माझे 125 वर्षाचे आजोबा.

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
12 Oct 2009 - 9:25 am

"कदाचीत माझे आजोबा आता मला माझ्या जीवनात मार्ग दाखवण्याच्या रुपात असतील,माझ्या स्मृतीच्या रुपात असतील किंवा आणखी काही रुपात असतील,हे खरंच मला सांगता येणार नाही."

आज माझे आजोबा जीवंत असते तर ते 125 वर्षाचे असते.माझ्या दहाव्या वर्षी ते गेले.त्यावेळी ते साठ वर्षाचे होते.त्यावेळी माणसाला आयुर्मान कमीच असायचं.
माझ्या आजोबांवर माझं खूप प्रेम होतं.आणि त्यांचं प्रेम आम्हा सर्व नातवंडावर होतं.माझे गोरेपान आजोबा स्वच्छ जांभळ्या रंगाचं सोवळं नेसून,वरून उघडे आणि खांद्यावरून कमरेकडे लोंबणारं त्यांचं जानवं, हातात ताम्हाण घेऊन गायत्री मंत्र मनातल्या मनात पुटपुटत संपलेल्या पुजेचं आचमन करून झालेलं ताम्हाणातलं पाणी आणि फुलं औदुंबराच्या चवथुर्‍यावर चढून औदुंबराच्या मुळाशी असलेल्या देवांच्या मुर्तिवर अभिषेक करण्या्साठी जाणारे माझे आजोबा मला अजून माझ्या चक्षु सामोरे येतात.

वय होत गेलं आणि त्यांची ही सर्व हालचाल कमी कमी होत गेली. नंतर नंतर ते आपल्या जीवाला अगदी कंटाळले.
अगदी सरते शेवटी जेव्हा माझ्या आजोबांनी अन्न-पाणी सोडून देलं आणि यापुढे जगायचं नाही असं ठरवलं ते ऐकल्यावर मी माझ्या आई बरोबर त्यांना भेटायला गेलो होतो.ह्या पूर्वी मी माझं जवळचं कुणीही हरवलं नव्हतं. म्हणून त्यांना भेटायला जायला मला मन होत नव्हतं.जणूं तसं केल्याने ते जीवंत राहणार होते.
तरीपण मी तिकडे पोहोचल्यावर, जीवन,मरण,आपलं कुटूंब आणि प्रेम ह्या गोष्टी काय ते मी समजलो.जणू माझ्या त्या जाण्याने माझे आजोबा माझ्या मनात जास्त जीवंत राहिले.
ह्यावेळेला प्रथम जेव्हा मी माझ्या आजोबांना पाहिलं,तेव्हा मोठ्या धक्क्याने घाबरून गेलो होतो.मी माझ्या आजोबांकडे पाहिलं तेव्हा ते कमजोर,दिसले आणि त्यांचं म्हातारं शरिर मृत्युशय्येवर निपचीत पडलेलेले होतं.मी पाहिलेले त्या प्रफुल्लीत चेहर्‍याचे ते माझे आजोबा मला दिसत नव्हते.आणि ज्यावेळेला मला हुंदका आला तेव्हा तडक न्हाणी-घरात गेलो-माझे दुःखाश्रू मला कुणाला दाखवायचे नव्हते.थोडा शांत होऊन मी परत त्यांच्या जवळ येऊन त्यांच्या डोळ्यात पाहू लागलो तेव्हा माझ्या नेहमीच्या नजरेतले माझे आजोबा मला दिसले.
तो सदाचा हंसमूख चेहर्‍याचा माझा "आजा " जो आम्हा सर्व नातवंडाना माडा-पोफळीच्या बनात नेऊन निसर्गावर कविता म्हणून दखवायचा,तोच माझा "आजा" जो औदूंबराच्या चवथुर्‍यावर माझ्या आजी बरोबर बसून गुजगोष्टी करताना तिच्या पासून दूर बसूनसुद्धा सरळ सरळ तिच्यावर प्रेम करताना भासलेला.
त्यावेळी दिवसातल्या निरनिराळ्या वेळेला माझ्या आजोबांच्या बिछान्याजवळ बसून उरलेल्या सर्व दिवसात आम्ही त्यांच्याशी बोलायचो ते बरचसं बोलणं त्यांच्या पेक्षा आमच्यासाठीच असायचं.
पण असं बोलत असताना त्यांच्या ओठावरचं ते हास्यस्फुट पहात राहायचो त्याची आठवण आता जागृत होते.मला वाटतं ते त्यांचं हंसणं ते काहीतरी बोलण्याच्या प्रयत्नात असावेत असंही भासवून द्यायचं.

त्यावेळचे त्यांचे ते बोलके डोळे, प्रेम आणि जीवन आठवून नाचत होते. त्या डोळ्यांच्या शक्तिबद्दल मला वाटत नाही की त्यावेळी त्यांना त्याची कल्पना येत असावी.कधी कधी तो त्या डोळ्यांचा नाच आशावादी असायचा तर कधी कधी उदास आणि हृदय हेलावणारा असायचा.हे सर्व त्यांचा शेवट होई पर्यंत होतं. कधी थोडं रडण्यात,कधी कधी अनुभव घेण्यात,कधी थोडं हंसण्यात आणि कधी निष्कर्षाला येण्यात मी तो काळ घालवला. विश्वास ठेवण्यासारख्या माझ्या मनात पुष्कळ गोष्टी आहेत पण सर्वांवर मात करणारा विश्वास म्हणजे जीवन सुंदर आहे हा.मला वाटतं मी काही प्रमाणात हे मानत होतो.पण एव्हडी निश्चितता त्यात नव्हती.

आता मात्र मला वाटतं की ही सुंदरता आपल्या अस्तित्वातच आहे, काही समयासाठी हे अस्तित्व उसन्या शरिरात वास्तव्य करतं,ही सुंदरता आत्म्यात वास करून असते पण डोळ्य़ामधून नाचत असते.
जीभेकडून होऊ शकत नाही म्हणून ती डोळ्यातून बोलकी होते.ही सुंदरता पडद्या आडचं रहस्य किंवा चमत्कार असते,आणि मृत्यु होताच शरिर सोडून जाते परंतु स्वतः मृत होत नसावी.

माझ्या हे सर्व ध्यानात आलं त्याचं फक्त कारण माझ्या आजोबांना शेवटचं अलविदा करताना ह्या दुःखाच्या दाहाला आणि भितीला मी सामोरा गेलो होतो.मला असंही वाटतं,मला त्यावेळी हे माहित नव्हतं कारण मी खरोखरीने अलविदा त्यांच्या शारिरीक अस्तित्वाला केला होता,एका अर्थी हे ही खरं आहे की माझे आजोबा एव्हडी वर्ष होऊन गेली तरी जेव्हडे माझ्या स्मृतित अजून राहिले आहेत की तेव्हडे त्यावेळी नव्हते.कदाचीत माझे आजोबा आता मला माझ्या जीवनात मार्ग दाखवण्याच्या रुपात असतील,माझ्या स्मृतीच्या रुपात असतील किंवा आणखी काही रुपात असतील,हे खरंच मला सांगता येणार नाही.परंतु,मला वाटतं ही अनिश्चितताच खरी सुंदर आहे आणि हे रहस्य जीवनाच्या रहस्यासारखंच आहे हे मात्र निश्चित आहे.

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

पर्नल नेने मराठे's picture

12 Oct 2009 - 10:35 am | पर्नल नेने मराठे

सुरेख !!! आजोबा डोळ्यासमोर उभे राहिले.
चुचु

अवलिया's picture

12 Oct 2009 - 10:37 am | अवलिया

मस्त लेख सामंत काका(आजोबा) ! :)

आधी शीर्षकवाचुन असे वाटले की सहजरावांवर लेख टाकला की काय ;)

--अवलिया
============
यॉर्कर भल्याभल्यांची दांडी उडवतो... म्हणुन पक्षपाती पंच त्याला नोबॉल ठरवतात.

प्रभो's picture

12 Oct 2009 - 12:45 pm | प्रभो

मस्त लेख सामंत काका(आजोबा) !

--प्रभो

सखाराम_गटणे™'s picture

12 Oct 2009 - 12:53 pm | सखाराम_गटणे™

सहजराव इतके व्रुदध आहेत?
मला तर ते तरुन वाटत होते

विष्णुसूत's picture

12 Oct 2009 - 10:38 am | विष्णुसूत

फेन्टास्टिक सामंत साहेब:

"तो सदाचा हंसमूख चेहर्‍याचा माझा "आजा " जो आम्हा सर्व नातवंडाना माडा-पोफळीच्या बनात नेऊन निसर्गावर कविता म्हणून दखवायचा,तोच माझा "आजा" जो औदूंबराच्या चवथुर्‍यावर माझ्या आजी बरोबर बसून गुजगोष्टी करताना तिच्या पासून दूर बसूनसुद्धा सरळ सरळ तिच्यावर प्रेम करताना भासलेला. "

"परंतु,मला वाटतं ही अनिश्चितताच खरी सुंदर आहे आणि हे रहस्य जीवनाच्या रहस्यासारखंच आहे हे मात्र निश्चित आहे."

फार आवडलं

माझी विनंती आहे कि तुम्ही तुमचे सर्व लेखन डिजीटल फॉरमॅट मधे जरुर साठवुन ठेवा. तुमचं सर्व लेखन मी वाचलेलं आहे. जरी इथे तुमच्या लेखना ला भरभरुन प्रतिसाद मिळत नसतिल तरी हि त्याची क्वालिटि फार चांगली आहे. तुम्ही एखादे पुस्तक जरुर प्रकाशित करु शकता.
अभिनंदन आणि शुभेच्छा !

भाग्यश्री कुलकर्णी's picture

12 Oct 2009 - 1:01 pm | भाग्यश्री कुलकर्णी

मलाही माझे आजोबा आठवले.मी दहावीत असताना ते गेले त्यामुळे माझं बालपण त्यांच्या सानिध्यातच गेले.खुप छान लिहले आहे.

sneharani's picture

12 Oct 2009 - 1:02 pm | sneharani

मस्त लेख सामंत काका(आजोबा) !

परंतु,मला वाटतं ही अनिश्चितताच खरी सुंदर आहे आणि हे रहस्य जीवनाच्या रहस्यासारखंच आहे हे मात्र निश्चित आहे."
छानच...

यशोधरा's picture

12 Oct 2009 - 2:37 pm | यशोधरा

सामंतकाका, हा तुमचा मला आत्तापर्यंतचा सगळ्यात आवडलेला लेख!

लवंगी's picture

12 Oct 2009 - 8:02 pm | लवंगी

खरच, आजोबा डोळ्यापुढे उभे राहिले.

मिसळभोक्ता's picture

12 Oct 2009 - 10:32 pm | मिसळभोक्ता

-- मिसळभोक्ता
(आमचेकडे सर्व प्रकारच्या आनंदांवर विरजण घालून मिळेल.)

विलास आंबेकर's picture

12 Oct 2009 - 8:23 pm | विलास आंबेकर

नमस्कार, सामंत साहेब,
आजोबांच्या आठवणी वाचुन मला माझ्यापण आजोबांची आठवण झाली.
माझे आजोबा मी लहान असतांनाच गेले. पण मला त्यांचा अभिमान वाटायचा कारण ते गावात पैलवान म्हणुन प्रसिध्ध होते. ( माझ्याकडे बघुन तुम्हाला अजिबात कल्पना येणार नाही ). ते छान उंचेपुरे, गोरे, धिप्पाड शरिरयष्टिचे, लांब झुपकेदार मिशांचे होते.
असो, तुमचे कौतुक करता करता मी माझ्या बद्दल बोलत सुटलो की!
तेव्हा, असेच छान छान लेख लिहित जा!
धन्यवाद!
विलास आंबेकर.

चित्रा's picture

12 Oct 2009 - 11:56 pm | चित्रा

>माझ्या आजोबांना शेवटचं अलविदा करताना ह्या दुःखाच्या दाहाला आणि भितीला मी सामोरा गेलो होतो.

दु:खाचा दाह - शब्द चपखल सापडले आहेत.
लेख आवडला, वेगळे सांगायला नकोच.

स्वप्निल..'s picture

13 Oct 2009 - 1:39 am | स्वप्निल..

>>माझ्या आजोबांना शेवटचं अलविदा करतांना....

मला हे करायला मिळालेच नाही ... :(

स्वप्निल

चतुरंग's picture

13 Oct 2009 - 5:00 am | चतुरंग

माझे आजोबा आठवले. ते गेले त्यादिवशी मी व बाबा बाहेरगावी गेलो होतो आणि नेमकी कधी नव्हे ते ३ तासाच्या प्रवासाला बस न मिळाल्याने ६ तास लागले होते. घरी आलो तो आजोबा गेलेले होते! :(
शेवटची भेट झालीच नाही.

(दु:खी)चतुरंग

भोचक's picture

13 Oct 2009 - 3:43 pm | भोचक

सामंतकाका छान लेख. काळीज हललं.
(भोचक)
तुम्ही पत्रकार आहात? कोणत्या पक्षाचे?

हा आहे आमचा स्वभाव

विसोबा खेचर's picture

13 Oct 2009 - 4:03 pm | विसोबा खेचर

म्हातार्‍या, सुरेख रे!

तात्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

13 Oct 2009 - 4:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सामंत साहेब, लेख आवडला.

-दिलीप बिरुटे

श्रीकृष्ण सामंत's picture

14 Oct 2009 - 5:57 am | श्रीकृष्ण सामंत

तुम्हा सर्वांना हा माझा लेख आवडल्याचे वाचून आपण दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले आभार न मानून कसं चालेल.?
मनस्वी आभार.

www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com