पिशितभुजाच्या कान्दिशिक नर्मदांचे विकल मनोरथ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture
प्रा.डॉ.दिलीप बिरुटे in जनातलं, मनातलं
31 May 2009 - 2:46 pm

अधिपतींनी नेहमीप्रमाणे दरबाराला सुरवात व्हावी अशी आज्ञा केली. दरबाराला सुरवात झाली. किरकोळ तंटे, भांडणे यांचा यथायोग्य निवाडा करुन अधिपतींनी मौजेचे कार्यक्रम सुरु व्हावे असे सांगितले.

दरबारी आपले विविध प्रकारचे कौशल्य दाखवित असतांनाच अधिपतींना लहर आली, आणि त्यांनी आपले नृत्यकौशल्य दाखविले. सभाजन अचंबित होवुन टाळ्या वाजवण्याचे विसरुन आपल्या शेजा-यांची बोटे तोंडात घालु लागले. दोन मिनिटांनी गरके घेवुन झाल्यावर "आताच भोजन झाले नाहीतर, कुणाला हार गेलो नसतो!" असे सांगुन अधिपती धापा टाकत सिंहासनावर जावुन बसले. राजवैद्यांनी जवळ जावुन "हेमगर्भाची मात्रा देवु का?" अशी पृच्छा केली तेव्हा "वेळ आली की जरुर घेवु" असे सांगुन अधिपतींनी त्यांची विनंती अव्हेरली.

दरबारच्या रिवाजाप्रमाणे सर्व कार्यक्रम यथास्थित होत असतांना अचानक दरवाजाच्या बाजुने काही गलबला ऐकु आल्यामुळे हे काय विघ्न उपस्थित झाले असा विचार करुन अधिपतींनी जरा रागानेच दरवाजाकडे नजर टाकली. अधिपतींनी नजर टाकली म्हणुन मानक-यांनी पण नजर टाकली. ही मंडळी काय बघत आहेत हे पहाण्यासाठी इतरांनी पण दरवाजाकडे नजरच टाकली.

दरवाजातील पहारेकरी दोघा जणांचे बखोटे धरुन आत आणत होते. त्यांना अधिपतीसमोर उभे करुन रक्षकप्रमुखाने सांगितले "अधिपती, हे दोघे नगरामधे तुमच्या विरुद्ध तसेच राज्याच्या विरुद्ध अफवा पसरतांना सापडले. भडकावु भाषणबाजी, गलिच्छ शिवीगाळ यांच्या सहाय्याने नगरजनांना त्रास देतांना हे सापडले. गेल्या कित्येक दिवसांपासुन आम्ही यांच्या मागावर होतो. कधी संतांचा, कधी गारुड्याचा, कधी वारक-याचा, कधी शेतक-याचा अशा बहुरुप्याच्या वेषात फिरणारे हे दोघे आज सापडले आहेत. यांचा बंदोबस्त करावा "

अधिपतींनी ही मंडळी कोण आहेत याची पृच्छा केली असता एकाचे नाव चक्रमुख असुन दुस-याचे चक्षुःश्रवस असे असल्याचे दरबारातील मंडळींनी सागितले. मोठ्या आढ्यतेने अधिपतींकडे पहात उभे असलेल्या दोघांना काय आहे असे विचारले असता, आमचे आगमन प्रज्ञावंतांच्या नगरीतुन झाले असुन या नगरीतील मुढांना सुज्ञतेचे धडे देण्यासाठी आलो आहे. त्याचप्रमाणे आम्ही दरबा-यातील मानक-यांपेक्षा जास्त प्रज्ञावंत असल्याने मानक-यांनासुद्धा प्रज्ञावंत बनवणार असल्याचे सांगितले. यावर अधिपतींनी हसुन राजवैद्यांकडे पाहिले.

"बोला राजवैद्य ! तुम्हाला आहे इच्छा प्रज्ञावंत म्हणवुन घ्यायची?" अधिपतींनी विचारले.

"जरुर ! पण आधी यांच्याच प्रज्ञेची परिक्षा पहावी असे म्हणतो!" राजवैद्य उत्तरले.

कोणत्याही परिक्षेला आमची तयारी आहे असे चक्रमुख आणि चक्षुःश्रवसाने सांगताच, दरबारातील कुणाला त्यांची परिक्षा घ्यावयास सांगायचे हा प्रश्न अधिपतींना पडला. त्यांनी प्रश्नार्थक मुद्रेने राजवैद्यांकडे पाहिले. तेव्हा "आपल्या नगरीतील कुणाही सामान्य माणसाला बोलावुन यांची परिक्षा घ्यावी, उगाचच दरबारातील मानक-यांना त्रास कशाला ?" असे बोलुन राजवैद्यांनी एका अनुचराला बोलावुन त्याच्या कानात काही सांगितले. अनुचर ते ऐकुन बाहेर गेला.

थोड्या वेळाने अनुचर अर्यमनला घेवुन आत आला. अर्यमन आत येवुन शांतपणे उभा राहिला. त्याच्या बरोबर त्याचा आवडता कपोत खांद्यावर बसुन होता, तर घोरदर्शन गवाक्षात बसुन राहिला. त्याला पहाताच अधिपतींच्या कपाळावर आठ्यांचे साम्राज्य पसरले. "अहो राजवैद्य ! कुणाला बोलावले तुम्ही ? हा मनुष्य माझ्या मानक-यांना वाटेल ते बोलतो! अशा माणसाला तुम्ही दरबारात तरी कसे बोलावले ? याच्यावर विश्वास कसा आणि का ठेवायचा?" यावर अर्यमनने गालातल्या गालात हसुन अधिपतींकडे पाहिले आणि म्हणाला "राजाने स्वतःच्या प्रजाननांवर सुद्धा अवास्तव विश्वास टाकु नये असे चाणक्य म्हणतो. आपले वागणे अगदी योग्य आहे ." यावर राजवैद्यांनी हसुन अधिपतींना शांत रहाण्याची विनंती केली आणि अर्यमनकडे वळुन म्हणाले "अर्यमन! या दोघा अनोकशायिन वेषातील मंडळींना प्रज्ञावान म्हणावे की नाही याचा निर्णय घ्यायचा आहे. त्यासाठी आम्हाला जरा मदत कर" अर्यमनने हसुन "होय जरुर करु" असे उत्तर दिले.

अर्यमनने वळुन दोघांकडे पाहिले आणि म्हणाला "आत्तगन्ध व्हायच्याच उद्देशाने आलेल्या प्रज्ञाचक्षुसांनो माझे व दरबारातील मंडळीचे प्रश्न नीट ऐकुन उत्तर द्या." यावर दोघे "हुं... तु काय विचारुन विचारुन विचारणार? विचार !" असे उत्तरले.

"तर मग सांगा बरे नीती, अनीती यात काय फरक असतो? धर्माची व्याख्या काय? देव म्हणजे काय?" अर्यमनने विचारले.
"...." चक्रमुखाने नजर चुकवली.
"...." त्याचेच अनुकरण चक्षुःश्रवसाने केले.

"सापेक्षतावादाचा सिद्धांत काय आहे?" अर्यमनने पुढचा प्रश्न विचारला.
"...." चक्रमुखाने मान खाली घातली.
"...." त्याचे अनुकरण चक्षुःश्रवसाने केले.

"भारतीय मानसशास्त्राची माहिती सांगा ?" अर्यमनने विचारले.
"...." चक्रमुखाचे खांदे उतरले.
"...." चक्षुःश्रवसाचे तसेच झाले.

"शुन्याचा शोध का लागला? शहाजोग हा शब्द कुठुन आणि का आला?" अर्यमनने विचारले.
"...." चक्रमुखाने खाली बसकण घातली.
"...." त्याचे अनुकरण चक्षुःश्रवसाने केले.

"एखाद्याने बोललेले, लिहिलेले वाक्य आपल्याला तुकड्यातुकड्याने समजते की पुर्ण वाक्य वाचुन अथवा ऐकुन? आणि समजणे म्हणजे काय? " अर्यमनने विचारले.
"...." चक्रमुखाच्या डोळ्यातुन अश्रुंचा पुर सुरु झाला.
"...." चक्षुःश्रवसाची स्थिती काही वेगळी नव्हती.

"ज्ञान होणे ही अवस्था काय दर्शवते? " अर्यमनने विचारले.
"...." चक्रमुख स्फुंदुन स्फुंदुन रडायला लागला.
"...." त्याचे अनुकरण चक्षुःश्रवसाने केले.

"अमेरिकन डॉलरचे भविष्य काय? " अर्यमनने विचारले.
"...." चक्रमुखाने हात जोडुन जमिनीवर लोळण घेतली.
"...." त्याचे अनुकरण चक्षुःश्रवसाने केले.

"नीट उठुन उभे रहा. आणि अर्यमनच्या प्रश्नांची उत्तरे येत नसतील तर दरबारातील लोकांच्या प्रश्नांची उत्तरे द्या! " अधिपतींनी फर्मावले. दोघेही उठुन उभे राहिले. अंग थरथर कापत होते. डोळ्यातुन अश्रु वहात होते. तोंड काळेठिक्कर पडले होते.

दरबारातील लोकांनी हल्लाबोल करुन प्रश्न विचारायला सुरवात केली. एकेका प्रश्नाला ऐकुनच आपली लायकी या दरबारात उभे रहाण्याची पण नाही याची जाणीव होवुन हळुहळु दरवाज्याच्या दिशेने मागे सरकण्यास दोघांनी सुरवात केली. त्यांचा विचार लक्षात येताच अधिपतींनी सगळ्यांना शांत रहाण्याच्या सुचना करुन, "मग तुम्हाला काय येते ते तर सांगा" असे म्हटल्यावर, गयावया करुन "अधिपती, आमचे चुकले. आम्ही परत असे करणार नाही, आम्हाला सोडा" असे विनवु लागले. यावर दरबा-यांनी यांना अजिबात असे सोडु नका असे अधिपतींना वारंवार सांगितले. दरबारात एकच गलका सुरु झाला.

अखेरीस अधिपतींनी "यांच्या तोंडाला काळे फासुन गाढवावर बसवुन धिंड काढा आणि नगराबाहेर हाकलुन द्या " असे फर्मान सोडले. पहारेक-यांनी दोघांचे बखोटे धरुन बाहेर नेले. दरबार बरखास्त झाला. दरबारातील लोक, त्या दोघांची मजा पहाण्यासाठी बाहेर गेले. अधिपती आणि राजवैद्य सौध्यावर जावुन पहात बसले. लोकांचा मार खावुन, चपलांचे प्रसाद खावुन दोघे खुरडत खुरडत नगराच्या सीमेकडे चालले होते तर अर्यमन दुस-या दिशेने मागे वळुन न पहाता चालत होता. त्याचा आवडता कपोत त्याच्या डोक्यावरुन फडफड करत उडत होता तर घोरदर्शन चक्रमुखाच्या आणि चक्षुःश्रवसाच्या मागे मागे उडत चालला होता.

खुरडत खुरडत सीमेच्या बाहेर पोचल्यावर दोघेही ओसाड जंगलाकडे निघाले. नगरवासीयांनी ते दोघे सीमेच्या बाहेर गेल्याचे पाहुन प्रचंड जल्लोष केला. तो जल्लोष ऐकुन त्या दोघांची हृदये अगदी विदीर्ण होवुन गेली. कुठुन ह्या भलत्या फंदात पडलो असे वाटुन त्यांची तोंडे अगदी काळीठिक्कर पडली होती. दोघेही ओसाड जंगलात येवुन पोहोचले. घोरदर्शन दोघांच्या मागोमागच होता. त्याला पाहुन भय वाटुन ते भरभर चालण्याचा प्रयत्न करत होते. कधी चालत, कधी खुरडत, आपट्या खात, धडकत कसे बसे काळ्या डोहाच्या कडेला येवुन पोहोचले. काळ्या डोहाच्या एका बाजुने येणा-या अवस्कराच्या प्रवाहात आपले पाय धुवुन दोघे तो प्रवाह येत असलेल्या गुहेत गेले.

गुहा कसली ती तर काळ गुंफाच. तिथला काळ जणु जन्मापासुन गोठुन गेलेला. बाहेर चाललेल्या जगातील घडामोडींचे कोणतेही स्पंदन तिथल्या वातावरणात जाणवत नव्हते. शतकांचा दारूण पराभव तिथल्या वातावरणाला अजुन भकास, उदास बनवत होता. जिथे तिथे पडलेले हाडकांचे तुकडे क्वचित अंधारात चमकत होते. मेलेल्या प्राण्यांच्या मुंडक्यांचे भेसुर डोळे येणा-या प्रत्येकावर जसे काही नजर ठेवुन होते. रक्ताच्या ओघळांनी साकारलेली नक्षी अभ्यागतांचे स्वागत करत होती. मृ्त्युच्या दारात जावुन थबकलेल्या प्राण्यांच्या आर्त विव्हळण्याचा आवाज गुहेत प्रतिध्वनी होत भेसुरपणात भर घालत होता. मधुनच येणारा गुरगुरण्याचा आवाज वातावरणात अजुनच गुढपणा वाढवत होता. मधुनच येणारा टपक टपक आवाज कोणत्या दिशेने जायचे हे सुचित करत होता.

त्या आवाजाच्या अनुरोधाने दोघेही एकमेकांचा हात धरुन जावु लागले. जाता जाता ते गुहेच्या आतमधे जावुन पोहोचले. आतमधे कुक्कुराच्या मांसाला पेटवुन मशाल बनवुन उजेड पाडला होता. तेथे एका उंचवट्यावर "ते" बसलेले होतं. केसाळ, लिबलिबित, हिरव्यागार डोळ्यांच्या खाचा मिचमिच करत, तीन मस्तकाचं, उग्र दर्प सोडत, एका तोंडानं गुरगुरत तर एका तोंडानं नुकत्याच मारलेल्या कुक्कुराचं आतडं चघळत, लाळ गाळत, एका तोंडानं सुस्कारे सोडत, विचित्र कुठलाही आकार नसलेलं पण त्रिमितीत दिसणारं "ते". विलक्षण दर्प सुटलेल्या त्या जागेत स्वतःभोवती डुलक्या घेत, अस्वस्थ सुस्कारे सोडत बसलेलं "ते".

"त्याला" पहाताच दोघांच्या जीवात जीव आला. त्याच्याजवळ जावुन "आमचे रक्षण करा" असे वारंवार विनवु लागले. त्यांच्यापुढे कुक्कुराच्या मांसाचे तुकडे टाकुन "त्याने" बाजुला असलेल्या रक्त,मांसाच्या डबक्यामधे लोळण घेतली. पुर्ण त्यात डुंबुन जावुन बाहेर हळुहळु येवु लागला. आता त्याचे शरीर पिशितभुजाचे होवु लागले होते.

पिशितभुजाला पाहुन ते दोघे आनंदित झाले. त्याच्याभोवती फेर धरुन नाचु लागले. पिशितभुजाने विचित्र आवाज काढायला सुरुवात केली. बाजुला पडलेल्या हाडांच्या झांजा बनवुन दोघे वाजवायला लागले. नाचायला लागले. मधुनच दोघे कवटीत साचलेले रक्त पिवु लागले. मांसाचे तुकडे चघळु लागले. पिशितभुजाच्या आवाजात आवाज मिळवुन कर्कश्श सुरात ओरडु लागले. गुहेतला आवाज वाढतच चालला. पिशितभुजाच्या कर्णकर्कश्श आरोळ्या ओसाड जंगलात ऐकु यायला लागल्या. ते ऐकुन घोरदर्शन हळुच परत मागे फिरला. लांबवरुन त्याने उडणा-या कपोताला पाहिले आणि तिकडे निघाला.

सौध्यावर उभे असलेल्या राजवैद्यांनी घोरदर्शनाला कपोताच्या दिशेने जातांना पाहिले आणि अधिपतींकडे समाधानाने पाहुन म्हणाले "अधिपती, पिशितभुजाच्या कान्दिशिक नर्मदांचे मनोरथ विकल झाले. आता पुढील व्यतिपातापर्यंत चिंता नसावी. आपण आराम करावा". उडत जाणा-या कपोताकडे विचारहीन टक लावुन पहाणा-या अधिपतींना कोणती संवेदना दर्शवावी हे न सुचल्याने त्यांनी "हम्म" उद्गार काढुन शयनगृहाकडे प्रस्थान केले.

राजवैद्यांनी उडणा-या कपोताच्या दिशेने पाहुन कुणी ऐकत नाही याची खात्री करुन "भो भद्रः, नमो नमः" असे म्हणुन संतोषाने आपल्या गृहाकडे प्रस्थान केले.

शब्दार्थ : अर्यमन - सूर्य, दृढ मित्र , चक्रमुख - डुक्कर, चक्षुःश्रवस - सर्प, पिशितभुज - लांडगा, कान्दिशिक - घाबरलेला, आत्तगन्ध - अपमानित, नर्मद - खुषमस्क-या
घोरदर्शन - घुबड. (संस्कृतच्या शब्दांचे अर्थ असे असावेत असे वाटते) संस्कृत शब्दकोश इथे ...!

वावरविरंगुळा

प्रतिक्रिया

इनोबा म्हणे's picture

31 May 2009 - 3:34 pm | इनोबा म्हणे

'अकबर-बिरबला'च्या कथांची आठवण झाली. बिरबल ही आपल्या बुद्धीचातूर्याने मुर्ख अकबराला वेगवेगळ्या संकटांतून सोडवत असे.

अरुण वडुलेकर's picture

31 May 2009 - 4:33 pm | अरुण वडुलेकर

भो: आचार्य बिरुटे सर: |
गूढ रम्य भाषेतील कथा आवडली. सुरुवातीला, अगदी शीर्षकापासून, कथा
कांहीशी डोक्यावरून जाऊ लागली. आता आपणही हेमगर्भाची मात्रा घ्यावी
की काय असा विचार मनांत येऊ लागला. पण पुढें मजा आली. पिशितभुजाच्या
गुहेचे वर्णन वाचून अंगावर कांटा आला. मी पुन्हा लहान होऊन चांदोबातली
गोष्ट वाचत तर नाहीं ना असा भास झाला. बहोत बढिया. आर्यमनाची प्रश्नावली
अशीच आणखी गूढ झाली असती तर आणखी मजा आली असती.
कथा आप्रतिम झाली आहे.
पुलेशु.

छोटा डॉन's picture

31 May 2009 - 5:40 pm | छोटा डॉन

हम्म् ,
कथा मजेशीर वाटली पण का कोण जाणे वादळापुर्वीच्या शांततेचा भंग करणार्‍या एका जहरी हवेच्या अवखळ झोतासारखी वाटली.

------
छोटा डॉन-वायदेआझमांची-फिकीर
एखादा "प्रण अथवा रिझॉल्युशन" म्हणजे काय ? जास्त काही नाही, मस्त गाजावाजा करुन ८ दिवसातच पहिली पाने पंचावन्न करणे.
आता आमचा "लेखन न करण्याच्या" प्रतिज्ञेचेच पहा ना ... ;)

नितिन थत्ते's picture

31 May 2009 - 5:55 pm | नितिन थत्ते

काही कळले नाही.
अर्यमनने विचारेलेले प्रश्न, त्यांचा कथेशी संबंध आणि त्याची उत्तरे त्यांना का देता आली नाहीत ह्याचा काही ठाव लागला नाही.

कथेतील वर्णनात्मक भाग उत्तम. मतकरी - धारपांची आठवण करून देणारा.

खराटा
(रंग माझा वेगळा)

पाषाणभेद's picture

31 May 2009 - 6:52 pm | पाषाणभेद

मस्त कथा आहे.
मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या ( -राजेंनी बहाल केलेले नाव)

अनंता's picture

31 May 2009 - 7:23 pm | अनंता

स.प्र.वा.नं.स.घे.टा.आ.

प्रतिसाद म्हणजे जणू लग्नातले आहेर. एकदा घेतलेत की... बसा आयुष्यभर फेडत. ;)

प्राजु's picture

31 May 2009 - 8:24 pm | प्राजु

हेच म्हणते..
त्या आवाजाच्या अनुरोधाने दोघेही एकमेकांचा हात धरुन जावु लागले. जाता जाता ते गुहेच्या आतमधे जावुन पोहोचले. आतमधे कुक्कुराच्या मांसाला पेटवुन मशाल बनवुन उजेड पाडला होता. तेथे एका उंचवट्यावर "ते" बसलेले होतं. केसाळ, लिबलिबित, हिरव्यागार डोळ्यांच्या खाचा मिचमिच करत, तीन मस्तकाचं, उग्र दर्प सोडत, एका तोंडानं गुरगुरत तर एका तोंडानं नुकत्याच मारलेल्या कुक्कुराचं आतडं चघळत, लाळ गाळत, एका तोंडानं सुस्कारे सोडत, विचित्र कुठलाही आकार नसलेलं पण त्रिमितीत दिसणारं "ते". विलक्षण दर्प सुटलेल्या त्या जागेत स्वतःभोवती डुलक्या घेत, अस्वस्थ सुस्कारे सोडत बसलेलं "ते".

हे वर्णन आवडले. पण कथेमध्ये त्यातले प्रश्न, त्यांची न दिलेली उत्तरे, चक्रमुख आणि चक्षु:श्रवस यांनी पिशितभुजासोबत केलेला नाच.. याचा नक्की संबंध नाही समजला.
थोडं विस्तारून सांगाल का?
एक मात्र नक्की, की कथेतली भाषा ....संस्कृत प्रचूर शब्दांमुळे कथेचा बाज सुंदर सांभाळला गेला आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

संजय अभ्यंकर's picture

31 May 2009 - 8:42 pm | संजय अभ्यंकर

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

अजय भागवत's picture

1 Jun 2009 - 12:04 pm | अजय भागवत

+१ हेच म्हणतो

युयुत्सु's picture

25 Jul 2010 - 9:09 am | युयुत्सु

+१

युयुत्सु
-------------------------------------
यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् |
यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति ||

- कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल.

यन्ना _रास्कला's picture

31 May 2009 - 9:01 pm | यन्ना _रास्कला

आप्ल्या बहुजनाना कळल आस कायतरी लिवा कि. ह्ये काय ह्ये. एक पन शबुद समजला नाय :-SS तुमी कंदीपास्न त्या लोकान्च्या दरवाज्याला जावुन उभ राह्यलेत? :-?

*/*\*/*\/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*\*/*
हितन २ कोसाव औटपोस्ट नाहि?

पोस्तात पोलीस काय करतोय...... मास्तर, दुसर कोन इचारनार?

अवलिया's picture

1 Jun 2009 - 6:54 am | अवलिया

हम्म. मजा चालु आहे तर :)
चालु द्या ! चालु द्या !!

--अवलिया

काळा डॉन's picture

1 Jun 2009 - 8:12 am | काळा डॉन

मास्तर कथेची शैली परिचीत वाटते आहे. अलिकडे संजोपरावांना भेटून आलात काय? ;)

क्रान्ति's picture

1 Jun 2009 - 8:43 am | क्रान्ति

+रत्नाकर मतकरी+सुहास शिरवळकर+नारायण धारप+चांदोबा !
क्रान्ति
क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो?
गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं|
अग्निसखा

आपणांस आहे मरण! म्ह् णोन राखावें बरवेपण!!

सहज's picture

1 Jun 2009 - 8:54 am | सहज

"विद्यावाचस्पती"!! लेखाची भाषा आवडली. (कठीण शब्दांचे अर्थ सांगीतले नसते तर कळले नसते धन्यवाद. :-) )

कथा नव्या, जुन्या वाचकांचे वेगवेगळ्या पातळीवर मनोरंजन करते. :-)

बहोत खुब!

विनायक प्रभू's picture

1 Jun 2009 - 8:56 am | विनायक प्रभू

असेच म्हण्तो

धनंजय's picture

1 Jun 2009 - 9:05 am | धनंजय

शैली ओळखीची वाटली.

मजा आहे :-) :-D

प्रमोद देव's picture

1 Jun 2009 - 9:24 am | प्रमोद देव

विवा,काय आणि कशासंबंधी लिहीलंय हे टकुर्‍यात नाय घुसलं.
पन जे बी लिवलंया त्येची भाषा बाकी जंक्शन जमलीये.

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

जयवी's picture

1 Jun 2009 - 9:40 am | जयवी

खरंच...... भाषा एकदम सही !! पण मला पण अजिबातच समजली नाही :(

ज्याबद्दल आणि ज्या साठी लिहली आहे ते समजले . एकदम मस्त कथा आहे.खुपच सुंदर भाषेत लिहले आहे.खुप दिवसानी असे लेखन वाचण्यास मिळाले. धन्यवाद.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

परिकथेतील राजकुमार's picture

1 Jun 2009 - 11:16 am | परिकथेतील राजकुमार

काही अर्थ उमगले काही नाही. कथा आणी शब्द भांडार अप्रतीमच.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

निखिल देशपांडे's picture

1 Jun 2009 - 11:54 am | निखिल देशपांडे

कथा आणी शब्द भांडार अप्रतीमच.
==निखिल

दशानन's picture

1 Jun 2009 - 2:13 pm | दशानन

कथा आणी शब्द भांडार अप्रतीमच.

सर, काय... काय !

लै भारी भारी... वजनाने पण भारी लिव्हायला चालू केलीत कि राव.... म्हणतो हुतो त्या अवलियाच्या नादी नको लागू.. डोक्यावर परिणाम झाला की नाय =))

थोडेसं नवीन !

धमाल मुलगा's picture

1 Jun 2009 - 2:00 pm | धमाल मुलगा

_/\_

अ-श-क्य !!!
वा र लो! ख प लो!! सं प लो !!!

काय लिव्हलंय काय लिव्हलंय....एकेक शब्द जोरदार! तुफ्फान हल्लाबोल!!
आज पुन्हा कळलं, दिलीप बिरुटे ह्या नावापुढं 'प्रा.डॉ.' ही बिरुदं का ते. :)

आमच्या भाषिक आकलनक्षमतेच्या त्रोटक आवाक्यातून काही (सोडुन बाकी सगळेच म्हणा ना!)शब्द वगळता, कथा, कथाबीज, आणि कथेचा गाभा अगदी सुर्यप्रकाशाइतका लख्ख्ख्ख उमजला हो!!!!!!!!!

हाणा च्यामारी!!! एक लंबर... डायरेक्ट बोफोर्सचं बंबार्डिंगच की हो!

-(एक नगरजन) ध.

----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

अभिज्ञ's picture

1 Jun 2009 - 2:22 pm | अभिज्ञ

क्षणभर "सुरस व चमत्कारिक" ची पुढची एडिशन आली कि काय? असेच वाटून गेले.;)
कथा उतम झालीय.

अभिज्ञ.
--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

भडकमकर मास्तर's picture

1 Jun 2009 - 2:42 pm | भडकमकर मास्तर

ही गोष्ट मला समजली की नाही मला माहीत नाही. पण पुनःपुन्हा वाचाविशी मात्र वाटली. या गोष्टीला जबरदस्त लय आहे, जी
मनाला गुंतवून टाकते. मला तर जीएंच्या गोष्टींची आठवण झाली ! आपण गूढ काहितरी लिहीता, त्या मुळे समजो न समजो आपली गोष्ट वाचाविशी मात्र वाटते.

माझे मराठी प्रस्तुत लेखकाइतके चांगले नाहि.. मात्र त्यामुळे उत्सुकता नाहि असे मात्र नाहि. विनंती करतो की लेखकाने या गोष्टीमागचेत्यांच्या मनातील भाव मांडावेत

असो, तुमच्या गोष्टीचे रसग्रहण करणे मला पामराला अशक्य आहे. तरी तुमच्या शब्दभांडाराला आमचा सलाम.
कृपा करुन तुम्हीच तुमच्या गोष्टीचे रसग्रहण केलेत तर मला समजायला सोपे होईल.

कृपया थोडा वेळ काढून या गोष्टीचा अर्थ पण सांगावा , कठीण शब्दांच्या अर्थासकट !
म्हणजे आमचे पण मराठी जरा सुधारेल की , तेव्हढीच तुमच्याकडून प्रौढ साक्षरता अभियानास मदत .....

बाकी गोष्ट कळली नाही पण वाचायला छान वाटली. प्राडाँनी रसग्रहण करावे ही विनंती.

वाचाविशी वाटते नक्कीच. पण अर्थ अजिबातच कळत नाही

शब्दभांडारालाच सलाम आमचा. लय वगैरेही भारीच. त्यांचे हे सारे लेखन गूढ स्वरूपाचे आहे. वाचताना काही तरी कळतेय असे वाटते आणि क्षणात ते हरवून जाते असे यांच्या प्रत्येक कवितेवेळी होत आले आहे.

काहीतरी कळतंय कळतंय कळतंय... अरेच्चा काहिच कळत नाहीये.......... अशी अवस्था. ही गोष्ट वाचताना लय खूप छान लागत होती. साधारणतः एखाद्या कवीला / लेखकाला त्याच्या साहित्यकृती उकलून दाखावायला सांगणे बरोबर समजत नाहीत पण प्राडाँना कळकळीची विनंति... त्याम्च्या गोष्टी नुसत्या इथे प्रकाशित करून भागणार नाही, त्यावर त्यांनी काही भाष्य करावे. वाचायची उत्सुकता आहेच.

_____________________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)

श्रावण मोडक's picture

1 Jun 2009 - 3:14 pm | श्रावण मोडक

तुम्ही समीक्षक आहातच. क्रिकेटचे अंपायर नव्हे नुसतेच तर खणखणीत आक्रमक खेळी खेळणारा फलंदाजही. प्रत्येक वाक्य उच्च कोटीचे. षटकारांचा पाऊस नुसता... आम्हालाही चेंडू टाकताना कळले नव्हते त्याची उंची इतकी थोर आहे की, तो थेट स्टेडियमवरून बाहेर जाणार आहे.

बिपिन कार्यकर्ते's picture

1 Jun 2009 - 7:04 pm | बिपिन कार्यकर्ते

हेच बोल्तो. लै लै भारी ठोकाठोक...

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

1 Jun 2009 - 9:00 pm | चतुरंग

मास्तुरे लईच्च भारी षटकारांची आतषबाजी!

(खुद के साथ बातां : रंग्या, आता प्रा.डॉ.'शरद' बिरुटे असे म्हणावे कीकाय? B) :T ) )

चतुरंग

धनंजय's picture

1 Jun 2009 - 6:34 pm | धनंजय

उच्च

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

1 Jun 2009 - 3:16 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती
  • शरदिनीताईंच्या कवितांचा गद्य भाऊ वाटला.
  • शेवटापर्यंत येण्याच्या आतच डोळा लागला.
मैत्र's picture

1 Jun 2009 - 3:24 pm | मैत्र

एकदम आठवण आली... अगदी शब्द, नावे वाक्यरचना... खूप मस्त वाटलं.
विकांताला एका मासिकाच्या टपरीवर चांदोबा पाहिला. मुखपृष्ठ खूपच मॉडर्न वाटलं म्हणून चाळला. विक्रम वेताळाचं तेच जुनं चित्र, तशीच नावं, लहान गावातली पडवी असलेल्या शाकारलेल्या घरांची चित्रं, पैरण आणि धोतर या वेशातली माणसं अशा अनेक गोष्टी पाहून वाटलं आहे अजून चांदोबा तसाच आहे. वरुन पोशाख जरा नवा आहे आणि गरजेचा. नीट वाचलं नाही पण नव्या जुन्या गोष्टींचा तोल सांभाळला आहे असं वाटलं.

राजवैद्य, अधिपती, अर्यमन, घोरदर्शन, शयनगृहाकडे प्रस्थान केले.... मस्त आहे...
अजून अशा काही कथा लिहा. जमल्यास एक मालिका. धमाल येईल.

जी. ए. तर वाटले नाहीत. फक्त गूढ शब्द आणि रक्त, कवटी म्हणजे जी ए अजिबात नाहीत. आणि जी एंचे मुळात शब्दच गूढ वाटतात!
शब्दार्थांवरुन वाचले तर गुहेतल्या प्रसंगाचे अन्वय लागला नाही. मनोरथ का विकल झाले हे कळाले नाही.
सर्वात महत्त्वाचे अगदी अति अवघड प्रश्न असला तरी 'अर्यमन' नामक व्यक्तिने अमेरिकन डॉलरबद्दल विचारणे हे पूर्ण कथेला छेद देणारे आणि अचानकपणे बेअरिंग घालवणारे वाटले.

एका वेगळ्या आणि मस्त लिखाणाबद्दल खूप धन्यवाद!

Pain's picture

25 Jul 2010 - 11:32 am | Pain

सर्वात महत्त्वाचे अगदी अति अवघड प्रश्न असला तरी 'अर्यमन' नामक व्यक्तिने अमेरिकन डॉलरबद्दल विचारणे हे पूर्ण कथेला छेद देणारे आणि अचानकपणे बेअरिंग घालवणारे वाटले.

तस नाहीये. मला वाटते की ती जी मालिका चालु आहे त्यातला तो शेवटचा भाग आहे.

पिवळा डांबिस's picture

2 Jun 2009 - 2:42 am | पिवळा डांबिस

प्राडॉ, प्राडॉ,
अवो आमचं काय चुकलं आसंल तर काढा तुमची ती डब्बल-बॅरल आणि घाला दोन गोळ्या आमच्या छाताडात!!

पण हे आत्मक्लेश कशापायी करून घेताय?
:)

Nile's picture

2 Jun 2009 - 3:20 am | Nile

कोणी तो ज्याने धागा काढुन संपादकांना लिहायला उद्द्युक्त केलं होतं? ;)

अवलिया's picture

2 Jun 2009 - 7:33 am | अवलिया

हा हा हा :)
कोण हो कोण तो संपादकांनाच लिहायला उद्युक्त करणारा? :)
देता का सुपारी ? लिहु का त्याच्यावरच एक फक्कडसा लेख ? ;)
बोला ‍ !!! :?

--अवलिया

काळा डॉन's picture

2 Jun 2009 - 9:19 am | काळा डॉन

कोण रे तो?...मलाही ह्याच गोष्टीचे "नवल" वाटते आहे.. :)))

एकदम गुहेत शिरताना बजबजलेल्या कचर्‍याच्या ढिगाची आठवण होते.
खविस,हडळ,मुंजा,गोस्ट,डेव्हिल,वेताळ

प्रकाश घाटपांडे's picture

2 Jun 2009 - 5:02 pm | प्रकाश घाटपांडे

बिरुटे सरांच्या टंकणीतुन ही कथा बाहेर पडणार असे आमचे भाकित होतेच. ;)
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

विजुभाऊ's picture

29 Dec 2009 - 2:53 pm | विजुभाऊ

बिरुटे सर......
आख्ख्या वर्षात या सारखी कथा पुन्ना ल्हिली नायी?
आसं का कर्ताय?

अवलिया's picture

23 Jul 2010 - 2:25 pm | अवलिया

आख्ख्या वर्षात या सारखी कथा पुन्ना ल्हिली नायी?

+१

--अवलिया

JAGOMOHANPYARE's picture

29 Dec 2009 - 5:00 pm | JAGOMOHANPYARE

हे काय आहे? काही कळेना ............ :(

***************************
प्रातरग्निं प्रातरिंद्रं हवामहे प्रातर्मित्रावरुणा प्रातरश्विना: l
प्रातर्भगं पूषणं ब्रह्मणस्पतिं प्रातः सोममुत रुद्रं हुवेम ll

अविनाशकुलकर्णी's picture

24 Jul 2010 - 4:34 pm | अविनाशकुलकर्णी

मस्त

परिकथेतील राजकुमार's picture

24 Jul 2010 - 4:57 pm | परिकथेतील राजकुमार

वाह ! क लिवलय क लिवलय. पुन्हा वाचुन आता अनेक अर्थ कळु लागलेत.

साला हे इयान फ्लेमिंग, रश्दी, नसरीन वगैरे संपतात तिथे आमचे दि.बी. चालु होतात :)

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
आमचे राज्य

माया's picture

24 Jul 2010 - 5:42 pm | माया

:O कुठेतरी वाचलयं हे...आता आठवत नाहिये...

लेखकांनी संदर्भाचा खुलासा करावा...

- माया.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

24 Jul 2010 - 5:49 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कोणत्या संदर्भांचा खुलासा हवा आहे ? विचारा......

-दिलीप बिरुटे

हा लेख कुठल्या लिखाणाचा संदर्भ घेऊन आपण लिहीलाय याचा खुलासा करावा.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

26 Jul 2010 - 4:48 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

तुम्हाला संजोपरावांच्या या लेखाबद्दल म्हणायचे आहे काय ? त्याला उत्तर म्हणूनच हे लेखन केले होते.
पण तुम्ही हा लेख पूर्वी वाचल्याचा आरोप केला आहे. त्याबद्दल काय ?

उगाच काहीच्या काही बरळू नका.

-दिलीप बिरुटे

अवलिया's picture

26 Jul 2010 - 6:13 pm | अवलिया

दिलीप शेट

मनावर घेवु नका... द्या सोडुन

>>तुम्हाला संजोपरावांच्या या लेखाबद्दल म्हणायचे आहे काय ? त्याला उत्तर म्हणूनच हे लेखन केले होते.
हा संदर्भ देणे आवश्यक होते असे नाही का वाटत आपल्याला?

>>पण तुम्ही हा लेख पूर्वी वाचल्याचा आरोप केला आहे. त्याबद्दल काय ?
मी कुठेतरी वाचलयं हे असे म्हटले आहे. यातील नावं , लिखाणाची पध्दत ओळखीची वाटली म्हणुन लिखाणही. (अन्य शब्दांचा संदर्भ दिल्याबद्दल आभार.)

>>उगाच काहीच्या काही बरळू नका.
तुमचीच शब्दशैली आहे का ही ? असे वाटुन गेले. असो.

तक्रार
आपल्याला पटलं नसेल तर तुम्ही करु शकता.

संदर्भ मिळाल्याने मी यावर अजुन बोलणे योग्य नाही असे मला वाटते .

धन्यवाद आणि शुभेच्छा.

- माया.

Pain's picture

25 Jul 2010 - 11:37 am | Pain

गोष्ट आवडली,
शेवटचे रूपक (किंवा जे काही आहे) कळले नाही. कदाचित सर्व संदर्भ माहिती नसल्याने असेल...

शंका:
हेमगर्भाची मात्रा अतःकाळ समीप आल्यावर देतात ना ? एखादे काही महत्त्वाचे बोलणे राहुन जावू नये म्हणुन ?

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Jul 2010 - 11:50 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>हेमगर्भाची मात्रा अतःकाळ समीप आल्यावर देतात ना ? एखादे काही महत्त्वाचे बोलणे राहुन जावू नये म्हणुन ?

श्वास अडकायला लागला आहे असे वाटल्यावर देतात असे वाचून आहे. आता तो श्वास [अंत:काळातला की] कोणत्या कारणामुळे अडकल्यावर वगैरे काही माहित नाही.

-दिलीप बिरुटे

Pain's picture

25 Jul 2010 - 11:56 am | Pain

अच्छा, धन्यवाद.

आणि माझ्या वाक्यात अंत:काळ असे असायला हवे. संपादन करता येत नाहीये.

लै भारी वाटलं राव वाचताना :)
थोड्या वेळानी जड वाटायला लागलं ;)

जबरा वर्णनशक्ती.. काय गुंफा आहे..

प्राडॉधिपतींनी पुन्हा अशीच तळपती बॅटिंग सुरु करावी.

अहिरावण's picture

14 Sep 2023 - 7:25 pm | अहिरावण

मराठीच्या प्राध्यापकांकडून इतके छान संस्कृतप्रचुर शब्दांचा मस्त वापर केलेले लेखन पाहून बरे वाटले.
असेच लेखन यावे ...

पण मराठीच्या प्राध्यापकांनी ती कथा नक्की काय आहे ते सोपे करून सांगितले नाही

अहिरावण's picture

15 Sep 2023 - 10:22 am | अहिरावण

आजवर कोणत्या मराठीच्या प्राध्यापकांनी तुम्हाअम्हाला समजेल असे सोप्पे लिहिले आहे? त्यांचे लेखन प्रज्ञावंतांसाठीच असते.

अमरेंद्र बाहुबली's picture

15 Sep 2023 - 9:55 pm | अमरेंद्र बाहुबली

मस्त होती कथा. समजत नव्हती पण तरी वाचावीशी वाटली.

टर्मीनेटर's picture

16 Sep 2023 - 12:50 pm | टर्मीनेटर

xट काही कळलं नाही, पण वातावरण निर्मीती मात्र एक नंबर प्रा. डॅा. 👍