जाळं

बिपीन सुरेश सांगळे's picture
बिपीन सुरेश सांगळे in जनातलं, मनातलं
17 May 2024 - 9:44 am

जाळं
----------------------------------------
रात्र झाली होती .मस्त गार वारं सुटलं होतं. दिवसभराची लग्नाची चाललेली धामधूम हळूहळू मंदावत चालली होती.
पण ते लोकांचं . बन्सीकिशनच्या डोक्यातली गडबड मात्र हळूहळू वाढत चालली होती .

गावाकडची मोकळी हवा . तो मित्रांबरोबर कडुनिंबाच्या झाडाखाली बसला होता. बाजेवर हवा खात . पलीकडे पोरंटोरं खेळत होती .
मित्र काहीबाही सांगत होते. वात्रट बोलत होते ,एकमेकांना टाळ्या देत होते.

बन्सीकिशन मात्र अवघडला होता. तो कसंनुसं हसत होता. तो वाट पाहत होता ... सुहागरातीची !

तिच्या घरचे बोलणी करायला आले होते . एकतर अलीकडे मुलगी मिळायची मुश्किल . तशात एवढी सुंदर मुलगी ! ... त्याने पहिल्यांदा मन्नोला पाहिलं होतं , तेव्हापासून तो तिच्या डोळ्यांमध्ये हरवून गेला होता .तिचे डोळे होतेच तसे - मासोळीसारखे, कातिल !

गाव छोटंसं . बन्सीची पुढची व्यवस्था त्याच्या चुलतभावाच्या घरी करण्यात आली होती .भावाचं घर वस्तीपासून थोडं लांब.

मन्नोला सोडायला तिची बहीण सोबत आली होती. बरोबर त्याच्या घरातल्या इतर स्त्रिया .ती वधूच्या पूर्ण साजशृंगारात होती . सगळ्या दागदागिन्यांसहित .

ती आत आली . हाती दुधाचा कप . बन्सीने दार लावलं . तिच्या हातातला कप त्याने तिपाईवर ठेवला.

त्याने तिला मिठी घातली. तिच्या डोळ्यांत त्याने खोलवर पाहिलं .ती लाजली. तिने लाजेने नजर खाली झुकवली .

तो तिच्या डोळ्यांतली नजर न हटवता म्हणाला,’ मन्नो , तुझे डोळे मासोळीसारखे आहेत का तू मासोळी आहेस ? माहिती नाही; पण ही खूबसूरत मासोळी आता माझ्या प्रेमाच्या जाळ्यात गावली खरी !’

तिला हसू आलं… मादक अन खट्याळ .

त्याने दुधाचा ग्लास तोंडाला लावला .एका दमात त्याने तो रिकामा केला . मग त्याला सुखद ग्लानी आली.
--------

दुसऱ्या दिवशी तांबडं फुटताच त्याचा बाप पोलीस चौकीत गेला .बरोबर आणि काही बाप्ये. तो तावातावाने हवालदाराशी बोलू लागला.

झोप मोडलेला हवालदार त्याचं बोलणं ऐकून जांभई देत म्हणाला .’हे भगवान ! अजून एक केस !’

रात्री दूध प्यायल्यावर बन्सी बेहोश झाला होता . मग मन्नो आणि तिची बहीण सगळं जडजवाहीर घेऊन पसार झाल्या होत्या. लग्नाळू तरुणांना फसवणारी , लुटणारी त्यांची एक मोठी टोळीच होती .

मन्नोने टाकलेलं ते कितवं जाळं होतं , ते आता तिलाही सांगता आलं नसतं .
---------------------------------

हे ठिकाणलेख

प्रतिक्रिया

अहिरावण's picture

17 May 2024 - 10:39 am | अहिरावण

लुटेरी दुल्हन !!

गवि's picture

18 May 2024 - 2:36 pm | गवि

बापरे

बिपीन सुरेश सांगळे's picture

20 May 2024 - 12:01 am | बिपीन सुरेश सांगळे

मंडळी आभारी आहे