जनोबा रेग्याचे वंशज!

kool.amol's picture
kool.amol in जनातलं, मनातलं
13 Apr 2023 - 5:20 pm

जर तुम्ही पू लं चे चाहते असाल तर जनोबा रेगे हा इसम/व्यक्तिरेखा तुम्हाला माहिती नाही असे होणे शक्य नाही. बटाट्याच्या चाळीतला एक अफलातून विनोद बुद्धी असणारी ही व्यक्ती. चाळीत खर म्हणजे एकापेक्षा एक नमुने आहेत, पण ह्याची बात काही औरच. ह्या व्यक्तिरेखेची 2 ठळक वैशिष्ट्ये, अत्यंत मोजक्या शब्दात विनोद निर्मिती आणि अफलातून म्हणावी अशी टायमिंग. एखादा अत्यंत महत्वाचा प्रसंग आहे त्यात सगळे गंभीरतेने चर्चा करत आहेत आणि अशा वेळी अचानकच असं काहीतरी ही व्यक्ती बोलून जाते की त्या प्रसंगाच गांभीर्य समूळ नष्ट होऊन जातं आणि चालू असणारी गोष्ट खरोखरच गांभीर्याने घ्यायची गरज आहे का असा प्रश्न निर्माण होतो. गच्चीसह झालीच पाहिजे ह्यात आचार्य बाबा बर्वे हे भाषण करत असताना मूळ मुद्द्यावर न येता बाकीची बडबड करत असताना, "अरे पण गच्चीच काय? हे काय बोलता?" हा प्रश्न अख्ख्या चाळीत फक्त जनोबाच विचारू शकतो किंवा पंत वजन कमी करण्यासाठी उपोषण चालू करतात तेव्हा सगळी चाळ त्यांना सल्ले द्यायला उलटते तो प्रसंग. आलेला प्रत्येक जण काहीच्या काही सल्ले देतोय त्यात बटाटा सोड असा सल्ला आल्यावर, "कोणी कुठं राहतोस असं विचारलं तर नुसतच चाळीत राहतो म्हण, बटाट्याची म्हणशील तर वजन वाढेल" अशी सामान्य भाषेत ज्याला कुजकट म्हणतात ती कमेंट सुद्धा हाच इसम करो जाणे.

तर अशा ह्या जनोबाचे 2 वंशज मला भेटले. त्यांना पाहून कळलं की जनोबा ही एक वृत्ती आहे. आमच्या सोसायटीची मीटिंग होती. त्यात वेगवेगळे मुद्द्यांवर अतिशय कंटाळवाणी चर्चा सुरू होती. एक आजोबा म्हणत होते की आपल्या सोसायटीत जो वॉकिंग ट्रॅक आहे त्याच्या बाजूला आपण तुळशीची रोपे लावुया. नकार कोणाचाच नव्हता पण आजोबा फायदे सांगायला लागले, थांबायचं नावच घेत नव्हते. इतक्यात माझ्या बाजूला बसलेले काका मला म्हणाले ही चांगली कल्पना आहे, तेवढंच बायकोला हैदरबादमध्ये तुळशीबागेत फिरल्याचा फील येईल. मला चांगलचं हसू फुटलं आणि ते मात्र शांत होते.

दुसरा वंशज ऑफिसमध्ये भेटला. ऑफिसमध्ये काही उत्साही लोकांना बऱ्याच गोष्टींची हौस असते. त्यांनी काही senior लोकांची मुलाखत घ्यायचं ठरवलं. आता मी नवीन असल्यामुळे प्रेक्षकात बसलो होतो आणि माझ्या बाजूला एक senior बसले होते. मुलाखती कंटाळवाण्या होत्या. त्यात एकीने विचारलं की नवीन जॉईन झालेल्या लोकांना तुम्ही काय सांगाल? माझ्या बाजूचे जनोबा एकदम मला म्हणाले, " फक्त काम कर, हे असले रिकामे कामं नको करू!" हे वाक्य आजूबाजूच्या काही जणांना पण ऐकायला आलं, ते मात्र मी त्या गावचाच नाही असे भाव घेऊन बसले होते.

पू लं च्या प्रतिभेला सलाम केला मी. असे वंशज तुमच्या पण आजूबाजूला असतीलच, नक्की. तुम्ही मात्र कुशाभाऊ अक्षीकर असणं गरजेचं आहे कारण जनोबा फक्त त्याच्याच कानात ह्या गुजगोष्टी करत असतो!

अमोल कुलकर्णी

विनोदप्रकटन

प्रतिक्रिया

माईसाहेब कुरसूंदीकर's picture

13 Apr 2023 - 6:53 pm | माईसाहेब कुरसूंदीकर

खरे आहे रे अमोल. अशा व्यक्तिरेखा आजुबाजुला वावरताना दिसतात.
कायकिणी गोपाळराव, जी व्यक्तीरेखा कोणत्यातरी स्वामी/अध्यात्माच्या मागे असते. असे लोक कधीकधी वावरताना दिसतात.
कुटुंबपद्धती आता बदलल्यामुळे 'नारायण' मात्र दिसत नाहीत.७०/८०च्या दशकापर्यंत मात्र 'नारायण'अनेकदा दिसायचे.
एकत्र कुटुंबपद्धती आता नसल्याने हरितात्याही समाजात जास्त दिसणार नाहीत.

आमच्या नातेवाईकांत एक नारायण नावाची व्यक्ती आहे. ती म्हणजे पु ल नी रंगवलेला नारायणच जणू. मागच्या महिन्यात बंगलोर ला एका लग्नात सकाळी गुरुजींनी ऐनवेळेला समई मागितली. त्याने तासाभरात उपलब्ध केली. हे म्हणजे गेलो कॅम्पात आणि आणले हातरुमाल, म्हणलं लेका पूस किती नाकं पुसतोस ते.

अमर विश्वास's picture

13 Apr 2023 - 7:02 pm | अमर विश्वास

मस्त किस्से ... ह्या सगळ्या वल्ली आपल्या आजूबाजूला असतात .. त्यांना "बघायची" दृष्टी" दिली त्याबद्दल पुलंना शतश: प्रणाम

श्रीगुरुजी's picture

13 Apr 2023 - 7:37 pm | श्रीगुरुजी

नारायण, हरीतात्या, नंदा प्रधान, चितळे मास्तर, दोन वस्ताद, जनार्दन नारो शिंगणापूरकर, परोपकारी गंपू, गजा खोत, पेस्तनकाका, सखाराम गटणे, नाथा कामत, अण्णा वडगावकर या वल्ली आता दिसणार नाहीत.

नामू परीट, लखू रिसबूड, तो या वल्ली अजूनही आजूबाजूला वावरतात.

कंजूस's picture

13 Apr 2023 - 8:57 pm | कंजूस

"तरी बरं पु.लं. आपल्या हापिसात आले नाहीत. व्यक्ती आणि वल्ली'चे बरेच भाग निघाले असते."

पर्णिका's picture

14 Apr 2023 - 3:23 am | पर्णिका

छान लिहिलंय ! सुदैवाने आजूबाजूला अशी बरीच मंडळी आहेत. माझा आणि नवऱ्याचा प्रेमळ (?) संवाद सुरु असला की मुलं बोलतात असेच काहीतरी... यांच्यामुळे वातावरण छान हलकंफुलकं राहतं.. 😉
पु. लं च्या प्रतिभेला सलाम... > अगदी अगदी. 😀