घर श्रीमंताचं...
हे नाव वाचून दचकलात ना?
हो, माझं घर आहे श्रीमंताचंच, आणि ते मी अगदी मिरवून सांगते. विषय नात्याचा आहे, त्यातल्या ओलाव्याचा आहे. हळुवार आठवणीचा आहे, म्हणून त्याचं नाव 'घर श्रीमंताचं' आहे.
काही दिवसांपूर्वी माझ्या मामाला देवाज्ञा झाली आणि खूप काही मनात दाटून आलं. अव्यक्त, नकळत साचून ठेवलेलं, तरीही अव्यक्त राहिलेलं... खूप काहीतरी! सांगता न येणारं ओझं होतं मनावर.
आजकाल सगळी मुलं गॅजेट्सवर जगत असतात. मामाची बातमी कळली आणि याच माध्यमातून मी त्याचं अंत्यदर्शन घेतलं.
माझं आजोळ कोकणातलं.
मामा आजोळीच होता. आईचं एकत्र कुटुंब. 'एकत्र कुटुंब' हा शब्द आपण आता वापरायला लागलो, जेव्हापासून कुटुंब स्वतंत्र झाली. असो. आईचं संपूर्ण कुटुंब काका-काकी, घरचा नोकरदार वर्ग सगळे जण एका वाडावजा घरात एकत्र राहत.
कालांतराने ते घर पडलं. माझ्या बघण्यात त्या घराची पडझड झाली. ते खंडार झालेलं घर मी खूप दुःखी होऊन पाहिलं. त्याच जागी मग प्रत्येकाने आपला स्वतंत्र संसार थाटला, प्रत्येकाचं एक-एक घर झालं. घरं वेगळी झाली, मनं मात्र तशीच राहिली. कुंपण नसलेली, मुक्त.
आम्हा मुलांची तर खूपच चंगळ झाली. कुठे वाटेल तिकडे जेवायला जा. जेवणाचा बेत काय असेल त्यावर आम्ही कुठे जेवायला जायचं ते ठरवतं असू.
त्या दिवशी तो खुर्चीवर ठेवलेला मलूल देह माझ्या मामाचा नव्हताच मुळी. तो निष्प्राण देह कसा असू शकतो.. त्याचा, जो कधीही बसून राहिला नाही. त्याला तुम्ही असं खुर्चीवर कसं काय ठेवलं आहे? माझ्या बुद्धीला हे मान्यच होत नव्हतं. ते शरीर माझ्या मामाचं वाटतचं नव्हतं मुळी. डोकं सुन्न झालं.
माझ्या मुलांना समजत नव्हतं की, आई इतकी दुःखी का झाली? त्यात एक सांत्वनपर फोन आला. "तो तुझा सख्खा मामा होता का?" मी भानावर आले. खरंच अशी वाटणी करता येते का? माझ्या आठवणींना ही किनार कधीच नव्हती. त्या दिवशी मी फक्त भाची होते. ते सगळं असह्यपणे बघणारी. कारण तसंच होतं. सख्खं आणि चुलत ह्या नात्यांमध्ये मी खूपच श्रीमंत होते आणि आहे.
माझं आजोळ कोकणातलं. खूप काटकसरीने गेलेलं, पण खूप लाडातही गेलेलं. गावात आलं की ह्या मामाचं घर पहिलं लागायचं. माझ्या आईला माहेरी आणायची जबाबदारी ह्या मामाची असायची. 'आईचा मुराळी' म्हणायचे त्याला. आम्ही आलो की तोच खूप खूश असायचा. माझी मामी लवकर गेली, त्यामुळे त्याला एकटं बघायचची सवय लागली. प्रथमदर्शनी दिसणारं त्याचं कौलारू घर मला आठवतं. कोकणातली माणसं आणि घर दोन्ही ही साधी आपल्या आस्तित्वाची दडपण न देणारी.
आता भावाने नवं घर बांधलं. लाल चिऱ्याचं घर जाऊन चांगल सिमेंटचं घर आलं. डोळे दिपावणारं मोठं, पण माझं लहानपण गेलं ते त्या जुन्या घराबरोबर.
मामा खूप गप्पा मारायचा, खूप काही करायचा. ही खरी श्रीमंती! माझी चाळीशी आली, तरीही मला आठवड्यातून खुशालीचा एक फोन माझ्या सख्ख्या मामाचा, तर येतोच, तसाच चुलत मामाचाही येतो, "काय गो, बरी मा?? काळजी घे." हेच बोलतात, पण तो फोन येतो मला आजही.
आज किती जणांच्या बाबतीत हे होतं? माझी पुढची पिढीसुद्धा हे करते. माझी भाचे मंडळीही फोन करतात. मावशी म्हणून एक फोन येतो. हे सगळं ऑनलाइन मागवता येईल का? हे सगळं कुठे मिळेल का? हे विकत घेता येईल का? याचं उत्तर माझ्या मुलांकडे नव्हतं. ती निःशब्द झाली आणि हे कागदावर उतरवून मीही रिती झाले ह्या श्रीमंतीच्या नात्यातून...
- दीपा सामंत.
औंध, पुणे.
प्रतिक्रिया
14 Nov 2020 - 4:13 pm | विजुभाऊ
खूप छान, प्रांजळ आणि थेट भिडणारं लिहीलं आहे
15 Nov 2020 - 4:37 pm | टर्मीनेटर
@deepa09s
'घर श्रीमंताचं...'
हा लघुलेख आवडला 👍
पुढील लेखनासाठी शुभेच्छा!
✨ शुभ दीपावली ✨
टर्मीनेटर
@deepa09s
'घर श्रीमंताचं...'
✨ शुभ दीपावली ✨
टर्मीनेटर
16 Nov 2020 - 12:47 am | चित्रगुप्त
खूपच छान लिहीले आहे पण लेख खूपच छोटा आहे. मामासोबतच्या, कोकणातल्या त्या घराच्या, गावाच्या, इतर लोकांच्या वगैरे आणखी आठवणी वेगळ्या एका लेखात अवश्य लिहाव्यात, ही विनंती.
20 Nov 2020 - 12:34 pm | मित्रहो
छान लिहिले आहे. अजून लिहिले असते तरी चालले असते.
24 Nov 2020 - 9:47 pm | मुक्त विहारि
लेख आवडला..