कानात “बसलेले” संगीत

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
12 Apr 2023 - 4:25 pm

मनाला रिझवणाऱ्या गोष्टींमध्ये संगीताचे स्थान फार वरचे आहे. व्यक्तीगणिक संगीताची आवड वेगवेगळी असते, परंतु कुठलेच संगीत न आवडणारा माणूस मात्र विरळाच. वेगवेगळ्या ठिकाणी आणि अनेक प्रकारे आपण संगीत ऐकत असतो - मग ती विविध संगीतप्रसारक श्रवणमाध्यमे असतील किंवा प्रत्यक्ष संगीताची मैफिल. कधी आपण शुद्ध वाद्यसंगीत ऐकतो तर बऱ्याचदा गीत आणि संगीताचा सुरेख संयोगही ऐकतो. यांच्या जोडीला अजून एक संगीताचा प्रकार आपल्या कानावर वारंवार पडतो आणि तो म्हणजे संगीतमय जाहिराती. तर अशा अनेक प्रकारचे संगीत ऐकत ऐकत आपण लहानाचे मोठे होतो.

दर काही वर्षांनी आपण नवी गाणी ऐकतो आणि त्याचबरोबर जुनी गाणी देखील पुन्हा पुन्हा ऐकली जातातच. अशा आपल्या श्रवणभक्तीतून काही ठराविक गाण्यांवर आपले अवीट प्रेम जडते. ध्यानीमनी नसताना जेव्हा असे एखादे गाणे आपल्याला कुठल्याही प्रसारमाध्यमातून अचानक ऐकू येते तेव्हा होणारा आनंद वर्णनातीत असतो. मग आपण ते गाणे तन्मयतेने ऐकतो. ते गाणे संपते परंतु आपल्या मनात बसलेली त्याची धून मात्र चांगल्यापैकी तेवत असते. मग आपण ती धून किंवा गाण्याचे शब्द देखील गुणगुणत राहतो. हा अनुभव बऱ्यापैकी सार्वत्रिक आहे. बऱ्याच जणांच्या बाबतीत अशी संगीताची धून डोक्यात राहण्याचा परिणाम सकारात्मक असतो. त्यातून आपल्याला दैनंदिन कामे करताना एक प्रकारचा उत्साह वाटतो किंवा आपल्यात जोश देखील संचारतो. त्या जोशात आपण कधीकधी आपल्या आसपासच्या व्यक्तींना देखील त्या गाण्याच्या लयीत सामावून घ्यायला बघतो. साधारणपणे आवडत्या गाण्याबाबतचा असा अनुभव ते गाणे संपल्यानंतर काही तास टिकतो. परंतु काहींच्या बाबतीत तो अक्षरशः दिवसभर देखील राहतो. बहुतेकदा अशी गाणी स्वरमधुर आणि/ किंवा तालबद्ध असतात.

इथपर्यंत जे लिहिलंय त्याच्याशी आपल्यातील बहुतेक जण सहमत होतील. कदाचित काही जण आपापल्या आवडत्या गाण्याची एखादी धून देखील मनात गुणगुणू लागतील. पण त्याचबरोबर वाचकांच्या मनात असा प्रश्नही आला असेल, की या सर्वसामान्य सुखद भावनेची आठवण करून देण्यात लेखकाचा काय हेतू असावा ?

सांगतो...
आपल्याला आवडणारी एखादी गोष्ट आपण जमेल तितकी वारंवार करतो त्याचप्रमाणे आवडणाऱ्या संगीताची धूनही वारंवार मनात गुणगुणली जाते. परंतु ही वारंवारिता सुखद राहण्याला एक मर्यादा असते. ती जर का ओलांडून एकच एक कृती नको इतक्या वेळा (कळत/नकळत) होत राहिली तर तो प्रकार त्रासदायक ठरु शकतो.

मग एक वेळ अशी येते, की संबंधित माणूस ते गाणे गुणगुणत नसला तरीही त्या संगीताची धून त्याच्या नकळत त्याच्यावर गारुड करते आणि मनाला सतत छळत राहते. आता ही सुखद गुणगुण राहिलेली नसून ती नको असलेली भुणभुण ठरते. अशा स्थितीला सामान्य भाषेत कानभुंगा (earworm) म्हणतात तर मानसशास्त्राच्या परिभाषेत त्याला ‘डोक्यात रुतून बसलेले संगीत’(stuck song syndrome) असे गोंडस नाव आहे.

ok
व्यावसायिक संगीतकारांच्या बाबतीत हा प्रकार सामान्य माणसापेक्षाही अधिक प्रमाणात होतो. साधारणतः सामान्य माणूस जास्त करून गाण्याचे ध्रुवपदच आळवत बसतो. परंतु संगीतकाराच्या मनात गाण्याच्या अनेक ओळी बिनचूक वारंवार गुणगुणल्या जातात. अर्थात त्यांच्या बाबतीत असे होणे हे कला-नवनिर्मितीसाठी उपयुक्तच ठरते; ते त्रास वाटण्याच्या पातळीवर सहसा जात नाही.

आता आपण सामान्य माणसाच्या बाबतीत होणाऱ्या कानभुंगा या अवस्थेची काही वैशिष्ट्ये पाहू :
१. या अवस्थेचे प्रमाण हे त्या व्यक्तीच्या संगीत ऐकण्याच्या प्रमाणाशी थेट निगडित आहे. जे लोक दिवसातील अनेक तास मन लावून संगीत ऐकतात आणि त्याचे अर्थपूर्ण आकलन करून घेतात, त्यांच्या बाबतीत ही घटना अधिक प्रमाणात दिसते.

२. याचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे एखादे गाणे ऐकून संपल्यावर लगेचच ही अवस्था येत नाही परंतु त्यानंतर काही तासांनी ती उद्भवते.

३. काही गाणी ही माणसाच्या आयुष्यातील काही ठराविक घटनांशी निगडित झालेली असतात.
उदाहरणार्थ,

“मी परीक्षेला निघालो होतो तेव्हा घरून निघताना माझी १५ नंबरची बस चुकली होती आणि त्याच वेळेस बसथांब्या शेजारच्या घरातील रेडिओवरून ‘ते’ गाणे लागलेले होते
”, इ.

काही गाणी ही आनंद किंवा वेदनेच्या प्रसंगाशी देखील निगडित असू शकतात. त्यातून अशा गाण्यांची मेंदूमध्ये एक घटनाधारित स्मृती कोरली जाते. पुढील आयुष्यात जेव्हा केव्हा ते गाणे अकस्मात ऐकू येते तेव्हा ते गाणे आणि पूर्वायुष्यातील संबंधित घटना यांची सांगडही सतत घातली जाते. मग ते गाणे आणि त्या घटनेची स्मृती असा 'मिश्रभुंगा' मनाला सतावू शकतो.

४. कानभुंगा जेव्हा काही तास किंवा फार तर त्या दिवसापुरता मर्यादित राहतो तोपर्यंत काळजीचे कारण नसते. परंतु काहींच्या बाबतीत हा भुंगा पुढे विस्तारत अगदी आठवड्यापर्यंत टिकतो. त्याची वारंवारिता जर फारच वाढली तर मग मूळ गाण्याचा अर्थ किंवा त्यातील स्वरमाधुर्य देखील हरवून गेलेले असते; जाणवते ती फक्त त्रस्तता.

५. अशा वेळेस मात्र संबंधिताच्या दैनंदिन घरगुती आणि व्यावसायिक कामावर देखील परिणाम व्हायला लागतो. तसेच झोप लागण्यातही या भुंग्याचा मोठा अडथळा निर्माण होऊ शकतो.

६. कानभुंग्याने त्रस्त असलेल्या व्यक्तींचा मानसशास्त्रीय अभ्यासही झालेला आहे. साधारणतः अशी माणसे झपाटल्यासारखी वागत असतात. त्यांच्या मनात बऱ्याचदा विचारांचे असंतुलन होते. एखाद्या घटनेनंतर त्यातला त्रासदायक भाग मनात घोळवत बसण्याकडे त्यांचा कल असतो. बऱ्याचदा अशी माणसे त्यांच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या किंवा व्यावसायिक कामांमध्ये कुठेतरी कमी पडत असतात आणि ही जाणीव त्यांना अस्वस्थ करत असते. सहसा अशी माणसे मानसिकदृष्ट्या ताठर प्रवृत्तीची असतात.

७. काही मनोविकारांमध्ये कानभुंग्याची समस्या तीव्रतेने जाणवते. असा एक परिचित विकार म्हणजे कृतीचे झपाटलेपण अर्थात OCD. अशा व्यक्तींच्या बाबतीत ताणतणावाच्या प्रसंगी कानभुंगा अधिक सतावतो. या मुद्दयावरील विवेचन या लेखाच्या कक्षेबाहेरचे आहे.

कानभुंगा घालवण्याचे उपाय
जेव्हा एखादे गाणे कानसुखाची मर्यादा ओलांडून भुंग्यासारखे मागे लागते तेव्हा सामान्य माणसासाठी काही साधे सोपे उपाय करून बघता येतात :
१. एकाच प्रकारचे संगीत दीर्घकाळ न ऐकणे; संगीतप्रेमी व्यक्तींनी त्यात सतत विविधता आणत राहायची. एखाद्या ॲपवरून जर ठराविक गाणी रोज ऐकण्याची सवय असेल, तर त्यात गाणी ‘पिसण्याचा’ जो पर्याय दिलेला असतो तो जरूर वापरायचा.

२. एका बैठकीत गाणी ऐकायला अगदी शिस्तीत वेळमर्यादा घालून घ्यायची.

३. कानभुंगा सतावू लागला की सरळ उठून ‘चालायला’ लागायचे. आपल्या आवडत्या गाण्याची एक विशिष्ट तालगती असते. त्या गतीपेक्षा एकतर खूप हळू किंवा खूप भरभर चालू लागायचे.

४. गाण्याचे फक्त ध्रुपद आळवत बसण्यापेक्षा एकदाच संपूर्ण गाणे शांतपणे आणि समजून ऐकायचे. साधारणपणे ध्रुपद किंवा गाण्याचे ‘तुकडे’ ऐकण्याची स्मृती मेंदूत खूप लवकर उमटते. त्या तुलनेत संपूर्ण गाणे लक्षात ठेवणे ही अवघड क्रिया आहे.

५. हातातले काम बाजूला ठेवून कुठले तरी पूर्णपणे वेगळे काम, वाचन किंवा अन्य छंदाकडे वळायचे. घरगुती पातळीवर, मटार सोलणे किंवा बारीक पानांची पालेभाजी निवडणे या कृती सुद्धा खूप उपयुक्त ठरतात.

६. च्युइंगम चघळत बसणे. आपण ती चघळण्याची किंवा चावण्याची क्रिया मन लावून करू लागलो की मग गाण्याच्या स्मृतीपटलाला बऱ्यापैकी धक्का लागतो.
. . .

आता जरा व्यक्तिगत लिहितो. लहानपणापासून अनेक वर्षे ऐकलेली काही गाणी आणि संगीतमय जाहिराती माझ्या कानात बसलेल्या आहेत. अर्थातच त्या कानसुख आणि गानसुख या पातळीवरच आहेत ! शालेय जीवनात रेडिओ हे मुख्य करमणुकीचे साधन होते. विविध भारतीवरील अनेक जाहिराती सुद्धा आयुष्याचा भाग बनून गेल्यात. सकाळी अंघोळ करण्याच्या वेळेस साडेआठच्या दरम्यान लागणारी ‘निरमा वॉशिंग पावडर’ची जाहिरात हे त्यातले ठळक उदाहरण.

ok

दर 24 तासांनी त्या जाहिरातीची मनातल्या मनात उजळणी होई. त्यातली,
“जया और सुषमा,
सबकी पसंद है निरमा”,

ही ओळ ऐकून ऐकून मनातल्या मनात एकेक जया आणि सुषमा देखील कल्पिल्या गेल्यात. 🙂
भले मी निरमाचा ग्राहक नसेना का, परंतु त्या जाहिरातगीताची गानस्मृती मात्र अगदी डोक्यात चिकटून गेली अन आयुष्याचा एक कायमचा भाग बनून गेली.

एकदा शाळेत जायला उशीर झाला होता आणि शाळेजवळ पोहोचलो तेव्हा ध्वनीवर्धकावर
“हे ये जो मोहब्बत है
ये उनका है काम..”

हे कटीपतंगमधले प्रसिद्ध गाणे लागलेले होते. ते ऐकत ऐकत पावले झपझप पडत होती. शाळेत उशीर झाल्याबद्दल दारातच गुरुजींच्या छड्या खाव्या लागणार आहेत याची कल्पना होतीच आणि तसेच झाले. आजही हे गाणे जेव्हा अचानक ऐकू येते तेव्हा मनाने मी शाळेत गेलेलो असतो आणि छडीच्या वेदनेसह तो प्रसंग जसाच्या तसा आठवतो. आता इतकी वर्षे सरल्यानंतर त्याच्याकडे स्मरणरंजनातून पाहता येते.

दरवर्षी पावसाळा सुरू होण्याच्या सुमारास अनेक ठिकाणांहून ‘रिमझिम गिरे सावन’ हे गीत ऐकू येऊ लागते. आपल्या संस्थळावरील या गाण्यासंबंधीचे धागे देखील टपकन वर येतात आणि मग मनच अगदी रिमझिम होऊन जाते. जाता येता ते गाणे कुठे बाहेर ऐकले रे ऐकले की काही वेळाने बोटे आपोआप युट्युबकडे वळतात. मग किशोर आणि लता अशा दोघांच्या आवाजातील ती स्वतंत्र गाणी लागोपाठ ऐकल्यावरच तृप्तीने निथळतो.

पावसाळ्यातच येणाऱ्या गणेशोत्सवात विविध भक्तीगीते मोठ्या आवाजात दिवस-रात्र कानावर पडत राहतात आणि मग त्यांचीही एक सुखदस्मृती मनावर कोरली जाते. यामध्ये वाडकरांचे ओंकार स्वरूपा आहे, गानकोकिळेच्या स्वरातील विविध गणेशवंदना आहेत आणि आशाताईंचे रामा रघुनंदना सुद्धा आहे. त्या संपूर्ण महिनाभर या गाण्यांच्या धून व मोजके शब्द डोक्यात जवळजवळ दिवसभर झनकत राहतात. ही काहीशी गानव्यसनाचीच अवस्था असते. अशा काही गाण्यांच्या विविध प्रसंगांशी जडलेल्या स्मृती नक्कीच आनंददायी आहेत.

मात्र आयुष्यातील काही मोजक्या वेळा मी कानभुंग्याची अवस्था अनुभवली आहे- विशेषतः परदेशात एकटे राहत असताना. त्या वास्तव्यात घरी असताना संगीताला सोबती करून घेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. रोज रात्री अंथरुणावर पडल्यावर वाद्यसंगीत ऐकता ऐकताच झोपी जाण्याची सवय जडली होती. तेव्हा कधीकधी एखाद्या धुनेने डोक्यात अगदी थैमान घातलेले असायचे आणि मग त्या रात्री झोप लागायला बऱ्यापैकी त्रास व्हायचा. अर्थात हे त्या रात्रीपुरतेच टिकायचे. पुढे त्याची कधी समस्या झाली नाही.
. . .

मित्रहो,
तुमच्यापैकी बरेच जण कानसेन असतील तर काहीजण तानसेन सुद्धा असू शकतील. तुमच्या आवडत्या गाण्यांबद्दल काय अनुभव आहेत तुमचे ? त्यांच्याशी निगडित काही व्यक्तिगत आठवणी नक्कीच असतील. आवडत्या गाण्यांचे कानसुख घेता घेता तुम्ही कधी कानभुंग्याने सतावला गेला होतात का?

प्रतिसादांमधून जरूर लिहा. वाचण्यास, नव्हे ऐकण्यास उत्सुक !
****************************************************

संगीतआस्वाद

प्रतिक्रिया

मस्तच !या प्रकाराबद्दल नवीन माहिती मिळाली.
महाविद्यालयीन काळात गझल लिहिण्याचा सराव करत होते.सुरेश भट यांच्या गझल ऐकायचे."गंजल्या ओठास माझ्या.."आणि "भोगिले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले,एव्हढे मी भोगिले की..."
बापरे कधीही कुठेही ऐकायचे ;)
एका समारंभात गेले होते.कंटाळा आला होता तेव्हा "भोगिले जे" लावले.तो आवाज ताई पर्यंत गेला.इतकी ओरडली . प्रसंग काय गाणं काय लावतेस ;)(खरच अवघडच होते मी)
नंतर जन्मात कधी गझल नाही ऐकली.पण गझल कुठेही लागली नुसतं गझल शब्द जरी म्हटलं की कानभुंगा त्रस्त करतो.
कानात ती गझल आणि प्रसंग उभा राहत़ो.
बाकी कानसेन आहे.वर्क आऊटची गाणी आवडती कानभुंगा आहेत, अजुन तरी त्यांनी त्रस्त न करता आनंदच दिला आहे.

कुमार१'s picture

12 Apr 2023 - 8:26 pm | कुमार१

वा ! एकदम छान अनुभव. आवडले.


.सुरेश भट यांच्या गझल


>>>
मला पण,

इतकेच मला जाताना सरणावर कळले होते

हे ज्या दिवशी ऐकतो तो संपूर्ण दिवसभर ते डोक्यात राहते...

उत्तम विवेचन. वेगळ्याच आणि महत्वाच्या विषयावरला हा लेख खूपच आवडला.
आवडती जुनी गाणी बरेचदा मनात चालत असतात तो अनुभव सुखद असतो. याउलट कुठेतरी लाऊडस्पीकरवर वगैरे आपल्याला न आवडणारे, नकोसे वाटणारे एकादे जरी गाणी ऐकावे लागले, तर त्या नंतर ते डोक्यात घुमत राहून जीव नकोसा होतो.

--- पण याहीपेक्षा एका वेगळ्याच समस्येने मी अनेक वर्षांपासून ग्रस्त आहे. माझ्या कानात/डोक्यात अहोरात्र एक वेगळाच संमिश्र कोलाहल घुमत असतो. एकाद्या जंगलात रात्रीचे वेळी विविध पक्षी, किडे, बेडके वगैरेंचा जो एक संमिश्र ध्वनि कानावर पडतो, तसा हा आवाज असतो. चार-पाच सेकदांच्या या आवजाच्या लडीची असंख्य आवर्तने वर्षानुवर्षे कानात घुमत आहेत. काही मेहनतीच्या कामात मग्न असताना त्याची जाणीव तात्पुरती होत नाही, परंतु लिहायला-वाचायला शांतपणे बसल्यावर मात्र ते लगेच सुरु होते. आत्ता याक्षणी कळफलकावर लिहीतानाही ते चालू आहे. मागे कोविडग्रस्त होऊन अनेक दिवस अर्धवट गुंगीत पडून असताना तर त्या आवाजाने कान वा डोके फाटून जाईल, असे वाटण्याएवढा तो कोलाहल वाढलेला होता.
हा काय प्रकार आहे ? ही काही गंभीर व्याधी आहे का ? याचे कारण काय आहे आणि यावर काही उपाय आहे का, हे कृपया सांगावे.
मला अनेक प्रकारचे घरगुती आवाज, लहान मुलांची विविध खेळणी असतात त्यांचे आवाज, मोठ्याने बोलणारांचे आवाज, टीव्हीवरील कार्यक्रमांचा आवाज वगैरे अजिबात सहन होत नाही, त्यामुळे मला माझ्या खोलीत स्वतःला बंद करून बसावे लागते, ते घरातल्या लोकांना फार विचित्र वाटते. हल्ली तर मला जिथे लहान मुले असतात त्यांच्या घरी जायला नकोसे वाटते कारण तिथली मुले हमखास टीव्हीवर कार्टून वगैरे जोरात आवाज करून बघत बसलेली असतात, आणि त्यांच्या पालकांना त्याचे काहीच वाटत नसते. एक-दोनदा मी त्यांना आवाज कमी करावा वा बंद करावा, असे सुचवून बघितले, पण काही उपयोग झाला नाही त्यापेक्षा तिथे न जाणेच बरे.
याशिवाय आणखी एक मला सतावणारी गोष्ट म्हणजे हल्ली घरा-घरात जिथे तिथे असणारे भरमसाठ एलईडी दिवे. आपण कुणाकडे जावे तर ते लगेच भसाभसा बटणे दाबत सगळे दिवे चालू करतात, किंवा ते मुळातच चालू असतात. अमेरिकेत वगैरे बाथरूम मधे जाऊन बटण दाबले ही एकदम चार दिवे, हॉलमधे एकदम नऊ दिवे, कीचनमधले बटन दाबले की सहा प्रखर दिवे जळू लागतात. घरात फक्त आम्ही दोघे असतो तेंव्हा फक्त एक दिवा चालू ठेवतो, परंतु मुलांकडे गेलो की सारखे उठून इकडले तिकडले दिवे बंद करणे हे माझे एक कामच होऊन बसते. मुला-सुनांना तसे केलेले आवडत नाही, ते वेगळेच.... (आणखी कशाने नाही, तरी या कारणांमुळे कधी कधी "उचल रे देवा आता" असे वाटते)

कुमार१'s picture

13 Apr 2023 - 8:19 am | कुमार१

चित्रगुप्त,
तुमचे निरीक्षण व प्रतिसाद आवडला. तुम्ही ज्या समस्येचे वर्णन केले आहे ती कदाचित Tinnitusअसू शकते.

Tinnitus मध्ये संबंधित माणसाला
कानाच्या आतमध्ये आणि डोक्यात विचित्र आवाज ऐकू येतात. जेव्हा ते ऐकू येतात तेव्हा आजूबाजूला तसाच आवाज होत नसतो.

(याच्या जोडीने, गरगरल्यासारखे वाटते का, हे जाणून घेणे पण महत्त्वाचे आहे).

अर्थात संबंधित वैद्यकीय तज्ञाकडून एकदा तपासणी करून घेतलेली बरी.

चित्रगुप्त's picture

13 Apr 2023 - 1:37 pm | चित्रगुप्त

अनेक आभार डॉक्टर साहेब. मला तसले आवाज नेहमीच ऐकू येत असले तरी गरगरल्यासारखे मात्र कधी वाटलेले नाही.
'संबधित वैद्यकीय तज्ञ' म्हणजे नेमके कोणते ? ईएनटी वाले का ?
या व्याधीला Tinnitus असे नाव असल्याचे तुमच्या प्रतिसादामुळेच समजले. याबद्दल यूट्यूबवर अनेक विडियो असलेले दिसत आहेत. ते बघून त्यात काही उपाय सांगितले असतील तर करून बघेन.

कुमार१'s picture

13 Apr 2023 - 1:45 pm | कुमार१

'ईएनटी' चे डॉ.
तुमच्या पहिल्या प्रतिसादावरून मला असेही वाटले, की तुम्ही एकदा श्रवणक्षमता तपासून घ्यावी. त्यासाठी ऑडिओमेट्रि या प्रकारचे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. कानतज्ञांना तुम्ही एकदा भेटलात की ते सगळे तुम्हाला समजावून सांगतीलच; युट्युबवरचे बघून मात्र काही स्व - प्रयोग करू नका 🙂

शुभेच्छा !

कुमारजी ,दाढा दुखत असतील तरी देखील असे श्रवण प्रोब्लेम होतात हे अनुभवलं आहे.जेव्हा असा त्रास ह़ोत होता तेव्हा दातांची ट्रिटमेंट घेतली आणि इनटीला पण दाखवलं.कान व्यवस्थित ह़ोता.दाढेमुळे कानात खुप दुखत होतं.थोड्या आवाजाने ही खुप त्रास व्हायचा.दाढेचं दुखणं नसेल वयानुसार कानाचं दुखणं असावं.तज्ञांचा सल्ला योग्य घ्यावा.

कर्नलतपस्वी's picture

13 Apr 2023 - 10:02 am | कर्नलतपस्वी

संगीताची धून त्याच्या नकळत त्याच्यावर गारुड करते आणि मनाला सतत छळत राहते. आता ही सुखद गुणगुण राहिलेली नसून ती नको असलेली भुणभुण ठरते.

हाच कानभुंगा कधी कधी मददगार साबीत होतो.

वडील गेले तेव्हां....
जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे ....
बरेच दिवस मनात घोळत होते.

आई गेली तेव्हां....

ती गेली तेव्हां पाऊस निनादत होता,
ती आई होती म्हणूनी घनव्याकुळ मी ही रडलो.

ती भेटली तेव्हां.....

हमे तुमसे प्यार कितना...
चांदी जैसा रंग है तेरा...
तुम्ही मेरी मंझील...

आणी बरीच कर्णमधुर गाणी.

तीने नकार दिल्यावर...
तुम अगर मुझको न चाहो तो कोई बात नही....

सैन्यात असताना रात्रीच्या अंधारात विषेशतः हिमालयातील फिल्ड एरीयात,राजस्थानात वाळवंटात काम करत असताना याच कानभुंग्याने एकटे पणा दुर केला.

बरेच काही लिहीता येईल.

संगीत कधीच त्रासदायक नसते फक्त जेव्हा ते डिजे डाॅल्बी,लाऊड स्पीकर वर जबरदस्ती ऐकावे लागते तेव्हांच नकोसे वाटते.

कोजागरी पौर्णीमेला पं मालिनी राजुरकर यांची यमन रागातली बंदिश जरूर ऐकतो.

नभ नित चरयो चंद्रमा

सकाळी चालताना सुफी संगीत ऐकायला फार आवडते.
अबिदा परवीन,कुमार गंधर्व, वडाळी बंधू आणी इतर दिग्गज.

आजकाल श्रीधर फडके यांचा काही बोलायचे आहे हा अल्बम कानात रूंजी घालत असतो. विषेशता,

वा रा कांत यांची झुळूक आणखी एक आणी सुधीर मोघे यांची मन मनास उमगत नाही.

कुमार१'s picture

13 Apr 2023 - 10:28 am | कुमार१

विविध संगीतमय प्रतिसाद आवडला !

कानसुख >>> अतीव कानसुख >> कानभुंगा
अशा त्या तीन अवस्था येतात. दुसऱ्या अवस्थेपर्यंत सगळे उत्तमच असते.
जोपर्यंत आपल्याला संगीत वारंवार ऐकून आनंदच मिळतोय तोपर्यंत आपण दुसऱ्या स्थितीतच आहोत असे समजायचे. 🙂

कुमार१'s picture

13 Apr 2023 - 10:28 am | कुमार१

विविध संगीतमय प्रतिसाद आवडला !

कानसुख >>> अतीव कानसुख >> कानभुंगा
अशा त्या तीन अवस्था येतात. दुसऱ्या अवस्थेपर्यंत सगळे उत्तमच असते.
जोपर्यंत आपल्याला संगीत वारंवार ऐकून आनंदच मिळतोय तोपर्यंत आपण दुसऱ्या स्थितीतच आहोत असे समजायचे. 🙂

चौथा कोनाडा's picture

13 Apr 2023 - 12:28 pm | चौथा कोनाडा

सुंदर सुरेख लेख !

रेडियोवर किंवा टीव्ही, म्युझिक सिस्टीम वर लागणारी विविध गाणी ठराविक प्रसंगांची आठवण करून देतात, सुदैवाने दु:खी किंवा त्रासदायक आठवण नाही.
या गाण्यांचा भुंगा रुंजी घालायला लागला की मिळतं ते निव्वळ सुखच !

सध्या लुटेरे मधलं "सवाँर लू", कला मधलं "सैंय्या क्यू घोडेपे सवॉंर हैं, बिखरनेका शौक हैं" ही गाणी रुंजी घालत आहेत !

राजेंद्र मेहेंदळे's picture

13 Apr 2023 - 3:49 pm | राजेंद्र मेहेंदळे

मस्त विषय!!

दर थोडे दिवसांनी एक नवीन गाणे डोक्यात घोळत असते. त्या त्या वेळच्या मूड नुसार. मग दिवस भर तेच डोक्यात राहते.
१. तबल्याच्या क्लासमध्ये ढोलकीवाले एक जण धुमाळी तालातले "राजसा जवळी जरा बसा" मधील तुकडे वाजवुन दाखवत होते, कुठे पिक अप, कुठे तिहाई, कुठे मुखडा टाकु शकतो वगैरे. मग दोन दिवस तूनळीवर आणि डोक्यात तेच तुकडे घोळत राहीले.
२.वर दिलेले उदाहरण--गणपतीच्या दिवसात गणराज रंगी, ओंकार स्वरुपा, अष्टविनायकांची गाणी, शिवजयंतीला शिवकल्याण राजा ची गीते, वगैरे वगैरे
३. मधे काही वर्षे गझल ने खाल्ली-मग जगजीत् सिंग,पंकज उधास, मेहदी हसन नी काय काय ऐकत होतो, जाता येता डोक्यात तेच चालु
४. नुसरत फतेह अली खान, किशोर कुमार, शान्,सोनु निगम,लकी अली ह्यानी मधे अधे काही महिने डोके खाल्ले
५.तबल्याची ओळख झाल्यापासुन कुमार गंधर्व(निर्गुणी भजने), भीमसेन जोशी(भाग्यदा लक्ष्मी बारम्मा आणि काय काय), मराठी भावगीते(श्रावणात घननीळा,तिन्हीसांजा सखे मिळाल्या, सावर रे, भय ईथले संपत नाही,केतकीच्या बनी तिथे) ह्यांनी डोक्यात ठाण मांडले

जाता जाता--भोर भये पनघट पे, "बघण्यासाठी" नाही बरे का? ऐकण्यासाठी :)

https://www.youtube.com/watch?v=mdEHgmS2o5E

कुमार१'s picture

13 Apr 2023 - 4:12 pm | कुमार१

आतापर्यंतचे प्रतिसाद अनेक उत्कृष्ट सुरावटींनी ओसंडून वाहत आहेत त्याबद्दल सर्वांना धन्यवाद !!

१.

दु:खी किंवा त्रासदायक आठवण नाही.

>>> हे सुंदरच ! असाच आनंद कायम मिळो .

२.

भोर भये पनघट पे, "बघण्यासाठी" नाही बरे का? ऐकण्यासाठी

>>

छानच ! लगेच तिकडे जाऊन ऐकलेच.
आता ‘सत्यम शिवम सुंदरम’ संपूर्ण ऐकावी लागणार हो ! 🙂

“राधा मोहन शरणम” सारख्या अनेक ओळी अक्षरशः वेड लावतात….

'संगीत' ह्या जिव्हाळ्याच्या विषयावरील हा वेगळाच लेख खूप आवडला 👍

"व्यक्तीगणिक संगीताची आवड वेगवेगळी असते, परंतु कुठलेच संगीत न आवडणारा माणूस मात्र विरळाच."

+१०००
"आ आ आ ... उ उ उ ..." वालया आलाप (कि विलाप 😀) असलेलया शास्त्रीय संगीताचा मला प्रचंड तिटकारा आहे, तसलं काही ऐकलं कि माझं डोकंच फिरतं! बाकी सर्व प्रकारचे संगीत मला सुसह्य वाटते. त्यातले अनेक संगीत प्रकार मनाला रिझवतात मग ते शुद्ध वाद्यसंगीत असो नाहीतर गीत आणि संगीताचा सुरेख संयोग. भाषेचाही त्यात अडसर येत नाही, गीत रचनेतला एक शब्दही समजला नाही तरी काही फरक पडत नाही पण जर ते गीत-संगीत (माझ्यासाठी) श्रवणीय असेल तर मस्त मूड बनवते!

बाकी लेखात म्हंटल्या प्रमाणे एखादे संगीत काही तासांसाठी किंवा फारतर एखाद दिवसासाठी डोक्यात रुतून बसण्याचा अनुभव आत्तापर्यंत अगणित वेळा घेऊन झाला आहे. गेल्या काही दिवस, आठवडे महिन्यांतले सांगायचे तर महाशिवरात्रीला ऐकण्यात आलेले ''हर हर शंभू... शिव महादेवा शंभू' असो किंवा आठवड्यापूर्वी होऊन गेलेल्या हनुमान जयंतीला ऐकलेले 'मेरे भारत का बच्चा बच्चा... जय श्रीराम बोलेगा' हे गाणे असो, पण त्या दोन्ही गाण्यांनी त्या त्या दिवसापुरते माझ्या मनावर पूर्ण गारुड केले होते 😀

आणि आता विषय निघालाच आहे तर नुकताच घडलेला एक किस्सा सांगायचा मोह आवरत नाहीये...
हौस अजिबात नव्हती पण दशकभराहून अधिक काळ असलेले चांगले व्यावसायिक संबंध जपण्याचा भाग म्हणून एका व्हेंडरच्या मुलाच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाला गेल्या शनिवारी संध्याकाळी गेलो होतो.

'मॅरेज लॉन' वर साग्रसंगीत साजऱ्या झालेल्या ह्या समारंभाच्या यजमानांनी 'वाढदिवस', 'हळदी समारंभ', 'महापुरुषांच्या जयंत्या' तसेच 'गणेश विसर्जन' आणि अन्य कुठल्या ना कुठल्या निमित्ताने निघणाऱ्या मिरवणुका अशा सर्व प्रसंगी "कर्णकर्कश्य संगीत वाजवावे । ते इतरांसी बळे ऐकवावे । बहिरे करून सोडावे । सकल जन ।" अशी शिकवण देणाऱ्या 'महान' धर्माची दीक्षा घेतली असल्याने त्या 'पवित्र' विधीसाठी आवश्यक असलेले कंट्रोलर, मिक्सर, टर्नटेबल्स, मोठमोठे स्पिकर्स, सब-वूफर्स, ट्विटर्स आणि हेडफोन, केबल्स वगैरे वगैरे किरकोळ ऍक्सेसरीज अशा साहित्यासह 'डिजे' नामक पुरोहिताला भरघोस दक्षिणा देऊन पाचारण केले होते.

अशा डिजे सिस्टिम्स वर वाजणाऱ्या संगीतामुळे होणारे ध्वनीप्रदूषण, त्यामुळे लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींना होणारा त्रास किंवा उद्भवणाऱ्या शारीरिक, मानसिक समस्या वगैरे गोष्टी मान्यच, त्यात दुमत असण्याचे कारणच नाही आणि कुठलीही सुज्ञ व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी चालणाऱ्या असल्या प्रकारांचे समर्थनही करणार नाही, पण चावून-चघळून चोथा झालेल्या ह्या मुद्द्यांवर भाष्य करण्याचा ह्या प्रतिसादाचा उद्देशही नाही 😀

सांगायचं मुद्दा काय तर परवा त्या ठिकाणीही दणक्यात गाणी सुरु होती. सुदैवाने खुल्या जागी कार्यक्रम असल्याने शहरांतील रस्त्यावर आणि सोसायटीच्या गच्चीवर किंवा आवारात, पार्किंग मध्ये वगैरे असा ढणढणाट चालू असल्यावर जसा जीव नकोस होतो तसा प्रकार नव्हता त्यामुळे आवाज त्यातल्यात्यात सुसह्य वाटत होता आणि (वेळ घालवण्यासाठी दुसरा काही ऑप्शनच नसल्याने) त्या गाण्यांवर चालू असलेला चिल्ल्यापिल्यांचा आणि पोराटोरांचा 'डान्स' बघायलाही मजा येत होती. पण अचानक 'डिजे'ने लावलेलया एका गाण्याचे बोल ऐकून मात्र मी अक्षरशः उडालोच!

ते गाणे त्याआधी कधी माझ्या ऐकण्यात आले नव्हते म्हणून फोनवर अशा अनोळखी गाण्यांची ओळख पटवण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून भरवश्याचा मदतनीस बनलेल्या 'Shazam' ह्या ॲप कडे मदतीची याचना केली आणि त्याने सेकंदाच्या कितव्यांतरी भागात "Gadi Wala Aaya Ghar Se Kachra Nikal - Shyam Bairagi" असा निकाल दिला!

देख देख देख तु यहा वहा न फेक...
देख देख देख तु यहा वहा न फेक...
देख फैले गी बिमारी होगा सबका बूरा हाल...

तो का करे भैया?

गाडी वाला आया घर से कचरा निकाल...
गाडी वाला आया घर से कचरा निकाल...
गाडी वाला आया घर से कचरा निकाल...
गाडी वाला आया घर से कचरा निकाल...

त्या डिजेने चक्क 'स्वच्छ भारत अभियानातंर्गत' (सध्या महाराष्ट्रासहित) देशातील अनेक राज्यांत रोज सकाळी ओला-सुका कचरा कचरा गोळा करण्यासाठी फिरणाऱ्या ग्रामपंचायत आणि नगर परिषद / नगरपालिकांचे घंटागाडी वाले लावतात त्या "गाडी वाला आया घर से कचरा निकाल" ह्या गाण्याचे रिमिक्स व्हर्जन लावले होते आणि गंमत म्हणजे त्या गाण्यावर नाचायला त्या लहानग्यांच्या साथीला अनेक मोठी माणसेही मोठ्या उत्साहात सामील झाली होती.

चांगल्या साउंड सिस्टीम्सवर अनेक सुमार गाणीही पहिल्यांदाच ऐकताना मजा येत असली तरी कुतूहल चाळवले गेल्याने नंतर गुगलवर त्या गाण्याविषयी थोडा शोध घेतला असता त्या गाण्या आणि गायक 'श्याम बैरागी' ह्यांच्याबद्दल भरपूर विलक्षण माहिती मिळाली. ती माहिती एका स्वतंत्र लेखाचा विषय ठरू शकेल त्यामुळे अधिक तपशिलात जात नाही 😀 पण ते गाणे किती लोकप्रिय झाले आहे ह्याची कल्पना येण्यासाठी त्याच्या तीन व्हर्जन्सचे युट्युब वरील व्हिडिओ लिंक्स खाली देत आहे...

गाडी वाला आया घर से कचरा निकाल.
https://www.youtube.com/embed/5cucNSAmSKQ
झुंबा डान्स व्हर्जन
https://www.youtube.com/embed/Wx8GomMjbSM?
तारक मेहता का उल्टा चश्मा
https://www.youtube.com/embed/coQVgyp50Zg

अर्थात संगीतात शब्दांना तितके महत्व नसते हे कित्येक प्रसंगातून अनुभवले आहे. "भगवे अमुचे रक्त तळपते तप्त हिंदवी बाणा" हे शिवसेना गीत महाराष्ट्राबाहेरही अनेक राज्यांत कुठल्याही कार्यक्रमांत वाजताना आणि त्यावर लोकांना नाचताना पाहिले आहे तसेच आमच्या डोंबिवलीला लागून असलेल्या कल्याण ग्रामीण ह्या विधानसभेच्या मतदार संघाचे मनसेचे एकमेव आमदार श्री. राजू पाटील ह्यांच्या निवडणूक प्रचारासाठी तयार केलेले 'एकंच वादा... राजू दादा' हे गाणे मागच्या वर्षी मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना परळी येथे 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती' निमित्त निघालेल्या मिरवणुकीत डीजे साउंड सिस्टीमवर वाजताना आणि रिपब्लिकन पक्षाचे झेंडे हाती घेऊन त्यावर बेभान होऊन नाचणाऱ्या कार्यकर्त्यांना बघितल्यावर संगीत हे धर्म, भाषा आणि जाती-पातिच्या पलीकडे जाऊन ते ऐकणाऱ्या आणि त्यावर नृत्य करणाऱ्यांना आनंदाची एक विलक्षण अनुभूती देते हे आधीच लक्षात आलेले असल्याने 'घंटागाडीचे' गाणे त्या दिवशी वाढदिवस प्रसंगी वाजणे हि काही तेवढी नवलाईची गोष्ट नसली तरी त्या गाण्याने मला एक दिवस पछाडले होते हे नक्की 😂

कुमार१'s picture

14 Apr 2023 - 7:17 am | कुमार१

लेखरूपी सुंदर प्रतिसाद आवडला म्हणजे आवडलाच.

"कर्णकर्कश्य संगीत वाजवावे । ते इतरांसी बळे ऐकवावे । बहिरे करून सोडावे । सकल जन ।"

हे अगदी जबराट आहे. याला आधुनिक जनामनाचा श्लोक म्हणता येईल !

"

गाडी वाला आया घर से कचरा निकाल"

ही नवी माहिती मिळाली. आता शांतपणे हे गाणे ऐकेन.

संगीत हे धर्म, भाषा आणि जाती-पातिच्या पलीकडे जाऊन ते ऐकणाऱ्या आणि त्यावर नृत्य करणाऱ्यांना आनंदाची एक विलक्षण अनुभूती देते

हे तर अगदी त्रिकाराबाधित सत्यच आहे. सुंदर !

कुमार१'s picture

14 Apr 2023 - 7:18 am | कुमार१

त्रिकाराबाधित >>> त्रिकालाबाधित
असे वाचावे.

सौन्दर्य's picture

13 Apr 2023 - 11:28 pm | सौन्दर्य

मला गाणी ऐकायला प्रचंड आवडतात, त्यातल्या त्यात हिंदी व मराठी. इंग्लिश गाण्यातले ओ की ठो कळत नाही. नाही म्हणायला ७०-८०च्या दशकात आबा, बॉनीएम वगैरे गाणी ऐकायला आवडायची.

सध्या स्मार्टफोनवर 'जिओसावन' ह्या संकेतस्थळावर भरपूर जुनी नवी हिंदी सिनेमातली गाणी ऐकतो. बाथरूम सिंगर तर मी आहेच, त्याचाही आनंद घेतो.

सतत गाणी ऐकत असल्यामुळे एक नवीनच अनुभव मी घेतोय - सकाळी उठल्या उठल्या अचानक मनात एक गाणे रुंजी घालायला लागते व संपूर्ण दिवस पिच्छा सोडत नाही. त्याचा अजून त्रास असा काही नाही, तरी देखील जे गाणे कदाचित वर्षाआधी ऐकले असेल किंवा नसेलही, ते गाणे असे अचानक का आठवावे ? खूप प्रयत्न करून देखील त्यामागचा कार्यकारण भाव अजून तरी कळला नाही, शक्य असल्यास समजवा.

कुमार१'s picture

14 Apr 2023 - 8:23 am | कुमार१

इंग्लिश गाण्यातले ओ की ठो कळत नाही.

या बाबतीत मी देखील तुमचाच बंधू आहे !
आतापर्यंत फक्त दोनच गाणी जराशी समजली होती.

माझ्या शालेय जीवनात "कम सप्टेंबर" खूप जोरात होते आणि वर्गातला एक मुलगा ते व्हायोलिनवर वाजवायचा. त्यामुळे त्या गाण्याचे गारुड काही वर्षे होते.

पुढे शैक्षणिक इंटरनॅशनलच्या काळात आमच्यातील एक सहकारी इंग्लिश गाण्यांचा शौकीन होता. त्याने एकदा आम्हाला "रासपूतीन" या गाण्याची पहिली ओळ अगदी स्वच्छ म्हणून दाखवली होती,
"

Rasputin, Rasputin
Russia's precious love machine !"

ती ओळ तेवढी पाठ झाली आणि काही काळ गुणगुणत असायचो.

कुमार१'s picture

14 Apr 2023 - 8:25 am | कुमार१

इंटरनॅशनलच्या>>>
Internship असे वाचावे.

कुमार१'s picture

14 Apr 2023 - 8:28 am | कुमार१

जे गाणे कदाचित वर्षाआधी ऐकले असेल किंवा नसेलही, ते गाणे असे अचानक का आठवावे ?

हा जो मुद्दा आहे तो मेंदूतील स्मृतिपेशी आणि स्मृतीप्रक्रियेशी निगडित आहे. तो असा दोन मिनिटात सांगता येणार नाही.

सवडीने त्यावर काही वाचून नंतर लिहावे म्हणतो.

श्वेता व्यास's picture

14 Apr 2023 - 11:14 am | श्वेता व्यास

खूप छान लेख आहे.

सध्या एका संगीताचा त्रास होत आहे. पण तो कानभुंगा आहे का ते माहिती नाही.
नेटफ्लिक्सवर "कला" चित्रपट आला होता, बरेच दिवस फक्त गाणीच ऐकली.
गाणी खूपच आवडली, दिवसातून एकदा तर नक्कीच ऐकत होते.

मग बऱ्याच दिवसांनी चित्रपट पाहिला. खूप डिस्टर्ब् झालं चित्रपट पाहून, काहीतरी नकारात्मक भाव भरून राहिला.
विशेष करून "जाने बलमा घोडेपे क्यूँ सवार है" हे गाणं आधी खूप आवडलं होतं, पण नंतर ऐकताना नायिकेवर ते गाणं गाण्यासाठी काय प्रसंग ओढवला हे विसरता येईना. तो प्रसंग आणि गाण्याचे शब्द यातला विरोधाभास चित्रपटात परिणामकारकरीत्या गुंफला आहे.

आधी खूप वेळा गाणी ऐकल्याने चित्रपट पाहिल्यानंतरही गाणी सतत डोक्यात येतच होती.
पण त्यानंतर ते संगीत डोक्यात आलं की त्रास व्हायला लागला. त्रास त्या संगीताचा नव्हता, त्यामुळे चित्रपटाची जी नकारात्मकता आठवत होती त्याचा होता.
आता वाटतं चित्रपट पाहून मी चांगल्या संगीताला मुकले.
कदाचित चित्रपटाचा मनावरचा परिणाम कालपरत्वे कमी झाला की गाणी पुन्हा आवडतील.

कुमार१'s picture

14 May 2023 - 2:41 am | कुमार१

छान प्रतिसाद.

चित्रपटाचा मनावरचा परिणाम कालपरत्वे कमी झाला की गाणी पुन्हा आवडतील.

शक्य आहे.

कुमार१'s picture

14 May 2023 - 2:33 am | कुमार१

ही काही माझी रोजची इथे यायची वेळ नाही परंतु एका कानभुंग्याने त्रस्त केल्यामुळे यावे लागले !

रात्रीचा प्रवास चालू होता. प्रवास संपायला 15 मिनिटे असताना अचानक ध्यानीमनी नसताना किंवा गेल्या कित्येक महिन्यात ऐकले नसतानाही,
" भेट तुझी माझी स्मरते"

हे गाणे डोक्यात प्रचंड भुंगा घालू लागले.
अजूनही ते थांबत नाही आहे. धृपद किमान शंभर वेळा म्हणून झाल्यानंतर त्यातली

"सुखालाही भोवळ आली" अर्धवट सुरू झालीये.

समजा हे गाणे सीडीवर असते आणि "आली"च्या ली वर सीडी अडकल्यावर कसे
लिलीलीली…..
होते, तसेच सुरू झालेले आहे.

मेंदूचा कारभारच अजब आहे ... :)