user

मम आत्मा गमला..

मधे एकदा घरी पुण्याला गेले होते. गेल्यावर पुस्तकांच्या दुकानी जाणं ओघाने आलंच. सेनापती बापट रस्त्यावरचं क्रॉसवर्ड मला खूप आवडतं. एकतर तिथे गर्दी नसते. मोठं दुकान आहे, खालचा मजला पुस्तकांसाठी आणि वरचा सीडीज्, डीव्हीडीज् वगैरेंसाठी. पुस्तक खरेदी करण्याआधी मस्तपैकी एखाद्या कोपर्‍यात बसून वाचता येतं. कोणीही उठा, खरेदी करायची नसेल तर दुकानातून चालू पडा! वगैरे म्हणत नाही. एकूणच निवांत असा माहौल आहे. सुख आणखी वेगळं काही असतं का? तर, त्यादिवशी पुस्तकांची खरेदी झाली, आणि वरच्या मजल्यावरच्या सीडीज् वगैरे पाहूयात म्हणून वर गेले. सीडीज् पाहता पाहता बालगंधर्वांनी म्हटलेल्या नाट्य संगीतांच्या दोन सीडींचा संच दृष्टीला पडला. संच हातात घेऊन सीडीज् वर कोणती गाणी आहेत हे वाचताना, लहानपणी यातली काही गाणी ऐकल्याचे आठवले. अण्णांनी - माझ्या आजोबांनी, आवडीने घेतलेला ग्रामोफोन आठवला, नाट्य संगीताच्या तबकड्या आठवल्या. तसं, त्या नाट्य संगीताच्या आणि बालगंधर्वांच्या आवाजाच्या मोहापेक्षाही माझ्या लहानपणीच्या आठवणींच्या मोहाने तो संचही मी खरेदी केला! पुण्यातल्या इन मिन चार दिवसांच्या वास्तव्यात मला काही त्या सीडीज् ऐकायला वेळ झाला नाही. बंगलोरला येऊन, घरी पोचल्या पोचल्या मात्र सीडी लॅपटॉपमधे सरकवली, पहिलंच गाणं सुरु झालं ते, नाथ हा माझा... अण्णा आणि वैनीचं आवडतं गाणं. आपल्या आठवणी कुठे आणि कशांत गुंतलेल्या असतील, आणि कोणत्या क्षणी त्या आपल्या भोवती फेर धरतील, काही सांगता येत नाही ना?

.....तसं, माझ्या घरी सगळ्यांनाच गाण्याचं वेड. अण्णा आणि वैनी - म्हणजे माझी आज्जी - यांना, जास्त करुन वैनीला. आज्जीला वैनी का म्हणत असू, ह्याचही कारण आहे, पण ते नंतर कधीतरी. घरी दोन सतारी, पेटी, तबला हेही होतं कधीकाळी. आत्त्या छान गायची, बाबा तबला वाजवत. घरात गाणं ऐकण्याच्या हौशीपायी नंतर ग्रामोफोन आणलेला. ग्रामोफोन आणि त्या तबकड्या. प्रत्येक वेळी बदली झाली, की मग तो अगदी जपून पुढच्या गावी न्यायचा. वैनी मग कधीतरी जुन्या आठवणींत रमताना सांगायची, "एवढं कधी मुलांना पण जपलं नसेल!" अर्थात, ह्यात कौतुकाचा, आयुष्यभर त्या दोघांनी मिळून जो संसार सगळे टक्के टोणपे खात, सुख-दु:खांत एकमेकांना साथ देत मार्गी लावला, त्यातून निर्माण झालेल्या एकमेकांविषयीच्या आत्मियतेचाच भाग जास्ती असायचा, ही बाब अलाहिदा! आम्हां सार्‍यांनाच ते ठाउकही होतं, पण तरीही तिच्या तोंडून ऐकताना ते खूप छान वाटायचं. उगाचच त्या वाक्यामागची माया आपल्यालाही उब देते आहे अशी काहीशी भावना मनात पैदा व्हायची. आजही मला तिच्याबरोबरच्या गप्पा आठवल्या ना, की तशीच काहीशी भावना मनभर पसरते.

अण्णा घरी असले की ग्रामोफोन लावायचेच. आम्ही लहान असताना ते रिटायर्ड आजोबा. त्यामुळे कुठे काही कामानिमित्त वगैरे बाहेर गेले नसले तर घरीच. त्यात पुन्हा नातवंडांचा आग्रह, मोडणार कसा?? घरात सतत सूर नादावत असायचे. राबताही भरपूर. मस्त जेवणं करुन जिव्हाळ्याच्या गप्पा मारत, आमच्या घरी जमलेल्या सुखाने सैलावलेल्या मैफिली, बैठका अजूनही आठवतात. बघायला गेलं तर, आकारमानाने एवढही मोठं घर नाहीये खरं तर, पण अण्णा-वैनीची मनं मात्र आभाळाएवढी. अतिथीचं नेहमीच स्वागत. आयत्या वेळी कोणी न सांगता आलं तरी कोणाच्याच कपाळी आठी पाहिल्याचं आठवत नाही! उलट गप्पा जमवायला कोणी पंगतीला आहे, याचंच अप्रूप. कधी कधी गर्दी व्हायची, पण त्यातही धमाल मजा होती! रात्री रात्रीपर्यंत जागलेल्या गप्पा आणि आम्ही बच्चे मंडळी मधे मधे लुडबूड करायला! आम्हांला कोणी काही दबकावायला पाहिले, की अण्णा आम्हांला पाठीशी घालत, वैनीही. त्यांच्यामुळे आम्ही निर्धास्तपणे मनसोक्त दंगा करत असू! नाहीतर बाकीच्या मोठ्या मंडळींनी आम्हांला जरा अतिच शिस्तीचा बडगा दाखवायला कमी केलं नसतं! नाहीतरी, अण्णा, वैनींनी लाडोबा केले आहे हे आम्हाला ऐकावं लागतच असे! जळत असत आमच्यावर मोठी माणसं - म्हणजे आई - बाबा, काका - काकी, आत्त्या वगैरे, अजून काय?? Smile

- क्रमशः

आज्जी आजोबा

आज्जी आजोबांची माया वेगळीच. कुतूहल वाढलं आहे... पुढे लवकर लिही.

अवांतर: क्रमशः पंथात स्वागत.

बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते

सुरूवात आणि क्रमशः एकाच पानात ? असो

चांगली मालिका आहे, एक दोन वाक्य अगदी जवळची वाटली.
बाकी आपलं पुर्ण घराणं संगितमय आहे , भारी एकदम.
आमच्या घरात फक्त आई भजन वगैरे गाते, पण असा खानदानी इतिहास नाही. त्यानंतर मीच सर्वात भसाड्या आवाजात इंग्लिश गाणी संगणकावर इंस्ट्रूमेंटल्स लाउन कोकलत असतो .

- (लेटेष्ट स्वर'बास्कर)
टारदेव

मस्तच.

यशोधरा,
सुरूवात खुप सुदंर केली आहेस.

>>आपल्या आठवणी कुठे आणि कशांत गुंतलेल्या असतील, आणि कोणत्या क्षणी त्या आपल्या भोवती फेर धरतील, काही सांगता येत नाही ना?

अगदी खरे आहे.
लवकर लिहि पुढचा भाग. Smile

सहमत...

>>आपल्या आठवणी कुठे आणि कशांत गुंतलेल्या असतील, आणि कोणत्या क्षणी त्या आपल्या भोवती फेर धरतील, काही सांगता येत नाही ना?

आत्ता या क्षणी माझं हेच झालंय. Smile

बिपिन कार्यकर्ते

बिपिन कार्यकर्ते

सहमत

>>आपल्या आठवणी कुठे आणि कशांत गुंतलेल्या असतील, आणि कोणत्या क्षणी त्या आपल्या भोवती फेर धरतील, काही सांगता येत नाही ना?
अगदी खरे आहे.
लवकर लिहि पुढचा भाग.
सहमत - सुरुवात आवडली.

अप्रतिम

सुंदर वाटतय वाचायला पुढचा भाग लवकर टाका

वा..

यशो,सुरेख लिहिले आहेस.पुढे लवकर लिही.
स्वाती

अरे

अरे एवढ्यात प्रतिक्रियाही दिल्यात मंडळी!!
धन्यु!!Smile
उद्य परवामधे लिहिते, आता कट्ट्याची तयारी सुरु आहे! Smile

छान लिहिलयस ....

एकदम हलके फुलके लेखन.
पुढचे भाग लवकर लवकर टाका.

--
काय? आज तुम्ही आय टी वाल्यांना शिव्या घातल्या नाहित? अनिवासिंच्या नावाने खडे फोडले नाहित? ...अरेरे! स्वतःला पुरोगामी कसे म्हणवते तुम्हाला?

क्या बात

क्या बात है! क्या बात है!

अप्रतिम. खूप खूप आवडले.

आपला,
(संतुष्ट) धोंडोपंत

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

( फिर पलट आयी है, सावन की सुहानी रातें..... फिर तेरी याद में, जलने के ज़माने आये!.....)

छान लेख

यशोधरा,
छान सुरुवात केली आहेस.
पुढचे भाग लवकर येऊदेत.

--शाल्मली.

--शाल्मली.

छान झाली आहे सुरूवात.

क्रमशः... लागलं का गं यशो तुलाही या क्रमशः चं खुळ!!!
पुढचा भाग लवकर येऊदे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

- (सर्वव्यापी)प्राजक्ता
http://www.praaju.net/

वा!

नॉस्टॅल्जिया कसा कबड्डी खेळत असतो नाहि... हुतुतुतु करत एंट्री घेतो आणि आपण त्याला पकडणार इतक्यात मनातल्या तीन चार मंडळींना स्पर्शून कधी निघून जातो कळतहि नाहि ..

सुंदर सुरवात.. पुढचा भाग लवकर येऊ दे

-(नॉस्टॅल्जिक) ऋषिकेश

ऋषिकेश
------------------
माझे आवडते ब्लॉग या सदरात वाचूया या आठवड्याचा ब्लॉग: खट्टा मिठा

अगदी

घरगुती लेखन झालय. छान वाटलं.
आता लवकर लिही बाई!

रेवती

रेवती

यशोधरा, लेख

यशोधरा,
लेख व लेखन दोन्हि आवडले.
फक्त

जरा मोठे भाग येउ देत.

अभिज्ञ.

--------------------------------------------------------
पॉझिटिव्ह थिंकिंग....? अजिबात जमणार नाहि.

Scroll to Top