अमेरिक-10 निसर्ग गुणगान

निमी's picture
निमी in जनातलं, मनातलं
8 Sep 2023 - 3:35 pm

शितावरून भाताची परीक्षा करता येते, पण सुगरणीची करता येईलच असं नाही. त्याच धर्तीवर इथं एका भूभागावरून देशाची परीक्षा होऊच शकत नाही. प्रत्यक्ष भारतात ज्याप्रमाणे एका राज्यावरून सार्वत्रिक मत भारताबद्दल करताच येणार नाही. काहीसे तसेच इथेही आहे. अमेरिकेतल्या लोकांनी उत्सुकतेपोटी 'भारतात कुठे राहता?' या प्रश्नाला आम्ही 'सांगली-महाराष्ट्र..10 अवर्स फ्रोॅम मुंबई..बाॅम्बे!' असं सांगितल्यावर 'तुमच्याकडे बर्फ पडतो का?' असा प्रश्न विचारून गार केलं. हिमाचल-काश्मीर-लेह लडाख आणि महाराष्ट्र शेजारीच असल्यासारखे जसं त्यांना वाटू शकतं, तसंच काहीसं आपलेही होते. अमेरिकेबद्दल आपल्याकडच्या लोकांचे प्रश्न ऐकले की, लक्षात येतं त्यांनी कुणाचं तरी नखाएवढं वर्णन ऐकलं-वाचलं आहे. विचारणाऱ्याच्या शंका रास्त असतात...पण आमची उत्तरं 'सार्वत्रिक विधान' मानता येणार नाही' हा सावधानिक इशारा आम्ही पण अतिउत्साहाच्या नादात द्यायचे विसरतो. स्वाभाविकच 'माझं वर्णन म्हणजे अमेरिका' असे ऐकणाऱ्याला वाटू शकते..पण खरंतर ते अल्पकाळासाठीच्या वास्तव्यातील, अत्यल्प भूभागाचे निरीक्षण म्हणता येईल.

कॅलिफोर्नियात आम्ही बे एरियात मुलीसोबत राहताना काही भाग पाहता आला. निसर्गानं रंगांची किती मुक्त, मुग्ध उधळण करावी ? आमच्या घरासमोरील काही डोंगर पिवळ्या गवताने नटलेले आणि त्यावर तुरळक ठिकाणी हिरव्या झाडांचे चित्रण असणारे, तर काही जवळच्या भागात दाटीवाटीने उभे उंच उंच वाढून एकमेकांशी स्पर्धा करणार्या वृक्षांना अंगाखांद्यावर खेळवणारे डोंगर ! काही ठिकाणी सपाट भागात दुरून चिमुकली दिसणारी पण प्रत्यक्षातील प्रशस्त घरे. इथल्या कोणत्याही घराला नावं लिहिलेली नसतात पण नंबर्स नक्की असतात. आपल्याकडे 'भरारी, परिश्रम, आई-वडिलांची कृपा, सार्थक, नमस्कार, स्वागत' अशा नावांमुळे स्वगत, स्वधर्म ते स्ववंशाची माहिती कळू शकते.

इथे प्रत्येक चौकात छान-छान फुलझाडे लावलेली असतात. काही ठिकाणी पाण्याचा नयनरम्य देखावा अखंड वाहत असतो.. तर काही ठिकाणी छोट्या-मोठ्या पुतळ्यांकडे लक्ष वेधले जाते. मुद्दाम नमूद करावेसे वाटते, इथे कोणाही ठरावीक थोर व्यक्तीचे पुतळे नाहीत. त्यांच्या वंशजांचे रक्त त्याकारणासाठी उगा सळसळत नाही. इथे प्रत्येकाच्या घरासमोरील बागेत विविध फुले फुललेली दिसली. गुलाबांच्या फुलांनी लगडलेलं झाड पाहून मला आमच्या घरचे केवीलवाणे गुलाब रोपटे आठवले. माती बदलून - जागा पलटून - गांडूळ खत - शेणखत असा पौष्टिक खुराक देऊन बापड्याला दोन चार फुलं कशीबशी येतात..ती पण सगळी एकावेळी नाही. खुरटल्यासारखी फुले येऊन माझे गुलाब गतप्राण होतात. भारतातही काही घरांमधून निगुतीने, प्रेमानं वाढवलेले आणि मालकाच्या कष्टाला जागून वाढलेले गुलाब मी पाहिले आहेत. पण इथं सार्वजनिक ठिकाणी मालकाच्या ढुंकून लक्ष न देण्याच्या सवयीकडे साफ दुर्लक्ष करून असंख्य फुलणारे गुलाब माझ्यासारख्यीचे लक्ष वेधून घेतात. बरं इतक्या देशी-विदेशी गुलाबांचा फावल्या वेळेत गुलकंद करावा तर तेही शक्य नाही कारण इथे कोणीही फुलं तोडत नाही. घरच्या फुलांचा गुच्छ पाहुण्याला देऊन पैसे वाचवत नाहीत आणि 'देवासाठी घेतोय चार फुलं! पुण्य तुम्हालाच लागेल!' असा आव आणत दुसऱ्याच्या श्रमाची फुलं स्वतःच्या देव पूजेसाठी कुणीही वापरत नाही.

फुलांनी तरी किती फुलावं त्याला काही सुमार ! नाकापेक्षा मोती जड सारखे - आपला जीव किती, पानं किती, उंची किती, फुललायस किती असं म्हणावसं वाटतं. झाडांची, वेलींची दया यावी आणि प्रेमाने रागे भरून 'बास हं आता... इतका फुललायस्....आता आराम कर निदान 2-4 आठवडे !' असं म्हणावसं वाटतं. आम्ही गेलो तेंव्हा इथला 'समर' आहे म्हणून असेलही पण जमिनींची सुपीकता पाहून थक्क व्हायला होतं.

रस्त्यावरून जाताना लांबलचक पसरलेली शेती पाहिली की दिसून येते ती कित्येक एकरांमधील द्राक्षबाग, स्ट्रॉबेरी शेती किंवा बेरी फार्म्स ! बहुतांशी शेती यांत्रिक उपकरणांनी केली जाते. मानवी क्षमतांच्या आणि संसाधनांच्या बाबतीत दुसऱ्यावर अवलंबून करता येणारे काम इथे अशक्यच आहे. निसर्गाचा वरदहस्त असला तरी माझ्यासारख्या सामान्य प्रवाशाला जाणवेल ती म्हणजे वृक्ष लागवडीने नटलेल्या पार्कमधील एकसुरी लागवड! जैवविविधता अशा ठिकाणी फारच कमी आढळली. मात्र जंगलात, शहरांपासून थोड्या अंतरावरील भागात किमान कॅलिफोर्नियात तरी चांगली जैवविविधता दिसली. एका जंगलातून जाताना आम्हाला चक्क 2 ठिकाणी भर दुपारी हरीणही दिसले.

इतक्या फळाफुलांनी लगडलेल्या वृक्षराजित ठराविक पक्षी दिसले.. पण मुबलक खाद्य उपलब्धतेमुळे फारसे कोणी पक्षी झगडत - बोलत - भांडत नसावेत. कोणत्याही झाडावर बसा.. खाऊ मिळणारच आहे त्यामुळे कमी कष्टात, फारसे पंख न फडफडवता ताव मारल्याने असेल पक्षी सुद्धा डबल XL साईझचे होते. जे पक्षांचं तेच खारोटी आणि कीटकांचं ! इथले डास सुद्धा नव्या चवीच्या रक्त प्राशनासाठी माझ्याकडे आकर्षित झाले तेव्हा 'रक्तदान - श्रेष्ठदान' न मानता जाळीआड बसणेच मी पसंत केले. भरभरून दान देणाऱ्या निसर्गाच्या दर्शनाने तृप्त होताना मला कोणत्याही परिस्थितीत 'तप्त' मात्र व्हायचे नव्हते..

मांडणीविचार

प्रतिक्रिया

राजेंद्र मेहेंदळे's picture

8 Sep 2023 - 4:33 pm | राजेंद्र मेहेंदळे

लेख आताशा छोटे होऊ लगले आहेत. फोटोही नाहीत. झाडाफुलांचे फोटो असते तर अजुन मजा आली असती.

नमस्कार लेख आधीच लिहिले आहेत.. फोटो लेखामध्ये घालायला शिकते. खरंच फोटो जास्त चांगली कल्पना देऊ शकतात. सूचनेबद्दल आभारी आहे आणि प्रतिसादाबद्दल धन्यवाद.