चिझ पावभाजी

साहित्यः
बटाटे - १/२ किलो
लालबुंद टोमॅटो - १/२ किलो
सिमला मिर्ची - १ नग (मोठी)
मटार दाणे- १/२ वाटी
कांदे :- भाजी साठी २ वरून सजावटीसाठी २
अमूल बटर - ४०० ग्रॅम
काश्मिरी मिरच्या - १०-१२
मीठ - चवीनुसार
धणे पावडर - २ टेबलस्पून
पावभाजी मसाला (बादशहा किंवा एव्हरेस्ट) - २ टेबल स्पून
लसूण पेस्ट - १ ते १-१/२ टेबलस्पून
कोथींबिर - वाटीभर
छेडर चिझ - १०० ग्रॅम

कृती:

बटाटे उकडून, साले काढून, कुस्करून ठेवावेत.
टोमॅटो, सिमला मिरची, कांदे बारीक चिरून ठेवावेत.
मटारचे दाणे उकडून ठेवावेत.
काश्मिरी मिरच्या गरम पाण्यात अर्धातास भिजवून मिक्सर मधून ग्राइंड करून त्याची मुलायम पेस्ट करून ठेवावी. पेस्ट जितकी मुलायम होईल तितका त्याचा रंग जास्त लाल भडक होत जातो.
प्रथम एखाद्या पसरट जाड बुडाच्या पातेल्यात मंद गॅस वर २०० ग्रॅम अमूल बटर गरम करावे. बटर पूर्ण वितळण्याआधीच त्यात बारीक चिरलेला अर्धा कादा घालावा आणि परतावा. (नुसते बटर लवकर जळते) नंतर, सिमला मिरची, उकडलेले मटार घालून परतावे. परतून, शिजून मऊ झाले की पावभाजी करण्याच्या चेपणीने मस्त चेचून घ्यावेत. फायनल चवीत ही पायरी खूप बदल घडवू शकते. शिजलेला कांदा, सिमला मिरची, वाटाणे चांगले चेचून एकजीव झाले पाहिजेत. नंतर, त्यावर बटाटे, टोमॅटो, धणे पावडर, पावभाजी मसाला, लसूण पेस्ट, काश्मिरी मिरची पेस्ट घालून नीट परतावे. थोडे थोडे पाणी घालून चेपणीने चेचत राहावे. गॅस फुल्ल असावा. चेचून चेचून सर्व भाजी एकजीव झाली, बटर किंचीत दिसायला लागले की त्यात अर्धी कोथींबिर आणि पुन्हा १०० ग्रॅम बटर घालून सर्व एकजीव करावे. थोडेथोडे पाणी घालून भाजीचा पोत सांभाळावा.
आता गॅस बंद करून भाजी खाली उतरवावी. एखाद्या बाऊल मध्ये भाजी काढून त्यावर थोडी कोथींबिर भुरभुरून वरून १०० ग्रॅम चिझ किसून टाकावे.
प्लेट मध्ये तो बाऊल ठेवून शेजारी बारीक चिरलेला कांदा, लिंबू , हिरवी मिरची आणि खरपूस भाजलेले पाव ठेवून सादर करावे.

शुभेच्छा....!

Taxonomy upgrade extras: 

प्रतिक्रिया

तुमचे पदार्थांचे फोटो बघून तोंडाला पाणी सुटले, इतके अनावर की कळफलक खलास झाला!

लालबुंद टोमॅटो - हे अमेरिकेच्या उत्तरेकडे उन्हाळा येईस्तोवर मिळतच नाहीत. त्यामुळे आणखीनच तरसलो.

एका छानश्या पाककृतीबद्दल आभारी आहे.
धन्यवाद

धन्यवाद, सुवर्णमयी.
अमेरिकेसारख्या 'समृद्ध' देशात साध्या टोमॅटोची वानवा असावी म्हणजे 'बडा घर पोकळ वासा'च म्हणावे की काय?

आधी खमंग कृती देता आणि नंतर त्याहूनही खमंग फोटो!
त्यातून बाहेर गच्च गारठा आणि बर्फाचा चिखल, आणखीनच खावेसे वाटते!
लाळ गिळून, गिळून हैराण झालोय, त्रास होतो हो, आता रात्रभर पावभाजीची स्वप्ने!

चतुरंग

श्री. धनंजय,

लालबुंद टोमॅटो - हे अमेरिकेच्या उत्तरेकडे उन्हाळा येईस्तोवर मिळतच नाहीत. त्यामुळे आणखीनच तरसलो.

टेट्रापॅक मध्ये 'फार्म फ्रेश टोमॅटो पल्प' मिळत असेलच तो वापरावा. तोही कढईत काढून आधी निट शिजवून घ्यावा म्हणजे प्रिझर्वेटीव्हज् मुळे येणारी 'दूसरीच' चव जरा कमी होउन तो पल्प जास्त नैसर्गिक वाटेल.

श्री. चतुरंग,

त्यातून बाहेर गच्च गारठा आणि बर्फाचा चिखल, आणखीनच खावेसे वाटते!

अहो, तुमच्या वर्णनाने मला इथे भारतात तुमचा हेवा वाटतोय. मांसाहारी असाल तर झणझणीत कोल्हापुरी मटण बनवून आस्वाद घ्यावा. नसलात तर, खानदेशी तिखटजाळ शेवेची भाजी......खल्लास.

आज चीझ पावभाजीच करणार...सगळ्या वस्तू घरात आहेत्,मग देर किस बात की? :)
स्वाती

स्वाती,

माझ्याकडून शुभेच्छा! भाजी कशी झाली कळवावे.

तुमच्या रेसिपिने केली हो काल पावभाजी,झकास!धन्यु!जर्मनीत पावभाजीच्या गाड्या नाहीतच, म्हणूनच केवळ नवर्‍याचा ती घरी केली आहे यावर विश्वास बसला,:-) आजवर इतक्या वेळा केली पण अशी कधी नव्हती झाली..
कश्मिरी मिरच्या नाही मिळाल्या म्हणून ज्या होत्या त्याच लाल मिरच्या घेतल्या,त्यामुळे रंग काळपट आला,म्हणून मग मी (अतिशहाणपणा करून) २ चिमूट तंदूर रंग घातला,त्याने एकदम फर्स्टक्लास रंग आला,:)
स्वाती

२ चिमूट तंदूर रंग घातला
काही हरकत नाही. मी मुद्दाम ते सुचवले नव्हते. कारण मग काही जणं काश्मिरी मिरच्या शोधण्याचा प्रयत्नही करणार नाहीत. असो.

अभिनंदन.

पाककृती, विशेषतः त्यातले बारकावे आणि फोटो अप्रतिम!

नंदन
(मराठी साहित्यविषयक अनुदिनी
http://marathisahitya.blogspot.com/)

आता पुण्याला यायलाच हवे!

असे नुसते वाचण्यापेक्षा प्रत्यक्ष येतो, चार समविचारी लोक भेटु, खाउ पिउ, गप्पा मारू चार घटका मजेत घालवु!

साक्षिदेवा,

पुण्यात कधी जायचं तेवढं बोल. :)

पेठकरकाका, अहो का असा नुस्ते फोटू देवून अन्याय करताय? :)

तात्या.

येई तोवर थांबा गड्यांनो....
(२३ फे.०८ पासून मु.पो. पुणे)केशवसुमार

पाव भाजी उत्तम आहे हे सां.ल.

पण आपल्याला त्यात चीझ अजाबात आवडत नाही..
अख्या मॅकल्सफिल्ड मधे माझी पाव भाजी फेमस आहे..
या एकदा २१ ईस्ट गेटला..
(आमंत्रक)केशवसुमार

असं असेल तर शनिवारी लंडनला येताना डब्यात घेउन या ;)

पेठकर काका,
पाककृती वगैरे सगळे कबूल, पण फोटो देऊन लई अन्याय करता बॉ आमच्यासारख्यांवर :(
(हावरट)बेसनलाडू

सर्वश्री. नंदन, सर्वसाक्षी आणि बेसनलाडू,
मनःपूर्वक धन्यवाद.

सर्वसाक्षी,
वेळात वेळ काढाच. बरेच दिवस झाले, 'समविचारींचे' सम्मेलन झाले नाही.

फोटो टाकून फार पंचाईत करता आमची.:)))
मस्त रेसिपी आहे. या रविवारी ३/४ फॅमिली जमणार आहोत तेव्हा पावभाजी करण्याचा बेत आहे.
यावेळी तुमची रेसिपी फॉलो करू .
मस्त फोटो आणि रेसिपी सुद्धा.:))

तोंडाला पाणी सुटलय. या रविवारी पावभाजी करावीच म्हणतो.

आपला
- (खादाड) सूर्य.

कुठे मिळणार? त्याला काही सब्स्टीट्यूट आहे का ?

स्वाती राजेश,
सोमवारी प्रतिक्रिया टाका मिपावर. वाट पाहीन.

श्री. सूर्य,
जरूर करून पाहा आणि सोमवारी सांगा कशी झाली ते.

वरदा,
आख्या काश्मिरी सुक्या मिरच्या नाही मिळाल्या तर काश्मिरी मिरच्यांची तयार पावडर मिळते ती वापरावी. अथवा, आख्खी सुकी बॅडगी मिरची वापरावी, तीही नाही मिळाली तर बॅडगी मिरचीची पावडर मिळते ती वापरावी. ह्यातील काहीतरी मिळेलच......
नाहीतर तयार पावभाजी खाणेच सोयीचे.

प्रतिक्रियांबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार.

तुमच्या पावभाजीचा फोटु झकास.. फोटु पाहुनच खल्लास!! धन्यवाद
काय राव!! मात्र आम्हाला इथे जिभेचे चोचले पुरवणे कठीण जाते. :(( पल्पची चव आवडत नाहि (तुमचा उपाय करून बघितला आहे, तरी खर्‍या लालबुंद टॉमेटोची सर नाहि), कश्मिरी मिरच्यांची बोंब, अमेरिकन बटाटे जास्त गोडसर वाटतात.. वगैरे वगैरे..
असो. पुढच्या महिन्यात भारतात येतो आहे तेव्हा खाईन :) तो पर्यंत पावभाजीची भूक फोटोवर भागवतो :)

-ऋषिकेश

नाहीतर तयार पावभाजी खाणेच सोयीचे.

अहो ती मिळत असती तर काय हवं होतं सगळे गुजराती मिळमिळीत पाव भाजी देतात..काही मजाच नाहि त्यात्..आता वेकेंडला ह्यातली कुठली मिरची मिळते का पहाते...थँक्यू सो मच.....

अहो ती मिळत असती तर काय हवं होतं सगळे गुजराती मिळमिळीत पाव भाजी देतात..
हा हा हा :) अगदी मनातलं बोललात :)

वरदा आणि ऋषिकेश (आणि इतर अमेरिकन समदु:खीही)

तुमच्या दु:खात मी मनापासून सहभागी आहे. मस्कत मध्ये पूर्वी पासून गुजराथी खानावळीत पावभाजी नामक सपक पदार्थ मिळायचा. एका ठिकाणी तर पावभाजीत वांगी घालायचे. त्या सर्वाला वैतागून मीच पावभाजी बनवून विकण्यास सुरुवात केली. लाकडाला स्पर्श करून सांगावेसे वाटते आज मस्कत (सल्तनत ऑफ ओमान) मध्ये उत्कृष्ट पावभाजी (आणि इतर बंबैय्या स्नॅक आयटम्स्) मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे माझे फास्ट फूड जॉइंट आहे.असो. आत्मस्तुती फार झाली. सांगण्याचा उद्देश एकच होता की तुमची असहाय्यता मी मनापासून समजू शकतो.

प्रतिसादा बद्दल धन्यवाद.

लाकडाला स्पर्श करून सांगावेसे वाटते आज मस्कत (सल्तनत ऑफ ओमान) मध्ये उत्कृष्ट पावभाजी (आणि इतर बंबैय्या स्नॅक आयटम्स्) मिळणारे एकमेव ठिकाण म्हणजे माझे फास्ट फूड जॉइंट आहे

असे असेल तर आपण आपली शाखा अमेरीकेत का नाही उघडत?
का आपल्याला पण पुणेकरांप्रमाणे 'आमची कुठेही शाखा नाही' असे सांगण्यात भूषण वाटते?

(पेठकर फूड जॉइंट, न्यू यॉर्क. च्या प्रतिक्षेत असलेला)
डॅनी....
पुण्याचे पेशवे

सुदैवाने आमच्या सौ. सुगरण असल्याने माझे जिभेचे चोचले जरी पुरवले जात असले, तरी इकडे 'बोस्टन आणि पंचक्रोशीत' वळवळणार्‍या जिभा आणि तळमळणार्‍या आत्म्यांची कमतरता नाही!
इथले भारतीयच नाहीत तर अमेरिकन्सही पक्के भारतीय खाद्याचे चाहते झाले आहेत. त्यामुळे खरोखरच गांभीर्याने विचार करायला हरकत नाही.

चतुरंग

श्री. धनंजय मिराशी आणि चतुरंग,

असे असेल तर आपण आपली शाखा अमेरीकेत का नाही उघडत?
का आपल्याला पण पुणेकरांप्रमाणे 'आमची कुठेही शाखा नाही' असे सांगण्यात भूषण वाटते?

अमेरिकेत शाखा उघडणे खचितच आवडेल. (आणि 'कुठेही शाखा नाही''असे कसे? मस्कतमधे आहे नं!) पण ह्या व्यवसायात आमच्या चिरंजिवांनी पाय रोवले की मग त्यालाच सांगेन.
सध्या (येत्या ५ वर्षात) रिटायर्डमेंटचे डोहाळे लागले आहेत. आता नुसते अमेरिका नाही विश्वभ्रमण करण्याचा मानस आहे.
आपल्या निमंत्रणा बद्दल मनःपूर्वक आभार. असाच लोभ असू द्यावा.

आलंच पाहीजे.....आम्हाला काय धन्यवाद देता तुम्ही एवढी हिट रेसिपी आमच्याशी शेअर केलीत त्यासाठी तुम्हालाच धन्यवाद....
(पावभाजीप्रेमी) वरदा

जरूर या. पण येण्या आधी एक व्यनी टाकलात तर मस्कतला स्वतः हजर राहीन. (सध्या पुण्यात असतो)

मग मस्कतला कशाला ठाण्यात येणारे तेव्हा पुण्यातच येते की......आमंत्रण दिल्याबद्दल धन्यवाद्...माझा स्वयपाक जरा यथातथाच आहे....तेव्हा मला अशाच नवीन पाककृती शिकवत रहा...मग पहा मीच ठाण्यात बोलावते तुम्हाला......

मग मस्कतला कशाला ठाण्यात येणारे तेव्हा पुण्यातच येते

अवश्य या. कधी येताहात भारतात?

मी गणपतीला येते दरवर्षी तिथे..म्हणजे सप्टेंबर्मधे येईन यंदा....

तू (म्ही) बनवलेल्या पाकक्रुती चे चित्र आहे का हे?

तू बनवलेल्या पाकक्रुती चे चित्र आहे का हे?
होय पाककृतीही माझी आहे आणि छायाचित्रही मीच काढलेले आहे.

ह्या रविवारचा बेत पक्का ... पेठकरा॑ची चिझ पावभाजी...
इस रविवारकि शाम...पेपा (पेठकरा॑ची पावभाजी) के नाम...

प्रभाकरपंत...
आपण फारच सुगरण आहात बुवा..! आपली बायको अतिशय भाग्यवान आहे ..
आपण पाककृतीही अतिशय बारकावे दाखवून लिहिली आहे.
आवडली. आणि पावभाजी मध्ये स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन खूप छान केलं आहे. पण मेलं इथे त्या काश्मिरी मिरच्या कुठून आणायच्या? बघू काहीतरी करून या विकांतास करेन ही पावभाजी.

धन्यवाद.

- प्राजु

आपली बायको अतिशय भाग्यवान आहे ..
लग्नाची 'सिल्व्हर ज्यूबिली' जवळ आली आहे. परंतु, तिची अवस्था अजूनही कस्तुरीमृगासारखी आहे.

छायाचित्रपण छान. मालाडला जवळच मिळते. तुमच्याएवढी चांगली नसेल. पण मिळते. भारत माता की जय. जय महाराष्ट्र. आता जीभ चाळवली. लवकरच खाईन. आताच जेवलो म्हणून. आणखी येऊ द्यात.

नमास्कार,
आजच बघी तली तूमाची रेसीपी,उद्या नक्की करेन्,पण ईथे,सेशेल्स्ला, पाहीजे त्या वस्तु मिलतिल तर शप्पथ.
पण फोटो बघुन रहावत नहिये.

उमाताई,

तुमचं मराठी खूप छान आहे. त्याला असंच भाबडं आणि इनोसन्ट राहू द्या. शुद्धलेखनाच्या आणि प्रमाणभाषेचा श्रूंखलात जखडून टाकून त्यातला भाबडेपणा हरवू नका ही विनंती...! :)

आपला,
तात्या.

तात्या नमस्कार,
सॉरी,पण पूढच्यावेळी प्रतिक्रीया लिहीताना काळजी घेइन,चूका कमी करीन शुद्धलेखनाच्या.
चांगली शालजोडीतली दिलीत माझ्या आई सारखी.
येवढं (होपफूली करेक्ट ) लिहायला१५ मिनीटं लागली मला.

सॉरी,पण पूढच्यावेळी प्रतिक्रीया लिहीताना काळजी घेइन,चूका कमी करीन शुद्धलेखनाच्या.

अहो खरंच तसं काही नाही उमाताई, काहीतरी गैरसमज होतो आहे तुमचा!

तुम्ही लिहा हो बिनधास्त तुम्हाला जमेल तसं! मिसळपाववर शुद्धलेखनाचं फाजील कौतुक केलं जात नाही आणि उलटपक्षी हा तात्या मराठी भाषेला शुद्धलेखनाच्या आणि प्रमाणभाषेच्या शृंखलांतून मोकळं करायला नेहमी भाषिक डुढ्ढाचार्यांशी लढायला उत्सुक असतो..! :)

आपण नवीन आहात तेव्हा कदाचित आपल्याला आमच्या या लढ्याची कल्पना नसेल! :)

असो, तेव्हा टोमणा वगैरे मारण्याचा किंवा शालजोडीतली हाणण्याचा माझा खरंच कुठलाही हेतू नव्हता. कृपया गैरसमज नसावा..

तात्या.

धन्यवाद,
खरच हायसं वाटलं.
उमा वैद्य

Tatya, you are simply great.

ते तर आहेच! :)

तात्या.

पेठकर सर,
तुमची रेसिपी फॉलो करून काल पावभाजी बनवली. चवदार झाली होती.
सर्वांना आवडली. आभारी आहे.
तसेच एक फरक केला ब्याडगी मिरची ची पावडर वापरली.

खरेतर मी श्रावण घेवडा, गाजर घालत होते कारण मुले जर भाज्या खात नसतील तर पावभाजी च्या निमित्त्याने भाज्या खाल्ल्या जातात म्हणून...
बाकि तुमची रेसिपी फक्कड आहे यात वादच नाही.

पेठकर सर? हा पदार्थ पचायला जरा जडच आहे मला. नुसते 'पेठकर' किंवा 'प्रभाकर पेठकर' पचायला हलकं आणि आरोग्यास उत्तम ठरावे. असो.

ब्याडगी मिरचीही चालेल. काश्मिरीने रंग मस्त येतो. ब्याडगी आणि काश्मिरी समप्रमाणात घेतल्या तर खर्च कमी होतो. पण नुसती ब्याडगीही चवदार मिरची आहे.

खरेतर मी श्रावण घेवडा, गाजर घालत होते कारण मुले जर भाज्या खात नसतील तर पावभाजी च्या निमित्त्याने भाज्या खाल्ल्या जातात म्हणून...

अरे वा! छोटासाच प्रॉब्लेम आहे. त्यासाठी व्हेजिटेबल कटलेट्सचा प्रयोग करून पाहा. तसेच, पालक राईस, कॅरट राईस असे पदार्थही उपयोगी पडतात. जमतील तशा ह्या सर्व पाककृती येतीलच मिपावर.

प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद.

जमतील तशा ह्या सर्व पाककृती येतीलच मिपावर.

आणि मिपालाही या ऋणात राहायला आवडेल! तेव्हा अजूनही अश्या अनेक उत्तम उत्तम पाककृती अवश्य येऊ द्या! :)

अन्नदाता सुखी भव!

आई अन्नपूर्णेच्या नावानं चांगभलं! :)

आपला,
(अन्नपूर्णाभक्त) तात्या.

मिपालाही या ऋणात राहायला आवडेल!

काय हे तात्या? दोस्तीमे दराऽऽऽर? ही अशी अस्थानी अलंकारिक भाषा शोभत नाही मिपावर. आमच्या पाककृती, हा तुमचा हक्कच आहे. ही 'ऋणाची' भाषा नको. आपण 'सण' साजरे करूया. खाओ-पिओ आणि, तब्येत सांभाळून, मजा करो. कसे?

तोंडाला पाणी सुटले चित्र बघुन!
एक सुचवणी : हे भाजीचे वाडगे अव्हन (साधा, मायक्रोवेव्ह नव्हे) मध्ये घालून त्यावरचे चिझ जरा वितळवू दिले आणि त्यात घुसळले तर काहीशी इटालियन पावभाजी तयार होईल का?.. सोनिया मॅडम तुमच्याकडे जेवायला येतील :)

-कोलबेर

गरम-गरम पावभाजीवर चीझ किसून घातले की ते जरा वितळतेच. भाजीत हळू-हळू मिसळत खायचे.

पेठकरकाका
वर्षाभरापूर्वी मनोगतावर पावभाजीची पाककृती वाचून मी ती बनवली होती. आणि चांगली झाल्याचे लगेच आपल्याला कळवले होते.
आता या कृतीत थोडा बदल वाटतो आहे. बहुधा आपण सतत प्रयोग करुन पदार्थ चविला आणि दिसायला कसा चांगल्यात चांगला होईल हे पाहत असता. आता एकदा चीझ-पावभाजी सुद्धा करुन पाहिन आणि आपल्याला कळवेन.
पालकराईस ची वाट पाहतो आहे :)
--लिखाळ.
शुद्धलेखन आणि शुद्ध लेखन यांवरील चर्चा वाचून आमची पार भंबेरी उडाली आहे.

धन्यवाद श्री. लिखाळ,

मनोगतावरील पावभाजी जशीच्या तशी इथे 'चिटकवली' नाही. नवनविन प्रयोग तर सतत चालूच असतातंच. पाककृतीत थोडेफार मागे-पुढे झाले तरी अंतिम उद्दीष्ट्य एक चवदार पदार्थ सादर करण्याचे असते त्या पासून लक्ष्य विचलित होऊ देता कामा नये.

आपल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.

पेठकर काका,

ही पावभाजीची चेपणी कुठे मिळेल? बाजारात ज्या चेपण्या पाहिल्या त्या खूपच तकलादू वाटल्या शिवाय त्याला जाळीही होती. त्यामुळे मटार वगैरे नीट भरडले जाणार नाहीत असे वाटते. (जाळीतून वर येतील असे वाटते). पावभाजीवाल्याकडे असते, तशी मोठी, जाळी नसलेली चेपणी कुठे मिळेल?

उपहारगृहासाठी लागणार्‍या सामानांचे एक दुकान असते. तिथे अशी व्यावसायिक चेपणी मिळू शकेल. पण ती जड असते. आपल्याला हवी तशी चेपणी एखाद्या लोहाराकडून बनवून घेता येते.

कँपात 'अगरवाल' नावाचे दुकान आहे. त्याच्याकडे मिळू शकेल. त्याचा पत्ता आणि दूरध्वनी क्रमांक शोधून तुम्हाला व्य. नि . पाठवतो.

जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

काका,
आपल्या कृतीप्रमाणे मागे पावभाजी केली होती .आज आपण सांगितल्यानुसार चीझ पावभाजी करीत आहे.काका, मलेशियात के.एल्.ला आपली एखादी शाखा सुरु करावी ही विनंती.आपल्या चिरंजीवांना सांगावा आमचा हा निरोप ! इथे खूप मराठी कुटुंबे आहेत. आपल्याला दुवा देतील हो!

धन्यवाद अमेयहसमनीस,
मुलाचे (वय वर्षे २३) पाय अजून पाळण्यात दिसत नाहीत. पण आपल्या निमंत्रणाबद्दल आभारी आहे. पावभाजीचे क्रमांक एकचे गिर्‍हाईक गुजराथी, दुसर्‍या क्रमांकावर मराठी आणि तिसर्‍या क्रमांकावर तामिळ आहेत. तशी सरमिसळ तिथल्या कम्युनिटीत असेल तर पावभाजीचे दुकान नक्कीच चालेल.

जांभया टाळण्याचा जालीम उपाय.....झोपा

रेसिपी खुप छान आहे. खरतर पावभाजीत कोण कोण अजुन भाज्या घालतात. पण तुम्ही ज्या भाज्या घेतल्या आहेत त्या माझ्या आवडीच्या आहेत. त्यामुळे अशी पावभाजी मी मनापासुन खाईन.
(पावभाजी वेडी)
परीसा

आत्ता कळ्ल माझ्या भाजीचा रंग लाल भडक का दिसत नाही ते...

केप्रचा मसाला सर्व मसाल्यात उजवा आहे अस मत वेगवेगळे मसाले वापरुन पाहील्यावर माझं बनल आहे.
या मसाल्यामुळे चव अगदी गाडीवरच्या भाजीसारखी येते.

../मुक्ता

पेठकर काका, खुपच छान आहे रेसिपी. :)
आता नक्की करुन बघेन. (फोटो बघुन तर कधी करुन बघते असं झाल आहे.)

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

पेठकर काका, खुपच छान आहे रेसिपी. :)
आता नक्की करुन बघेन. (फोटो बघुन तर कधी करुन बघते असं झाल आहे.)

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

काल रात्री पावभाजी केली (मायनस चिझ.. खुपच हेवी होईल ह्या भीतीने :) ) सहीसही हीच रेसिपी वापरुन.. खाऊन झाल्यावर ताटांवर जराही खुण उरली नाही, ह्यातुन कोणी काही पदार्थ खाल्लाय म्हणुन......... शनिवारी परत पाहिजे अशी मागणीही झाली... एकदम हिट रेसिपी :)

तुमचे खुप खुप आभार..

साधना