मंथरा (भाग 2) (शेवटचा)

ज्योति अळवणी's picture
ज्योति अळवणी in जनातलं, मनातलं
2 May 2020 - 12:20 pm

पहिला भागासाठी माझ्या ब्लॉगची लिंक देत आहे

https://jyotijinsiwalealavani.blogspot.com/

मंथरा (भाग 2) (शेवटचा)

दुसऱ्या दिवशी दिवस चांगलाच वर आल्यावर मंथरा राणी कैकयीच्या महालात पोहोचली. तोपर्यंत महाराज राणी कैकयी सोबत असल्याने अंत:पुरात कोणालाही येण्याची परवानगी नव्हती; याची तिला कल्पना होती. मंथरेने आत शिरताच राणी कैकयीचे मुख न्याहाळले आणि तिच्या लक्षात आले की काल अंत:पुरातून बाहेर पडताना तिने राणी कैकयीशी जो संवाद केला होता त्याचा योग्य तो परिणाम झाला आहे. राणी कैकयी काहीतरी खूप मोठे मिळवल्याच्या समाधानात होती. थोडावेळ इकडे-तिकडे केल्यानंतर मंथरेने राणीला विचारले;"स्नानाची तयारी करू ना?" त्यावर मंथरेचा हात धरून तिला मंचकावर बसवून राणी कैकयीने तिच्या डोळ्यात पाहात म्हंटले;"स्नानाचे राहू दे. मी काय सांगते ते तर ऐक." त्यावर आपल्या मनातील उत्सुकता लपवून ठेवत अत्यंत कोऱ्या चेहेऱ्याने मंथरा म्हणाली;"काही खास आहे का राणी? आपण अगदी आग्रहपूर्वक मला इथे मंचकावर बसवलंत म्हणून विचारते." त्यावर तिचे दोन्ही हात हातात घेऊन राणी कैकयी म्हणाली;"मंथरे, तू माझी दासी नाही माझी मैत्रीण आहेस. त्यामुळे तू असं काही बोलू नकोस हं. बरं, ऐक तर मी काय सांगते आहे ते... काल महाराज अंत:पुरात आले न तर मी उगाच त्यांच्यावर रागावल्याचा आव आणला. त्यांनी कितीतरी वेळ माझी मनधरणी केली; पण मी बोललेच नाही. ते अगदीच काकुळतीला आले आणि मग मी म्हंटले की तुम्ही न सांगता-सवरता महाराणी कौसल्या यांच्या माहाली जाता; मात्र मी कधीपासून आपली वाट बघत आहे आणि मला मात्र तिष्ठत ठेवता.... हे काही बरोबर नाही. आपलं माझ्यावर प्रेमच नाही. मी असं म्हणाले आणि महाराज अगदीच कसेनुसे झाले. मंथरे, त्यानंतर जे काही झालं ते तू मला विचारू नयेस आणी मी तुला सांगू नये; बरका!" असं म्हणून राणी कैकयी परत एकदा कालच्या त्या मोहमयी घटिकांच्या आठवणींमध्ये रमून गेली. 

राणी कैकयीचे कथन ऐकून मंथरा समाधान पावली. आपण सुरू केलेल्या खेळाची सुरवात आपल्या मनासारखी झालेली पाहून ती मनातच हसली. मंचावरून उठताना ती सहज म्हंटल्यासारखे करून राणी कैकयीला म्हणाली;"राणी, ही खूपच चांगली गोष्ट आहे की महाराजांचे तुमच्यावर अतोनात प्रेम आहे; जे त्यांनी काल तुमच्याकडे व्यक्त केले. मात्र माझ्या मंद बुद्धीला असं वाटतं की केवळ प्रेम असून पुरेसं नसतं." हे ऐकून राणी कैकयी तिच्या स्वप्नातून जागी झाली आणि मंथरेकडे आश्चर्याने पाहात म्हणाली;"म्हणजे काय ग मंथरे? महाराजांचे माझ्यावर खूप प्रेम आहे; हे ऐकून तुला आनंद नाही झाला?" राणी कैकयीच्या हातावर हात ठेवत मंथरा म्हणाली;"विश्वास ठेवा राणी; महाराजांचे प्रेम तुमच्यावर सर्वात जास्त आहे हे ऐकून माझ्या इतकी आनंदी या त्रिकाल खंडात कोणी नाही." हे म्हणतांना मंथरेने मुद्दाम सर्वात जास्त या दोन शब्दांवर जास्त भार दिला होता. राणी कैकयीने दाखवले नाही तरी ते तिच्या लक्षात आले आहे हे देखील मंथरेला कळले होते. 

आता राणी कैकयी महाराज दशरथांची पट्ट राणी होती. तिचे हट्ट पुरवणे आणि लाड करणे यात महाराज दशरथांना कोण आनंद होत होता. राणी कैकयी येण्या अगोदर महाराणी कौसल्या आणि राणी सुमित्रा यादेखील अत्यंत मानाने अयोध्येला सालंकृत राण्या म्हणून आल्या होत्या. मात्र दोघींनाही अजूनही मूल झालेले नव्हते. त्यामानाने राणी कैकयी अत्यंत तरुण होती. त्यामुळे हे देखील एक कारण होते की महाराज दशरथ राणी कैकयी सोबत जास्त वेळ घालवत होते. 

असेच दिवस जात होते; मात्र अजूनही धर्मानुचरित सूर्यवंशी महाराज दशरथांच्या वंशाला दिवा प्राप्त झाला नव्हता. यामुळे महाराज दशरथ अलीकडे खूपच दुःखी राहू लागले होते. एकदिवस मुनी वशिष्ठ महाराज दशरथांना भेटण्यास आले आणि त्यांनी महाराजांनी पुत्रकानेष्टी यज्ञ करण्यास सांगितले. महाराज दशरथांनी अत्यंत मनोभावे आणि भक्तीपूर्ण भावनेने या यज्ञात आहुत्या दिल्या. यामुळे अग्निदेव महाराज दशरथांवर प्रसन्न झाले आणि त्यांनी महाराजांच्या हातात सुवर्ण पात्रातील पायस ठेवले आणि म्हणाले;"राजा, मी तुझ्या भावपूर्ण आहुतींमुळे प्रसन्न झालो आहे. तू हे पायस दान तुझ्या प्रिय पत्नीस दे. या पायसाच्या प्राशनानंतर तुझ्या प्रिय पत्नीस अशा पुत्राची प्राप्ति होईल ज्याचा जयजयकार त्रिकाल खंडात युगानुयुगे होत राहील." महाराजांनी सुवर्ण पात्र स्वीकारताच अग्निदेव पवित्र होमकुंडामध्ये अंतर्धान पावले. 

महाराज दशरथ अत्यंत आनंदीत झाले आणि पायसामृत असलेले सुवर्ण पात्र महाराणी कौसल्या यांच्याकडे सुपूर्द केले. मात्र त्यावेळी त्यांची नजर त्यांची प्रिय राणी कैकयीकडे होती. हे लक्षात येऊन अत्यंत प्रेमळ आणि समंजस महाराणी कौसल्या महाराज दशरथांना म्हणाल्या;"महाराज, हे पायसामृत माझ्या बरोबरीने राणी कैकयीने देखील घ्यावे असे मला वाटते." असे म्हणून त्यातील अर्धे पायसामृत महाराणी कौसल्याने राणी कैकयीला दिले. मंथरा राणी कैकयी जवळच उभी होती. ती राणी कैकयीला काही सांगणार एवढ्यात राणी कैकयी पुढे झाली आणि तिने अत्यंत प्रेमाने राणी सुमित्रेकडे बघितले आणि आपल्याला मिळालेल्या पायसामृतातील अर्धा भाग राणी सुमित्रेला दिला. त्याचवेळी महाराणी कौसल्या यांनी देखील त्यांच्यातील अर्धे पायसामृत राणी सुमित्रेला दिले.

यथावकाश महाराज दशरथ यांच्या तीनही सुलक्षणा पत्नी गरोदर राहिल्या आणि योग्य वेळी प्रसूत देखील झाल्या. महाराणी कौसल्याने श्रीरामाला जन्म दिला, राणी कैकयीच्या पोटी भरताचा जन्म झाला आणि राणी सुमीत्रेच्या ओटी दोन पुत्रांचा योग जुळून येऊन लक्ष्मण आणि शत्रुघ्न यांचा जन्म झाला. 

वर्षांमागून वर्षे जात होती आणि चारही सुर्यवंशी राजकुमार आवश्यक अशा योग्य विद्या आणि शास्त्रांचा अभ्यास आत्मसाद करत मोठे होत होते. एक दिवस ऋषी विश्वामित्र महाराज दशरथांकडे आले आणि म्हणाले;"महाराज, मी एक महायज्ञ करीत आहे. परंतु यज्ञ चालू असताना राक्षसांकडून सतत हल्ला होतो आणि विघन आणले जात आहे. आपण आपले दोन पुत्र राम आणि लक्ष्मण यांना माझ्या सोबत पाठवावेत. माझा हा यज्ञ पूर्ण होईपर्यंत ते माझ्या सोबत राहून माझ्या यज्ञ कार्याचे सौरक्षण करतील." महाराज दशरथ मनातून शशांक होते. कारण राम केवळ सोळा वर्षांचा होता. लक्ष्मण त्याहून लहान. महाराजांच्या मनातील चिंता ओळखून ऋषी विश्वामित्र म्हणाले;"महाराज, आपल्या मनात कोणतीही चिंता नसावी. आपले पुत्र दिंगत कीर्ती मिळवणार आहेत. येऊ दे त्यांना माझ्यासोबत." ऋषी विश्वामित्रांनी असे म्हंटल्यानंतर महाराजांच्या मनातील प्रश्न मिटला आणि त्यांनी राम आणि लक्ष्मण यांना बोलावून ऋषी विश्वमित्रां सोबत जाण्यास सांगितले.

राम आणि लक्ष्मणाने अत्यंत योग्य रीतीने ऋषी विश्वामित्र यांच्या महायज्ञाचे दुष्ट राक्षसांपासून रक्षण केले. त्यांच्या कार्यामुळे ऋषी विश्वामित्र अत्यंत खुश झाले. त्याचवेळी मिथिला नगरीचे महाराज जनक यांनी त्यांची सुकन्या सीता हिच्या विवाहाची घोषणा केली. महाराज जनक यांच्याकडे शिव धनुष्य होते. विवाहाचा पण होता की या शिवधनुष्याला पेलून त्याला प्रत्यंचा लावणाऱ्या वीरालाच राजकुमारी सीता वरणार होती. या विवाहपूर्तीची शोभा बघण्यासाठी ऋषी विश्वामित्र राम आणि लक्ष्मण यांना सोबत घेऊन मिथिला नगरीमध्ये पोहोचले. अनेक शूरवीर राजा-महाराजांनी शिव धनुष्याला उचलण्याचा प्रयत्न केला. प्रत्यंचा तर दूर कोणालाही ते धनुष्य उचलता देखील आले नाही. त्यावेळी ऋषी विश्वामित्रांनी रामाला आज्ञा केली आणि श्रीरामाने अत्यंत सहजपणे ते शिव धनुष्य पेलून त्यास प्रत्यंचा लावण्यासाठी ते वाकवले. मात्र एक गगनभेदी आवाज करत ते शिव धनुष्य मोडून पडले. 

महाराज जनकांनी ऋषी विश्वामित्रांकडून राम आणि लक्ष्मणाबद्दल समजून घेतले आणि अयोध्या नगरीला दूत पाठवून घडलेली घटना कळवली. रामाने जनक जननीच्या विवाहाचा पण जिंकला आहे ही वार्ता ऐकून महाराज दशरथ अत्यंत हर्षोल्लासित झाले. यथावशाक श्रीरामाचा विवाह जनक नंदिनी सीतेशी झाला. याचवेळी महाराज जनक यांच्या इतर तीनही कन्या राजकुमारी उर्मिला हिचा विवाह लक्ष्मणाशी, राजकुमारी मांडवी हिचा विवाह भरताशी आणि राजकुमारी श्रुतकीर्ती हिचा विवाह शत्रुघ्न यांच्याशी अत्यंत थाटामाटात झाला. महाराज दशरथ आपल्या चारही पुत्र आणि सुकुमार स्नुषा घेऊन अयोध्या नगरीला आले. 

आता दिवस अत्यंत आनंदात आणि सुखाने व्यतित होत होते. अशावेळी महाराज दशरथांनी निर्णय घेतला की आता राम अयोध्येचा राजा होऊन योग्य प्रकारे राज्यकारभार करण्याइतका मोठा झाला आहे. त्यामुळे रामाचा राज्यभिषेक करावा. आनंदीत करणारी ही वार्ता ऐकून संपूर्ण अयोध्या नगरी हर्षोल्लासित झाली. महाराणी कौसल्या, राणी सुमित्रा आणि राणी कैकयी यांच्या आनंदाला तर पारावार उरला नाही. राणी कैकयी तर समोर येणाऱ्या प्रत्येक दास-दासीला मानत येईल ती वस्तू देऊन आनंद साजरा करत होती. मग ते मग ते एखादे अत्यंत सुंदर आभूषण असेल किंवा वर्णनातीत तलम वस्त्र असेल. भोजन समय असल्यास येणाऱ्या प्रत्येकास राणी कैकयी आग्रहाने भोजन देखील देत होती. राणी कैकयीच्या आनंदाला पारावार नव्हती; आणि मंथरेच्या चिरफडण्याला अंत नव्हता. 'राज्याभिषेक रामाचा होता; भरताचा नव्हे;' इतके देखील राणी कैकयीला समजू नये याचे मंथरेला राहून राहून वैषम्य वाटत होते. 

शेवटी न राहून एका रात्री मंथरा राणी कैकयीच्या अंत:पुरात दाखल झाली. राणी कैकयी दिवसभराच्या दगदगीने दमून मंचकावर पडून आराम करीत होती. मंथरा तिच्या जवळ बसली आणि राणी कैकयीचे पाय चेपू लागली. राणी कैकयीने डोळे उघडले आणि मंथरेला पाय चेपताना बघून उठून बसत म्हणाली;"अग मंथरे तू का माझे पाय चेपते आहेस? बस बघू अशी स्वस्थ इथे माझ्या जवळ. अग, तू तर अगदीच दृष्टी दुर्लभ झालीस. रामाचा राज्यभिषेक होणार आता... किती हर्षभरीत बातमी आहे ही. कितीतरी कामं आहेत करण्यासारखी." राणी कैकयीचे बोलणे ऐकून मंथरेने तिचे तोंड लहान केले आणि मान खाली घालून म्हणाली;"आपण म्हणाल तसं." राणी कैकयीला मंथरेच्या पडलेल्या आवाजात बोलण्याचे खूपच वैषम्य वाटले आणि तिचा हात हातात घेत राणी म्हणाली;"मंथरे, तुला काही होतं आहे का? अशी पडलेल्या चेहेऱ्याने का बसली आहेस?"

मंथरेला राणी कैकयीने हेच विचारायला हवे होते. राणीचा प्रश्न संपतो न संपतो तो मान वर करून राणीच्या डोळ्यात पाहात मंथरा म्हणाली;"राणी कैकयी आपणाला माझ्यावर किती विश्वास आहे?" तिच्या या प्रश्नाने गोंधळलेली राणी कैकयी म्हणाली;"हा काय प्रश्न झाला मंथरे? माझ्या वडिलांनी माझ्या लहानपणीच म्हंटले होते की मंथरा असताना कैकयीच्या सुखाची चिंता नाही. जो विश्वास माझ्या वडिलांना तुझ्यात होता; तोच विश्वास माझा आहे. माझं कायमच सर्व चांगलं व्हावं यासाठी त कायम तनमनाने झटशील यात मला तिळमात्रही शंका नाही." राणी कैकयीचे बोलणे ऐकून मंथरेने एक निश्वास टाकला आणि म्हणाली;"राणी आपण माझ्यावर इतका विश्वास ठेवता हे ऐकून मी शेवटचा श्वास घेण्यास मोकळी झाले." त्यावर तिच्या मुखावर आपला तळवा ठेवत राणी कैकयी म्हणाली;"हे असे अभद्र काय बोलते आहेस मंथरे आत्ताच्या या आनंद भरल्या सोहोळ्याच्या वेळी?" 

त्यावर राणी कैकयीच्या डोळ्याला डोळा भिडवत मंथरा म्हणाली;"राणी, कुठला आनंद सोहळा? कोणाचा? महाराणी कौसल्या यांचा पुत्र राम याचा राज्यभिषेक होणार हा सोहळा! राज्य रामाला मिळणार. तो राजा होणार. पण भरताचे काय राणी?"

मंथरेच्या बोलण्याने गोंधळून गेलेली कैकयी म्हणाली;"भरताचे काय मंथरे?"

त्यावर अत्यंत शांत पण खंबीर आवाजात मंथरा म्हणाली;"राणी, मी आता जे बोलणार आहे ते केवळ आणि केवळ आपल्या आणि राजकुमार भरत यांच्या उज्वल भविष्याचा विचार करून यावर आपण विश्वास ठेवावा ही विनंती. राणी, थोडा विचार करावात... राजा होणार राम. त्याची पट्ट राणी होणार सीता. म्हणजे यापुढील संपूर्ण आयुष्य मानाने जगणार महाराणी कौसल्या..... आणि राणी......"

मंथरा बोलताना थांबली आणि मनलावून तिचे बोलणे ऐकणाऱ्या राणी कैकयीने न राहून विचारले;"आणि काय मंथरे?"

"आणि राणी यापुढील संपूर्ण आयुष्य तुमचा लाडका भरत त्या रामाचा दास होऊन राहणार. तुमची सुकुमार स्नुषा मांडवी ही सीतेच्या वचनात राहणार. आणि आपण स्वतः राणी.... विचार करावा! आजवर महाराजांची लाडकी राणी म्हणून आपण मिरवले आहे. मात्र आता महाराज दशरथ पायउतार झाल्यानंतर आपण जरी त्यांची लाडकी राणी असलात तरी राजमाता मात्र महाराणी कौसल्या होणार. म्हणजे यापुढे राजमाता कौसल्यादेवी सर्वच कौटुंबिक निर्णय घेणार. मग तुमच्या मनात जे काही येईल त्यासाठी अगोदर आपणास राजमाता कौसल्यादेवींची परवानगी घ्यावी लागेल. राणी, विचार करा.... यात तुमचे काय सौख्य आणि मान? आणि अशा वेळी आपल्या तातांनी माझ्यावर टाकलेल्या विश्वासाला तडा गेल्यासारखे नाही का होणार? मग मी शेवटचा श्वास घेणेच योग्य नाही का?"

मंथरेचे बोलणे ऐकून राणी कैकयी विचारात पडली. त्यावर तिला फार विचार करण्यास वेळ न देता मंथरा म्हणाली;"राणी, यावर एक उपाय मला सुचतो आहे. आपले अभय असेल तरच मी बोलेन."

आपल्याच विचारात गढलेल्या राणी कैकयीने म्हंटले;"मंथरे तुला माझ्याशी बोलताना अभय का हवे बरे? तरीही तू म्हणतेस तर दिले अभय... बोल!"

पुन्हा एकदा राणी कैकयीच्या डोळ्यात खोल पाहात मंथरा म्हणाली;"राणी, विचार करा... आपला भरत, तुमचा लाडका राजकुमार भरत.... वीर भरत जर अयोध्येचा राजा झाला तर? तर आपण राजमाता व्हाल... राजकुमारी मांडवी महाराणी... आपल्या सुखाला पारावार राहणार नाही."

हे ऐकताच राणी कैकयी ताठ बसली. तिची मुद्रा पूर्णपणे गोधळलेली होती. तिला मंथरेच्या बोलण्याचा राग आला होता; मात्र तरीही त्यात काही तथ्य आहे असेही एकीकडे वाटत होते. थोड्या विचाराअंती राणी कैकयीच्या कपाळावर आठ्या निर्माण झाल्या आणि तिने काहीशा रागाने मंथरेला म्हंटले;"मंथरे, तू माझी सखी आहेस आणि केवळ माझ्या सुखाचा विचार करतेस; यात मला बिलकुल शंका नाही. मात्र तरीही तुझे हे बोलणे मला मुळीच पटलेले नाही. अग, माझा राम त्याच्या माते प्रमाणेच माझा देखील तितकाच आदर करतो." त्यावर काहीसे न पटणारे कुत्सित हास्य चेहेऱ्यावर आणून मंथरा म्हणाली;"राणी, आजवर अशी किती उदाहरणे आपण बघितली आहेत की सर्वस्व मिळाल्या नंतर देखील एखादी व्यक्ती आदरयुक्त भावनेने वागते? आणि मी अशी किती उदाहरणे सांगू की जिथे मानसन्मान मिळताच आपल्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना सहज विसरले जाते? तरीही, आपला रामावर आणि महाराणी कौसल्या यांच्यावर माझ्यापेक्षा जास्त विश्वास असेल तर आपण राजकुमार रामाचा राज्यभिषेक होणार म्हणून नक्कीच आनंदीत व्हा आणि मला मात्र निरोप द्या." एवढे बोलून मंथरा राणी कैकयीपासून लांब झाली आणि अंत:पुराबाहेर जाण्यास निघाली. त्यावर तिला थांबवत राणी कैकयी म्हणाली;"मंथरे थांब. हे असे माझ्या मनात प्रश्न निर्माण करून तू कुठे जाते आहेस? यावर काही उपाय असेलच न? मला खात्री आहे की तू याचा विचार केलाच असशील."

मंथरेला हेच हवे होते. परत मागे फिरून अत्यंत उत्साहित आवाजात ती राणी कैकयीला म्हणाली;"राणी कैकयी, आपण विसरला असालही कदाचित; मात्र मी अजूनही तुमच्या आयुष्यातील एक प्रसंग विसरलेले नाही. राणी, आपण एकदा महाराज दशरथांना देवांकडून विनवणी करण्यात आली की दानव त्यांना सतत त्रास देत आहेत तरी यासाठी होणाऱ्या युद्धामध्ये महापराक्रमी महाराज दशरथांनी देवांना मदत करावी. त्यावेळी राणी कैकयी आपण स्वतः महाराज दशरथांची सारथी बनून गेला होतात. त्यावेळी केवळ सारथ्य केलेत असे नाही तर स्वतःच्या जीवाची पर्वा न करता आपली अंगुली रथ निडामध्ये घालून आपण व्यूहातून रथ बाहेर काढून महाराज दशरथांचे प्राण वाचवलेत. त्यानंतर देखील महाराजांच्या अमोघ बाणांपुढे तग न धरता पळून जाणाऱ्या दानवांचा पाठलाग करून आपण महाराजांना आणि पर्यायाने देवांना विजयश्री मिळवून दिली होतात. त्यावेळी महाराज दशरथांनी स्वखुशीने आपणास दोन वर दिले होते. मात्र आपण आपल्या सरळ साध्या स्वभावानुसार ते नाकारले होते. परंतु महाराजांनी आग्रह केल्यानंतर 'योग्य वेळी मी माझे वर मागून घेईन'; असे म्हणाला होतात."

मंथरेचे हे बोलणे ऐकून राणी कैकयी परत एकदा त्या युद्ध भूमीमध्ये पोहोचली होती. तिच्या चेहेऱ्यावर विजयश्रीचे तेज झळकू लागले होते. मंथरेकडे मंद हास्य करीत बघत राणी कैकयी म्हणाली;"मंथरे, मला वाटते हीच ती योग्य वेळ आहे. मी माझे दोनही वर महाराजांकडे मागण्याची ही वेळ आहे." त्यानंतर काही क्षण विचार करून राणी कैकयी मंथरेला म्हणाली;'मंथरे, अशीच जा आणि महाराजांना माझा निरोप दे... तू स्वतः.... म्हणावे राणी कैकयी शोकाकुल आणि क्रुद्ध दोन्ही आहे याक्षणी. त्यांनी आहे त्या स्थितीमध्ये मला भेटायला यावे."

राणी कैकयीचे बोलणे ऐकून मंथरेच्या मनाला समाधानाचा स्पर्श झाला. तिची खात्री होती की सूर्यवंशी महाराज दशरथ दिलेला शब्द नक्कीच पाळतील. ती राणी कैकयीच्या महालातून बाहेर पडली ती थेट महाराज दशरथ विश्रांती घेत असलेल्या त्यांच्या महालाच्या दिशेनेच. तिने महाराजांच्या द्वारपालकडे महाराजांना भेटण्याची परवानगी मागितली. मंथरा राणी कैकयीची खास दासी आहे हे माहीत असल्याने द्वारपालाने देखील तिला अडवले नाही. मंथरा थेट महाराजांच्या अंत:पुराजवळ जाऊन थांबली आणि तिने आदबीने राणी कैकयींचा निरोप महाराजांना दिला. महाराजांना राणी कैकयींचा निरोप ऐकून आश्चर्य वाटले आणि ते तसेच राणी कैकयीच्या माहाली जाण्यास निघाले.

राणी कैकयीने महाराज दशरथांकडे आपले दोन वर मागितले आणि त्यांनी कितीही समजूत काढण्याचा प्रयत्न केला तरी ती तिच्या मागणीवर ठाम राहिली. 'जर तुम्हाला मी मागितल्या प्रमाणे रामाला चौदा वर्षे वनवास आणि माझ्या भरताचा राज्यभिषेक ही माझी इच्छा पूर्ण करायची नसेल तर; मी माझे वर परत मागे घेतो; असे म्हणा आणि मला आणि स्वतःला त्या वरांमधून मुक्त करा..." असे एकच म्हणणे होते तिचे. दुःखाने विव्हल झालेले महाराज दशरथांनी शेवटी राणी कैकयीची मागणी मान्य केली. मात्र त्याक्षणापासून त्यांची वाचाच बंद झाली. 

महाराजांनी होकार देताच अत्यानंदी झालेल्या राणी कैकयीने रामाला बोलावणे पाठवले. राम येताच तिने महाराज दशरथांसमोर रामाला सांगितले;"रामा, महाराजांनी मला दिलेल्या वरांची मागणी मी आज केली आहे. त्याप्रमाणे तू पुढील चौदा वर्षे वनवासास जावे आणि माझा मुलगा राजकुमार भरत अयोध्येचा राजा व्हावा; असे त्यांनी मान्य केले आहे. तरी आता वेळ वाया न घालवता तू उद्याच निघावेस हे बरे. राजकुमार भरत आत्ता त्याच्या आजोळी जरी असला तरी मी त्याला बोलावून घेऊन त्याचा राज्यभिषेक करेनच."

राणी कैकयीचे बोलणे ऐकून रामाने मंद स्मित केले आणि राणीला नमस्कार करून म्हणाला;"माते आपण महाराजांकडे वर न मागता देखील मला सांगितले असतेत तरी मी लगेच वनवास स्वीकारला असता. असो; तातांची इच्छा म्हणजे माझ्यासाठी ती धर्माज्ञा ठरते. आपण मुळीच चिंतीत होऊ नयेत... मी उद्या प्रत:समयीच निघेना."

रामाचे बोलणे ऐकून तेथेच दुःखाकुल झालेल्या महाराज दशरथांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांच्या जवळ जाऊन त्यांचे अश्रू पुसत राम म्हणाला;"तात, विधिलिखित कोणालाही टाळले नाही. आपण का शोकाकुल होऊन त्रास करून घेत आहात? मी स्वखुशीने वनवास स्वीकारत आहे." एवढे बोलून राम उठला आणि राणी कैकयीच्या अंत:पुरातून बाहेर पडला.

ती संपूर्ण रात्र राणी कैकयीने एका वेगळ्याच आनंदाच्या आणि विजयाच्या उन्मादात घालवली. तिला तिच्या आनंदापुढे तिच्या प्रिय पतीचे; महाराज दशरथांचे दुःख देखील दिसत नव्हते. उष:काली महालाच्या सज्जामध्ये ती आली असता तिला दिसले की रामाच्या सोबतीने वल्कले नेसून लक्ष्मण आणि सीता देखील निघाले आहेत. ते पाहाताच मात्र राणी कैकयीचे काळीज हलले. हे नक्की काय होते आहे हे समजून घेण्यासाठी कोणालातरी विचारावे या हेतूने तिने मागे वळून पाहिले तर तेथे मंथरा होती. राणी कैकयीच्या चेहेऱ्यावरील प्रश्नार्थक भाव बघून मंथरा पुढे झाली आणि तिने राणी कैकयीला माहिती दिली;"राणी, राजकुमार राम यांच्या बरोबर त्यांची धर्मपत्नी पत्नी धर्माचे पालन करण्यासाठी निघाली आहे. राजकुमार लक्ष्मणाने त्याच्या मूळ स्वभावानुसार हट्टाने सोबत जाण्याचे ठरवले आणि तो देखील निघाला आहे. राणी आपण यावर फार विचार करू नयेत हेच योग्य. आपणास माहीतच आहे की राजकुमार लक्ष्मण तसे तापट स्वभावाचे आहेत. कदाचित त्यांचे आणि राजकुमार भरत यांचे पटले नसते. त्यामुळे हे योग्यच झाले. सुकुमार सीतेने मात्र हा निर्णय घ्यायला नको होता. परंतु पती सोबत जर पत्नी जात असेल तर तिला अडवण्याचा हक्क कोणाला असणार? त्यामुळे आता जे जात आहेत त्यांचा विचार करण्यापेक्षा राजकुमार भरत यांना त्यांच्या आजोळहुन बोलावून घेऊन त्यांचा राज्यभिषेक करणे योग्य." मंथरेचे बोलणे ऐकून राणी कैकयी परत एकदा हसऱ्या मुद्रेने महालाकडे वळली.

राजकुमार भरताला बोलावून घेण्यासाठी राणी कैकयीने दूत पाठवला आणि ती इतर कोणताही आणि कोणाचाही विचार न करता भरताच्या राज्यभिषेकाच्या तयारीस लागली. राजकुमार भरत परत आला आणि येताच त्याला त्याच्या मातेने त्याच्या पित्याकडे मागितलेल्या वरांसंदर्भात समजले. त्याक्षणी अत्यंत क्रुद्ध होऊन तो त्याच्या मातेच्या अंत:पुरात पोहोचला. 

राणी कैकयी त्याला पाहून अत्यंत आनंदाने त्याला सामोरी गेली. मात्र अत्यंत तीक्ष्ण शब्दात तिची निर्भस्ना करत राजकुमार भरत म्हणाला;"कसला एवढा आनंद झाला आहे तुला? तुला मी कोणत्या तोंडाने माता म्हणू ग? माझ्या प्रिय बंधू रामाला तू वनवासास पाठवलेस. माझी सुकुमार वहिनी... जी मला मातेसमान आहे.... ती देखील त्याच्या सोबत निघाली तरी तुझे काळीज हलले नाही.... तुला मी स्त्री तरी कसे म्हणू? अग पापिणी तुला असे वाटले तरी कसे की मोठा बंधू राम राजा न होता मी राजा व्हावे असे माझ्या मनात तरी येईल? ऐहिक सुखलोलुप मनाच्या हे पापिणी यापुढे मला तुझे मुख देखील पाहायचे नाही. मी आज याक्षणी बंधू राम, माझी माता सीता आणि माझा बंधू लक्ष्मण यांना वनातून परत आणायला निघतो आहे. मला हे राज्य नको आणि तू तर मुळीच नको आहेस."

आपल्या पुत्राचे ते शब्द ऐकून मंथरेच्या बोलण्यामुळे बिथरले राणी कैकयीचे मन जागे झाले. मात्र आता फारच उशीर झाला होता. राजकुमार भरत मागे वळला आणि आपला काळा पडलेला चेहेरा हाताने झाकून घेत राणी कैकयी मूर्च्छित होऊन खाली कोसळली. हा प्रसंग लांबून पाहणारी मंथरा धावत पुढे आली आणि राजकुमार भरताला थांबवत म्हणाली;"राजकुमार, आपण आपल्या मातेशी या शब्दात बोलाल आणि तिची अशी निर्भस्ना कराल असे मला स्वप्नात देखील खरे वाटले नसते. मागे वेळा राजकुमार. तुमची माता मूर्च्छित होऊन पडली आहे. तिला सांभाळा. ते तुमचे प्रथम कर्तव्य आहे." 

मंथरेला पाहाताच आणि तिचे बोलणे ऐकताच राजकुमार भरताचे डोळे जणू अग्नी ओकू लागले. आपल्या तलवरीकडे हात नेत राजकुमार भरत म्हणाला;"मंथरे, तू? तुझा शिरच्छेद करण्यासाठी माझे हात कधीचे शिवशिवत आहेत. इतर कोणालाही माहीत नसले तरी मी खात्रीने सांगू शकतो की माझ्या मातेच्या मनात माझ्या प्रिय रामाविषयी मत्सर आणि राग भरणारी तूच आहेस. मी माझ्या जन्मापासून पाहात आलो आहे. तुला ऐहिक सुखाची लालसा कायम राहिली आहे; आणि लहानपणापासून तुझी सोबत लाभलेल्या माझ्या मातेला देखील ती इच्छा उत्पन्न झाली आहे. आत्ता याक्षणी मला माझ्या बंधू रामशिवाय काहीही दिसत नाही आहे. त्यामुळे मी निघतो आहे. यापुढे तू आणि राणी कैकयी यांचे नशीबच तुमची सोबत करेल." असे म्हणून राजकुमार भरत तिथून निघून गेला.

मंथरा राणी कैकयीकडे धावली आणि तिने राणीला शुद्धीवर आणले. डोळे उघडताच राणी कैकयीला मंथरा दिसली. त्याक्षणी मंथरेला ढकलून देत राणी कैकयी कडाडली;"तू? दूर हो तू माझ्यापासून. कायम माझ्या सुखाचा विचार करते आहेस असे म्हणून तू मला फसवत आलीस. कायम तू तुझ्या मनातील अपेक्षा माझ्याकडून पूर्ण करून घेत आलीस. पण तुला तरी काय दोष देऊ? तू लाख मला काहीही सांगितलेस तरी त्यावर मी विश्वास ठेवला. ही माझी चूक झाली. आज माझ्या पुत्राने माझे डोळे उघडले आहेत. यापुढील माझे आयुष्य म्हणजे पाश्चातापाचे आणि प्रायश्चित्तपूर्ण असणार आहे. काय केले मी कलंकिणीने? आपल्याच हाताने आपले सुख दूर लोटले. क्षणिक ऐहिक सुखाच्या मोहात पडून मी माझे सर्व पुण्य गमावले. मंथरे.... जा निघून जा. तुझा वध करण्यास मी कोणालातरी सांगण्या अगोदर माझ्या डोळ्यासमोरून नाहीशी हो..... आणि हो! एक मात्र नक्की कर मंथरे....... जर कधी वाटलेच तर आत्मपरीक्षण नक्की कर. परमोच्च सुख हे आत्मसमाधानात असते. जा मंथरे जा......."

असे म्हणून राणी कैकयीने मंथरेकडे पाठ फिरवली..... आणि..... आणि...... अजूनही स्वतःची चूक न समजलेली ऐहिक सुखलोलुप मंथरा खालच्या मानेने राणी कैकयीच्या माहालातून बाहेर पडली.

समाप्त

कथा

प्रतिक्रिया

मनिम्याऊ's picture

2 May 2020 - 10:58 pm | मनिम्याऊ

छान लिहीले आहे. पण मंथरेचे व्यक्तिचित्रण त्यामानाने कमी दिसते.

गामा पैलवान's picture

3 May 2020 - 2:12 am | गामा पैलवान

मनिम्याऊ,

तुमच्या निरीक्षणाशी सहमत आहे. पण मुळात माहिती कमी उपलब्ध असतांना मूळ ढाच्यास धक्का न लावता मंथरेचं व्यक्तिचित्र रंगवणं थोडं जिकिरीचं काम आहे.

शिवाय कथेत दशरथाचा मृत्यूही वर्णिलेला नाही.

आ.न.,
-गा.पै.

खूपच सुंदर, रामायणातील कथा अनेक वेळी वाचल्य पण एखाद्या विशिष्ठ व्यक्ती केंद्रित अभ्यास पुर्ण लिहणे फारच कठीण आहे. त्यात कैकयी, मंथरा ही तर वेगळीच पात्रे आहेत. लिखाणाच्या भाषेला एक अन्य साधारण अशी विशिष्ठ धार आहे,जी मनाला खूप भावते. लिहीत रहा

Prajakta२१'s picture

3 May 2020 - 4:46 pm | Prajakta२१

प्रसंग आणि व्यक्तिचित्रण चांगले केले आहे
पौराणिक कथांनुसार रावण वधासाठी श्रीराम अयोध्येतून बाहेर पडणे आवश्यक होते परंतु राज्याभिषेक जर झाला असता तर हे साध्य झाले नसते असे वरून
पाहणाऱ्या ब्रम्हदेव आणि इतर देवांना वाटले म्हणू त्यांनी सरस्वती देवीला अयोध्येत पाठवले सरस्वतीने सर्व अवलोकन करून मंथरेची बुद्धी कलुषित केली आणि कार्यभाग साधला

एका संस्कृत नाटकात पण राम वनवासात गेल्यानंतरचा भारत आणि कैकेयीचा संवाद आहे त्यात कैकेयी "१४ दिवस असे म्हणायचे होते पण १४
वर्षे असे तोंडातून निघून गेल्याचे सांगते (इथे हि सरस्वतीने हस्तक्षेप केला असणार)

रामायणात सरस्वती देवीने ठिकठिकाणी हस्तक्षेप केल्याची उदाहरणे आहेत कुंभकर्णाची तपश्चर्या सफल झाल्यावर त्याला इंद्रपद मागायचे होते पण
सरस्वती देवीने त्याच्या बुद्धीत आणि जिव्हेवर फेरफार करून इंद्रपदाऐवजी निद्रापद असे केले असे मागे वाचले होते

Prajakta२१,

आपले म्हणणे खरे आहे. मात्र मी जेव्हा रामायण आणि महाभारत या दोन्हीचा विचार करते त्यावेळी काही पात्र ही केवळ एका घटनेपूर्ती मर्यादित आढळतात. मनात येतं की यांचं एकंदर आयुष्य, यांची मानसिकता कशी तयार झाली असेल त्या एकुलत्या प्रसंगासाठी? आणि मग त्यातून त्या व्यक्तिमत्वाच्या आयुष्याचा प्रवास लिहवासा वाटतो; त्यातूनच 'अनय', 'धात्री', आणि 'मंथरा' सुचले. अजूनही काही व्यक्तिमत्त्व मला विचार करायला लावतात. त्यांच्या मानसिकतेचा विचार करून जमलं तर त्यांच्या आयुष्यात डोकावण्याचा प्रयत्न देखील मी करणार आहे.

अर्थात हे सगळंच काल्पनिक आहे.

Prajakta२१'s picture

3 May 2020 - 10:50 pm | Prajakta२१

आभारी आहे
आभारी आहे

रामायणातील उर्मिला (laxmanachi पत्नी )आणि भरताची पत्नी ह्याही दुर्लक्षित व्यक्तिरेखा
उर्मिलेचा त्याग पण तेवढाच असूनपण दुर्लक्षित राहिली (एक कविता वाचली होती -त्रिवार वंदन उर्मिले तुला -अशी आत्ता कवी आठवत नाहीयेत क्षमस्व )
तसेच मांडवी हिने पण भरताची बाजू समजून पाठिंबा दिला हेही उल्लेखनीय
जनकाची पत्नीचे एका आईच्या बाजूने काहीच कुठे नाहीये (मुलींच्या संसारात एवढ्या उलथापालथी चालू असताना) कदाचित त्याकाळी एकदा सासरी पाठवल्यावर जास्त कॉन्टॅक्ट ठेवायची पद्धत नसेल
वाली पत्नी -तारा
अवांतर - हल्लीच्या पौराणिक सिरियलस मध्ये बरेच काही दाखवतात 'देवों के देव महादेव ' मध्ये रामायण सांगताना त्राटिका राक्षसीचे वनाची रक्षणकर्ती म्हणून थोडे उदात्तीकरण केले होते तसेच srimadbhagawat महापुराण ह्या सिरीयल मध्ये रावणाने शूर्पणखेच्या नवऱ्याचा मर्डर केला म्हणून तिने पुढे बदला घेतला असे काहीसे दाखवले आहे आणि रावणाच्या ताब्यात जी होती ती सीता नसून वेदवती होती असे पण दाखवले आहे खरी सीता कधीच रावणाच्या ताब्यात नव्हती हे जुन्या रामायणात पण दाखवले आहे

प्रचेतस's picture

4 May 2020 - 7:43 am | प्रचेतस

हे दोन्ही लेख छानच झाले.