हॅप्पी चिल्ड्रेन्स डे...

दिनेश५७'s picture
दिनेश५७ in जनातलं, मनातलं
15 Nov 2008 - 12:11 am

दुपारची वेळ. रिक्षा पकडून मी स्टेशनवर आलो, आणि गाडीची वाट पाहात फलाटावर थांबलो.
पुढची हकीकत, मी जसं पाहात गेलो, तशीच्या तशी तुम्हाला सांगणार आहे...
...अंधेरीच्या गजबजलेल्या रेल्वे स्टेशनवरचा सहा नंबरचा प्लॅटफॉर्म नेहमीसारखाच गर्दीनं खचाखच भरलेला.
लांबून ट्रेन येताना दिसली, आणि मी मोबाईलवरचं मुलीशी बोलणं आटोपतं घेतलं. आज तिच्या शाळेत "चिल्ड्रेन्स डे' साजरा झाला होता. खूप मजा केली होती मुलींनी. आज शाळेतल्या सगळ्या शिक्षिकांनी मुलींसाठी करमणुकीचे कार्यक्रम केले. मुलींच्या टाळ्यांनी आणि "चिअर्स'नी आज शिक्षिका मोहरून गेल्या होत्या.
ट्रेन फलाटावर पोहोचली, आणि मी बोलणं अर्धवट तोडून खटाक्कन फोन बंद केला. गाडी पकडायच्या तयारीत "पोझिशन' घेतली. मुंबईतल्या बऱ्याच वर्षांच्या "अनुभवा'मुळे फलाटावर येऊन थांबण्याआधीच गाडी पकडायच्या "कले'त मी माहीर झालो होतो.
आजही, गाडी पुरती थांबण्याआधी मी विंडो पकडून "निवांत'ही झालो होतो...
गाडी थांबली, आणि फलाटावरचा गर्दीचा लोंढा दरवाजाशी जमा झाला. धावपळ करीत एकेकजण मिळेल त्या जागेवर बसत होता. गाडी भरली.
गाडी सुटायची काही मिनिटांची प्रतीक्षा सुरू झाली होती.
अचानक फलाटावर कलकलाट झाला.
सातआठ बायका आणि दोनचार पुरुषांचा एक घोळका सातआठ लहान मुलांना पुढे रेटत फलाटावरून सरकत होता. दहाबारा बायका धाय मोकलून रडत त्यांच्या मागून धावत होत्या... गाडीच्या डब्यात त्या मुलांना कोंबलं गेलं, आणि त्या बायका आणि पुरुषांनी दरवाजाशी भिंत तयार केली. रडत मागून आलेल्या बायकांनी डब्याच्या खिडकीशी गर्दी केली होती.
फलाटावर शिल्लक असलेली गर्दी पळापळ करून गाडी पकडायचं विसरली.
हा काय प्रकार असेल, त्याचे तर्क करीत फलाटावरची माणसं एकमेकांशी कुजबुजत होती.
बाहेरच्या गर्दीतल्या बायकांचं रडणं ऐकत गोंधळलेल्या त्या सातआठ लहान मुलांचाही एव्हाना बांध फुटला होता.
सगळा डबा रडण्याच्या भेसूर सुरांनी केविलवाणा झाला होता.
आतल्या बायका त्या मुलांना गप्प बसण्यासाठी दटावतानाच, खिडकीतल्या बायकांवरही दामटत होत्या.
"अभी चूप बैठो, नही तो तुम लोगोंकोही अंदर ले लेंगे'... एकीनं आपल्या "ठेवणीतल्या' आवाजात खिडकीतून बाहेर पाहात "दम' दिला, आणि खिडकीशी जमलेली बायकांची गर्दी धास्तावल्यासारखी दोन पावलं मागं सरकली.
डब्यातली हंबरडा फोडून रडणारी मुलंही, आतल्या आत मुसमुसू लागली.
त्या बायकांतल्याच एकीच्या मांडीवर बसलेली दोनतीन वर्षांची एक मुलगी पलीकडच्या खिडकीतून पलीकडून धावणाऱ्या गाडीकडे पाहात "टाटा' करीत होती...
आपण कुठे चाललोय, हे तिला माहीतच नव्हते.
आपल्याला आज रात्री आईबाप भेटणार नाहीयेत, याचीही तिला जाणीव नव्हती. कुणाच्या तरी मांडीवरून, गाडीच्या सीटवर बसून प्रवास करण्याच्या वेगळ्या अनुभवाचा आनंद तिच्या मासूम चोहऱ्यावरून ओसंडत होता.
रडणाऱ्या मुलांकडे पाहातही ती हसतच होती.
बाहेरच्या बायकांचं रडणं मात्र आता सगळ्यांनाच अस्वस्थ करीत होतं.
हा काय प्रकार आहे, तेच कळत नव्हतं...
कोण आहेत ही मुलं?
कोण होत्या त्यांना गाडीत कोंबणाऱ्या बायका आणि ते पुरुष?
बाहेर फलाटावर धाय मोकलून रडणाऱ्या बायका?
असे प्रश्‍न गर्दीच्या चेहऱ्यावर उमटवूनच गाडी सुटली, आणि पुन्हा फलाटावर एका सुरात हंबरडा फुटला...
मुलांनीही डब्यात गलका केला...
कुणी अविचारानं उडीबिडी मारू नये, म्हणून त्या पुरुषांनी दरवाजाशी घट्ट गर्दी केली.
मुलं नाईलाजानं जाग्यावर बसली होती.
डोळ्यातल्या पाण्याचे ओघळ त्यांच्या मळलेल्या गालांवर सुकले होते.
नाकातूनही धारा वाहात होत्या...
... गाडीनं वेग घेतला, आणि अचानक माझा फोन पुन्हा वाजला.
मुलीचाच फोन होता.
शाळेत साजऱ्या केलेल्या "चिल्ड्रेन्स डे'ची मजा सांगून संपली नव्हती.
मी फोन कानाला लावून हलकासाच रिस्पॉन्स देत तिचं बोलणं ऐकत होतो... काहीच बोलत नव्हतो.
कदाचित ते तिला समजलं असावं.
"जाऊ दे बाबा... संध्याकाळी तुम्ही घरी आल्यावर सांगेन...' असं म्हणत तिनंच फोन बंद केला, आणि मी पुन्हा त्या मुलांना न्याहाळू लागलो...
... दोनतीन स्टेशनं गेल्यावर, त्यांच्यातला एकजण माझ्याच शेजारी रिकाम्या झालेल्या सीटवर बसला.
हा काय प्रकार आहे, हे आता कळेल, अशी माझी खात्री झाली होती.
त्यांच्या गप्पा सुरू असताना मी उगीचच त्यावर रिऍक्‍ट होत होतो.
हे त्यांच्याही लक्षात आलं होतं.
मग कुणीही काहीही बोलला, तरी प्रतिक्रियेच्या अपेक्षेनं तो माझ्याकडं पाहातो, हे माझ्या लक्षात आलं.
मी कधी हसून, कधी मान डोलावून त्यांच्या बोलण्यावर माफक प्रतिक्रिया देत होतो.
त्याचा उपयोग झाला.
त्या हसण्यातून तयार झालेल्या ओळखीचा फायदा घेत मी एकाशी बोलणं सुरू केलं...
"कोण आहेत ही मुलं?' मी अनभिज्ञ चेहऱ्यानं त्याला विचारलं, आणि ती रेल्वे स्टेशनांवर भीक मागणारी, चोऱ्या करणारी, बूट पॉलिश करणारी मुलं आहेत, एवढं मला त्याच्या उत्तरावरून समजलं.
पुढच्या प्रश्‍नाचं उत्तर मी तर्कानं लढवलं होतं.
सरकारच्या बालसुधारगृहानं अशा मुलांना पकडून सुधारगृहात ठेवण्यासाठी फतवा जारी केला असणार, हे मी माझ्या पत्रकारितेच्या पेशातील अनुभवावरून ताडलं होतं.
"त्यांना मानखुर्दला नेणार?' मी थेट विचारलं, आणि "तो' चमकला.
"किती मुलांना पकडलंत आज?' माझ्या प्रश्‍नावर काय उत्तर द्यावं, या शंकेनं तो भांबावलेला स्पष्ट दिसत होता.
"आठ जणांना...' त्याच्या शेजारी बसलेला त्याचा सहकारीच माझ्या प्रश्‍नावर उत्तरला.
"फक्त अंधेरी, जोगेश्‍वरी आणि गोरेगावच्या फलाटांवरच आज "रेड' केली...' मी न विचारताच त्यानं मला पुढची माहिती पुरवली होती...
"मग त्या खिडकीबाहेर जमलेल्या बायका?...' माझा प्रश्‍न त्याला बहुधा अपेक्षितच होता.
"त्या या मुलांच्या आया... मुलांना भिका मागायला लावतात, चोऱ्या करायला लावतात... बूट पॉलिशच्या धंद्यात घुसवतात, आणि त्यांच्या कमाईवर दारू पितात...' तो कडवट तोंडानं बोलला.
आता या मुलांना बाल-गुन्हेगार म्हणून सुधारगृहात ठेवणार... पण खरे गुन्हेगार कोण?... ते, की त्यांना यात ढकलणारे... त्यांचे जन्मदाते?...
ते आता खिडकीतून पाहात रडतायत. मायेपोटी, की कमावणारे हात गेले म्हणून?... मी सुन्न झालो होतो.
`अरे पण आज कशाला पकडलंत त्यांना?... आज चिल्ड्रेन्स डे'... माझं बोलणं अर्धवटच राहिलं.
आजच काम करायची "ऑर्डर' होती...
"चिल्ड्रेन्स डे' वगैरे प्रकाराशी काही देणंघेणं नसल्याच्या चेहऱ्यानं तो उत्तरला.
"अजून कुठे केलीत कारवाई?' मी विचारलं.
"नाही. आज फक्त तीन स्टेशनांवर...' तो म्हणाला.
बाजूचा एक प्रवासी हे ऐकून हैराण चेहऱ्यानं आळीपाळीनं आमच्याकडे पाहात होता.
उद्विग्नपणे त्यानं मान हलवली.
तेवढ्यात, आमच्याच डब्यात एक लहान मुलगी हात पसरत पुढे आली.
तिच्या चेहऱ्यावर भिकाऱ्याच्या "धंद्या'ला आवश्‍यक असलेला "केविलवाणेपणा' पुरेपूर मुरला होता.
माझ्याशी बोलताबोलता त्यानं खिशात हात घातला, आणि रुपयाचं नाणं तिच्या पसरलेल्या हातावर ठेवलं.
"तिला पण घेऊन चल मानखुर्दला'... त्याचा सहकारी खदाखदा हसत तिच्याकडे पाहात बोलला, आणि त्या मुलीच्या चेहऱ्यावर अचानक वेगळेच भाव उमटले. केविलवाणा "केलेल्या' तिच्या चेहऱ्यावर अचानक भयाचं सावट दाटलं, आणि तिनं धूम ठोकली.
पण गाडी बरीच पुढे आली होती...
ती अंधेरीला असती तर?.. एक प्रश्‍न सहज मनाला चाटून गेला, आणि मी त्या मुलीकडं बघितलं.
त्याच डब्यात, पलीकडच्या कंपार्टमेंटच्या पॅसेजमध्ये थांबून ती भयभरल्या नजरेनं आमच्या डब्याकडे पाहात होती...
ती सुटल्याचा आनंद, आमच्या डब्यातल्या पोरांच्या रडवेल्या चेहऱ्यांवर उमटलेला मला स्पष्ट दिसला.
वीसपंचवीस मिनिटांच्या प्रवासातलं हे चित्र. जसंच्या तसं.
... गाडी वडाळ्याला आली, आणि पुन्हा सगळ्यांनी त्या पोरांना उठवून एकत्र केलं.
पुन्हा "डोकी' मोजली गेली.
मला "छशिट'ला जायचं होतं.
तरीही मीदेखील त्यांच्याबरोबर उठलो.
फलाटावर उतरलो, आणि खिशातला मोबाईल काढून घाईघाईनं फोटो काढायचा प्रयत्न करू लागलो. समोरून मानखुर्दकडे जाणारी गाडी येऊनही थांबली होती.
मुलांचा घोळका गर्दीत कोंबायच्या प्रयत्नातही त्यांच्यातले एकदोघंजण मला "पोज' देत होते.
मी "प्रेसवाला' आहे, हे त्यांनी ओळखलं होतं...
एकदोन निसटते फोटो माझ्या हाताला लागले, आणि ती गर्दी मानखुर्दला जाण्यासाठी गाडीत चढली...
मघाची ती छोटी मुलगी आता मला "टाटा' करत होती. मी कॅमेरा सरसावला, पण तोवर गाडी सुटली होती.
तिचा फोटो मला मिळालाच नाही.
मी "छशिट'कडे जाणाऱ्या गाडीसाठी फलाटावर उभा राहिलो.
मिनिटभरात गाडी आली, आणि मी चढून दरवाज्याशीच थांबलो.
"हॅप्पी चिल्ड्रेन्स डे बेटा'... प्रेमळ सुरात बाजूचा एक प्रवासी पलीकडच्या बहुधा आपल्या मुलाला म्हणाला, आणि त्यानं फोन बंद केला.
मीही विचार करत होतो.
मघाशी माझ्या मुलीनं, मला "चिल्ड्रेन्स डे'च्या गमती मोठ्या उत्साहानं सांगितल्या होत्या.
... पण, तिला "विश' करायचं राहूनच गेलं होतं...
---------------------
http://zulelal.blogspot.com

समाजप्रकटन