मंतरलेले दिवस – ३ : शास्त्रीय संगीत समारोह

सुधीर कांदळकर's picture
सुधीर कांदळकर in जनातलं, मनातलं
4 Dec 2019 - 4:53 pm

नोव्हेंबर आला की येणार्‍या थंडीची चाहूल लागते. सहलींचे मनसुबे रचले जातात. त्याचबरोबर संगीत समारोहांचे देखील वेध लागतात. भारतात ठिकठिकाणी शास्त्रीय संगीत समारोह भरतात. गेल्या आठवड्यात केव्हातरी चित्रवाणीवर वाहिन्या चाळता चाळता एका समारोहातल्या मैफिलीचे दृश्य आले आणि अशा कार्यक्रमांच्या आठवणी जाग्या झाल्या. शास्त्रीय संगीत हे भारताच्या संस्कृतिक अस्मितेचे एक प्रतीक. गणेशोत्सवातील शास्त्रीय संगीताच्या मैफिलीवरून आठवले होते पं. गामेखां पुण्यतिथी, पं पलुस्कर पुण्यतिथी अशा निमित्ताने चालणारे शास्त्रीय संगीताचे समारोह, सोहळे. परंतु विस्तारभयास्तव ते लिहीले नव्हते. ते इथे सादर करतो.

मुंबईत मी काही अशा समारोहांत संगीतरसांत डुंबण्याचा आनंदानुभव घेतला. स्थळ असे छबिलदास, छबिलदाससमोरच्या ‘दासावा’ वरील धुरू सभागृह, प्रवेश विनामूल्य असे. शनिवार आणि रविवार दोन रात्री समारोह चाले. सायंकाळी ठीक ८.०० वाजता नवोदिताच्या ख्यालाने सुरुवात होई. खुर्च्या मागच्या बाजूला असून फार कमी असत. त्यावर गुढगेदुखीचा आनंद लुटणारी बुजुर्गमंडळीच (स्वतःच्या चरणकमलांसह) बसे. इतर सर्वांसाठी भारतीय बैठक. चहाकॉफी हॉलच्या बाहेर मार्गिकेतल्या स्टॉलवर रात्रभर विनामूल्य उपलब्ध असे. स्टॉलवरच कधीतरी अधूनमधून बटाटेवडे देखील (विनामूल्य) येऊन जात. दरवळ ताबडतोब वर्दी देण्यात कधीही कुचराई करीत नसे हे सांगायला नकोच. तरीही जेवूनखाऊन आलेले लोक खाण्यास फारसे उत्सुक नसत. वासंती साठे, सी. आर. व्यास, शृती सडोलीकर, इ. नवोदित कलाकार असत. ११.०० च्या सुमारास प्रथितयश गायकवादक आपली कला सादर करण्यास येण्यास सुरुवात होई. सारंगीवादक सुलतान खां, गुलाम मुस्तफा खां, परवीन सुलताना, शोभा गुर्टू, झरीन दारूवाला, इ. गायकवादकांनी अपार आनंद दिला. आता तंबोर्‍याचा आवाज जरी आला की मन स्मरणगुंजनात दंग होऊन जाते.

मैफिलीतला तरुण श्रोतृगण पण वैशिष्ट्यपूर्ण असे. चहाच्या ठेल्यांवर जुजबी चौकशी होई. तू काय गातोस वाजवतोस? कोणाकडे शिकतोस? कुठले राग जास्त आवडतात? हल्ली टप्पा कोण गातात? अमीरखां वा प्रभा अत्रे विलंबित गातांना तालाचा घाट समजतो का? वगैरे विचारपूस होई. कधीतरी एखादी युवती असे प्रश्न विचारी वा हा कुठला राग? मारवा की पूरिया वा नंद की मारुबिहाग वगैरे विचारी. आणि अंगावरून मोरपिसे पिरवल्यासारखे वाटे. याबद्दल आणखी काही शेवटच्या दोनतीन परिच्छेदात. गाणेवाजवणे सोडू नकोस आणि ऐकणे तर मुळीच सोडू नकोस असे वयस्कर लोक आपुलकीने, आर्जवाने सांगत. कधी कोणतरी तुझी आवड छान, वैशिष्ट्यपूर्ण, एक्सक्लूझिव आहे ऐकणे सोडू नकोस असे हरभर्‍याच्या झाडावर पण चढवले जाई. त्या निरागस वयात ते खरेच वाटे. नवीन चेहर्‍यांची खरेच रसिक आहे की वेगळ्या हेतूने घुसला/घुसली आहे की काय अशी चाचपणी पण अशा चौकशांतून होत असे.

अनेक पट्टीचे गायक म्हणतात की तंबोरा लावणे ही गानसाधनेतली सर्वात कठीण गोष्ट आहे. तंबोरा चांगला लागला की अर्धी मैफिल जिंकलीच. किंबहुना तंबोरा कसा लावतो आहे यावरूनच गायकाची निम्मी परीक्षा होते. तेव्हा गायकाचा प्रमुख साथीदार हा तंबोराच. साथीदार खास असेल तर गाणे मस्त रंगते. तंबोरा मस्त लागला तरी गाणे खरे रंगते ते साथीदारांच्या उत्स्फूर्त साथीने. शोभा गुर्टूंना उजव्या बाजूला डग्गा ठेवणार्‍या बुजुर्ग नारायणराव इंदौरकरांनी केलेली साथ अजून आठवते. नखरेल ठुमरीला साथ करतांना तबलाडग्गा असा मुलायम आणि नखरेल वाजे की जणु तबल्याला कातडे नसून रेशीमच असावे आणि डग्ग्याला मखमल. माझ्या मनात छुन्नक छुन्नक. ‘ठुमरी मोडण्या’तला अखेरचा शब्द म्हणजे नारायणराव इंदोरकरच असे तेव्हा म्हटले जात असे ते अगदी सार्थ होते. ठुमरीला अशी कलात्मक, मोहक, सुंदर साथ मी अद्याप ऐकली नाही. आपलाच नाद ऐकून तबलाडग्गा स्वतःच का नृत्य करीत नाही याचेच आश्चर्य वाटावे. मालिनी राजूरकर टप्पा फार सुरेख गातात असे नंतर ऐकिवात आले पण त्यांच्या मैफिलीला जाणे काही जमले नाही.

नंतर कधीतरी एका तबलजीला मी एका हाताला नर्तिकेचे चाळ बांधून एका नवोदित गायिकेच्या ठुमरीला तबलासाथ करतांना पाहिल्याचे आठवते. ठुमरी गायिकेचे नाव आता आठवत नाही. नृत्यसाथ करणारे काही तबलजी रियाझ करतांना हाताला चाळ बांधून रियाझ करतांना पाहिले होते पण ठुमरीसाथीला तबलजीहाती चाळ तेव्हा प्रथमच पाहिले. तरुण गिरिजा देवीचा टीपेतला घंटीसारखा जोरकस आवाज आणि तिची ती ठसकेबाज, नादमय, नखरेल कजरी पण आठवते. आता तांबूलओष्ठिता, शुभ्रकेशा गिरीजादेवींना चित्रवाणीवर पाहून गंमतच वाटते. निसर्गाचे देहाचा, चेहर्‍याचा, देहाचा नूर बदलणारे ऍप विलक्षणच आहे.

चंदूला शास्त्रीय संगीतातले ओ का ठो कळत नसे. तो थोडावेळ बसून नंतर निघून जाई. नवोदितांचे गाणे चालू असतांना तो विनोदी मल्लीनाथी करी. चेहरा गंभीर आणि फक्त आम्हाला ऐकू येईल अशा हळू आवाजात. ताना सुरू झाल्या की ‘अरे हा तर रागात आला’, ‘कोण चिमटे काढतो रे याला’ ‘याच्या पोटात दुखायला लागले रे’ ‘कोणी तरी डाऽऽक्टर आणा रे’ ‘तबलजी आता रागाने तबला बडवतो आहे, जास्त राग आला तर तो तबला तुडवणार. आता गायकाला सांभाळा रे. पुढचा गायक चांगला पेहलवान बोलवायला पाहिजे.’ अशी मल्लिनाथी. मूढरंजनी, मर्कटकंस, दरबारी गधडा, अशा चित्रविचित्र नावांच्या अनेक रागांचा याने शोध लावलेला आहे. आम्ही कसेबसे चेहरे गंभीर ठेवीत असू. नवोदितांचे आटोपले की रात्री ११च्या सुमाराला आम्ही चहा पिईपर्यंत थांबून मग तो त्याला झोपायचे असल्यामुळे चहा न पिता परत जाई. रात्री ११नंतर जाणकारांची गर्दी वाढायला सुरुवात होई.

काही गायकांचे गाणे कधी रंगत नसे. पण मैफिलीत नरडे वाजवून आपली हौस भागवून श्रोत्यांना पिळायचे काही त्यांनी सोडले नाही. मग कार्यक्रमातली एकदीड तासाची पोकळी भरायला त्यांची वर्णी लागे. गाणे रंगत नसे तेव्हा आम्हांला चहाकॉफीची तलफ येई. मग आम्ही इतर लोकांपासून दूर उभे राहून चहाकॉफीबरोबर कलाकारांच्या टवाळीचा देखील आस्वाद घेत असू. कधी गायनाबद्दल तर कधी चांगले गाणार्‍यांच्या विचित्र लकबीबद्दल. काही गायक गात छान पण लकबी विचित्र. मग आम्ही त्यांचीही आम्ही भरपूर टवाळी करत असू. पण सभागृहाबाहेर चंदूबरोबर. सभागृहात नाही. मैफिलीत वागण्याची शिस्त मोडणे मला आवडतही नाही. एक गायक गात छानच. पण माईकच्या आजूबाजूने असे हातवारे करीत की वाटे आता हे माईकचा गळाच आवळणार. एक सुप्रसिद्ध ठुमरी गायिका कधी कधी कोणाची तरी टर उडवत मान वाकडी करून डोळा मारताहेत असे वाटे. पण दोघांचेही गायन म्हणजे तेजस्वी स्वरावलीचा निखळ आनंद.

परंतु चहाबरोबर केवळ टवाळीच असे, असे मात्र नाही. अमजाद अली खां, सुलतान खां, शिवकुमार शर्मा यांच्या वादनाबरोबरच त्यांच्या देखणेपणाचे, लांबसडक नाजूक बोटांचे, झकपक कपड्यांचे, त्यांच्या देहबोलीच्या राजेशाही रुबाबाचेही कौतुक करीत असू. बटणे गळ्याखाली मध्याऐवजी एका बाजूला असलेला, देखणे भरतकाम असलेला रेशमी सदरा आम्ही पहिल्यांदा सुलतान खां च्या अंगावर पाहिला. पंकज उधास तसा सदरा बर्‍याच वेळा वापरतात. काही व्यक्तींचे केस जसजसे पिकत जातात तसतसे ते जास्त देखणे, खानदानी दिसू लागतात. पांढर्‍या केसांचे अमजाद अली खां आता असेच जास्त छान दिसूं लागले आहेत.

पंचविशीतल्या सडपातळ परवीन सुलतानाला जेव्हा १०.३० - ११ वाजता व्यासपीठावर आणले तेव्हा तिचे नाव मुंबईत फारसे कोणाला ठाऊकही नव्हते. वाटले होते की बढत सुरू होईपर्यंत चहा मारूयात. पण तिने आलापीला खणखणीत सुरुवात केल्यावर चहा कॉफीच्या स्टॉलवरचे सगळे मंत्रमुग्ध झालो आणि हास्यविनोद करीत चहाकॉफी पिणारे आम्ही सारे रसिक गरम गरम चहा घाईघाईने कसाबसा बशीत ओतून नरड्यात उतरवून पुन्हा घाईघाईने आत आलो. तेव्हा तिथे कपबशाच असत आणि धुतलेल्या कपबशा आम्ही (न फोडतां) पुन्हा धुवून घेऊन मग चहा भरून घेत असू. डिस्पोझिबल ग्लासेस तेव्हा फक्त यूसिस - USIS मध्येच दिसत. चापल्याने सरगम उच्चारणारी तिची जीभ हा निसर्गाचा चमत्कारच म्हणावा लागेल. अजूनही तिच्याइतक्या चापल्याने सरगम उच्चारणारा/री गायक/गायिका माझ्या ऐकण्यात नाही.

नवोदितांनंतर दोनचार प्रथितयश कलाकारांचे सादरीकरण होई. आपण तल्लीन होऊन स्वरानंद लुटतांना नंतर कधीतरी भोवतालचा श्रोतृवृंद वाढल्याचे ध्यानात येई. इतकी माणसे कधी आली ते कळलेही नाही हे पाहून आश्चर्य वाटे. हीच तर संगीताची जादू आहे. आपल्याला स्थलकालाच्या पार पलीकडे नेऊन ठेवणारे गारुड. सकाळी चारसाडेचारच्या सुमारास मान्यवर गायकवादक आपली कला सादर करून त्या रात्रीच्या कार्यक्रमाचा समारोप करायला व्यासपीठावर येत. समारोपाआधीचा प्रातःकालीन राग सुरू झाला की ध्यानात येई की उत्तररात्र सरत आहे. मग नजरा मनगटाकडे वळत.

समारोपाच्या शिवकुमार शर्मा आणि वसंतराव देशपांडे अशा दोन मैफिली आठवताहेत. घसा बसलेला असतांना देखील वसंतराव आले आणि आज गळा साथ देणार नाही तेव्हा सांभाळून घ्या म्हणून रसिकांना विनंती केली. प्रत्यक्षात वसंतरावांनी नटभैरव मंद्रसप्तकातच असा रंगवला की आपण कोण ऐकणारे! तो नटभैरव कानात अजून निनादतो आहे. शिवकुमारांच्या वादनाच्या वेळी नीरव शांततेसाठी विनावातानुकूलित सभागृहातले सारे पंखे बंद करावे लागले होते. श्रोत्यांतले शिवकुमारांचे पंखे अशा स्वर्गीय वादनात रमतात. सभागृहातले पंखे तर बोलून चालून पंखेच. तेही रमले. म्हणून तर श्रवणानंद लुटायला निःशब्द झाले. हलक्या हाताने संतूरवर केलेली नाजुक कलाकारी देखील नीरव शांततेत स्पष्ट ऐकू आल्यामुळे वादन रंगले हे सांगायला नकोच.

रानडे रस्त्यावर डिसिल्व्हा हायस्कूलसमोर पदपथावरच्या भाजीविक्रेत्याकडून भाजी घेणारी पोरगेलीशी निरागस सडपातळ तरुणी – अश्विनी भिडे एका कार्यक्रमात एवढी सुंदर ख्याल गातांना पाहिली आणि प्रथम आश्चर्यच वाटले. काही गायकगायिका सर्जनशील, कलात्मक अशा उपज अंगाने तर गातातच पण मांडणीतला नीटनेटकेपणा आणि पद्धतशीरपणा आणि त्यामागचा रेखीव विचार या गुणांमुळे त्यांचे सादरीकरण नेहमीच ठराविक उंचीच्या वर तर राहतेच आणि प्रत्येक वेळी मनोहर, अविस्मरणीय असे नवे काहीतरी ऐकायला मिळते. अश्विनीताई, मालिनीताई देखील प्रत्येक बैठकीत अशाच सुंदर, नीटनेटके आणि अविस्मरणीय असे सादरीकरण करतात.

त्या भाजीविक्रेत्याच्या मागे आमच्या बाजूच्या इमारतीतल्या बंधू शेट्ये यांचे पानविडीसिगरेटचे दुकान आहे. या दुकानात संध्याकाळचे विख्यात संवादिनीवादक पं. गोविंदराव पटवर्धन बसलेले असत. राम मराठे यांचे चिरंजीव मुकुंद मराठे यांनी एकदा एक आठवण सांगितली होती. पुल आणि गोविंदराव यांची एकदा हार्मोनियम जुगलबंदी झाली होती. तेव्हा पुल म्हणाले होते की भीतीने पोटात गोळा येतो हे सर्वांनीच ऐकलेले आहे. पण गोविंदरावांसमोर वाजवायचे म्हटले की बोटात गोळा येतो.

एकदा साडेनऊ दहाच्या सुमाराला एका नवोदित गायिकेचे गाणे झाल्यावर एका नव्वदीच्या हडकुळ्या वृद्ध गृहस्थांना हाताला धरून व्यासपीठावर आणले. त्यांना वार्धक्य आणि प्रकृती अस्वास्थ्यामुळे धड चालता देखील येत नव्हते. आज मी रसिकांची सेवा करणारच – हीच माझ्या दिवंगत गुरूंची सेवा आहे - असा हट्ट धरून डॉक्टरांचा सल्ला अव्हेरून आपला हेका खरा करून ते आले होते असे निवेदकांनी जाहीर केले. ते बुजुर्ग संगीतकार काहीतरी बोलले, पण त्याचे वेगळे हिंदी आणि त्यात बोबडे उच्चार; त्यामुळे मला कळले नाही. आमच्या मनात प्रश्नचिन्हे. आता आठवत नाही पण कोणीतरी प्रतिष्ठित मान्यवरांनी पेटीवर लेहरा धरला आणि यांनी तबला वाजवायला सुरुवात केली. पेशकारा सुरु झाला आणि काही सेकंदातच मनात एक दिव्य प्रकाश पसरला आणि शरीरात रोमांच फुलले. आपण केवळ स्वर्गीय वादनाचा आनंद घेतो आहोत असे वाटले. त्यांचे वादन संपल्यावर रसिक टाळ्या वाजवायला विसरले. नंतरची घोषणा टाळ्यांच्या गजरात विरून गेली. खरे तर तालवाद्ये मला एवढी हलवून टाकत नाहीत. पण हा एक अलौकिक अपवाद होता. वादन अलौकिक तर होतेच पण संगीतकाराचे रसिकांवरचे एवढे प्रेम आणि गुरूवरची एवढी निष्ठा वाखाणण्याजोगीच. त्याशिवाय ही उंची गाठणे कठीणच. एका रसिकाला मी ते कोण होते म्हणून विचारले. एखादे झुरळ पाहावे तसे माझ्याकडे तुच्छ्तेने पाहात त्यांनी खॉंसाहेब थिरखवां म्हणून दोनच शब्द उच्चारले. या परिच्छेदातला काही भाग अन्यत्र कुठेतरी मीच दिलेल्या प्रतिसादात आला आहे. द्विरुक्तीबद्दल क्षमस्व.

नंतरच्या काळात कधीं प्रभादेवीचे रविंद्र तर कधी बिर्ला मातुःश्री वगैरे पण इथे प्रवेश शुल्क असे. पण कनिष्ठ मध्यमवर्गीय खिशाला परवडण्याजोगे. आता असे समारोह कोणीतरी स्पॉन्सर षण्मुखानंदसारख्या प्रतिष्ठित सभागृहात भरवतात. १,०००/- रुपयांपासून पुढे तिकीट असते. सुखवस्तू वा उद्योगपतींच्या गळ्यात जास्त महागडी तिकिटे देणगीस्वरूपात मारली जातात. तिकिटे घेतलेले बरेच लोक कधी फॅशन म्हणून तर कधी आपल्याला शास्त्रीय संगीत कळते हे दाखवण्यासाठी येतात. काहीजण व्यावसायिक हितसंबंध घट्ट करायला येतात. काही जण मात्र तिकीट एखाद्या रसिकालाच देऊन टाकतात. हजार रुपयांचे तिकीट काढले तरी षण्मुखानंदच्या वरच्या गॅलरीतून गायकाचा चेहरा पण धड दिसत नाही.

चांगला बदल हा की आता प्रत्येक कार्यक्रमात सारे काही चित्रवाणी कॅमेर्‍याच्या चौकटीला साजेल असे चित्रवत सुंदर असते. प्रमुख गायकवादकाला मध्यभागी ठेवून मागच्या बाजूला दोन अगदी सारखे, सुंदर कलाकुसरीचे तंबोरे हवेतच. रंगमंचावरील कलाकारांच्या जागा, प्रत्येक कलावंताचे कपडे, कपड्यांचे रंग, तंबोरे झुकवण्याचा कोन, सारे काही. कार्यक्रम सुरू होण्याआधी रंगमंच व्यवस्थापक चित्रवाणीच्या मॉनिटरमधून सारे काही आखीवरेखीव, सिमेट्रीकल, सुंदर आहे असे पाहून आवश्यक तिथे सूचना देऊन ठीकठाक करतो. छायाचित्रकार आणि ध्वनीसंयोजक पण अशाच चाचण्या घेतात. ध्वनीसंयोजन पण कैक पटींनी विकसित झाले आहे. कुठेही बसले तरी मजरिफेचा (कैक दशके हा शब्द ऐकलेला नाही त्यामुळे शब्द चुकू शकतो) सतारीच्या तारेवर आघात झाल्याचा सूक्ष्म ध्वनी देखील ऐकू येतो आणि डोळे मिटले तर आपण पहिल्या रांगेत बसलो आहोत असे वाटते.

अलीकडचे गायकवादक पण धनियंत्रणेचे योग्य नियंत्रण करण्यात निपुण झाले आहेत. बहुतेक प्रमुख गायकवादक आलापीला सुरुवात करतांना जरा तंबोर्‍यांपुढचे, संवादिनीपुढचे माईक पुढेमागे करून घेतात, नंतर त्या त्या माईकचे आवाज कमीजास्त करायला सांगतात. तबलजीला डग्गा तबला थोडासा वाजवायला सांगून ढाले-किनरे – ढमढम-टिणटिण आवाज - बास-ट्रेबल संतुलित करून घेतात आणि तंबोरे, तबलापेटी, सारंगी स्वरमंडल जे असेल त्या सगळ्या साथींचे आवाज गायनाला/वादनाला पूरक असे लहानमोठे करून घेतात.

उच्च दर्जाच्या चित्रवाणी कॅमेर्‍यातून वाद्येही सुंदर दिसावीत या दृष्टीकोनामुळे तंबोरे, सतारी, सरोद, वीणा इ. वाद्यांवरील बारीक कलाकुसर आता जास्त रेखीव, सुंदर, होते आहे, वर झक्क पॉलीश पण दिसू लागले आहे. फक्त काही ठिकाणी हस्तिदंताऐवजी सुंदर प्लॅस्टीक असते. तबल्याचे ताणपृष्ठ (चर्म असते की प्लॅस्टीकच्या कृत्रिम रेणूचे ठाऊक नाही.) सुंदर शुभ्रधवल वा उज्ज्वल मोतिया रंगात असते. त्यामुळे तबल्यावरची शाई छान रेखीव आणि उठावदार दिसते. एवढेच काय, बांसरीवर आकर्षक रंगातला शोभिवंत असा रेशमी, गोंडेदार गोफ दिसू लागला आहे. सारे काही छान, मस्त, चित्रवत सुंदर. कॅमेर्‍याने माईकशी केलेली सलगी फारच आनंददायक ठरली. या बाबतीत तसेच कार्यक्रमाच्या सांगीतिक दर्जाच्या बाबतीत लखनौ दूरदर्शन आघाडीवर आहे असे वाटते.

शास्त्रीय संगीताला वाहिलेली एक खाजगी चित्रवाहिनी सुरू झाली आहे खरी. पण अजून तरी नवे दर्जेदार कार्यक्रम तिथे दिसत नाहीत. तेच तेच कार्यक्रम पुन्हा पुन्हा दाखवतात. आणि कार्यक्रमांपेक्षा जास्त वेळ त्याच वाहिनीवरच्या कार्यक्रमांच्या जाहिरातीच असतात. जसे कार्यक्रम तेच तेच तशा जाहिराती पण त्याच त्याच. रसिक प्रेक्षक गायकवादकाला दाद देतील की चित्रवाहिनीला? इथे मात्र ई मेल, फेसबुक वा ट्वीटरद्वारा ‘ग्रेट चॅनल’ अशी चॅनलला दाद दिलेली दाखवतात. एकेक नवलच. दर्जाच्या आणि वैविध्याच्या पातळीवरून तरी त्यांना जाहिरातदार मिळ्णे कठीण दिसते. निदान शास्त्रीय संगीताला तरी आकाशवाणी आणि दूरदर्शन याला पर्याय नाही. दहापंधरा वर्षांपूर्वी एका अ-मराठी गृहस्थाने अचानक मराठीचा पुळका येऊन मुंबईसाठी एक एफ एम रेडिओ वाहिनी केंद्र सरकारकडून सशर्त शुल्कमाफी घेऊन सुरू केली होती. फक्त मराठी संगीत कार्यक्रम ठेवायचे आणि एकही जाहिरात ठेवायची नाही या आणि आणखी काही अटींवर. या वाहिनीवर सरळ त्याने जाहिराती ठेवल्या. सरकारने त्याला शुल्क भरायची मागणी पाठवली. शेवटी दोन कोटींचे शुल्क न भरल्याबद्दल सरकारने ती एफ एम वाहिनीच बंद केली. आता या चित्रवाणी वाहिनीचे काय होते ते पाहायचे आहे. असो.

चित्रसौंदर्य कितीही सुंदर झाले असले तरी शास्त्रीय संगीताचा आत्मा आणि सौंदर्य स्वरातच आहे. जानेवारी २०१८ मध्ये मी आणि शेवडे, पेंडसे असे आम्ही तिघे मित्र मुंबईतल्या शिवाजी उद्यानाजवळच्या सावरकर स्मारकातील सभागृहात स्पिक फाउंडेशन पुरस्कृत शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमाला गेलो होतो. दोनतीन सायंकाळच्या कार्यक्रमात आरतीताई, इ. सुप्रसिद्ध कलावंतांसमवेत दोनतीन नवी नावे होती. एका नवोदितेचे ख्यालगायन झाल्यावर एक फारसा नावलौकिक नसलेली गायिका तरुणी मंचावर स्वतःच्या हातात तानपुरा घेऊन आली. सोबत एक तबलजी आणि एक संवादिनीवादक. एकच तंबोरा तोही गायिकेकडेच असल्यामुळे रंगमंच व्यवथापक आणि चित्रवाणी कॅमेराचालक नाराज झाले असावेत. पण दृश्यविलास हा स्वरविलासापुढे कःपदार्थ ठरावा. तिने आलापीला सुरुवात केली आणि पाचदहा मिनिटातच ‘सुधीर, जॅकपॉट लागला रे’ अशी सुहास शेवडेने तात्काळ प्रतिक्रिया दिली. तिच्या सादरीकरणानंतर निवेदकांनी ‘वी थॅन्क हर फॉर ऑफरिन्ग अस अ फ्यू मॅऽऽजिकल मोमेन्टस. शी इज आअर म्यूझिकल फ्यूऽऽचर.’ असा तिचा रास्त गौरव केला. असे क्षण मोहक स्मृतीगंध मागे ठेवून जातात. आता वयामुळे आठवण दगा देते. स्मृतीगंध दरवळत राहतो पण काही तपशील हरवतात. खूप दिवस प्रयत्न करतो आहे पण त्या गायिकेचे नाव काही नीट आठवत नाही. शेवडेला मात्र तिचे नाव आठवले. सोनल शिवकुमार. लौकरच हे नाव दिगंतात दुमदुमतांना दिसले तर आश्चर्य वाटायला नको.

वातानुकूलनात नियंत्रण केलेले हवेचे तापमान कमी असेल तर पूशर्वी गडबड होत असे. सभागृहातले तापमान घसरत गेले तर काही वेळाने तबल्याचा स्वर बदलण्याअगोदर तबल्याचा स्पर्शच तबलजीच्या बोटांना किंचित वेगळा वाटू लागतो आणि पट्टीचा तबलजी अस्वस्थ होतो. तंबोर्‍याच्या एका जरी तारेचा स्वर जरासा जरी बदलला तरी स्वरसंवेदनाशील गायक अस्वस्थ दिसू लागतो मग हातोडीने तबला ठोकणे, तंबोरे जुळवणे असे व्यत्यय वारंवार येऊ लागतात. आणि गायनवादन रंगत नाही. वातानुकूलनातील तापमान नियमनाच्या आधुनिक तंत्रज्ञानामुळे आता असे होत नसावे. आता तंबोर्‍याचे सारे स्वरसमूह देणारे इलेक्ट्रॉनिक यंत्रही आले आहे. पण तंबोर्‍याच्या तारा एकमेकींशी जो स्वरसंवाद करतात तो मात्र या यंत्रात बव्हंशी हरवलेला दिसतो.

शास्त्रीय संगीत फाईव्ह स्टार झाल्यावर चढ्या दरातल्या तिकिटांमुळे काही अस्सल रसिकांची मात्र पंचाईत झालेली आहे. शाळाकॉलेजात असतांना खिशात दमडी देखील नसतांना आम्ही मैफिलींना जाऊं शकत होतो. आता शाळकरी/महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना, बेकार युवकांना, तिकीट कसे परवडणार? संगीत क्लासला जाणार्‍यांना क्लासतर्फे प्रवेशिका मिळतील. पण इतर रसिकांची पंचाईतच होत असणार. झिंबाब्वेत शाळकरी मुलांना क्रिकेट टेस्ट मॅचेसना मोफत प्रवेश दिला जातो तसे काहीतरी केले पाहिजे. मैफिलीची शिस्त सर्वांकडे नसते. मग विमान कंपन्या जसे फ्रीक्वेन्ट फ्लायर म्हणून नोंद ठेवतात तसे हवे असल्यास ‘मान्यवर रसिक’ असे ओळखपत्र देऊ करतां येईल. सध्याच्या बदललेल्या वातावरणात चहाकॉफी, खाद्यपदार्थ फुकट नसाव्यातच असे माझे वैयक्तिक मत आहे. त्यासाठी नको ते भलते लोक यायला नकोत.

काही अतिउत्साही, टाळ्यांना हपापलेले गायक पण वेड्यावाकड्या चित्रविचित्र तानांच्या स्वरकसरती दाखवून अर्धकानसेनांची वाहवा मिळवतात. स्वरसौंदर्याच्या नावाने मात्र बोंब असते. तानांची आडझोड आतषबाजी नव्हे तर स्वराचा अचूक आणि योग्य लगाव आणि सौंदर्यपूर्ण स्वररचना तसेच त्यामागील उत्कट स्वरविचार हाच कोणत्याही संगीताचा आत्मा आहे हे त्यांना कधी कळेल?

समारोहाच्या प्रतिष्ठेसाठी समाजातल्या मान्यवरांच्या उपस्थितीचा त्यांची आवडनिवड, संगीत समजण्याची कुवत ध्यानात न घेता आग्रह धरला जातो. भलतीकडेच माना डोलावल्या जातात आणि वाहवा दिली जाते. बहुतेक आमंत्रित मान्यवर श्रोत्यांचे कार्यक्रमात लक्षच नसते. ते सतत कुणाशी तरी हलक्या आवाजात बोलत असतात. हल्ली अनेक मान्यवर मंत्रीमहोदय देखील ‘शाईन मारायला’ बर्‍याच कार्यक्रमांना हजेरी लावतांना दिसतात. कार्यालयात तातडीची, महत्त्वाची लोकोपयोगी कामे दीर्घकाळ प्रलंबित राहिली तरी चालतील पण प्रसिद्धीचा प्रकाशझोत टाकणारा कार्यक्रम चुकवता नये. कुठे ठाऊक नाही; कुमार गंधर्व यांच्या कार्यक्रमात एकदा तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी बाजूला बसवलेल्या सचिवाशी की नेत्याशी बोलत होत्या. तेव्हा ‘आपल्याला माझ्या गायनात स्वारस्य नसल्यास आपण जाऊ शकता, आपल्या बोलण्यामुळे माझी एकाग्रता ढळते आहे’ असे त्यांना कुमारजींनी सांगितले होते. कुमारजींचे गुरुबंधू रेळे लिखित पुस्तकात याचा उल्लेख आहे असे ओझरते आठवते. असो. आपल्या संस्कृतीची अस्मिता असलेल्या एका पैलूचे – शास्त्रीय संगीतांच्या मैफिलींचे स्वरूप असे बदलत गेले.

वरील एका परिच्छेदात म्हटल्याप्रमाणे तेव्हाची तरुण पिढी तू काय गातो/गातेस वाजवतो/वाजवतेस असे विचारीत एकमेकांची ओळख करून घेत घोळके करी. इथे आवर्जून हिंदीतूनच संभाषण होत असे. मग एक ख्याल संपल्यावर मिळणार्‍या मध्यंतरात, एका कलाकाराचे सादरीकरण संपून दुसर्‍याचे सुरू होण्यापूर्वीच्या मध्यंतरात आमच्या गप्पा होत. या गप्पात एकमेकांना शास्त्रीय संगीतातल्या बारकाव्यांची ओळख करून देत असू. विलंबित ख्यालात कशा मात्रा सोडून ताल आकार घेतो ते आम्हांला तबला शिकणार्‍या अनुराग शहाने सांगितले. पंचीकर नावाचे एक संगीतकार नेहमी येत. जलतरंग आणि इतर अनेक वाद्ये वाजवीत. शास्त्रीय संगीताचे सखोल ज्ञान त्यांच्याकडे होते. मध्यमवयीन असले तरी तरुणांशी आपुलकीने जवळीक साधीत. त्यामुळे त्यांना संगीतातली कोणतीही शंका विचारायला आम्हाला भिती वाटत नसे. आदर होता पण भिती मात्र नाही. इथे खरे सांगितिक शिक्षण होई.

औपचारिक संगीतशिक्षण सोडले तरी पुढील काही वर्षे मी मैफिलींना नेमाने जात असे याचे अनेकांना कौतुक वाटे. मांडणीतील सौंदर्याकडे आमचे बारकाईने ध्यान असे. खाण्यातले जसे नखरे आणि चोचले असतात तसे गाण्यातले पण असतात. माझेही असत, अजूनही आहेत. एखाद्याला काही राग अतिशय आवडतात तर काही राग अजिबात आवडत नाहीत. शाईन मारायला कोणी चित्रविचित्र हरकतींची, तानांची, आतषबाजी केली की नंतर आमच्या टवाळकीला ऊत येत असे. गाणेवाजवणे रंगले नाही तर का रंगले नाही याचे ब्रेनस्टॉर्मिन्गसहित विश्लेषण मात्र सभागृहाबाहेर चहासोबत छान रंगत असे. एखाद्याचे म्हणणे पटले नाही तर शब्दांनी दुखवण्यापेक्षा तबल्यातले बोल ऐकवून टवाळी होई. गायनवादन आवडले नसेल तर कसे वाटले यावर तबल्याचे बोलांनी उत्तर मिळे. हे सारे फारच हलक्या आवाजात शिस्त सांभाळूनच होई. एखाद्या कल्याणडोंबिवली वा बदलापूरकर्जतच्या मुलीची शेवटच्या गाडीची वेळ टळून जाई. मग सारा कंपू टेलिफोन बूथवर. सकाळी मग तिला गाडीत बसवून मगच सारे घरी जात.

समारोह मोठ्या सभागृहात गेले आणि आसनव्यवस्थेमुळे हालचालींवर बंधने आली. सुरुवातीची रटाळ सादरीकरणे अस्तंगत झाली. प्रत्येक सादरीकरण आखीवरेखीव आणि देखणे. प्रत्येक मोलाचा क्षण बेतून सजवलेला. त्यामुळे वेळेचीही बंधने आली. सकाळच्या सत्रानंतर एखाद्याच्या घरी वा हॉटेलात जमून जेवतखात, चहा घेत गप्पा हाणायचे ठरताठरता एकदोघांच्या अडचणी येत आणि घोळका कॉन्फरन्सेस कालौघात हरवल्या. अ्शा मौल्यवान क्षणांच्या मधुर आठवणींचा अमूल्य ठेवा दिल्याबद्दल त्या समारोहांच्या आयोजकांचे, तत्कालीन गुरुजनांचे आणि रसिक मित्रमैत्रिणींचे ऋण कधीही फेडता येणार नाही.

काळानुसार सारे बदलणारच. नाहीतर त्या त्या क्षेत्रात साचलेपण येईल आणि विकास स्तंभित होईल. आता साठीनंतर भारतीय बैठकीवर संध्याकाळी आठसाडेआठपासून सकाळी सहा साडेसहापर्यंत दहा तास काय दोनतीन तासही बसणे नक्कीच जमले नसते. त्यामुळे आसनव्यवस्था विकसित झाली हे चांगलेच झाले. ध्वनीयोजनेबद्दल आणि मंचव्यवस्थेबद्दल वर लिहिलेच आहे. या सर्व बदलांबद्दल तंत्रज्ञानाला आणि आधुनिक व्यवस्थापनाला धन्यवाद द्यावेच लागतील; तसे ते देऊन हा लेख इथे संपन्न करतो.

संगीतअनुभव

प्रतिक्रिया

मुक्त विहारि's picture

4 Dec 2019 - 5:15 pm | मुक्त विहारि

आवडलं.

राग दारी कधी आवडलीच नाही. किंबहुना तसे कानच विकसित झाले नाहीत...आमचे अपयश....

पण संगीत मात्र आवडतेच. ..

मग ते People need love असू दे किंवा , तामिळ मधील "दलपती" तील गाणी असू दे....

अर्थात, कुणाला काय आवडते हे महत्वाचे नाही. कुणाला सोने आवडत असेल तर कुणाला पितळ...त्याच्या आवडीत तो समाधानी आहे ना? मग झालं. ..

कुमार१'s picture

4 Dec 2019 - 5:57 pm | कुमार१

लेख वाचताना जणू मैफिलीचाच आनंद मिळाला.
छानच !

काही व्यक्तींचे केस जसजसे पिकत जातात तसतसे ते जास्त देखणे, खानदानी दिसू लागतात.

>>> + १११

यशोधरा's picture

4 Dec 2019 - 6:13 pm | यशोधरा

सुरेख.

सुधीर कांदळकर's picture

5 Dec 2019 - 6:11 am | सुधीर कांदळकर

@ मुवि: संगीत हे सारेच सुंदर, बावनकशी असते. अमुक संगीत तमुक संगीतापेक्षा श्रेष्ठ असे काही नसते. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने आवड वेगळ्या प्रकाराची असू शकते. सादरीकरणाचा दर्जा फक्त वरखाली होऊ शकतो. प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

डॉ. कुमार आणि यशोताई आपल्या नियमित प्रतिसादांबद्दल अनेक अनेक धन्यवाद.

धन्यवाद. ..

विजुभाऊ's picture

5 Dec 2019 - 6:46 am | विजुभाऊ

वा. खूप रत्नांचा आस्वाद घेतलाय तुम्ही महाराजा. एखाद्या अविस्मरणीय मैफीलीबद्दल अगत्याने लिहा ना

कंजूस's picture

5 Dec 2019 - 7:38 am | कंजूस

रसीक आहात.
------

गाणे रंगत नसे तेव्हा आम्हांला चहाकॉफीची तलफ येई.

हे आवडलं.

एकदा कॉलेजात असताना मित्र आला सात साडेसातला. चल लवकर चल. आमच्या घरापासून चार बिंल्डिंगा जवळ वल्लभ संगीत विद्यालय. (तिथे आमच्या इमारतीतली तीन चार मुले वायलीन,तबल,,गाणे,,,नाच शिकायला जात) गेलो.
प्रवेशदाराशी पोहोचल्यावर सारं समजलं. आता मैफिलीत बसवणार. "ए मागेच बसू हां, सटकायला बरे."
बसलो.
एक जण गात होता. गर्दी होती.
पंधरा मिनिटांनी मित्राने खूण केली 'खसकुया बाहेर'.
हुश्श.
" नेमका रातंजनकरबुवा गायला बसलाय. गातो सुरात पण रेकून."
"चहा घेऊ या का?"
"हो."

आजच उस्ताद बिस्मिल्लाखा यांचा हा सुरेख विडिओ पाहिला. खासाहेब इतके सुंदर बोलले आहेत, की बघत राहावे. शेखर गुप्ता त्यांच्यापुढे अजागळ वाटतो.

https://youtu.be/tkB6qnASmQc

जयंत कुलकर्णी's picture

5 Dec 2019 - 9:17 am | जयंत कुलकर्णी

मस्तच.....

प्रमोद देर्देकर's picture

5 Dec 2019 - 9:34 am | प्रमोद देर्देकर

तुम्हाला एकदा भेटायलाच हवं साहेब.
तुम्ही भारतात आल्यावर मला तुमचा भ्रमणध्वनी व्यनि कराल काय?

सुधीर कांदळकर's picture

5 Dec 2019 - 7:04 pm | सुधीर कांदळकर

विजूभाऊ, जयंतराव, श्री. मनो आणि प्रमोदजी अनेक अनेक धन्यवाद.
@कंजूसजी: रेकून आवाज लावल्यामुळे खरेच मजा निघून जाते. मलाही ते आवडत नाही. करुण रसाच्या नावाखाली रडके गाणे पण वैताग देते. रसिक अमूल्य वेळ देऊन येतात. काही रसिक तर ४००-५०० किमी. प्रवास करून येतात. म्हणून गाणे सुंदरच असावे. अनेक अनेक धन्यवाद.
@श्री. मनो: व्हीडीओ आवडला. धन्यवाद. एक भिडणारी हळवी आठवण जागी झाली. साल २००९. मुंबईतल्या वास्तव्याची आमची शेवटची रात्र. सामान बांधून तयार होते. दुसरे दिवशी टेंपो येणार होता. मुंबई सोडण्याची हुरहूर, मनात मोठे काहूर. आयुष्य मंगलध्वनींनी व्यापून टाकणारे बिस्मिल्लाजी अल्लाला प्यारे झाल्याची बातमी आली. विविध चित्रवाणी वाहिन्यावर बिबिस्मिल्लाजींबद्दल वेगवेगळे माहितीपट रात्री २ पर्यंत पाहात होतो. जड अंत:करणाने कधीतरी झोपलो.
@प्रमोदजी आपला प्रश्न मला उद्देशून नसावा. कारण मी भारतातच असतो.

सुधीर कांदळकर's picture

5 Dec 2019 - 9:01 pm | सुधीर कांदळकर

जयंतराव धन्यवाद.

स्मिताके's picture

5 Dec 2019 - 9:22 pm | स्मिताके

सुंदर लेख. आणखी मैफिलींविषयी, निरनिराळ्या रागांविषयी वाचायला आवडेल.

अनिंद्य's picture

6 Dec 2019 - 11:05 am | अनिंद्य

@ सुधीर कांदळकर,

'देर से आए हम इस बज्म-ए-तरब में' असे वाटले. (परवा प्रतिसाद लिहिला होता तो मिपा सूक्ष्मावस्थेत गेल्यामुळे उडाला बहुतेक.)

सुरेल आठवणी आहेत तुमच्या आणि त्या रंजक नेमकेपणाने शब्दबद्ध करण्याचे कसबही खास.

ही लेखमाला 'शिफारस' मध्ये असावी खरे तर.

पु ले शु.

मुक्त विहारि's picture

6 Dec 2019 - 11:43 am | मुक्त विहारि

+1

श्वेता२४'s picture

6 Dec 2019 - 3:39 pm | श्वेता२४

खूप दिग्गज कलाकारांना ऐकलंय तुम्ही. त्यांच्या आठवणी म्हणजे खजिनाच. खूप छान लेख.

वेस्टन म्युझिक म्हणजे काय यावर भाषण देणारे कुंटे (पुण्यात असतात) यांचे मुलुंडला भाषण, होते महाराष्ट्र मंडळात. तेही ऐकले आहे. खूप चांगले सांगतात.

लेखामुळे गार वाऱ्याची झुळुक आली.

सुधीर कांदळकर's picture

7 Dec 2019 - 5:59 am | सुधीर कांदळकर

स्मिताके, अनिंद्य, श्वेता२४, मुवि आणि कंजूसजी अनेक अनेक धन्यवाद.

प्रमोद देर्देकर's picture

7 Dec 2019 - 7:04 am | प्रमोद देर्देकर

अहो तो प्रतिसाद तुम्हालाच आहे.
तुम्ही आधी तिकडे होतात म्हणून तसं लिहलं.

पहाटवारा's picture

7 Dec 2019 - 7:15 am | पहाटवारा

तुमच्या पीढीला ज्या या अनमोल आठवणी गोळा करता आल्या .. त्याचा हेवा वाटतो.
सुदैवाने युटयुब च्या माध्यमातून अनेक अशा गाण्यांचा खजिना आता ऊपलब्ध आहे परंतु त्याने फक्त गाणी ऐकु शकता .. हि जी एक अनुभवांची , त्या उत्कटतेची , मित्रांबरोबर रात्र रात्र जागवलेल्या आठवणींची पोतडि आहे , ती नाहि मिळणार आता.. ती खरोखर अनमोल आहे.
शास्रीय सन्गीत समजत नसले तरी ऐकायला आवडते .. त्यातहि थोडे कमी गायकि ढंगातले संगीत.. प्रभाताईंच्या सावरे च्या सुरांत माझ्या कित्येक ड्राईव्ज डोलत गेल्या आहेत. कधी आपल्या भीमसेनजींचे ब्रिंदावनी भजनातल्या पल्लेदार ताना ऐकुन चकित व्ह्यायला होते .. तर कुमार गंधर्वांच्या छोट्या पण धारधार सुरावटी अंगावर रोमांच ऊभ्या करतात. आपल्या गायकांच्या इतकीच ऊत्तुंग अशी वाद्य-वादन करणारी मंडळी पण आहेत. ऊस्ताद अम्जद अली खां यांचे सरोद जास्ती लडिवाळ पणे बोलतेय की बिस्मिलाह खां यांची शहनाई !
मध्यंतरी झाकीर हुसेन अन राकेश चॉरसीया यांच्या प्रत्यक्ष कार्यक्रमाला जाण्याचा योग आला .. ती संध्याकाळ अशीच अफाट गेली.
वाह .. हा लेख अन लेखमाला वाचून मजा आली.. लिहिते रहा अन आम्हालाहि तुमच्या स्मरणरंजनात सामील करून घ्या.
-पहाटवारा

सुधीर कांदळकर's picture

7 Dec 2019 - 6:53 pm | सुधीर कांदळकर


शास्रीय सन्गीत समजत नसले तरी ऐकायला आवडते

.

आपल्याला काही समजत नाही असे वाटणे हे बर्‍यापैकी ज्ञान असल्याचे लक्षण आहे.

कुमार गंधर्वांच्या छोट्या पण धारधार सुरावटी

अचूक निरीक्षण. राजयक्ष्म्यातून बरे झाल्यावर कुमारांच्या फुफ्फुसांची क्षमता कमी झाल्यामुळे ते पल्लेदार ताना घेऊ शकत नाहीत. छोट्याच सुरावटी घेतात.

आपला प्रतिसाद देखील पहाटवार्‍यासारखा मन प्रफुल्लित करणारा आहे. अनेक अनेक धन्यवाद.

चौकटराजा's picture

10 Dec 2019 - 10:26 am | चौकटराजा

माझया मते मी ही शास्त्रीय संगीत खूप ऐकले आहे व माझ्यातही काही आठवणी दाटल्या आहेत पण तुम्हीच अधिक प्रत्यक्ष मैफली ऐकल्या असाव्यात असा माझा कयास आहे ! बाकी मारवा की पुरिया यात चटकन भेद समजायला काहीसे अधिक गाणे ऐकायाला लागते. वास्तविक षडज हा स्वरांचा राजा पण या राजाचेच जिथे अल्पत्व आहे असा युनिक राग म्हंजे मारवा. श्रवणातही चोचले असतात हे अगदी खरे आहे. आलापी हा माझा चोचला आहे , बहलावा हाही माझा चोचला आहे , मंद्र पंचम किंवा ज्याला जमेल त्याचा मंद्र षडज ऐकायचा हा माझा चोचला आहे पण अलीकडे द्रूत सरगमी , लांब स्वर लावणे अतितार षडज पकडणे ( परवीन सुलताना - पतियाळा घराणे स्पेशालिटी ) याची क्रेझ आहे !

सुधीर कांदळकर's picture

11 Dec 2019 - 6:04 am | सुधीर कांदळकर

प्रत्यक्ष मैफिली ऐकणे कौटुंबिक जबाबदार्‍यांमुळे फारसे जमले नाही. मधली जवळजवळ पंचवीस-तीस वर्षे साहित्य आणि संगीतापासून दूर होतो. कुणीतरी रसिक कुठेतरी भेटे, हॉटेलात चहाबरोबर बोलणे होई, नवे काय आले वगैरे समजे आणि आठवणींना उजाळा मिळे.


अलीकडे द्रूत सरगमी , लांब स्वर लावणे अतितार षडज पकडणे ( परवीन सुलताना - पतियाळा घराणे स्पेशालिटी ) याची क्रेझ आहे !

अगदी खरे. स्वतःच्या उच्चारांचा नाद, स्वतःच्या स्वराचा पोत वगैरे ध्यानात न घेता केवळ अर्धवटराव श्रोत्यांची वाहवा ऐकायला हे सारे केले जाते. त्यात बहुतेक वेळा हे सारे आवाजाला न पेलल्यामुळे टेंपोमध्ये ट्रकभर माल लादल्यासारखे गाण्याचे सौंदर्यच हरवून जाते.

बहलावा हा शब्द अनेक वर्षांनी संपर्कात आला आणि अनेक स्मृती जाग्या झाल्या.


मंद्र पंचम किंवा ज्याला जमेल त्याचा मंद्र षडज ऐकायचा हा माझा चोचला आहे

जगजीत सिंग मंद्र षडज फारच ताकदीने, स्थिर आणि सुरेख लावीत. 'कल चौदवी की रात थी' ते दोनतीन प्रकारे गात. त्यातल्या 'जोगी ...' या कडव्यात ते मंद्र सप्तकात मस्त संचार करून अद्भुत आनंद देत.

मस्त आठवणी जागवल्यात. अनेक अनेक धन्यवाद.