वॉटरगेट (भाग ३)

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
13 May 2021 - 6:42 pm
गाभा: 

वॉटरगेट (भाग १)
वॉटरगेट (भाग २)
______________________________________________________________________________

वॉटरगेट कॉम्प्लेक्स हा एकूण १० एकर जागेत वसलेला ६ मोठ्या इमारतींचा समूह होता. हा काँप्लेक्स वॉशिंग्टन डीसी मधील फॉगी बॉटम परिसरात आहे. फॉगी बॉटम हे एक मेट्रो स्थानक आहे. त्यानंतर येते फॅरॅगट वेस्ट आणि त्यानंतरचे स्थानक मॅकफर्सन स्क्वेअर हे व्हाईट हाऊसच्या अगदी जवळ आहे. व्हाईट हाउस साधारणपणे वॉटरगेट कॉम्प्लेक्सपासून पूर्वेला २ किमी अंतरावर आहे. व्हाईट हाऊस पासून जवळच्या परिसरात अमेरिकेच्या संसदेची इमारत कॅपिटॉल हिल आहे. इतक्या महत्त्वाच्या परिसरात असा गुन्हा घडणे आश्चर्यकारक होतेच पण धाडसाचे सुद्धा होते.

वॉशिंग्टन पोस्टचा पत्रकार बॉब वुडवर्डला या प्रकरणात नक्कीच काहीतरी काळेबेरे आहे असा संशय येऊ लागला होता. आता त्याचा सहकारी कार्ल बर्नस्टीन हा सुद्धा या प्रकरणाचा छ्डा लावण्यास त्याच्याबरोबर काम करू लागला. या दोघांनाही त्यांचे वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टने पूर्ण सहकार्य व स्वातंत्र्य दिले.

बॉब वुडवर्डने येल विद्यापीठातून १९६५ मध्ये पदवी मिळविली होती. नंतर अमेरिकेच्या नौदलात कम्युनिकेशन्स ऑफिसर या पदावर ५ वर्षे काम करून त्याने पत्रकारिता सुरू केली. १९७१ मध्ये तो वॉशिंग्टन पोस्ट दैनिकासाठी काम करू लागला.

वॉटरगेट प्रकरणात काहीतरी काळेबेरे आहे असा संशय येताच वुडवर्ड व त्याचा सहकारी कार्ल बर्नस्टीन यांनी प्रारंभीच्या काळात बर्‍याच संबंधित लोकांना भेटून माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. यासाठी दैनिकाची तत्कालीन मालक कॅथरीन ग्रॅहम हिने पूर्ण प्रोत्साहन दिले. व्हाईट हाउसमधील निक्सनचा सहाय्यक अधिकारी अलेक्झांडर बटरफिल्ड याच्याशी त्यांनी सुरूवातीच्या काळात संपर्क साधला व त्यानेही त्यांना हवी असलेली काही माहिती दिली.

एखाद्या प्रकरणाचा शोध घेत असताना योग्य त्या माणसांशी संबंध प्रस्थापित करून, त्यांचा विश्वास प्राप्त करून, वारंवार प्रयत्न करून माहिती मिळवायची असते. वुडवर्ड व बर्नस्टीन यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून, अनेकांशी बोलून शेवटी योग्य त्या माणसे शोधून प्रचंड माहिती मिळविली.

त्यांच्या सुदैवाने आणि योगायोगाने त्यांना एक ऑफिसर भेटला ज्याने अत्यंत गुप्तता राखून त्यांना खूप महत्त्वाची गुप्त माहिती पुरविली ज्यामुळे हे सर्व प्रकरण बाहेर येण्यास मदत झाली. वुडवर्ड व बर्नस्टीन यांनी नंतर या संपूर्ण प्रकरणावर "All the President's Men" हे अत्यंत गाजलेले पुस्तक लिहिले. या पुस्तकावर याच नावाने १९७६ मध्ये एक चित्रपट तयार झाला ज्यात रॉबर्ट रेडफोर्डने बॉब वुडवर्डची व प्रसिद्ध अभिनेता अभिनेता डस्टिन हॉफमनने कार्ल बर्नस्टीनची भूमिका केली होती. (हा चित्रपट यूट्यूब वर उपलब्ध आहे, परंतु तो सशुल्क आहे). या चित्रपटाला १९७७ मध्ये ऑस्करसाठी ८ नामांकने मिळाली होती व सर्वोत्कृष्ट कला दिग्दर्शन, सर्वोत्कृष्ट कथा, सर्वोत्कृष्ट ध्वनी आणि सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता असे ४ ऑस्कर पुरस्कार मिळाले होते.

या पुस्तकात या अज्ञात ऑफिसरचे नाव जाहीर न करता त्याचा उल्लेख "Deep Throat" या नावाने केला आहे कारण त्याचे नाव त्याच्या मृत्युपर्यंत जगासमोर न आणण्याचे वचन वुडवर्ड व बर्नस्टीनने दिले होते व २००५ पर्यंत त्यांनी आपले वचन पाळले.

डीप थ्रोट आणि वुडवर्ड-बर्नस्टीन द्वयीने कमालीची गुप्तता बाळगली होती. जेव्हा जेव्हा त्यांना डीप थ्रोटला भेटावेसे वाटे तेव्हा वुडवर्ड आपल्या बाल्कनीतील फुलांच्या कुंडीत एक लाल रंगाचा झेंडा खोचून ठेवायचे. डीप थ्रोटला जेव्हा यांना भेटावेसे वाटे तेव्हा तो वुडवर्डकडे येणार्या वृत्तपत्राच्या २० व्या पानावर एक वर्तुळ काढून त्यावर घड्याळाचे चित्र काढून भेटण्याची वेळ दाखविलेली असायची. त्यानुसार बहुतेक वेळा ते मध्यरात्री २ च्या आसपास एका अज्ञात अंडरग्राउंड गॅरेजमध्ये भेटायचे.

डीप थ्रोट एफबीआय मध्ये काम करीत होता व त्याला एफबीआयने गोळा केलेल्या माहितीची पूर्ण कल्पना होती. त्यांच्या गुप्त भेटी फार थोडा वेळ चालायच्या. त्याने त्यांना कोणतीही कागदपत्रे किंवा पुरावे दिले नव्हते. आपल्या भेटीत तो वुडवर्ड-बर्नस्टीन जोडीने जमा केलेल्या माहितीची शहानिशा करायचा व त्यांना काही टिप्स सुद्धा द्यायचा. अशाच एका भेटीत त्याने "Follow the money" असा सल्ला दिला होता. काही काळानंतर "तुमचा जीव धोक्यात आहे" हा इशारा सुद्धा दिला होता.

कालांतराने एफबीआयला समजले की CREEP ने गुप्तपणे बाजूला ठेवलेल्या Secret Slush Fund मधून सर्व ५ चोरट्यांच्या खात्यात प्रत्येकी ५०,००० डॉलर्स जमा करण्यात आले होते. हा फंड सांभाळणार्‍या ज्युडिथ होबॅकला या ट्रांझॅक्शन्विषयी संशय आल्यानंतर तिनेच एफबीआयला याविषयी माहिती दिली होती. ही माहिती डीप थ्रोटला असल्याने त्याने सूचक शब्दात वुडवर्ड-बर्नस्टीनला याविषयी सांगितले होते.

एका भेटीत त्यांनी डीप थ्रोटला व्हाईट हाउसमध्ये काम करणार्‍या व ज्याचा दूरभाष क्रमांक चोरट्यांकडील डायरीत सापडला होता त्या होवार्ड हंट विषयी विचारले. डीप थ्रोटने हंटची माहिती व त्याचा या प्रकरणातील सहभाग याचा शोध घेऊन या दोघांना माहिती पुरविली होती.

या प्रकरणात निक्सनचा सहभाग व एडमंड मस्कीला राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर काढण्यासाठी CREEP ने खोट्या पत्राचे रचलेले कारस्थान याविषयी सुद्धा डीप थ्रोटने माहिती पुरविली होती. सप्टेंबर १९७२ ते मे १९७३ या काळात त्यांच्या एकूण ७ भेटी झाल्या होत्या.

परंतु डीप थ्रोट म्हणजे नक्की कोण हे जगाला २००५ पर्यंत समजले नव्हते. १९७४ नंतर सुमारे ३० वर्षे डीप थ्रोट म्हणजे नक्की कोण हे शोधण्यासाठी इतर पत्रकारांनी पराकोटिचे प्रयत्न केले. त्यावर किमान ३ पुस्तके लिहिली गेली. डीप थ्रोट म्हणजे हीच व्यक्ती असा अनेकांवर संशय व्यक्त केला गेला. यात प्रमुख संशयित होते डायन सॉयर, निक्सनचे कर्मचारी प्रमुख अलेक्झांडर हेग, एफबीआय संचालक पॅट्रिक ग्रे आणि निक्सनचा अजून एक कर्मचारी जॉन सीअर्स. डीप थ्रोट ही एक व्यक्ती नसून काही व्यक्तींचा एक गट आहे असा काही जणांचा दावा होता तर ही व्यक्तीरेखा काल्पनिक आहे असेही काही जण म्हणत होत.

डीप थ्रोट मेल्यानंतरच आम्ही त्याची ओळख जगासमोर आणू असे वुडवर्ड-बर्नस्टीन या दोघांनीही ठासून सांगितले होते तरीही हा एक पुरूष आहे आणि त्याला स्कॉच व्हिस्की व धूम्रपानाची सवय आहे हे एकदा वुडवर्डने सांगितले होते. या दोघांनी जमविलेले सर्व पुरावे म्हणजे वेगवेगळ्या ७५ खोक्यांमध्ये ठेवलेल्या नोंदी, फोटो, फाईली अशा सर्व गोष्टी टेक्सस विद्यापीठाने नंतर ५० लाख डॉलर्स देऊन विकत घेतल्या व डीप थ्रोटविषयी संदर्भ वगळता इतर सर्व पुरावे २००४ मध्ये जनतेसमोर आणले.

स्मिथसोनिअन मासिकाच्या विल्यम गेन्सने व त्यांच्या पत्रकारिता शिकणार्‍या विद्यार्थ्यांनी डीप थ्रोटला शोधून काढण्यासाठी एक मोहीम हातात घेतली. डीप थ्रोट असू शकेल अशा त्या काळातील व्हाईट हाउसशी संबंधित असलेल्या व तपासाशी संबंधित असलेल्यांची त्यांनी सर्व माहिती गोळा करण्यास सुरूवात केली. त्या काळातील वृत्तपत्रात आलेले लेख, वुडवर्ड-बर्नस्टीन यांचे लेख व त्यांच्या मुलाखती वाचून डीप थ्रोट एफबीआयशी संबंधित असावा असा त्यांनी कयास बांधला. परंतु डीप थ्रोटची ओळख लपविण्यासाठी तो एफबीआयशी संबंधित नसल्याचे वुडवर्ड-बर्नस्टीन यांनी १९७३ मध्येच सांगितले होते. त्या विद्यार्थ्यांनी नंतर व्हाईट हाउसशी संबंधित ३९ पुरुष अधिकार्‍यांची माहिती गोळा केली जे १९७२-७३ या काळात तेथे काम करीत होते. त्यातून मद्यपान व धूम्रपान न करणारे वगळले गेले.

शेवटी त्यांनी डीप थ्रोट असू शकेल अशी ७ नावे नक्की केली. ते होते - पॅट्रिक बकॅनन (निक्सनचा व्याख्यान लेखक व विशेष सहाय्यक), स्टीफन बुल (निक्सनचा व्यक्तीगत सहाय्यक), डेव्हिड गर्गेन आणि रेमंड प्राईस (निक्सनचे अजून दोन व्याख्यान लेखक), जोनाथन रोझ (निक्सनचा एक अ‍ॅटर्नी), जेराल्ड वॉरन (सहाय्यक सचिव) आणि फ्रेड फिल्डिंग (व्हाईट हाउस प्रमुख जॉन डीनचा मुख्य कायदेशीर सल्लागार).

परंतु बकॅननने फेब्रुवारी १९७२ मध्येच धूम्रपान सोडले होते. त्यामुळे त्याचे नाव डीप थ्रोट असू शकणार्‍या संभाव्य यादीतून गळाले. यातील फ्रेड फिल्डिंग्ला स्कॉच व्हिस्की व धूम्रपानाची सवय होती. त्यामुळे तोच डीप थ्रोट असावा याविषयी संशय वाढला.


डावीकडे कार्ल बर्नस्टीन आणि उजवीकडे बॉब वुडवर्ड (१९७३ मध्ये)

सलग ४ वर्षे बिल गेन्स आणि त्याच्या ६० विद्यार्थ्यांनी प्रचंड माहिती गोळा करून त्याआधारे २२ एप्रिल २००३ या दिवशी जाहीर केले की फ्रेड फिल्डिंग हाच डीप थ्रोट होता. परंतु त्यांनी चुकीचा निष्कर्ष काढला होता. या निष्कर्षावर वुडवर्ड-बर्नस्टीन या दोघांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. त्यांनी एवढेच सांगितले की डीप थ्रोटच्या मृत्युनंतरच त्याचे नाव जाहीर करण्याचे त्यांनी त्याला वचन दिले आहे.

परंतु २००५ मध्ये वयाच्या ९१ व्या वर्षी स्वतः डीप थ्रोटने व्हॅनिटी फेअर मासिकाला आपण स्वतःच डीप थ्रोट असल्याचा गौप्यस्फोट केला व त्या मासिकाने लगेचच ते जाहीर करून त्याचे नाव मार्क फेल्ट असल्याचे जाहीर केले. आश्चर्य म्हणजे या प्रकरणाचा तपास सुरू असताना वुडवर्ड-बर्नस्टीन यांना तपासाची गुप्त माहिती कशी मिळत असावी यावर व्हाईट हाउसमध्येही चर्चा व्हायची व स्वतः निक्सनने दोन वेळा मार्क फेल्ट हाच ही माहिती पुरवित असावा असा संशय व्यक्त केला होता. मार्क फेल्ट नंतर एफबीआयच्या उपसंचालक पदापर्यंत पोहोचला. व्हॅनिटी फेअर मासिकाच्या गौप्यस्फोटामुळे वुडवर्ड-बर्नस्टीनवर माध्यमांकडून प्रश्नांचा भडीमार होऊ लागला व शेवटी पत्रकार परीषद घेऊन त्यांनी त्याला दुजोरा दिला व शेवटी ३२-२२ वर्षांनंतर या रहस्याचा उलगडा झाला. मार्क फेल्टचे १८ डिसेंबर २००८ मध्ये वयाच्या ९५ व्या वर्षी वार्धक्याने निधन झाले.

बॉब वुडवर्ड आणि कार्ल बर्नस्टीन हे या प्रकरणातील दृश्य नायक तर मार्क फेल्ट हा अदृश्य नायक होता.


Deep Throat मार्क फेल्ट


उजवीकडे कार्ल बर्नस्टीन आणि डावीकडे बॉब वुडवर्ड (२०१२ मध्ये)

__________________________________________________________________________________________

CREEP (Nixon's Committee to Re-Elect the President) - निक्सनच्या पुनर्निवडीसाठी स्थापण्यात आलेली समिती
Slush Money - लाच देण्यासाठी, छुप्या गुन्हेगारी कृत्यांसाठी गुपचुप वेगळे काढून ठेवलेले पैसे


(क्रमशः)

प्रतिक्रिया

कॉमी's picture

13 May 2021 - 7:54 pm | कॉमी

डीप थ्रोट असे नाव इंफॉर्मण्टला देण्याची बहुदा त्यानंतर फ्याशन सुरु झाली असावी, कारण सुचेता दलाल यांचा इंफॉर्मण्ट पण डीप थ्रोट म्हणूनच ओळखला जातो.

गॉडजिला's picture

13 May 2021 - 9:20 pm | गॉडजिला

डीप थ्रोट ? काहीही हं कॉमी... असेच म्हणनार होतो पण गुगल बाबाने a person who anonymously supplies information about covert or illegal action in the organization where they work. हे मीनिंग दावले.

आमचा डिप थ्रोट शब्दाशी संबंध प्रथम एमिनेमाच्या गाण्यातुन आल्याने इतके दिस भलतचं काही समजत व्हतोव.

हिहीहीही

-(सात्विक) कॉमी

शाम भागवत's picture

13 May 2021 - 8:16 pm | शाम भागवत

मला डीप ॲसेटची आठवण आली.

अभिजीत अवलिया's picture

13 May 2021 - 8:19 pm | अभिजीत अवलिया

रोचक लेखमाला.

चंद्रसूर्यकुमार's picture

13 May 2021 - 8:19 pm | चंद्रसूर्यकुमार

हा भागही रोचक. आवडला.

यश राज's picture

13 May 2021 - 8:25 pm | यश राज

पू.भा. प्र.

Bhakti's picture

13 May 2021 - 9:16 pm | Bhakti

खुप छान लिखाण शैली.

तुषार काळभोर's picture

13 May 2021 - 9:36 pm | तुषार काळभोर

अवांतर : खबरी व्यक्तीने धोका पत्करून माहिती द्यावी आणि संबंधित व्यक्तीने खबरीची ओळख जाहीर करावी किंवा विरुद्ध बाजूला सांगावी, ही रिस्क खूप जास्त असते.
उदा. पोलिसांना एखाद्या खबरीने एका डॉन विषयी महत्त्वाची माहिती पुरवली तर त्या आधारे कारवाई करायच्या ऐवजी, त्या डॉन ला कळवणे की या खबरीने ही माहिती दिली. म्हणजे संपला तो.
किंवा
वरील उदाहरणात पत्रकारांनी फेल्ट ची माहिती निक्सन व संबंधितांना देणे, तो तर आयुष्यातून उठला असता!
अशा परिस्थितीत आपल्या खबरी च्या ओळखिविषयी इतकी गुप्तता पाळणे, हे स्पृहणीय अन् आदरणीय काम आहे. शिवाय ' प्रोजेक्ट' संपल्यावर ' मीच तो' अशी बढाई न मारता तीस वर्षे शांत बसून राहणे, हे सुद्धा तितकंच कौतुकास्पद.

एक असच प्रकरण ऐकलं होतं की एका महिला पत्रकाराला (अर्थात अमेरिकन) तिला माहिती देणाऱ्या खबरीची माहिती सांगण्यासाठी सरकार पासून ते सर्वोच्च न्यायालया पर्यंत दबाव टाकण्यात आला, पण तिने खबरी व्यक्तीची माहिती n देणे हे तिचे नैतिक कर्तव्य असल्यावर ठाम राहिली.

सुरिया's picture

13 May 2021 - 11:09 pm | सुरिया

मस्त माहिती.
आवडले. पुलेशू

जबरदस्त लिहिली आहे मालिका. मला ह्या विषयांतील ज्ञान शून्य होते पण आपण वेगवान पद्धतीने सर्व काही लिहिले आहे.

मराठी_माणूस's picture

14 May 2021 - 12:13 pm | मराठी_माणूस

मार्क फेल्ट त्यावेळेस काय पदावर होता ?

श्रीगुरुजी's picture

14 May 2021 - 12:43 pm | श्रीगुरुजी

तो त्यावेळी एफबीआय मध्ये अधिकारी होता.

मुक्त विहारि's picture

14 May 2021 - 5:24 pm | मुक्त विहारि

लेखमाला चांगलीच पकड घेत आहे

सिरुसेरि's picture

14 May 2021 - 6:18 pm | सिरुसेरि

उत्कंठावर्धक लेखमाला . enemy of the state आठवला .

जयन्त बा शिम्पि's picture

14 May 2021 - 7:43 pm | जयन्त बा शिम्पि

२०१३ मध्ये प्रथम व २०१६ मध्ये पुन्हा एकदा अमेरिकेत , मोठ्या मुलाकडे जाण्याचा योग आला. २०१३ मध्ये " All the president's men " हे पुस्तक वाचनालयातुनआणुन वाचुन काढले. २०१६ मध्ये ह्याच विषयावरील सिनेमा ( वाचनालयातुन प्राप्त डिव्हिडि ) पाहिला होता. त्यावर एक लेख सुद्धा "मिपा" वर
२५/०८/२०१६ रोजी प्रकाशित केला होता. विषय हाच आहे म्हणुन तो लेख येथे देत आहे.

अमेरिकेत मी काय वाचतोय ?

जयन्त बा शिम्पि
25 Aug 2016 - 7:47 am

सध्या मी पुन्हा एकदा अमेरिकेत आलो असुन,माझे वाचन काय सुरु आहे अशी विचारणा,भारतातील सूनबाईने (सौ सुजाता ने)केली आहे,त्याचे हे उत्तर.
सर्वात प्रथम आत्ता दोन पुस्तकांचे वाचन सुरु आहे,१) A-G Man's Life.....by मार्क फेल्ट व २) Inside the White House( The hidden lives of the modern Presidents and the secrets of the World's most powerful institution. by Ronald Kessler.( पत्रकार )
येथील (माहवाह) लायब्ररीचे एक बरे आहे कि पुस्तक देतांनाच,परतीची तारीख लांबची देतात.पुस्तके आणली १८/८ ला, आणि परत करायची आहेत ७/९ला. फोनवर सुद्धा दोन वेळा मुदत वाढविता येते. आता हीच पुस्तके कां निवडली?त्याची पार्श्वभूमी आहे.
२०१३ मध्ये येथे आलो होतो त्यावेळी ' All the President's men'...by Bob Woodward and Carl Bernstein हे पुस्तक वाचून काढले होते. काय होते बरं त्या पुस्तकात? वाचा

अमेरिकेत दोन प्रमुख राजकीय पक्ष आहेत . डेमोक्रेटिक व रिपब्लिकन . १९६८ साली रिपब्लिकन पक्षाचे रिचर्ड निक्सन प्रेसिडेंट म्हणून निवडून आले होते. १९७२ मध्ये ते दुसऱ्यांदा निवडून आले होते. ज्या ठिकाणी,अमेरिकन खासदार पार्लमेंटच्या कामासाठी बसतात, ते ठिकाण म्हणजे Capitol House. जेथे प्रेसिडेंट निवास करतात ते White House. त्याच्या जवळच Water Gate नावाची एक इमारत होती,जेथे डेमोक्रेटिक पक्षाचे कार्यालय होते. शनिवार १७ जून १९७२ रोजी,पहाटे पाच अज्ञात इसमांना,त्या इमारतीत काहीतरी कारभार करतांना पोलिसांनी पकडले.त्या पाचांपैकी,एकजण पूर्वी CIA या अमेरिकन गुप्तचर संस्थेमध्ये,काम करीत होता.पहाटे अडीच वाजता, त्या इमारतीच्या सुरक्षा अधिकाऱ्याने पाहिले कि एका दरवाज्याला,' प्रवेश प्रतिबंध 'अशी टेप लावली होती.त्याने ती टेप काढून टाकली.चाळीस मिनिटानंतर,पुन्हा कुणीतरी तशीच टेप लावलेली त्याला दिसली.त्याने ताबडतोब पोलिसांना फोन केला.त्या पाचही जणांनी अशी बतावणी केली कि ते प्लंबर आहेत आणि लिकेज थांबविण्यासाठी काम करीत आहेत.पाच वाजेपर्यंत, पोलिसांनी व FBI(Federal Borough of Investigation--अमेरिकन पोलीस यंत्रणा)च्या अधिकाऱ्यांनी पाहिले कि अनेक ठिकाणी त्यांनी,गुप्त संदेश टिपणारी यंत्रे, मायक्रोफोन,ट्रान्समीटर,छुपे केंमेरे, गुप्त जागी बसविले होते. त्या पाचही जणांना ताब्यात घेण्यात आले. ही बातमी बाहेर पसरण्यास वेळ लागला नाही.शत्रूपक्षाच्या कार्यालयातील,बित्तमबातम्या,ऐकण्यासाठी,ही उपकरणे तेथे बसविण्यात आली होती हे जगजाहीर तर झाले,पण ह्याच्या मागे कोणाचा हात आहे,हे शोधणे महत्वाचे होते.White House मधील रिचर्ड निक्सन सह सर्वच सरकारी अधिकाऱ्यांनी,कानावर हात ठेवले. अगदी " मी नाही त्यातली अन कडी लावा आतली " असा प्रकार सुरु होता.अमेरिकेत " वाशिंगटन पोस्ट " नावाचे एक चांगल्या खपाचे वर्तमान पत्र आहे.त्याचे वरील दोघे,Bob Woodward and Carl Bernstein,तरुण पत्रकार होते. त्या दोघांनी,ह्या घटनेच्या मुळापाशी जाण्याचे ठरविले. वरवर पहाता हे काम सोपे नव्हते. FBI च्या प्रमुख पदावर म्हणजे संचालक म्हणून J.Edger Hoover हे होते.१ जानेवारी १८९५ साली जन्मलेले हे गृहस्थ,१९२४ पासून संचालक,पोलीस गुप्तहेर खाते,म्हणून नेमले गेले.त्याच खात्याचे १९३५ मध्ये FBI या नावाने रुपांतर करण्यात आले होते.त्यांनी FBI चा इतका दरारा निर्माण केला होता कि प्रेसिडेंट हेंरी ट्रुमन काय नि रिचर्ड निक्सन काय, त्यांना त्यांच्या पदावरून हटविण्यास घाबरत होते. कारण लोकमानसातील क्षोभ त्यांना असे करू देऊ शकत नव्हता. १९२४ पासून १९७२ पर्यंत प्रदीर्घ कालावधी साठी हूवर संचालक म्हणूनच राहिले. २ मे १९७२ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.आणि १७ जून १९७२ ला ही भानगड उपस्थित झाली.त्यांच्या हाताखाली उप संचालक म्हणून मार्क फेल्ट हे काम करीत होते व शिवाय त्यांच्या कामावर हूवर खुश होते.मार्क फेल्ट यांना अपेक्षा होती कि हूवर नंतर त्यांनाच संचालक पदावर बढती मिळेल,पण प्रत्यक्षात तसे न होता,दुसऱ्याच व्यक्तीला संचालक म्हणून नेमण्यात आले. तपास करण्याचे काम मार्क फेल्ट यांचे कडेच आले.
ह्या पाच जणांना जी अटक करण्यात आलेली होती,त्याचे खुलासे वर्तमान पेपरात येण्यास सुरवात झाली होती.प्रेसिडेंट निक्सन व त्यांच्या हाताखालील अधिकार्यांनी बातमी कुठून लिक होते व ते थांबविण्यात FBI ला अपयश येते आहे म्हणून दबाव आणण्याचा खूप प्रयत्न केला." Washington Post " च्या संपादकांना धमक्या मिळत गेल्या,पण पत्रकारांच्या जोडगोळीने हार मानली नाही. पाच जणांना अटक झाली तेंव्हा त्यांचेकडे २४०० डॉलर्स रोख मिळाले.ही रक्कम कोठून आली ? काम करीत असताना ह्या रकमेची गरज काय?असा प्रश्नांचा भडीमार सुरु झाला.बॉब वूडवर्ड त्यांच्या पुस्तकात म्हणतात कि आम्हाला White House मधूनच काही विश्वसनीय सूत्रांकडून ह्या कटकारस्थानाचे धागे मिळत होते.त्यासाठी त्याने एक टोपण नाव जाहीर केले,ते म्हणजे " Deep Throat ".ह्या डीप थ्रोट कडून जी गुपिते मिळत गेली,त्याच्या अनुरोधाने आम्ही तपास करीत गेलो आणि कटाचे कारस्थान कुठून कसे सुरु झाले,हे दररोज Washington Post मध्ये छापून येवू लागले.रिचर्ड निक्सन आणि चौकडीचे धाबे दणाणले.निक्सन खोटे बोलतच राहिले.कोणतीही गुप्त बातमी,मोठ्याने बोलून दाखवायची नसते,तर हळू हळू,कुजबुजत,आवाजात सांगायची असते. ते कुजबुजणे म्हणजेच घशातल्या घशात बोलणे, म्हणून Deep throat हे टोपण नाव ! ! ' All the president's men " ह्या पुस्तकात Bob Wood Word लिहितात कि हा जो कुणी सूत्रधार,आम्हाला महत्वाची माहिती देत होता,तो एका ठरलेल्या, गेरेजच्या आतमध्ये बसून,रात्रीच्या वेळी,देत होता. त्यांनी ठरविले होते कि डीप थ्रोट चे नाव शेवटपर्यंत जाहीर करावयाचे नाही. ते वचन त्याने शेवटपर्यंत पाळले सुद्धा ! ! आता,FBI च्या नव्या संचालकाचा सुद्धा संशय,मार्क फेल्ट,यांचेवरच होता.पण त्याने कधी तसे जाहीरपणे बोलून दाखविले नव्हते.
पेपरमध्ये ह्या घटनेचा इतका गाजावाजा झाला कि सारे प्रकरण,कोर्टाकडे गेले आणि ह्या कटाचा सूत्रधार म्हणून प्रेसिडेंट रिचर्ड निक्सन यांचेच नाव पुढे आले.कारण White House मधील निक्सन यांनी जे जे फोनवर बोलणे केले होते व आपल्या लोकांसह स्वतःला वाचविण्याचा जो प्रयत्न केला,तोही कोर्टापुढे आला.निक्सन ह्यांचे हे टेप वरील संभाषण प्रसिद्ध झाले आहे .(नेट वर शोधले तर सापडेल)कोर्टाने त्यांचेपुढे दोनच पर्याय ठेवले,एक म्हणजे खटल्याला सामोरे जाणे (त्यालाच Impeachment असे म्हटले जाते,मराठीत 'महाअभियोग')किंवा राजीनामा देणे.निक्सन यांनी राजीनामा देणे पसंत केले .
त्या नंतर श्री मार्क फेल्ट यांचेवर,कामात कसूर केल्याबद्दल,वेगळ्या कारणासाठी,खटला भरला गेला होता त्यातून ते सहीसलामत सुटले.
महत्वाचे:- Deep Throat कोण होता हे गुपित दिवस काय,महिने काय,पण किती वर्षे राहावे?तब्बल २००५ साल उगवेपर्यंत ! ! गुपित टिकविले ते ३३ वर्षापर्यंत ! ! मार्क फेल्टच्या नातीने आग्रह केला,म्हणून २००५ मध्ये मार्क फेल्ट, ह्यांनी,वयाच्या ९२ व्या वर्षी,आपणच डीप throat ची भूमिका बजावली होती हे जाहीर केले.त्यालाही बॉब वूडवर्ड चा नकारच होता,कारण त्याचे स्वतःचे पुस्तक,गूढतेमुळे जास्त खपत होते म्हणून! ! १७ ऑगस्ट १९१३ मध्ये जन्मलेले,मार्क फेल्ट, १८ डिसेंबर २००८ साली वारले.
त्यांनी २००६ साली वर उल्लेख केलेले पुस्तक प्रकाशित केले.Water Gate हे प्रकरण फारच गाजले होते.त्या पुस्तकात ह्या प्रकरणाशिवाय आणखी सुद्धा त्यांच्या कामगिरीचा उल्लेख आहे,म्हणून हे पुस्तक वाचण्यासाठी मी निवडले आहे.जगभरात कोठेही भ्रष्टाचारचे प्रकार बाहेर आले कि पत्रकार त्याचा गेट लावून उल्लेख करीत असतात. उदाहरणार्थ भारतात कोळशाच्या खाणींचे वाटप गैरमार्गाने केले,त्याचा उल्लेख Coal Get म्हणून केला गेला.
पुढे बॉब वूडवर्ड त्याच' Washington Post 'वृत्तपत्राचे संपादक म्हणून ३३ वर्षे काम करीत होते. ह्या जोडगोळीचा , अलीकडचा फोटो,पेपरात छापून आलेला मी पाहिला आहे.
दुसरे पुस्तक : -- अमेरिकेच्या पहिल्या वारीत White House,आम्ही फक्त बाहेरून पाहिले होते,( बराक ओबामा लांबून दिसले होते, मी त्यांना हात ही दाखविला होता , पण त्यांनी आम्हाला आतमध्ये काही बोलाविले नव्हते, ह घ्या)त्यामुळे अठरा एकरात पसरलेल्या ह्या इमारतीमध्ये आत काय काय असू शकेल हे जाणून घेण्यासाठी, हे पुस्तक मी निवडले आहे.यात अनेक प्रेसिडेंट राहून चुकले,त्यांच्या बाबतीत मागेच २०१३ मध्ये मी,अमेरिकेत असतांना,अनेक लेख लिहून पाठविले होते.त्या साठी येथील वाचनालयात मला " Our Presidents " नावाचे पुस्तक मिळाले होते.बराक ओबामा हे ४४ वे प्रेसिडेंट आहेत.ह्याच White House मध्ये हे प्रेसिडेंटस,त्यांच्या बायका मुलांसह,कसे रहात होते,त्यांच्या काय काय भानगडी सुरु असायच्या,कोणी कोणी कसा आणि कुठल्या थरापर्यंत,याचा फायदा घेतला,त्याचा खर्च कसा आणि कोण भागवितो,केम्प डेविड ही प्रेसिडेंट यांच्या विश्रांतीची जागा कोठे आहे,याचे अगदी सविस्तर व रसभरीत वर्णन,पत्रकार श्री. रोनाल्ड केस्स्लर,यांनी केले आहे.ते वाचणार आहे,टिपणे काढणार आहे,आणि ज्यांनी मागितली,त्यांना कळविणार आहे.

श्रीगुरुजी's picture

14 May 2021 - 7:47 pm | श्रीगुरुजी

फारच छान माहिती. धन्यवाद!

तुषार काळभोर's picture

14 May 2021 - 9:33 pm | तुषार काळभोर

लेखाला पूरक असा रोचक अन् उत्तम प्रतिसाद!