पुरे झाले चंद्र सूर्य!

केदार केसकर's picture
केदार केसकर in जे न देखे रवी...
5 Dec 2008 - 12:25 pm

मित्रांनो,
ही माझी नवीन कविता. कशी वाटतेय ते नक्की सांगा. एका स्त्रीचे मनोगत रेखाटण्याचा हा प्रयत्न कितपत यशस्वी झालाय? कशी सुचली हे नंतर सांगेनच.

पुन्हा जांभळ्या रात्री देशांतरीचा
उभा राही दारात बेभान वल्ली
खडा सूर लावून गातो नव्याने
जुन्या पावसाचे जुने तेच गाणे

तुला झोप नाही किती पावसाळे
असे थेंब अन् भासती कोरडे
पुन्हा चिंब व्हावे जरा वाटता
पाळण्यातून आवाज कानी पडे

त्वरा धाव घेशी धरूनी उराशी
क्षुधा शांत होता पुन्हा नीज त्याला
उरातील उर्मी तुझ्या ती तशी राहूनी
काळजातील स्त्री ओरडे

जशी रात्र होते तसा जोर वार्‍यास
भन्नाट वाहे दिशाहीन वाहे
तुझ्या अंतरी कोसळे वीज
आता रहावे कसे शांत याच्यापुढे

सरे अंतरा अन् सरे गान त्याला
आता भान येता फिरे पाठ त्याची
गळोनि तुझ्या नीतीच्या श्रुन्खला
पावले धाव घेतात दाराकडे

आणि दु:ख हिरवे उफाळून येता
भरे नेत्र अन् बोलकी हो व्यथा
जरी जाहले पूर्ण मी आज
सांगू कशी अन् कुणा पूर्णतेची कथा

असा मोह होणे न शोभे जरी या
मनस्वी सुखालागी मी पारखी
आता दु:ख कसले पुन्हा राहीले मी
जगी धन्य मी धन्य स्त्री सारखी

तुमचा,
केदार

भेट द्या: http://keskarkedar.blogspot.com

कविता

प्रतिक्रिया

राघव's picture

5 Dec 2008 - 1:27 pm | राघव

चांगला प्रयत्न. पण अस्पष्ट वाटतोय असे स्पष्ट सांगावेसे वाटते. :)

तुम्ही सांगीतले की हे एका स्त्रीचे मनोगत आहे. त्यामुळे, एखाद्या प्रसंगावर त्या स्त्रीला काय वाटते ते तिने लिहिलंय, अशा विचाराने कविता वाचली. खालील ४ कडवी मात्र या भूमिकेला छेद देतात. कुणी दुसरी व्यक्ती तिच्या परिस्थिती चे वर्णन करते आहे असे वाटते.

तुला झोप नाही किती पावसाळे
असे थेंब अन् भासती कोरडे
पुन्हा चिंब व्हावे जरा वाटता
पाळण्यातून आवाज कानी पडे

त्वरा धाव घेशी धरूनी उराशी
क्षुधा शांत होता पुन्हा नीज त्याला
उरातील उर्मी तुझ्या ती तशी राहूनी
काळजातील स्त्री ओरडे

जशी रात्र होते तसा जोर वार्‍यास
भन्नाट वाहे दिशाहीन वाहे
तुझ्या अंतरी कोसळे वीज
आता रहावे कसे शांत याच्यापुढे

सरे अंतरा अन् सरे गान त्याला
आता भान येता फिरे पाठ त्याची
गळोनि तुझ्या नीतीच्या श्रुन्खला
पावले धाव घेतात दाराकडे

दुसरे सांगायचे म्हणजे, रूपक समजून घेण्यासाठी कविता २-३ दा वाचावी लागली. तरी ते सुस्पष्ट होत नाही असे वाटले. अन् लय मधे मधे तुटते ज्यामुळे रस निर्माण होता होता थांबतो.

कल्पना चांगली आहे, आणखी प्रयत्न केला तर नक्की छान जमेल. स्पष्ट सांगितल्याबद्दल राग नसावा.

बाकी, या ओळी खूप आवडल्यात -
खडा सूर लावून गातो नव्याने
जुन्या पावसाचे जुने तेच गाणे

पु.ले.शु.

मुमुक्षु