व्यसन

सुबोध खरे's picture
सुबोध खरे in जनातलं, मनातलं
21 Dec 2022 - 7:28 pm

व्यसन

माझ्याकडे एक ४८ वर्षाच्या बाई आल्या होत्या. त्यांचा डावा हात दुखत होता. त्यासाठी त्यांच्या डॉक्टरांनी त्यांच्या डाव्या खांद्याची सोनोग्राफी करायला सांगितली होती.

सोनोग्राफी करण्याच्या अगोदर त्यांच्या आजाराची माहिती असावी म्हणून आणि मध्यम वयीन, डावा हात दुखतो आहे म्हणून मी त्यांना विचारले कि त्यांच्या हृदयाची तपासणी झाली आहे का? त्यावर त्यांनी आपली फाईल दाखवली.
त्यात इ सी जी , स्ट्रेस टेस्ट आणि इको कार्डिओग्राफी चे अहवाल होते ते सर्व व्यवस्थित होते म्हणजेच या बाईंना हृदयाचा काहीही आजार नव्हता.

यानंतर मी त्यांना विचारले कि हृदय तर व्यवस्थित आहे

तुम्हाला मानेचे स्पॉनडायलोसिस पण असू शकते. त्यावर त्यांनी एक दुसरी फाईल दाखवली त्यात मानेचा एक्स रे आणि एम आर आय होता त्यामध्ये सुद्धा काही विशेष दिसत नव्हते.

मी सोनोग्राफी केली तर डावा आणि उजवा( तुलनात्मक तपासणी साठी) दोन्ही खांदे व्यवस्थित होते.

आता मी त्यांना कोणत्या स्थितीत आहेत दुखतो आहे ते आणि तेंव्हा नक्की कुठे दुखतो आहे हे विचारले आणि त्या स्नायूंची तपासणी केली.

यानंतर मी त्यांना शांतपणे विचारले कि आपण बराच वेळ मोबाईल हातात घेऊन पाहत असता का?

त्यावर त्यांचे यजमान म्हणाले कि डॉक्टर ती दिवसात सात ते आठ तास मोबाईल घेऊन युट्युबवर विडिओ पाहत असते. पोळ्या लाटताना सुद्धा डावा खांदा वर करून आणि मान वाकडी करून ती मोबाईलवर बोलत असते. तुम्ही तिला काही तरी सांगा. हात दुखतो म्हणून तपासण्यांवर माझे आतापर्यंत २५ हजार रुपये खर्च झाले आहेत.

मी त्यांना म्हणालो कि ४८ वर्षाच्या बाईंना मी सांगावे असा मला काय अधिकार आहे. ज्याचे त्याने समजून घेणे आवश्यक आहे. मी त्यानं फारतर मोबाईल स्टॅण्डवर ठेवून व्हिडीओ पहा असा अनाहूत सल्ला देऊ शकतो. आणि मी त्यांना संगणकावर रुपये ९९ पासून मोबाईल स्टॅण्ड उपलब्ध आहेत असे सुचवले.

https://www.amazon.in/Portronics-POR-122-MODESK-Universal-Mobile/dp/B07N...

काही दिवसानंतर हीच भ्रमणध्वनीच्या व्यसनाची कथा मी एका स्त्री रुग्णाच्या बरोबर आलेल्या त्यांच्या यजमानांना ( हे माझ्या परिचयाचे आहेत) सांगत होतो तर त्यानी हसत हसत मला सांगितले कि डॉक्टर हे तर काहीच नाही. मला पण डावा खांदा आणि डोकं यात मोबाईल ठेवून संभाषण करण्याची सवय होती. यास्तव मी माझे नातेवाईक डॉक्टर सामंत अस्थिरोगतज्ज्ञ ( नाव बदललेले आहे) यांच्या कडे गेलो असता त्यांनी फिजिओ थेरपी घेण्यास सांगितले. मला ते पटलं नाही. आता ते जवळचे नातेवाईक असल्याने मी काही केले नाही पण ते सहा महिन्यांसाठी परदेशी गेले तेंव्हा मी मुलुंडच्या फोर्टिस मध्ये जाऊन कार्डिओलॉजिस्ट कडे सर्व तपासण्या करून घेतल्या. त्यानंतर न्यूरॉलॉजिस्टना दाखवून आलो. यानंतर मानेचा एम आर आय झाला आणि हे सर्व बाड घेऊन मी तेथील अस्थिरोगतज्ज्ञ याना दाखवायला गेलो तर त्यांनी मला फिजिओ थेरपी घेण्यासच सांगितले. आता फिजिओ थेरपी घेऊन मला आराम पडला.

या सर्व प्रकरणात माझे ७५ हजार रुपये खर्च झाले असे त्यांनी मला हसत हसत सांगितले.

मी काय बोलणार? हतबुद्ध होऊन फक्त त्यांच्याकडे पाहत राहिलो.

अशीच २-३ वर्षांपूर्वीची गोष्ट. एक ३५ वर्षाचे गृहस्थ पोट बिघडले म्हणून सोनोग्राफी साठी आले होते. त्यांची सोनोग्राफी करताना आणि जुने अहवाल पाहून मला लक्षात आले कि यांचे वारंवार पोट बिघडते आहे. यावर मी त्यांना विचारले कि तुम्ही जे खाता आहात किंवा जे पाणी पिता आहात त्यामुळे हा आजार तुम्हाला होत असावा असा माझा कयास आहे. तुमच्या पोटात असा गंभीर काही प्रश्न नाही.

त्यावर त्यांनी सांगितले डॉक्टर तुम्ही म्हणता ते बरोबर आहे मी साकी नाका येथल्या औद्योगिक वसाहतीत नोकरी करतात तेथील कॅन्टीन मधले अन्न फारसे चांगले नाही.

यावर मी त्यांना म्हणालो मग घरून डबा घेऊन जा. घरचे चांगले अन्न घेतले तर हा तुमचा प्रश्न निकालात निघेल.

यावर त्यांनी तोंड वाकडे केले. मी प्रश्नार्थक चेहरा केला तेंव्हा त्यांनी खालच्या आवाजात मला सांगितले कि डॉक्टर माझी बायको सकाळी ११ पर्यंत उठतच नाही.

मी त्यांना विचारले कि त्या नोकरी करतात का? यावर ते म्हणाले कि नाही ती रात्री २ पर्यंत व्हॉट्स ऍप वर असते आणि सकाळी ११-१२ पर्यंत झोपलेली असते. यावर आमची बरीच बोलाचाली झाली आहे पण ती ऐकतच नाही.

मी काय बोलणार? मी एवढेच म्हणालो, मुलुंड मध्ये बरीच चांगली पोळी भाजी केंद्रे आहेत. त्यातील एखाद्या चांगल्या केंद्रावरून पोळी भाजी डब्यात घेऊन जात जा.

याशिवाय मी तर अधिक काय सल्ला देऊ शकलो असतो?

मुक्तकप्रकटन

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

21 Dec 2022 - 7:57 pm | चौथा कोनाडा

एकंदरीत मोबाईल हा अनेक व्याधींचं मुळ आहे.
मी पण मोबाईल भरपुर वापरतो. एखादी गोष्ट मोबाईल वर करायला जमत नसेल तरच लॅपटॉप वापरतो.
(आणि मोबाईल वर मोठे वाचन आणी कमेंट करायला त्रास होतो म्हणून मिपावरचा वावर कमी झाला आहे)
आमच्या सारख्यांना मोबाईल वापर कमी करणे हे मोठे आव्हान होऊन बसले आहे.
"राजा वेळेत झोपी जा , रात्र मोबाईल रुपी वैऱ्याची आहे !"

तुषार काळभोर's picture

22 Dec 2022 - 7:14 am | तुषार काळभोर

या व्यसनाची सुरुवात असल्याचं (किंवा व्यसन लागले असल्याचं) जाणवतंय.
कळतंय पण वळत नाही अशी परिस्थिती आहे.
(हा प्रतिसाद बसमध्ये मोबाईलवरच टाईप करतोय :/ )

वळायलाच हवं!!

कानडाऊ योगेशु's picture

22 Dec 2022 - 9:25 am | कानडाऊ योगेशु

काही वर्षांपूर्वी कुटुंबासोबत सोलापूरहुन मुंबईला जात होतो.मी व पत्नी दोघांचे बर्थ आरक्षण होते .कन्या लहान होती व तिच्या आरक्षणाचीही गरज नव्हती. मला साईड बर्थ मिळाला व पत्नीला मिडल बर्थ मिळाला. झोपायची वेळ झाली तेव्हा पत्नीची होणारी गैरसोय पाहुन खालच्या बर्थवर असलेली एका टीनेज युवतीने तिचे बर्थ पत्नीला ऑफर केले. ती म्हणाली कि मी तशीही रात्रभर मोबाईलवरच असते व तसेही झोपणार नाही मी. मुलीला झोपु द्या. तिची आईही बाजुच्याच बर्थवर झोपली होती ती ही म्हणाली कि हो हो झोपु दे. ही तशी रात्रभर जागीच असते. हे ऐकुन एकाच वेळी बर्थ दिल्यामुळे आदर ही वाटला व न झोपण्याचे कारण ऐकुन कणव ही वाटली.

सौंदाळा's picture

22 Dec 2022 - 9:28 am | सौंदाळा

वरील सर्वांशी सहमत.
लॉकडाऊन नंतर मोबाईलचे वेड खूपच वाढले होते, आता प्रयत्नपूर्वक कमी करतो आहे. मोबाईल शक्यतो रात्री झोपताना बघतो त्यामुळे या वेळेत पुस्तके वाचणे, किंवा टिव्ही बघणे करतो. आता सकाळी लवकर पण उठत आहे म्हणजे रात्री झोप वेळेवरच येईल.
लेख आवडला.

व्यसनच म्हणायचं, आणखीन काय?
रस्त्यावरुन जाताना पाहतो, टू व्हीलर वाले जरा बरे, त्यातल्या त्यात मुली कानात हेडफोन घालून वरुन स्कार्फ बांधून त्यावर हेल्मेट असा जामानिमा करुन सतत बोलत असतात, स्वीगी, झोमॅटोवाले तर चालत्या बाईकवर मॅप्स वगैरे ऑपरेट करत सतत हेडफोनवर बोलत असतात. ऑटोरिक्षा वाले हँडलच्या वर लावलेला मोबाईल पाहत बोलत चालवतात. ड्रायव्हींग करत मोबाईल वापरण्याचे सगळ्यात जास्त प्रमाण आहे खाजगी कार्स चे. कार चालवताना नॉर्मली एक हात मोकळा राहू शकतो, कारमध्ये मोबाईलवर बोलत असलेले बाहेरच्यांना सहसा दिसत नाही ह्याचा फायदा घेतला जातो. स्टेआरिंग वरच्या एका हातात मोबाईल पकडून गाडी चालवणारे कित्येक दिसतात. सिग्नलवर तर सोडा, ट्राफिकमध्ये जरा थांबले तरी तेवढ्यात मोबाईल हाताळून घेतला जातो. मला एक कळत नाही, इतके काय कंटीन्युअस कनेक्टेड राहावे लागते? आर्मीचे कमांडो किंवा एसपीजीवाले सोडले तर इतके सतत कनेक्टेड राहण्याची गरज असणारा पेशा दुसरा नसावा. अगदी मोठमोठे डोक्टर्स, बिझनेसमन ह्यांना गरज असते पण ते लोक ड्रायव्हर्स ठेवतात सरळ. बाकी ट्रक ऑपरेटर्स किंवा कमर्शिल ड्रायव्हर्स ना हायवेवर चालवताना कनेक्टिव्हिटी लागते पण तेही छोट्या डब्बा फोनवर भागवतात. खाजगी गाडीचे स्वतः ड्रायव्हिंग करत असताल तर तेवढा वेळ फक्त ड्रायव्हिंगला देण्याची गरज आहे. त्यातल्या त्यात आपल्या देशासारखी बेशिस्त वाहतूक आजूबाजूला असता डोळ्यात तेल घालूनच ड्रायव्हिंग करण्याची गरज असताना हे मोबाईल वापराचे काय फॅड चालुय ते कळत नाही.
ट्राफिकवाल्यानी काहीही दयामाया न दाखवाता कुणीही असला आणि ड्रायव्हिंग करताना मोबाइलचा कुठल्याही प्रकारे (हॅन्डसफ्री, टेक्स्टींग, ब्रावसिंग, कान खांद्यात पकडून, पिलियनने फोन पकडून) केलेल्या वापरावर जबर दंड जागच्या जागी केल्याशिवाय पर्याय नाही.

सुबोध खरे's picture

23 Dec 2022 - 10:26 am | सुबोध खरे

इतका कुणीही इतका व्यस्त नाही.

मी डॉक्टर असलो आणि गाडी चालवत असलो तरीही एक मिनिट गाडी बाजूला घेऊन थाम्बवूनच फोन उचलतो. मोटार सायकल असेल तर रस्त्याच्या कडेस उभी करून हेल्मेट काढूनच फोन उचलतो. जास्तीत जास्त १ मिनिट उशीर होईल.

१०० वेळेस काहीही होणार नाही पण १०१ व्या वेळेस तुमची वेळ व्यवस्थित नसेल तर तुम्ही अपघातात सापडाल. आणि वेळ सांगून येत नाही.

कर्नलतपस्वी's picture

22 Dec 2022 - 5:17 pm | कर्नलतपस्वी

व्यसन आता संक्रमित रोगात...परिवर्तीत झाल्या सारखे वाटते. महामारी पेक्षाही भयंकर.

पहिला मोबाईल १९९५ मधे बघितला. आमचा एक मित्र नवीन लग्न झालेला. बायको व मोबाईल बरोबरच आले. बार मधे बसलो होतो "अजी म्या ब्रह्म पाहीले" प्रमाणे सर्वच जण मदिरापान सोडून मोबाईल पुराणात भान विसरून गेले.त्यावेळेस सोळा रूपये प्रती मिनीट काॅल दर होती.

आता घरातल्या घरातच प्रत्येक जण आपपापले मोबाईल घेऊन बसलेले दिसतात. तंत्रज्ञानाचा अतिरेक झालाय असे वाटते.

कर्नलतपस्वी's picture

22 Dec 2022 - 5:21 pm | कर्नलतपस्वी

आगोदरच फ्रोजन शोल्डरचा रोगी असल्याने दररोज खुल्या व्यायाम शाळेत जाऊन नाॅटिकल व्हिल वर व्यायाम करतो. मोबाईल काळाची गरज आहे म्हणून गरजे पुरताच वापरतो.

सुरुवातीला सोय म्हणून बरे होते, आता वाटते मानवजातीवर आलेले सर्वात मोठे सावट आहे हे.
तुम्ही लिहील्याप्रमाणे परिस्थिती अनेक घरांमधे झालेली आहे. सासू-सासरे तर फार लांबची गोष्ट, हल्ली स्त्रियांनी नवरा आणि मुलांना प्रेमाने, वेळच्यावेळी स्वयंपाक करून खाऊ घालणे सुद्धा सोडून दिलेले प्रत्यक्ष बघून हसावे की रडावे, कळेनासे झालेले आहे.

कंजूस's picture

23 Dec 2022 - 5:40 am | कंजूस

ताडी,दारू,अफू,मोबाईल प्रमाणात ठेवल्यास आनंदच.
शिवाय रोग आणि उपचार मिरवणे यांची चलती आहे. माझ्याकडे पैसे आहेत आणि महागडी वैद्यकीय सेवा घेऊ शकतो,कशी घेतली हे सांगत सुटणे ही प्राशन आहे.
असो.