नर्मदे हर- उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा

राजेंद्र मेहेंदळे's picture
राजेंद्र मेहेंदळे in जनातलं, मनातलं
8 May 2023 - 1:11 pm

मिपा बंद असताना धागा उडल्यामुळे पुन्हा प्रकाशित करत आहे.
======================================================
नमस्कार मंडळी
नर्मदा परिक्रमा या विषयावर भरपूर लेख,पुस्तके वगैरे उपलब्ध आहेत. मला वाटते "नर्मदेच्या तटाकी, & नर्मदे हर! (नर्मदा परिक्रमेचा अनुभवसिद्ध वृत्तान्त - रघुनाथ रामचंद्र गुण्ये )" हे पुस्तक त्यातल्या त्यात जुने असावे. कारण श्री.जगन्नाथ कुंटेंच्या नर्मदे हर पुस्तकातही त्यांनी गुण्यांचे पुस्तक वाचून परिक्रमा केल्याचे लिहिले आहे. मी ते वाचले नाही पण स्वतः कुंटे यांची "नर्मदे हर"/"साधनामस्त"आणि "नित्य निरंजन " तसेच नाशिकच्या भारती ठाकूर यांचे "नर्मदा परिक्रमा -एक अंतर्यात्रा" ही पुस्तके मी वाचली आहेत. ही पुस्तके वाचून मनात नर्मदा परिक्रमेबद्दल बरेच कुतूहल निर्माण झाले होते. बऱ्याचदा ही पुस्तके वाचताना जणू मी प्रत्यक्ष तिकडे नर्मदेच्या तटावर ,किंवा आसपास कुठेतरी फिरतोय असाही भास होत असे.अर्थात पूर्ण परिक्रमा करण्यासाठी लागणारी अध्यात्मिक बैठक, शारीरिक ताकद आणि मुख्य म्हणजे हापिसातून सुट्टी मिळणे हे सगळे एकत्र जमणे कठीण असल्यामुळे मी पुस्तके वाचून दुधाची तहान ताकावर भागवत होतो.

पुढे मिपावर विअर्ड विक्स यांनी नर्मदा परिक्रमेवर लिहिलेला लेख वाचनात आला आणि त्यांच्याकडूनच उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमेबद्दल समजले. शिवाय अशी परिक्रमा आयोजित करणाऱ्या माणसाचा नंबरही मिळाला. हा माझ्यापुरता त्यातल्या त्यात सोपा पर्याय होता. चालायचे अंतरही फार नव्हते (१८ कि.मी.) आणि पैशाचे/सुट्टीचे गणितही जमत होते. त्यामुळे मानाने पुन्हा उचल खाल्ली.टूर आयोजक संतोष शी २-३ वेळा बोलणे झाले आणि त्याला तिकिटापुरते पैसे गूगल पे करून माझी जागा नक्की करून टाकली.

पुढील माहिती विकिपीडिया वरून साभार
=================================
इतिहास
मार्कंडेय ऋषींनी सर्वात प्रथम नर्मदा परिक्रमा केली होती अशी धारणा आहे.मार्कंडेय ऋषींनी श्रीमार्कण्डेय मुनी हे नर्मदा-परिक्रमेचे आद्य प्रवर्तक. त्यांनी सुमारे सात हजार वर्षापूर्वी नर्मदेची परिक्रमा केली. त्या परिक्रमेचे वैशिष्ट्य असे की त्यांनी नर्मदेचीच नव्हे तर तिच्या उभय तटांवर तिला येऊन मिळणाऱ्या सुमारे ९९९ नद्यांचे धारा-प्रवाह न ओलांडता प्रत्येकीच्या उगमाला वळसा घालून मार्गक्रमण केले. अश्या पूर्णतः शास्त्रोक्त महापरिक्रमेला त्यांना ४५ वर्षे लागली. स्कंदपुराणात नर्मदेचे वर्णन आले आहे असे म्हणतात. पायी केल्यास ही यात्रा ३ वर्षे ३ महिने आणि तेरा दिवसात पूर्ण होते असा समज आहे. यासाठी एकूण २६०० किलोमीटर अंतर पायी चालावे लागते.

उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा
नर्मदा परिक्रमा हे प्रसिद्ध धार्मिक व्रत आहे. तरी उत्तरावाहिनी नर्मदा परिक्रमेबद्दल फारच अल्प माहिती सापडते. तिलकवाडा (गुजरात) येथे नर्मदा नदी उत्तरावाहिनी होते आणि पुढे रामपुरापर्यंत ती उत्तरावाहिनी राहते आणि नंतर तिचा प्रवाह पूर्ववत होतो. तिलकवाडा-रामपुरा-तिलकवाडा या २१ किलोमीटरच्या टप्प्यावर नर्मदेच्या तीरावरून केल्या जाणाऱ्या परिक्रमेला उत्तरावाहिनी नर्मदापरिक्रमा म्हणतात. ज्यांना संपूर्ण परिक्रमा करणे शक्य नाही असे भाविक उत्तरावाहिनी प्रदक्षिणा करतात. तिलकवाडा ते रामपुरा या परिसरात फक्त चैत्र महिन्यात ही उत्तरवाहिनी परिक्रमा केली जाते. जो कुणी चैत्र महिन्यात उत्तरवाहिनी नर्मदा परिक्रमा करेल, त्याला संपूर्ण नर्मदा परिक्रमा केल्याचे पुण्य मिळेल, असे नर्मदा पुराणामध्ये व स्कंद पुराणामध्ये म्हटले आहे.

ही परिक्रमा तिलकवाडा येथून उत्तर तटावरून सुरू होते, उत्तर तट संपल्यावर नावेने समोरील तीरावर म्हणजे दक्षिण तट रामपुरा येथे यावे लागते. येथे आल्यावर प्रथम घाटावर स्नान करून तेथील नर्मदामैयाचे जल घेऊन घाटावरील तीर्थेश्‍वर महादेव मंदिरात शंकराच्या पिंडीवर अर्पण करून दक्षिण तटावरून परिक्रमा चालू होते. दक्षिणतट पूर्ण झाल्यावर नावेने पुन्हा उत्तर तटावर आल्यावर स्नान करून परिक्रमेची समाप्ती होते. परिक्रमा मार्गात छोट्या गावातून जाताना काही मंदिरे, आश्रम लागतात. जागोजागी नर्मदे हर...नर्मदे हर... असे म्हणून स्वागत होते. गावातील काही मंडळी परिक्रमावासींसाठी थंड पाणी, सरबत, चहा, फळे किंवा छास अशी सेवा देतात. परिक्रमा मार्गातील उत्तरतट रस्ता म्हणजे गावातून जाणारा, तसेच किनाऱ्यावरून जाणारा आहे. काही ठिकाणी वाट बिकट आहे. पण कसलाही त्रास न होता वाटसरू आरामात उतर तट पार करतो. या उलट दक्षिण तट मार्ग हा बहुतांशी डांबरी सडक आहे. दक्षिण तटावरील रामपुरा घाटावर तीर्थेश्‍वर महादेव मंदिर आहे. येथे राधागिरी माताजी परिक्रमावासींची बालभोग म्हणजे नाश्‍ता व भोजनाची व्यवस्था करतात. येथे बालभोग घेऊन पुढे वाटचाल सुरू राहते. वाटेत मांगरोल नावाचे एक छोटे गाव लागते. गावातील लोक मिळून परिक्रमावासींची सेवा करतात. येथे मोठ्या मंडपात परिक्रमावासींच्या विश्रामासाठी व्यवस्था केली जाते. या मंडळाचे नाव आहे विसाओ मांगरोल मंडल. मंडळाचे कार्यकर्ते फार सेवाभावी आहेत. तिथून पुढे लागतो तपोवन आश्रम. या आश्रमामध्ये परिक्रमावासींसाठी छाश सेवा (ताक) देतात आणि त्या पुढे सर्वांत शेवटी लागतो, श्रीसीताराम बाबांचा आश्रम. आश्रमाचा परिसर फार सुंदर व रमणीय आहे. आश्रमातून समोरच मैयाचे दर्शन होते. येथे दुपारचा भोजनप्रसाद घेऊन विश्राम करून वाटसरूची दक्षिणतट परिक्रमा संपते.
===================================
तर शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून लॉगिन करून सकाळच्या सगळ्या मीटिंग आणि ईमेल्स वगैरे वगैरे आटोपल्या आणि २ च्या सुमारास आउट ऑफ ऑफिसचा फ्लॅग लावून टाकला.जेवून थोडा आराम केला आणि संध्याकाळच्या इंटरसिटीने निघालो. खूप वर्षांनी पुण्याहून मुंबईला जाण्यासाठी ट्रेनमध्ये बसलो होतो.गाडी सुरु झाली आणि जुने दिवस आठवले. पहिल्या नोकरीमध्ये जवळपास दर आठवड्याला पुण्याला फेरी व्हायचीच. सकाळी धावत पळत इंद्रायणी पकडायची, गाडीतच किंवा शिवाजीनगरला उतरून जे एम रोडवर पांचाली वगैरे कुठेतरी नाश्ता करायचा. मग ओळीने क्लायंट्स ना भेटायचे. त्यावेळी जुन्या मुंबई पुणे रस्त्यावर बरेच क्लायंट्स होते आणि तिथे वडाप किंवा विक्रम रिक्षा चालायच्या. त्यामुळे ५-१० रुपयात हॉपिंग करत शिवाजीनगर ते पिंप्री-चिंचवड फिरायचे आणि संध्याकाळी ३.३० ची डेक्कन एक्स्प्रेस ते ६ ची इंद्रायणी (तेव्हा इंटरसिटी नव्हती) यादरम्यान कुठलीतरी गाडी पकडून परतायचे. तेव्हा माहित नव्हते की पुढे हीच आपली कर्मभूमी असणार आहे. :) असो. आज निवांत खिडकीबाहेर बघत असताना ते सगळे दिवस डोळ्यासमोरून सरकू लागले. विचार करता करता गाडी दादरला कधी पोचली समजलेच नाही. बाहेर पडून पोटपूजा केली आणि दादर पश्चिमेला फलाट क्रमांक ५ वर पोचलो. तोवर परीक्रमेसाठी बनवलेल्या कायप्पा ग्रुपवर मेसेज चालू झाले, आम्ही पोचलो, आम्ही इथे आहोत, आम्ही येतोय वगैरे वगैरे. यथावकाश दादर एकतानगर गाडी फलाटाला लागली आणि आम्ही आपापल्या डब्यात स्थानापन्न झालो.टूर मॅनेजर संतोष सगळीकडे फिरून लोकांना भेटून ट्रीपच्या प्रवाशांची यादी तपासून गेला. बोरिवली आणि वडोदरा येथे प्रवासी चढ उतार करताना झालेली चाव चाव वगळता रात्रभर मस्त झोप झाली. सकाळी गाडी थोडी उशिराने एकतानगराला पोचली.सुंदर नवीनच बांधलेले स्टेशन.
b
ऊन वर आले होते. स्टेशनवरून बाहेर पडताना सुखद धक्का बसावा तसे झाले. समोर सरदार पटेलांचा पुतळा ,छान कारंजे ,मोठा रस्ता, २-३ पेट्रोल पम्प, नवीन झालेली हॉटेल्स , स्टॅच्यू ऑफ युनिटी ला नेणारी फेरी बस लागलेली असा माहोल होता.

b

संतोषने आमच्या ३०-३२ जणांच्या ग्रुपसाठी ३ जीप केल्या असल्याने सरळ तिकडेच गेलो. सगळ्यांना एकाच रंगाच्या टोप्या दिलेल्या असल्याने माणसे ओळखायला सोपे जात होते.

१५-२० मिनिटात गरुडेश्वर गावात पोचलो.गाव छोटे असल्याने सगळ्या लोकांची सोय वेगवेगळ्या ठिकाणी केली होती.आमची राहायची सोय एका होम स्ट मध्ये केलेली होती.सकाळची आन्हिके आटोपून नाश्ता करून १० वाजता स्थळ दर्शनासाठी निघालो. मैलोन मेल पसरलेली सपाट जमीन आणि कापूस,भुईमुगासारखी पिके साथ करू लागली. क्वचित कुठे ऊस.

प्रथम कुबेर मंदिर पाहिले.तिथे एक पुजारी १० -१० रुपयाला एक पुडी विकत होता.त्यात १ रुपया, तांदूळ व सुपारी होते, जे तुम्ही घरात ठेवले तर बरकत येते. गंमतीचा भाग म्हणून एक घेतली.मंदिराजवळ एक काचेची पेटी होती ज्यात कुबेराची अनेक पागोटी ठेवली होती. एकेक पागोटे मीटरभर व्यासाचे असेल.

b

प्रसाद भोजन करून बाकीच्या लोकांची वाट बघत होतो. तोच मंदिराच्या मागच्या बाजूला माईचे विस्तीर्ण पात्र दिसले. ऊन कडक होते, पण तिची धूळभेट घ्यावी म्हणून घाट उतरून खाली गेलो. उन्हाचे चटके बसत होते, किनाऱ्यावरचे नावाडी पलीकडे जाणार का म्हणू विचारू लागले. पण मला कुठेही जायचे नव्हते. वाळूचे चटके सहन करत घोटाभर पाण्यात उतरलो. माझ्याकडे येतानाच एक कामगिरी होती. घराच्या पंचायतनामधील गणपती हरवला होता, त्यामुळे नर्मदेतील लाल खडा आणायचा होता.खरेतर ट्रीपला यायचा तोही एक हेतू होताच.शोधाशोध करत असताना अजून काही माणसे दगड गोळा करताना दिसली. मला इतर छान छान दगड मिळत होते, पण पाहिजे तो लाल खडा मिळेना. शोध घेता घेता त्यातील एकजण जवळ आला आणि विचारू लागला, की काय शोधतोयस? त्याला लाल खडा पाहिजे म्हणून सांगितले. दोन मिनिटात त्याने २-३ लाल खडे शोधले आणि मला दिले.

b

मला इतका आनंद झाला की बस. त्याचे आभार मानले आणि त्याला सांगितले की हा नर्मदेतील गणपती स्वयंभू असतो, त्याची प्रतिष्ठापना करावी लागत नाही. माझ्याकडचा बाप्पा निर्माल्यात कुठेतरी हरवला म्हणून हा नेतोय. त्यावर त्यानेही आपल्या देवात ठेवायला एक खडा घेतला. तोवर इतर लोकांचे जेवण झाले असल्याने माझ्या नावाने शंख व्हायच्या आत पटापट परतलो.

पुढचा कार्यक्रम अनुसूया माता मंदिर. श्री दत्तात्रयांची आई अनुसूया हिचे माहेर स्थान. सुंदर देऊळ, मूर्ती , स्थान माहात्म्य सांगणारे गुरुजी आणि त्यात महिला मंडळाने केलेली आरती असा मस्त माहोल जमून आला. पुढे अनुसूयेची बहीण सौंदर्य सुंदरी मंदिर, श्री रंगावधूत यांचे स्थान नारेश्वर , मग हनुमंतेश्वर , मग शनी आणि पनवती मंदिर आणि शेवटी शूलपानीश्वर असे करून आणि रस्त्याने परत जाताना लांबूनच स्टॅच्यू ऑफ युनिटीचे दर्शन घेत गरुडेश्वरला परतलो.
b

b

b

b

b

b

पनवती मंदिर संकुलात बरीच मंदिरे आहेत. जगन्नाथ कुंट्यांच्या पुस्तकात उल्लेख केलेले साधू चंदुलाल महाराज सोमण यांचे चिरंजीव तेथील श्री यंत्र मंदिरात पुजारी म्हणून बसले होते. पुस्तकात वाचलेले ठिकाण प्रत्यक्ष बघताना मस्त वाटत होते.पुढे होऊन त्यांची ओळख करून घेतली. अतिशय विद्वान आणि नम्र माणूस. काही मिनिटांच्या गप्पांमध्ये त्यांनी संस्कृत ,मराठी,इंग्लिश मध्ये इतके काही सांगितले की "घेता किती घेशील दो कराने " अशी माझी अवस्था झाली. या गप्पांबद्दल पुन्हा कधीतरी. येथील स्वामी समर्थांच्या पादुकांची विशेष वाटल्या. ज्यांच्या पादुका जवळपास फूटभर लांब त्यांची उंची किती असेल? असा विचार मनात आला. सर्व परिसरात काळतोंडी माकडे खूप होती. पण कोणाला त्रास देत नव्हती.मागच्या बाजूला १०० मीटर खाली मैयाचे चमकणारे विस्तीर्ण पात्र,मावळणारा सूर्य आणि मंदिर संकुलातले ते गूढ वातावरण मनात घर करून राहिले.

अंधारु लागले आणि दमलेले लोक आपापल्या जीप्स मध्ये बसून हॉटेलवर परतले. आज रात्री लवकर जेऊन झोपायचे होते कारण पहाटे ३ वाजता परिक्रमा सुरु करायची होती.जेवण करून घरी फोन करायला गच्चीवर गेलो कारण खाली रेंज मिळत नव्हती. वर आकाश ताऱ्यांनी गच्च भरलेले. बाजूला कैऱ्या लगडलेले आंब्याचे झाड,उंबराची फळे आणि वातावरणात एक मंद सुवास भरलेला. आजचा दिवस खरा भाकड दिवस असेल असे वाटले होते , कारण मैयाची परिक्रमा तर अजून सुरूच झाली नव्हती. पण आजच्या दिवसाने बरेच काही पदरात टाकले होते. विशेष करून दुपारी मिळालेला लाल खडा आणि संध्याकाळी श्रीयंत्र मंदिरातल्या गप्पा.

इथे रोज राहणाऱ्या लोकांनाही असे काही जाणवत असेल का? की मी आज रिकामटेकडा आहे म्हणून डोक्यात काय काय कल्पना येताहेत?काही समजेना. शेवटी थकलेल्या अवस्थेत खोलीत झोपायला गेलो. पण दिवसभर गच्ची तापल्याने खोली गरम झाली होती, त्यामुळे खूप उकडत होते. रात्रभर नीट झोप अशी लागलीच नाही. शेवटी २ वाजता उठलोच. अंघोळी उरकल्या.यजमानांकडे सामसूम होती.चहा मिळेल की नाही असे वाटत असतानाच किटली घेऊन आयोजक अंधारातून कुठूनतरी आले आणि फक्कड चहा पाजला. त्यामुळे तरतरी आली. वातावरणात थंडावा असला तरी दिवसभर आग ओकणारा सूर्य थोडी धग मागे ठेवून गेला होता. निघू निघू करता करता ३.३० झाले.
b
नर्मदा मंदिरात संकल्प केला आणि जीप निघाल्या.
b
सुरुवात रणछोडदास मंदिरापासून करायची होती. काही वेळ चालून मग जीपमध्ये बसायची सोय आहे असे संतोष म्हणाला होता. पण एक घोटाळा झाला.रणछोडदास मंदिराकडे जायच्या रस्त्यावर पोलीस वाट अडवून उभे होते. काय झाले होते माहित नाही, पण सगळ्या जीपवाल्याना त्यांनी तिकडून जायला मनाई केली आणि मणी नागेश्वरला जायला सांगितले. त्यामुळे प्लॅन बदलला. ज्यांना थोडे पायी आणि मग जीपने जायचे होते त्या ऐवजी पूर्ण जीपने जावे लागणार होते. त्यामुळे त्यात थोडा वेळ गेला. शेवटी एकदाचे आम्ही मणी नागेश्वरला पोचलो आणि चालायला सुरुवात केली.
d
शंकराचे दर्शन घेऊन पुढे गेलो. इथे तर जत्रा भरली होती. पहाटेचे ४ वाजले आहेत असे वाटतच नव्हते. नर्मदे हर--माताजी चाय लेलो,पोहा लेलो, खिचडी खाओ, ढोकळा लेलो, लस्सी पीओ अशी विनंती करणारे ग्रुप्स जागोजागी उभे होते. खाणारे जणू त्यांच्यावर उपकार करत होते अशा थाटात सगळे चालले होते. दार थोड्या वेळाने नवीन काहीतरी खात पिट लोक चालत होते. एका ठिकाणी तर मजाच झाली. कोणीएक कार्यकर्ता माइकवरून घोषणा करून सगळ्यांना खायला बोलावत होता. मग कोणाच्यातरी डोक्यात आले आणि त्याने स्पीकरवर गरब्याची धून लावली. पहिले २ मग ४ असे करता करता पन्नासेक लोक गोल करून गरबा खेळू लागले.बाकीचे त्यांचे फोटो आणि व्हिडीओ काढण्यात गुंग झाले. हे गुजराती लोक फारच उत्सवप्रेमी बुवा असे म्हणता म्हणता आमच्यातलेही काही लोक त्यांना सामील झाले. एकुणातच मजा मजा चालू होती. आपण परिक्रमेला आलोय की खादाडी करायला हेच समजेना. भल्या पहाटे आणि तेही फुकट एव्हढ्या सगळ्या गोष्टी वाटणारे लोक बहुतेक डोक्यावर पडलेले असावेत असा विचार मनात येऊन गेला.पण लोक तर चांगले शहाणे दिसत होते. रात्रीपासून मोठमोठी पातेली लावून पदार्थ शिजवून आग्रहाने लोकांना खिलवण्यात त्यांना काहीतरी मिळत असणार खास. पण काय मिळत असणार ते माझ्या शहरी बुद्धीला झेपेना. शेवटी डोक्याला जास्त ताण न देता नर्मदे हर म्हणून तिथून पुढे झालो.
c
आता उजाडू लागले होते. पायाखालचा रस्ता दिसू लागला होता.
d

वाटेत वासुदेव आश्रम लागला. इथे एक थांबा घेतला. मठातील मुख्य स्वामींचे दर्शन घेतले.
c

अनेक परिक्रमावासी तिथे मुक्कामाला होते. पुढे निघालो. आता रस्ता अगदी मैयाच्या काठाने जात होता.
d

पण पाण्यात मगरी असल्याने उतरायला बंदी होती. लहानथोर सगळेच कुठल्यातरी ओढीने पुढे पुढे चालले होते. कोणी उड्या मारत , कोणी काठी टेकत, कोणी लंगडत, तर कोणी आधार घेत, पण चालत होते. ऐतरीय उपनिषदातील "चरैवेति चरैवेति" मनात रुंजी घालू लागले.
c

गप्पांच्या नादात चालता चालता आमचे टूर मॅनेजर संतोष यांच्याबरोबर चालू लागलो. हि ट्रिप सोडून अजून कुठल्या ट्रिप करता? पुर्ण वेळ हेच काम करता का?काय काय अनुभव आले ? असे एक एक करता करता संतोष ही एक "पहुँची हुई व्यक्ती" आहे हे लक्षात येत गेले. त्याचा इथवरचा प्रवास तुंगारेश्वर,गिरनार,माहूर गड,नर्मदा परिक्रमा,गांजा,गुरुकृपा,अनुग्रह,साधना अशा वेगवेगळ्या स्टेशनांवरून झालाय हे लक्षात येत गेले. गप्पा ट्रॅक सोडून कुठेही धावत होत्या. वाटेत फोन घेणे, करणे, लोकांना मदत करणे हे चालूच होते. त्यामुळे मध्येच गिरनार, तर मध्येच रेल्वे बुकिंग, मग माहूर गड, लगेच कोणालातरी पैसे ऍडव्हान्स देणे , मग गांजाची नी लगेच कुठले ब्लु टूथ चांगले आहे याची चर्चा असे वाट्टेल ते चालले होते. एकुणातच २-३ तास कसे गेले कळलेच नाही.
a

बघता बघता मैया पार करायला होडी घेण्याची जागा आली. चार दिवसात चैत्र संपणार आणि उत्तरवाहिनी परिक्रमाही. आज चैत्रातील शेवटचा रविवार असल्याने तुडुंब गर्दी होती.

d

इथे २ तास गेले. त्यातील होडीमध्ये फक्त १० मिनिटे आणि बाकी नुसतेच वाट बघण्यात. रणरणत्या उन्हात दक्षिण तटाला पोचलो.
c
a
इथे अर्धे अधिक लोक जीपमध्ये बसले.उरलेली मंडळी चालू लागली.वाटेत जिथे तिथे पुन्हा ताक लस्सी खिचडी वगैरे होतेच. तपोवन आश्रम इथे तर आईस्क्रीम वाटत होते. अरे देवा, लाड लाड म्हणजे किती?

आता शेवटचा टप्पा सीताराम आश्रम. छान दाट झाडीमध्ये विसावलो. तिथले सेवक सर्वांना जेवायचा आग्रह करत होतेच, पण फक्त ताक पिऊन निघालो आणि मैयाच्या किनाऱ्यावर उतरलो. दुपारचा १ वाजला होता. ऊन इतके तापले होते की कोरड्या पडलेल्या पात्रात धुळीचे भोवरे तयार होत होते. मानेची हाताची त्वचा भाजत होती. वाटेतील छोट्या पुलावरून मैयापार केली आणि एक मोठा चढ चढून परिक्रमा संपवली.
d
=========================
अवांतर - जेवून खोलीवर येऊन थोडा आराम केला आणि संध्याकाळी गावातलेच गरुडेश्वर मंदिर आणि आश्रम बघायला गेलो. नदीच्या काठावरील दत्तगुरूंचे सुंदर मंदिर आणि पू. टेंबेस्वामींच्या वास्तव्याने पावन झालेली वास्तू.
b
नेमके तिथे गेलो आणि आरती सुरु झाली. वातावरणात काहीतरी अगोचर ,अद्भुत भरून राहिले. आरती घेतली आणि नदीकाठावर गेलो. माईच्या आरतीची तयारी चालू होती. अंधार पडत होता. पलीकडच्या किनाऱ्यावर दूर स्टॅच्यू ऑफ युनिटी दिसत होता तर इथे नुकतेच बांधलेले धरण आणि त्यामुळे कोरडे पडलेले नदीपात्र होते.
b
एक दोन दाढ्या जटा वाढवलेले साधू बसले होते. त्यांच्या सोबत सेल्फी घेण्याचा मोह झाला पण आवरला. जड मनाने माईचा निरोप घेतला आणि पायऱ्या चढून वर खोलीवर आलो. चला , ओळख तर झाली. आता पुढची भेट कधी?

धोरणविचार

प्रतिक्रिया

गोरगावलेकर's picture

8 May 2023 - 3:00 pm | गोरगावलेकर

लेख आधीही वाचला होता पण प्रतिक्रिया देण्या आधीच मिपा बंद झाले होते. नर्मदा परिक्रमेवर जास्त काही वाचलेले नाही. खूप चांगली माहिती मिळाली.

मुक्त विहारि's picture

8 May 2023 - 5:59 pm | मुक्त विहारि

वाखूसा

मी नर्मदा परिक्रमेचा सगळ्यात जुना उल्लेख वाचला होता तो म्हणजे श्री बिडकर महाराज यांचे चरित्रात. त्यांनी १८७८ च्या दरम्यान परिक्रमा केली होती. अक्कलकोट स्वामी समर्थ यांचे शिष्य असलेल्या बिडकर महाराजांनी गुर्वाज्ञेवरून परिक्रमा केली होती. श्री स्वामी समर्थ यांनी देह ठेवल्याची बातमी त्यांना परिक्रमा करित असताना कळली होती असा उल्लेख येतो.

कंजूस's picture

8 May 2023 - 7:27 pm | कंजूस

नर्मदा एकदाच पाहिली आहे. (ओंकारेश्वर,माहेश्वर,मांडू सहलीत तीन ठिकाणी.) पाणी स्वच्छ वाटतेय.
ओंकारेश्वरला डब्यात पाणी घेऊन घाटावर आंघोळ (हाफफ्राइ) केली.

मनिम्याऊ's picture

12 May 2023 - 1:53 pm | मनिम्याऊ

वरून 8 वा फोटो ज्यात कमानी मधून पायऱ्या आणि खाली मैय्या दिसते आहे तो नेमका कोणत्या जागेचा? काही विशेष अनुभव निगडित आहेत म्हणून विचारलं

राजेंद्र मेहेंदळे's picture

12 May 2023 - 3:00 pm | राजेंद्र मेहेंदळे

हनुमंतेश्वर मंदीराच्या मागचा आहे. विशेष अनुभव काही नाही. सहज अँगल आवडला म्हणुन घेतला. नदीत पोहायला जायची ईच्छा होती पण वेळ झाला नाही ईथे, हाच अनुभव.

मनिम्याऊ's picture

12 May 2023 - 3:08 pm | मनिम्याऊ

अहो माझे काही विशेष अनुभव निगडित आहेत असे म्हणायचे होते पण एक्झॅक्ट जागा लक्षात येत न्हवती.

राजेंद्र मेहेंदळे's picture

12 May 2023 - 8:27 pm | राजेंद्र मेहेंदळे

येउंदेत की म ईथे

मनिम्याऊ's picture

13 May 2023 - 9:33 am | मनिम्याऊ

या जागी मला मैय्याच्या साक्षात स्वरूपात असण्याची प्रचिती आली. पण हे अगदीच व्यक्तीसापेक्ष वैयक्तिक झाले.
तो अनुभव इथे पब्लिक फोरम वर सांगणं म्हणजे उगीच टीका ओढवून घेणं होईल. अंधश्रद्धा n all...

लोक्स काही केले तरी बोलतातच. फाट्यावर मारा. तुमचे अनुभव मांडा.

मनिम्याऊ's picture

17 May 2023 - 10:10 pm | मनिम्याऊ

त्या पायऱ्या किनाऱ्याजवळ संपतात ना तिथे एक मोठे झाड आहे त्या झाडाखाली मावळत्या दुपारी उबदार उन्हात एक मध्यमवयीन काळी सावळी स्त्री बसलेली होती. अंगावर निळी नऊवारी साडी आणि ठसठशीत गोल कुंकु. अंगाने धिप्पाड. कोणाशी बोलत न्हवती आणि कोणी तिची दखल देखील घेत न्हवते.
मला मात्र तिने जवळ तिने बोलावले. साखर फुटाणे खायला दिले. त्या दिवसांत माझी मनस्थिती जरा डिस्टर्ब होती. त्या स्त्रीने काहीच पूर्व ओळख नसताना स्वतःहून सांगितले की "काळजी करू नकोस, सर्व ठीक होईल" व माझ्या चिंतेवर उपाय देखील सांगितला.
मला आश्चर्य की ही गावाकडची नऊवारी लुगडे नेसलेली मराठी बाई एकटीच इथे काय करतेय आणि ओळखदेख नसतांना माझी चिंता हिला कशी कळली?
मी तिला वाकून नमस्कार केला आणि ती उठून उभी राहिली. प्रचंड म्हणजे प्रचंड धिप्पाड होती. मी जेमतेम तिच्या छातीपर्यंत येत होते. ( मी स्वत ५'४" आहे). माझ्या डोक्यावर हात धरला प्रत्यक्ष स्पर्श नाही केला आणि बोलली "भेटू पुन्हा. विसरू नकोस माझं नाव 'नर्मदा'". आणि किनाऱ्याकडे निघून गेली.
मी स्तब्ध. हातात साखर फुटाणे तसेच. माझा नवरा मला शोधत तिथवर पोचला होता. त्याला घडलेलं सांगितलं. दोघांनी धावत पळत किनाऱ्याकडे जाऊन बघितलं. ती दिसली नाही.
(तुमच्या लेखातला फोटो बघितला. तीच जागा. म्हणून विचारलं तुम्हाला काही विशेष अनुभव आला का? )
नर्मदे हर!

शाम भागवत's picture

17 May 2023 - 11:01 pm | शाम भागवत

🙏

राजेंद्र मेहेंदळे's picture

18 May 2023 - 3:10 pm | राजेंद्र मेहेंदळे

नर्मदा अष्टक

हे म्हणता का? छान टंग ट्विस्टर आहे, पण होईल पाठ. तेव्हढीच रोज माईची आठवण.

प्रकाश घाटपांडे's picture

21 May 2023 - 11:21 am | प्रकाश घाटपांडे

माझा अनुभव
१)
ताथवडे उद्यानात मी कधी कधी संध्याकाळी करोनापुर्व काळात जायचो. त्या दिवशी तिथे जवळ मोटरसायकल लावली व जरा लवकर झाल्याने टंगळ मंगळ करत चालत होतो. तिथे टॆंकर जवळ एक भिकारी म्हातारी बसली होती. मी तंद्रीत तिथून चालत गेलो. एकदम मनात आले की त्या म्हातारीला काहीतरी दिले पाहिजे. आपल्या आईच्या वयाची आहे. मग मागे आलो पाहिले तर म्हातारी गायब. अरे इतक्यात कुठे गायब झाली. फुगेवालीला विचारल ती म्हणली गेली. झपाझप चालत आजूबाजूला पाहिले. दिसली नाही. विचार केला एवढी जक्ख म्हातारी चालून चालून किती लांब जाणार? गाडी काढली व आजूबाजूला गेलो तिचा पत्ता लागला नाही. अस्वस्थ झालो. नंतर सात आठ दिवस त्याच वेळी तिथे येउन म्हातारी दिसते का हे पहात राहिलो. म्हातारी परत दिसलीच नाही विषय डोक्यात असाच रेंगाळत राहिला.
२)
सकाळी चालायला जातो डहाणूकर कॊलनी ते गांधीभवन वरुन पुढे गोपीनाथनगर. तिथे द्त्ताच देउळ आहे. पुढे टेकडीचा पायथा व डेड एंड आहे. भुभु लोक असतात तिथे. माझी बहिण जवळच राहते. ती पण येते कधी कधी दिसते. त्या दिवशी टेकडीच्या पायथ्याशी दिसली. मी विचार केला जरा भुभु मंडळींशी दोन मिनिट खेळून जावे भेटायला. नंतर गेलो तर बहिण गायब. अरे आता इथे होती. मग झपाझप पावले उचलली द्त्तमंदीरात पाहिले दिसली नाही. पुढे परतीच्या वाटेवर वेगाने जात राहिलो. दिसली नाहि. परत मागे येउन पाहिले नाहीच कुठे? अरे दोन मिनिटात कशी गायब झाली. कालावधी व वेग याची तुलना करत मी परिसर पिंजला होता. अरे त्या म्हातारी सारखी गायब! मग घरी आलो. बहिणीला फोन लावला. ती म्हणाली मी थेट नेहमीच्या रस्त्याने घरीच आले. मग मी निष्कर्ष काढला की माझ्या मेंदुत time & space चे गणित काहीतरी चुकले असावे. आपल्या अंदाजापेक्षा मेंदुत वेगळेच काहीतरी गणित झाले असावे. ती दोन मिनिटे प्रत्यक्षात जास्त असणार आहेत.

विअर्ड विक्स's picture

22 May 2023 - 1:43 pm | विअर्ड विक्स

नर्मदे हर !!!! नशीबवान नि पुण्यवान आहात .

मूकवाचक's picture

25 May 2023 - 11:17 am | मूकवाचक

+१

श्रीगणेशा's picture

12 May 2023 - 5:48 pm | श्रीगणेशा

फोटो आणि प्रवासवर्णन, छान!

विअर्ड विक्स's picture

12 May 2023 - 6:46 pm | विअर्ड विक्स

नर्मदे हर !!
परिक्रमेला जाऊन आलात हे वाचून आनंद झाला .
आता जाऊन आला आहात तर पुढचे पाऊल - खंड परिक्रमा करा . दरवर्षी थोडे अंतर, पुढल्या खेपेस तेथून पुढे अशा प्रकारे सुद्धा परिक्रमा करता येते .
सत्पुषांबरोबरचे अनुभव कथनाची वाट पाहतोय.

पुढे मिपावर विअर्ड विक्स यांनी नर्मदा परिक्रमेवर लिहिलेला लेख वाचनात आला - मला सापद्ला नाही

विअर्ड विक्स's picture

22 May 2023 - 1:41 pm | विअर्ड विक्स
इपित्तर इतिहासकार's picture

26 May 2023 - 10:06 am | इपित्तर इतिहासकार

दुधाची तहान ताकावर भागवली म्हणता पण लेखन फारच उस्फुर्त अन् ओघवते आहे हे म्हणायला हवेच. फारच सुंदर वर्णन, प्रकाशचित्रे व भाव आहे.

आवडले.

पुढील लेखनास शुभेच्छा.

राजेंद्र मेहेंदळे's picture

1 Jun 2023 - 11:57 am | राजेंद्र मेहेंदळे

धन्यवाद!!

मनिम्याऊ's picture

28 May 2023 - 7:11 pm | मनिम्याऊ

तुमचा लेख वाचून आठवणी जाग्या झाल्या आणि मैय्याच्या दर्शनाची अनिवार ओढ लागली. म्हणून मग दि. 25may 2023 रोजी जबलपूर येथे जाऊन मैय्याचे दर्शन घेतले. ग्वारीघाटापासून सुमारे 300मीटर आत प्रवाहाच्या मध्ये मैय्याचे छोटेखानी संगमरवरी मंदिर आहे. नावेतून जाऊन दर्शन घेतले. मैय्याला साडी व ओटी अर्पण केली. दुपारी १२ ची वेळ. अतिशय गरम वातावरण असूनही मंदिरात त्यामानाने गारवा होता. नंतर
जवळच भेडाघाट येथे जाऊन धुवांधार waterfall बघितला.
एकंदरीतच छान छोटीशी भेट घडली.
तुमच्या लेखामुळे हे घडून आले.
नर्मदे हर!

राजेंद्र मेहेंदळे's picture

1 Jun 2023 - 11:57 am | राजेंद्र मेहेंदळे

छानच की!!

MipaPremiYogesh's picture

2 Jun 2023 - 6:51 pm | MipaPremiYogesh

खूपच सुंदर लेख आणि अनुभव. मस्त वाटले वाचून. नर्मदे हर आणि साधनामस्त बऱ्याच वेळेला वाचले असल्याने रिलेट करता आले.

अहिरावण's picture

20 Mar 2024 - 10:20 am | अहिरावण

भारी !

अहिरावण's picture

21 Mar 2024 - 7:14 pm | अहिरावण

ऐन चैत्रात करण्यापेक्षा नोव्हे डिसेंमधे जास्त मजा येईल का? उन्हात तापून घेण्यापेक्षा मस्त थंडीत धुक्यात फिरायला जास्त मजा येईल का?

राजेंद्र मेहेंदळे's picture

21 Mar 2024 - 9:55 pm | राजेंद्र मेहेंदळे

चैत्रातील उत्तरावाहीनी परीक्रमेला धार्मिक महत्व आहे. नुसतेच फिरायचे असेल तर कधीही करता येईल.

अहिरावण's picture

22 Mar 2024 - 7:50 am | अहिरावण

हं. धार्मिक लाभ कुठल्यातरी पुराणात लिहिले आहेत म्हणून मानले जात असावे.
हरकत नाही.