श्रीगणेशोत्सवानिमित्त महात्मा फुले ह्यांचा एक सुप्रसिध्द अखंड
एक गोष्ट आजकाल प्रकर्षाने जाणवते आहे की आजच्या काळात लोकं जास्त वाचन करीत नाहीत, जुने ऐतिहासिक लेखन वाचत नाहीत. नुसतेच कोठेतरी काहीतरी वाचुन मते बनवतात. इन्स्टाग्राम रील्स आणि व्हॉट्सॅप युनिव्हर्सिटीच्या काळात आपल्या देशातील लोकोत्तर महापुरुष आणि त्यांचे अभिजात लेखन काळाच्या पडद्याआड चालले आहे , हे पाहुन फार खंत वाटते. विशेष करुन शाहु फुले आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात ही समाज सुधारकांची विचारधारा अशी लुप्त होत जाणे हे अत्यंत निराशाजनक आहे.
ढ्यंड ढ्यंड ढ्यंड ढोलताशांचा कर्णकर्कश गोंधळ ऐकला, बाजारपेठेत कशच्या तरी थातुरमातुर गवताची किंमत तब्बल ५० रुपये लावुन चाललेली लुट पाहिली , प्लॅस्टिक थर्मॉकोलचे मखर , चायनीजच्या माळा , अव्वाच्या सव्वा रेट ने विकली जात असलेली सुमार दर्जाच्या पाच फळांच्या पिशव्या पाहिल्या . रस्त्यात टृअॅफिकला अडचण होत असुनही उभे केलेले मांडव पाहिले, अन माहात्मा फुलेंच्या लेखनाची आठवण झाली.
आता सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने महात्मा फुले ह्यांचा हा सुप्रसिध्द अखंड येथे उधृत करत आहे. "सुजाण" नागरिक ह्यातुन नक्कीच "ज्याला जो घ्यायचा तो" बोध घेतील अशी आशा आहे !
अखंडादि काव्यरचना
गणपती
पशुशिरी सोंड पोर मानवाचें ॥ सोंग गणोबाचें ॥ नोंद ग्रंथी ॥ ध्रु. ॥
बैसे उंदरावरी ठेवूनियां बूड ॥ फुकितो शेंबूड ॥ सोंडेंतून ॥ १ ॥
अंत्यजासी दूर, भटा लाडू देती ॥ नाकानें सोलीतो ॥ कांदे गणू ॥ २ ॥
चिखल तुडवूनी बनविला मोऱ्या ॥ केला ढंबुढेऱ्या ॥ भाद्रपदीं ॥ ३ ॥
* * * * * * * * वांचून ॥ करवी भ्रमण ॥ सर्व लोकीं ॥ ४ ॥
* * * * * चंद्र हांसला म्हणून ॥ श्रापवरदान ॥ पाहील्यास ॥ ५ ॥
* * * * * चंद्रास पाहीलें ॥ अस्वली वरिलें ॥ कृष्णदेवें ॥ ६ ॥
* * * * वला गणुजी दोंदीला ॥ नोवरा मिळाला ॥ देवबाप्पा ॥ ७ ॥
गणोबाची पूजा भावीका दाविती ॥ हरामाच्या खाती ॥ तूपपोळ्या ॥ ८ ॥
जै मंगलमूती जै मंगलमूती ॥ गाती नित्य किर्ती ॥ टाळ्यांसह ॥ ९ ॥
उत्सवाच्या नांवें द्रव्य भोंदाडीती ॥ वाटी खिरापती ॥ धूर्त भट ॥ १० ॥
जातिमारवाडी गरिबा नाडिती ॥ देऊळें बांधीती ॥ किर्तीसाठीं ॥ ११ ॥
देवाजीच्या नांवें जगाला पीडीती ॥ अधोगती जाती ॥ निश्चयानें ॥ १२ ॥
खरे देवभक्त देह कष्टवीती ॥ पोषण करीती ॥ घरच्यांचें ॥ १३ ॥
अजाणासी ज्ञान पांगळ्या अन्नदान ॥ हेंच बा स्मरण ॥ निर्मिकाचें ॥ १४ ॥
भोळा वारकरी त्यास दिली हूल ॥ स्मरणांत फल ॥ आहे म्हणे ॥ १५ ॥
क्षत्रिय रामाचा धूर्त बने दास ॥ गांठी शिवाजीस ॥ मतलबी ॥ १६ ॥
दादु कोंडदेव त्या ठेवी अविद्वान ॥ करवी तुळादान ॥ ऐदी भटा ॥ १७ ॥
स्वजातिहितासाठीं बोधीलें पाखांड ॥ धर्मलंड खरे जोती म्हणे ॥ १८ ॥
___________________________________________________
तळटीपः
१. श्रेयअव्हेर : वरील अखंड शासन प्रकाशित पुस्तकात जसा सापडाला तसाच्या तसा उधृत केलेला आहे.
२. पुस्तकातही **** असे च लिहिलेले आहे, ते नक्की काय शब्द असावेत ह्याचा अंदाज येतो. पण प्रकाशकाने ते का लिहिने नसावेत हे अनाकलनीय आहे.
३. उत्तदायित्वास नकार लागु. सदर लेखन महात्मा फुले ह्यांनी लिहिलेले असुन महाराष्ट्र शासनाने प्रकाशित केलेले आहे. त्यावर काहीही शंकाकुशंका अथवा आक्षेप असल्यास महाराष्ट्र शासनाशी संपर्क साधावा.
४. संदर्भ: महात्मा फुले समग्र वाङ्मय, पीडीएफ पान क्रमांक ४९९ . (पुस्तक पान क्रमांक छापलेला नाही. )
संपादक: धनंजय कीर, स.ग. मालशे आणि य दि फडके.
प्रकाशक : सचिव , महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई
लिन्क : https://sahitya.marathi.gov.in/ebooks/%E0%A4%AE%E0%A4%B9%E0%A4%BE%E0%A4%...
प्रतिक्रिया
19 Sep 2023 - 2:49 am | चित्रगुप्त
हल्लीच्या गणेशोत्सवाचे वर्णन आणि महात्मा फुलेंची गणेशस्तुती, दोन्ही जबरदस्त.
--- अगदी खरे. भारताच्या इतिहासातील लोकोत्तर महापुरुषांनी प्रकट केलेले विचारधन पुन्हा आजच्या वाचकांना उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्या फुल्या फुल्या बघून आश्चर्य वाटले.
19 Sep 2023 - 4:55 am | कंजूस
लाभार्थी कुठे जाणार?
19 Sep 2023 - 7:00 am | कर्नलतपस्वी
समाज विघातक. पुस्तक फक्त ब्राह्मण द्वेषातून लिहीले गेले आहे. याच विचारांना सामान्य जनतेला सांगुन मतलबी लोक आपली पोळी भाजत आहे. यामुळेच समाज पुढे न जाता मागे खेचला जातोय. दंगल, तोडफोड आपसातील संबध कलुषित होत आहेत.
सरकारकडून, समाज सुधारकां कडून समाज बांधणीची अपेक्षित ना की जे घडून गेले व ज्यावर आजच्या पिढीचा कुठलाच सहभाग अथवा दोष नाही तरीही त्यांनाच वेठीस धरले जात आहे.
या आगोदर समाज व्यवस्था, इतीहास काय होता सर्व मिपाकरांना माहीत नाही असे लेखकाने समजू नये.प्रतिसादात फारसे काही लिहीता येणार. सांप्रत विषय अप्रासंगीक म्हणणे चुकीचे होईल पण अवांछित जरूर आहे. जे लिहून ठेवले आहे तेच तेच उगाळण्यात काहीच अर्थ नाही. शिळ्या कढीला उत आणणे फक्त एवढेच म्हणेन.
इथे वडलांचे कर्ज मुलगा फेडत नाही तीथे इतीहास दाखवून आजच्या पिढीतील समाजाला दोषारोप करण्यात मुर्ख पणा व लबाड हेतू आहे.
इतर समाज सुधारकांनी सुद्धा समाजातील दुर्बल, दुर्लक्षित घटकांसाठी काम केले पण उदो उदो फक्त आणी फक्त शाहू फुले अंबेडकरांचा झाला.
जीसकी लाठी उसकी भैंस/बळी तो कान पिळी या न्यायाने सामान्य समाज हाकलला जातो एवढे मात्र खरे.
इतीहास वाचून जमत असल्यास चुका सुधाराव्यात ना की खत पाणी घालून त्याची समाजाला घातक आशी विषवल्ली जोपासायची.
बाकी लेखकाचे अभिनंदन, लेखनावर भरपूर फटाके उडणार यात शंका नाही.
बाकी, उत्सवाचे बाजारीकरण व पर्यावरण इत्यादींवर संपूर्ण सहमत.
साहित्य संपादकांनी असा जाती द्वेषावर लेखन संस्थाळवर प्रकाशीत केल्याबद्दल त्यांचाही तिव्र निषेध करतो.
19 Sep 2023 - 7:29 am | कर्नलतपस्वी
या लेखना मुळे आजच्या काळात गणपती किवां फुले यांना काही फरक पडणार नाही पण काहींचे उखळ तर काहीचें कपाळ पांढरे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
19 Sep 2023 - 8:22 am | कंजूस
वि.द.घाटे यांनी त्यांच्या आत्मकथनात ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर या विषयावर बराच उजेड पाडला आहे. तो म्हणजे फक्त मतप्रदर्शन नसून काय काय कसे घडत गेले ते मांडलं आहे. स्वानुभव,वर्तमान घडामोडी. फुले हे समाज सुधारक होते आणि त्यांचा विरोध ब्राह्मण्य पाळणाऱ्यांवर होता. असा भेदभाव न पाळणाऱ्यांशी ब्राह्मणांशी सख्य होतं. त्यांनी ज्या संस्था काढल्या त्यावर संचालक म्हणून पुरोगामी ब्राह्मणांनाच नेमले होते.
गणेशोत्सव म्हटला तर त्याचा त्रास होण्याचं कारण नाही. त्रास होतो तो उत्सवातील वाईट प्रघातांचा. मोठ्या आवाजात रेकॉर्ड गाणी लावणे हे त्यापैकी एक. नाही तर उत्सव कधी आला आणि संपला हे कळणार नाही. दुसरा एक गुप्त त्रास दुकानदारांना होतो. वर्गणी गोळा करणारे खूप पैसे मागतात.
कुणी कोणत्या समाजाने कोणतं दैवत आदरणीय मानायचे हा त्यांचा विषय आहे. पण त्याबाहेर जाऊन दरारा वाढवत आहेत.
22 Sep 2023 - 8:23 pm | धर्मराजमुटके
प्रथमदर्शनी असे वाटत नाही. मुळ कविता किंवा कोणतेही दलितांसाठीचे लिहिले गेलेले जुने साहित्य पाहिले तर आलोचनेचा रोख हिंदू देवतांवरच असतो. देवता फक्त ब्राह्मणांच्याच असतील तर वेगळी गोष्ट असते. राम, कृष्ण, गणपती,शंकर, सरस्वती, ब्रह्मदेव कोणीही या टिकेतून सुटलेले नाहित. तत्कालीन समाजात एक वर्ग खूप नाडला गेला होता हे सत्य स्वीकारुन त्यापोटी निर्माण झालेल्या चीडीमधून हे साहित्य प्रसवले असावे असा माझा अंदाज ! फार मनावर घेऊ नये. जुने जाऊद्या मरणालागूनी असे म्हणुन सोडून द्यावे. नव्या युगात विषमता नष्ट कशी होईल याचा काही सामाईक कार्यक्रम असेल तो राबवावा.
फारच आरडा ओरडा झाला तर आमचा विरोध ब्राह्नंणांना नाही तर ब्राह्मण्याला आहे असा एक सेफ डायलॉग सदा सदा सर्वदा मुखी बाळगावा.
19 Sep 2023 - 9:38 am | कर्नलतपस्वी
लेखाची सुरूवात गणेशोत्सवा ने सुरवात केल्याने गैरसमज झाला. विनाशर्त ममनापासुन साहित्य संपादकांची जाहीर क्षमा मागून दिलगीरी व्यक्त करतो.
पैजारबुवांनी चुक निदर्शनास आणून दिल्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
क लो आ
19 Sep 2023 - 6:46 pm | आजानुकर्ण
चांगली कविता. फुल्यांनी गोरगरिबांना नाडणाऱ्यांचा चांगलाच समाचार या कवितेतून घेतला आहे. अर्थात मार्कस ऑरेलियस यांचा काडी घालण्याचा हेतू असल्याने त्यांनी अशुद्धलेखनाने बुजबुजलेल्या तळटीपा टाकून पळ काढलेला दिसतोय. किमान या कवितेबाबत त्यांचे आकलन काय आहे हे सांगितले तर बरे होईल.
19 Sep 2023 - 10:52 pm | प्रसाद गोडबोले
हेतु:
सदर कविता उधृत करण्याचा हेतु अतिषय सरळ आणि सोप्पा आहे. आपले लोकोत्तर समाजसुधारक महात्मा फुले ह्यांचे लुप्तप्राय होत चाललेले अभिजात लेखन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवावे.
हे लेखन खरेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचले पाहिजे. हे मी अत्यंत मनापासुन , खर्या कळकळीने म्हणत आहे , ह्यात काहीही उपरोध वगैरे नाही.
मी आधीच लिहिल्याप्रमाणे - "सुजाण" नागरिक ह्यातुन नक्कीच "ज्याला जो घ्यायचा तो" बोध घेतील अशी आशा आहे !
आणि माझे आकलन काय हे माझे मला ठाऊक आहे. मला ते तुम्हाला सांगायची किंव्वा पटवुन द्यायची आवश्यकता वाटत नाही. तुम्ही तुमचे अंदाज बांधायला स्वतंत्र आहात.
ह्या कवितेवर येणार्या लोकांच्या प्रतिक्रिया पाहुन त्यांच्याशी कसे आणि काय बोलायचे हे मला ठरवता येते . आता हेच बघा ना , तुम्हाला ही कविता "चांगली कविता " वाटली आहे it says a lot about you. ! तसेच इतरांच्या प्रतिक्रिया पाहुन ते कसे व्यक्ती आहेत ह्या बद्दल देखील देखील सहज अनुमान बांधता येत आहे !
इत्यलम
:)
21 Sep 2023 - 3:24 am | स्वधर्म
यापूर्वी तुंम्हाला चातुर्वर्ण्यामुळे झालेले अन्याय इ. विचारले होते, तर प्रश्न विचारणार्या आमच्यासारख्या लोकांना गट क्र. २ मध्ये टाकले होते. तुम्हीं तर त्यांना काही समजवायला जात नाही, फ़क्त स्वांतसुखाय लेखन करता. मग गट क्र. २ चे अग्रणी महात्मा फुले यांची ऐन गणपतीउत्सवात इथे टाकून काय साध्य करायचे आहे? बरं, पुन्हा उपरोध नाही, असेही साळसूदपणे म्हटले आहे. निदान इथेतरी प्रामाणिकपणे खरा हेतू सांगून टाका.
महात्मा फुले, आंबेडकर यांच्याबद्दलची तुमची विरोधाभक्ती:
http://misalpav.com/comment/1169353#comment-1169353
बाय द वे: तुमची ती मूळ गटांची वर्गवारी सापडली नाही, ती इथे देण्याची हिंमत दाखवा म्हणजे सगळ्यांनाच क्लिअर होईल.
21 Sep 2023 - 12:15 pm | प्रसाद गोडबोले
उपरोध नाहीच.
जास्तीत जास्त लोकांपर्यंत महात्मा फुले ह्यांचे हे पुरोगामी विचार, हे अभिजात लेखन पोहचले पाहिजे, जेणे करून ते त्यांची मते बनवू शकतील. हाच सरळ स्पष्ट उद्देश आहे.
आणि हो , हे लेखनही स्वंत:सुखायच आहे. लोकांची शालेय शिक्सनातील थातूरमातूर पाठ्यक्रम वाचून बनलेली मते बदलताना पाहून , डोळे उघडले जाताना पाहून, किंवा मते अधिक कट्टर होत जाताना, अधिक दीर्घद्वेषयुक्त होत जाताना पाहून मला मनापासून आनंद होतो.
बाकी ते गटवारी तुम्हाला आमच्याच अन्य एका लेखात सापडेल. थोडे तरी कष्ट घ्या. ह्या निमित्ताने तुम्ही आमचे अजून काही लेखन वाचाल आणि स्कोर करायला अजुन काही ब्राऊनी पॉइंट्स सापडतील तुम्हाला.
आता ह्या लेखावर इतके बास.
२
22 Sep 2023 - 10:38 pm | आजानुकर्ण
मी झक मारली आणि वेळ घालवला. मार्कस ऑरेलियस यांची मूलभूत मुद्द्यांवर चर्चा करण्याची कुवत आणि तेवढे आकलन नाही. एखादी कविता टाकून गोंधळ उडवून द्यायचा आणि फुल्यांविरुद्ध मने दूषित करायची इतकाच त्यांचा मर्यादित हेतू आहे. वेळ घालवू नका.
22 Sep 2023 - 11:54 pm | प्रसाद गोडबोले
>>> चला, म्हणजे ही कविता वाचून लोकांची मने दूषित होतील इतके तरी तुम्हाला मान्य आहे. हे ही नसे थोडके !
हे सारं लोकांपर्यंत पोहचले च पाहिजे. ती वारकरी सांप्रदायिक लोकांविषयी ची कविताही जास्तीत जास्त लोकांना माहीत असायला हवी. त्यावर कार्तिकी एकादशीला लेख लिहिणार आहे. त्यातच ज्ञानेश्वरी मधील १२ व्या अध्यायावर माउलींनी जे विवेचन केले आहे , ज्याला ज्ञानेश्वरी चा परमोच्च बिंदू म्हणता येईल त्यावर महापुरुषांनी काय टिप्पणी केली आहे ते ही लिहीन. एकनाथ षष्ठी चया मुहूर्तावर नाथांनी ज्या कृष्णावर नितांत सुंदर एकनाथी भागवत लिहिले , त्या कृष्णबद्दल काय लिहून ठेवले आहे ते लिहीन म्हणतो.
शाहू फुले आंबेडकर ह्यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात हे सर्वांनाच माहीत असायला हवे.
19 Sep 2023 - 7:09 pm | अहिरावण
फारच सुंदर कविता. गोरगरीबांना नाडणारे मागच्या पिढीतले वेगळे होते, या पिढीतले वेगळे आहेत हे कळाले.
19 Sep 2023 - 8:10 pm | ढब्ब्या
* * * * * * * * ब्राम्हण द्वेषाबद्दल
19 Sep 2023 - 9:00 pm | अमरेंद्र बाहुबली
कविता छान आहे. फुलेंबद्दल सनातनींत द्वेष दिसतो. पण फुले जातीच्या नाहीतर वृत्तीच्या विरूध्द होते हे समजण्याची कूवत तेव्हाच्या सनातनीत नव्हतीच पण आताच्या सनातनीत तर आजिबातच नाही. फुले ब्राम्हण जाती विरूध्द असते तर “भिडे” वाडा मूलींच्या शिक्षणाला घेतला नसता. ब्राम्हण मूलगा दत्तक घेऊन वाढवला नसता. संघटनेत, संस्थेत ब्राम्हण जातीच्या लोकांत स्थान नसते.
20 Sep 2023 - 8:19 am | प्रचेतस
अगदी खरंय. लोकोत्तर महापुरुषांनी फारच थोर थोर काव्ये लिहून ठेवलीत.
20 Sep 2023 - 11:19 am | Bhakti
सर्व महापुरुषांनी आज सगळ्या जयंत्या,उत्सवातला डीजेचा उन्माद ,प्लास्टिकचा कचरा,मूर्तीची विसर्जनानंतरची विटंबना पाहिली असती तर समाजसुधारणाचे कार्य सुरूच केले नसते.शेवटी हेच बरोबर..
मनाचा गणेश मनीं वसावा. हा वसा कधीं घ्यावा? श्रावण्या चौथीं घ्यावा. माही चौथीं संपूर्ण करावा. संपूर्णाला काय करावं? पशापायलीचं पीठ कांडाव. अठरा लाडू करावे. सहा देवाला द्यावे, सहा ब्राह्मणाला द्यावे, सहाचं सहकुटुंबी भोजन करावं. अल्प दान, महापुण्य. असा गणराज मनीं ध्यायीजे, मनी पाविजे, चिंत्त लाभिजे, मनकामना निर्विघ्र कार्यसिध्दि किजे. ही साठां उत्तरांची कहाणी, पांचां उत्तरी सुफळ सपूर्ण.
;) :)
20 Sep 2023 - 12:59 pm | आनन्दा
काय मजा नाही आली राव.
अजून फटाके फुटले नाहीत.
बाकी, सनातन प्रभात मध्ये 10 वर्षापूर्वी महात्मा फुलेंचे निवडक वांगमय छापले आहे. ते वाचले तरी पुरेसे आहे अभ्यास करायला.