१६ डिसेंबर ०८

स्वाती दिनेश's picture
स्वाती दिनेश in जनातलं, मनातलं
16 Jan 2009 - 9:14 pm

१६ डिसेंबर, मंगळवार.. सकाळी ७ चा सुमार, पारा मायनसकडे झुकलेला.. सूर्याची लेट ड्यूटी.. उजाडायला अजून चिकार अवकाश.. दिनेश बूट घालत असताना फोन खणाणला. आत्ता एवढ्या सकाळी कोणाचा फोन? म्हणत त्याने फोन घेतला आणि बापरे..बरं .. म्हणत ठेवलाही. कोणाचा फोन होता?ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी अंगातला ओव्हरकोट काढून त्याने सोफ्यावर फेकला. "अरे,काय झालं? कोणाचा फोन होता? " "बाबा गेले." तो सुन्नपणे म्हणाला.
"बाबा गेले? कोणाचे?"
"अग, आपले..सुधीरचा फोन होता."
"शक्यच नाही. परवाच तर बोललो की आपण त्यांच्याशी.."
लगेचच परत भारतात घरी फोन लावला.अशा बातम्या दुर्दैवाने कधीच खोट्या ठरत नाहीत.
फोनवर तेच परत ऐकूनही स्वत:च्या कानांवर विश्वास बसेना.सुन्न व्हायला झालं. लगेचच भारतात यायला निघतो आहोत एवढंच कसंबसं बोलता आलं.दिनेशने काकाला सांगितलं आम्ही लगेच निघतो आहोत,पण तुम्ही आमच्यासाठी थांबू नका.परत एकदा मी जे ऐकलं त्यावर माझा विश्वास बसेना. थांबू नका? मला न भेटता कसे जातील बाबा? मला त्यांना पहायचं आहे. माझ्या मनात विचारांची गर्दी दाटली. लगेच निघालो तरी तिथे पोहोचायला रात्रीचे २ तरी वाजतील हे लक्षात घेऊन तिथे असलेल्या सगळ्यांना आणि बाबांनाही माझ्यासाठी किती त्रास द्यायचा? हे विचार मनात आणून मग डोळ्यातलं पाणी आवरत तिकिटांची व्यवस्था करायला निघालो.
नाताळच्या सुट्या सुरु झाल्याने तिकिटं मिळेनात. मला आत्ताच्या आत्ता जायचं आहे भारतात, कोणत्याही एअरलाइनचं, कोणत्याही क्लासचं तिकिट द्या हो मला.. माझं मन आक्रंदू लागलं.त्या दिवशीचं तिकिट नाहीच मिळालं, शेवटी दुसर्‍या दिवशीचं एकच तिकिट कन्फर्म झालं,दुसरं तिकिट अजूनही वेटिंगवरच होतं.
घरी फोन करुन तिकिटाचं सांगितलं. असं कसं झालं? ह्या खेरीज दुसरा विचार मनात नव्हता आणि जाता येत नसल्यानं हतबल.. अगदी हेल्पलेस वाटत होतं. फोनावर फोन करण्याखेरीज दुसरं काय करु शकत होते? त्सेंटा आजीला फोन लावला. आजीही माझ्याइतकीच हादरली.आईबाबा जर्मनीत येऊन गेल्याने आजीआजोबांशी त्यांची छान दोस्ती झालेली होती. त्यांनाही धक्का बसणं स्वाभाविक होतं, तरीही त्यांचा आम्हाला खूपच आधार होता. अशा वेळी कोणीतरी मोठं आधाराला हवं असतं आणि आजीआजोबांनी बळंबळं ब्रेडचा स्लाइस आणि कॉफी घ्यायला लावली, तुला तिथे जाऊन उभं रहायचं आहे. धीराने घ्यायला हवं असं सांगत धीर दिला.अजून रात्र फ्रांकफुर्टातच काढायची होती पण ही वाईट बातमी कळल्यावर आमच्या सुहृदांनी इमेल,फोन, चॅटवरुन संपर्क साधून एकटेपणा वाटू दिला नाही.
आठवणी, आठवणी आणि असंख्य आठवणी..मन तर कधीच आईच्या कुशीत जाऊन पोहोचलं होतं.लहानपणी मला खांद्यावर घेऊन जाणारे बाबा, प्रियाला हिरकणीची गोष्ट सांगणारे बाबा, काका,तुझे केस सोनेरी हवे होते म्हणजे एकदम युरोपियन दिसला असतास असं मृणालने म्हटल्यावर मिश्किलपणे हसणारे बाबा,वास्तुशांतीच्या वेळचे सोवळं नेसलेले बाबा,आमच्या सगळ्यांच्या लग्नातले बाबा, सारिकाला सुपारी आवडते म्हणून तिच्या रुखवतात किलोभर सुपारी ठेवणारे बाबा,जर्मनीला आलेले, ख्रिस आणि सुझनचे लग्न एन्जॉय करणारे, त्सेंटा आकिम आणि मार्सेलाशी गप्पा मारणारे बाबा.. असंख्य आठवणींनी रात्र उसवून गेली.
कसाबसा दुसरा दिवस उजाडला.आकिमआजोबा विमानतळावर सोडायला आले होतेच.दिनेशचे तिकिट कन्फर्म झाले नाही, ४ दिवसांनंतरचे तिकिट त्याला मिळाले.पण तो एकटा नाही त्याच्या पाठीशी आजीआजोबा आहेत ह्याची कल्पना असल्याने पुढे गेले. विमानाने आकाशात झेप घेतली आणि मनही धावू लागलं. प्रवासाचे ते ८ तास किती मोठे वाटले. वेळ जाता जाईना.. परत आठवणींचे कढ यायला लागले.
एकदाचे विमान मुंबईला पोहोचले.बाहेर पडण्यासाठी ही गर्दी.. एस.टी स्टँडच्या वरताण दृश्य! सामान तर काही नव्हतंच पण बाहेर जाण्यासाठी रांगेत तर उभं राहणं प्राप्त होतंच. हताशपणे रांगेत उभी राहिले. पाचेक मिनिटात एका कस्टम अधिकार्‍याने सामानाची विचारणा केली. हातातली पर्स दाखवल्यावर त्याने एनी प्रॉब्लेम? असं विचारत माझ्या उत्तराचीही वाट न पाहता रांगेतून बाहेर काढून दुसर्‍या दाराने मला बाहेर सुध्दा काढले. निखिल,सुधीर बाहेर वाट पाहतच होते.
घरी पोहोचलो. अंगणात गाडी लावताना मात्र बांध फुटला. बाबांशिवाय घर..कल्पनाच सहन होईना.घर सगळ्या नातेवाईकांनी भरलेलं होतं पण बाबाच नव्हते. त्यांच्याऐवजी टोपलीखालचा तो अशुभ दिवा फक्त होता. आई आणि प्रियाच्या कुशीत शिरले. नेमकं काय झालं त्यांना हे मला अजूनही कळलेलं नव्हतं.
सकाळचा पेपर वाचून ,दुसरा चहा घेऊन नेहमीसारखे ते आंघोळीला गेले.रंगाचं काम सुरु करायचं म्हणून कामगार आलेले होते.बाबा आंघोळ करुन,बादल्या आवरुन ,कपडे मशिनमध्ये टाकून,सूर्याला नमस्कार करुन जिना उतरत होते. ४/५ पायर्‍या उतरल्यावर एका पायरीवर बसले.कसला आवाज नाही, व्हिवळणं नाही, आधाराला काही घेतलेलं नाही. शांतपणे एका पायरीवर बसून दुसर्‍या पायरीवर पाय सोडलेले,डोळे मिटलेले आणि डोके खाली झुकलेले.. प्रियाने त्यांना असं बसलेले पाहताच ती धावतच वर गेली.बाबांना सावरत तिने आईला, रंगार्‍यांना हाका मारल्या.त्यांच्या मदतीने खाली आणून त्यांना कांदा हुंगवला, ब्रँडी चोळली,तोंडात सॉर्बिट्रेट चुरुन घालत एकीकडे डॉ़क्टरना ,काकाला फोन लावले. दुसर्‍या मिनिटाला नरेन आणि काका धावतच आले. नरेन आणि प्रियाने कार्डिऍक मसाज,माऊथ टू माउथ रेस्पि. द्यायला सुरुवात केली.एवढ्यात डॉक्टर आलेच.त्या परिस्थितीत प्रियाने आणि आईने दाखवलेलं ध्यैर्य खरोखरच कौतुकास्पद होतं.
कार्डिऑलॉजिस्ट तांबेंचं हॉस्पिटल आमच्या दारात आहे.ऍम्ब्युलन्सची सुध्दा वाट न पाहता आपण काकांना गाडीतूनच नेऊया, नरेन म्हणाला. पण बीपी शूट व्हायला तयार नाही, नाडी लागेना.. कार्डिऍक ऍरेस्ट झाले होते. आता कशाचाच उपयोग नव्हता.क्षणात सगळं होत्याचं नव्हतं झालं होतं.त्यांना मधुमेह होता ,हाय बीपी होते पण दोन्हीही कंट्रोलमध्ये होते. मधुमेह्यांना पेनलेस ऍटेक येतो. वेदना जाणवत नाहीत. बाबांना मॅसिव्ह ऍटेक आला पण त्यांना वेदना जाणवल्या नाहीत आणि कार्डिऍक झाल्याने काहीच करायला अवधी मिळाला नाही. माझा डॉक्टर भाऊ सांगत होता.मन तरीही अजून हे सत्य मानायला तयार नव्हतं.जेव्हा आपलं कोणी आजारी पडतं ,आयसीयुत ऍडमिट करतो तेव्हा मनाविरुध्द का होईना त्या शेवटच्या आजाराची मनाला तयारी करावी लागते पण बाबांनी कसलाच अवधी न देता एकदम एक्झिटच घेतली.प्राजक्ताच्या झाडावरुन फुलं ओघळून पडावित तसे निघूनच गेले एकदम!
मागच्याच वर्षी ७५ पूर्ण केल्यावर आम्ही सगळ्यांनी आनंदाने एकत्रितपणे ते साजरं केलं. त्यांच्याकडे पाहून ते ७५चे आहेत हे खरं वाटत नसे इतके ते तरुण दिसत,मनाने तर ते तरुण होतेच. त्यामुळेच ते असे एकदम अनंताच्या प्रवासाला निघून जातील हे स्वप्नातही आलं नव्हतं.पण जितके ते डेअरिंगबाज होते त्याच निडरपणे ते यमालाही म्हणाले असतील, "तुझ्याबरोबर यायचं म्हणतोस? चल.. आलोच.."
जवळ्जवळ प्रत्येकाची अशी इच्छा असते. संसारातल्या सार्‍या जबाबदार्‍या पूर्ण व्हाव्यात, लोळतघोळत न पडता, चालतं बोलतं असताना यमाजीकडून निमंत्रण यावं,शेवटचा दिस गोड व्हावा. पण सार्‍यांचीच ही इच्छा पूर्ण नाही होत. बाबा त्या काही भाग्यवंतापैकी एक होते. त्यांच्या संपन्न जीवनाची ही यशस्वी अखेर होती.

जीवनमानअनुभव

प्रतिक्रिया

विनायक पाचलग's picture

16 Jan 2009 - 9:19 pm | विनायक पाचलग

अरे याला काय म्हणायचे
भावस्पर्शी
दोन वर्षापुर्वी माझी आजी गेली
त्यावेळी काहीशी अशीच अवस्था झाली होती माझी

विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले

लिखाळ's picture

16 Jan 2009 - 9:24 pm | लिखाळ

स्वातीताई,
तुझ्या दु:खात सहभागी आहोत. तुझ्या बाबांना सद्गती लाभो ही प्रार्थना !

सरता संचिताचे शेष नाही क्षणाचा अवकाश।
ढळते न ढळते निमिष जाणे लागे ।
-- लिखाळ.

चतुरंग's picture

16 Jan 2009 - 9:26 pm | चतुरंग

स्वतीताई, भगवंताची करणी अन डोळ्यात पाणी!!
दुसर्‍या कोणालाच काय पण त्यांना स्वतःलाही समजलं नसावं कदाचित की त्यांची एक्झिट कधी झाली!

विना दैन्येन जीवनम | अनायासेन मरणम!
तुझे बाबा भाग्यवान होते एवढंच म्हणेन मी. परमेश्वर त्यांना सद्गती देवो आणि तुम्हाला धैर्य!

(हा एवढा हृदयातला अनुभव आमच्याबरोबर वाटून घेण्यातून तुझं मिपाकरांवरचं मनोमन प्रेम दिसलं तुला शतशः धन्यवाद!)

चतुरंग

विनायक पाचलग's picture

16 Jan 2009 - 9:29 pm | विनायक पाचलग

मगाशी आठवणीने व्याकुळ झाल्याने काही लिहु शकलो नाही
असो
परमेश्वर त्यांना सद्गती देवो आणि तुम्हाला धैर्य!
माझ्याही याच सदीच्छा
आणि हो मिपाला एक कुटुंब मानले जाते हा विश्वास तुम्ही आज द्रुढ केलात
आता आम्ही दीवसभर किपावर पडुन असतो याचे सार्थक होइल कारण माणूस कुटुंबातच रमतो
आपला
(मनातल्या मनात अश्रु ढाळणारा)विनायक...................................
विनायक पाचलग
माझ्या भावना येथे उतरतात.
आणि हो सर्वात महत्वाचे म्हणजे
छानसे वाचलेले

श्रावण मोडक's picture

16 Jan 2009 - 9:27 pm | श्रावण मोडक

...ते यमालाही म्हणाले असतील, "तुझ्याबरोबर यायचं म्हणतोस? चल.. आलोच.."
सलाम तुमच्या बाबांना.
असा मृत्यू येणं भाग्याचंच. 'काळ देहासी आला खाऊ, आम्ही आनंदे, नाचू गाऊ...' वृत्तीची अशी समाधानी माणसे न सांगताच निघून जात असतात. त्यांचं ते जाणं त्यांनाच शोभतं. आपण फक्त त्यांच्या स्मृती अधिक गहिऱ्या करायच्या असतात.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

16 Jan 2009 - 9:29 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

स्वातीताई, काय बोलू? ज्याचं दु:ख त्यालाच भोगायला लागतं आणि आपलं जवळचं माणूस जातं तेव्हाच हे समजतं. पण किंचित बरं वाटलं हे वाचून की तुझ्या बाबांना जिवंतपणी मरण भोगण्याची वेळ आली नाही आणि शेवटच्या क्षणालाही फारशा यातना झाल्या नाहीत. माझ्या बाबांचीही अखेर जवळजवळ अशीच झाली.

अदिती
आमच्यात बौद्धीक संपदेचा कॉपीराईट घेण्याची पद्धत नाही आणि मी त्याला अपवादही नाही.

मिंटी's picture

17 Jan 2009 - 11:37 am | मिंटी

स्वाती ताई खरच माझ्या भावनाही आदिती सारख्याच आहेत......ज्याचं दु:ख त्यालाच भोगावं लागतं आणि हे त्याचं त्यालाचं कळतं......त्या परिस्थितीत तुझ्या आईनी दाखवलेला धीर......
शब्दचं नाहीएत बघ बोलायला.................

फार वाईट वाटले पण हा प्रवास कुणालाच चुकला नाही हेच खरे...
तुझ्या बाबांच्या आत्म्याला शांती अन सद्गती लाभो हीच प्रार्थना !

...बाबा

प्राजु's picture

16 Jan 2009 - 9:52 pm | प्राजु

स्वातीताई..
तुझं दु:ख समजू शकते. तुझ्या बाबांच्या पुण्यात्म्याला सद्गती लाभो..
हा अनुभव मिपाकरांबरोबर शेर करून तू आमचा सर्वांचा सन्मान केला आहेस. आम्हाला तुझ्या दु:खात सामिल करून घेऊन आपलेपणा दाखवला आहेस इतकेच म्हणेन.
आता मात्र तुला सावरायला हवं. उभं रहायला हवं. आम्ही आहोतच गं तुझ्या पाठीशी. तुला तुझ्या आईला, भावंडांना सांभाळायला हवं.

- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

शाल्मली's picture

16 Jan 2009 - 10:04 pm | शाल्मली

स्वातीताई,
तुझ्या दु:खात सहभागी आहे.
खरंच एवढ्या लांब असल्याने त्यादिवशी तू किती हतबल झाली असशील..
तुझ्या बाबांना सद्गती लाभो !

--शाल्मली.

घाटावरचे भट's picture

16 Jan 2009 - 10:16 pm | घाटावरचे भट

आपल्या दु:खात सहभागी आहे. जवळची व्यक्ती जाण्याचं दु:ख मोठं असतंच, तरीही आमच्यासोबत दु:ख शेअर केल्याने आपलं मन थोडं हलकं झालं असेल अशी आशा. आपल्या बाबांना ईश्वर सद्गती देवो हीच त्याच्या चरणी प्रार्थना.

प्रमोद देव's picture

16 Jan 2009 - 10:19 pm | प्रमोद देव

असे मरण फारच थोड्या भाग्यवंतांना मिळतं. माझे आई-वडीलही झोपेतच गेले. चेहेर्‍यावर प्रसन्नतेचे भाव ठेवून.
तरी देखिल आपल्या जवळची व्यक्ती गेल्यावर दु:ख हे होतेच. स्वाती तुला हे दु:ख सोसण्याचे सामर्थ्य मिळो अशी प्रार्थना करतो.

जे होणार ते टाळता येत नाही. परंतु एक माणुस आपल्यातुन निघुन जाणे किती क्लेशदायक असते ह्याचा अनुभव आहे.तुम्ही लवकरच ह्या दु:खातुन बाहेर पडाल ह्याची खात्री आहे.तुमच्या बाबांना सद्गती लाभो ही प्रार्थना .
वेताळ

नि३'s picture

16 Jan 2009 - 11:20 pm | नि३

परमेश्वर त्यांना सद्गती देवो आणि तुम्हाला धैर्य!

---नि३.

रेवती's picture

16 Jan 2009 - 11:38 pm | रेवती

स्वातीताई,
तुझे सांत्वन करण्यास शब्द नाहीत.
परमेश्वर तुझ्या बाबांच्या आत्म्यास शांती देवो.
त्यांच्या आठवणींमुळेच सावरशील अशी आशा.
रेवती

यशोधरा's picture

17 Jan 2009 - 12:11 am | यशोधरा

स्वातीताई, :(
सावरशील ना स्वतःला? आम्ही आहोतच गं तुझ्यापाठी..

भाग्यश्री's picture

17 Jan 2009 - 12:25 am | भाग्यश्री

छ्या वाईट वाटलं वाचून.. असं कसं एखादा माणूस झटकन एक्झिट घेतो मला कळतच नाही.. :( माझी ६ वर्षाची भाची अशी झटकन गेली.. तो धक्का मी महीनोनमहीने विसरले नव्हते..
तुला हा धक्का सहन करायचे बळ मिळो.. :(

http://bhagyashreee.blogspot.com/

सखी's picture

17 Jan 2009 - 12:43 am | सखी

स्वाती खरचं काय बोलायचे व काय लिहायचे तेच कळत नव्हतं बराच वेळ. मला वाटतं परगावी वा परदेशी असणा-यांच हे अगदीच दुर्देव असावं. एक मनात असु दे - त्यांच्या आठवणी, त्यांचे आशिर्वाद हे तुमच्या पाठिशी सदैव असतील, ते कोणीही तुमच्यापासुन हिरावुन घेऊ शकत नाही. तुला हे दु:ख सोसण्याचे सामर्थ्य मिळो.

विसोबा खेचर's picture

17 Jan 2009 - 12:55 am | विसोबा खेचर

तात चरण ते वंदनीय रे
शत तीर्थांचे धाम!

तात्या.

नंदन's picture

17 Jan 2009 - 12:59 am | नंदन

परमेश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो आणि तुला यातून सावरण्यासाठी बळ देवो, हीच प्रार्थना.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सुवर्णमयी's picture

17 Jan 2009 - 1:17 am | सुवर्णमयी

लेख अतिशय हळवे करून गेला. भारताबाहेर राहणारे- मध्यरात्री आणि पहाटे फोन म्हणजे काय मनाची अवस्था होते ते समजू शकतात.
तुझ्या दु:खात सहभागी आहोत.
सोनाली

मुक्तसुनीत's picture

17 Jan 2009 - 1:24 am | मुक्तसुनीत

तुमच्या दु:खात सहभागी आहे. तुमच्या वडलांना भेटल्याच्या काही अंधुक स्मृतीही आहेत. त्यामुळे वाटणार्‍या दु:खाचि धार जास्त तीव्र होती.

पिवळा डांबिस's picture

17 Jan 2009 - 2:54 am | पिवळा डांबिस

अशा वेळी स्वतःचं असं काही सांत्वनपर लिहायला शब्द सुचले नाहीत...
म्हणून गदिमांच्या पायाशी गेलो....

"जरा मरण यातून सुटला, कोण प्राणिजात?
अतर्क्य ना घडले काही, जरी अकस्मात!
मरण कल्पनेशी थांबे, तर्क जाणत्यांचा!
पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा!!!"

ईश्वरकृपेने तुझ्या वडिलांच्या आत्म्याला सद्गती लाभो हीच प्रार्थना!!!

मीनल's picture

17 Jan 2009 - 2:57 am | मीनल

सर्वच शब्द पाणावलेल्या डोळ्यातून धूसर झाले आहेत. काय लिहू?

मीनल.

सुनील's picture

17 Jan 2009 - 6:13 am | सुनील

भावपूर्ण लेख. हे दु:ख पचविण्याचे धैर्य तुम्हाला लाभो, ही प्रार्थना!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

रामदास's picture

17 Jan 2009 - 6:22 am | रामदास

जवळची व्यक्ती नीजधामाला गेल्यावर बरेच दिवस फार त्रास होत राहतो. आठवणीचे कढ न सांगता येत राहतात.त्यातून बाबा आणि मुलगी यांचे नाते तर फार वेगळेच असते.लतादिदींचं कल्पवृक्ष कन्येसाठी हे गाणं जेव्हा पण ऐकतो तेव्हा तेव्हा केवळ कल्पना करून डोळे पाणावतात.
पण मरणात जमेची बाजू असते.हॉस्पीटल, औषधोपचार, अंथरुणाला खिळून राहणं हे काही न होता त्यांचा पुढचा प्रवास सुरु झाला.आत्म्याला सद्गती लाभो .
लेक धाडली परदेशी
बाप घरात उपाशी.

पर्नल नेने मराठे's picture

17 Jan 2009 - 11:18 am | पर्नल नेने मराठे

माझ्या बाबतीत असेच काहीसे घडले होते.............

चुचु

मदनबाण's picture

17 Jan 2009 - 6:42 am | मदनबाण

स्वातीताई,
फार वाईट वाटल...
तुझ्या बाबांना सद्गती लाभो ही प्रार्थना !!!

मदनबाण.....

"Its God's Responsibility To Forgive The Terrorist Organizations
It's Our Responsibility To Arrange The Meeting Between Them & God."

- Indian Armed Forces -

वल्लरी's picture

17 Jan 2009 - 11:47 am | वल्लरी

स्वातीताई,
काय बोलू? सुचत नाही....
हा प्रसंग खुप हेलावणारा आहे गं...पण तुला सावरले पाहीजे स्वातीताई....
परमेश्वर त्यांना सद्गती देवो आणि तुला सावरण्याचे धैर्य!

---वल्लरी

mamuvinod's picture

17 Jan 2009 - 12:45 pm | mamuvinod

आजोबा गेले त्यावेळि असेच झाले होते माझे.
छान झालेय लेखन

समिधा's picture

19 Jan 2009 - 10:15 am | समिधा

काही सुचत नाही लिहायला,मन खुप विचलित झाल.
परमेश्वर त्यांना सद्गती देवो आणि तुला ,तुझ्या घरच्याना हे दु:ख पचविण्याचे धैर्य !
बाबा आणि मुलीच नात खरच खुप वेगळ असत.

मैत्र's picture

19 Jan 2009 - 10:30 am | मैत्र

लेख पाहून भ्रमणमंडळाची नवीन मोहीम असावी असं वाटून उघडला आणि पहिल्या परिच्छेदातच धक्का बसला.
तरीही किती संयमाने आणि शांत लिहिलं आहे तुम्ही. अगदी जसे तुमचे बाबा वागले आणि शांतपणे निघून गेले तसंच.
भाग्यवान खरंच. इतकं संपन्न आयुष्य जगून वेदना / यातना न होता सहज अचानक जाणं...
दु:ख स्वाभाविक आहे आणि तुम्ही लिहिल्या प्रमाणे रेंगाळलेल्या आय सी यु च्या मोठ्या आजारात ती परिस्थिती आणि शंका थोडी मानसिक तयारी करायला मदत करतात. असं चालता बोलता काही घडलं तर ते मनाला पटायला फार वेळ लागतो. अचानकपणे ध्यानी मनी नसताना धक्का बसतो ...
तुमचं आभाळाएवढं दु़:ख तुम्ही मिपाकरांसोबत वाटलं हेच आमचं भाग्य...
तुमच्या बाबांना सद्गती लाभो ही प्रार्थना .

अवांतरः अशा वेळी स्वतःहून विचारून मदत करणार्‍या कस्टम अधिकार्‍याची वागणूक वाचून आश्चर्य वाटलं आणि थोडं बरंही...

एकलव्य's picture

19 Jan 2009 - 10:31 am | एकलव्य

स्वातीताई - सांभाळून असा... आणखी काय लिहू.

का कोणास ठाऊक पण आपली माणसे -- विशेषतः वडिलधारी -- दूर असली की उगाच रुखरुख लागून राहते. त्यातच दहशतवादाने थैमान घातल्यामुळे तर आणखीच काळजी वाढली आहे. गेल्या काही वर्षांत इतकी जवळची माणसे ध्यानीमनी नसताना आम्हाला मागे सोडून देवाघरी गेली आहेत की मन अगदी व्याकूळ होऊन जाते. पोकळी जाणवत राहते.

दिपक's picture

19 Jan 2009 - 1:33 pm | दिपक

आपण इथे मन मोकळे केलेत...

आम्ही दु:खात सहभागी आहोत. तुझ्या बाबांना सद्गती लाभो ही प्रार्थना !

सुधीर कांदळकर's picture

19 Jan 2009 - 7:38 pm | सुधीर कांदळकर

भारलेली .. आपण वर्णन केल्याप्रमाणँ ... व्यक्ति गेल्यास असा धक्का बसणारच. आपल्या दु:खांत मी सहभागी आहे. पण असे वेदनामुक्त मरण एखाद्याच भाग्यवंताच्या नशिबी असते. असो. काळ कुणासाठीं थांबणार?

सुधीर कांदळकर.

स्वाती दिनेश's picture

20 Jan 2009 - 8:04 pm | स्वाती दिनेश

१६ जानेवारीला बाबांना जाऊन महिना झाला आणि परत तेच सारे चित्र डोळ्यापुढे येऊ लागले, डोक्यात वादळ सुरु झाले ते कागदावर उतरुन मिपाकर सुह्रदांबरोबर वाटलं तेव्हा मनावरचं ओझं हलकं झालं,
धन्यवाद.
स्वाती

मृत्यु तर आपल्या आयुष्यातील अनिवार्य असा भाग आहे. यात वियोगाचे शोक आणि दुखतर होणारच. अशावेळी काही काळानंतर आपल्या आप्त आणि सृजनाच्या आवडीच्या विचाराच्या कामाला चालना देणे हेच त्यांचे खरे स्मरण.

माणसाचे शरीर हे त्या आत्माचे वस्त्र आहे. वस्त्र जीर्ण झाल्यावर ते बदलुन तो महान आत्मा परत नविन शरीराकडे जात असतो असे आपण वाचत असतोच,

मृतात्माला शांती मिळो आणि त्यांचा आप्तजनास हे दुख स्विकारण्याचे धैर्य मिळो.

शितल's picture

21 Jan 2009 - 12:32 am | शितल

दु:ख दायक घटना ,वाचुन वाईट वाटले. :(
बाबांच्या आठवणींनी तुझे मन हळवे होणारच, पण तरीही आठवणींच्या स्वरूपात ते तुझ्या बरोबर सदैव राहतील.

डॉ.प्रसाद दाढे's picture

21 Jan 2009 - 5:33 pm | डॉ.प्रसाद दाढे

वाचून खूप वाईट वाटले.. तुमचे तीर्थरूप भाग्यवान, त्वरीत व शा॑तपणे मृत्यू आला म्हणून.
परमेश्वर तुम्हा॑ला व कुटुम्बिया॑ना ह्या दु:खातून सावरण्याचे बळ देवो.

प्रभाकर पेठकर's picture

22 Jan 2009 - 12:50 am | प्रभाकर पेठकर

स्वाती दिनेश,

वाचून धक्का बसला. अशा लेखाची अपेक्षा नव्हती. तुमच्या दु:खात सहभागी आहोत आम्ही सर्वजणं.

१६ डिसेंबर... हा दिवस माझ्याही आयुष्यात पितृछत्र हिरावून नेणारा आहे. (१९९६). हॉस्पिटल मधले 'ते' २२ दिवस आठवले. असहाय्यता, हतबलता, नैराश्य आणि जन्मदात्याची, आय्. सी. यू. तली, 'ना ह्या जगात, ना त्या जगात' अशी हृदय पिळवटून टाकणारी अवस्था. शेवटी, 'ह्या जगातून सूटका'. त्या दु:खावेगातून सावरायला फार मोठा काळ जावा लागला.

तुम्हाला दु:खातून सावरायला इश्वराची मदत मिळो ही त्याच्या चरणी प्रार्थना.

फटाकडी's picture

22 Jan 2009 - 1:16 am | फटाकडी

स्वाती,

वाचून धक्का बसला. सहासा आपल्या बाबांना काही होयु शकेल असा विचार पण करवत नाही.
तुम्हाला दु:खातून सावरायला इश्वराची मदत मिळो हीच प्रार्थाना.