वाईट झालं

म्हया बिलंदर's picture
म्हया बिलंदर in जनातलं, मनातलं
27 Sep 2023 - 1:41 pm

स्वतःच्या महागड्या गाडीत बसून, पाणावलेल्या डोळ्यांनी श्रवण चितेकडे बघत होता. माझ्यापेक्षा वयाने थोडासाच मोठा पण परिस्थितीमुळे लौकरच मोठा झालेला. नवऱ्याच्या बेताल स्वभावाला वैतागलेली सासुरवाशीण आपल्या तिन्ही मुलांना घेऊन माहेरी आली. सणावाराला आले की अगदी डोक्यावर घेणारे मामा-मामी आता वेगळे वागताहेत हे पाचवीतल्या श्रवणला लगेच कळले. मामांबरोबर शेतात जाऊ लागला. सगळं शेत, गोठा, गुरं आवरूनच घरी यायचा. अधे मध्ये येऊन तरी काय करणार होता. आई बिगारीवर जायची. घरी आलं कि घरची कामं काही ना काही असायचीच त्यापेक्षा गुरं, झाडं, रोपं त्याला जवळ करायची. भला मोठा गोठा उरकून आलेल्या श्रवणच्या चहाच्या वेळीच घरातलं दूध संपलेलं असायचं. त्याने तेव्हापासून जो चहा बंद केला तो आजतागायत. आजही, हिवाळ्यात सुद्धा तो फरशीवर अंथरून पांघरून न घेता तो निवांत झोपू शकतो. कधी मिळायचं कधी नाही. त्याने अंगाचे चोचले पुरवणं कधीच सोडलं, साधी उशी देखील नको असते त्याला. दमायचाच इतका कि पाठ टेकली कि झोप. त्यानेच बाजारातून किलोभर आणलेल्या मटणातुन त्याला रस्साच मिळायचा. आता म्हणतो "रस्श्यातच खरी मजा" आणि स्वतःच्या ताटातले पीस सर्वांना हक्काने देत राहतो. अपमान, टोमणे त्याला कळायचे पण ते गिळण्याची कला त्याने लहानपणीच आत्मसात केली होती. 'तरुण पोरगी जीवाला घोर.' म्हणून मामांनी श्रवण च्या थोरल्या बहिणीसाठी 'उचित' स्थळ शोधलं. सगळं लग्न मामा-मामींनी उरकल्याचा थाट मिरवला, कर्ज श्रवण फेडत राहिला.
कालचक्र फिरलं. वाट्याला आलेल्या जमिनी विकल्या गेल्या. श्रवणने स्वतःसाठी एका इलेक्ट्रिकल होलसेलर कडे नोकरी शोधली, प्रामाणीकपणाला फळ मिळालं आणि योग्यवेळी स्वतःचे छोटेखानी इलेक्ट्रिकलस चे दुकान त्याने काढले. आज शहरातल्या सर्वात मोठ्या डीलर्स पैकी एक म्हणून नाव कमावलंय.
मला फोन आला तोपर्यंत उशीर झाला होता. मामा मामीने कॅन्सर विषयी नातेवाईकांना सांगितलंच न्हवत. खरंतर शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या दोन्ही मुलींनी प्रेमविवाह केल्यापासून त्यांनी माणसांत जाणं कमी केलं होतं. शिवाय कॅन्सर विषयी गैरसमजुती पोटी ते लपवलं व नको ते इलाज करत राहिले.
श्रवण काल रात्रीच हॉस्पिटलमध्ये पोहोचला होता. मामींनी शेवटचं त्याला पाहिलं, आसवं पडली आणि त्यांनी डोळे मिटले.
स्मशानातून सगळे आता घरी गेले होते. गाडीत फक्त श्रवण आणि मी. शेवटी त्याच्या पाठीवर हात ठेवला तसं त्याने डोळे पुसले आणि म्हणाला 'लय वाईट झालं रे.'

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

कर्नलतपस्वी's picture

27 Sep 2023 - 1:55 pm | कर्नलतपस्वी

कथा आवडली दोन तीन वेळेस वाचली पण काहीतरी मिसिंग आहे असे वाटते.

विजुभाऊ's picture

27 Sep 2023 - 7:41 pm | विजुभाऊ

कथेचा निवेदक "मी" आणि श्रवण चे रिलेशन काय आहे हे उलगडत नाही. तो/ती त्याच्या पाठीवर हात का ठेवते ते समजत नाही.
त्यामुळे मिसिंग वाटते.
कथेचा /ची निवेदक कथेत अगदी शेवटच्या वाक्यात येते त्याचे प्रयोजन काय ते समजत नाही.
या कथेमधे "मी " चा उल्लेख केला नसता तरी चालले असते

यात निवेदक आला आहे. मला वाटते निवेदक श्रवण चा बालमित्र असावा आणि तो श्रवणची गोष्ट सांगत आहे.

राघव's picture

27 Sep 2023 - 2:13 pm | राघव

चांगले लेखन. आवडले.

कंजूस's picture

27 Sep 2023 - 2:25 pm | कंजूस

प्राक्तन.

बाकी समजायचं

चौथा कोनाडा's picture

27 Sep 2023 - 5:41 pm | चौथा कोनाडा

दुर्दैवी.
वाईट झालं.

कथा आवडली. शैली सहज आणि आटोपशीर आहे.
आणखी दीर्घ लिहिली असती तरी चालली असती.

तुषार काळभोर's picture

27 Sep 2023 - 7:25 pm | तुषार काळभोर

प्रतिसाद देण्यासाठी शब्द खुंटल्यासारखे वाटतात... म्हणुन फक्त पोच..

प्रसाद गोडबोले's picture

28 Sep 2023 - 12:34 am | प्रसाद गोडबोले

कळलं नाही

नक्की काय वाईट झालं ते कळलं नाही.
एकवेळ श्रवण मेला असता तर म्हण्ता आलं असतं की वाईट झालं मामा मामी काही अगदीच भाच्च्याला स्वतःच्या मुलासारखं वागवत नव्हते असे कथेतुन स्पष्ट दिसलं आहे , शिवाय मामींच्या पोरींनी व्यवस्थित शिक्षण घेऊन परस्पर प्रेमविवाह उरकला आहे ,( अर्थात आई वडीलांवर लग्नाच्या खर्चाचा भार न टाकता .) म्हणजे त्यांचे वय ही ५०+ असावे असे मानायला हरकत नाही. शिवाय टर्मिनल कॅन्सर झालेल्या माणासाला उगाच ओढुन ताणुन त्याची आयुष्याची रेखा वाढवुन इतरांना बरं वाटतं , सदर व्यक्तीचे काय हाल चालु असतात ते त्याच व्यक्तीला चालु असते , त्यामुळे असल्या कॅन्सर पेक्षा मरण बरें .

नक्की काय वाईट झालं ते कळलं नाही.

मुक्त विहारि's picture

28 Sep 2023 - 11:36 am | मुक्त विहारि

घरोघरी मातीच्याच चुली

जोवरी पैसा, तोवरी बैसा...

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Sep 2023 - 12:15 pm | अमरेंद्र बाहुबली

कोण मेलं? मामा की श्रावण?

अमरेंद्र बाहुबली's picture

28 Sep 2023 - 12:36 pm | अमरेंद्र बाहुबली

साॅरी मामा गेलाय.

म्हया बिलंदर's picture

29 Sep 2023 - 2:21 pm | म्हया बिलंदर

प्रतिसादासाठी सर्वांचे आभार. 'प्रतिसाद देण्यासाठी शब्द खुंटले' ते 'कळलं नाही' इतका प्रवास केलाय प्रतिसादाने. सूचनांचे स्वागत.

चौथा कोनाडा's picture

29 Sep 2023 - 5:36 pm | चौथा कोनाडा

आता

👍

आता पुढचा (किंवा मागचा) भाग लिहा !

सिरुसेरि's picture

2 Oct 2023 - 8:55 pm | सिरुसेरि

छान कथा . निरागस श्रवण चे व्यक्ती चित्रण वाचुन "forest gump" आठवला .