सुके मटण

ललिता's picture
ललिता in पाककृती
11 Nov 2008 - 3:19 pm

ही पाकृ वेळ देऊन निगुतीने बनवावी लागते. पार्टीला आदल्या दिवसाचं सुकं मटण वाढावं, मसाला मुरल्यामुळे मटण अप्रतिम चविष्ट लागतं.

७०० ग्रॅम मटण (नळ्यांसकट असेल तर १ किलो)
५, ६ कांदे बारीक चिरून
दोन मोठे टॉमेटो (सालं काढून किसून घ्यावे)
१ मोठा कप भरून दही
अर्धा कप तेल
२ टेबलस्पून आलं + लसूण + हिरव्या मिरच्या पेस्ट
२ चमचे धने + १ चमचा जिरे + १ चमचा शहाजिरे (कोरडे भाजून पूड करावी)
मीठ चवीप्रमाणे
कोथिंबीर चिरून

खडा मसाला:
४ लवंगा, ६-७ मिरें, दालचिनी (१"), २ मसाल्याची वेलची, ३-४ हिरवे वेलदोडे, पाव चमचा जायपत्री, २ तमालपत्रं

एका पसरट कढईत -कढई नसेल तर पसरट भांड्यात- तेल गरम करावे. तेलात खडा मसाला टाकून किंचित तळावा. त्यावर चिरलेला कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यावा. त्यात आल्यालसणाची पेस्ट घालून दोन मिनिटे परतावे. नंतर मटण व धने+जिरें+शहाजिर्‍याची पूड एकत्र घालून मटणाचे तुकडे गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावे. मटण जितके जास्त परतले जाईल तितकी चव खुलत जाते (स्वानुभव).
दही व टोमॅटो घालून मटण मंद आचेवर भांड्यावर झाकण ठेवून शिजू द्यावे, अर्थात् मध्ये मध्ये ढवळत रहावे. गरज वाटली तरच अगदी थोडे गरम पाणी घालावे, शक्यतो टोमॅटो व दहयावरच शिजवावे. मटण पूर्ण शिजले की मीठ घालून झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी. वाढताना वरुन कोथिंबीर पेरावी व लिंबाच्या फोडी बाजुला लावून सजावट करावी.

टीपः उत्तम प्रतीचे मटण साधारण पाऊण ते एक तासामध्ये मऊ शिजलं पाहिजे. कूकरमध्ये शिटी काढून मटण कधीच शिजवू नये, लज्जत निधून जाते.
मटण शिजल्यानंतर मीठ घातलं तर वातड होत नाही.

अवांतरः मटणाला धुरी दिली तर एकदम पंचतारांकित हॉटेल-शेफच्या हातचं मटण तयार! एक ज्वलंत कोळसा पाकृप्रमाणे तयार केलेल्या मटणात खळगा करून त्यात ठेवा, वर थोडा लिंबाचा रस व तूपाचे थेंब सोडा... धूर निघेल, लगेच बाजूचे मटण कोळशावर पसरून भांड्याला झाकण गच्च लावून १० मिनिटे ठेवून द्या. मटणाला सौम्य व लज्जतदार धुराचा वास लागतो.

करून पहा आणि रिपोर्ट द्या!

प्रतिक्रिया

सुनील's picture

11 Nov 2008 - 3:30 pm | सुनील

करून पहा आणि रिपोर्ट द्या!
करून रिपोर्ट देऊच पण सध्या नुसते वाचूनच तोंडाला पाणी सुटलय त्याचं काय?

काही शंका-
दोन मोठे टॉमेटो (सालं काढून किसून घ्यावे)
टोमेटो कसा किसावा? रस नाही का गळणार? का थोडावेळ फ्रीझरमध्ये ठेवून , टणक झाला की किसावा?

शहाजिर्‍याला जवळचा पर्याय कुठला?

गरज वाटली तरच अगदी थोडे गरम पाणी घालावे
खरे म्हणजे मटण गरम करताना त्यातील फॅट वितळून अगदी सुंदर दाट रस्सा बनतो. पाणी अजीबातच घालू नये. सहमत.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चित्रा's picture

11 Nov 2008 - 7:23 pm | चित्रा

आमच्या एका घरगुती मित्राला नवरी मिळवून देण्याच्या खटपटीत असताना त्याच्या "कदाचित होऊ शकले असते अशा" सासरी आग्रहपूर्वक सुके मटण खाल्ले होते ती आठवण आली.

छानच पाककृती.

ललिता's picture

11 Nov 2008 - 3:50 pm | ललिता

टोमेटो कसा किसावा? रस नाही का गळणार? का थोडावेळ फ्रीझरमध्ये ठेवून , टणक झाला की किसावा?
रस गळणारच, भांड्यात टोमॅटो किसत नाही का आपण? रश्श्यात टोमॅटोच्या फोडी तशाच राहतात म्हणून मी किसून घेते. टोमॅटो नरम असेल तर साली काढून बारीक चिरून टाकला तरी चालेल.

शहाजिर्‍याला जवळचा पर्याय कुठला?
पर्याय मलातरी माहित नाही. शहाजिरं वगळलं तरी चालेल.

वेताळ's picture

11 Nov 2008 - 4:47 pm | वेताळ

ही पाकृ वेळ देऊन निगुतीने बनवावी लागते. पार्टीला आदल्या दिवसाचं सुकं मटण वाढावं, मसाला मुरल्यामुळे मटण अप्रतिम चविष्ट लागतं.

ह्या पाककृतीला आमच्या इकडे कोल्हापुर ला मटणाचे लोणचे असे देखील म्हणतात. एक दिवस मुरलेले मटणाचे लोणचे दुसरया दिवशी खायला खुप मस्त लागते.ललिता ताई तुमचे परत एकदा धन्यवाद..अजुन खुप गोवेचे खाद्यपदार्थ आहेत. त्याची पाककृती येऊ दे मिपावर.
वेताळ

विसोबा खेचर's picture

11 Nov 2008 - 5:07 pm | विसोबा खेचर

सुके मटण ...!

वा वा वा! अल्टीच पाकृ...

ग्लेनफिडिचच्या सोबत जबराच लागेल..!

तात्या.

अहो तुम्ही फोटू का देत नाही? :(

प्रभाकर पेठकर's picture

11 Nov 2008 - 5:26 pm | प्रभाकर पेठकर

सुक्या मटणाची पाकृ मस्तच आहे. सोबत छायाचित्र दिले असते तर जीव ओवाळून टाकला असता.

निष्कर्ष म्हणजे मेंदू थकल्याचे लक्षण!

वल्लरी's picture

11 Nov 2008 - 5:26 pm | वल्लरी

ललिता ताई,
मागे तुम्हि चिकन सागुती ची रेसीपी दिली होती त्याप्रमाणे करुन बघितली नी मुद्दाम दुसरया दिवशी उरवुन पण खाल्ली,,,खुप टेस्टी लागते.खाऊन झाल्यावर फोटो काढायचे आठ्वले..
आता सुके मटण करेन तेव्हा reply देताना फोटो डकवेन आठवणीने..
तोंडाला पाणी सुटणारी सुंदर पा.कृ.दिल्याबद्द्ल धन्यवाद...

ललिता's picture

11 Nov 2008 - 5:28 pm | ललिता

तात्याराव,
मटण घरी फारसं बनवत नाही त्यामुळे फोटो हाताशी नाहीय कारण मी स्वतः मटण, चिकन व अंडी खात नाही. पार्टीला असे पदार्थ होतात आमच्या घरी. आता कधी पार्टी होईल... कधी फोटो काढीन... तोपर्यंत बराच वेळ जाईल.. म्हणून रेसिपी फोटोशिवायच टाकते.

ललिता's picture

11 Nov 2008 - 5:44 pm | ललिता

जया धन्यवाद ग! माझा फोटोचा प्रॉब्लेम सोडवलास! :)

प्राजु's picture

11 Nov 2008 - 9:19 pm | प्राजु

ललिता ताई,
मी मटण खात नाही. यात मटणा ऐवजी चिकन घातलं तर चालेल का?
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

सुनील's picture

11 Nov 2008 - 9:36 pm | सुनील

ललिताबाई काय ते उत्तर देतीलच पण माझ्या मते चिकन चांगले होणार नाही.

एक तर चिकन शिजायला वेळ लागत नाही आणि चिकन फार वेळ शिजवले तर ते थोडे कडक /ड्राय होते. मटण याउलट जेव्हढे जास्त शिजवाल तेव्हढे नरम होत जाते.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

ललिता's picture

12 Nov 2008 - 2:34 am | ललिता

मटणाबरोबर शिजत गेलेला मसाला खुलत जातो. चिकन इतका वेळ शिजवता येत नाही, त्यामुळे मसाला पाणीदार व बेचव राहातो.

चिकनसाठीचा मसाला आधीच तेल/तूप सुटेपर्यंत तयार करावा लागतो, त्यात मीठ घालून चिकन मऊ होईपर्यत रस्सा उकळावा.
वर मटणासाठी दिलेला मसाला दही व टोमॅटो घालून तेल सुटेपर्यंत परतून घे, नंतर त्यात चिकन शिजवलंस तर छान रस्सा तयार होईल. चिकनसाठी खडा मसाला व आल्यालसणाच्या पेस्टचं प्रमाण थोडं कमी कर.

धोंडोपंत's picture

13 Nov 2008 - 12:02 am | धोंडोपंत

वा वा
पाककृती छान आहे. आवडली.

रामदास फुटाणे यांची कविता आठवली.

बामणानं मटण महाग केलं
दलितांनं पुस्तक महाग केलं
समाजवादाचं ओझं एकमेकांच्या दाराशी नेलं
त्यात आपल्या बापाचं काय गेलं?

आपला,
(मटणखाऊ) धोंडोपंत

आम्हाला इथे भेट द्या: http://dhondopant.blogspot.com

(जय जय महाराष्ट्र माझा! गर्जा महाराष्ट्र माझा!)

मनस्वी's picture

13 Nov 2008 - 10:26 am | मनस्वी

ललिता, भन्नाट पाककृती दिलीयेस.. आता करून बघितल्याशिवाय चैन पडणार नाही.
तो कोळसा प्रकार तर अफलातून आहे.