सलाम!

आपला अभिजित's picture
आपला अभिजित in जनातलं, मनातलं
30 Nov 2008 - 9:27 am

स्वर्गात अतिमहत्त्वाची सभा भरली होती. विषय होता, वाढती गुन्हेगारी आणि दहशतवाद. विष्णूचे दशावतार पूर्ण झाल्यानंतर राक्षसांचा दहशतवाद पुन्हा वाढला होता. अतिमहत्त्वाच्या ठिकाणांसाठी, सर्वसामान्य ठिकाणांसाठी, असे वेगवेगळे दहशतवादी गट राक्षसांनी स्थापन केले होते. त्यांनी सगळीकडे उच्छाद मांडला होता. स्वर्गातल्या कुणालाच पहिल्यासारखे सुरक्षित वातावरण जाणवत नव्हते. अप्सरांचे अपहरण, देव-देवतांचा छळ, शुभकार्यात बाधा, काय वाटेल तसा धुमाकूळ राक्षस घालत होते.
राजाधिराज इंद्रानं आणीबाणीची स्थिती ओळखून सर्वांशी सल्लामसलत करण्यासाठी आजची बैठक बोलावली होती. प्रत्येकानं त्यात मतं मांडावीत आणि राक्षसांचा उच्छाद कायमचा नष्ट करण्यासाठी उपाय सुचवावेत, हा उद्देश होता. इंद्रानं प्रस्तावना करून दिल्यानंतर प्रत्येकानं आपापल्या भूमिका मांडल्या. राक्षसांना परकीय शक्तींकडून कुमक मिळत असली पाहिजे, अशी मतंही काही देवांनी व्यक्त केली. पूर्वीच्या काळी अशी परिस्थिती नव्हती, अशी काही बुजूर्गांची भूमिका होती. दुःशासनाची मजल द्रौपदीच्या वस्त्रहरणापर्यंत गेली होती. पण आताच्या असुरांनी देवांचंही वस्त्रहरण चालवलं आहे, असा त्यांचा आक्षेप होता. राष्ट्रपती ब्रह्मदेव सर्वांची मतं धीरोदात्तपणे ऐकून घेत होते. त्यांनी काही मौलिक सूचना केल्या.
इंद्राच्या विरोधी गटातल्या लोकांनी वेगळीच मतं मांडून एकदम हलकल्लोळ उडवून दिला. इंद्र, कृष्ण यांसारख्या देवांनी राक्षसांचा संहार करण्याच्या उद्देशानं का होईना, बेकायदा आणि अनधिकृत कृत्यं केल्याचा आरोप त्यांनी केला. भगवान शंकरांच्या ज्येष्ठतेचा विचार न करता, त्यांनाही या वादात निष्कारण ओढण्यासही काही जणांनी मागेपुढे पाहिलं नाही. शंकरांनी सारासार विचार न करता अनेक राक्षसांना नको इतक्‍या शक्ती बहाल केल्या आणि त्यातूनच अनेक अनर्थ घडले आणि ही परिस्थिती ओढवली, असा त्यांचा आक्षेप होता. इंद्र, कृष्ण, शंकरांच्या समर्थकांनी या मुद्द्यांना तातडीने आक्षेप घेतला. काही जणांनी या आरोपांचा खुलासा करणारी प्रसिद्धिपत्रकंही पाठवून दिली. पत्रकार परिषदा झाल्या. वाद विकोपाला जाण्याची लक्षणं दिसायला लागली.
ब्रह्मदेवांना पुन्हा मध्यस्थी करून सर्वांची गाडी आजच्या विषयावर आणावी लागली. आधी वापरून झालेले आणि फारसे परिणामकारक न ठरलेले उपायच सगळे जण सुचवत होते. त्यातून काही निष्पन्न होणार नाही, हे लक्षात येत होतं. काळाचा अपव्यय होत होता आणि काही साधलं जात नव्हतं.
बुद्धीची देवता असलेल्या गणपतीचं बैठकीत अचानक आगमन झालं. सगळ्या देवांनी मग त्यालाच साकडं घातलं. गणपतीनं सगळा विषय समजून घेतला. नवीन उपाय सुचविण्यासाठी काही अटी घातल्या. आपलं आकारमान, वाहन, रूप, बोलण्या-चालण्याची पद्धत, यावरून कोणीही, कधीही चेष्टा करायची नाही, ही त्यातली प्रमुख अट होती. ती मान्य झाल्यानंतर गणपती धीरोदात्तपणे म्हणाला, ""घटना वाईट आहे. पृथ्वीवर मुंबई नावाच्या शहरात दहशतवाद्यांनी असाच धुडगूस घातला. पण आपल्या पराक्रमी, शूरवीर अधिकाऱ्यांनी, जवानांनी सगळ्या दहशतवाद्यांचा नायनाट करून लोकांची सुटका केली. दुर्दैवानं त्यांच्यातल्या काही जणांना या युद्धात आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. आपल्या पराक्रमी, देदीप्यमान कारकिर्दीमुळं आणि देशासाठी दिलेल्या बलिदानामुळं ते स्वर्गात आले आहेत. आता इथल्या गुन्हेगारांचा समाचार घ्यायला ते समर्थ आहेत! त्यामुळं कुणीही दहशतवादाची काळजी करण्याचं कारण नाही!''
गणपतीनं केलेलं वर्णन ऐकून सगळेच देव भारावले आणि आपल्या शूर अधिकाऱ्यांचा त्यांना अभिमानही वाटला. सगळ्यांनी उभे राहून शहिदांच्या कामगिरीला सलाम केला...!

समाजप्रकटन

प्रतिक्रिया

परिकथेतील राजकुमार's picture

30 Nov 2008 - 12:03 pm | परिकथेतील राजकुमार

++दुर्दैवानं त्यांच्यातल्या काही जणांना या युद्धात आपल्या प्राणांची आहुती द्यावी लागली. आपल्या पराक्रमी, देदीप्यमान कारकिर्दीमुळं आणि देशासाठी दिलेल्या बलिदानामुळं ते स्वर्गात आले आहेत. आता इथल्या गुन्हेगारांचा समाचार घ्यायला ते समर्थ आहेत! त्यामुळं कुणीही दहशतवादाची काळजी करण्याचं कारण नाही!'
= अरेरे ! अभिजित दादा, म्हणजे वरती सुद्धा बिचार्‍यांच्या नशिबात स्वस्थपणा नाहि कि रे. आधि राजकारण्यांनी हवे तसे खेळवले, आता देव वापरुन घेणार. :(

|!¤*'~` प्रसाद `~'*¤!|
"समर्थाचिया सेवका वक्र पाहे । असा सर्व भूमंडळी कोण आहे ।।"
आमचे राज्य