पुस्तक परिचय ~ 'जाई' : सुहास शिरवळकर भाग २

सुजित जाधव's picture
सुजित जाधव in जनातलं, मनातलं
11 Apr 2024 - 4:38 pm

याआधीच्या भागात आपण कादंबरीची पार्श्वभूमी व इतर काही गोष्टींबद्दल चर्चा केली. भाग २ मध्ये कादंबरीचे सविस्तर कथानक व तिचा परिचय तुम्हाला करून देणार आहे.

भाग १ इथे वाचा: https://misalpav.com/node/52058

कथानक:

शाळेत असताना जाई शेखरच्या आयुष्यात वहिनी म्हणून येते. दोघांच्या वयात जेमतेम तीन साडेतीन वर्षांचे अंतर. शेखरच्या घरासमोर अगदी हाकेच्या अंतरावर तिचं घर. परिस्थितीमुळे लहान वयातच वयापेक्षा जास्त समजूतदार बनलेली, नको असलेल्या नात्यांच्या बंधनात अडकलेली आणि ती तोडू पाहणारी पण अयशस्वी अशी एक स्त्री.. दुसरीकडे आहे पोरवयीन, थोडासा अल्लड पण शाळेत हुशार असलेला शेखर. अश्या या वयात त्याच्यावर माया करणारी, सुंदर आणि वागायला, बोलायला गोड असलेली जाईवहिनी त्याची मैत्रीण होते. मुळातच हुशार असलेली पण परिस्तिथीमुळे नववीच्या पुढे शिकू न शिकलेली जाई शेखरला अभ्यासात मदत करते, त्याला प्रत्येक गोष्टीत प्रोत्साहन देते. शेखरला हे सगळ हवंहवंसं वाटत. तो सांगतो, "जाईनं आपल्याला शहाणं म्हणावं, शाबासकी द्यावी, आपल्याबद्दलचं कौतुक, अभिमान तिच्या नेत्रांतून ओसंडावा, म्हणून भरपूर मेहनत घेऊन मी अकरावीपर्यंत शाळेतली बहुतेक सगळी बक्षिसं पटकावली आहेत." ’शाळेत असतानाच शेखरला जाईबद्दल ओढा निर्माण होतो, त्या अल्लड वयात त्याच्याही नकळत त्याला तिच्याबद्दल एक सुप्त आकर्षण वाटू लागतं. या आकर्षणामागील कारण सांगत असताना शेखर म्हणतो, "माझी आई सोडून कोणत्याही स्त्रीशी माझा इतका जवळचा संबंध आलेला नव्हता, मला बहीण वगैरे नाहीच त्यामुळे मला तिच्या वागण्या-बोलण्याचं आकर्षण वाटलं असावं."

जाईच्या नवऱ्याचे जाईवर अजिबातच प्रेम नसते, कधीकधी तर तो तिच्याशी अगदी तुसडेपणाने वागायचा, हे शेखराला आवडायचे नाही. नवरा इतकं वाईट वागत असूनसुद्धा जाई त्याला सहन करते, त्याचं सगळ करते यामुळे त्याला तिचा रागपण येतो. नवऱ्यामुळे जाई त्याच्याकडे दुर्लक्ष करते तेव्हा तो तिच्याशी भांडतो देखील. एकदा तर रागाच्या भरात तो तिच्या डोक्यात दगड मारतो.. बिचाऱ्या जाईच्या कपाळातून भळाभळा रक्त वाहू लागतं, नंतर शेखरला याबद्दल पश्चाताप होतो. अश्याच छोट्या मोठ्या प्रसंगांच्या माध्यमातून शेखरच्या मनात तिच्याबद्दलच्या भावना वाढीस लागतात. आपल्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या जाईला हे सगळं समजतच नव्हतं की सगळं कळत असूनसुद्धा ती त्याकडे कानाडोळा करत होती की काय असा प्रश्न शेखरला कथा सांगत असताना पडलाय.
शाळा संपल्यानंतर शेखर पुढील शिक्षणासाठी पुण्याला जातो. खरतर जाईला सोडून पुण्याला जाणं त्याला नकोसं वाटतं, जाईच्या विरहाच्या कल्पनेने त्याचा जीव कासावीस होतो. कॉलेजला पैसे घालवण्यापेक्षा एक वर्ष गॅप घेऊन मी External बसतो असा आई व नानांसमोर तो युक्तिवाद करून पाहतो पण नानांच्यापुढे त्याचं काहीएक चालत नाही. शेखर पुण्याला जाणार हे कळल्यावर जाईला सुद्धा अवघड वाटू लागतं, सुट्टीतला हा शेवटचा सहवास म्हणून सतत शेखर सोबत बोलावं, तो सारखा आसपास असावा असं तिला वाटतं. त्यातच शेखर सगळ्यांनी मिळून शिवनेरीला जाण्याची कल्पना काढतो व जाईपण ती उचलून धरते. शिवनेरी चढत असताना जाई आणि शेखर चालत चालत सगळ्यांच्या पुढे जातात, तेव्हा तिथे शेखर तिला त्याच्या मनातील तीच्याविषयीच्या काही भावना बोलून दाखवतो व एका अनपेक्षित क्षणी तिला प्रेमाची साद घालतो. तो बोलतो, " तू मला आवडतेस जाई! आय लव्ह यू. माझ्याशी लग्न करशील का?" यावर जाई त्याच्या प्रश्नाचं थेट उत्तर न देता बोलते, "किमान पाच वर्षे आधी का जन्माला आला नाहीस तू!" या प्रेमाचे बीज/झाड फक्त आपल्या मनातच वाढत नसून त्याच्या फुलांचा सुगंध जाईच्या मनात सुद्धा दरवळत आहे याची अनुभूती शेखरला या प्रसंगानंतर होते.

शेखर पुण्याला गेल्यानंतर मात्र जाई शेखरला पत्र लिहून मला विसरून जा, शिक्षण व स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्यावर लक्ष दे असा सल्ला देते. तुझ्या मनात माझ्याबद्दल ज्या भावना आहेत त्या खऱ्या नसून ते फक्त आकर्षण आहे असं ती लिहिते. इकडे शेखरला मात्र जाईला विसरणं कठीण वाटतं. जाईशिवाय दुसऱ्या कोणत्याही युवतीला आपल्या जीवनात प्रवेश करू द्यायचा नाही अशी मनाशी खूणगाठ तो बांधतो. जाईसाठी चार वर्षेच काय चार युगे थांबण्याची त्याची तयारी असते.

पुढे कॉलेजमध्ये असताना त्याचा अनेक समवयीन मुलींशी मैत्रीपूर्ण संबंध येतो, एक-दोन मुली तर स्वतःहून त्याच्यापुढे प्रेमाचा प्रस्ताव ठेवतात पण शेखर ते प्रस्ताव धुडकावून लावतो, कारण गावापासून लांब राहत असून सुद्धा शेखरचे मन गावी राहणाऱ्या त्याच्या जाई वहिनीमध्येच अडकून राहिलेले असते. प्रत्येक वेळेस तो स्वतःच्या भावनांना काबूत ठेवतो.

एकीकडे शेखर कॉलेज लाइफचा आनंद लुटत असतो तर दुसरीकडे जाईच्या आयुष्याची मात्र होरपळ चालू होते. शेखर पुण्याला गेल्यानंतर आपलं म्हणावं असं तिचं कोणीच राहत नाही. नवरा दारू पिऊन तिच्यावर संशय घेतो, तिचा छळ करायला सुरुवात करतो, तिला मारहाण करतो. अधूनमधून शेखर गावी येत असतो तेव्हा तो त्याच्या जाईवहिनीला भेटत असतो. पण एकदा जाईच त्याला विनवणी करुन मला भेटायला येत जाऊ नको असं सांगते. आधी त्याला यामागील कारण समजत नाही पण त्यानंतर काही दिवसांनी जाई त्याला भेटायला का मनाई करत होती याचा सुगावा लागतो. सगळं समजल्यानंतर तो अस्वस्थ होतो..

मध्ये काही वर्षे अशीच जातात.. शेखर बी. ए. पूर्ण करून लॉ जॉईन करतो, वकीलीचे शिक्षण पूर्ण करून नोकरीलाही लागतो. शेखरच्या मनातील जाई बद्दलच्या भावना आता बऱ्याच प्रमाणात विरून जातात. पण दरम्यानच्या काळात जाईच्या आयुष्यात काही अनपेक्षित घटना घडतात. तेव्हा शेखरला जाईची काळजी वाटू लागते, तिच्या एकाकी, निराधार आयुष्याला आपण सावरायला हवं असं त्याला वाटू लागतं.. इकडे जाईसुद्धा सर्व काही सोडून शेखरला तिचं सर्वस्व अर्पण करायला तयार असते. शेवटी शेखर व जाईची प्रेमकहाणी कोणते वळण घेते, त्यांच्या प्रेमाचा शेवट कसा होतो हे सगळं समजून घेण्यासाठी सुहास शिरवळकर लिखित जाई एकदा नक्की वाचा..

कादंबरीचा शेवट अनपेक्षित व मनाला चटका लाऊन जाणारा आहे. तो वाचताना व वाचून झाल्यानंतर सुद्धा जाईविषयी आपल्या मानत जी करुणा दाटून आलेली असते ती संपत नाही. जाईच्या वाट्याला आलेलं दुःख, निराधार व एकाकी जाईच्या आयुष्याची झालेली होरपळ यामुळे मन विषण्ण होते. पापण्यांच्या कडा ओलावतात.

सुशिंची ही आगळीवेगळी प्रेमकथा वाचलीच पाहिजे या कॅटेगरी मधील नसेलही पण वाचनाची मनापासून आवड असलेल्या प्रत्येक वाचकाला ही कादंबरी नक्कीच आवडेल याची मी खात्री देतो..

तुम्ही ही कादंबरी वाचली असेल तर तुमचे या कादंबरी विषयीचे विचार, भावना तसेच माझ्या लेखाबद्दलची तुमची प्रतिक्रिया मला टिप्पणी स्वरूपात नक्की कळवा.
धन्यवाद.. !!

कथाअनुभव

प्रतिक्रिया

कादंबरी वाचली आहे, पण इमोशनल अंगाने गेलेली असल्याने फारशी आवडलेली नव्हती.
त्यांनी लिहिलेली एक भन्नाट प्रेमकथा म्हणजे ' बरसात चांदण्यांची'. लैच भारी.