सिनेमाच्या गोष्टी भाग ६

साहना's picture
साहना in जनातलं, मनातलं
23 Jun 2023 - 11:26 am

आजचा चित्रपट एक भारतीय चित्रपट आहे आणि तो सुद्धा मिथुनदाचा. मिथुन म्हणजे गरिबांचा अमिताभ अशीच इमेज आहे. गुंडा, लोहा, आणखीन अनेक बी ग्रेड सिनेमांचा सम्राट मिथुन ह्याला मुख्य चित्रपट क्षेत्रांत सुद्धा चांगले यश लाभले. मिथुन मध्ये अभिनय क्षमता होती ह्यांत शंकाच नाही. गुरु मधील रामनाथ गोयंका ह्यांची भूमिका माझी विशेष प्रिय मिथुन भूमिका आहे.

मिथुन ह्यांचा गुडिया हा चित्रपट जास्त लोकांनी पहिला असेल असे मला वाटत नाही. हा १००% आर्ट सिनेमा होता. ह्याचा प्रीमिअर सुद्धा १९९७ मध्ये टीव्ही वर झाला. तेंव्हा सहारा नावाचा चॅनल होता त्याच्यावर. त्याकाळी माझी बाल्यावस्था असली तरी चित्रपटाने मनावर थोडाफार परिणाम केलाच. त्याकाळी मला तो थोडा गूढ प्रकारचा चित्रपट वाटला. नंतर पुन्हा पहिला तेंव्हा समजला.

हमीद (प्राण) हा एक व्हेंट्रिलॉकिस्ट म्हणजे बोलक्या बाहुल्यांचा खेळ करणारा मुस्लिम कलाकार आहे. त्याच्या कलेची विशेष कदर कुणाला नाही पण जॉनी मेंडिस (मिथुन) ह्या गोमंतकीय कलाकाराला हमीद कडून हि कला शिकायला मिळते. हमीद च्या बाहुलीचे नाव आहे उर्वशी. ती एक विभ्रम फेकणारी, वेड लावणारी ललना आहे. हमीद आपली कला जॉनीला चांगल्या प्रकारे शिकवतो आणि हमीद च्या मृत्यूनंतर उर्वशी जॉनी ला मिळते. जॉनी आणि उर्वशीची जोडी अत्यंत लोकप्रिय होते. उर्वशी बाहुली असली तर जॉनी साठी ते एक माध्यम आहे. उर्वशीचा आवाज जॉनीचाच असला तरी जॉनीच्या मनात उर्वशीची आपली अशी पर्सनॅलिटी असते.

रॉसमेरी ह्या खूप तरुण मुलीला जॉनी आवडतो आणि ती त्याच्या सोबत ती खूप वेळ घालवते. नंदना सेन ह्या भूमिकेत विशेष लोभस दिसली आहे. मिथुन तिच्यापेक्षा खूपच वयस्क वाटतो. रॉसमेरी जॉनीवर प्रेम करत असला तरी त्याला मात्र उर्वशी बद्दल इतके आकर्षण वाटते कि तो तिच्यांत पूर्ण पणे गुंतून जातो. ह्याच थीम वर अनेक चित्रपट बनले आहेत आणि बहुतेक वेळा "संगीत" ह्या विषयासाठी लोक आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांना विसरतात असे कथानक असते पण इथे त्या जागी बाहुली आहे. माझ्या मते बाहुली थोडी "creepy" वाटते. माझ्या मते दिग्दर्शकाला सुद्धा हेच अपेक्षित असावे. पण चित्रपटांत मात्र सर्वानाच ती अत्यंत सुंदर वाटते. रोजमेरीला जॉनी चे उर्वशीवरील ऑब्सेशन अजिबात आवडत नाही पण जॉनी तिचे ऐकत नाही.

लहानपणी मला गुडिया एक गूढ चित्रपट का वाटला ह्याचे कोडे मला आता सुटले. चित्रपटांत वारंवार गुडिया बोलते आणि जॉनी अश्या प्रकारे वागतो कि जणी काही गुडिया स्वतःच बोलत आहे. तो त्या उर्वशीशी भांडतो सुद्धा. जॉनी किती उत्कट पणे आपल्या कलेच्या आहारी गेला आहे हे दिग्दर्शक दाखवू इच्छितो पण माझ्या बालमनाला ते गूढ वाटले.

चित्रपटाच्या दुसऱ्या भागांत जॉनी आणि उर्वशीची लोकप्रियता खूप वाढते आणि ते एका डांबिस नेत्याच्या नजरेत भरते. तो भरपूर पैसे देऊन जॉनी ला करारबद्ध करतो. पण ऐनवेळी उर्वशी स्टेजवर बोलण्यास नकार देते आणि शो फ्लॉप होतो. म्हणजे इथे कदाचित जॉनीने अंतर्मन त्याला उर्वशीचा आवाज काढण्यास देत नसावे.
ह्या सर्वांची परिणीती जॉनी आणि नेता ह्यांच्या दुश्मनीत होते. आता इतर कुठल्याही मिथुन चित्रपटांत मिथुन ने आपल्या करंगळीने नेता आणि त्याच्या गुंड मंडळींचे नरडे दाबले असते पण हा तसा चित्रपट नाही.

नेता दंगली घडवून आणतो आणि लोकांचा जीव जातो. जॉनी बाहुलीच्या मार्फत लोकांच्या पुढे सत्य आणू पाहतो आणि त्याचे पर्यवसान मोठया भांडणांत होऊन नेते मंडळींचे गुंड उर्वशीला तोडून फोडून टाकतात. जॉनी त्यामुळे अत्यंत दुःखी होतो आणि त्याची कलाच गायब होते.

पण रोजमेरी त्याला आधार देते आणि ती त्याचा आवाज बनते. चित्रपटाच्या शेवटी रोजमेरी त्याची गुडिया बनते म्हणजे उर्वशीची जागा घेते जी खरे तर तिने आधीच घ्यायला पाहिजे होती. जॉनी आणि रोजमेरी स्टेज परफॉर्मन्स करतात आणि तिथेच चित्रपटाचा अंत होतो.

चित्रपटांत नक्की काय आहे हे पाहिल्याशिवाय समजत नाही. चित्रपट खूप मनोरंजक आहे असे नाही किंवा डेव्हिड लिंच प्रकारे मनावर प्रभाव पाडणारा सुद्धा नाही किंवा स्टॅन्ड बाय मी प्रमाणे अतिशय हृदयद्रावक संवाद आहेत असेही नाही. चित्रपटाची जमेची बाजू म्हणजे मिथुन आणि नंदना ह्यांचा सुरेख आणि उत्कट अभिनय. प्राण आणि मोहन आगाशे ह्यांनी सुद्धा आपल्या भूमिका स्कोप नसताना सुद्धा प्रभावी केल्या आहेत पण लक्षांत राहतो तो म्हणजे मुखर्जी हे पात्र जे जॉनीला आपल्या दुर्बिणीतून तारे दाखवते.

घोष ह्यांचे चित्रपट असेच असतात. तथाकथित कलात्मक वगैरे. त्यांचा दुसरा चित्रपट मी पहिला होता तो म्हणजे नाना पाटेकर आणि रेखा ह्यांचा यात्रा.

तुम्ही गुडिया विनामूल्य youtube वर पाहू शकता. एक चांगला चित्रपट म्हणून पाहण्यापेक्षा मिथुन ह्यांचे चाहते असाल तर त्याच्या साठी पहा.

https://www.youtube.com/watch?v=ekNgdgjJLyA

चित्रपट

प्रतिक्रिया

रोचक कथा वाटल्याने अधिक माहिती बघितली तर तीन गोष्टी दिसल्या.

१. हा चित्रपट महाश्वेता देवी यांच्या एका कथेवर आधारित आहे. (मला मूळ जर्म उगीचच परदेशातील वाटला होता.)
२. हा १९९७ च्या रिलिज वर्षात कान्स चित्रपट महोत्सवात दाखवला गेला होता.
३. याला त्या वर्षी सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

लेख आवडला.

तुषार काळभोर's picture

23 Jun 2023 - 5:29 pm | तुषार काळभोर

या लेखमालेत एखादा तरी भारतीय चित्रपट असेल का असे वाटत होते. पण या लेखात तो आला, आणि तेही मिथुन चक्रवर्ती!
म्हणजे, मिथुन अभिनयाच्या बाबतीत चांगला आहेच. पहिल्याच चित्रपटासाठी त्याला अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळाला होता. ऐंशीच्या दशकात तो सुपरस्टारदेखील होता. इतका, की श्रीदेवी ही तत्कालीन सुपरस्टार त्याच्याशी लग्न करणार होती! डिस्को डान्सर या चित्रपटाने रशियात लोकांना वेड लावले होते! असं सगळं भारी चाललेलं असताना नव्वदीच्या दशकात कदाचित नव्या दिग्दर्शक, नव्या नायक, आणि नव्या प्रेक्षकांसमोर तो कमी पडला असावा. तो उटीला गेला आणि तिथून त्याने मिथुनपटांचा रतीब सुरू केला. ९७-९८ च्याच सुमारास एका वेळी त्याच्या १०-१५ चित्रपटांचं शूटिंग चालू असायचं असं ऐकलंय. दर महिन्याला किमान दोन आणि कधीकधी तीन चित्रपट प्रदर्शित व्हायचे. ते गल्लाही गोळा करायचे. म्हणजे किमान निर्मात्याला मजबूत नफा मिळवून देतील इतपत धंदा असायचा. एकीकडे युरोपात शूटिंग असणारे चित्रपट आणि एकीकडे हे मिथूनपट. तरी नफ्याची शक्यता दुसऱ्या बाबतीत जास्त असावी. अन्यथा इतके चित्रपट बनवले गेले नसते.
मध्यमवर्गीय सुशिक्षित कुटुंबातील पदवीधर ते नक्षली चळवळीतील कार्यकर्ता ते अभिनेता ते सुपरस्टार ते रतीब घालणारा (आणि त्याच रतीबाच्या जोरावर स्वतःच्या हॉटेलचा धंदा पण वाढवणारा) ते पुनरागमन करणारा ते भाजपाचा राज्यसभेतील खासदार... या लेखमालेतील मिथुनच्या चित्रपटाचा समावेश हा त्याच्या आयुष्याएवढाच रोचक आहे!

साहना's picture

24 Jun 2023 - 4:07 am | साहना

बी ग्रेड चित्रपटांच्या अर्थकारणाची माहिती हवी असेल तर ऍमेझॉन प्राईम वरील सिनेमा मरते दम तक हि सिरीज पहा. १०-१५ लाखांचा चित्रपट २०-२५ लाखांचा नफा हमखास मिळवून देत असेल तर असे २० चित्रपट काढून २-३ बिग बजेट चित्रपटांच्या जवळपास नफा मिळवणे शक्य होते. त्याशिवाय बहुतेक शूटिंग इत्यादी सर्व काही मिथुन च्या रिसॉर्ट च्या भागांत होत असे. त्यामुळे ह्या व्हर्टिकल ईंटेग्रेशन मुले मिथुन चा वैयक्तिक नफा जास्त होता.

कांती शाह ह्यांनी बी ग्रेड सिनेमाची वाट लावली. त्यांनी स्वतः पैसा केला तरी सिनेमाच्या रीळ मध्ये अश्लील चित्रपटांचा एक भाग दाखवण्याची पद्धत सुरु केली. हा भाग सेन्सर ला दाखवायचाच नाही पण थेटर मध्ये मात्र हमखास असायचा. त्यामुळे ग्रामीण भागांतील छोट्या थेटर मध्ये फक्त आंबट शौकीन जाऊ लागले त्यामुळे हि बी ग्रेड सिनेमा इंडस्ट्री पूर्णता अश्लील झाली.

तुषार काळभोर's picture

24 Jun 2023 - 7:05 am | तुषार काळभोर

हा शब्दप्रयोग मुद्दाम टाळून मी मिथुनपट हा शब्द वापरला तो त्याचसाठी. कारण B grade हे X आणि XX प्रकारच्या दृष्यांनी भरलेले असतात. क्वचित XXX. अगदी ऐंशीच्या दशकापासून. त्यांची नावेही साधी सोपी असतात. जंगली हसीना, चुडेल का हनिमून, साली की जवानी.
पण हे असं व्हायच्या आधी बी ग्रेड हे लो बजेट, डोक्याला शॉट नसणारे, दे मार चित्रपट असत. आणि वर वर्णन केलेले C grade मानले जात. नंतर नंतर दोन्ही एकत्र झाले. आता b grade सर्च केलं तर फक्त आणि फक्त शकीला आणि रेश्माचे चित्रपट दिसतात.

अवांतर : Grind House ही चित्रपट द्वयी B grade चित्रपटांना वाहिलेली श्रद्धांजली आहे. कॉलेजात असताना हे चित्रपट प्रचंड आवडायचे. पहिला प्लॅनेट ऑफ टेरर मागच्याच आठवड्यात कितव्यांदा तरी पाहिला!

भारतीय बी ग्रेड सिनेमा भारतीय सामान्य समाजमनाचे दर्शन म्हणून मला नेहमीच आवडले होते. पण मी इंग्रजी बी ग्रेड चित्रपटांची खूप मोठी चाहती आहे. मला ते फार आवडतात. बर्ट गमर वाला ग्राबोईड्स संबंधित सिनेमे मला प्रचंड आवडतात, नेटफ्लिक्स ने ह्या सिरीज मधला शेवटचा चित्रपट निर्मित केला.

इपित्तर इतिहासकार's picture

24 Jun 2023 - 7:32 am | इपित्तर इतिहासकार

की मला आठवतो फक्त त्याने जीव ओतून साकारलेलं रामकृष्ण परमहंस ह्यांचं पात्र

images-4

आंद्रे वडापाव's picture

24 Jun 2023 - 8:34 am | आंद्रे वडापाव

m