"आनंदी आनंद गडे!"

श्रीकृष्ण सामंत's picture
श्रीकृष्ण सामंत in जनातलं, मनातलं
3 Jun 2009 - 8:22 am

आज बरेच दिवसानी प्रो.देसायांचा नातू आणि त्याचा मित्र असे दोघे लगबगीने माझ्याजवळ येताना पाहून मी समजलो की आज भाऊसाहेब काही तळ्यावर फिरायला येत नाहीत.
"आम्हाला पाहून तुम्ही समजला असालच"
असं म्हणता म्हणता निमीश म्हणाला,
"हा माझा मित्र नितीन मतकरी.आत्ताच हा वकीली परिक्षा पास झाला, आणि सध्या एका कंपनीत काम करतो.सध्या म्हणण्याचं कारण, तो ही कंपनी सोडून दुसर्‍या एका कंपनीत वरच्या पोस्टवर जॉईन होणार आहे."

हे ऐकून मी म्हणालो,
"बरं आहे तुमचं,आमच्या जमान्यात आम्ही एका कंपनीत काम करायला लागलो की निवृत्त होई पर्यंत त्याच कंपनीत चिकटून असायचो.आणि त्यावेळी आम्हाला तेव्हडे मोके मिळत नव्हते.पण एक मात्र खरं मोके मिळत नसतात मोके घ्यायचे असतात.पण ते राहूदे तुझे आजोबा आज येणार नाहीत ह्या शिवाय मला काहीतरी तुला सांगायचं आहे असं वाटतं.बोल."

"हा माझा मित्र नितीन पुरा नास्तिक आहे.ह्याचा माझ्या आजोबांशी वाद चालला होता.आजोबांचं म्हणणं असले वाद ही तरूणपणातली त्यांच्या शब्दात "खूळं " असतात.जसं जसं वय होत जातं,दुनियादारी करावी लागते,जीवनात "ठक्केठोपे" खायची पाळी येते तसं तसं माणूस थोडा स्वभावाने नरम होतो.आणि मग थोडाफार देवाच्या अस्तित्वाला मानायाला लागतो.अर्थात ह्याला काही अपवाद असूं शकतात.
काका,तुमचं काय म्हणणं आहे ह्या विषयावर?"

मी म्हणालो,
"हे बघ नितीन ह्या विषयावर अगणीत वाद झाले आहेत.तुला मला ते नवीन आहेत.तुझे आजोबा म्हणतात त्या अपवादातला मी पण एक आहे.पण हे सर्व बोलण्यापूर्वी तुझा हा मित्र नितीन काय म्हणतो ते तरी ऐकतो.बोल रे नितीन."

"मला प्रथम श्रद्धे विषयी उघड उघड बोलण्यापूर्वी माझी श्रद्धा काय आहे ते सांगू देत.
मी देवावर विश्वास ठेवत नाही.देव आहे हे मी मानत नाही.काही श्रद्धा ठेवतात त्या देवावर,सर्वव्यापी परमेश्वरावर किंवा ज्याच्याजवळ ह्या विश्वाचं रहाटगाडगं चालवण्याचं बळ आहे त्या विधात्यावर, पण मी विश्वास ठेवीत नाही.
मी नास्तिक आहे.अनीश्वरवादी आहे. अज्ञेयवादामागे-ईश्वराचं अस्तित्व आहे की नाही यावरचा वाद-मला दडून राहायचं नाही.किंवा पैजे मागे लपून राहायचं नाही.माझी अशी श्रद्धा आहे की हे विश्व,ही सृष्टि भौतिक तत्वावर,आणि अंतरिक्षीय योगायोगावर चालते."

नितीनला मधेच थांबवून मी म्हणालो,
"भाऊसाहेब सांगत आहेत ते त्यांच्या अनुभवावरून सांगत असावेत.अनुभव ही अशी गोष्ट आहे की ती अनुभवल्याशिवाय कशी कळणार.?खाडी पोहून जाण्याची कल्पना करता येईल पण ती पोहून गेल्या शिवाय अनुभव येणार नाही असं उदाहरण देता येईल.तरीपण तुझ्या विचारांचा पण आदर केला पाहिजे."

नितीन म्हणाला,
" माझे हे विचार बर्‍याच लोकाना धक्कादायी वाटतात.माझ्या सर्वात दुःखदायी स्मृतिची ती संध्याकाळ,मला आठवण करून देते जेव्हा मी अगदी माझ्या तारुण्यात असताना माझ्या आईबाबाना -जे देवभाविक असून ज्यानी मला त्या माझ्या तरूणपणाच्या दिवसात एकाही मंदीरात नेण्यापासून सोडलं नाही,एकाही देवाच्या उत्सवात जाण्यास वंचित केलं नाही,त्यांना मी माझ्या श्रद्धेबद्दल आणि माझ्या देवावरच्या अविश्वासाबद्दल सांगितलं.त्यांना ऐकून मनस्वी धक्का बसला.त्याना माझ्या मोक्ष मुक्तिची काळजी वाटली आणि माझं नीट संगोपन करण्यास ते असफल झाले असं त्यांना वाटलं.त्यांनी अशी कल्पना करून घेतली की मी नैतिकतेची सीमा गमावून बसलो आहे.

जरी मी त्या कल्पित सर्वव्यापी परमेश्वराबद्दल मनुषाच्या मनात असलेली छबी स्वीकार करायला असमर्थ असलो तरी माझ्या जवळ जबर नैतीक श्रद्धा आहे.
मी मानतो की दुसर्‍या जीवजंतूना मारणं किंवा जखमी करणं हे अगदी अयोग्य आहे.मी शांतीवादी आहे.वाटेत एखादा कीडाजरी दिसला तर त्याला मारायला मी टाळीन.पण त्याचबरोबर मी हे ही मानतो की क्वचीत प्रसंगी कुणी जर का अत्याचार करीत असेल तर त्याच्याबरोबर दोन हात करणं जरूरीचं आहे.तसंच मी मानतो की मला माझं जीवन जगताना, योग्य निर्णय घेणं आणि प्रामाणिकता ठेवणं ह्यावर जास्त भर ठेवण्याची आवश्यकता आहे. एकदा मी बाजारात कुणाची तरी शंभराची नोट खाली पडलेली पाहून दोन बसस्टॉप त्या माणसाच्या मागे धावून त्याला परत करण्याचा प्रयत्न केला होता.

काका,तुम्ही म्हणता तेच मला वाटतं,
प्रत्येकाने दुसर्‍याचा आदर केला पाहिजे आणि त्याच्या श्रद्धेचापण आदर केला पाहिजे.अमूक देवायलाला पैसे द्या म्हणून माझा दरवाजा खटखटला तर मी पैसे द्यायला कबूल होत नाही.पण काही सामाजिक कार्याला मदत मागितली तर मी अवश्य देतो."

मी नितीनला म्हणालो,
"प्रोफेसर म्हणतात त्याप्रमाणे ह्या वयात माझ्याही स्वभावात नरमपणा आला आहे.तरीपण मी ह्या वयात तुझ्या नास्तिक असण्याच्या श्रद्धेशीही सहमत आहे. पण माझ्या स्वभावाचा नरमपणा मी "सिलेक्टीव्हली" वापरतो.ज्यावेळी माझी पत्नी रोज देवाची पूजा करून झाल्यावर मला गणपतीच्या मुर्तिला नमस्कार करायला सांगते त्यावेळी निमुट नमस्कार करतो.आणि तिने दिलेला प्रसाद आणि तीर्थ न चुकता उजव्या हातात घेऊन प्राशन करतो.
माझा उद्देश एकच असतो की माझ्या असं करण्याने तिला जर का आनंद होत असेल तर सहाजीकच त्यात मलाही आनंद होतो.
तसंच तुझ्या सारखा नास्तिक जेव्हा म्हणतो की,
"हे विश्व,ही सृष्टि भौतिक तत्वावर,आणि अंतरिक्षीय योगायोगावर चालते."
हे पण मला तंतोतंत पटत असल्याने तुझ्याशी मी देवाच्या अस्तित्वावर वाद घालायला प्रवृत्त होत नाही.आणि सहाजीकच तुलाही आनंद होत असावा."

माझं हे म्हणणं ऐकून खूश होऊन नितीन म्हणाला,
"बरेच वेळा पाहिलंय की माझ्या सारख्या विचार असलेल्या माणसाची, देवावर विश्वास ठेवणारे लोक अवहेलना करतात. म्हणतात की आमच्या सारख्यांना नैतिक मुल्य नाहीत आणि आमच्या जीवनाला अर्थ नाही.मी एव्हडीच इच्छा करतो की माझं जीवन असल्या विचाराचं खंडण करण्यात गेलं तरी भले.

माझ्या आयुष्यातला अगदी आनंदाचा दिवस तो होता की जेव्हा माझी आई तिचं निधन होण्यापूर्वी काही वर्ष अगोदर ह्या माझ्या नास्तिकपणाच्या विचारावर माझं बोलणं आठवून मला म्हणाली होती की, त्या विचाराव्यतिरीक्त तिला माहित होतं की मी तिने दिलेल्या मुल्यांच पालन केलं आणि त्यामुळे मला स्वर्गात मोक्ष प्राप्त होणार.
मी जरी तिला स्वर्गात भेटू शकलो नाही तरी त्याहीपेक्षा माझा आनंद ह्यात आहे की निदान माझ्या श्रद्धेच्या आचरणाची तिच्याकडून मला पुष्ठि मिळाली होती."

ह्या सर्व चर्चेत निमीश फक्त ऐकण्याचं काम करीत होता. मी काहीतरी त्याला विचारणार हे पाहून म्हणाला,
"काका,तुमच्या ह्या वयातल्या सर्वांना आनंदी करण्याच्या नरम स्वभावाचा उपयोग मी माझ्या ह्या वयात वापरायचं ठरवलं आहे.
त्यामुळे मी, माझे आस्तिक आजोबा आणि माझा नास्तिक मित्र नितीन असे आम्ही तिघेही आनंदी राहूं.तुमचं काय म्हणणं आहे?"

एव्हाना तळ्यावर काळोख झाला होता.उठत उठत मी दोघांची पाठ थोपटत म्हणालो,
"माझं एक म्हणणं की तू प्रो.देसायांचा नातू शोभतोस.आणि दुसरं नितीनचं "आर्ग्युमेंट" अगदी कोर्टात मांडल्या सारखं वाटलं."

हे ऐकून दोघेही हंसायला लागले.आणि मी मनात पुटपुटलो,

"आनंदी आनंद गडे!
इकडे तिकडे चोहिकडे!"

श्रीकृष्ण सामंत

कथालेख

प्रतिक्रिया

बापु देवकर's picture

3 Jun 2009 - 9:19 am | बापु देवकर

असे जर प्रत्येकजण वागला तर भांड्णे होणारच नाहीत...
आणी सगळीकडे "आनंदी आनंद गडे" असेल..

क्रान्ति's picture

3 Jun 2009 - 9:41 am | क्रान्ति

सामंतकाका, तुमचे अनुभवाचे बोल नेहमीच मार्गदर्शक ठरतात. खूप छान लिहिता तुम्ही.
:)

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा