वॉटरगेट (भाग १)

श्रीगुरुजी's picture
श्रीगुरुजी in काथ्याकूट
10 May 2021 - 8:50 pm
गाभा: 


वॉटरगेट कॉम्प्लेक्स

मे १९७२ मधील एक मध्यरात्र. अमेरिकेची राजधानी वॉशिन्ग्टन डीसी शहर झोपेत होतं. परंतु काही जणांच्या गुपचुप हालचाली सुरू होत्या. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला ६ महिन्यांपेक्षा कमी अवधी शिल्लक होता. दुसर्‍यांदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणुक जिंकण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन जिवापाड प्रयत्न करीत होते. त्यासाठी त्यांनी Nixon’s Committee to Re-Elect the President (CREEP) या नावाची एक समिती स्थापन केली होती.

या समितीचे ५ सदस्य मे १९७२ मधील एका मध्यरात्री वॉशिंग्टन डीसी मध्ये असलेल्या वॉटरगेट कॉम्प्लेक्स या इमारतीतील प्रतिस्पर्धी डेमॉक्रॅटिक पक्षाच्या मुख्यालयात गुपचुप घुसले. त्यांनी रबरी हातमोजे परीधान केले होते व हातात प्लॅस्टिकच्या बॅगा होत्या. त्यामुळे नंतर ही हेरगिरी संस्था प्लंबर म्हणून ओळखली जाऊ लागली. तेथून काही गुप्त कागदपत्रांच्या प्रती त्यांनी घेतल्या व चोरून बोलणे ऐकण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी छुपे मायक्रोफोन लावून ठेवले. सुरक्षा रक्षकांना कोणताही सुगावा लागून न देता ते निसटले. निवडणुकीसाठी डेमॉक्रॅटिक पक्ष प्रचारासाठी नक्की कोणत्या योजना आखत आहे हे त्यांच्या नकळत समजून घेण्यासाठी ही घुसखोरी झाली होती.

आपल्या कार्यालयात कोणीतरी गुपचुप येऊन त्यांनी हेरगिरी करणारी, पाळत ठेवणारी यंत्रे बसविली आहेत याचा डेमॉक्रॅटिक पक्षकार्यालयात काम करणार्‍यांना थांगपत्ताही लागला नाही.


वॉटरगेट कॉम्प्लेक्स

हे मायक्रोफोन नीट चालत नाहीत हे काही दिवसातच त्यांना समजले. त्यांमुळे १७ जून १९७२ या दिवशी मध्यरात्री पुन्हा एकदा या समितीचे ५ सदस्य नवीन मायक्रोफोन लावण्यासाठी याच कार्यालयात पुन्हा एकदा जाण्यासाठी वॉटरगेट इमारतीत गुपचुप घुसले. परंतु त्यांच्या दुर्दैवाने या वेळी तेथील एका सुरक्षा रक्षकाला इमारतीतील अनेक दारांच्या कुलुपांवर टेप चिकटवलेला आढळला. त्यामुळे संशय येऊन त्याने लगेच पोलिसांना बोलविले आणि हे पाचही घुसखोर पकडले गेले. पोलिस आले तेव्हा त्यांना डेमोक्रॅटिक पक्षाच्या मुख्य कार्यालयाचा मुख्य दरवाजा तुटलेला आढळला. अधिक तपासानंतर कार्यालयात ध्वनीमुद्रण करणारी अत्यानुधिक उपकरणे सापडली.

हा फक्त भुरट्या चोरीचा प्रकार आहे असे सुरूवातीला पोलिसांना वाटले. हे चोरटे कोणाशी संबंधित आहेत का हा विचारच त्यांच्या डोक्यात आला नव्हता. परंतु पोलिस ठाण्यात नेऊन चोरट्यांची तपासणी करताना पोलिसांना व्हाईट हाउसशी संबंधित काही दूरभाष क्रमांक सापडले. त्यामुळे सुरूवातीच्या काळात पोलिस संभ्रमात पडले होते.

(क्रमशः)

प्रतिक्रिया

उपयोजक's picture

10 May 2021 - 9:08 pm | उपयोजक

पुभाप्र

श्रीरंग_जोशी's picture

10 May 2021 - 9:14 pm | श्रीरंग_जोशी

या जगप्रसिद्ध राजकीय प्रकरणावर लेखमालिका सुरू केल्याबद्दल धन्यवाद. सुरुवात चांगली झाली आहे.

अवांतरः या इमारतीच्या नावातले 'गेट' नंतर कुठल्याही ठरवून केलेल्या गैरकारभार किंवा कानाडोळा केलेल्या समस्यांना जोडले जाऊ लागले .
(संदर्भ १, संदर्भ २ ) उदा. अ‍ॅपल मॅपगेट

गॉडजिला's picture

10 May 2021 - 9:51 pm | गॉडजिला

:)

आग्या१९९०'s picture

10 May 2021 - 10:08 pm | आग्या१९९०

आपला कोळसा घोटाळा "Coalgate".

चंद्रसूर्यकुमार's picture

10 May 2021 - 9:20 pm | चंद्रसूर्यकुमार

मस्त. मला अमेरिकेच्या अध्यक्षांच्या इतिहासात प्रचंड रस असल्याने वॉटरगेट हा एक खूप उत्कंठावर्धक प्रकार वाटतो.

याविषयी आणखी काही लिहिता येईल पण त्यासाठी पुढच्या भागांची वाट बघतो.

यश राज's picture

10 May 2021 - 10:37 pm | यश राज

पु. भा.प्र
वॉटरगेट बद्दल उत्कंठा आहेच त्यामुळे वाचायला आवडेल.

कॉमी's picture

10 May 2021 - 11:54 pm | कॉमी

छान .
मोठे भाग प्लिज.

मुक्त विहारि's picture

11 May 2021 - 7:46 am | मुक्त विहारि

पुढील भागाच्या प्रतिक्षेत

प्रचेतस's picture

11 May 2021 - 8:02 am | प्रचेतस

कधीपासून ह्या प्रकरणावर वाचावयाचे होते.
जरा मोठे भाग लिहा भो गुरुजी.

महायुद्धोत्तर काळात केनेडी हत्या, वॉटर गेट, क्लिंटन यांचं लेविन्स्की प्रकरण आणि आता जानेवारीत घडलेलं कॅपिटॉल प्रकरण, ही सर्वाधिक वादग्रस्त प्रकरणं असावीत.

द पोस्ट सिनेमा भारी आहे, व्हिएतनाम युद्धाबाबत एक्सपोजे वॉशिंग्टन पोस्ट वृत्तपत्राने केला त्याची गोष्ट आहे.
(सिनेमाचा शेवट वॉटरगेट अटकेने होतो.)

हे पेपर वाल्यांचे सिनेमे भारी असतात. स्पॉटलाईट पण छान आहे.

चंद्रसूर्यकुमार's picture

11 May 2021 - 9:58 am | चंद्रसूर्यकुमार

रॉनाल्ड रेगन यांचे इराण-कॉन्ट्रा प्रकरण सुध्दा तसेच वादग्रस्त होते. त्या कारणावरून त्यांना इम्पिच केले जायची शक्यता बरीच होती.

तुषार काळभोर's picture

11 May 2021 - 1:09 pm | तुषार काळभोर

रोचक प्रकरण आहे. हा पण स्वतंत्र आणि विस्तृत लेखमालेचा विषय होईल.

चौथा कोनाडा's picture

11 May 2021 - 12:30 pm | चौथा कोनाडा

रोचक !
गेली कित्येक वर्षे वॉटर गेट प्रकरणाचा गवगवा, दबदबा ऐकतोय, या धाग्याच्या निमित्ताने आता तपशिलवार वाचायला मिळेल !
जरा मोठे भाग येऊ द्यात !
पुभाप्र !

ज्ञानोबाचे पैजार's picture

11 May 2021 - 1:48 pm | ज्ञानोबाचे पैजार

त्यावर इथेच लेखमाला आणि ती ही श्रीगुरुजी लिहिणार म्हणजे मेजवानीच

तेवढे मोठे भाग लिहायचे मनावर घ्या गुरुजी,

पैजारबुवा,

श्रीगुरुजी's picture

11 May 2021 - 7:25 pm | श्रीगुरुजी

सर्वांना धन्यवाद!

लहान किंवा मोठे भाग लिहिण्यापेक्षा एखादी प्रमुख घटना संपूर्णपणे एका भागात लिहिणार आहे. त्यामुळे सलगता राहील. खूप दिवस मालिका सुरू ठेवण्याऐवजी रोज एक भाग लिहून सात आठ दिवसांत मालिका संपविणार आहे.

चौकटराजा's picture

11 May 2021 - 8:13 pm | चौकटराजा

मी त्यावेळी तरुण होतो .जाणिवा फारशा विकसित नव्हत्या . प्रथमच इम्पीचमेंट हा शब्द त्यावेळी ऐकला . आता पुन्हा खरेच तो प्रकार कल्पिताहूनही विस्मयकारक होता हे उमगेल ! पुढील भागांची वाट पहातो.
बाकी या वरून उगीचच आयर्विंग वालेस च्या " आर डॉक्युमेंट " या कादंबरीची आठवण आली !!