नंदावैनी...!

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
13 Nov 2008 - 4:58 pm

"अरे नका जीव खाऊ माझा! मी मेले की सुटाल सगळे एकदाचे..!"

"राहूल, का उठलास जेवता जेवता? एवढाच भात उरला आहे तो संपवून टाक पाहू पटकन.."

"अरे वा! आमची अस्मिताताई आली का शाळेतून! आज काय बुवा मज्जा आहे एका मुलीची. आज वाढदिवस म्हणून नवा ड्रेस घालून शाळेत गेली होती वाटतं माझी राणी! चल, हातपाय धुवा बेटा लौकर. गरमगरम वरणभात खायचाय ना?"

"अरे देवा, थांब मी आल्ये..! काय खाल्लस काय रात्री? अरे थांब थांब, उभा रहा तिथेच. नाहीतर ते बरबटलेले कुले घेऊन हिंडशील गावभर.." असं म्हणून पदरबिदर खोचून नंदावैनी त्या कुणा लहानग्याला उचलून घाईघाईत संडासात घेऊन जाते! :)

"प्रसाद, तू का घेतलास त्याचा चेंडू? अरे अद्वैत, मारू नको ना त्याला. मी आता उठले ना, की झोडून काढेन हां सर्वांना!"

"मी मेले की सुटाल सगळे एकदाचे..!"

दुपारचे काहितरी बारा-साडेबारा वाजलेले असतात आणि नंदावैनी मुक्त कंठाने घरातलं पाळणाघर हाकत असते. एकिकडे
"गोविंदा माझा कृष्णमुरारी..." असं कुठलंसं गाणं म्हणत मांडीवरल्या कुणा तान्ह्या आर्चिसला खेळवत असते, त्याला ग्राईपवॉटर का कायसं पाजत असते! चिन्मय, प्रसाद, नेहा, राहूल, अस्मिता, अथर्व, चैत्राली अशी दहापंधरा बाळगोपाळ मंडळी नंदावैनीच्या पाळणाघरात आहेत. या सार्यांचे आईवडिल मोठ्या विश्वासाने आपापली पिल्लं नंदावैनीकडे सोपवतात आणि दिवसभरच्या रोजीरोटीकरता मुंबईत कुठे कुठे कामावर निघून जातात. आता त्या पिल्लांची आई, बाप, काकू, मावशी सारं काही नंदावैनीच असते!

नंदावैनी..!

आमचीच चाळकरी. दोन मुलींना मागे ठेवून नवरा या जगातून चालता झाल्यावर शिवणकामाच्या मिळणार्‍या तुटपुंज्या पैशात नंदावैनीचं भागेनासं झालं. सुरवातीला एक, मग दोन, असं करत करत नंदावैनीचं सगळं घरच मुलांनी भरलं, त्या घराचं पाळणाघर झालं! अगदी चार-सहा महिन्यांच्या तान्ह्या आर्चिसपासून ते दुसरी-तिसरीत शिकणार्या प्रसाद -अस्मितेपर्यंत सर्व वयांची मुलं आज नंदावैनीच्या पाळणाघरात आहेत. आमची नंदावैनी या सार्‍यांची रिंगमास्टर! सकाळची-दुपारची शाळा सांभाळून आठवी/नववीत असलेल्या नंदावैनीच्या दोन मुलीही या बाळगोपाळांची अगदी प्रेमाने काळजी घेतात, त्यांना सांभाळतात.

नंदावैनी तशी फटकळ, परंतु प्रेमळही तेवढीच. एखाद्या मुलाच्या आईवडिलांनी आपल्याला पैसे दिले आहेत म्हणूनच केवळ त्यांना सांभाळलं पाहिजे अशी कोरडी कर्तव्यभावना तिच्यापाशी कधीच नसे. नंदावैनी त्या सर्व मुलांचं अतिशय प्रेमाने करायची, प्रेमाने सांभाळायची! परंतु शेवटी मुलंच ती! त्यामुळे दंगामस्तीही अगदी भरपूर करत. त्यामुळे मग नंदावैनीचा तोंडपट्टाही सुरू व्हायचा. कुणाला रागव, कुणला धपाटा मार, कुणी अगदी छान, निमूट वागलं की त्याचं भरभरून कौतुक कर, "तू का त्याला उलट बोललास? दादा आहे ना तो तुझा?" असे मुलांवर नकळत संस्कार कर.. असे नानाप्रकार नंदावैनीकडे दिवसभर चालत असत. पाळणघर कसलं, नंदावैनीकडे रोज सकाळी भरणारं गोकूळच होतं ते! आणि का कुणास ठाऊक, परंतु मुलांनाही नंदावैनीचा लळा फार लौकर लागायचा. मग नंदावैनी कितीही ओरडू देत, रागावू देत, मुलांना नंदावैनी कधी परकी वाटायची नाही..

छान बोलका चेहेरा, दिसायला आखीव-रेखीव, मध्यम उंची, मध्यम बांधा असलेली पंचेचाळीशीतल्या घरातली आमची नंदावैनी आणि तिचं पाळणाघर हा आमच्या चाळीतला एक जिवंत झरा. नंदावैनी मुलांना सांभाळायचे जे पैसे घ्यायची त्यात त्या मुलांचं दुपारचं जेवण, मधल्यावेळचं खाणंही असे. दुपारच्या जेवणात वरणभात-तूप-मीठ-लिंबू हा पूर्णाहार कंपलसरी! तो प्रत्येक मुलाने खाल्लाच पाहिजे असा नंदावैनीचा कायदा असे. शिवाय सोबत भाजी पोळी, कधी तूपसाखरेच्या किंवा लसूणचटणी घातलेल्या पोळीची गुंडाळी मुलांनी खाल्लीच पाहिजे असाही नंदावैनीचा नियम असे. मॅगी, केलॉग्ज्स वगैरे शब्दांनादेखील त्या घरात बंदी होती! विविध वयोगटाच्या दहापंधरा मुलांचा त्या घरात मुक्त वावर असूनही नंदावैनीचं घर नेहमीच अतिशय स्वच्छ व टापटीप असे. आपल्याकडे लहान मुलं असतात तेव्हा कुठल्याही परिस्थितीत आपल्याकडे स्वच्छता असलीच पाहिजे अशीच नंदावैनीची तिच्या दोन्ही मुलींना शिकवण होती..

दुपारच्या वेळेस ती बालगोपाळ मंडळी जरा वेळ झोपायची तेवढाच काय तो नंदावैनीला थोडा आराम. मग पुन्हा नंदावैनी मधल्या वेळच्या खाण्याच्या मागे असे. कधी उकड, कधी मोकळी भाजणी, कधी तिखटामिठाचा शिरा असा बेत असे. मग त्या सर्व मुलांचं मधल्यावेळचं खाणं चालायचं. त्यानंतर कुणाकडून कविता म्हणून घे, कुणाकडून पाढे म्हणून घे, एखाद्या लहानग्याला तुकडेतुकडे जोडून वाघ किंवा हत्ती पूर्ण करायला सांग, असे नानाप्रकार चालायचे. कुणी काही चांगलं वागलं की नंदावैनी त्या मुलाला किंवा मुलीला "बघा, आमची ताई कित्ती शहाणी आहे, म्हणूनच माझी लाडकी आहे..!" असं सगळ्यांदेखत मुद्दाम तोंडभरून कौतुक करत असे. मग इतर मुलंही नकळत चांगलं वागून नंदावैनीच्या गुडबुक्स मध्ये जायचा प्रयत्न करायची! :)

मुंबईच्या धकाधकीच्या दुनियेत कामावरून घरी परतायला आईवडिलांना संध्याकाळचे सात साडेसात तरी वाजत. इकडे संध्याकाळ होऊ लागली की नंदावैनी पुन्हा एकदा रिंगमास्टर बनायची.

"चला, प्रत्येकाने स्वच्छ हातपायतोंड घुवून घ्या, पर्वचा म्हणायचा आहे ना? मग जायचंय ना सर्वांना आपाल्या घरी?"

असं म्हणून कडेवरच्या कुणा लहानग्या अर्चनाचा पापा घेऊन, "आता जायच्ययं ना आईकडे?" असं म्हणायची. ती लहानगी अर्चना काही कळल्यासारखं अगदी गोड हसायची! नंदावैनीसकट घरातल्या सगळ्याच बाळगोपाळांना ते निरागस हास्य निखळ, निर्विष आनंद देऊन जायचं!

मग नंदावैनी स्वत:च प्रत्येक मुलाला फ्रेश करायची, स्वच्छ करायची. ती आणि तिच्या मुली प्रत्येकाचा भांग, पावडरकुंकू वगैरे करायच्या. मग सगळ्यांनी हात जोडून देवापुढे बसायचं. एखादी सुरेखशी उदबत्ती आणि मंद ज्योतीची समई नंदावैनीच्या देवघरात तेवत असायची. आणि मग सुरू व्हायचं - "शुभंकरोति कल्याणम्.."

तोवर एकेका आईवडिलांचं आपापल्या पिल्लाला नेण्याकरता नंदावैनीच्या घरी येणं सुरू झालेलं असायचं. मग,

"आज काही जेवलाच नाही.."

"आज एक मुलगा मुळ्ळीसुद्धा रडला नाही बरं का!" :)

"आज प्रणवला चांगला धपाटलाय बरं का! पाढे पाठ करत नाहीत आणि दिवसभर नुसती मस्ती..!"

"आज जरा डॉक्टरलाच दाखवा, दिवसभर रेघा मारतोय..!"

असा प्रत्येक मुलाच्या/मुलीच्या आईवडिलांकडे त्या त्या मुलाचा नंदावैनी रिपोर्ट करायची! :)

आपलं पोरगं नंदावैनीकडे आहे म्हणजे सुखरूप आहे असा विश्वास प्रत्येक आईवडिलांना होता. नंदावैनीने रट्टा मारलेला असणार म्हणजे आपल्याच लेकाचं काहीतरी चुकलेलं असणार.. अशी खात्री होती प्रत्येकाची! २६ जुलै सारख्या प्रलयातही, जेव्हा कुणाच मुलाचे आईवडिल रात्रभर घरी येऊ शकले नव्हते तेव्हाही ते मुलांच्या बाबतीत मात्र निश्चिंत होते. "अगदी रात्रभर जरी मुलांना नंदावैनीकडे रहायला लागलं तरी चिंता नको.." अशी त्यांची निचिंती होती. नंदावैनीवरचा तो विश्वास होता..!

त्या दिवशी संध्याकाळी कुणा प्रणवचे आईवडिल नंदावैनीचा निरोप घ्यायला आले होते. लाडक्या प्रणवला नंदावैनीकडून सेन्डऑफ होता.. अगदी ३-४ महिन्यांचा असल्यापासून ते ३ वर्षांचा होईस्तोवर प्रंणव नंदावैनीकडेच सांभाळायला होता. आता प्रणवचे आईवडिल दोघेही त्याला घेऊन अमेरीकेला चालले होते..! निरोपाची वेळ आली. नंदावैनीनी कपाटातून छानश्या सोनेरी कागदात पॅक केलेली कुठलीशी एक भेटवस्तू काढली आणि प्रणवला जवळ बोलावलं. काहीतरी वेगळं जाणवून छोटासा प्रंणवही जरा कावराबावराच झाला होता..

नंदावैनीनी प्रणवला उचलून कडेवर घेतला. त्याचा एक गोड पापा घेऊन हातातली भेटवस्तू त्याच्या हातात दिली,

"पुन्हा येशील ना रे मला भेटायला? अमेरिकेला गेल्यावर नंदावैनीला विसरणार नाहीस ना रे? की विसरशील गधड्या मला?"

"मी तुला खूप मारलं ना रे लहानपणी?"

असं म्हणून त्या लहानग्या प्रणवला उराशी कवटाळत नंदावैनी हमसून हमसून रडू लागली! प्रणवही रडू लागला, प्रणवच्या आईबाबांच्या डोळ्यातही पाणी आलं..!

"अरे नका जीव खाऊ माझा! मी मेले की सुटाल सगळे एकदाचे..!"

नेहमीप्रमाणेच दुसरा दिवस उजाडला आणि नंदावैनीकडचं गोकूळ पुन्हा एकदा भरलं..! :)

आज त्या गोकुळात प्रंणव नव्हता. उद्या तो चांगला शिकून कुणीतरी मोठा यशस्वी डॉक्टर/विंजिनियर होईल, त्याचं नांव होईल, त्याच्या आईवडिलांचं नांव होईल..

पण त्याच्या त्या यशात कुठेतरी नंदावैनीकडच्या गरमगरम वरणभाताचा अन् तीनसांजेच्या शुभंकरोतीचाही वाटा असेल..!

-- तात्या अभ्यंकर.

वाङ्मयप्रतिभा

प्रतिक्रिया

विसुनाना's picture

13 Nov 2008 - 5:08 pm | विसुनाना

छान व्यक्तिचित्र. खूप आवडले. वैनी पाळणाघरासकट डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या.

जैनाचं कार्ट's picture

13 Nov 2008 - 5:29 pm | जैनाचं कार्ट (not verified)

१००% हेच म्हणतो !

तात्या,
येऊ द्या अजून काही तरी बाहेर पोटडीतून !

जैनाचं कार्ट
शुभ कर्मन ते कबहूं न डरो....!
आपले संकेतस्थळ

लिखाळ's picture

13 Nov 2008 - 5:15 pm | लिखाळ

:)
छान आहे व्यक्तिचित्रं !
-- लिखाळ.

शाल्मली's picture

13 Nov 2008 - 9:36 pm | शाल्मली

छान आहे व्यक्तिचित्रं
+१

--शाल्मली.

सुचेल तसं's picture

14 Nov 2008 - 11:17 am | सुचेल तसं

+१

उत्तम!!!!
Finally I will be so matured that I will react to nothing.
अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com

साती's picture

13 Nov 2008 - 5:26 pm | साती

तात्या,मस्त लिहिलंय. नंदावैनी आवडल्या.
साती

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Nov 2008 - 5:38 pm | बिपिन कार्यकर्ते

तात्या... हे माझंच घर आहे. तू कधी आला होतास आमच्या कडे असं वाटतंय मला.

कित्येक वर्षं माझ्या आईने आमच्या घरात असंच पाळणाघर चालवलं आहे. बाबा तिला मदत करायचे. तू जे लिहिलं आहेस त्यातला शब्दन् शब्द मी जगलो आहे. एक वेळ अशी होती की आमच्या घरात ४ महिन्याच्या छोटुलीपासून ७वी मधे जाणार्‍या ताई / दादांपर्यंत सगळा मेळा (जवळ जवळ १२-१४ मुलं) सुखेनैव नांदत होता. त्यातली बरीच मुलं आज मोठी झाली आहेत. कोणी इंजिनियर, कोणी फार्मासिस्ट असे शिकले आहेत. कोणी जास्त शिकलेच नाही. पण या सगळ्यांचा कॉमन फॅक्टर मात्र 'काकू'. बरीचशी मुलं आणि त्यांचे पालक आजही संपर्कातच आहेत असं नाही तर आमच्या सुखदु:खाच्या प्रसंगात आजही आमच्या जोडीने उभे असतात. गणपती वगैरेला मुद्दाम भेटायला येतात. वाकून नमस्कार करतात. काही कुटुंबं तर एवढी जवळ आली की अजूनही प्रत्येक मुंबई भेटीत त्यांना नाही भेटलं तर धरून मारतिल मला. माझी एक 'बहिण' मला या सगळ्या मुळेच मिळाली. माझ्या लग्नात तिचा पण मानपान झाला होता. :)

दुपारच्या जेवणात सगळे आपापला डबा घेऊन यायचे तरी गरम भात, वरण / आमटी हे आमच्या घरचंच असायचं. एकदा गंमत झाली. एका मुलीच्या आईला कळले की काकू रोज दुपारी वरण भात देतात. तसं आई जे पैसे घ्यायची त्यात वरणभाताची बोली नसायची. त्या बाईंना वाटलं की कशाला काकूंना त्रास. मग त्या बाई त्यांच्या मुलीला भाजी पोळी बरोबर थोडा वरण भात द्यायला लागल्या. पहिल्याच दिवशी संध्याकाळी त्या मुलीला घ्यायला आल्या तेव्हा सगळ्यांसमोर तिला तिच्याच मुली कडून हे ऐकायला मिळाले, "आई, तुला काकूंसारखी आमटी कधीच येणार नाही. तू नुसती पोळी भाजीच दे. खरं तर ती पण मला आवडत नाही." ती माऊली पिसाटली होती. :) घरी दूधाला तोंड न लावणारी मुलं आमच्या कडे इतरांच्या नादाने गटागट दूध प्यायची.

खूप कडू गोड अनुभव मिळाले. मिळालेला पैसा तेव्हाच खर्च झाला, पण मिळालेली माणसं मात्र आजही आम्हाला सोबत करत आहेत. याहून अधिक काय पाहिजे?

पण त्याच्या त्या यशात कुठेतरी नंदावैनीकडच्या गरमगरम वरणभाताचा अन् तीनसांजेच्या शुभंकरोतीचाही वाटा असेल..!
आमच्या भाग्याने आम्हाला हा वाटा मान्य करणारे पण खूप लोक भेटले.

बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर's picture

13 Nov 2008 - 5:43 pm | विसोबा खेचर

आमच्या भाग्याने आम्हाला हा वाटा मान्य करणारे पण खूप लोक भेटले.

नंदावैनीवर लिहिंण्याचा एक प्रयत्न करून पाहिला. पण तुझ्या या वाक्यामुळे भरून पावलो..!

आपला,
(भाईकाकांचा ष्टुडंट) तात्या.

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Nov 2008 - 5:46 pm | बिपिन कार्यकर्ते

गंमत म्हणजे, असा एक छोटा मुलगा कॅनडाला कायमचा जाण्याचा प्रसंग जसाच्या तसा घडला होता. एखादं मूल यायचं बंद झालं की काही दिवस मात्र खरंच चुकल्या चुकल्या सारखं होतं. बाकीची मुलं पण जरा दु:खीच असतात.

अवांतरः आत्ता या क्षणी माझे आई - वडिल सुद्धा हे वाचत आहेत.

बिपिन कार्यकर्ते

ललिता's picture

13 Nov 2008 - 6:24 pm | ललिता

पाळणाघरातील वातावरण, तिथली मुलं, नंदावैनींचा तिथला वावर..... नजरेसमोर उभं राहिलं!
जियो तात्याराव! :)

स्वाती दिनेश's picture

13 Nov 2008 - 6:27 pm | स्वाती दिनेश

पाळणाघरातील वातावरण, तिथली मुलं, नंदावैनींचा तिथला वावर..... नजरेसमोर उभं राहिलं!
ललितासारखेच म्हणते,
तात्या,नंदावैनी आवडल्या.
स्वाती

मनस्वी's picture

13 Nov 2008 - 6:32 pm | मनस्वी

>पाळणाघरातील वातावरण, तिथली मुलं, नंदावैनींचा तिथला वावर..... नजरेसमोर उभं राहिलं!
+१
लेख छान जमलाय.

अभिरत भिरभि-या's picture

13 Nov 2008 - 6:47 pm | अभिरत भिरभि-या

हेच म्हणतो

सहज's picture

14 Nov 2008 - 7:24 am | सहज

हेच म्हणतो.

छोटा डॉन's picture

13 Nov 2008 - 8:33 pm | छोटा डॉन

लेख कम व्यक्तीचित्र नेहमीप्रमाणेच अप्रतिम जमले आहे.
त्या "रक्तापेक्षा जवळच्या नात्याला" ह्यापेक्षा अजुन मोठ्ठी आदरांजली नाही ....
मस्तच.

लिहा अजुन असेच, पुलेशु.

छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....

सुनील's picture

13 Nov 2008 - 6:40 pm | सुनील

छान चित्रण. नंदावैनी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या!

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चतुरंग's picture

13 Nov 2008 - 6:54 pm | चतुरंग

पाळणाघराचे आणि नंदावैनिंच्या स्वभावाचे बारकावे टिपलेत चांगले!

"आज जरा डॉक्टरलाच दाखवा, दिवसभर रेघा मारतोय..!"

हे हे हे! अगदी टिपिकल!! :)

चतुरंग

दत्ता काळे's picture

13 Nov 2008 - 7:15 pm | दत्ता काळे

फार छान

त्या लहानग्या प्रणवला उराशी कवटाळत नंदावैनी हमसून हमसून रडू लागली! प्रणवही रडू लागला, प्रणवच्या आईबाबांच्या डोळ्यातही पाणी आलं..!

कुणी काही चांगलं वागलं की नंदावैनी त्या मुलाला किंवा मुलीला "बघा, आमची ताई कित्ती शहाणी आहे, म्हणूनच माझी लाडकी आहे..!" असं सगळ्यांदेखत मुद्दाम तोंडभरून कौतुक करत असे. मग इतर मुलंही नकळत चांगलं वागून नंदावैनीच्या गुडबुक्स मध्ये जायचा प्रयत्न करायची!

. . . पु.लं.च्या लेखनाची आठवण आली.

ऍडीजोशी's picture

13 Nov 2008 - 7:19 pm | ऍडीजोशी (not verified)

तात्या इज बॅक :)

अवांतर - जरा रोशनी वर प्रकाश पाडायचं बघा ना तात्या. त्रिवार प्लिज...

यशोधरा's picture

13 Nov 2008 - 8:30 pm | यशोधरा

व्यक्तीचित्रण आवडले तात्या.

अवांतर - जरा रोशनी वर प्रकाश पाडायचं बघा ना तात्या. त्रिवार प्लिज...

अनंत छंदी's picture

13 Nov 2008 - 8:46 pm | अनंत छंदी

तात्या
कधी कधी मनाला खूप हळवे करणारे लिहिता.

मुक्तसुनीत's picture

13 Nov 2008 - 8:49 pm | मुक्तसुनीत

नंदावैनींची कथा एकाच वेळी हृदयाला स्पर्श करणारी आहे आणि त्याच बरोबर प्रेरणादायकही. नवरा गेल्यानंतर आलेल्या परिस्थितीला बाईंनी आपल्याला जे शक्य आहे त्या रीतीने तोंड दिले. आणि या प्रक्रियेमधे अनेकानेक कुटुंबाना अनमोल मदत केली.

राहता राहिले मुलांचे , त्यांच्या पालकांचे नि वैनींचे स्नेहबंध. अशा गोष्टींबद्दल विचार करताना माझ्या सारखा नास्तिकसुद्धा मग अशा अनामिक नात्यांच्या बाबतीत पूर्वजन्मीचे ऋणानुबंध असे पटकन म्हणून जातो ! :-)

तात्या , फारा दिवसांनी तुमच्या शैलीतले उत्तम काही लिहीलेत. धन्यवाद !

विनायक प्रभू's picture

13 Nov 2008 - 9:07 pm | विनायक प्रभू

अतिशय सुंदर
अवांतरः तुम्ही आमच्या साहेबासारखे हसता हो. ३ मजली.

परिकथेतील राजकुमार's picture

13 Nov 2008 - 8:56 pm | परिकथेतील राजकुमार

'अप्रतीम' ... लेखणीत खरच ताकद आहे डोळ्यासमोर व्यक्तिचीत्र उभे करण्याची ! असेच छान छान लिहुन आमच्या डोळ्यांना आणी डोक्याला मेजवानी देत जा बुवा !!

++++ प्रसाद ++++
तू तेव्हा तशी, तू तेव्हा अशी...तू बहराच्या, बाहूंची...
http://papillonprasad.blogspot.com/

प्राजु's picture

13 Nov 2008 - 9:18 pm | प्राजु

व्यक्तीचित्र आवडले. खास तात्या स्टाईल मध्ये लिहिलेले.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

नंदन's picture

14 Nov 2008 - 2:32 am | नंदन

सहमत आहे. व्यक्तिचित्र आवडले.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

रेवती's picture

13 Nov 2008 - 9:28 pm | रेवती

नंदावैनी. अशी एखादी नंदावैनी जर असली जवळपास तर पालकांचे कितीतरी प्रश्न सुटतील.

रेवती

सुवर्णमयी's picture

13 Nov 2008 - 9:51 pm | सुवर्णमयी

मी पण हेच म्हणते.
तात्या, व्यक्तीचित्र छान झाले आहे. (ऑ? आता मला का प्रतिसाद ?म्हणून खरड लिहू नका..)

नारायणी's picture

13 Nov 2008 - 11:06 pm | नारायणी

तात्या, व्यक्तिचित्र तर मस्तचं जमलय पण माझ्या लहानगीचा सांभाळ करणार्‍या बेबीसिटरचं(विजया) आणि तुमच्या या वैनीचं वर्णन अगदी मिळतंजुळतं आहे. स्वभावाच आणि दिसण्याचदेखील.वरणभात असतो तिच्याकडे. रोज संध्याकाळी घरी आल्यावर मुलिच्या कपाळावर विभुतीही असते. :).
ईतक्या मुलांना सांभाळणं साधं काम नव्हे. बाईमध्ये कामाचा प्रचंड उरक्,हसतमुख स्वभाव आणि सर्वात महत्त्वाच म्हणजे पेशन्स असावाचं लागतो. परक्या भुमीवर विजयासारखी काकु भेटल्यामुळे मी देवाचे अनेकदा आभार मानलेत.
पण त्याच्या त्या यशात कुठेतरी नंदावैनीकडच्या गरमगरम वरणभाताचा अन् तीनसांजेच्या शुभंकरोतीचाही वाटा असेल..! >>> नक्किचं आहे तात्या.

शितल's picture

14 Nov 2008 - 1:35 am | शितल

तात्या,
व्यक्तिचित्रण मस्तच जमले आहे नंदावैनी आणि त्याचे पाळणाघर डोळ्यासमोर उभे राहते. :)

चित्रा's picture

14 Nov 2008 - 8:39 pm | चित्रा

असेच म्हणते..

बन्ड्या's picture

14 Nov 2008 - 6:23 am | बन्ड्या

व्यक्तीचित्र नेहमीप्रमाणेच मस्त जमले आहे.

...बन्ड्या

बेसनलाडू's picture

14 Nov 2008 - 7:47 am | बेसनलाडू

नेहमीसारखेच 'टिपिकल तात्या' व्यक्तिचित्र! भाईकाकांचे विद्यार्थी शोभता खरे!
(वाचक)बेसनलाडू

मदनबाण's picture

14 Nov 2008 - 7:54 am | मदनबाण

तात्यानु फारच सुरेख...

मदनबाण.....

हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व,धर्मांतर म्हणजेच राष्ट्रांतर.
बॅ.वि.दा.सावरकर

धोंडोपंत's picture

14 Nov 2008 - 8:26 am | धोंडोपंत

क्या बात है

अप्रतिम लेखन तात्यासाहेब. तुमचे हार्दिक अभिनंदन.

रोशनी ते मंदावैनी हा तुमच्या लेखनात आवाका खूपच विस्तृत आहे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

धोंडोपंत

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

प्रमोद देव's picture

14 Nov 2008 - 8:31 am | प्रमोद देव

रोशनी ते मंदावैनी हा तुमच्या लेखनाचा आवाका खूपच विस्तृत आहे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.

पंतांशी सहमत आहे.

पक्या's picture

14 Nov 2008 - 12:49 pm | पक्या

सुंदर व्यक्तिचित्रण. आवडले.

>> रोशनी ते मंदावैनी हा तुमच्या लेखनात आवाका खूपच विस्तृत आहे. पुढील लेखनासाठी शुभेच्छा.
- धोंडोपंत

मंदावैनी नव्हे हो...नंदावैनी

अनिल हटेला's picture

14 Nov 2008 - 8:39 am | अनिल हटेला

आवडले !!!

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

मस्त लिहिले आहे. पुन्हा पुन्हा वाचायला आवडेल असं. :)

(पु.ल. भक्त)
दिपक

संताजी धनाजी's picture

14 Nov 2008 - 1:56 pm | संताजी धनाजी

तात्या, फार छान लिहीले आहे. शेवटी कंठ दाटुन आल होता :)

- संताजी धनाजी

मिसळ's picture

14 Nov 2008 - 8:58 pm | मिसळ

नंदावैनी डोळ्यासमोर उभ्या राहतात. तात्या, अजून येऊदेत.

विसोबा खेचर's picture

17 Nov 2008 - 2:47 pm | विसोबा खेचर

आपुलकीने प्रतिसाद देणार्‍या सर्व रसिक वाचवरांचे आभार..

आपला,
(कृतज्ञ) तात्या.