वक्र नजर वळली आहे. त्याने आता असा आदेश काढला की कोणीही दिल्ली बादशहाच्या कुठल्याही नातेवाईकाला आसरा देऊ नये. जनतेने कोणी आलेच तर त्याला पकडून इंग्रजांच्या ताब्यात द्यावे. हे ऐकून मी इतकी घाबरले की माझ्या नवर्‍याला बाहेर पडण्यास मी मज्जाव केला. पण याने फाके पडण्याची परिस्थिती निर्माण झाली. शेवटी त्यांना लाचार होऊन एका नवाबाच्‍या मुलाला १२ रुपये पगारावर कुराण शिकविण्याची नोकरी पत्करावी लागली. ते गुपचूप त्‍यांच्‍या घरी जात शिकवणी करीत व गुपचूप परत येत. पण त्या नवाबाने त्यांना नोकरापेक्षाही वाईट वागणूक देण्यास सुरुवात केल्यावर मात्र माझ्या नवर्‍याचा धीर सुटला. ते घरी येत व ढसढसा रडत, ‘हे अल्‍ला, या नराधमाची नोकरी करण्यापेक्षा लखपटीने मरण परवडले. तू मला किती लाचार बनवले आहेस बघ ! जे नवाब कालपर्यंत आमचे गुलाम होते, आज आम्ही त्यांचे गुलाम झालो आहोत. याच दरम्यान कोणीतरी आमची खबरबात मियां निज़ामुद्दीन साहेबांपर्यंत पोहोचवली. मियांना हैदराबदमधे खूपच मान होता कारण मियां हजरत काले मियांसाहेब, चिश्ती निज़ामी फक़रीचे चिरंजीव होते आणि दिल्लीचे बादशाह आणि निजामाचे पीर होते. मियां रात्री आमच्या घरी आले व आमचे ते हाल पाहून खूप रडले. एक काळ असा होता की जेव्हा ते लाल किल्ल्यात येत तेव्हा सोन्याच्या वेलबुट्टी असलेल्या मसनदीवर त्यांना बसवले जात होते आणि बेगम एखाद्या दासी सारखी त्यांची सेवा करीत असे. आज ते घरी आले तर त्यांना बसण्यासाठी खाली अंथरायला फाटकी सतरंजी ही नव्हती. त्यांच्या डोळ्यासमोर भूतकाळ फिरू लागला. काय होते आणि हे काय झाले असे सारखे उसासे सोडत म्हणू लागले. आमची त्यांनी बराच वेळ चौकशी केली व नंतर निघून गेले. सकाळी सकाळी त्यांचा निरोप आला की त्यांनी पैशाची व्यवस्था केली आहे. आता हजची तयारी करण्यास हरकत नाही. हे ऐकल्यावर आमच्या आनंदास पारावार राहिला नाही.

थोडक्यात सांगायचे तर हैदराबादहून आम्ही मुंबईला आलो. तेथे आमचा मित्र व प्रामाणिक सोबत्याला, बस्तीला, त्याचा खर्च देऊन निरोप दिला. जहाजावर चढल्यावर एक माणूस आमचे बोलणे लक्षपूर्वक ऐकत होता. जेव्हा त्याला कळले की आम्ही शाही खानदानातील आहोत तेव्हा तो उतावळा होऊन आमच्याकडे पाहत बसे. त्यावेळी आम्ही सगळे दर्वेशीच्या वेषात होतो. एक हिंदू, ज्याचे बहुतेक एडनमधे दुकान होते, त्याने विचारले, ‘‘ तुम्ही कुठल्या पंथाचे फक़िर आहात ?’’ त्याच्या या प्रश्नाने माझ्या जखमांवर जणू मीठच शिंपडले. मी म्हटले, ‘‘ आम्ही मजलूम शाह गुरुचे चेले आहोत. (मजलूम = पिडीत) तोच आमचा बाप होता आणि तोच आमचा गुरु ! पापी लोकांनी त्याचे घरदार हिसकावून घेतले आणि आम्हाला त्याच्या घरातून जंगलात हाकलून दिले. आम्ही त्याच्या दर्शनासाठी तडफडतोय आणि तो आमच्या.’’
यापेक्षा आमच्या फ़किरीची हकिकत काय सांगणार ? आमची कहाणी ऐकून तो हिंदू व्यापारी रडू लागला, ‘‘ बहादूर शाह आपल्या सगळ्यांचेच बाप व गुरु आहेत. काय करणार, रामाची हीच इच्छा असावी. कारण नसताना बिचारे बरबाद झाले.’’

मक्‍केला पोहोचल्यावर अल्लाहने एका अजीब ठिकाणी आमची राहाण्याची सोय केली. माझा अब्‍दुल कादिर नावाचा एक गुलाम होता ज्याला मी बर्‍याच वर्षापूर्वी मुक्त करून मक्‍केला पाठवून दिले होते. येथे आल्यावर त्याने बरीच संपत्ती गोळा केली व ज़मज़मचा फौजदार झाला. आम्ही आलोय ही बातमी त्याच्यापर्यंत पोहोचल्यावर बिचारा धावतपळत आला व माझ्या पायावर लोळण घेऊन बराच रडला. त्याचे घर चांगले मोठे असल्यामुळे आम्ही मग तेथेच राहिलो. काही दिवसांनी सुल्‍तान रोमचा एक अधिकारी, जो मक्‍केतच राहात होता त्याला आमच्याबद्दल कळले तेव्हा तो आम्हाला भेटण्यासाठी आला. कोणी तरी त्याला सांगितले होते की दिल्ल्लीच्या बादशहाची मुलगी आली आहे आणि पडदा न करता तुमच्याशी बोलते. त्याने अब्‍दुल कादिरतर्फे माझ्याकडे भेट मागितली. जी मी मंजूर केली.

दुसर्‍या दिवशी तो अधिकारी आमच्या घरी आला व खूपच आदराने माझ्याशी बोलला. जाताना त्याने आमच्या आगमनाची बातमी सुल्‍तानाला सांगण्याची परवानगी मागितली पण मी बेपर्वाईने उत्तर दिले, ‘‘ आता मी सगळ्यात शक्तिमान अशा सुल्‍तानाच्‍या दरबारात आले आहे. आता मी दुसर्‍या कुठल्या सुलतानाच्‍या दरबारात कशी हजेरी लाऊ ? आता मला कोणाचीच पर्वा राहिलेली नाही.’’ त्या बिचार्‍याने आम्हाला खर्च करण्यासाठी मोठी रक्कम मंजूर केली. आम्ही तेथे ९ वर्षे राहिलो. त्यानंतर १ वर्ष बगदाद शरीफ व एक वर्ष नजफ अशरफ व करबलामधे काढले. एवढ्या काळानंतर मात्र दिल्लीची आठवण आलीच. बेचैन होऊन दिल्लीला परत आले. येथे इंग्रज सरकारने दया येऊन महिन्याला १० रुपयाची पेंशन सुरु केली. पेन्शनचा हा आकडा ऐकून मला प्रथम हसू आले,

‘‘ माझ्या बापाचा एवढा मोठा मुलूख घेऊन मला फक्त दहा रुपये !’’ पण नंतर विचार केला, ‘‘ मुलुख तर खुदाचा ! नाही कोणाच्या बाबाचा ! त्याला पाहिजे त्याला तो देतो आणि हिसकावून घेण्याची इच्छा झाली तर हिसकावून घेतो. त्याच्या परवानगीशिवाय तर मनुष्याला श्वास घेण्याचीही हिंमत नाही...’’

अनुवाद : जयंत कुलकर्णी.

क्रमश:

पुढची कथा : गुलबानो.

कथालेख

प्रतिक्रिया

ज्ञानोबाचे पैजार's picture

5 Jul 2018 - 6:29 pm | ज्ञानोबाचे पैजार

ही गोष्ट आवडली...
संपूर्ण मालिका रोचक होईल याबद्दल काही शंका नाही.
पुभाप्र
पैजारबुवा,

सोमनाथ खांदवे's picture

5 Jul 2018 - 8:41 pm | सोमनाथ खांदवे

येऊ द्या सर !!!
मी सभासद नसताना सुद्धा तुमचा फॅन होतो आणि तुमचे लेख आवडीने वाचायचो .

सिरुसेरि's picture

6 Jul 2018 - 10:50 am | सिरुसेरि

मनाला भिडणारे लेखन . घर फिरले की घराचे वासेही फिरतात .

श्वेता२४'s picture

6 Jul 2018 - 11:54 am | श्वेता२४

ही बाजूपण प्रकाशात येईल या निमित्ताने.

माहितगार's picture

6 Jul 2018 - 12:32 pm | माहितगार

रोचक, पु. ले. शु.

इथे अप्रत्यक्षपणे १८५७ चर्चेत आहे आणि दुसर्‍या धाग्यावर मॅकॉले मंदिराची उभारणी चालू आहे त्या निमीत्ताने बिटीश पार्लमेंट मधील १८५३ ची एक चर्चा (- म्हणजे १८५७ च्या अदमासे ३-४ वर्षे आधी-) त्यांच्या पार्लमेंट वेबसाईटवर वाचनात आली. मॅकॉले सोबतच्या त्या डिबेट मधील एक बिटिश संसद सदस्य VISCOUNT JOCELYN यांच्या वक्तव्यातील स्व-प्रमाणपत्र देणारा खालील भाग रोचक असावा.

......It was not true that the Government of India was a curse to the country. If this were Be, it was a terrible slur on the character of this nation. But it was not so. The simple fact was, that an Englishman might walk unarmed all through India, and be received everywhere with civility and courtesy. They held India at this moment with a force of 40,000 men; and yet since 1833 they had had no insurrection against their authority in India which had called for any interference on the part of Parliament; but he would remind the House that since that period they had had a rebellion in Canada; they had had two wars at the Cape of Good Hope; they had had a revolution in Ceylon, and an insurrection in New Zealand; and during all that time pot a single arm had been raised against British rule and authority in India. They had there a faithful army of upwards of 200,000 following their banners, and acting and co-operating with them in the field. These were all facts which could not be denied; and he firmly believed that the rule of the British Government had been, on the whole, a blessing, and not a curse, to the people of India.....

परिच्छेदात He हे सर्वनाम आहे पण परिच्छेदाच्या सुरवातीवरुन VISCOUNT JOCELYN यांचेच वाटते.

सुंदर अनुवाद. नवीन खजिना घेऊन आलात आमच्यासाठी. धन्यवाद.

चित्रगुप्त's picture

6 Jul 2018 - 2:08 pm | चित्रगुप्त

@ श्री. जयंत कुलकर्णी: नवीन अत्यंत रोचक आणि उत्कंठावर्धक कथामालेबद्दल अनेक आभार. रविंद्रनाथांनी सुद्धा या सारखी एक कथा लिहीली आहे त्यावरील चित्रपट बघितल्याचे आठवते. पुढील भागांची वाट बघत आहे.
@माहितगारः लोकहितवादी यांचे सर्व लेख इंग्रज सरकारचे महिमामंडन करणारे आहेत ना? लहानपणी वाचल्याचे आठवते.

बरोबरे म्हणून तर VISCOUNT JOCELYN यांचा परिच्छेद निवडला, भारतीयांच्या आधी कुणि कुणि उठाव केले याचा पाढाच वाचलाय त्यांनी . भारतीयांना पुलाखालून पाणि निघून गेल्या नंतर जाग येते. जागे राहीले तर भूतानही स्वतंत्र रहाते . एकेका संस्कृतीचा आपापला स्वभाव आणखी काय ?

सोमनाथ खांदवे's picture

7 Jul 2018 - 10:13 am | सोमनाथ खांदवे

'चरखा चला के ' आणि कमीतकमी मनुष्यहानी होऊन फुकटात मिळालेल्या स्वातंत्र्य मिळाल्यामुळे भारतीयांना स्वातंत्र्य ची किंमत नाही त्यामुळे देशाप्रती प्रेम राहिले नाही .अगोदर ब्रिटीश नंतर काँग्रेस पुढे भविष्यात भाजप ची गुलामी करत राहणार कारण नकर्त्या ची सतत गुलामी करणे हीच आपली संस्कृती आहे .

माहितगार's picture

7 Jul 2018 - 10:33 am | माहितगार

सहमत आहे. गुलामगिरी हा स्वभाव बनून आहे. आम्हाला प्रत्य्क्ष गूलाम बनवून ठेवता नाही आले तरी मानसिक गुलाम तरी बनवून ठेवा अशी भारतीयांची स्वतःचीच आशा असते.

चौथा कोनाडा's picture

8 Aug 2018 - 5:23 pm | चौथा कोनाडा

नंतर काँग्रेस पुढे भविष्यात भाजप ची गुलामी करत राहणार कारण नकर्त्याची सतत गुलामी करणे

सहमत.

अफगाणांनी ब्रिटीश सैन्याची पहिल्या युद्धात जशी वाट लावली होती , त्या मानाने आताचे अफगाण दहशतवादीही सभ्य वाटतील. आणि हे युरोमेरीकेस अनुभवातून माहित होते म्हणून कोल्ड वॉरकाळात रशियाची गळचेपी करण्यास दुसरा देश न निवडता अफगाणीस्तान निवडला.

चीन थोडीशीच वर्षे पारतंत्र्यात होते पण गहबज आणि छोट्या अनुभवातूनही राष्ट्रवाद तेवत ठेवण कौतुकास्पद वाटते.

अनिंद्य's picture

6 Jul 2018 - 2:43 pm | अनिंद्य

ही मालिका नक्की वाचणार.
पु भा प्र

आवडले!
काय ही अवस्था!
पुभाप्र

रातराणी's picture

7 Jul 2018 - 4:22 am | रातराणी

वाचतेय, पुभाप्र.

तुषार काळभोर's picture

7 Jul 2018 - 10:30 am | तुषार काळभोर

या विषयावर कधी विस्तृत व खोलात वाचलेले नाही.
प्रतीक्षा करायला लावणारी मालिका असणार ही.

धन्यवाद जयंत काका!!

नाखु's picture

7 Jul 2018 - 12:03 pm | नाखु

उन्हाळ्यातील (राजकीय) चर्चांपेक्षा हा हिरवागार श्रावण सुखद अनुभव आहे,

पुभा प्र

नाखु वाचकांचीही पत्रेवाला

मस्त लिहिले आहे साहेब .. कालच वाचले होते पण अभिप्राय देता आला नाही म्हणून आज देत आहे .. पुभाप्र

सगळी दुही पेरून गेले भडवे इंग्रज. खासकरुन

हे परवर्दिगार फक्त हीच नाही तर हिंदुस्तानचे सारे हिंदू-मुसलमान माझी लेकरेच आहेत आणि लवकरच या सर्वांवर संकट कोसळणार आहे. माझ्या कर्मामुळे, दुर्भाग्यामुळे यांची परवड नको. सगळ्यांना सुखरूप ठेव.’

‘‘ तू मला भाई म्हणालीस ! आजपासून तू माझी बहीण व मी तुझा भाऊ !’’ हा कोरालाचा एक सधन शेतकरी असावा. त्याचे नाव ‘बस्‍ती’ होते. त्याने आपली बैलगाडी तयार केली व आम्हाला त्यात बसवले व म्हणाला की तो आम्हाला पाहिजे तेथे सोडून येईल.

आमची कहाणी ऐकून तो हिंदू व्यापारी रडू लागला, ‘‘ बहादूर शाह आपल्या सगळ्यांचेच बाप व गुरु आहेत. काय करणार, रामाची हीच इच्छा असावी. कारण नसताना बिचारे बरबाद झाले.’’

अगदी कसंसंच झालं. त्यात त्या मेरठच्या शाही हकिमाचं वागणं च्यायला खरंच, वासे फिरायला वेळ लागत नाही. काँग्रेसने पण वर्षोनुवर्षे तेच केले आहे जे इंग्रज करत होते. दुर्दैवी!

अरविंद कोल्हटकर's picture

29 Jul 2018 - 11:26 pm | अरविंद कोल्हटकर

उत्तम आणि हृदयस्पर्शी अनुवाद. पुढच्या कथांची वाट पाहात आहे.
दिल्ली आणि आसपासच्या भागांमध्ये प्रथम स्थानिक प्रजा आणि नंतर इंग्रजी फौजा ह्यांनी विरुद्ध बाजूवर कायकाय अत्याचार केले ह्याची कथा William Dalrymple लिखित The Last Mughal मध्ये वाचली होती. ती वाचून बादशाहाच्या आणि अन्य उच्च घराण्यांचे पुढे काय झाले हे वाचण्याची उत्सुकता निर्माण झाली. असे काहीजण दक्षिणेस निजामाच्या आश्रयास गेले आणि त्यांनी स्वतःची आत्मवृत्ते लिहिली आहेत असेहि कळले. असे सर्व लेखन उर्दू किंवा पर्शियनमध्ये असल्याने ते आपल्यास वाचता येत नाही. अशा प्रकारचे लेखन इंग्लिश वा हिंदीमध्ये भाषान्तरित कोठे उपलब्ध आहे काय ह्यावर काही प्रकाश टाकू शकाल काय?

उलट इंग्रज बाजूने बरीच लेखने उपलब्ध आहेत पण हिंदुस्थानी बाजूचे वरील कारणामुळे विशेष काही भेटत नाही. From 'Sepoy to Subhedar' by Subedar Sitaram, a Native Officer of the Bengal Army असे एकच पुस्तक माझ्या संग्रहामध्ये आहे.

प्रत्येक शब्द न शब्द अचूक पणे ठेवला आहे. एखादा कलाकार एखादी वस्तू समोर तयार करीत आहे व ते आपण याची डोळा पहातो आहे असा एक भास. हि कथा कि आत्मचरित्र की इतिहास की सत्य प्रसंग वर्णन की अनुवाद, सर्वच प्रकारांचा आभास होतो. खूपच सुंदर.

स्वाती दिनेश's picture

3 Aug 2018 - 4:38 pm | स्वाती दिनेश

वाचते आहेच, पुभाप्र..
स्वाती

तिमा's picture

4 Aug 2018 - 5:58 pm | तिमा

फार सुंदर लिहिलं आहे. वाचत आहे.

पियुशा's picture

9 Aug 2018 - 8:58 pm | पियुशा

खुपच आवडले :)

महामाया's picture

4 Mar 2019 - 1:22 am | महामाया

त्याला ते प्‍याल किंवा पाल म्हणत.

त्याला पुआल म्हणतात.