पाण्याच्या थेंबासाठी

सुवर्णमयी's picture
सुवर्णमयी in जे न देखे रवी...
12 Nov 2008 - 9:51 pm

पाणी वाया घालवू नका असे मुलांवर ओरडतांना
आठवत असते मी..माझ्यातल्या एका मुलीला..
आज नळ आला नाही ..
..
दोन हातात बादल्या धरून
मोठ्या बंगल्याला वळसा घालून
शेजार्‍याच्या मालकीच्या विहिरीवर पाण्यासाठी जाणार्‍या..
लहान भाऊ तेव्हा अनेक प्रश्न विचारून भंडावत असे मला..

तासभर रांगेत चुळबुळत राहिले की पाणी मिळेल या आशेवर
मान घाली घालून उभी राहयचे मी भावाचा हात धरून
भरलेल्या बादल्या घरी नेतांना लोक बघतात ही जाणिव
आतल्या आत ओढायची..

ओढलेला चेहरा हासरा ठेवण्याच्या प्रयत्नात
फ्रॉकवर सांडलेल्या पाण्याचे भान यायच ...जेव्हा मीच बघायचे
माझ्याकडे
तिर्‍हाइताच्या नजरेने..

विहिरीच्या दगडी काठाला आपटत आपटत ..बादली आत जायची.
.. हिंदकळत वर यायची
त्या आवाजात हरवलेला माझा आवाज आजतागात मला ऐ़कू आलेला नाही...

मुलांच्या दंग्यात पाण्याचा नळ मात्र तसाच वाहतो आहे...

कविताविचार

प्रतिक्रिया

विसोबा खेचर's picture

13 Nov 2008 - 12:19 am | विसोबा खेचर

सुरेख कविता...!

बिपिन कार्यकर्ते's picture

13 Nov 2008 - 12:23 am | बिपिन कार्यकर्ते

खरंच सुंदर.

बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर's picture

13 Nov 2008 - 12:33 am | विसोबा खेचर

साला, ही कविता वाचून लहानपणापासून चाळीतली/बिल्डिंगमधली नळावरची कचाकचा भांडणं आठवली अन् क्षणभर हळवा झालो.. !

आपला,
(भांडखोर) तात्या.

सध्या महाराष्ट्रात/भारतात वीजेच्या लोडशेडिंगचा लपंडाव खूपच वाढला आहे. येत्या पाच-दहा वर्षांच्या काळात पुन्हा एकवार ठिकठिकाणी पाणीयुद्ध पेटणार याची खात्री आहे. तूर्तास आमच्या बिल्डिंगिला पुरेसे पाणी मिळत आहे परंतु भविष्यात पाणीयुद्ध अटळ आहे..!

आपला,
(द्रष्टा) तात्या.

वृषाली's picture

15 Nov 2008 - 7:41 pm | वृषाली

सध्या महाराष्ट्रात/भारतात वीजेच्या लोडशेडिंगचा लपंडाव खूपच वाढला आहे. येत्या पाच-दहा वर्षांच्या काळात पुन्हा एकवार ठिकठिकाणी पाणीयुद्ध पेटणार याची खात्री आहे. तूर्तास आमच्या बिल्डिंगिला पुरेसे पाणी मिळत आहे परंतु भविष्यात पाणीयुद्ध अटळ आहे..!

सहमत

दत्ता काळे's picture

13 Nov 2008 - 11:04 am | दत्ता काळे

हि कविता वाचल्यावर मला माझ्या कर्वेनगरातील (पुणे १९८३ ) चाळीत रहात असतानाची आठवण आली. त्यावेळी सार्वजनिक नळकोंडाळे आमच्या चाळीपासून १५० - २०० फुटांवर होते आणि चाळीपासून तिथवर जाणारी पायवाट दोन शेतांच्यामधल्या बांधावरुन होती. दररोज अगदी सकाळी लवकर दोन्ही हातात भरलेल्या दोन मोठ्या बादल्या हिंदकळ्त, हिंदकळ्त पाणी भरण्याचा कार्यक्रम असे. फार कष्ट पडायचे .

त्यामुळे

तासभर रांगेत चुळबुळत राहिले की पाणी मिळेल या आशेवर
मान घाली घालून उभी राहयचे मी भावाचा हात धरून
भरलेल्या बादल्या घरी नेतांना लोक बघतात ही जाणिव
आतल्या आत ओढायची..

. . . हि जाणिव अगदी जिवंत आहे.

फार आवडली कविता

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

13 Nov 2008 - 11:11 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

आणि बाळकराम म्हणतात तशी जिवंतही वाटते.

नशीबाने कधी अशी वेळ नाही आली, कदाचित मोठ्या शहरात आणि तेही जरा सखल भागात घर असल्यामुळे असेल. (तसं घरात घुसलेल्या पावसाच्या पाण्यानी अनेकदा रडवलं आहे.)

पण या कवितेच्या निमित्ताने पुन्हा एकदा पाणी, वीज वाचवावी हा निश्चय पक्का केला. (यावर स्वतंत्र धागा काढून आपल्याला रोजच्यारोज वीज, पाणी कसं वाचवता येईल यावरही चर्चा करता येईल.)

सहज's picture

13 Nov 2008 - 11:22 am | सहज

कविता आवडली. बदलते आयुष्य, मानवी भावना, संपन्नता-जुने दिवस.... पाण्यासारख्या महत्वाच्या गोष्टीतुन ही जाणीव....

सुरेख..

अवांतर- मुबलक पाणी, सतत वीज, सर्व नागरी सुविधा उत्तम अवस्थेत, जवळजवळ सर्व महत्वाच्या गोष्टी २४ तास उपलब्ध असणे - सुख .....

मनीषा's picture

13 Nov 2008 - 7:18 pm | मनीषा

कविता ... आवडली

पांथस्थ's picture

13 Nov 2008 - 9:15 pm | पांथस्थ

कविता मस्तच आहे. शैली मला द.भा. धामणस्कर यांच्या सारखी वाटली.

पांथस्थ
--- आहे हे अस आहे.

भास्कर केन्डे's picture

13 Nov 2008 - 9:44 pm | भास्कर केन्डे

सोनाली ताई,

कविता वास्तववादी व भावनात्मक असल्याने आवडली. आणखी येऊ द्यात.

आपला,
(हळवा) भास्कर
आम्ही येथे वसतो.

धनंजय's picture

15 Nov 2008 - 6:13 am | धनंजय

कविता आवडली.

चांदीमयी's picture

15 Nov 2008 - 7:43 am | चांदीमयी

अरे वा! सुंदर कविता.

विसुनाना's picture

15 Nov 2008 - 2:23 pm | विसुनाना

कविता खूप आवडली.

त्या आवाजात हरवलेला माझा आवाज आजतागात मला ऐ़कू आलेला नाही...

यात आणखी काही गर्भित असण्याची शक्यता वाटली. शक्यता स्पष्ट झाली असती तर बरे वाटले असते.

विसुनाना's picture

15 Nov 2008 - 2:23 pm | विसुनाना

प्रकाटा.

ऋषिकेश's picture

15 Nov 2008 - 7:31 pm | ऋषिकेश

सुंदर कविता.. पाण्यासाठीचा संघर्ष .. वास्तव.. बोध याच बरोबर आता एका लहानगीला मिळणारे यथेच्छ पाणी बघुन मिळालेले समाधान आणि तरी मनातली काळजी सारे काहि मस्त टिपले आहे..

-('मिसळ'लेला) ऋषिकेश