सुके मटण
ही पाकृ वेळ देऊन निगुतीने बनवावी लागते. पार्टीला आदल्या दिवसाचं सुकं मटण वाढावं, मसाला मुरल्यामुळे मटण अप्रतिम चविष्ट लागतं.
७०० ग्रॅम मटण (नळ्यांसकट असेल तर १ किलो)
५, ६ कांदे बारीक चिरून
दोन मोठे टॉमेटो (सालं काढून किसून घ्यावे)
१ मोठा कप भरून दही
अर्धा कप तेल
२ टेबलस्पून आलं + लसूण + हिरव्या मिरच्या पेस्ट
२ चमचे धने + १ चमचा जिरे + १ चमचा शहाजिरे (कोरडे भाजून पूड करावी)
मीठ चवीप्रमाणे
कोथिंबीर चिरून
खडा मसाला:
४ लवंगा, ६-७ मिरें, दालचिनी (१"), २ मसाल्याची वेलची, ३-४ हिरवे वेलदोडे, पाव चमचा जायपत्री, २ तमालपत्रं
एका पसरट कढईत -कढई नसेल तर पसरट भांड्यात- तेल गरम करावे. तेलात खडा मसाला टाकून किंचित तळावा. त्यावर चिरलेला कांदा लाल होईपर्यंत परतून घ्यावा. त्यात आल्यालसणाची पेस्ट घालून दोन मिनिटे परतावे. नंतर मटण व धने+जिरें+शहाजिर्याची पूड एकत्र घालून मटणाचे तुकडे गुलाबी होईपर्यंत परतून घ्यावे. मटण जितके जास्त परतले जाईल तितकी चव खुलत जाते (स्वानुभव).
दही व टोमॅटो घालून मटण मंद आचेवर भांड्यावर झाकण ठेवून शिजू द्यावे, अर्थात् मध्ये मध्ये ढवळत रहावे. गरज वाटली तरच अगदी थोडे गरम पाणी घालावे, शक्यतो टोमॅटो व दहयावरच शिजवावे. मटण पूर्ण शिजले की मीठ घालून झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी. वाढताना वरुन कोथिंबीर पेरावी व लिंबाच्या फोडी बाजुला लावून सजावट करावी.
टीपः उत्तम प्रतीचे मटण साधारण पाऊण ते एक तासामध्ये मऊ शिजलं पाहिजे. कूकरमध्ये शिटी काढून मटण कधीच शिजवू नये, लज्जत निधून जाते.
मटण शिजल्यानंतर मीठ घातलं तर वातड होत नाही.
अवांतरः मटणाला धुरी दिली तर एकदम पंचतारांकित हॉटेल-शेफच्या हातचं मटण तयार! एक ज्वलंत कोळसा पाकृप्रमाणे तयार केलेल्या मटणात खळगा करून त्यात ठेवा, वर थोडा लिंबाचा रस व तूपाचे थेंब सोडा... धूर निघेल, लगेच बाजूचे मटण कोळशावर पसरून भांड्याला झाकण गच्च लावून १० मिनिटे ठेवून द्या. मटणाला सौम्य व लज्जतदार धुराचा वास लागतो.
करून पहा आणि रिपोर्ट द्या!
वाचन
13526
प्रतिक्रिया
0