अमेरिका 11- कथा श्वानप्रेमाच्या.

निमी's picture
निमी in जनातलं, मनातलं
13 Sep 2023 - 9:42 pm

अमेरिकेत अनोळखी माणसे एकमेकांना सुहास्य वदनाने हाय-हॅलो म्हणतात पण ते हवाई सुंदर्यांसारखं नाटकी किंवा बेगडी वाटतं. प्रत्येक अनोळखी व्यक्ती इथे सहजपणे 'कसे आहात' असे विचारते आणि उत्तर देणाराही 'छान..मस्त' असे वापरून गुळगुळीत झालेले खोटे उत्तर चिकटवतो. इथे कामाला किंवा घरकामाला माणसं सहज मिळत नाहीत आणि मिळाली तर ती परवडतीलच असेही नाही. घरातली रोजची भांडी-कपडे अथवा साप्ताहिक कामात घर - गाडीची स्वच्छता स्वतःच करावी लागते. इथल्या लोकांना घरकाम - छंद - नोकरी यातून पुरेसा वेळ मिळत नाही अशी तक्रार ऐकू येते आणि त्याचवेळी इथे वेळ घालवायला आणि एकटेपणावर मात करायला कुत्रं पाळायचा सल्लाही दिला जातो.

इथली सर्व कुत्री/मांजरं पाळीवच असतात. भटकी - विमुक्त कुत्री इथं नाहीतच ! त्यामुळे भटक्या कुत्र्यांचे कळप गाड्यांची सीट कव्हर्स फाडत नाहीत, अंगणातून चपला पळवत नाहीत, मेलेले प्राणी, अन्न अंगणात टाकत नाहीत किंवा रात्री-अपरात्री भुंकतही नाही. इथल्या कुत्र्यांचे विशेष लाड केले जातात. हे लाड अवाजवी वाटतील आपल्याला इतके जास्त असतात...त्यामुळेच असेल कोणत्याही कुत्र्याला मी इथे अर्वाच्य आवाजात भुंकताना पाहिले नाही की ऐकले नाही. यांची बडदास्त इतकी असते की, 'कुत्ते की मौत' येणार असेल तर जन्म अमेरिकन कुत्त्याचा द्या !' असा वर देवाकडे मागायचा, असे मी मनोमन ठरवले आहे.

इथे कुत्र्याला Dog म्हणत नाहीत तर पेट/डॉगी असे संबोधून त्याचं बारसं केलेलं असतं. मालकाच्या मूळ भाषेतील शब्द कुत्र्याला कळत असावेत. त्यामुळेच 'टेक' ला अमेरिकन कुत्रा पुढे सरसावतो तर मराठी कुत्रा टेकून बसतही असेल. इथे माणसांच्या सामानाप्रमाणे पेट मॉलही असतात. कुत्रा पाळण्यापूर्वी तुम्हाला किमान 15-20 गोष्टींची खरेदी करावी लागते. कुत्र्याचे गळपट्टे आणि चेन, एक जुनी जर्मनची ताटली आणि पाण्याचे साधे, निरुपयोगी भांडे आवश्यक आहे असे माझे भारतीय ज्ञान होते. इथे मात्र लाडक्या पपीसाठी कॉलर, फूड बाउल, आयडेंटीटी टॅग, लिश म्हणजे चेन किंवा फिरायला नेण्याचा पट्टा, बॅलन्स-हेल्दी फूड, वॉटर बाऊल, खेळणी..खेळायला,चावायला,चोखायला आणि ती सगळी खेळणी ठेवायला बॉक्स, पेटसाठी केज म्हणजे पिंजरा, त्यात गरम होणारी गादी - मऊ उबदार पांघरून, थंडीसाठी- स्वेटर्स, फिरायला कपडे, कानाची टोपी, आंघोळीचा टॉवेल, पंजे-नखं स्वच्छ करायला साहित्य- प्रसाधनं-शाम्पू, हे सगळं करण्यासाठी आपल्याला हॅन्डग्लोव्हज्, त्यांची विष्ठा गोळा करायला उपयोगी पडतील अशा विशेष हिरव्या पिशव्या, गाडीतून फिरायला नेण्यासाठी क्रेट, घरातील काही भागात त्याला फिरू देण्याचे नसेल तर त्याचे पार्टिशन अशी न संपणारी आणि न समजणारी अगम्य वस्तूंची यादी असते. कुत्र्यासाठी खाण्यापिण्या व्यतिरिक्त औषधे, इन्शुरन्स, वैद्यकीय उपचार यांचा खर्च इथे आनंदाने करतात. केवळ डॉगी ट्रेनर्स किंवा डॉक्टर्स नाही तर अशा इथे पेट पार्लरची संख्याही खूप आहे. त्यांचे न्यूट्रिशनर्स, ग्रुमर, ब्रीडर, टेक्निशियन, औषध विक्रेते असतात. डॉगीचे इतके लाड पाहून जाणवतं की आपल्याकडे बाळाच्या आगमनाची जितकी तयारी होते त्यापेक्षा ही तयारी अधिक आहे. इथे कुत्र्यांच्या शारीरिकच नाही मानसिक आरोग्यासाठी 'पेट सायकॉलॉजिस्ट' ही आहेत म्हणे ! कुत्री कशामुळे खुश होतात, घाबरतात, शांत राहतात, उदास होतात याचही ज्ञान मालक सातत्याने मिळवत असतो. मालकाच्या भावभावना कुत्र्याला समजतात आणि एकटेपणाचा 'सखा सोबती' हा पेट असतो.

इथल्या पार्कमध्ये रस्त्यावर थोड्या थोड्या अंतरावर हिरव्या पिशव्या आणि डस्टबिन असतात. आपल्या कुत्र्याची 'शी' मालकाने तात्काळ उचलून डस्टबिनमध्ये फेकायची असते. काही ठिकाणी या पेटच्या नट्यापट्ट्याचा खर्च मालकीण बाईंच्या नट्टापट्ट्यापेक्षाही अधिक असू शकतो. इथे पेट हा घरचा सदस्यच असतो..नव्हे..'पोटच्या' गोळ्यापेक्षाही या 'पेटच्या' गोळ्यांवर जास्त खर्च होतो. अगदी झिपरी, कलुंगी वाटावी ते देखणी पेट मी इथे पाहिली. बारके मांजर ते दांडगा कोल्हा या आकाराचीही कुत्री दिसली. कुत्र्याच्या मानाने पाळीव मांजरं मात्र कमी दिसली.

काही प्रमाणात इथे मांजरांव्यतिरिक्त गिनीपिग्ज,ससे, मासेही लोक पाळतात. त्याप्रमाणे आवश्यक खरेदी बदलते. इथे प्राण्यांच्या संवर्धनासाठी, अभ्यासासाठी स्वतंत्र अभ्यास केंद्र आहेत. आपत्कालीन सेवा प्राण्यांसाठी देणारी यंत्रणा आवश्यक साधनांसह उपलब्ध असते. एखाद्या 'पाळीव नसणाऱ्या' प्राण्याचे दर्शन होण्याची शक्यता असली की लगेच त्याचा फलक तिथे लावला जातो. कसा दिसतो - काय करेल - तुम्ही काय करा - करू नका याचं ज्ञानही दिलेलं असते.

इथल्या काही रेस्टॉरंट मध्ये पाळीव प्राण्यांना मनाई असेल तर तसे लिहिलेले आढळते. इथे प्राण्यांसाठीचे मेनू असणारी काही स्वतंत्र रेस्टॉरंट सुद्धा आहेत. जिथे तुम्ही स्वतः सोबत तुमच्या लाडक्या कुत्तुलाही आवडीचे - हेल्दी,न्यूट्रिशियस पदार्थ मागवून खाऊ घालू शकता.

दादा कोंडकेंच्या एका सिनेमात 'मानसा परास मेंढर बरी' असं गाणं होतं. इथल्या टेक्नोसॅव्ही आयुष्यातील अडथळे - अडचणीतून वाट काढण्यासाठी धडपडणाऱ्या माणसाकडे पाहिले आणि इथलं हे श्वान प्रेम, त्याच्या लाडाच्या, ब्रीडच्या, फीडच्या सुरस रम्य कथा ऐकल्या की वाटतं..
माणसा परिस श्वाना, तुझेच जगणे भारी !

मांडणीविचार

प्रतिक्रिया

ही मालिका एकत्र पहिल्यापासून कूठे मीळेल..लिंक देईल का कोण?

राजेंद्र मेहेंदळे's picture

14 Sep 2023 - 11:31 am | राजेंद्र मेहेंदळे

अत्यंत आभारी आहे.. खरं तर हे 21 भागांचे लिखाण मी अमेरिकेत जेमतेम महिना सव्वा महिना होते त्यावेळी केले आहे. अमेरिका अथवा परदेश म्हणजे केवळ छान, उत्तम असे नाही आणि वास्तव मी पाहिले तेच खरे असेही नाही.. हे या लेखमालेतून काहींना समजावे म्हणून इथे पाठवण्याचे ठरवले. आपल्यासारख्या काही व्यक्तींच्या कडून आलेल्या सकारात्मक प्रतिक्रिया पुढील लिखाणास नक्कीच प्रेरणा देणाऱ्या ठरतील. मनःपूर्वक आभारी आहे.

विंजिनेर's picture

14 Sep 2023 - 5:09 am | विंजिनेर

ग्गोग्गोड छान लेख मस्त आहे पण वास्तवाकडे डोळेझाक करणारा वाटला.
इथली सर्व कुत्री/मांजरं पाळीवच असतात. भटकी - विमुक्त कुत्री इथं नाहीतच !

ह्याचं कारण इथल्या म्युन्शिपाल्टीची माणसं भटकी/सोडून दिलेली/पळून गेलेली अशी कुत्री/मांजरं पकडून "शेल्टर" मध्ये नेतात. त्या पकडलेल्या प्राण्यांच्या नशीबात नंतर क्वचितच सुखाचे दिवस असतात.
त्यातल्या त्यात, काही शेल्टर्स अनाथालयासारखी असतात - बेवारशी प्राणी दत्तक देण्यासाठी आवर्जून प्रयत्न करतात- अशा जागी तुमचं पेट गेलं तर बरेच दिवस आपल्याला कोणी दत्तक घेईल का ह्याची वाट पाहणं असतं.
त्याहून दुर्दैवी म्हणजे काही शेल्टर्स पकडल्यानंतर २४-४८ तासांमध्ये मालकाचा ठावठिकाणा लागला नाही तर नाईलाजाने बेवारशी प्राण्याला निजधामास पाठवतात

कोविडच्या काळात "एकटे पणाची साथ" म्हणून हौसेखातर आणलेले हजारो कुत्री-मांजरं नंतर "झेपत नाही" म्हणून सोडून दिली आहेत.

म्हणून नवीन प्राणी विकत घेताना, शेल्टर्स मधून घ्यावा किंवा अशा ब्रीडर कडून घ्यावा जो/जी पैशाच्या मागे न धावता पिल्लाचा आणि पिल्लाच्या आई-वडिलांचा जिवापाड संभाळ करेल

असो. चालूद्या

सर टोबी's picture

14 Sep 2023 - 10:09 am | सर टोबी

कि सदर लेखात कुत्रांच्या बाबतीत अमेरिकेत सर्व काही कल्पनेहून सुंदर असा काही लेखिकेचा सूर दिसला नाही. त्यामुळे श्वान प्रेमाची दुसरी बाजू असं म्हणून तुमचा विचार मांडू शकला असता.

किती योग्य लिहिलय तुम्ही.. माझा सूर तुम्हाला समजला आणि तुम्ही तो समजून घेतला याबद्दल आभारी आहे. मला खरंच दुसऱ्या बाजूबद्दलची अधिक माहिती नाही.

आपल्या प्रतिसादाबद्दल आभारी आहे. हा लेख आपल्याला ग्गोग्गोड का वाटला हे समजले नाही..प्राण्यांबद्दलची ही दुसरी बाजू केवळ परदेशातच नाही तरच स्वदेशातही आहे. अति सर्वत्र वर्जते प्रमाणे अति लाड अथवा अति प्राणी द्वेष नसावा ही सुयोग्य भावना वाटते.

मुक्त विहारि's picture

14 Sep 2023 - 5:40 am | मुक्त विहारि

लेख आवडला ....

निमी's picture

14 Sep 2023 - 3:01 pm | निमी

धन्यवाद!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

14 Sep 2023 - 10:13 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेखन वाचतोय. प्रत्येक भागात एक नवा विषय आणि उत्तम मांडणी त्यामुळे वाचन सहज होते. हाही भाग आवडला. देश कोणताही असो, पाळीव प्राणी माणसाच्या मनातला एकाकीपणा घालवतात हे मात्र खरं आहे, आमच्याकडेही पोपट, कुत्री पाळून झाले आहेत. कुत्र्यांचं हसतं खेळतं रुप कोणालाही आवडतं. पण त्याचं जाणं हे फार त्रासदायक असतं. फारसं आयुष्य त्यांच्या वाट्याला येत नाही, आणि मग नको तो त्रास असे व्हायला लागते. असो. लिहिते राहा. पुढील भागास शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

निमी's picture

14 Sep 2023 - 3:00 pm | निमी

धन्यवाद सर.. तुमच्या सातत्याने मिळणाऱ्या प्रोत्साहनामुळे लेख इथे पाठवण्याचे धाडस होत आहे. मनःपूर्वक धन्यवाद.

कुत्रे मांजर पाळता येत नाही पण आवडतात अशांसाठी भटकी असतात.

धर्मराजमुटके's picture

22 Sep 2023 - 8:31 pm | धर्मराजमुटके

आपल्याकड्चे भटके कुत्रे चीनला पाठविण्याऐवजी अमेरीकेला पाठविण्याचा पर्याय जास्त योग्य वाटतो. तिकडे त्यांना घर भेटेल आणि आणि आपल्याला त्रासापासून मुक्ती.