सांज स्वीकारली

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
8 May 2009 - 8:00 pm

प्रभाती किरण नवे, रात्री चांदण्यांचे दिवे
पुसता तू, 'काय हवे?' मीच सांज स्वीकारली!

उषा रम्य लावण्याची, निशा धुंद तारुण्याची
उदासीन, कारुण्याची, मीच सांज स्वीकारली!

उषा भूपाळीचे सूर, निशा अंगाई मधूर
मनी जागवी काहूर, मीच सांज स्वीकारली!

उषा प्रभूच्या कटाक्षी, निशा मीलनाची साक्षी
उभी एकली गवाक्षी, मीच सांज स्वीकारली!

उषा किलबिलणारी, निशा दरवळणारी
मागे घुटमळणारी, मीच सांज स्वीकारली!

उषा भैरव वहाते, निशा मालकौंस गाते,
माझे मारव्याशी नाते, मीच सांज स्वीकारली!

नको किरण कोवळे, नको चांदणसोहळे
माझे आभाळ वेगळे, मीच सांज स्वीकारली!

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

प्राजु's picture

8 May 2009 - 8:31 pm | प्राजु

सुरेख!!
प्रचंड अर्थ आहे कवितेत. फारच सुंदर!

उषा किलबिलणारी, निशा दरवळणारी
मागे घुटमळणारी, मीच सांज स्वीकारली!

उषा भैरव वहाते, निशा मालकौंस गाते,
माझे मारव्याशी नाते, मीच सांज स्वीकारली!

सुप्पर्ब!!

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

चन्द्रशेखर गोखले's picture

8 May 2009 - 9:18 pm | चन्द्रशेखर गोखले

खूप खूप आवडलेली कविता ! तुमच्या प्रतिभेला दंडवत !!!

मानस's picture

8 May 2009 - 9:28 pm | मानस

कवितेचा आशय आवडला. तुमची प्रतिभा अशी सदैव फुलत राहो हीच इच्छा ....

उषा भैरव वहाते, निशा मालकौंस गाते,
माझे मारव्याशी नाते, मीच सांज स्वीकारली!

क्या बात है!!!!

बेसनलाडू's picture

8 May 2009 - 10:34 pm | बेसनलाडू

आणि तो असलेली द्विपदी विशेष आवडली.
(आस्वादक)बेसनलाडू

चतुरंग's picture

8 May 2009 - 10:44 pm | चतुरंग

चतुरंग

घाटावरचे भट's picture

8 May 2009 - 11:55 pm | घाटावरचे भट

सुंदर!!

जागु's picture

9 May 2009 - 12:19 am | जागु

खुप सुंदर कविता आहे. खुप आवडली.

धनंजय's picture

9 May 2009 - 12:46 am | धनंजय

अजून विचार करतो आहे.

निरागस-अल्लड उषा एकीकडे, रसिक-प्रौढ निशा, पण कवयित्री निवडते ती विचलित करणारी थोडीशी करुण संध्या.

संध्या ही दिवस आणि रात्र यांच्या मध्ये घुटमळणारी (हेलकावणारी) वेळ. पण तशीच उषा ही रात्र आणि दिवस यांच्यामधली संधिकालीन वेळ...

उषा ही गाढ निद्रेपासून जागृतीकडे जाणारी म्हणून उमलणारी-प्रसन्न म्हणावी, तर इथे रात्र प्रत्येक कडव्यात सौदर्य लेऊन आलेली आहे. फारफारतर उषा एका धुंद आनंदातून दुसर्‍या धुंद आनंदाकडे नेणारा सांधा आहे. पण मग संध्यासुद्धा उलट्या दिशेने तसाच सांधा आहे. पण कवयित्रीला तो संधिकाल मग्न-करुण करतो. कवयित्री असे म्हणते ते पटते, पण "असे कारुण्य का?" हा विचार गुलदस्त्यात आहे.

अजून विचार करायला लावणार्‍या कवितेबद्दल धन्यवाद.

बेसनलाडू's picture

9 May 2009 - 1:34 am | बेसनलाडू

या कवितेच्या बाबतीत तरी कवयित्री स्वतःच अपेक्षित उत्तर देऊ शकेल; पण सामान्यतः हा नियम नसावा असे (मला) वाटते. सांज ये गोकुळी सावळी सावळी, संधिकाली या अशा यांसारखी गीते आठवतात (जोडीलाच 'सांज ढले गगनतले हम कितने एकाकी' सुद्धा आठवतेच!)
(स्मरणशील)बेसनलाडू
अवांतर - जवळपास दररोजची संध्याकाळ व्यायामशाळेतच व्यतीत होत असल्याने (शक्यतो) करुणबिरुण वाटत नाही; प्रसन्नच वाटते :)
(हट्टाकट्टा)बेसनलाडू

क्रान्ति's picture

9 May 2009 - 8:37 am | क्रान्ति

संध्याकाळ ही माझी अत्यंत आवडती वेळ! ती कातरवेळ असते, हुरहूर लावणारी, अंतर्मुख करणारी. तशी नेहमीच ती उदास नसते, पण बरेचदा असं होतं. 'संध्याछाया भिवविती हृदया' ही भावना कैकदा जागी होते संध्याकाळी. आयुष्याच्या एका ठराविक वळणावर एकाकीपणा, रितेपणा जेव्हा जास्त सलतो, तेव्हा असं काहीतरी मनातून कागदावर उतरतं. [मारवा थाटातला पूरिया शिकतेय, तोही संध्याकाळी, त्याचा परिणाम असेल कदाचित!]
तशी माझी संध्याकाळ कधी कधी अशी सुन्दरही असते.
http://www.misalpav.com/node/6781
क्रान्ति
{तापलो रामराया!}
अलिकडे आम्ही फ्रीज ओव्हन म्हणून वापरतो!
www.mauntujhe.blogspot.com

प्रदीप's picture

11 May 2009 - 8:14 pm | प्रदीप

ह्या कवितेवरून नकळत कैफी आजमींचे गीत आठवले :"ऐ बेक़रार दिल, हो चुका है मुझ को आसूओं से प्यार, मुझे तू खुशी न दे, नयी जिंदगी न दे"

सायली पानसे's picture

9 May 2009 - 1:36 am | सायली पानसे

फारच सुंदर आणि अर्थपुर्ण कविता. खुप आवडली.

यशोधरा's picture

9 May 2009 - 8:38 am | यशोधरा

सुरेख आहे कविता!

समिधा's picture

9 May 2009 - 8:52 am | समिधा

खरचं खुप सुंदर कविता लिहीली आहेस.

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

मनीषा's picture

9 May 2009 - 8:57 am | मनीषा

सुंदर कविता ..

नको किरण कोवळे, नको चांदणसोहळे
माझे आभाळ वेगळे, मीच सांज स्वीकारली! ... खूपच छान

नितिन थत्ते's picture

9 May 2009 - 4:08 pm | नितिन थत्ते

सहसा कविता वाचत नाही. पण कशी कोण जाणे आज वाचली.
खूप आवडली. प्रत्येक कडव्यातील सकाळ आणि रात्र यांतील वेगळेपण आणि स्वीकारलेले/निवडलेले तिसरेच.
छान कल्पना.

खराटा
(रंग माझा वेगळा)

मैत्र's picture

9 May 2009 - 4:58 pm | मैत्र

उषा भैरव वहाते, निशा मालकौंस गाते,
माझे मारव्याशी नाते, मीच सांज स्वीकारली!

खूप सुंदर कविता!!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

9 May 2009 - 5:50 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कवितेत आलेले शब्द आणि कविता केवळ सुंदर...!!!

चांदण्याचे दिवे, चांदण सोहळे,
रम्य लावण्याची उषा,
भुपाळी सुर उषा,
भैरव वाहते उषा,

आवडले !

-दिलीप बिरुटे

स्वाती दिनेश's picture

9 May 2009 - 7:09 pm | स्वाती दिनेश

नको किरण कोवळे, नको चांदणसोहळे
माझे आभाळ वेगळे, मीच सांज स्वीकारली!

वा .. आवडले.
स्वाती

सँडी's picture

9 May 2009 - 8:26 pm | सँडी

हेच म्हणतो.
प्रभाती किरण नवे, रात्री चांदण्यांचे दिवे
पुसता तू, 'काय हवे?' मीच सांज स्वीकारली!

मस्तच! पहिल्याच चेंडुवर षटकार!

-संदीप.
काय'द्याच बोला.

राघव's picture

11 May 2009 - 9:08 am | राघव

मस्त कविता..

प्रभाती किरण नवे, रात्री चांदण्यांचे दिवे
पुसता तू, 'काय हवे?' मीच सांज स्वीकारली!

नको किरण कोवळे, नको चांदणसोहळे
माझे आभाळ वेगळे, मीच सांज स्वीकारली!

हे विशेष आवडले.

राघव

अश्विनि३३७९'s picture

11 May 2009 - 11:06 am | अश्विनि३३७९

मस्तच क्रान्ति ताई ...

उषा भैरव वहाते, निशा मालकौंस गाते,
माझे मारव्याशी नाते, मीच सांज स्वीकारली!

या ओळी सुंदरच..

जयवी's picture

11 May 2009 - 4:43 pm | जयवी

क्या बात है क्रान्ति........ !!
अप्रतिम !!
मीच सांज स्वीकारली...... अहा !! जियो !!

नंदन's picture

11 May 2009 - 8:42 pm | नंदन

आणि अर्थगर्भ कविता. अतिशय आवडली.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सुवर्णमयी's picture

12 May 2009 - 1:01 am | सुवर्णमयी

कविता आवडली.
शुभेच्छा