माझं नाव अच्युत भिडे. माझं नाव तुम्हाला माहित असणार नाही म्हणून थोडी ओळख करून देतो. मी रहस्य कथा लिहितो. तुम्ही अर्थात छावा, स्वामी ययाति आणि काय ते रायगडाला जेव्हा जाग येते किंवा सध्याचे विद्रोही साहित्य असे मर्मभेदी वाचणारे लोक, तुम्हाला माझे नाव माहित नसणार ह्यात नवल ते काय. पण एकदा कधी तुम्ही रिक्षात बसलात तर रिक्षावाल्याला विचारा की अच्युत भिडेची ताजी कथा वाचलीत काय हो? म्हणजे तुम्हाला समजेल.
मी आहे ना, धुवाधार नावाचा , सॉर्ट ऑफ सुपर हिरो निर्माण केला आहे. माझ्या वाचक वर्गाला तो प्रचंड भावला आहे.
आता ह्या क्षणी मी त्याचीच एक कथा लिहिण्यात गर्क आहे. कथेचे नाव आहे “धुवाधार आणि हिरवा राक्षस.” धुवाधार ठोश्यांची धुवाधार बारीश करतो आहे. हिरवा राक्षस पण काही कमी नाहीये. त्याचे वैशिष्ठ्य हे आहे की आपल्या बळीला वेलींनी जेरबंद करून शेवटी त्या वेलींकडून त्याचा गळा दाबून तो खून करतो. आता तो हिरव्या गार वेलींनी हीरोला जखडून टाकायचा प्रयत्न करत आहे. हे मी कशासाठी तुम्हाला सांगत आहे? त्यापेक्षा तुम्ही हे पुस्तक विकत घेऊन वाचा. तुम्हाला ही कथा निश्चित आवडेल अशी माझी खात्री आहे. अजून दोन एक महिन्यात हे पुस्तक न्यूजपेपर स्टॉलवर तुम्हाला दिसेल. पुस्तकावर हॅट आणि लांब ओव्हरकोट मध्ये धुवाधारचे चित्र असणार आहे. बाजूला स्वरूप सुंदरी फराकोती फनिम्यौचे ...
मी बागेत बसून माझ्या लॅप टॉपवर ही कथा लिहित आहे. बायको शेजारी बसून लोकरीचा स्वेटर विणण्यात मग्न आहे. माझा सहा वर्षांचा मुलगा आरु तिकडे कुणाबरोबर तरी खेळत आहे.
व्यत्यय.
अश्या महत्वाच्या वेळी मी हीरोला वेलींच्या गराड्यातून कसं सोडवावं ह्याचा विचार करत आहे. बहुतेक फराकोती फनिम्यौला बोलवावे लागणार...
अर्णव येऊन मला विचारतो “बाबा बाबा, तुम्ही ह्या सिद्धूचा सांता बघितला आहे का?”
“नाही, का काय झाले?”
“बाबा हा सांता पहा, हा नाचतो आणि हे त्यांच्या हातात काय आहे ना ते वाजवतो.”
“सक्सॉफ़ोन.” त्या सिद्धूने माहिती पुरवली.
मला काही सांता दिसला नाही. पण मुलांचा हिरेमोड होऊ नये म्हणून हो हो म्हणत गेलो.
लाल पोशाखातला आणि गोंड्याची लाल टोपी घातलेल्या सांताची आठवण झाली.
“सिद्धू दाखव ना बाबाना. सांता कसा नाचतो.”
“सांता, आरुच्या बाबांना सॅक्स वाजवून दाखव.”
अर्थात काही झाले नाही. बहुतेक सांताला सॅक्स वाजवून दाखवायची इच्छा नसावी.
“तू बोलतोस ते ह्याला समजते?” मी विचारले.
“बाबा ह्याला सगळे समजते. आणि तो नुसता सॅक्स वाजवतो असे नाही तो गप्पा पण मारतो. गोष्टी सांगतो.”
“अरे वा.छानच की. पण हा आत्ता का काही बोलत नाही.”
“तो सगळ्यांशीच काही बोलत नाही. त्याला जी माणसे आवडतात त्यांच्याशीच तो बोलतो. तो बोलतो, सॅक्स वाजवतो यावर तुमचा विश्वास नाहीये ना म्हणून तो तुमच्याशी बोलणार नाही.” सिद्धूने माहिती पुरवली.
“त्याला कसं समजलं की माझा विश्वास नाही?”
“सांताला सगळं समजतं. मोठ्या माणसांबरोबर तो बोलत नाही. तो म्हणतो की मोठी माणसं विश्वासू नसतात. ती कायम दुसऱ्याला कसं फसवायचं याचाच विचार करतात. त्यांच्या बोलण्यात काही खरं नसत. माझ्या आई बाबांशी सुद्धा तो बोलत नाही.”
लहानग्या सिद्धूच्या तोंडून हे तत्वज्ञान ऐकून मला आश्चर्य वाटले. क्षणभर स्वतःची लाज वाटली.
बायको स्वेटर विणत विणत सगळे ऐकत होती. सिद्धूचे बोल ऐकून तिच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळकले.
“काय करतात तुझे बाबा?”
“माझे बाबा तुम्हाला माहित नाहीत? ते तर सगळ्या जगात प्रसिद्ध आहेत. तुम्ही कधी माझ्या बाबांच्या बँकेतून पैसे उधार घेतले नाहीत का? बाबा सगळ्यांना पैसे वाटत असतात.”
सिद्धुचे बाबा बहुतेक बँकेत काम करत असणार.
“बाबा मी सांगतो. हा सिद्धार्थ शानभाग.”
अशी माझी सिद्धार्थशी ओळख झाली.
सिद्धू आणि आरु पुन्हा खेळायला निघून गेले. मी जर लक्ष देऊन ऐकले असते तर कदाचित मला सांताचे गाणे ऐकू आले असते पण तेव्हढा वेळ नव्हता. मी आपला माझ्या कथेत मग्न होतो.
“पुष्पे, तुला दिसला सांता? मला नाही दिसला.”
“मला दिसला.तुमचे मन दूर कुठेतरी धुवाधार बरोबर भटकत असणार. हो ना.”
हे तिचे बोलणे मला ऐकू आले नव्हते.
“चला. साडे सात वाजले आहेत. घरी जाऊन जेवण पण करायचे आहे ना.” बायकोने तिचे काम थांबवले, लोकर पिशवीत कोंबली आणि ती उठली. आणि तिने अर्णवला हाक मारली.
“अच्यु, एक गोष्ट तू नोट केलीस का? सिद्धू बरोबर त्याचे आई बाबा आलेले नाहीत. त्याला सांभाळणारी एक मुलगी ती तिकडच्या बाकावर बसून केव्हापासून मोबाईलवर बोलत आहे.. “
“पुष्पा, तू म्हणजे...” मी आरुला आवाज दिला, “आरु चला. घरी जायाच्जी वेळ झाली.”
सिद्धू आणि अर्णव पळत पळत आमच्याकडे आले.
“अर्णवचे बाबा, तुम्ही घरी चाललात? “ त्याचा चेहरा हिरमुसलेला होता.
“बेटा, साडे सात वाजले. उशीर झाला आहे. घरी जायला पाहिजे. तू देखील जा. आई बाबा वाट पहात असतील, काळजी करत असतील.”
“माझे आई बाबा काळजी करणार नाही. मेरी आहे ना माझ्या बरोबर. पण तुम्ही उद्या येणार बागेत?”
मी बायकोकडे पाहिले.
“हो हो. येऊ आम्ही.”
घरी गेल्यावर आरुने हट्ट करायला सुरवात केली.
“बाब, मला पण सिद्धूच्या सांता सारखा सांता आणून द्या.”
“ओके. आपण उद्या सिद्धूला विचारू की हा सांता कुठल्या दुकानातून आणला.”
तेव्हढ्याने आरुचे समाधान झाले. माझी कल्पना अशी होती की हा सांता इम्पोर्टेड असणार. उद्या कळेल. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही नेहमीप्रमाणे बागेत फिरायला गेलो तेव्हा आरु सिद्धूला घेऊन माझ्याकडे आला.
“बाबा, विचारा ह्याला.”
“अरे हो सिद्धू, एक सांग हा सांता तुम्ही कुठून म्हणजे कुठल्या दुकानातून आणला? आमच्या आरुलाही एक आणायचा आहे.”
“आम्ही विकत नाही आणलेला. तो स्वतःहून माझ्याकडे आला.”
“म्हणजे? मला नाही समजलं.”
“माझी नर्सरी आहे ना त्यात खूप खेळणी आहेत. हीमॅन आहे, स्केलेटर आहे, रिमोट वर चालणाऱ्या गाड्या आहेत. अंडी देणारी कोंबडी आहे, बार्बी आहे, आपल्या बरोबर आपला हात धरून चालणारी मोठी भावली आहे...तुम्ही या माझ्या घरी. मी सगळी खेळणी दाखवीन.”
“पण हा सांता...”
“मागच्या ख्रिसमसला माझ्या नर्सरीत सांता आला.”
“तुझ्या बाबांनी तुला ख्रिसमसची भेट म्हणून दिला असणार, हो ना?”
“नाही नाही. कुणी गिफ्ट नाही केलेला. तो आपणहून आला.”
मला त्याचा विरस करायचा नव्हता. “सिद्धू त्याला सांग की आरुच्या घरी पण जा.”
“सांगितलं.पण तो म्हणाला की आरुला सांताची गरज नाहीये.”
मला असं वाटलं की मला काहीतरी समजलं आहे आणि बरचसं नाहीही.
पुष्पा हातातलं काम सोडून आमचे संभाषण ऐकत होती.
“ऐकलस पुष्पे? कुछ समझा क्या?”
ती हसली. “अच्यु, तुला नाही समजणार.”
“बाबा, सांता आपल्याकडे का नाही येणार?”
आता ह्याला मी कसे आणि काय सांगू. पुष्पाने आरुला जवळ घेतलं. “आरु, मी सांगते. आरू तुझ्याकडे चित्रकला कशी आली? तुमच्या वर्गात ती ॠचा आहे तिच्याकडे गाणं कसं आलं? तुझ्या वर्गात तो टॉपर आहे त्याच्याकडे डोकं आलं आहे. असं प्रत्येकाकडे काहीना काही येतं. देव सगळ्याना सगळं देत नाही. प्रत्येकाला थोडं थोडं. कळलं? “
“प्रत्येकाला थोडं थोडं.” वेल आय डोंट अॅग्री.
ccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccccc
“आरुचे बाबा, वय थांबवण्यासाठी काही औषध असते का?”
मला काही समजले नाही. “कारे सिद्धू? कशाला वय थांबवायचे आहे. कुणाचे वय थांबवायचे आहे?”
“सांता मला म्हणाला आहे की माझ्या सातव्या वाढदिवसानंतर तो मला भेटणार नाहीये. म्हणजे त्यांच्या राज्यात मला प्रवेश बंद. तो असही म्हणाला की जेव्हा तुम्हाला खेळातले पैसे आणि खरे पैसे यातला फरक समजायला लागेल, खेळातली गाडी आणि खरी गाडी ह्या निराळ्या असतात हे समजायला लागेल तेव्हा सांताच्या राज्यात प्रवेश बंद. खरी बार्बी आपल्या बरोबर खेळणार नाही हे उमजेल तेव्हा बालपण संपलं असं समजायचं. असं तो म्हणाला.”
मी गमतीच्या सुरात म्हणालो, “सांता तुझा मित्र आहे ना त्याला सांगकी वय थोपवून धरायला.”
“हो मी सांगितले आहे त्याला. त्याने मला प्रॉमिस केले आहे की तो मला त्यांच्या राजाकडे घेऊन जाईल आणि माझ्या वतीने राजेसाहेबांना स्पेशल विनंती करेल. राजेसाहेबांनी मनात आणले तर काहीही होऊ शकेल असं सांता म्हणाला.”
ह्यावर काही बोलायचे धाडस मला झाले नाही. ह्या मुलाला त्याची वंडरलँड भेटलेली दिसतेय. खरा नशीबवान म्हणायचा.
ccccccccccccccccccccccccccccccccccccccccccc
आरु मी बसलो होतो ज्या बाकावर तिकडे उड्या मारत आला.
“बाबा, पैसे द्या.”
“का कशाला? “
“मी आणि सिद्धू आईसफ्रुट खाणार आहोत. सिद्धूने आईसफ्रुट कधी खाल्लेच नाहीये.लवकर द्या पैसे.”
दोन ऑरेंज घेऊन ते परत आले, रॅपर उघडून खाणार तितक्यात मिस मेरी धावत आली.
“डोंट, सिद्धार्थ, नो. अहो तुम्ही कशाला देता त्याला असले. मॅडमना समजल तर माझी छुट्टी करतील. चला मास्टर सिद्धार्थ, तुम्हाला माहित आहे ना की ह्याच्यात किडे असतात म्हणून.”
सिद्धू बिचारा. त्याचा चेहरा गोरामोरा झाला.
मिस मेरी मला म्हणाली की मास्टर सिद्धार्थना थंड खाल्लं की सर्दी ताप होतो. म्हणून मॅडमणे मना केले आहे. डॉक्टर म्हणतात की थोडा मोठा झाला की असा त्रास होणार नाही. तो पर्यंत जपायला पाहिजे.
ही मोठेपणाची व्याख्या सांताला माहित नव्हती.
मिस मेरी मास्टर सिद्धार्थला घेऊन बाजूला झाली.
मला एकूण परिस्थितीची थोडी कल्पना आली.
ccccccccccccccccccccccccccccccccccccccccccc
ह्याच वेळी कधीतरी आरुने बातमी आणली की सिद्धूच्या बाबांची बदली झाली होती. आरुला खूप वाईट वाटले. पण लहान मुलांचे काय असते की ती अश्या गोष्टी सहजच विसरून जातात. आरु ही सिद्धुला हळू हळू विसरून जाईल.
माझ्यासाठी मात्र ते सांताचे रहस्य रहस्यच राहिले. आयुष्यात अनेक रहस्ये येतात आणि जातात. हे त्यापैकी एक असे म्हणून मला ते बाजूला सारणे कठीण होते.
ह्या कथेचा दुसरा भाग आता सुरु होणार होता.
zzzzzzzzzzzzzzzzzzzzz
प्रतिक्रिया
27 Aug 2025 - 9:50 pm | कर्नलतपस्वी
नेहमीप्रमाणेच मस्त. एका श्वासात वाचली. पुढे काय होणार याची उत्सुकता वाक्यागणिक वाढत होती पण......
पुढील भागाची वाट बघतोय.
28 Aug 2025 - 12:58 pm | भागो
कर्नल साहेब आभार!
पुढचा भाग टाकला आहे.