'नव्हाळीतले ना उमाळे उसासे' अर्थात 'जनूची प्रेमकथा'

Primary tabs

बबन ताम्बे's picture
बबन ताम्बे in दिवाळी अंक
14 Nov 2020 - 10:00 am'नव्हाळीतले ना उमाळे उसासे' अर्थात 'जनूची प्रेमकथा'

जनू सारसबागेच्या तळ्यातल्या गणपतीच्या पायरीवर उभा राहून बागेच्या प्रवेशदाराकडे किती तरी वेळ एकटक पाहात होता. मंद थंडगार झुळूक त्याची हुरहुर आणखी वाढवत होती. अचानक त्याच्या दिशेने दुलारे मॅडम झपझप चालत येताना दिसल्या. जनू खालपासून वरपर्यंत शहारला. दुलारे मॅडम आल्या? त्याचा विश्वास बसेना. घाईघाईने त्याने तिथेच गजरेवाल्याकडून पटकन गजरा विकत घेतला. दुलारे मॅडम जवळ आल्या आणि संकोच, थरथर, बधिरपणा या एकत्रित भावनांमुळे जनूच्या तोंडून शब्द फुटेना.
"हॅलो ...." दुलारे मॅडमच्या नाजूक आवाजाने तो भानावर आला.
"हॅलो मॅडम. हॅ हॅ, हो हो, तुम्ही....हॅ हॅ....." त्याने बोलायचा कसाबसा प्रयत्न केला.
"हे काय हो मि. जनार्दन! तुम्ही असं केलंत तर आम्ही नाही बोलणार जा." दुलारे मॅडम.
"हॅ हॅ, तुम्ही याल याची मला खातरी वाटत नव्हती, सॉरी वाटत होती, सॉरी..." जनू.
"ते जाऊ द्या. आपण इथेच उभे राहून बोलणार आहोत का? चला, आपण एखाद्या कोपऱ्यात बसू या. आणि मला अहो जाहो नाही करायचं हं!" दुलारे मॅडम मानेला झटका देत लाडीकपणे बोलल्या.
जनू हरखला. पण लगेच त्याच्या घशाला कोरड पडली. त्याच्या छातीत धडधडू लागले. अजूनपर्यंत सारसबागेच्या कुठल्याच कोपर्‍यात असा एखाद्या मुलीबरोबर किंवा तरुण स्त्रीबरोबर बसला नव्हता. दुलारे मॅडमच झपझप पुढे निघाल्या आणि एक कोपरा बघून बसल्या. जनू अंतर राखून त्यांच्या शेजारी बसला.
"हे काय हो? जवळ बसा ना!"
जनू आणखी थोडासा जवळ सरकला. दुलारे मॅडमने झटकन जनूचा हात धरला.
"तो गजरा शोभेला आणलाय का जानू?" दुलारे मॅडम लटक्या रागाने ओठांचा चंबू करत म्हणाल्या.
जनूच्या अंगात वीज सळसळत गेली. त्याने धुंदीत तो गजरा दुलारे मॅडमच्या केसांत माळला आणि आता काय होईल ते होईल असा मनाचा हिय्या करून स्वत:चा चेहरा मॅडमच्या चेहर्‍याजवळ नेला. दोघांचेही चश्मे एकमेकांवर आपटले आणि..

ठाककन मोठा आवाज झाला.

जनू दचकून जागा झाला. तो खूप चडफडला. च्यायला, चांगले रोमँटिक स्वप्न पडत होते. ह्या उंदरांनी मध्येच काशी घातली.. मोठा आवाज हा उंदरांचा प्रताप होता. रात्री डब्यांतले खाऊ खाण्यासाठी उंदरं त्यांची झाकणे बरोब्बर उघडत. आज डब्याचे झाकण मांडणीवरून खाली पडले, त्यामुळे मोठा आवाज झाला. त्याने काठी उचलली आणि उंदरांना हाकलले. संस्थेच्या प्रमुखांना किती वेळा सांगितले खोली बदली करून द्या, पण साले ऐकतील तर शपथ. रात्री नीट झोप नाही आणि इतर वेळी होस्टेलच्या रेक्टरची नोकरी. नुसता वैताग होता. सगळी संस्थेच्या कॉलेजमध्ये शिकणारी तरणी पोरे होती हॊस्टेलमध्ये. बिलकूल ऐकायची नाहीत. तो राउंडला निघाला की कुठूनतरी कोण ना कोण आवाज टाकायचेच - "जनू बांडे नॉट नॉट नॉट नॉट फायु आला. घाबरा रे.." त्यांच्या आयला यांच्या. आता आहेच आपली प्रकृती तोळामासा, त्याला काय करणार? दुसरीकडे कुठे नोकरी मिळाली नाही म्हणून इथे नोकरी धरली. कुठे यांच्या नादी लागता, म्हणत तो ऐकून न ऐकल्यासारखा करायचा.

कशीतरी त्याने तळमळत रात्र काढली. नाही म्हणायला दुलारे मॅडमनीसुद्धा हल्ली त्याची झोप खराब केली होती. सतत त्यांचेच विचार मनात येत.
त्याचे लग्नाचे वय उलटून पस्तिशी आली होती. लग्नाच्या वयात मुली बघितल्या, पण तो दिसायला चांगला नाही या कारणाने एका मुलीने त्याला नाकारले होते. दुसर्‍या र्एका मुलीने आरशात तोंड बघून ये असा निरोप पाठवला होता. त्यामुळे तो खूप चिडला होता. आईवडिलांना त्याने साफ सांगितले - "आता मी अजिबात मुली बघणार नाही." त्याने होस्टेलवर रेक्टरची नोकरी पकडली, पण लग्नाचे विचार तो झटकून टाकायचा.

दुलारे मॅडम मराठीच्या प्राध्यापिका होत्या. त्यांचीही तिशी उलटून गेली होती. एकदा जनू प्राचार्यांच्या केबिनमधून बाहेर आल्यावर व्हरांड्यातून चालला होता. दुलारे मॅडमचा वर्गातून आवाज येत होता. कुसुमाग्रजांची 'पृथ्वीचे प्रेमगीत' कविता त्या वर्गात तन्मयतेने शिकवीत होत्या.
युगामागुनी चालली रे युगे ही
करावी किती भास्करा वंचना
किती काळ कक्षेत धावू तुझ्या मी
कितीदा करू प्रीतीची याचना ......

जनू जागीच थबकला. एक गोड कळ त्याच्या काळजातून गेली. अहाहा, काय तो मंजुळ आवाज.. काय ती आर्जवे.. जनू स्वत:ला भास्कर आणि दुलारे मॅडमना पृथ्वीच्या रूपात पाहू लागला.

सदा शिपायाने जनूला माहिती पुरवली की त्यांना कडक मंगळ आहे, म्हणून त्यांचे लग्न अजून जमले नाही. हा सदा शिपाई एक वल्ली होता. त्याचा एक हात थोटा होता, पण अंगात नाना कळा. स्कुटर एका हाताने भर ट्राफ़िकमद्ध्ये चालवायचा. मटका, दारू सगळ्याची व्यसनं. मग पगार संपला की याच्या-त्याच्यापुढे हात पसरायचा. त्याला जनू आता चांगला बकरा मिळाला होता. कधीही त्याच्याकडे परत द्यायच्या बोलीवर पैसे मागायचा. अर्थात परत कधीच मिळायचे नाहीत. पण त्या बदल्यात जनूची तो छॊटी-मोठी कामे करायचा. ह्या वेळी त्याने जनूचे आणि दुलारे मॅडम सूत जमवायचे काँट्रॅक्ट स्वत:च्या शिरावर घेतले.

त्याने माहिती काढली की दुलारे बाईसुद्धा कविता करतात. त्याने एक दिवस त्यांच्याकडे जनूची तारीफ केली आणि सांगितले की तेसुद्धा छान कविता लिहितात.
दुलारे मॅडम म्हणाल्या, "हो का? आम्हाला द्या की वाचायला म्हणावं त्यांना."
सदाने पळत पळत ही बातमी जनूला सांगितली. जनूने कपाळावर हात मारला. तो भडकून बोलला, "अरे, बापजन्मी मी कधी कवितेच्या वाटेला गेलो नाही. तुला कुणी सांगितला हा उपद्व्याप?"
सदा हार मानणारा नव्हता. तो म्हणाला, "सर, तुम्ही ट्राय तर करून बघा. जमेल तुम्हाला. मी तर झूट बोले कव्वा काटे या गाण्यावर शाळेत असताना पोरगी पटवली होती. तुम्ही तर शिकलेले. काय ना वो, करा डेरिंग सर."
जनू त्या रात्री आढ्याकडे टक लावून स्फूर्ती यायची वाट बघत बसला. ते श्रावणाचे दिवस होते. बाहेर सरी कोसळत होत्या. बरेच कागद चोळामोळा करून टाकल्यावर त्याने कशीबशी एक कविता खरडली आणि दुसर्‍या दिवशी सदाच्या हाताते ते चिठोरे दिले.
सदा पळतपळत तो कागद घेऊन दुलारे मॅडमकडे गेला. मॅडमने कागद खोलला आणि वाचायला सुरुवात केली.

आला श्रावण, आला श्रावण
झाडांना नवी पालवी फुटली
चिमण्या घरटे बांधू लागली
मोहोर आंब्याचा दरवळू लागला
पुलकित झाले माझे मन मन
आला श्रावण आला श्रावण! ॥ध्रु..॥

आला श्रावण, आला श्रावण,
मटण मच्छी स्वस्त जाहले
घराघरातून सुवास दरवळे
खवय्यांची चंगळच चंगळे
आला श्रावण, आला श्रावण ॥ध्रु.॥

दुलारे मॅडम कविता वाचल्यावर खो खो हसत सुटल्या. सदा वेड्यासारखा पहात राहिला.
डोळ्यातले पाणी पुसून मॅडम सदाला म्हणाल्या, "अरे सदू, कवीला सांग कवितेसाठी थोडेसे भौगोलिक भानही लागते. श्रावणात काय झाडांना नवी पालवी फ़ुटते? आणि आंब्यांना मोहोर? खवय्यांची चंगळ? मी मराठीची प्राध्यापिका आहे. माझी चेष्टा करता काय? कसली भंकस आहे ही!" असे म्हणून तो कागद त्यांनी सदूच्या अंगावर भिरकावून दिला.

सदूने घडलेला वृत्तान्त जनूला सांगितला. जनू खूप खट्टू झाला.
सदूने परत धीर दिला. "काही घाबरू नका हो सर. त्या सनम तेरी कसम गाण्यात नाही का, नफरतसे देखना पहले, अंदाज प्यार का है ये असे कमल हसन म्हणतो? नंतर त्याला हिरॉइन पटते का नाय? हे बी तसंच हाये. मी तर शाळेत एका पोरीला त्रास देऊन पटवली होती. आधी लय नखरे केले. नंतर म्हणली, तुज्याशिवाय करमत नाय. तुम्ही प्रयत्न करणं सोडू नका. त्यांना क्रीकेटचीपण लय आवड हाये. कॉलेजची पोरं क्रीकेट खेळतात, तव्हा त्यापण पोरांचं क्रीकेट बघायला येत्यात. तुम्ही पोरांच्यात रोज क्रीकेट खेळत जा. बघा, हळूहळू तुमच्यासाठी रोज यीतील त्या."
च्यायला या सद्याच्या. काय काय आयडिया देतोय पटवायच्या. पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? जनू मनाशी म्हणाला.

दुसर्‍या दिवशी त्याने संध्याकाळी लांबूनच पाहिले. होस्टेलची पोरे क्रिकेट खेळत होती आणि दुलारे मॅडम व्हरांड्यात पुस्तक वाचत पाठमोर्‍या बसल्या होत्या.
सदा जनूला म्हणाला, "तुम्ही व्हरांड्याजवळ फील्डिंगला उभे रहा. म्हणजे मॅडमचे लक्ष तुमच्याकडे अधूनमधून जाईल."
जनू त्याप्रमाणे मॅडमना चाहूल लागू न देता फील्डिंगला उभा राहिला. पोरांनी लगेच जनू बांडे आला रे म्हणून गलका केला. जनूने दुर्लक्ष केले. सदूने बॅटिंग करणार्‍या पोराला कानात काहीतरी सांगितले. त्या पोराने पुढचा बॉल असा टोलवला की बरोब्बर तो दुलारे मॅडमच्या पाठीत बसला. सगळी पोरे पळाली.
दुलारे मॅडम "आई गं" म्हणून मोठ्याने किंचाळल्या. त्यांनी पाठमोरे वळून पाहिले, तर पहिला जनूच त्यांना दिसला.
त्या ओरडल्या, "लाज नाही वाटत बायकांना असे बॉल फेकून मारायला? आई गं. केव्हढा जोरात बॉल लागला पाठीत."
जनू घाबराघुबरा झाला. तो अनवधानाने बोलून गेला , "फार लागले का? पाठ चोळून देऊ का?"
दुलारे मॅडम शॉक लागल्यासारख्या किंचाळल्या, "काय? बेशरम! लाज नाही वाटत असे बोलायला? नालायक!"
जनूच्या अंगावर जणू वीज कोसळली. बापरे, घाबरल्या अवस्थेत आपण काही तरी भलतेच बोलून गेलो. जनूला माफी मागायचेहि सुचेना.
दुलारे मॅडम संतापाने लालबुंद होऊन निघून गेल्या.
सदा धावतधावत आला. "काय बोलल्या का मॅडम तुम्हाला सर?" सदाने शहाजोगपणे जनूला विचारले. जनू संतापला, "काय बोलल्या? मला शिव्या घालून गेल्या. च्यायला त्या कार्ट्यांच्या.. त्यांना आजच सुचले होय मॅडमच्या पाठीत बॉल मारायला?"
सदूने पुन्हा एकदा धीर दिला. "जाऊ द्या हो सर. हे होतेच. मी सांगतो ना. मी तर एकदा...."
"सदा, तु़झ्या स्टोरी राहू दे. फार मनस्ताप झालाय मला या प्रकरणात..." जनू सदावर वैतागला.

हार मानेल तर नावाचा सदू कसला? दुसर्‍या दिवशी तो हळदकुंकू लावलेले एक पिकलेले सफरचंद घेऊन जनूकडे आला. त्याची टकळी सुरू झाली.
"ऐका ना सर. काल मी हे ना, आमच्या गुरूंकडं गेलो होतो. तुमची समस्या त्यांना मी नाव न सांगता डीटेलवार सांगितली. ते महाराज म्हणले का दोष मॅडमच्यात हाये. त्यांना साडेसाती हाये. म्हणून त्यांचं अजून लगीन जमलं नाय. पण एक व्यक्ती त्यांच्या आयुष्यात लवकरच येणार हाये. ज नावाची. म्या ह्बाकलोच. अहो ज नावाची म्हणजे तुम्हीच. महाराज म्हणले का त्या ज नावाच्या व्यक्तीने हे मी दिलेले सफरचंद त्या मॅडमला माझा प्रसाद म्हणून त्यांना खायला दिला, का त्या मॅडमची साडेसाती निघून जाईल. सर, आता माघार घेऊ नका. महाराजांचा लय गूण आलाय बहुतेकांना!" सदूने जनूला परत जणू हिप्नोटाइझ केले.

जनूच्या मनात परत आशा पल्लवित झाल्या. दुसर्‍या दिवशी तो सदाने दिलेले सफरचंद घेऊन डायरेक्ट टीचर रूममध्ये घुसला. दुलारे मॅडम एकट्याच पुढच्या तासाचे वाचन करत बसल्या होत्या. जनूने ते सफरचंद दुलारे मॅडमपुढे धरले आणि म्हणाला, "मॅडम, तुमचं लग्न जमत नाही ना? हे सफरचंद तुम्ही खाल्ले ना, तर तुमची सगळी साडेसाती निघून जाईल. आमच्या महाराजांनी सांगितलेय. प्रसाद आहे त्यांचा, खा." जनू उसने अवसान आणून एका दमात बोलून गेला. दुलारे मॅडम आधी आश्चर्यचकित झाल्या आणि नंतर भयंकर चिडल्या. त्यांनी ते सफरचंद खिडकीबाहेर फेकून दिले आणि ओरडल्या, "हे बघा मि. जनार्दन, तुम्ही मला खूप मानसिक त्रास दिलाय. तुम्ही पहिले इथून निघा. मी संस्थेकडे तक्रार करीन तुमची."

जनू तिथून पळाला आणि निराश, अपमानित अवस्थेत रूमवर आला. दुसर्‍या दिवशी त्याला मॅनेजिंग कमिटीच्या ऑफिसमध्ये बोलावणे आले.
संस्थाचालक म्हणाले, "हे पहा जनार्दन सर, तुमच्याविषयी एक गंभीर तक्रार आली आहे. तुम्ही म्हणे संस्थेतील एका प्राध्यापिकेला मानसिक त्रास दिलात? हे खरे आहे का?"
जनूची त-त-प-प झाली. तो गप्प उभा राहिला. संस्थाचालकांनी त्याला जायला सांगितले.
थोड्या वेळाने त्याच्या रुमवर संस्थेच्या लेटरहेडवर एक नोटिस येऊन थडकली - 'आपण केलेला गुन्हा अक्षम्य आहे. संस्थेची बदनामी होऊ नये या कारणास्तव आपणास नोकरीतून तातडीने काढून टाकण्यात येत आहे.'

जनू प्रचंड पस्तावला. उगाच त्या सद्याच्या नादी लागलो.. मनोमन तो म्हणू लागला.
त्याने आवरायला घेतले. बॅगेवरची धूळ झटकली आणि निराश मनाने खाली मान घालून कपडे भरायला लागला.
तेवढ्यात दारात एक सावली पडलेली त्याला दिसली. "आत येऊ का?" सावलीने त्याला मंजुळ आवाजात विचारले.
जनूचा स्वत: वर विश्वास बसेना. दारात दुलारे मॅडम!
"दुलारे मॅडम? या, बसा" तो कसाबसा बोलला.
मॅडम आत आल्या आणि म्हणाल्या, "मला सगळे समजलेय. जे झाले, त्यात तुमचा काही दोष नाही. त्या सद्याने हे सगळे तुमच्याविरुद्ध घडवून आणलेय. त्याला तुमच्या जागेवर त्याच्या मेहुण्याला चिकटवायचेय म्हणून."
"काय..? सद्या...?" सदूला खाऊ की गिळू असे जनूला झाले.
"तुमच्या घरी कोण कोण असतं?" दुलारे मॅडमच्या प्रश्नाने जनू भानावर आला.
"थांबा, मी तुमच्यासाठी आधी चहा करतो." जनू म्हणाला आणि कीचनमध्ये गेला.
"चहा किती गोड करू तुमच्यासाठी?" जनूने विचारले.
"तुमच्याएवढा गोड चालेल.." दुलारे मॅडम हसून म्हणाल्या.
जनू लाजला.
दुलारे मॅडम पुढे म्हणाल्या, "मीही या संस्थेचा राजीनामा दिलाय. नोकरी काय, दुसरीकडेसुद्धा मिळेल.आपण लग्न करू या का?"
जनूने मॅडमचा हात हातात घेतला आणि म्हणाला, "मॅडम, तुमच्याच आवडत्या पृथ्वीचे प्रेमगीत या कवितेच्या ओळी म्हणतो -
तळी जागणारा निखारा उफाळून
येतो कधी आठवाने वर
शहारून येते कधी अंग तुझ्या
स्मृतीने उले अन् सले अंतर..
"

प्रतिक्रिया

टर्मीनेटर's picture

15 Nov 2020 - 5:43 pm | टर्मीनेटर

@बबन ताम्बे

'नव्हाळीतले ना उमाळे उसासे'...

ही तुमची कथा आवडली  👍

पुढील लेखनासाठी शुभेच्छा!

✨ शुभ दीपावली ✨

टर्मीनेटर

बबन ताम्बे's picture

15 Nov 2020 - 6:46 pm | बबन ताम्बे

आपण कथा आवडली हे कळवल्याबद्दल व आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद .

गवि's picture

15 Nov 2020 - 8:57 pm | गवि

छान आहे...

बबन ताम्बे's picture

16 Nov 2020 - 9:06 am | बबन ताम्बे
बबन ताम्बे's picture

16 Nov 2020 - 9:06 am | बबन ताम्बे
दुर्गविहारी's picture

15 Nov 2020 - 10:51 pm | दुर्गविहारी

कथा छान फुलवली आहे, अगदी वि.आ.बुवा स्टाईल.पण शेवट जमून आला नाही.उगाच ओधून ताणून आणल्यासारखा वाटला.

बबन ताम्बे's picture

16 Nov 2020 - 9:05 am | बबन ताम्बे

वि.आ.बुवांचा मी ही फॅन आहे. आपणास शेवट आवडला नाही हे प्रांजळपणे सांगितले त्याबद्दल धन्यवाद. लॉक डाऊन मध्ये नेमके ऑफीसचे काम जास्त आले त्यामुळे कथा लिहायला वेळच मिळत नव्हता.25 ऑक्टोबर शेवटची तारीख होती कथा पाठवायची त्यामुळे शेवटच्या दिवशी रात्री 12 पर्यंत बसून कथा लिहिली. त्यामुळे घाई झाली.

शा वि कु's picture

16 Nov 2020 - 9:07 am | शा वि कु

असंच वाटलं.

सुरुवात मस्तच विनोदी.. .हसून हसून पुरेवाट..शेवट वेगळा पाहिजे ... मस्त खुसखुशीत कथा..

व्वा बबनराव, धमाल कथा लिहीली आहे. तुम्ही स्वतः चित्रे काढत असल्याने की काय लिखाण एकदम चित्रदर्शी वाटते. (जीएंच्या बाबतीतही असेच होते ) जनू आणि दुलारे मॅडम ही नावे आणि त्यांचे वर्णन, चष्म्याला चष्मा आदळणे, जनूची कविता सारेच मजेदार.

मटण मच्छी स्वस्त जाहले
घराघरातून सुवास दरवळे
खवय्यांची चंगळच चंगळे

... हे तर खासच.
आणि शेवटी त्या महाराजांनी दिलेले सफरचंद खरोखरीच कामास आले की हो. मस्त.
.
हेच ते अ‍ॅप्पल वाले बाबा की काय ?

बबन ताम्बे's picture

16 Nov 2020 - 8:55 am | बबन ताम्बे

खूप खूप धन्यवाद चित्रगुप्तजी. एका महान कलाकाराची अशी दिलखुलास दाद मिळाली, अजून काय हवे. तुमचाही लेख मी वाचलाय. तिकडे प्रतिसाद देणारच आहे.
मी लिहिलेली कथा आपणास आवडली हे वाचून खूप आनंद झाला.
मिपाच्या या दिवाळी अंकात सर्व लेखकांनी दिवाळीची खमंग मेजवानी दिलीय असे मला वाटते.
चित्रे काढणे सध्या बंद आहे. लवकरच पुनःश्च हरी ओम करणार आहे.
आतापासून तुम्ही सल्ला दिल्या प्रमाणे फोटो कॉपी बंद ☺️
स्वतः ची काहीतरी कलाकारी!

बबन ताम्बे's picture

16 Nov 2020 - 9:00 am | बबन ताम्बे

ऍपल वाले बाबा खासच☺️
अगदी कॉम्प्युटर वर कुंडली मांडून भक्तांना सल्ले देताहेत वाटते!
मी लिहिलेला बाबा आणि सफरचंदाचा प्रसंग मात्र खरा आहे.☺️☺️

Bhakti's picture

19 Nov 2020 - 12:46 pm | Bhakti

:)

सतिश गावडे's picture

16 Nov 2020 - 2:46 pm | सतिश गावडे

आवाज स्टाईलची कथा लिहिण्याचा प्रयत्न आवडला

चौथा कोनाडा's picture

17 Nov 2020 - 12:56 pm | चौथा कोनाडा

आला श्रावण, आला श्रावण,
मटण मच्छी स्वस्त जाहले
घराघरातून सुवास दरवळे
खवय्यांची चंगळच चंगळे
आला श्रावण, आला श्रावण ॥ध्रु.॥

FLWR04202354

व्वा, बबन ताम्बे साहेब, `जनूची प्रेमकथा' एकदम फर्मास ! मजा आली !
१९८० च्या दशकातील आवाज, जतरा, मोहिनी, चपराक इ मासिकातील विआ बुवा, गंगाधर गाडगीळ यांच्या झकास गुलाबी कथांची आठवण झाली ! शैली एकदम परफेक्ट जमलीय.
(आमचे ही "असे दिवस आणि असे किस्से" आठवले) कथेसोबत ज्ञानेश सोनार, हळबे, खलीलखान यांच्या शैलीतील चित्र असते तर आणखी धमाल आली असती !
FLWR042023
(आम्ही स्वतःच कल्पनेनेच जनू. सद्या अन दुलारे मॅडम यांचे चित्र इमॅजिन केले !)

शेवटी जनूला दुलारे मॅडम मिळतात हे भारी वाटलं !

अगदी कथेला साजेसं चपखल व्यंगचित्र टाकलेत आपण . मस्त !
कथा आवडली हे कळवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
तुमचेही असे दिवस, असे किस्से आठवले म्हणताय. मग होऊन जाऊ द्या एक फर्मास लेख. आवडेल आम्हाला वाचायला.

टवाळ कार्टा's picture

19 Nov 2020 - 12:58 pm | टवाळ कार्टा

अगदी अगदी.....आवाज किंवा जत्रा टाईपची आठवण झाली....धमाल आहे

जनुचे पराक्रम वाचून हसू आले...
वर म्हणल्याप्रमाणे शेवट rewrite होतो का बघा

मित्रहो's picture

18 Nov 2020 - 5:08 pm | मित्रहो

मस्त कथा आहे. मजा आली वाचताना. ती जनूची कविता भयंकर आवडली. ती महाकवी जनू यांची कविता टिपून ठेवली आहे. आवाज, जत्रा यासारखे व्यंगचित्र असते तर आणखीन मजा आली असती.
मला शेवट सुद्धा आवडला. जनूला परत तिथेच नोकरीत घेतले असते तरी चालले असते.

स्मिताके's picture

18 Nov 2020 - 9:19 pm | स्मिताके

ध मा ल कथा. आवडली.

प्राची अश्विनी's picture

18 Nov 2020 - 9:45 pm | प्राची अश्विनी

कथा एकदम फर्मास. आवडली.
अन् कविता वाचून हहपुवा.

बबन ताम्बे's picture

18 Nov 2020 - 10:42 pm | बबन ताम्बे

सुखी,मित्रहो, स्मिता के, प्राची अश्विनी - खूप खूप धन्यवाद.
@सुखी, सम्पादनाची सोय नाही, नाहीतर शेवट थोडासा चेंज केला असता.

ज्ञानोबाचे पैजार's picture

19 Nov 2020 - 10:12 am | ज्ञानोबाचे पैजार

जनूची प्रेमकथा खुपच आवडली,
सोबत जनू आणि दुलारेबाईंची चित्रे असती तर अजून मजा आली असती
पैजारबुवा,

अथांग आकाश's picture

19 Nov 2020 - 12:09 pm | अथांग आकाश

मजेदार कथा!!!
.

बबन ताम्बे's picture

20 Nov 2020 - 8:05 pm | बबन ताम्बे

धन्यवाद ट का, अथांग सागर , ज्ञानोबाचे पैजार !
चित्रे काढायला वेळच मिळाला नाही. आणि त्यात व्यंगचित्रे तर खूपच अवघड .