Unsafe Roads : महाराष्ट्र

जिन्क्स's picture
जिन्क्स in भटकंती
4 Jan 2021 - 2:38 pm

काही दिवसांपूर्वी काही कामा निमित्त रात्री एकटाच कार ने पुण्याहून सोलापूर कडे निघालो होतो. सोलापूर हायवे एकंदरीत पुण्यावरून निघणाऱ्या इतर महामार्गाच्या मनाने सूनसानच. त्यात पाटस गावाच्या पुढे तुरळक ट्रक ट्रॅफिक वगळता इतर वाहने फारच कमी. रात्री 11:30 च्या आसपास मळद गाव ओलांडल्यावर एका वळणाजवळ गाडी आली असता अचानक डाव्या बाजूने झाडीतून तूफान दगडफेक सुरू झाली. त्यातला एक दगड हेडलँपवर बसला आणि दुसरा बोनेटवर आदळला. दुसऱ्या दगडाच्या आघातामुळे गाडी डावीकडे रस्त्याच्या खाली उतरली. आरश्यातून मागे पाहिले असता 4-5 जण झाडीतून रस्त्यावर येताना दिसले. गाडी तशीच गेर मध्ये टाकून लगेच रस्त्यावर लागून भरधाव पळवली. पुढे रावणगाव पोलीस चौकीत जाऊन रीतसर FIR वगैरे नोंदवली. पोलिसांनी सहकार्य करत एक हायवे पेट्रोलिंग पार्टि प्रसंग घडला त्या दिशेला रवाना केली आणि मला पुढच्या मोठ्या गावापर्यंत एसकोर्ट केले.
पुणे सोलापूर हा प्रवास मी गेली अनेक वर्षे करत आलो आहे. दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरी कधी एकट्याने कधी कुटुंबासोबत तर कधी मित्रांसोबत अनेक वेळा केलेला आहे.असा प्रसंग घडल्याचे कधी ऐकवीत नव्हते. माझे अनेक मित्र हा प्रवास रात्री कुटुंबासोबत स्वतःच्या गाडीने करतात. त्या सर्वांना धोक्याची कल्पना दिली आहेच.
तर ह्या धाग्याचे प्रयोजन असे आहे की, तुमच्या बाबतीत कधी असा प्रसंग घडला आहे का? घडला असल्यास कोणत्या रस्त्यावर? ह्या धाग्यामुळे जे रस्ते कुटुंबासोबत प्रवास करण्यास ( कोणत्याही कारणाणे) धोकादायक आहेत त्याची सूची बनवता येईल. देशात काही ठिकाणी पोलीस अशा रस्त्यांवर गाड्यांचा ताफा बनवून पुढे पाठवतात. सुदैवाने महाराष्ट्रात असे कुठे दिसले नाही.
काही ऐकीव माहितीच्या आधारे आणि वर्तमानपत्रातून छापून आलेल्या बातम्यांच्या आधारे खाली यादी देत आहे,
1. बापदेव घाट - रात्री प्रवास करणाऱ्यांची लुटालूट.
2. खोपोली - मुरबाड रस्ता : पूर्वी एक्स्प्रेस वे वर लुटणारी टोळी कार्यरत होती तीच टोळी ह्या रस्त्यावर पण लुटालूट करत असत.
3. पंढरपूर - अहमदनगर रस्ता : ट्रक लुटणारी टोळी गेली अनेक वर्षे कार्यरत. स्थानिक बातम्या वाचल्यास कल्पना येईल.
4. घोटी - सिन्नर : अंडी काचेवर फेकून लुटणारी टोळी.
5. वरंद घाट: लुटालूट नाही पण हा रस्ता प्रचंड निर्मनुष्य आहे. देवघर धरणाच्या कडेकडेने जाणारा हा रस्ता संपतासंपत नाही. काही कारणाने तुम्ही इथे अडकलात तर मदत मिळण्याची शक्यता फार कमी आहे.
6. महाराष्ट्र -कर्नाटक - तेलंगणा ह्या राज्याच्या सीमेवरच्या हायवे सोडून आतमधल्या गावामध्ये रात्रीची बऱ्याच वेळेला तस्करी, चोरटी माल वाहतुक चालते. लुटालूट नसली तरी इथे पोलीस तुम्हाला अडवून मनसोक्त विचारपूस करू शकतात.
7. केळघर घाट : महाबळेश्वर वरून साताऱ्यात उतरणारा हा घाट पूर्वी फारच कुप्रसिद्ध होता.
8. बागलाण : ह्या प्रांतात रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या वाहनांकडे स्थानिक लोक बऱ्याच वेळेला संशयाने पाहतात. त्यात त्या भागात जर एखादी अफवा ( मुले पालवणारी टोळी इ. ) पसरली असेल तर बाका प्रसंग उद्भवु शकतो.
9. कन्नड घाट: अवघड वळणांमुळे धीम्या झालेल्या ट्रक्स , मागच्या मागे माल पळवून नेणाऱ्या टोळ्या.

तुमचेही असे काही अनुभव असल्यास किंवा काही माहिती असल्यास भर घालावी.
अजून माहिती साठी ही दुवा
https://www.team-bhp.com/forum/route-travel-queries/32480-unsafe-roads.html

प्रतिक्रिया

सौंदाळा's picture

4 Jan 2021 - 3:19 pm | सौंदाळा

बापरे, थोडक्यात वाचलात.
हल्ली असे प्रकार कुठे ऐकले नव्हते.
खूप पूर्वी आंबोली घाटात पण रात्री रस्त्यावर अडथळे उभे करून गाड्या लुटायचे असे ऐकले होते पण सध्या तर अजिबातच नाही.

विजुभाऊ's picture

4 Jan 2021 - 6:07 pm | विजुभाऊ

केळघर घाट अवघड म्हणून प्रसिद्ध होता.
इथे वाटमारी वगैरे कधी ऐकीवात नाही
नाही म्हणायला वाटमारी वगैरे कोरेगाव हुन पुढे पुसेगाव ला जाताना वर्धनगडच्या घाटात वाटमारी च्या बातम्या ऐकल्या आहेत.
वाटमारी वगैरे प्रकार सहसा कोरड्या दुश्काळी भागत जास्त ऐकण्यात येतात.
एक शंका : नेहमी वर्तमान पत्रात धाडसी द॑रोडा असे मथळे येतात.
दरोड्याला धाडसी म्हणणारांचे नेहमीच विचित्र वाटते

चौकटराजा's picture

5 Jan 2021 - 9:41 am | चौकटराजा

वर्तमानपत्र धाडसी दरोडा असे वर्णन करतील तर वाहिनी "दरोड्याचे थरार नाट्य " वर्णन करतील! एकूण आनंदी आनंद !!

चलत मुसाफिर's picture

4 Jan 2021 - 7:09 pm | चलत मुसाफिर

नागपूरच्या दक्षिणेस, आंध्र प्रदेशात आदिलाबाद शहर आहे. काही वर्षांपूर्वी त्या मार्गाने स्वचालित वाहनाने मेडकला निघालो असताना पोलिसांनी गाडी थांबवून 'आता उशीर झाला आहे, इथून पुढे एकट्याने जाऊ नका' असा सल्ला दिला होता. (त्या प्रभागात जंगले असून रात्री नक्षली पथकांचे प्राबल्य असते.)

बडोदा- दाहोद- इंदूर या रस्त्यावर एकेकाळी रात्रीच्या वेळी पोलीस वाहनांचे मोठे ताफे बनवून एकत्र पाठवीत. एकट्यादुकट्या वाहनाची लूटमार होणे जवळजवळ निश्चित असे (आता हा रस्ता आता चौपदरी, पथकर महामार्ग झाला असून सद्यस्थिती काय आहे याची कल्पना नाही).

सुबोध खरे's picture

4 Jan 2021 - 8:10 pm | सुबोध खरे

अशी स्थिती एखाद्या नैसर्गिक किंवा मानवी आपत्ती नंतर जास्त प्रमाणात दिसते.

सध्या करोना मुळे अनेक लोकांचे रोजगार गेलेले आहेत. वैफल्यातून किंवा अगतिकतेतून माणसे गुन्ह्याकडे वळतात असे आढळून आलेले आहे. शिवाय जर अशा भुरट्या गुन्हेगारावर तातडीने कार्यवाही झाली तर त्याचे निराकरण होते.

अशा वेळेस मंगळसूत्र खेचणे किंवा एकट्या दुकट्या माणसाला गाठून मोबाईल काढून घेणे सारखे गुन्हे पण जास्त होतात.

त्यासाठी आपल्याला जास्त काळजी घेणे आवश्यक आहे.

मुंबईत गिरण्यांच्या संपानंतर कोकणात आणि नगर जिल्ह्यात( जेथून मोठ्या प्रमाणावर गिरणी कामगार आलेले होते) अशा संघटित गुन्हेगारीत वाढ झाली होती. महिनोन्महिने काम नाही पगार नाही यामुळे हताश झालेली माणसे गुन्हेगारी कडे वळली होती.

तेंव्हा मुंबईत पाकीटमारी, मंगळसूत्र खेचणे अशा गुन्ह्यात पण बरीच वाढ झाली होती.

जिन्क्स's picture

4 Jan 2021 - 8:59 pm | जिन्क्स

सहमत. मागे युनिक फिचर्सचा मुंबई गुन्हेगारीवर एक लेख वाचण्यात आला. त्या मध्ये बहुतेक गँगस्टर्सचा उदय BTS चाळींमधून झालेला आहे. बंद पडलेल्या गिरण्या, तिर्थरूपांची गेलेली नोकरी ह्या मूळे बरेच मध्यमवर्गीय तरुण पैशांसाठी गुन्हेगारीकडे वळाले.
आताही दुष्काळी रोजगार नसलेल्या भागात हा प्रकार जास्त घडतो.

दौंड,कुर्डुवाडी ,सोलापूर इथून रात्री जाणाऱ्या ट्रेनसमध्ये पोलीस फिरतात आणि दारे, खिडक्या लावून ( शटर ओढून) बंद करायला सांगतात. हे करोना काळाचे नसून कित्येक वर्षे चालू आहे. मंगळसूत्र, मोबाइल, पिशव्या ओढून नेतात.

हा भाग कुप्रसिद्ध आहे.

उलट कोकण, गोवा,कर्नाटककडे जाणाऱ्या कोकण रेल्वेत पोलीस फिरकतही नाहीत. सीटखाली ब्यागा टाकून, खिडक्या
उघड्या टाकून बर्थवर प्रवासी मस्त झोपा काढतात.

चांदणे संदीप's picture

5 Jan 2021 - 1:48 pm | चांदणे संदीप

दौंड ते सोलापूर यामधला भिगवण ते कुर्डुवाडी हा भाग पारध्यांच्या रेल्वे लुटणार्‍यांच्या टोळीसाठी सुपीक भाग आहे. अतिशय चलाखीने ते योजना पार पाडतात. टोळीतले काहीजण पुणे-दौंड येथे रेल्वेत बसतात आणि रेल्वे अपेक्षित ठिकाणी आली की, आतले लोक साखळी ओढून रेल्वे थांबवतात. रेल्वेत दोनच पोलीस असतात ते पूर्ण रेल्वे तपासून काढेपर्यंत पारध्यांनी त्यांचे काम फत्ते केलेले असते. यामध्ये बर्‍याच वेळा रेल्वेतले लोक पोलिसांना सहकार्य करत नाहीत त्यामुळे त्यांच्यावरच असे प्रसंग ओढवतात. रेल्वेत भारतीय रेल्वेचे पण दोन पोलीस असतात (जीआरपी) पण राज्य पोलीस आणी केंद्रीय पोलीस यांच्यात आजिबात समन्वय नसतो.

कित्येकदा डोळ्यादेखत रेल्वे लुटताना या पारध्यांच्या टोळीला पाहिले आहे. माझे वडील रेल्वेत पोलीस होते. लहानपणी त्यांच्यासोबत या रेल्वेलाईन रात्री पायी तुडवल्या आहेत. पारध्यांचा पाठलाग करताना वडिलांना आणि त्यांच्या साथीदार पोलीसांना पाहिले आहे. जिंती, पारेवाडी, वाशिंबे, पोफळज ही काही कुप्रसिद्ध ठिकाणे. बर्‍याच गमतीजमती आणि आठवणी आहेत माझ्या लहाणपणीच्या.

कित्येकदा बाईकवरून किंवा कारमधून दोघांनी महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या रस्त्या-घाटांमधून प्रवास केलेला आहे. भीती अशी कधी वाटली नाही. काहीतरी अघटित घडू शकले असते असेही बरेच किस्से आहेत. सगळे लिहायचे म्हणजे एक मुक्तपिठीय लेख होईल. ;)

सं - दी - प

बाप्पू's picture

4 Jan 2021 - 10:17 pm | बाप्पू

बाप रे.. अंगावर काटा आला वाचून.
काळजी घ्या.
FIR बाबत पुढे काही फॉलो अप घेतला का??

माझ्या बाबतीत असे 2-3 वेळेला झालेय कि रस्ता एकदम निर्मनुष्य आणि मी आणि वाईफ दोघेच गाडीमध्ये. एकदा ताम्हिणी घाटात (2016 मध्ये )रात्री 10 च्या आसपास ड्राईव्ह करत होतो. पूर्ण घाट संपेपर्यंत फक्त 3 च गाड्या भेटल्या . नाहीतर पूर्ण 20-25 km च्या पॅच मध्ये आम्ही एकटेच. त्यावेळी काही वाटले नाही पण नंतर खूप भीती वाटली कि काही झाले असते तर?? किंवा गाडी खराब/पंचर झाली असती तर??
त्याचवेळी अजुन एक घटना घडली जिची उकल आजवर झाली नाहीये. रात्री 10:30 च्या आसपास कामत हॉटेल च्या अलीकडे 3-4 km वर एका टर्न वर रस्ताच्या कोपऱ्यावर बरेच लोकं बसलेली दिसली. त्यामध्ये बायका, म्हातारी माणसे आणि 2-4 तरुण, 3-4 लहान मुले एकाच ठिकाणी बसलेली दिसली. बायकांनी बराच मेकअप ( पावडर वैगेरे ) लावले होते, म्हाताऱ्या बायकांनी नऊवारी साड्या घातल्या होत्या. एकाच ठिकाणी सर्व बसून होते. नेमके कोणत्या कारणासाठी ते समजले नाही आणि त्याचा आम्ही त्यावेळी जास्त विचारही केला नाही. पण आजही त्या प्रश्नाचे उत्तर सापडले नाहीये. घाटात एका वळणावर इतकी माणसे नेमक्या काय कारणासाठी बसून असतील??

2018 मध्ये उन्हाळ्यात एकदा वाइफसोबत गणपतीपुळे, मार्लेश्वर आणि पावस सहलीला गेलो होतो. पावस ते पुणे असा शेवटचा टप्पा होता. पावस वरून निघायला बराच उशीर झाला. रात्रीचे 8:30 वाजले होते.
गूगल मॅप चालू केले आणि आंबा घाटाकडे जाणारा रस्ता सेट केला. आणि ड्रायविंग सुरु केले. 2 मिनटातच गाव मागे पडले आणि आमच्या सोबतीला भयाण शांतता आली. रस्त्यावर दुतर्फा पूर्ण काळोख फक्त हेडलाईटचा उजेड आणि सिंगल रस्ता. कुठेही वस्ती किंवा गावाचा मागसुस नाही.
जवळपास 30-35 मिनिटे ड्रायविंग करत होतो पण अक्षरशः जीव मुठीत धरून.
बायको ला पुढच्या सीटवर खाली वाकून बसायला सांगितले ( कारण जर कोणी अचानक समोरून आले किंवा समोरून टॉर्च मारला तर गाडीत लेडीज आहे हे कोणाला पटकन कळू नये म्हणून.. ) मी गाडी 70-80 च्या स्पीड ने पळवत होतो पण रस्ता संपतच नव्हता. जास्त स्पीड पण घेऊ शकत नव्हतो कारण रस्ता सिंगल लेन आणि वळणावळणाचा होता. कसे बसे आंबा घाटात पोहचलो आणि मग हायसे वाटले. पुढे मलकापूर मध्ये मित्राच्या घरी मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी पुण्याकडे रवाना झालो.

पुणे ते सोलापूर असा प्रवास बऱ्याच वेळेला केलाय (रात्री सुद्धा ) पण मला असा अनुभव आला नाही. पण तरीही इथून पुढे काळजी घेईल.

बापदेव घाटाच्या बाबतीत बोलायचं तर हा घाट चोरीमारीच्या घटनांसाठी पहिल्यापासून बदनाम आहे. त्यामुळे एकेकाळी घाटामध्ये मिलिटरी कॅम्प ठेवला होता.
रात्री 7 नंतर क्वचितच एखादी गाडी जायची. रात्री साडे आठ वाजता च्या आसपास असणारी स्वारगेट ते सासवड ही शेवटची ST असायची (अजूनही आहे ).. कित्येक two व्हिलर वाले त्या गाडीची वाट पाहत थांबायचे. गाडी आल्यानंतर त्या गाडीच्या पुढे मुद्दामहून आपली two व्हिलर चालवायचे. जेणेकरून काही झाल्यास मागे असणारी ST आणि त्यातील प्रवासी मदत करतील.

2007 च्या आसपास माझे वडील रात्री 7:30 -8 च्या आसपास पुण्यातून सासवड कडे या घाटाने जात होते. तर काही तरुणांनी घाटाच्या पायथ्यापासून (आत्ताच्या येवलेवाडी कमानी पासून ) त्यांचा पाठलाग सुरु केला. आपल्या मागावर कोणी आहे असे वाटताच त्यांनी प्रसंगावधान राखून अक्चुअल घाट चालू होण्याआधीच गाडी अचानक वळवली आणि परत पुण्याच्या दिशेने वेगाने दामटवली. पण उलट फिरताना ते आणि दुसऱ्या गाडीवरील ते तरुण यांची नजारा नजर झाली. त्यांची नजर भयानक होती.
त्यांनी देखील परत थोड्या अंतरापर्यंत वडिलांचा पाठलाग केला पण वडिलांनी खूप जोरात गाडी पळवली आणि वाचले.

मी 2010 मध्ये शुक्रवारी बापदेव घाट मार्गे गावी जाण्यासाठी निघालो होतो. 9 वाजले असावेत. घाट चालू होण्याआधी खूप जोरात लघुशंका आल्याने घाट पायथ्याशी गाडी ( घाटाच्या पायथ्याशी एक नीरा आणि सरबत विकणारी टपरी आहे जी पहिल्यांदा उजव्या बाजूस होती आता डाव्या बाजूला शिफ्ट केलीये ) थांबवली आणि उतरून लघवी करू लागलो. पण काही अंतरावरून दोन तरुण हातात कठी (कि रॉड? ) घेऊन येताना दिसलें. मी घाबरलो. तसेच गाडीवर टांग मारून गाडी चालू केली आणि जोरात पळवली. सुदैवाने थोडयाच वेळात माझ्या सोबतीला एक पिक अप आली आणि त्याच्या मदतीने घाट ओलांडला.

आता रस्ता मोठा झालाय, आणि आसपास वस्ती झालीये त्यामुळे असे प्रकार जवळपास बंद झालेयत. हा रस्ता आता रात्रीचे 1-2 तास वगळता पूर्ण पणे वाहता असतो.
पण आता नवीन प्रकार सुरु झालेत. या घाटाला आता पर्यटन स्थळाचे स्वरूप येऊ लागलेय. खूप लोकं घाटाच्या 3ऱ्या आणि 4थ्या वळणावर पुण्याचा पसारा पाहत बसतात. कित्येक प्रेमी युगुल अश्लील चाळे करतात. घाट संपत आल्यावर दोन्ही बाजूस दरी असणारा एक 100 मिटर चा पॅच आहे तिथे गाड्या लावून काही लोकं डोंगरावर चालत चालत दूरवर जातात. त्यामुळे रात्री 8 नंतर इथे थांबणाऱ्या लोकांसोबत लुटमारीच्या बऱ्याच घटना आजही घडतायेत

कोंढवा आणि तत्सम भागातले मुस्लिम लोकं आपल्यासोबत लेडीजना घेऊन रात्री उशिरापर्यंत या भागात रेंगाळत असतात. लॉक डाऊन नंतर आता या सर्व प्रकारात वाढ़ होतेय. पोलिसांनी या घाटात कामाव्यतिरिक्त थांबायला मनाई केलीये तसे बोर्ड पण आहेत पण तरीही गर्दी होतच आहे. आता पोलिसांची एक गाडी इथे बऱ्याच वेळेला पेट्रोलिंग करत असते. पण या घाटाचे जुने रेप्युटेशन पाहता येथे रात्री अपरात्री थांबणे बऱ्याच लोकांना महागात पडलेय ( अगदी कालपरवा पर्यंत ) आणि इथून पुढे ही पडू शकते.

अजुन एक घाट आहे जो खेड शिवापूर मधून सासवड पर्यंत जातो. मरीआई घाट. हा देखील चोरी मारीच्या घटनांसाठी बदनाम आहे.
जवळपास 12-15 किमी चा प्रदेश पूर्ण निर्मनुष्य असल्याने इथे बऱ्याच लुटमारीच्या घटना घडलेत.
आता सुद्धा या घाटाने उशिरा जाणे महागात पडू शकते. घाटाच्या पायथ्याशी बऱ्याच कंपन्या आहेत आणि तिथे जवळपास 70-80 टक्के परप्रांतीय काम करतात त्यापैकी काही जण किंवा तिथलेच बेरोजगार झालेले तरुण लुटमारीच्या घटना करत असतात. त्यामुळे कधी इकडून जाणार असताल तर काळजी घ्या.

फोटोग्राफी च्या निमित्ताने बापदेव घाट आणि मरीआई घाट फिरणे होते . पण आम्ही भल्या पहाटे जातो तरी थोडी भीती वाटते. पूर्वी बापदेव मध्ये खूप कमी गर्दी असायची पण तुम्ही म्हणाला तसे आता खूप वर्दळ वाढली आहे. मरीआई घाटात एकदाच गेलो आहे पण निर्मनुष्य होता घाट.

आंबा घाट रात्रीच्या वेळी बराच सुनसान असतो. त्यात आम्ही नुकतंच लग्न झालेले असताना (बर्‍यापैकी दागिने अंगावर असताना) देवदर्शनाला कोकणात जाताना काय बुद्धी झाली आणि हा मार्ग निवडला. कराड ओलांडुन पुढे रत्नागिरीकडे जाईपर्यंत अंधार पडला. रात्री ८:३० - ९ वाजले असतील पण पुर्ण रस्ता सुनसान होता.
घाट ओलांडुन साखरपा पासुन वर्दळ सुरु झाली.
सुदैवाने काही बरे-वाईट झाले नाही पण चांगलीच तंतरलेली होती.

चौकटराजा's picture

5 Jan 2021 - 9:51 am | चौकटराजा

मी पुणे येथून अहमदाबाद येथे जात असता रात्री २ वाजता नवसारी जवळ पत्नींची हॅण्डबॅन्ग पळवून चोरटा चालत्या गाडीतून उडी टाकून पसार झाला . या मार्गावर नेहमी ये जा करणार्यानी हा चोरीचा " झोन " असल्याचे सांगितले . विशेष असे की ही बाब अहमदाबाद रेल्वे पोलिसांना माहित असल्याचे ही निषपन्न झाले .त्यातील मोबाईल ई सोडून पत्नीचे आयकार्ड चोराने नोकरीच्या पत्यावर पोस्टाने पाठविले ! तेंव्हा लक्षात असू द्या ट्रेन च्या दाराजवळ बर्थ मिळाला असेल तर मोबाईल ,पैसे ई गोष्टी आपल्या साखळीने बांधलेल्या सर्वात जड बॅगेच्या तळाशी असू द्या !!

पंढरपूर सोडल्या नंतर काही तासात ट्रेन मध्ये अचानक हत्यार बंद पोलिस आले आणि त्यांनी ट्रेन च्या खिडक्या,दरवाजे बंद केले.
कोणत्या भागातून ट्रेन जात होती हे माहीत नाही.
पण त्या भागात लुटमार करणाऱ्या टोळ्या सक्रिय असाव्यात.

चौथा कोनाडा's picture

8 Jan 2021 - 5:26 pm | चौथा कोनाडा

कुर्डूवाडी-भिगवणचाच परिसर !

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

5 Jan 2021 - 2:13 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

कन्नड घाटात असे काही ऐकलेले नाही, ब-याचदा गेलोय. घाट साला लै धोकादायक आहे, शीस्तीत चालावे लागते. आपण गाडी चालविण्याच्या बाबतीत अननुभवी असाल तर गाडी चालवू नका. वाहतूकीची कोंडी कायमच होत असते, माहिती घेऊनच या रस्त्याने प्रवास करावा. रात्र टाळावी इतकेच.

बाकी, डॉ. खरे साहेब म्हणतात तसे करोनामुळे बेकार झालेले आता लहान-सहान लुटमारीकडे वळु शकतात, पण ते कधी कधी झटापटीत जीवावरही बेतू शकते. बाकी, पुढे अशा गोष्टी वाढू शकतात असे वाट्ते आणि ते कोणत्याही रस्त्यावर होऊ शकते. लुटमारीला रात्रच असली पाहिजे, सुनसान रस्तेच असले पाहिजेत असे नव्हे, ते केव्हाही होऊ शकतं. आपण महिला-मुली कुंटूंबातली वयस्कर मंडळी प्रवासासाठी सोबत घेऊन जात असाल तर काळजी घेतली पाहिजे.

-दिलीप बिरुटे

प्रवासात शक्यतो दागिने अंगावर घालुच नये.
एटीएम कार्ड मुळे जास्त रोखड ठेवायची गरज नसते .
आणि जे atm कार्ड आपण प्रवासात वापरणार आहोत त्या अकाउंट मध्ये ठराविक च पैसे असतील तर लूट होण्याची शक्यता कमीच आहे.
पण त्यांनी लूट करताना हल्ला केला तर ते धोकादायक ठरू शकतं त्या साठी शक्यतो रात्री चा प्रवास टाळणे हाच उपाय आहे.

राजेंद्र मेहेंदळे's picture

5 Jan 2021 - 2:53 pm | राजेंद्र मेहेंदळे

मागच्या वर्षी ऑफिसमधुन बाईकवर घरी येत असतान रात्री १२.३० च्या सुमारास सुस पुला खाली(पुणे-बँगलोर हायवे) ३ जणानी मला अडवले आणि लुटायचा प्रयत्न केला. पळुन जायचा प्रयत्न केला तर बाइक आडवी घालुन थांबवले आणि डोक्यात काहितरी वस्तु मारली. पण हेल्मेट्मुळे वाचलो. तरीहि प्रसंगावधान राखुन संधी साधुन मी पळालो(बाईकवरुन) आणि भरधाव गाडी पळवुन थेट कोथरुड पो.स्टे. ला नेली आणि तक्रार दिली.
नंतर बरेच दिवस त्या रस्त्याला वेगवेगळ्या ठिकाणी लुटमारीच्या घटना घडत होत्या (पेपर् मधे वाचत होतो.)

मी मात्र रात्री उशीर होणार असेल तर कार न्ययला सुरुवात केली.

तुषार काळभोर's picture

5 Jan 2021 - 7:18 pm | तुषार काळभोर

डॉ खरे यांच्या प्रतिसादाशी सहमत. ज्यावर्षी महाराष्ट्रात पाऊस कमी पडतो तेव्हा हवेली तालुक्यात जब्री चोऱ्या - दरोडे यांचे प्रमाण वाढते.
बोपदेव घाट अजूनही कुप्रसिद्ध आहे आणि मी अजून एकदाही अंधार पडल्यावर तिकडून आलेलो नाही. हिवरे किंवा भिवरी ला गेल्यावर जर संध्याकाळ झाली तर दिवे घाट वापरतो. तिकडून कितीही वाजता येताना काही वाटत नाही.

चेन्नई ला जाताना रेल्वेने जाणं येणं व्हायचं. नेहमी संध्याकाळची १०४१ चेन्नई एक्स्प्रेस असायची. कुर्डुवाडी आलं की सशस्त्र पोलीस यायचे आणि दारे खिडक्या लावायला सांगायचे. एकदा दोन बर्थ मागे साईड बर्थ वरील मुलीची गळ्यातली चेन ओढली गेलेली पहिली आहे. तिची किंकाळी अजून आठवते.
गेल्या जानेवारीत रात्री अकरा वाजता ताम्हिणी घाटातून परतलो होतो, पण बऱ्यापैकी वर्दळ असल्याने काही वाटलं नाही.

कोणत्या ठिकाणी काय काळजी घ्यायची ते कळतंय, सर्वांना धन्यवाद.

पिनाक's picture

5 Jan 2021 - 8:58 pm | पिनाक

एक साधी शंका. जर या घटना त्याच त्याच ठिकाणी नेहमी घडतात तर पोलीस सापळा लावून (म्हणजे साध्या वेशात साध्या वाहनाने जाऊन) या लोकांना संपवून का टाकत नाहीत? एखाद्या पोलीस स्टेशन च्या भागात नेहमी गुन्हा घडत असेल तर त्या जिल्ह्यातला वरिष्ठ पोलीस अधिकारी एन्काऊंटर ची आज्ञा देऊ शकतो ना?

राजेंद्र मेहेंदळे's picture

6 Jan 2021 - 12:36 pm | राजेंद्र मेहेंदळे

आणि या जबरी चोरिच्या घटनांमध्ये काय जास्त चिरिमिरी थोडीच मिळते? नुसताच डोक्याला ताप. त्यापेक्षा जास्त कमाई तर घरफोडी,सोनसाखळी चोरी, हाफ मर्डर्,चॅप्टर केसेस यामध्ये होते. हायवे पेट्रोलिंग, व्हाईट कॉलर वस्तीमध्ये ड्युटी म्हणजे एकदम भंगार. केळेवाडी, सुतारदरा, जनता वसाहत, डायस प्लॉट, पर्वती म्हणजे फुल कमाई

सुबोध खरे's picture

9 Jan 2021 - 11:30 am | सुबोध खरे

आणि या जबरी चोरिच्या घटनांमध्ये काय जास्त चिरिमिरी थोडीच मिळते?

अशा दरोड्यांमध्ये पोलीस दलाची बदनामी भरपूर होते त्यामुळे पोलीस शक्यतो असे दरोडे पडू नयेत म्हणून काळजी घेत असतातच .

पारधी जमातीचे लोक दरोडा पाडण्याचे वेळेस पुरुषांनाच नव्हे तर स्त्रियांना मुलांनासुद्धा अत्यंत निर्दयपणे मारहाण करतात. प्रस्थापितांवरील राग हे त्यामागचे एक कारण असते. याशिवाय पोलिसांनी केलेली मारहाण हे एक कारण आहे.

पारधी वस्तीवर अटक करण्यासाठी एकटा दुकटा पोलीस जाऊ शकत नाही. त्यासाठी पूर्ण फौजफाटा महिला पोलिसांसकट जावे लागते. अन्यथा पारधी महिला आपली वस्त्रे फेडून टाकतात आणि पोलिसांवर विनयभंग आणि बलात्काराचे आरोप करतात.

अशा आरोपातून सुटलेले पोलीस पुढच्या वेळेस प्रत्यक्ष बलात्कार सुद्धा करतात असे दुष्ट चक्र आहे.

पोलिसांची रेड पडणार असे दिसले कि वस्तीतील पुरुष रानोमाळ पळून जातात अन दरोड्यातील मुद्देमाल पुरून ठेवतात किंवा कोणत्यातरी मारवाड्याकडे विकून पैसे घेऊन मोकळे होतात. सहसा हे लोक रोकड किंवा दागिने सोडून इतर वस्तुंना हात लावत नाहीत.

जे पकडले जातात त्यांना बेदम मारहाण होतेच पण काही दिवसांनी इतर पुरुष सुद्धा पकडले जातात. बेदम मारहाण झाली तरी हे आपली तोंडे उघडत नाहीत.

वस्तीवर मिळालेली चीजवस्तू पोलीस आपल्या खिशात टाकतात.

हे चोरीचे सोने विकत घेणारे मारवाडी आणि पोलीस यांच्यात पण साटेलोटे असतातच. ( जेंव्हा एखादया दुसऱ्या प्रवाशाची लूट होते तेंव्हा त्याची मोठी बातमी होत नाही)

खटला उभा राहतो तेंव्हा या चोरीच्या सोन्यात वाटेकरी असणारे हुशार वकील सुद्धा असतात.

ज्याला मारहाण होते तो माणूस काही साक्ष द्यायला येत नाही.

कारण तो मुंबई पुण्याचा किंवा हैद्राबाद मद्रासचा असतो त्याला हि कायद्याची कटकट नको असते.

तांत्रिक कारणामुळे किंवा पुरेशा पुराव्याअभावी बरेचसे आरोपी सुटतात.

खटल्याचं निकाल लागून काही गुन्हेगारांना वर्ष दोन वर्ष शिक्षा होते. एकदा सुटून आले कि परत दरोडा घालायला हि माणसे मोकळी असतात.

कोणत्याही गावात पारधी जमातीला घरे बांधू देण्यास किंवा त्यांना मजूरीच्या कामावर ठेवण्यास गावकऱ्यांचा विरोध असतो. यामुळे समाजापासून फटकून राहणारी हि माणसे इतर कोणत्या रोजगारापेक्षा दरोडे या भरपूर पैसे देणाऱ्या रोजगारावर जास्त अवलंबून असतात.

हे दुष्टचक्र ब्रिटिशांच्या काळापासून चालू आहे. राहण्यासाठी स्थिर घरे मिळाली तर या समाजाची गुन्हेगारी मानसिकता अजून तरी बदललेली नाही.

या वेशीबाहेरच्या माणसांना समाजप्रवाहात सामावून घेण्याचे प्रयत्न चालू आहेतच पण त्याला अजूनतरी मर्यादित यश आले आहे असेच म्हणावे लागेल.

सुबोध खरे's picture

9 Jan 2021 - 11:10 am | सुबोध खरे

जेथे दरोडे पडण्याची साक्यात अजस्त असते तेथे रेल्वे मध्ये रेल्वे सुरक्षा दलाचे हत्यारबंद जवान तैनात असतात. आणि ते गाडीचे डबे बंद करून आत मध्ये कडी लावण्यास सांगतातच. याशिवाय कोणत्या स्थानकावर किती प्रवासी चढणार किंवा उतरणार आहेत याचीही माहिती त्यांना असते त्याप्रमाणे ते त्या डब्यात जाऊन थांबतात.

परंतु रात्री सिगरेटी ओढण्यासाठी दरवाजा उघडणारे फुंक्ये किंवा बाहेरची "हवा खाण्यासाठी" दारात बसणारे हुशार लोक असतात. पोलीस पुढच्या डब्यात गेले कि हे लोक परत दार उघडतात. यामुळे पोलिसांची गस्त सुद्धा अपुरी पडू शकते.

दरोडा टाकणाऱ्या टोळीतील एखादा माणूस याच गाडीतून प्रवास करत असतो असा माणूस सुद्धा ठरवलेल्या ठिकाणी दरवाजा उघडतो आणि साखळी खेचून गाडी थांबवतो आणि दरोडा घालून पळून जातो.

यासाठी लोको पायलट( इंजिन ड्रायव्हर) ला बऱ्याच वेळेस सूचना असतात कि गाडी लगेच न थांबवता दोन तीन किमी अंतरावर जास्त सुरक्षित ठिकाणी थांबवावी.

या सर्व काळजी मुळे ९९ टक्के दरोड्याना प्रतिबंध केला जातो

पण उरलेला एक टक्का दरोडा हा "ब्रेकिंग बातमी" असल्यामुळे "मद्रास मेल वर धाडसी दरोडा" सारख्या टी आर पी खेचणाऱ्या बातम्या प्रसारीत करून त्याला ग्लॅमर देण्यात प्रेस्टिट्यूट पुढे असतात.

लुटमार केल्यानंतर त्या लपायला योग्य जागा असेल तिथेच हे लुटमार करतात.आजूबाजूला राहणारी च लोक असतात.
सावज हेरून चोरी किंवा लुटमार करणारे हे सराईत झाले .
पण ह्या भुरट्या चोरांना आपण ज्यांना लुटंनार आहे त्यांच्या कडे पैसे,दागिने आहेत की नाहीत ह्याची बिलकुल माहिती नसते.

सिरुसेरि's picture

8 Jan 2021 - 2:32 pm | सिरुसेरि

गंभीर आणी सावध करणारे अनुभव कथन .

गामा पैलवान's picture

9 Jan 2021 - 2:27 am | गामा पैलवान

जिन्क्स,

या निमित्ताने मुंबईच्या परिसरात रेल्वेवर टाकलेले अत्यंत धाडसी दरोडे आठवले. उत्तरेतनं कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्या वसई-दिवा-पनवेल मार्गाने जातात. या गाड्या वसईस रात्री दहानंतर येतात व पनवेलला रात्री ११ नंतर पोहोचतात. अशा काळ्याकिच्च रात्रीच्या सुमारास वसईहून निघालेल्या गाड्या भिवंडी गेलं की कोपर ( डोंबिवली नजीकचे गाव) पर्यंत निर्मनुष्य मार्गाने धावतात. त्या वेळेस पारध्यांनी अक्षरश: पंधरा मिनिटांत दरोडे टाकले आहेत. हा परिसर मुंबईच्या उपनगरी परिक्षेत्रात येतो. असे दरोडे म्हणजे रेल्वे पोलिसांच्या नाकावर टिच्चून घातलेले वाटतात. हल्ली सशस्त्र बंदोबस्त असतो असं ऐकून आहे.

सांगायचा मुद्दा असा की अतिशय अनपेक्षित ठिकाणीही दरोडा पडू शकतो.

आ.न.,
-गा.पै.

Rajesh188's picture

9 Jan 2021 - 9:50 am | Rajesh188

सावध राहणे म्हणजे आपण काय करू शकतो.
रात्री सुनसान रस्त्यावर गाडी थांबवू नये.
रात्रीच्या प्रवासात दागदागिने ,जास्त पैसे घेवून प्रवास करू नये.
रात्री कोणालाच लिफ्ट देवू नये.
स्वतः च्या स्वरक्षणा साठी अधिकृत परवानगी असलेले शस्त्र जवळ बाळगावे.
तसे शस्त्र नसेल तर लोखंडी रॉड,किंवा तस्तम वस्तू हाताला आहे येईल अशा ठिकाणी ठेवावे.
रात्री फूड हॉल ला थांबता ना कोणी आपले बोलणे लक्ष देवून ऐकत तर नाही ना ह्या वर लक्ष ठेवणे.
संशायपद हालचाल जाणवली तर प्रवास सुरक्षित जागेत राहून स्थगित करावा.

मुक्त विहारि's picture

12 Jan 2021 - 8:54 pm | मुक्त विहारि

माहिती बद्दल धन्यवाद

जिन्क्स's picture

20 Jan 2021 - 4:36 pm | जिन्क्स

हीच बातमी डकवण्यासाठी आलो होतो. माहितीसाठी धन्यवाद.