"लहाने"पण देगा देवा !

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जनातलं, मनातलं
20 Jul 2009 - 11:36 am

"लहाने"पण देगा देवा !

रविवार दिनांक १९ जुलै २००९, स्थळ सहयोग मंदीर , ठाणे (पश्चिम) आणि व्यास पौर्णिमेनिमित्त : व्यास क्रिएशन्स चा व्यास स्नेह महोत्सव.
सूर सप्तकांचे-हा श्री.संदीप वैद्य संकल्पित मराठी गाण्यांचा कार्यक्रम आणि श्री मधुकर मंडलेकर यांनी मराठीमधे अनुवाद केलेले (रोझेलीन पर्लमन यांचे मूळ इंग्रजी पुस्तक : द ब्लाईंड डॉ.जेकब बोलेटीन - ऑटोबायोग्राफी ) "मात अंधारावर" या पुस्तकाचे प्रकाशन हे निमित्त.
कार्यक्रमाची सुरुवात गणपती स्तवनाने झाली, आणि कार्यक्रम फुलत गेला.साधारण ५ गाणी झाली आणि सभागृहात "त्यां"चे आगमन झाले - ज्यांच्या हस्ते "मात अंधारावर" या पुस्तकाचे प्रकाशन होणार होते ते- पद्मश्री माननीय डॉ.तात्याराव लहाने !
पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम ताबडतोब आयोजित केला गेला.सूत्र संचालन केले रडिओवरील सुप्रसिध्द निवेदक श्री राजेंद्र पाटणकर यांनी आणि मग एकामागोमाग एक अशी भाषणे झाली.
सर्वप्रथम व्यास क्रिएशन्सचे संचालक श्री नीलेश गायकवाड यांनी प्रास्ताविक करुन कार्यक्रमाचे प्रयोजन सांगितले.यानंतर "आरोग्यम" या नियतकालिकेच्या संपादिका वैद्य सौ.सुचित्रा कुलकर्णी यांचे भाषण , मग ज्येष्ठ पत्रकार श्री अरविंद भानुशाली यांचे खुमासदार भाषण झाले.यानंतर "मात अंधारावर" या पुस्तकाचे अनुवादक श्री.मधुकर मंडलेकर यांचे भाषण झाले - त्यांनी "मात अंधारावर" हे पुस्तक ज्या अमेरिकन अंध डॉक्टरांवर लिहिले आहे त्या डॉ.जेकब बोलेटीन यांच्याविषयी माहिती सांगितली.
यानंतर व्यास क्रिएशन्स ने या वर्षीपासूनच "व्यास रत्न" या पुरस्काराला सुरुवात केली आणि या पुरस्काराचे मानकरी योग भूषण श्री.व्यवहारे यांना मानपत्र आणि गौरव प्रदान करण्यात आला.त्यांनी आपल्या भाषणात व्यास क्रिएशन्सचे आणि श्री.श्रीकांत नेर्लेकर - जे व्यास चे सल्लागार आहेत त्यांचे आणि व्यास च्या श्रीं.नीलेश गायकवाड आणि एकूणच व्यास परिवाराचे सार्थ कौतुक केले !
आता या "मात अंधारावर" या पुस्तकाचे पैलू पहा : मूळ पुस्तक लिहिले आहे ते डॉ.जेकब बोलेटीन - अंध होते ! तरी अफाट समाजसेवेचे व्रत घेतलेल्या या ध्येयवेड्या माणसाचा वयाच्या अवघ्या ३६ व्या वर्षी मृत्यु झाला - अतिश्रमाने ! त्यांच्यावरील हे पुस्तक एका वर्षात अनुवादीत करणारे श्री.मधुकर मंडलेकर ह्यांची दृष्टी पण अधूच आहे ! आणि असे हे पुस्तक प्रकाशित करण्यासाठी प्रमुख पाहुणे होते - आपल्या भारतातील ख्यातनाम नेत्रविशारद पद्मश्री डॉ.तात्याराव लहाने !
पुस्तक प्रकाशित करताना संपूर्ण सभागृहातील दिवे मालवण्यात आले , आणि ज्या खोक्यात ह्या पुस्तकाच्या वेष्टनाधिष्टित प्रती होत्या , त्या खोक्यात लाल दिवा लावून मग त्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले - अशा प्रकारे "मात अंधारावर" प्रकाशात आले ! इतकी सामाजिक जाणीव असणारे "व्यास क्रिएशन्स" चे कौतुक करावे तेव्हढे थोडेच आहे ! आणि या व्यास परिवारातील सर्वच लोक - सुधीर सर, मनिषा, प्रणाली, मयेकर, मनोज आणि इतर सारे यांची हसतमुख वागणूक हे खरोखरच कौतुकास पत्र आहेत ! मी स्वतः - माझे "रत्नपारखी शिवराय्-भाग १-बाजी पासलकर" या पुस्तकाच्या प्रकाशनामुळे इतक्या चांगल्या संस्थेच्या जवळ आलो , हे माझे भाग्य !

आता वळूया तात्याराव यांच्या भाषणाकडे :
तात्याराव म्हणाले .....
माणसाला पाच इंद्रिये असतात , यातील एखादे कमी असते तेंव्हा ती शक्ती इतर चार इंद्रियात विभागली जाते.आणि म्हणूनच या "मात अंधारावर" या पुस्तकातील नायक डॉ.जेकब बोलेटीन यांना एक मैलभर अंतरावरून पण दूरवरच्या बेटाचा सुगावा लागला ! ते आपल्या ३००० रुग्णांपैकी कुअणालाहे निव्वळ आवाजावरून ओळखत आणि त्याला कुठे आणि काय उपचार केले ते सांगत ! आपल्या मेंदूची किती जी.बी.मेमरी आहे हे अजून सिध्द व्हायचय , पण ती नकीच लक्ष जी.बी असणार , फक्त आपण सारेच ती "स्व" साठी = स्वार्थासाठी वापरतो , दुसर्‍यासाठी आणि देशासाठी - अशा २ "द" साठी वापरत नाही !
आपला डोळा - बुब्बुळ हे २१ मि.मि. असते , ते २२ झाले के ३ नंबर्चा चश्मा लागतो, २३ झाले की ६ नंबरच , २४ झाले की ९ नंबरचा.....म्हणजे प्रत्येक १ मि.मि. साठी ३ नंबरनी चष्मा बदलतो ! पण अश्या वेळी त्या माणसाचा पुढील मेंदू हा खूप प्रगल्भ होतो , आणि म्हणून तुम्ही पहा , सगळे सायंटीस्ट लोक चश्मावाले आहेत !
वैयक्तिकरित्या मी १ लाख ऑपरशन्स केली , २ लाख ६० हजार रुग्ण तपासले ! मला जरी पद्मश्री मिळाले असले तरी त्याचा मानकरी मी एकटा नाही- माझे ६७ सहकारी आहेत , श्रेय फक्त मला मिळाले !
मी अत्ताच श्री.व्यवहारे यांनी सांगितल्याप्रमाणे योग आणि विज्ञान याचा बराचसा जवळचा संबंध आहे असे मानतो ! माझीच हकीकत ऐका :
मी १९९१ साली खूप आजारी पडलो , माझ्या दोन्ही किडनीज निकामी झाल्या होत्या.आमच्या लातूरमधे डॉक्टर लोक औषध देतात आणि हे घ्या असे सांगतात , पण इकडे मुंबईतल्या डॉक्टरांनी मला दुसर्‍या दिवशी बोलावले ! आणि मला किती नातेवाईक वगैरे विचारुन आयिर्विमा काढायचा सल्ला दिला , मी बँकेकडून कर्ज घेऊन ४३,००० रुपये भरुन ५ लाखाचा विमा काढला , सर्व नातेवाईकांना भेटून घेतले.आणि आता रोज घरून निघताना बायकोकडे बघून निघायचो , की आता घरी परतण्याची काही शाश्वती नाही ! १ वर्ष गेले , जून १९९२, मी जिवंतच , मी म्हटले आपली काही चूक झाली असेल हिशेबात , वाट पाहू(मरणाची!) , अजून १ वर्ष गेले , आणि १९९४ साली डॉक्टर म्हणाले आता तुमचे ऑपरेशन होऊ शकेल ! मला किडनी माझ्या आईने दिली ! तिच्या बरगड्यांच्या फासळ्या काढून मला किडनी बसवली गेली, शुध्दीत आल्यावर तिने मला भेटण्याची इच्छा दाखवली.आपल्या दुखर्‍या भागावर हात ठेवलेली माझी आई काचेआडून मी हात हलवताच तिचा तो स्वतःच्या दुखर्‍या भागावरील हात कधी गळून पडला कळलेच नाही ! ही आई असते ! वडील - श्रीमंत मुलकडे जातात , पण आई नाही ! विज्ञानाने "मरण" सांगितलेला माणूस "आशिर्वादाने" आजून जिवंत आहे ! हा आशिर्वादाचा महिमा आहे !

हे पुस्तक तुम्ही वाचा आणि आपल्या मनाच्या अपंगत्वावर मात करा ! या इथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांना मला सांगायचय की महिन्यातले २९ दिवस पैसे कमवा जरूर पण १ दिवस २ गरीब पेशंट्स तपासा आणि उपचार करा , त्यांचे लाभलेले आशिर्वाद हे इतर २९ दिवस मिळालेल्या पैशांपेक्षा जास्त महत्वाचे आहेत , करून बघा !
अखंड टाळ्यांच्या गजरात तात्यारावांचे भाषण संपले ! घशात आलेला हुंदका , आवंढा आणि डोळ्यातील पाणी लपवत मी वरच्या मजल्यावर चहा घेत असलेल्या तात्यारावांना भेटायला गेलो.व्यास चे श्रीं.नीलेश गायकवाड यांनी माझी ओळख करुन दिली आणि माझ्या पुस्तकाबध्दल त्यांना सांगितले.चहा घेत असलेले ते पद्मश्री तात्याराव , उठून उभे राहिले, मी त्यांना नमस्कार केल्यावर , त्यांनी मला मिठी मारली ! यापेक्षा जास्त मोठा क्षण काय असू शकतो? हे सोनेरी क्षण माझ्या आणि माझ्यासारख्या असंख्य लोकांच्या वाटेला देणार्‍या "व्यास" चे ऋण ७ जन्मांत फिटणार नाही , नव्हे , ते कधी फिटूच नये !
तात्याराव हे रोज ५ ते ९ जे.जे.मधे पत्रांना स्वतःच्या हातांनी लिहून उत्तरे देतात , रोज २५ पत्रे लिहितात ! माझे पुस्तक त्यांना दिले गेले आहे हे कळल्यावर मला "मी वाचणार आणि तुम्हाला प्रतिक्रिया पण कळवणार" असे म्हटले !
कालचा हा कार्यक्रम पाहिल्यावर बाकी राहिलेला गाण्यांचा कार्यक्रम ऐकला , पण मन तात्याराव मय किंवा "लहाने"मय झाले होते ! कै.बाळ कोल्हटकर यांच्या "लहानपण दे गा देवा !" या नाटकातील उक्तीप्रमाणे आता मला कधीही "लहानपण दे गा देवा !" असे न वाटता , "लहाने"पण दे गा देवा असेच वाटत राहील !
परमेश्वरा , या आमच्या भारतात अश्याच प्रभॄती जन्मास येवोत , आम्ही अश्या लोकांकडून फूल ना फुलाची पाकळी म्हणून काहीतरी आम्हाला शिकता येवो आणि आम्हाला सर्वांनाच "लहाने"पण दे गा देवा अशी तुझ्या चरणी प्रार्थना !

समाजआस्वाद

प्रतिक्रिया

विशाल कुलकर्णी's picture

20 Jul 2009 - 12:23 pm | विशाल कुलकर्णी

डोळ्यांच्या एक लाखाच्यावर शस्त्रक्रिया करणारा हा हिमालयाएवढा माणुस कायम जमीनीवर असतो. या हिमालयाला माझे शतशः प्रणाम !

सस्नेह
विशाल
*************************************************************
मज पिसे लागलेले सुखांचे
गे हलकेच धुके ओसरते आहे...

प्रमोद देव's picture

20 Jul 2009 - 2:09 pm | प्रमोद देव

डॉक्टर लहाने...आडनावाने लहान असले तरी खूप महान आहेत आणि तरीही ह्या माणसाचे पाय अजूनही जमिनीवर आहेत.
ह्या विभूतीला माझा सादर प्रणाम!
उदयराव,तुम्हीही भाग्यवान आहात. अशा माणसाचा सहवास लाभणे हा एक भाग्ययोगच असतो. तो तुम्हाला लाभला. अभिनंदन!

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

दशानन's picture

20 Jul 2009 - 4:51 pm | दशानन

>>डॉक्टर लहाने...आडनावाने लहान असले तरी खूप महान आहेत आणि तरीही ह्या माणसाचे पाय अजूनही जमिनीवर आहेत.
ह्या विभूतीला माझा सादर प्रणाम!

हेच म्हणतो.

अक्षरशः निशब्द झालो आहे.. !

टुकुल's picture

21 Jul 2009 - 3:43 am | टुकुल

एवढ्या थोर व्यक्तीची ओळख करुन दिल्या बद्द्ल धन्यवाद.

-- निशब्द टुकुल

घाशीराम कोतवाल १.२'s picture

20 Jul 2009 - 4:54 pm | घाशीराम कोतवाल १.२

अहो देव काका आमचे एक स्नेही डॉ. लहाने ना चांगले ओळखतात माणुस खरच खुप नम्र आणी थोर आहे एकदा त्यांच्या बरोबर बोलण्याचा योग आला होता खुप मस्त व्यक्तीमत्व आहे डॉ तात्याराव लहाणे
हॅट्स ऑफ देम

**************************************************************
"मराठी संकेतस्थळ चालावे ही तो तमाम मराठी वाचकांची इच्छा"
सौजन्य अदिती

संजय अभ्यंकर's picture

20 Jul 2009 - 10:50 pm | संजय अभ्यंकर

डॉ. तात्याराव लहानेंची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद!

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/