बागेतले आवाज

जेडी's picture
जेडी in जनातलं, मनातलं
9 Jun 2018 - 11:49 pm

रोज सकाळी बागेत फिरायला जायचे म्हणून पाचचा कर्कश गजर लावते पण गजर ऐकून परत बंद करून एखादी डुलकी काढावी वाटतेच मग सकाळी सकाळी जाता येत नाहीच . मग सव्वा सातला बागेत पाऊल पडते . गेट समोरच एक कारंज्या आहे . त्याचा सरसर आवाज येत असतो . पण काही केल्या हा आवाज मला शब्दात पकडता येतच नाही म्हणून "सरसर" हा शब्द शोधला मी . तिथून पुढे गेले कि बऱ्याचशे लोक गोलाकार उभे असतात . आणि त्यांचा हे हे हु हु हो हो चाललेले असते . त्यांची हि ह ची बाराखडी किती किती वळणे घेते . तिथे उभे असणारे हसण्याचे नाटक करत असतात पण बाहेर चालणाऱ्याना त्यांच्या कडून पाहून खूप हसू येते त्यांचे ते कृत्रिम हसे पाहून बाकीचे बाहेरचे खूप हसत असतात . त्यांच्या हसण्याचा आवाज येत राहतो .
परवा एक छोटी आपल्या आजोबांबरोबर आलेली होती . आजोबा तिला थोड्या पुढे असणाऱ्या मुलांच्या खेळाच्या जागेकडे नेवु पाहत होती तर ती हट्टुण पुढे पाय उचलत नव्हती . आजोबा म्हणत होते , "झोपाळ्यावर नाही बसायचे तुला बाळ ?" ती," मला हसायला जायचे आहे". मज्जाच वाटली तिचे हे उत्तर ऐकून . आजोबांचे वय लहान होवू पाहत होते आणि तिला मोठे होण्याची घाई लागली होती
इथून पुढे खऱ्या अर्थाने चालणाऱ्याच्या पायाचे "झपझप " आवाज ऐकू येवू लागतो कारण हा रस्ता उताराचा आहे . . शूज घालून चालणाऱ्या पेक्षा धावणाऱ्या माणसांच्या शूज चा खूप आवाज येत असतो . आता बाग वळण घेते . त्या कोपऱ्यावर बच्चे कंपनीची जागा आहे . तिथे सी सा , घसरगुंडी , झोपाळे आणि बरीच खेळणी आहेत . मग झोके फिरतानाचा "करकर "आवाज येत असतो आणि त्या बरोबर कोणी मजेने हसत असतो तर कोणी घाबरून "स्सस " असा आवाज काढत असतो . कोणी आनंदाने ओरडत असतो . कोणी छोटी मुलं जबरदस्तीने झुल्यावर बसवली कि हे "भोकाड " पसरून, शिरा ताणून रडत असतात . सी सा वर मुलं खेळत असली कि जोरात एक बाजू टायर वर आपटून "फट फट " असा आवाज येत असतो . घसरगुंड्या -त्यावर पण एक "सुस्स्स " असा आवाज येतो अ. आणि त्या नळयासारख्या घसरगुंडीवरून कोणी आले की त्या नळ्या वाजतात त्याचाही एक आवाज येतो . तो हि आवाज मला शब्दात पकडता आला नाही . पण तो गडगड आवाज म्हणता येयील .
तिथून पुढे बागेच्या रस्त्याला चढ लागतो , आणि बागेत हिरवळीवर टाळ्या वाजवत बसलेले बरेच असतात . कोणी प्राणायाम करत असतो . त्यांचा नाकाने जोरजोरात श्वास सोडणे चालू असते . फूस फूस असा आवाज त्याचा येत असतो . तिथून पुढे काही जणांनी ओमकारचा नाद लावलेला असतो .
रस्त्यावर चालणारे आता चढाला चालत असतात . मग दमून ते सॉय सॉय आवाज काढत असतात . मधून त्यांचा चपलांचा घासाल्याचा आवाज येत असतो . काहींचा वेग मंदावतो मग संन्त आवाज येत राहतो .
तिथून पुढे एक ओहळ आहे . तिथे एक बाकडे आहे . तिथे त्यावर एखादे जोडपे बसलेले असते . इतक्या हळू आवाजात ते कुजबुजत असतात आणि आपल्याच धुंदीत मग्न असतात . घरात काही बोलायला मिळत नसेल म्हणून इथे येवून त्यांची लाडिक गुफ्तगू चालत असेल .
पुढे पुढे एक धबधबा येतो . त्याचा धबधब आवाज येत असतो . त्यात बरेच कावळे भिजून पंख फडफडवत असतात , त्यांच्या पंखाचा फडफडण्याचा आवाज येत असतो . मधेच काव काव करत असतात . धबधब्याशेजारी बच्चे कंपनी खूप असतात . त्यांचा त्यात उतरण्याचा प्रयत्न असतो . मग मजेत भिजत खळाळणारे पाणी अडवतात आणि फुर्र करून सोडून देतात . तेच पाणी पुढे छोट्या तलावात साठवलेय , तिथेही ही बच्चे कंपनी पण थोडी मोठी (१२ -१३ वर्षाची ) छोट्या छोट्या प्लास्टिक पिशव्यात हे पाणी भरून पुन्हा खाली सोडतात . त्याचा टप टप आवाज येत राहतो आणि पाण्यावर तरंग उमटतात . मध्येच बाहेरून जाणाऱ्या एखाद्या बसचा आवाज येतो , एखद्या स्कूटरचा . धबधब्याच्या थोडे पुढे म्हाताऱ्या बायकांचा एक अड्डा बसलेला असतो ,अगदी कासटा घातलेल्या ह्या आज्ज्या यायाम , सुना , नातवंडे , पोरं , दुखणी भानी ,डाकदर ह्यावर मनसोक्त गप्पा मारत असतात . जवळच खेळणाऱ्या नातवंडावर लक्ष ठेवून असतात . तिथेच जवळ काही दोरीवर उड्या मारणारे असतात . त्याचाही एक वेगळाच आवाज येत असतो . काही सुगावत्या सूर्याकडे पाहून मंत्र पुटपुटत असतात . मधेच चिमणी चिवचिवत असते . अगदी छोटी चिमणीसारखी दिसणारी चीरचीरत असते . मधुनच कोकीळ कुहूकुहू करत असते . मधेच बसायला असणाऱ्या छपराखाली काही हास्य क्लब वाले हाहू हेहे करत उड्या मारत असतात . अजून खूप सारे पक्षांचे आवाज येतात पण ते मला शब्दात बसवताच येत नाहीत .

आता बागेचा राउंड संपतो . बाहेर आल्यावर नारळ वाला खापखाप नारळ फोडून पाणी देत असतो , त्यांचे रेट सांगत असतो. मध्येच एखाद्या लहान मुलाने नारळ मागितलेला असतो. आई बाबा नको म्हणत असतात . मग त्याचे भोकाड पसरलेले असते . पुढे कसले कसले रस विकणारा असतो. तो बाटल्यातून रस ग्लासात ओतत असतो . तो ओतन्याचाही एक आवाज असतोच.

भाषाआस्वादलेखअनुभवविरंगुळा

प्रतिक्रिया

चांगला आहे. क्रमशः आहे का?

जेडी's picture

10 Jun 2018 - 8:31 am | जेडी

क्रमश: नाही.

कंजूस's picture

10 Jun 2018 - 4:42 am | कंजूस

छान झालय निरीक्षण.
सकाळ - संध्याकाळ दोन्ही वेळेचं एकदमच घेतलय.

जेडी's picture

10 Jun 2018 - 8:29 am | जेडी

संध्याकाळचे काय आहे ?

जयन्त बा शिम्पि's picture

10 Jun 2018 - 3:39 pm | जयन्त बा शिम्पि

बरं झालं अष्ठौप्रहराचे आवाज दिले नाहीत ते ! क्रमशः मध्ये तेही आलेच असते ना ?

Ranapratap's picture

10 Jun 2018 - 3:56 pm | Ranapratap

पु. ल. च्या आवाज आवाज या लेखाची आठवण जाली

चांदणे संदीप's picture

11 Jun 2018 - 1:58 pm | चांदणे संदीप

लेख आवडला

Sandy