तुझे माझे नाते

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
4 Apr 2009 - 5:57 pm

तुझे माझे नाते जशी गूढ सागराची खोली
दूर दूर तरी एक तुझी माझी मनबोली
तुझा धुंद निशिगंध, माझी नाजूक अबोली

तुझे माझे नाते जसे भाग्य रेखले ललाटी
पूर्वसंचिताचे फळ तुझ्या माझ्या गाठीभेटी
तुझ्या गुलाबाचा डौल, माझी बावरी कोरांटी

तुझे माझे नाते जशी घनगर्द देवराई
तोच सूर, तोच ताल, तरी रोज नवलाई
तुझा खट्याळ प्राजक्त, माझी वेडी जाईजुई

तुझे माझे नाते जशी श्रावणसरींची गाणी
तुला-मलाच कळली प्राक्तनाची गूढ वाणी
तुझा धीट सोनचाफा, माझी शांत रातराणी

तुझे माझे नाते जसे उठती तरंग जळी
आभाळीच्या खेळियाने मांडली अबोध खेळी
तुझा आर्जवी मोगरा, माझी लाजरी बकुळी

कविताप्रकटन

प्रतिक्रिया

पल्लवी's picture

4 Apr 2009 - 6:50 pm | पल्लवी

कविता छान "फुलली" आहे !! :)

शितल's picture

4 Apr 2009 - 7:22 pm | शितल

फुले ओवुन छान कविता केली आहे. :)

अनामिक's picture

4 Apr 2009 - 8:40 pm | अनामिक

मस्तं!

-अनामिक

अनिल हटेला's picture

6 Apr 2009 - 7:42 am | अनिल हटेला

आवडली !! :-)

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मराठमोळा's picture

4 Apr 2009 - 7:58 pm | मराठमोळा

योग्य चाल लावली तर छान गाणे तयार होईल.. :)

आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!

शाल्मली's picture

4 Apr 2009 - 8:08 pm | शाल्मली

वा! मस्त कविता!
छान आहे.
फुले ओवुन छान कविता केली आहे.
असेच म्हणते..

--शाल्मली.

ऋषिकेश's picture

4 Apr 2009 - 8:38 pm | ऋषिकेश

मस्त. कविता आवडली
ऋषिकेश

सागर's picture

4 Apr 2009 - 8:50 pm | सागर

एकदम सुंदर कविता क्रांतिजी...

खास करुन हे कडवे अप्रतिमच

तुझे माझे नाते जसे भाग्य रेखले ललाटी
पूर्वसंचिताचे फळ तुझ्या माझ्या गाठीभेटी
तुझ्या गुलाबाचा डौल, माझी बावरी कोरांटी

फक्त शेवटच्या ओळीत मला थोडी दुसरी ओळ सुचली ती देत आहे
तुझे नि माझे नाते, जसे भाग्य रेखले ललाटी
पूर्वसंचिताचे फळ, तुझ्या नि माझ्या गाठीभेटी
मनास मोह पाडी तुझी ती अंगकाठी शेलाटी ... :)
किंवा
मनाची तगमग अन् मग विरहात आठवतात तुझ्या त्या अटी :)

मदनबाण's picture

5 Apr 2009 - 4:26 am | मदनबाण

सुंदर कविता... :)

मदनबाण.....

I Was Born Intelligent,But Education Ruined Me.
Mark Twain.

सुधीर कांदळकर's picture

5 Apr 2009 - 3:17 pm | सुधीर कांदळकर

माझी नाजूक अबोली

तुझा खट्याळ प्राजक्त, माझी वेडी जाईजुई

तुझा धीट सोनचाफा, माझी शांत रातराणी

तुझा आर्जवी मोगरा, माझी लाजरी बकुळी

या ओळी मस्तच. पण गुलाबाची कोरांटी हे पटत नाहीं. उगीच न्यूनगंडात्मक भावना वाटते.
तसेंच अशा भावरम्य कवितेंत मध्येंच प्राक्तन आणि आभाळाचा खेळ असे तत्वज्ञान रसभंग करतें तरी मस्त कल्पनांचा आस्वाद दिल्याबद्दल धन्यवाद.

सुधीर कांदळकर.

क्रान्ति's picture

5 Apr 2009 - 3:40 pm | क्रान्ति

प्रतिसादांनी कवितेला आणखी फुलविणा-या सगळ्या मित्रांना धन्यवाद.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

जयवी's picture

5 Apr 2009 - 4:11 pm | जयवी

तोच सूर, तोच ताल, तरी रोज नवलाई........ अगदी अगदी :)

फार गोड कविता झालीये क्रान्ति !!

जागु's picture

6 Apr 2009 - 12:15 pm | जागु

वा फुलांचा खुप छान बहार आला आहे कवितेत.

विसोबा खेचर's picture

6 Apr 2009 - 12:49 pm | विसोबा खेचर

व्वा! व्वा!

प्राजु's picture

6 Apr 2009 - 9:46 pm | प्राजु

फुलांचा ताटवा.. अतिशय मनमोहक आणि सुगंधी आहे.
मस्तच.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बेसनलाडू's picture

6 Apr 2009 - 10:00 pm | बेसनलाडू

आवडली.
(बागायतदार)बेसनलाडू