जोकर

श्रीरंग's picture
श्रीरंग in जनातलं, मनातलं
15 Oct 2019 - 7:06 am

जोकर.. DC चित्रपट विश्वातील सुपरहिरो इतकंच प्रचंड लोकप्रिय पात्र. किंबहुना, आजवरच्या सर्वात लोकप्रिय खलनायकांपैकी एक. अत्यंत विक्षिप्त, विदूषकाच्या मुखवट्याआडून थंडपणे गुन्हे करणारा, अंगावर काटा आणणारा खलनायक हिथ लेजर यांनी डार्क नाईट चित्रपटातून एका वेगळ्याच उंचीवर नेऊन कल्पनेपलिकडे लोकप्रिय करून ठेवला आहे.
टॉड फिलिप्सने दिग्दर्शित केलेला "जोकर" हा चित्रपट याच जोकरचे पूर्व कथानक, म्हणजेच आर्थर फ्लेचर याची विकृत क्रूरकर्मा जोकर बनण्यापुर्वीची कथा आहे.
आर्थर फ्लेचर हा एक साधा सरळ मध्यवयीन इसम. गॉथम शहरात, आपल्या आईबरोबर अगदी बेताच्या परिस्थितीत दिवस काढणारा. दिवसा विदूषकाचे काम करणे, आणि रात्री आईसोबत टीवी वर आवडते विनोदी कार्यक्रम पाहणे, एवढेच मर्यादित विश्व असलेला. आईची मनापासून सेवा करणारा, काळजी घेणारा आर्थर, स्वतः एक स्टँड अप कॉमेडियन बनण्याचे स्वप्न बाळगून असतो. पण बेताचीच प्रकृती असलेला, काहीसा भाबड्या स्वभावाचा, काहीसा गतिमंद आर्थर सतत सगळीकडे चेष्टेचा, टिंगल टवाळीचा, आणि अपमान व अवहेलनेचाच बळी ठरत असतो. सततच्या अपमान व कुचंबणेमुळे हळूहळू तो नैराश्य व तत्सम मानसिक विकारांच्या विळख्यात अडकायला लागतो. त्यात भर म्हणून, सरकारी अनुदान थांबल्याने, त्याचे उपचार व औषधे पण बंद होतात. अशातच, एकदा गल्लीतल्या टवाळ पोरांकडून मार खाऊन आलेल्या आर्थरला, त्याचा एक सहकारी पिस्तुल देतो. यातून पुढे घडू नये ते घडते, व एक नाकासमोर चालणाऱ्या शामळू माणसाचा क्रूर विकृत खलनायक बनण्याकडे प्रवास चालू होतो. समाजाने आपल्याला सामान्य माणसाप्रमाणे स्वीकारावे, कोणी चार शब्द हसून बोलावेत, एवढ्या माफक अपेक्षा पण पूर्ण होत नाहीत, तेव्हा त्याच्यात सैतान जागा होऊ लागतो..
अडीच तासांचा हा चित्रपट काहीसा संथ असला, तरीही पूर्ण वेळ आपल्याला गुंतवून ठेवतो, काहीवेळा अंतर्मुखही व्हायला लावतो. जरी सुपरहिरोशी निगडित कथा असली, तरी यात कुठलेही स्पेशल इफेक्ट, action sequences, इत्यादी नाहीत. गॉथम या काहीश्या गडद, वेगाने ढासळणार्या काल्पनिक शहरात ही कथा घडते. संपूर्ण कथा अर्थरभोवतीच फिरते. उपकथानकं वगैरे फापटपसारा नाहीये, पण त्यामुळे चित्रपट जरासा एकसुरी पण वाटतो. काही प्रसंग थोडेसे अतार्किक आहेत, पण शेवटी फँटसी असल्यामुळे तेवढे चालवून घ्यायला हवे. अभिनयाच्या बाबतीत, वाकिन फिनिक्स व्यतिरिक्त कोणालाही फारसा वाव नाही, पण फिनिक्सने अक्षरशः या भूमिकेचे सोने केले आहे. इतकी नैसर्गिक देहबोली आणि मुद्राभिनय केला आहे, की कित्येकदा विसरायला होतं, की हे काल्पनिक पात्र असून, समोर चालू आहे तो केवळ अभिनय आहे. विशेषतः, प्रथमच स्टेजवर मिळालेल्या संधितही फजिती झाल्यावर झालेली घालमेल, आपल्या आवडत्या कॉमेडियनने जाहीर खिल्ली उडवल्यावर आलेले नैराश्य, भावनांचा पूर्ण कडेलोट झाल्यावरचा उद्रेक, हे प्रसंग अक्षरशः सुन्न करतात. या वर्षीच्या ऑस्करच्या शर्यतीत फिनिक्स हे नाव असणार, हे निश्चित.
एकूण, चित्रपट जरी संथ असला, जरी सतत गंभीर, तणावपूर्ण असला, तरी आपल्याला देखील, समाजातील गरीब, मानसिकदृष्ट्या दुर्बल असलेल्यांना आपण कसे वागवतो, किंवा आपण केवळ मस्करी म्हणून केलेली टिंगल टवाळी एखाद्याच्या किती जिव्हारी लागू शकते, याचा विचार करण्यास भाग पाडतो.
चित्रपटाची गती मात्र खूपच संथ आहे. कित्येक प्रसंग अगदी रटाळ वाटावे असे, आणि तोचतोच पणा असलेले आहेत.
फिनिक्सच्या अप्रतिम अभिनयासाठी, ही संथ गती, आणि एकसुरीपणा जरा सुसह्य वाटतो.

कलाआस्वाद

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

15 Oct 2019 - 8:08 am | प्रचेतस

हा चित्रपट बघायचाच आहे.

उपेक्षित's picture

15 Oct 2019 - 12:10 pm | उपेक्षित

कालच रात्री पहिला आणि अंगावर आला, अजून नॉक नॉक आर्थर च्या वातावरणातून बाहेर आलेलो नाहीये.

फ्लेचर ने स्वतः च्या शरीरयष्टी वर घेतलेली मेहनत (याला पाठमोरे पाहताना किळस वाटावी असे) याला तोड नाही.
हिथच्या जोकर ला philosophy ची छटा होती तर इथे फ्लेचर च्या जोकर ला विक्षिप्तपणा + भावानिकतेची छटा आहे.
फ्लेचर च्या अभिनयाबाबत तर क्या केहने ? निव्वळ निशब्द व्हायला होत २ तास भान हरपून पहिल्यांदाच एखादा इंग्लिश मूवी मी पहिला असेल.

सर्वांनी एकदा तरी जरूर पाहावा असा हा जोकर आहे.

तुषार काळभोर's picture

16 Oct 2019 - 11:42 am | तुषार काळभोर

जोकर या पात्राची मुळात लोकांवर एक मोहिनी आहे.
बर्‍याच लोकांना हा जोकर त्यांच्या सुप्त मनाचे प्रतिबिंब वाटतो.
हा नवा जोकर अजून पाहिला नाही, पण नोलानचा जोकर एकदम अशक्य भारी होता!

आणि हेच त्याचे बहुतेक यशही आहे.

जोकर पात्र ज्यांना माहीत आहे त्यांना हा चित्रपट खिळवून ठेवेल हे निःसंशय.

ज्यातून अभिनय, दिगदर्शन, पार्श्वसंगीत, कथानक मांडणी या गोष्टी वेगवेगळ्या करूही शकणार नाही तेंव्हा फक्त हेच मनात येते "अफलातून चित्रपट".