हळवं मन

VRINDA MOGHE's picture
VRINDA MOGHE in जनातलं, मनातलं
13 Oct 2020 - 3:08 pm

"सम्या, अरे गधड्या ! आवरलं कि नाही अजून तुझं ?" नंदिनीचा आवाज आता आणखीनच वाढला.
एकतर सकाळची धावपळ सुरू होती तीची. आणि समीरचं अगदी हळुहळु रेंगाळत आवरणं चालू होतं. त्याची आज नेमकी शाळेची रिक्षा येणार नव्हती म्हणून त्याला शाळेत सोडून मग परत घरी येऊन बाकी कामं आवरून तीला ही साडेआठला ऑफिसला निघायचं होतं.
आलोक सकाळी सातलाच पोळीभाजीचा डबा घेऊन गेला होता आज त्यालाही लवकर जायचं होतं एका क्लायंटला भेटून मग पुढे ऑफीसला जायचं होतं. नंदिनीने अजून बाकी पोळ्या करून.. समीरच्या डब्यासाठी भाजी घालून एक रोल मग एक तुप साखरेचा रोल असं त्याला हवं तसं घालून तीने डबा भरला. त्याची वाॅटरबॅग भरून दप्तराजवळ ठेवली. नी पटकन चेहरा धूवून केस आवरले. आरशात बघून टिकली टेकवली. आतल्या बेडरूम मधे डोकावून नाना झोपलेत का बघीतलं. नाना जागेच होते. केव्हाचेच उठून तीची धावपळ ऐकत होते. त्यांना गरम गरम चहा प्यावासा वाटत होता.. पण तीच्या धावपळीत मधेच कुठे मागायचा चहा. त्यांनी हळुच आवंढा गिळला. त्यांना परवापासून ताप येत होता आजही थकवा खूप जाणवतोय म्हणून तसेच पडून राहिले. नंदिनीने त्यांच्या कडे बघत म्हटलं "नाना, पडून राहा. मी समीरला शाळेत सोडून येते पटकन.. आल्यावर तुम्हाला चहा, औषध देईन. "
समीर बुटाच्या लेसशी खेळत बसलेला बघून तीने त्याच्या पाठीत हलकासा धपाटा घातला.."आवर ना रे, चटकन. तुला येत नाही का बुटाची लेस बांधता? आज का असा रेंगाळतो आहेस ?" बोलता बोलता तीनेच लेस बांधली. रोजसारखा सगळा पाढा वाचला. "डबा ?' समीरचं उत्तर "भरला दप्तरात" वाॅटरबॅग, कंपास, निबंधाची वही, टोपी..सगळं विचारून झालं. मग सुचना.."दुपारी शाळा सुटली कि तीकडेच थांब आज रिक्षावाले काका नाही येणारेत घ्यायला हे लक्षात ठेव. मी शांता बाईला पाठवते तीचा हात धरून नीट ये घरी. धांदरटपणा करू नकोस. तीला पाच दहा मिनीट उशीर झाला तरी तीकडेच थांबून रहा. कळलं का?"
हे सगळं होईतो सात पंचवीस झालेच. पटकन खाली येऊन स्कुटीवरून त्याला सोडून आली नंदिनी. सात चाळीस ला प्रार्थनेची घंटा होईतो ती दोघं पोचली होती शाळेत. नंदिनी वेळ पाळण्याच्या बाबतीत एकदम पक्की.
इकडे ती दोघं गेल्यावर नाना हळुच उठून बसले. अशक्तपणा खूपच जाणवत होता तरीही तोंड धूवून फ्रेश झाले. त्यांना खूप वाईट वाटत होतं. नंदिनीची धावपळ त्यांना बघवत नसे. आज ते बरे असते तर तीचं समीरला शाळेत सोडण्याचं काम तर नक्कीच केलं असतं त्यांनी.
साधना -त्यांची पत्नी गेल्यापासून ते नंदिनीला तशी खूप मदत करायचे. भाजी वाण सामान तर बहुधा तेच आणायचे. आलोकही त्यांना म्हणायचा," नाना, मी संध्याकाळी येताना आणत जाईन. तुम्ही एवढं नका आणत जाऊ सगळं". पण त्यांचं मत होतं आपलं कोणाला ओझं वाटता कामा नये.
ते फ्रेश होऊन डायनींग टेबलशी बसले तेवढ्यात नंदिनी आलीच. हातपाय धुवून तडक किचनमधे गेली. चहाचा आणि आल्याचा मस्त सुगंध दरवळत आलाच नानांपाशी. किती प्रेमाने करत असते नेहमी ही आपलं.
आज का चिडली होती पण एवढं..तीला वाटलं असेल का की तीला गरज असताना मी तीच्या काहीच उपयोगी पडत नाहीए. तीची धावपळ बघत मी नुसताच पडलोय. साधना असती तर तीचं बरंच काम हलकं झालं असतं. साधना उगीच गेली आधी. तीच्या ऐवजी मी गेलो असतो तर ? आपण निरूपयोगी आहोत असं तीला वाटलं असेल का? आधीच सगळी कामं.. त्यात यांना बरं नाही म्हणून यांची काळजी पण घ्यावी लागतेय, दवाखान्यात नेऊन आणलं परवा. औषधं गोळ्या द्याव्या लागतायत आठवणीने. असं वाटत असणार तीला. म्हणून तीला राग आला असणार.
थोड्याच वेळात ती तीचा आणि नानांचा चहा आणि एका ताटलीत गरम गरम एक पोळी घेऊन आली. नानांना म्हणाली,
"नाना, गरम गरम आलं घातलेला चहा घ्या. बरं वाटेल. आणि गरम गरम एक पोळी पण खा त्याबरोबर. "
चहाचा एक घोट घेताच नानांना अगदी बरं वाटलं..चहा करावा तर नंदिनीनेच. साधनासारखाच करते अगदी. नकळत डोळे पाझरू लागले. आजारी माणूस तसंही हळवा होतोच. आणि मघाच्या विचारांनीही त्यांना हळवं केलं होतं. त्यांचे आजारी हात थरथरले. डोळ्यातलं पाणी कडांशी जमा झालं.
नंदिनी बोलत होती..."नाना, मघाशी माझी थोडी चिडचीड झाली...सम्यावर चिडले हो मी..नऊ वर्षांचा झालाय हा समजत कसं नाही याला... आजच नेमकं आलोकलाही जायचं होतं लवकर. रिक्षेवाला पण नाही आला आणि हा पोरगा भरभर आवरतही नव्हता. म्हणून थोडी चिडचिडले मी.
बरं ते जाऊ दे. तुम्हाला आज कसं वाटतय ? अशक्तपणा आहे ना अजून ? आजही आराम करा छान. पडून रहा. शांताबाई येईलच. मी जाताना जोशी काकांना सांगून जाते..बारा साडेबाराला इथे येऊन बसायला. शांता समीरला आणायला जाईल ना तेव्हा. म्हणजे तुम्हाला एकटं नको वाटायला आणि दुपारची औषधं पण मी काढून ठेवेन. उठू नका सारखं सारखं बरं का ? आणि शांताबाईला दुपारी गरम गरम मऊभात अगदी तुम्हाला आवडतो तसा करायला सांगु का?"
इतकं प्रेमाने बोलत होती नंदिनी..नानानी हळुच डोळे टिपले. आणि मघाच्या स्वतःच्या वेड्या विचारांचं हसू अलगद
पांढ-या मीशांच्या आडून गालावर ओघळलं. चहाचा कप धरलेला हात उगाचच थरथरला.
©सौ वृंदा मोघे.
14/9/18

कथालेख

प्रतिक्रिया

चौथा कोनाडा's picture

13 Oct 2020 - 3:31 pm | चौथा कोनाडा

चहा करावा तर नंदिनीनेच. साधनासारखाच करते अगदी. नकळत डोळे पाझरू लागले. आजारी माणूस तसंही हळवा होतोच. आणि मघाच्या विचारांनीही त्यांना हळवं केलं होतं. त्यांचे आजारी हात थरथरले. डोळ्यातलं पाणी कडांशी जमा झालं.

इतकं प्रेमाने बोलत होती नंदिनी..नानानी हळुच डोळे टिपले. आणि मघाच्या स्वतःच्या वेड्या विचारांचं हसू अलगद
पांढ-या मीशांच्या आडून गालावर ओघळलं. चहाचा कप धरलेला हात उगाचच थरथरला.

👌
वाह, अतिशय सुंदर !

छोटीसी साधीच कथा, पण हळवं करून गेली !

VRINDA MOGHE's picture

13 Oct 2020 - 4:04 pm | VRINDA MOGHE

धन्यवाद