ज्याचं त्याचं आभाळ

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
9 Mar 2009 - 9:53 pm

कोण म्हणत आभाळ मोकळ असत?
पिंज-यातल्या पंख कापलेल्या पाखराला विचार!
आभाळ असत बांधलेल, पिंज-याच्या गजांनी.
कधी हिरव्या फांद्यांवर विसावलेल्या,
कधी किलबिलत स्वच्छंद उडणा-या
पाखरांच्या थव्यांनी सजलेल आभाळ
असत केवळ एक स्वप्न, सत्याचा खुळा आभास फक्त!
कोण म्हणत आभाळ भव्य असत?
जन्मठेपेची शिक्षा भोगणा-या कैद्याला विचार!
आभाळ म्हणजे कोठडीच्या झरोक्यातून दिसणारा
धूसर, कळाहीन टीचभर तुकडा
काजळलेल्या कंदिलाच्या काचेसारखा.
शरदातला मोहक अमृताचा चन्द्र,
रौद्र तांडवान दिपवणारी वीज,
किरणांच्या रांगोळीन नटलेल आभाळ
असते नुसतीच वेडी कल्पना, कुणा उन्मनी कवीच्या मनातली!
कोण म्हणत आभाळ भव्य असत?
डोळ्यांना झापड बांधून घड्याळाच्या काट्यांच्या तालावर
धावणा-या पावलांना विचार!
आभाळ असत धुरकट, वेडवाकड,
खाचखळग्यांनी भरलेल्या रस्त्यासारख.
श्रावणातले सोनेरी झालरींचे ढग,
सांजसकाळची रंगपंचमी,
सप्तरंगी झूला झुलवणार आभाळ
असत केवळ एक चित्र, एखाद्या मनस्वी चित्रकाराच्या
कुंचल्यातून उतरलेल!
खर आभाळ कस असत, ठाऊक आहे?
पिंज-याच्या गजांवर पंख आपटून,
कोठडीच्या भिंतींवर डोक आदळून,
रस्त्यान धावताना ठेचकाळून पडून
पापण्यांत जे उतरत ना, डोळ्यांतून जे बरसत ना,
तेच असत खर आभाळ, ज्याच त्याच वेगळ आभाळ!

क्रान्ति
{मी शतजन्मी मीरा}

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

मुक्तछंदातली ही कविता आवडली.
एवढंस आभाळ या चित्रपटातल्या, "तू एवढंसं आभाळ, माझ्या पापाणीत लपलेलं" याची आठवण झाली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

9 Mar 2009 - 10:44 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

पण कविता थोडी दु:खी वाटली; म्हणून खूऽप नाही आवडली.

अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.

बिपिन कार्यकर्ते's picture

10 Mar 2009 - 12:25 am | बिपिन कार्यकर्ते

मला आवडली....

बिपिन कार्यकर्ते

अवलिया's picture

10 Mar 2009 - 8:17 am | अवलिया

आवडली.

--अवलिया

शरदिनी's picture

9 Mar 2009 - 10:56 pm | शरदिनी

कविता उत्कृष्ट होती...
...
अवांतर : शतजन्मीची मीरा आणि क्रांती एकच असाव्यात हे आजच्या काळात खूपच सूचक वाटले आणि हृदयाला भिडले.... धन्यवाद

पक्या's picture

10 Mar 2009 - 12:20 am | पक्या

कविता आवडली.

बेसनलाडू's picture

10 Mar 2009 - 1:38 am | बेसनलाडू

आवडलं.
(भूचर)बेसनलाडू

क्रान्ति's picture

10 Mar 2009 - 8:48 am | क्रान्ति

सगळ्या मित्रकम्पनीला प्रतिसादाबदल धन्यवाद. अशा प्रतिसादांमुळेच तर लिहायची उर्मी येते.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}

जयवी's picture

10 Mar 2009 - 2:13 pm | जयवी

क्रान्ति....... फार फार आवडली गं कविता !!