सिल्क

वझेबुवा's picture
वझेबुवा in जनातलं, मनातलं
4 Jun 2022 - 10:44 am

तशी त्यांची कॉलेज पासूनची ओळख. पण खऱ्या अर्थाने मैत्री आणि भेटीगाठी गेल्या ५-६ महिन्यांपासून चालू होत्या. भेटणं, बोलणं, फिरायला जाणं हे सर्व २६-२७ वर्षांची मध्यमवर्गीय घरातील मुलं-मुली ज्या भविष्यकालीन हेतूने करतात तसंच चाललेलं होतं.

तिला आता लग्नाची घाई झाली होती. त्याला भेटत असतानाच घरच्यांच्या आग्रहाने ती इतरही मुलांना ऑनलाईन भेटत होती. ते दोघे भेटल्यावर ती त्याला नेहमी विचारायची, आता पुढे काय? अजून किती वेळ घेणारेस तू? खरंतर त्यालाही ती आवडत होती. पण तो उगाच वेळ घेत होता. आपण अजून सेटल झालो नाही , १-२ वर्ष थांबूयात अशी माफक कारणं तो स्वतःच्याच मनाला देत होता.

पण आज त्याने ठरवलं, या खास दिवशी होकार देऊन टाकायचा. फुल आणि मस्त मोठी कॅडबरी देऊन आज तिला सांगून टाकायचं.
तो १५ ऑगस्ट चा दिवस होता.. तो तिचा वाढदिवस होता..

सकाळी झेंडावंदनाचा कार्यक्रम आटपून तो तसाच पांढऱ्या शर्टवर तिरंगा लावून तिला भेटण्यासाठी निघाला. तिच्या घराजवळ जाताना वाटेतच तो एका दुकानात थांबला. आज नेहमीची नको म्हणून खास 'सिल्क' त्याने मागितली. नवीन कॅडबरी ज्यामध्ये चॉकलेटचाच बदाम असतो ती द्या.
दुकानदाराने कॅडबरी सिल्क दिली आणि म्हणाला एकशे तीस रुपये. (तो मनातल्या मनात ओरडला.. एकशे तीस??) आजपर्यंत कॅडबरी म्हणजे फारतर पन्नास रुपये अगदीच ते सेलिब्रेशन वगैरे घेतलं तर शंभर. (पण निदान त्याचा खोका तरी मोठा दिसतो आणि ही एव्हडीशी कॅडबरी एकशे तीस?)
त्याने अवंढा गिळला आणि निमूट पैसे देऊन कॅडबरी शर्ट च्या वरच्या खिशात ठेवली. तिचं ते चकचकीत जांभळं रॅपर खिशातून डोकावत होतं.

तिच्या घराखाली आल्यावर कॉल करून त्याने तिला खाली बोलावलं. ती तशीच घरातल्या कपड्यांवर खालीआली. बर्थ-डे विश करून तो म्हणाला चल बाईकवर एखादी राउंड मारून येऊ. गावातील तळ्याच्या, त्याच्याआवडत्या जागेवर थांबून सांगून टाकू असे मनाशी ठरवून तो निघाला. तळ्याशी पोचल्यावर, असं घरातल्या कपड्यांवर दिवसा नको थांबायला त्यापेक्षा माझ्या घराखालीच बोलू, या तिच्या उत्तराने त्याने बाईक पुन्हा परतीच्या वाटेवर घेतली.

बाईकवर तो मनात शब्दांची जुळवाजुळव करत होता. आपल्याला काही एकदम ‘फिल्मी श्टाईलने’ किंवा रोमँटिक होऊन नाही जमणार, तरी तो क्षण खास कसा होईल असा विचार करत करत तो कधी तिच्याघराजवळ आला हे त्याचे त्यालाच समजले नाही.

बाईक लावून पुन्हा एकदा शुभेच्छा देऊन त्याने खिशातील फुल आणि सिल्क तिच्यापुढे केली. तिने सिल्क घेतली आणि एखद्या लहान मुलीच्या कुतुहलाने त्या नवीन कॅडबरी कडे काही क्षण पाहत राहिली. तिच्या चेहऱ्यावरील ते दिलखुलास हास्य आणि छोटीशी खळी पाहून त्याची धडधड अजून वाढली.

पण तेवढ्यात ती अचानक जरा गंभीर झाल्याचं त्याला जाणवलं. आणि मग तिने कालच ज्याला होकार कळवलाय त्याच्याबद्दल सांगायला सुरुवात केली. तो सध्या लंडन मध्ये असतो, केवळ ऑनलाईन भेटीत कसे आम्ही एकमेकांना क्लिक झालो वगैरे वगैरे...

अरे वाह! छान, मस्तच! अश्या उसन्या शब्दांनी त्याने तिचे अभिनंदन केले. बाकी काही न बोलताच शेवटचे बाय केले आणि शेकहॅण्ड करून तो निघाला.

त्यानंतर इतकी वर्ष झाली, पण ती 'सिल्क' काही त्याने आजपर्यंत खाल्ली नाही.

SILK

कथा

प्रतिक्रिया

सस्नेह's picture

4 Jun 2022 - 6:01 pm | सस्नेह

तीर हुकला.

कर्नलतपस्वी's picture

4 Jun 2022 - 6:45 pm | कर्नलतपस्वी

आता बघा "ती सध्या काय करतेय "

तुषार काळभोर's picture

4 Jun 2022 - 7:17 pm | तुषार काळभोर

मर्मभेदी प्रतिसाद!!

:D

तुषार काळभोर's picture

4 Jun 2022 - 7:19 pm | तुषार काळभोर

उद्या करायचं ते आज करा...
अन् आज करायचं ते आत्ता...
नाहीतर अरे वाह! छान, मस्तच! अश्या उसन्या शब्दांनी तिचे अभिनंदन करा..

कर्नलतपस्वी's picture

4 Jun 2022 - 9:10 pm | कर्नलतपस्वी

बैल गेला अन झोपा केला.

कंजूस's picture

4 Jun 2022 - 8:20 pm | कंजूस

मैसुरू वाटलेलं.

ज्ञानोबाचे पैजार's picture

8 Jun 2022 - 3:00 pm | ज्ञानोबाचे पैजार

सिल्क काय स्वस्तः असते का? इकडे काय आपली डाळ शिजणार नाही हे लक्षात आल्या बरोबर लगेच सिल्क परत मागून घ्यायची. दुसरी कडे वापरता आली असती.
पैजारबुवा,

वामन देशमुख's picture

8 Jun 2022 - 3:46 pm | वामन देशमुख

त्यानंतर इतकी वर्ष झाली, पण ती 'सिल्क' काही त्याने आजपर्यंत खाल्ली नाही.

एका कंपनीत जॉब मिळाला नाही म्हणून आपण काही करिअर सोडून देतो का? दुसरीकडे अप्लाय करतोच की. लेट् अस् बी प्रॅक्टिकल्!

---

अवांतर: सिल्क सलामत तो प्रपोज् पचास.

---

सवांतर: क्रमशः आहे का ;)

सरिता बांदेकर's picture

8 Jun 2022 - 3:49 pm | सरिता बांदेकर

सिल्क हातातून सुळकन् निसटणारच आणि त्याचा तो मुलायम स्पर्ष आयुष्यभर लक्शात राहणार.
छान लिहीली आहे.

सरिता बांदेकर's picture

8 Jun 2022 - 3:49 pm | सरिता बांदेकर

सिल्क हातातून सुळकन् निसटणारच आणि त्याचा तो मुलायम स्पर्ष आयुष्यभर लक्शात राहणार.
छान लिहीली आहे.

चौथा कोनाडा's picture

8 Jun 2022 - 5:18 pm | चौथा कोनाडा

अरेरे, वाईट वाटले ! सिल्कमनोभंग !

FRDTBCH

राजेंद्र मेहेंदळे's picture

8 Jun 2022 - 9:17 pm | राजेंद्र मेहेंदळे

हा प्रपोज करत नाही, आणि घरचे लग्नाची घाई करताहेत , म्हणुन कशावरुन तिने ट्रॅप लावला नसेल? की निदान लग्न ठरल्याची बातमी दिली की हा बोलेल.

आणि तरीही बातमी खरी असेलच, तर मग एक प्रयत्न तरी करायचा. बेटर लेट दॅन नेव्हर!! कदाचित तिचे मत बदलेल?
हिंदी चित्रपटात तर मांडवातुन हिरॉईन पळुन जाते, ईथे तर नुसतीच ठरल्याची बातमी आहे.