कथा - पोट

केदार पाटणकर's picture
केदार पाटणकर in जनातलं, मनातलं
27 Aug 2020 - 10:20 am

हरीश उठला. आज त्याच्या घरी कोणीच नव्हते. आईबाबा दूरच्या नात्यातल्या लग्नाला गेले होते. हरीशची तिथं फार ओळख नव्हती. तो नाही आला तरी हरकत नाही, असं म्हणून फक्त आई-बाबाच लग्नाला गेले. आता हरीशपुढे अख्खा दिवस होता. त्याने रेडिओ मिर्ची लावली. स्वैपाकघरात गेला. हरीशचं घर बैठं. स्वैपाकघराच्या खिडकीतून समोरची बांधकाम सुरु असलेली इमारत दिसत होती. हरीशच्या घराचं कुंपण ओलांडलं की रस्ता. काही अंतर सोडून इमारतीचं काम. आज तिथे सामसूम होती. विटा, सिमेंटची पोती असं साहित्य पडून होतं. आज कामगारांना सुटी दिली की काय, असं हरीशला वाटलं.
तेवढ्यात मिलिंदचा फोन वाजला.
“मॅच ठरवली आहे रे. ये लवकर. तुझे ग्लोव्हज घेऊन ये. पद्माकरलाही सांगितलंय.”
हरीशला काहीही बोलू न देता मिलिंदने फोन ठेवला. मिलिंद, पद्माकर दोघंही त्याच्या वर्गातले.
“काय माणूस आहे. मी घरी आहे की नाही, मला दुसरी कामे आहेत की नाही, कसलाही विचार न करता डायरेक्ट सिलेक्शन ?”
हरीश आतून सुखावलाही होता. आपल्या मित्रांना आपली कदर आहे म्हणून बोलवतायत. इतकी वर्षे खेळतोय आपण. आपलेच दोस्त आहेत. हरीश तयार झाला. फ्रीजमधे ठेवलेलं थोडं खाऊन घेतलं. ग्लोव्हज घेतले टी शर्ट घातला, टोपी घातली व निघाला. मैदानावरच्या झाडाखाली अंजली व नाजनीन दिसल्या. वर्गातल्याच.
“तुम्ही काय करताय इथे? “
“आलो होतो जॉगींगला. आता तुमची मॅच पाहूनच जाऊ.”
“रन झाल्या नाहीत तर नंतर चेष्टा ना आमच्या टीमची ? अभ्यास करा. लास्ट ईयर आहे.”
“ मि. हरीश, हाच सल्ला तुम्हाला व तुमच्या त्या जिवलगांना लागू आहे. आमच्यापेक्षा जास्त.”
दोघींनी अंगठा खाली करून खट्याळपणे हसून दाखवलं. मॅच चांगलीच रंगली. हरीशच्या बाजूने प्रथम बॅटिंग घेतली होती. हरीशने धुलाई करून संघाला एक मोठी धावसंख्या उभारून दिली. प्रतिपक्षाची सुरवात चांगली झाली पण नंतर बळी पडत गेले. हरीशने एक झेल घेऊन त्यात हातभार लावला. अखेरीला सामना हरीशच्या संघाने जिंकला. हरीश व त्याच्या संघाने जल्लोष सुरु केला. सगळ्यांनीच हरीशच्या बॅटिंगचं कौतुक केलं. अंजली, नाजनीननंही अभिनंदन केलं. संघातली बाकीची मुलं निघाली. मिलिंदने त्यांना “सरावाला येत जा”, म्हणून बजावलं व त्यांचं अभिनंदन करून निरोप दिला.
“आज मस्त पार्टी झाली पाहिजे.” पद्माकर म्हणाला. कुठं जायचं या प्रश्नाला सामूहिक उत्तरं शोधली जाऊ लागली. एकमत न होण्याचा शिरस्ता नेहमीप्रमाणं पाळला गेला व अखेरीला ठरलं की कुणाच्या तरी घरीच जायचं.
“माझ्या घरी जाऊ या. आज माझ्या घरी कोणीच नाही. वाटेत काहीतरी खायला घेऊ या. सॉस व चटणी माझ्या घरी आहे. मी होतो पुढं. माझ्या घरीच लाईफ झिंगालाला करूया.”
अंजली व नाजनीनही यायल्या तयार झाल्या. हरीश जरा आधी निघाला. चौघांनी वाटेत भरपूर वडे घेतले. मॅगीची पाकिटं घेतली. थम्स अपच्या बाटल्या घेतल्या.
हरीशने मोठी सतरंजी हॉलमध्ये अंथरली होती. मिलिंद व पद्माकरने सॉस, चटणीच्या बाटल्या स्वैपाकघरातून आणल्या. अंजली व नाजनीने डिशेस सजवल्या. सगळ्यांची चेष्टामस्करी सुरु झाली. प्रत्येकी चार चार वडे खाल्ले गेले. अंजलीने गाणी लावायला सुचवलं. प्रत्येकाने आपापले मोबाईल काढून बटणाबटणी सुरु केली. कोणाचा संग्रह भारी, यावरून एकमेकांच्या तोंडाला तोंड दिलं गेलं. पद्माकरनं मोबाईलवर पॉप गाण्यांची अख्खी सीरीज लावली. पॉप गाण्यावर सगळ्यांनीच ठेका धरला. आवाज वाढत गेला. वाढत्या आवाजाचा कॉलनीत इतरांना त्रास नको म्हणून हरीशने सगळ्यांना दटावलं व आवाज कमी करायला लावला. मिलिंदने तीन बाटल्यांपैकी दोन उघडल्या. पोटं भरलेली असल्याने सगळ्यांनी थम्सअप हळुहळू प्यायला सुरवात केली. जेमतेम दोन बाटल्या संपल्या. पद्माकरने टीव्ही लावला व नॅशनल जिओग्राफिक पाहायला सुरवात केली. त्यात सुस्तावलेल्या मगरी दिसू लागल्या. त्यांचं वर्णन करणारं समालोचनही जोडीला होतंच. सगळे बसल्या बसल्या लवंडले. बराच वेळ गेला. सगळ्यांची पोटे भरलेली होती. काही वडे उरलेले होते.
“आता हे वडे कोण खाणार लेको?” हरीशने विचारलं. सगळ्यांनी पोट दब्ब झालंय सांगून नकार दिला. मॅगीही नको करूयात असं सगळे म्हणाले.
बेल वाजली तशी हरीश उठला. समोर एक माणूस उभा होता. रापलेला चेहरा. चाळिशीची उमर.
“साहेब, लांबून आलोय. ठेकेदारानं बलिवलं व्हतं. आज कामाव कुनी बी न्हाई दिसते. माझा पहिलाच दिवस. ठेकेदार बी न्हाई अन् कुनी बी न्हाई.”
.....
“पाणी हाय?”
हरीश आत जाऊन लोटीतून पाणी आणले. पाणी प्यायल्यामुळे त्या माणसाला तरतरी आली.
“ठेकेदाराला फन लावतोय. उचलीना झालं.”
“.....”
“ऊन तरी किती हाय...”
“.....”
“ऊन हाय. आता परत जायचं म्हटलं ठेकेदाराकडं तर अंतरबी हाय.”
“.....”
“ठेकेदार लांब हाय ना.”
“.....”

हरीशला काय बोलावं, सुचत नव्हतं. ही सगळी माहिती तो आपल्याला का देतोय. मागून पद्माकर, मिलिंद आले व तेही त्या माणसाकडं पाहू लागले. अंजली व नाजनीन आल्या. काय चाललंय, ते त्यांनाही कळेना. हरीशला काहीतरी जाणवलं. त्यानं एकदम पद्माकर, मिलिंदला उरलेले वडे व ताटली घेऊन यायला सांगितलं. त्यांनी वडे असलेली ताटली त्या माणसासमोर ठेवली. पाणी दिले.
खाऊन तो माणूस तृप्त झाला. हात धुवायला बागेत गेला. लोटीनंच हात धुतले.
“आभारी आहे, सायब. भूक लागली व्हती.”म्हणून त्याच्या किरकिरणा-या सायकलवरून निघून गेला.
सगळे शांतपणे हे दृष्य पाहत होते. अंजली व नाजनीनने ताटली, पाणी उचललं व त्या स्वैपाकघरात गेल्या. तिघे आत आले व एकमेकांकडे पाहात कोचावर बसले. दोघी बाहेर आल्या. सायकलचा किरकिर आवाज मनात घुमत राहिला.

(समाप्त)

वाङ्मयप्रतिभा

प्रतिक्रिया

सिरुसेरि's picture

27 Aug 2020 - 4:05 pm | सिरुसेरि

कथा ठिकशी कळली नाही . पण आशय आवडला .

Gk's picture

27 Aug 2020 - 5:07 pm | Gk

तो डेली वेजीस वरचा कामगार होता, पण आज काम बंद म्हणून पगार नाही,
त्याने पाणी व वडे दिले

केदार पाटणकर's picture

29 Aug 2020 - 2:27 pm | केदार पाटणकर

धन्यवाद प्रतिसादकांना.

कपिलमुनी's picture

29 Aug 2020 - 10:50 pm | कपिलमुनी

खाऊन राहिलेले देणे आणि देऊन राहिलेले खाणे यातला फरक माणसाचे व्यक्तीमत्व ठरवते

दादा कोंडके's picture

29 Aug 2020 - 11:00 pm | दादा कोंडके

स्वकष्टाने पोट भरणे (स्वाभिमान, इतरांसमोर हात न पसरणं वैग्रे) आणि फुकटचं खाणं यातला फरक देखिल व्यक्तीमत्व ठरवते.

Gk's picture

29 Aug 2020 - 11:13 pm | Gk

खाऊन राहिलेले देणे , सामान्य माणसासाठी हेच ठीक आहे, खुलभर दुधाची गोष्ट आहे की , आधी घरच्यांना द्या मग उरलेले धर्मकार्याला द्या.

आणि कुणी सांगावे , आज भीक मागणारा उद्याचा पंतप्रधानही असेल