काठावरचे प्रेम.....

उदय सप्रे's picture
उदय सप्रे in जे न देखे रवी...
6 May 2009 - 9:06 am

काठावरचे प्रेम.....

अस्ताला जाणार्‍या सूर्याला बघून
एकदा रात्र म्हणाली,
"बराच काही काळ तळपतोस
मग शेवटी असा का मावळतोस?"

सूर्य म्हणाला , "वेडे , मी जातो तुझ्या सुखासाठी
तू आसुसलेली असतेस तुझ्या चंद्राच्या मुखासाठी !

आपलं तारुण्य उधळतेस , पहाटे पहाटे दु:खी होतेस
पुन्हा यावं लागतं मला , तुला फुलवायला , तुझ्या सुखासाठी !"

रात्र : " खरंच राजा , चंद्रापेक्षाही तूच खरा सखा आहेस
भेटतोस काही क्षणांसाठी , पण धग देतोस जगणार्‍या प्रत्येक कणासाठी !

मला तुम्ही दोघेही हवेत , दोघांना एकत्र मला बघायचंय
'एक हात तुला अन् एक हात त्याला' असं बेधुंद जीवन जगायचंय !"

सूर्य म्हणाला , "मलाही सखे एकदा तुझ्या कुशीत निजायचंय
ही धग खूप असह्य आहे , शांत होईतो चांदण्यात भिजायचंय !

पण .....आपल्याला असं वागता येणार नाही
तुझ्या रात्रीच्या प्रियकरासाठी तुला जायलांच हवं
आणि.....तुझ्या त्या सुखी क्षणांसाठी.....
"तो" येताच , मला असं विझायला हवं !

----------कवी : सन्मित्र (उदय गंगाधर सप्रे-ठाणे , ०८ डिसेंबर २००५ , ०८.०० वा.)

कविताआस्वाद

प्रतिक्रिया

मराठमोळा's picture

6 May 2009 - 9:54 am | मराठमोळा

कल्पना आणी कविता खुप आवडली. येऊ द्या अजुन.

( अवांतरः "एक फुल दो माली", "संगम" सिनेमे आठवले. ;) )

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

पिवळा डांबिस's picture

6 May 2009 - 10:00 am | पिवळा डांबिस

पण उदयराव,
अंमळ राज कपूरच दिसतोय तुमचा सूर्य....
राजेंद्रकुमारपायी वैजयंतीमालेला गमावणारा...
धत तेरेकी!!
:)

उदय सप्रे's picture

6 May 2009 - 10:40 am | उदय सप्रे

राव , असं काय करता? सूर्य एकदम वास्तववादी आहे , नाहीतरी आपल्याला हे झेपणार नाही हे त्याला दिसतंच आहे (चंद्र १२ तास आणि हा फक्त पहाटे उगवताना रात्रीला काय भेटेल तेव्हढाच !) , मग निदान प्रेम तरी व्यक्त करून उदारपणा का मिळवू नये?
अवांतर : राज कपूर ने फक्त सिनेमात हिरॉईन्स दुसर्‍यांना दिल्या , प्रत्यक्षात मात्र.....तुम्ही सुजाण आहातच , आज तो जिवंत असायला हवा होता , नाती ज्या उघड्या नाचतायत त्या बघायला.....(एक कलाकार म्हणून आदर असला तरी वास्तव नाकारता येत नाही ना?)

पिवळा डांबिस's picture

6 May 2009 - 10:43 am | पिवळा डांबिस

मग निदान प्रेम तरी व्यक्त करून उदारपणा का मिळवू नये?
असं आहे होय!!
मग चालूद्या...
:)
बाकी तुमचं 'अवांतर' अगदी खरं आहे!! त्या बिचार्‍या नितू सिंग ला उगाच ऍक्टिंग सोडून द्यावी लागली.....

अश्विनि३३७९'s picture

6 May 2009 - 10:45 am | अश्विनि३३७९

रात्र : " खरंच राजा , चंद्रापेक्षाही तूच खरा सखा आहेस
भेटतोस काही क्षणांसाठी , पण धग देतोस जगणार्‍या प्रत्येक कणासाठी ..
या ओळीचा नक्कि अर्थ काय ??

उदय सप्रे's picture

6 May 2009 - 11:06 am | उदय सप्रे

"जगण्यासाठी आपण खातो त्याचे रुपांतर ऊर्जेत होते आणि त्या ऊर्जेवर आपण जिवंत राहू शकतो " हे वैज्ञानिक सत्या तुम्हाला माहित आहेच , त्याच धर्तीवर , सूर्य पहाटे म्हणजे रात्र मावळताना फक्त काही क्षणच रात्रीला भेटतो आणि त्या पहाटेच्या आपल्या दर्शनाने जी ऊब तिच्यात निर्माण करतो , त्यावर प्रत्येक कण ती अजून १२ तसांनी १२ तास जिवंत राहू शकते .....

सहज's picture

6 May 2009 - 11:19 am | सहज

जर नदीचा उल्लेख नसेल तर काठावरचा शब्द हा नेहमी काठावर म्हणजे जेमतेम, नक्की असे नाही, अगदी काठावर पास झाला हेच पहीले आठवते.

काठावरचे प्रेम म्हणजे अजुन १००% कमीट्मेंट नाही आहे दुसरे कुणी सापडले तर हा करार संपुष्टात असे वाटते. :-)

बाकी सुर्य, पृथ्वी व चंद्र यांचे लफडे, एकमेकांना कुशीत घेणे व सोडणे ... जाउ दे.. चालू दे...

पुलेशु

जागु's picture

6 May 2009 - 12:45 pm | जागु

छान आहे कविता.