जावे फेरोंच्या देशा - भाग ४ : दहशुर, सक्कारा, गिझा

Primary tabs

कोमल's picture
कोमल in भटकंती
24 Sep 2019 - 10:28 pm

भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ भाग १२ भाग १३ भाग १४


१९ सप्टेंबर २०१८

सकाळी ७:३० वाजता महमूद चा फोन आला. 
-- "तुमच्या आजच्या ट्रिपची गाडी तासाभरात पोहोचेल, नाश्ता करायला कॉमन रूम मध्ये या."
नवऱ्याचा ताप उतरला होता पण अशक्तपणा थोडा होताच.
"नक्की जाऊया ना आज?" असं त्याला ४ वेळा विचारून पक्कं केल्यावर १५ मिनिटात आवरून आम्ही नाश्ता करायला पोहोचलो. 
लांबुळका ब्रेड, बटर, जॅम आणि कोरा चहा संपवेपर्यंत गाडी तयार होती. 

"हॅलो, गुड मॉर्निंग!! माझं नाव अशुर. तुमचा आजचा गाडीवान. तुमचं नाव?"
-- "मी प्रवीण"
-- "आणि मी कोमल"
"नमस्ते पारवीन आणि कुमाल. आज आपण जाणार आहोत दहशुर, सक्कारा आणि ग्रेट पिरॅमिड पाहायला. गिझा आपण सगळ्यात शेवटी करूया."
- "ओके" 

नील नदीवरचा ६th ऑक्टोबर ब्रीज ओलांडून आम्ही गिझा हद्दीत आलो आणि नदीच्या कडेकडेने आमचा प्रवास चालू झाला. 

गिझा मधील सगळ्या इमारती विटांच्या आहेत आणि सगळ्या एकमेकांना अगदी खेटून. इतक्या कि एका घरात पडलेल्या भांड्याचा आवाज तिसऱ्या घरापर्यंत पोहोचावा. कधी दोन्ही किंवा कधी तिन्ही बाजूंनी इमारती वेढलेल्या. त्यामुळे फक्त दर्शनी भिंतीला रंग देण्याची पद्धत. काही इमारती तिच्या शेजारणीचं बांधकाम पूर्ण होई पर्यंत तशाच बोडक्या उभ्या तर काही शेजारी कोणी येईल का याची वाट बघत उभ्या. सगळ्या इमारतींवर डिश टीव्हीच्या छत्र्यांचं छप्पर. आणि सगळ्याच इमारतींचा रंग सारखाच. मातकट. गिझा मधून वाहणारं नील नदीचं पाणी सुद्धा प्रचंड कळकट. आपल्या मुळा-मुठे सारखंच. 

गिझा संपलं कि चालू होतात खजुराच्या बागा, स्वच्छ हवा आणि नीलचं स्वच्छ पाणी. आपल्याकडे कोकणातून फिरताना माडाच्या लांब रांगा दिसतात तशा इथे खजुरांच्या दिसतात. आम्ही गेलो तेव्हा फळ पिकायला आलं होतं. उंच वाढलेल्या झाडांच्या शेंड्याला सोनेरी फळं काय सुरेख दिसत होती म्हणून सांगू.  रस्त्याशेजारी छोटी पोरं खजुराचे वाटे विकतांना दिसत होती. चव बघावी म्हणून एक वाटा घेतला, काय गोड आणि ताजा होता तो खजूर. आपल्याकडे पोरं जशी बोरं पाडतात तसं तिकडं खजूर पाडत होते. रसरशीत आणि भरपूर गर असलेलं ते फळ तिथे चाखतांना फार छान वाटल. 

5 Terre

खजूराच्या बागा

5 Terre

पिकलेलं फळ

5 Terre

छोटं झाड आणि कच्चं फळं. चव तुरट बोरासारखी


साधारण तासाभराने गाडीने मुख्य रस्ता सोडून गावात प्रवेश केला. आणि दहशुरची पाटी दिसली. 

पिरॅमिड कॉम्प्लेक्सच्या हद्दीवर असलेल्या तिकीट खिडकीवर पोहोचलो आणि चेहरे बघताच तिथे सगळे पुटपुटायला लागले, "हिंदी हिंदी. मेशी.. शारूखान, अमिताबच्चन""yes yes" म्हणत मी तिकीटे घेतली आणि पुढे निघालो. तिकडे भारतीयांना इंडियन म्हणून नव्हे तर हिंदी म्हणून ओळखतात. आणि बॉलिवूड चित्रपटांची मोहीनी पण त्यांच्यावर फार आहे. त्यामुळे भारतीय लोक बघून त्यांना फार आनंद होतो, त्यांचं प्रेम आणि आदर त्यांच्या वागण्यातून जाणवतोही.

दहशुरचा रेड पिरॅमिड फेरो स्नेफेरू याने ख्रिस्त पूर्व २६०० मध्ये बांधला. हा पिरॅमिड बांधायच्या आधी स्नेफेरूने २ वेळा पिरॅमिड बांधायचा प्रयत्न केला. पहिल्या प्रयत्नात सुरवातीचे काही दगड ठेवल्यावरच ते कोसळले. दुसऱ्या प्रयत्नात पिरॅमिडच्या बाजूंचा कोन साधतांना आकडेमोडीत काहीतरी गोंधळ झाला. आणि हे लक्षात आलं तोवर निम्मा पिरॅमिड उभा राहिला होता. सुरवातीच्या कोनाला धरून बांधकाम केले असता पिरॅमिड ढासळण्याची शक्यता होती. त्यामुळे झालेला गोंधळ सुधारण्याकरिता मध्यातून कोन बदलण्यात आला आणि तयार झाला वाकडा पिरॅमिड (Bent Pyramid). पिरॅमिडच्या बाजू सपाट आणि गुळगुळीत होण्यासाठी चुन्याचा थर लावला जायचा. आज जवळजवळ साडेचार हजार वर्षांनंतर सुद्धा तो थर इथे शाबूत दिसतो.

5 Terre

रेड पिरॅमिड

यानंतर रेड पिरॅमिड बांधायला अंदाजे १०-१७ वर्ष लागली. लाल चुनखडकापासून बनवलेला हा पिरॅमिड इजिप्तमधील सर्वात मोठा असा तिसरा पिरॅमिड असून, याच्या आत जायला वेगळे तिकीट घ्यावे लागत नाही. पहिले दोन मोठे पिरॅमिड खुफू आणि खाफ्रे यांच्या आत जायला प्रत्येकी १००० पौंड्सचं तिकीट असल्याने आम्ही रेड पिरॅमिड आतून पाहायचा ठरवला. अशुर आम्हाला पायथ्याशी सोडून गाडी पार्किंग मध्ये लावायला गेला. या आवारात गर्दी अजिबात नव्हती. फक्त एक मध्यम वयस्क युरोपियन जोडपं नुकतंच पिरॅमिड बघून खाली उतरत होतं. १०-१५ मिनिटांनी आम्ही पिरॅमिडच्या मध्यापर्यंत पोहोचलो. इथून आत उतरण्याच्या पायऱ्या सुरु झाल्या. बऱ्यापैकी उतार असलेल्या लाकडी फळीवर मध्ये मध्ये पट्टे मारून शिडीप्रमाणे बनवलेलं आहे. यावरून उतरून एका हॉल मध्ये पोहोचलो. आता एक लाकडी जिना परत वर घेऊन जात होता. वरती पोहोचल्यावर ममी ठेवलेली ती खोली आली. सध्या इथे काहीच नाही, मस्तबा पण इथून हलवून कैरोच्या म्युसिअम मध्ये ठेवलेला. पण जेव्हा स्नेफेरूला इथे ठेवलं असेल तेव्हा त्या सोन्याच्या वस्तुंनी फार सुंदर दिसत असेल ना ही खोली. सुंदर कि उदास कि भयावह? 

5 Terre

उतरायचा जिना

5 Terre

चढाईचा लाकडी जिना

5 Terre

फेरोची ममी ठेवलेली खोली

परत १५ मिनिटांच्या चढाई नंतर आम्ही पिरॅमिडच्या प्रवेशापाशी पोहोचलो. भरपूर आणि थंडगार वारं वाहात होत. इथून सक्काराचा स्टेप पिरॅमिड पण दिसला दूरवर. खाली उतरून गाडीत बसलो आणि वाकड्या पिरॅमिड कडे एक चक्कर मारली. याच्या शेजारीच थोड्या अंतरावर काळा पिरॅमिड उभा असलेला दिसतो. विटा आणि मातीपासून बनवलेला हा पिरॅमिड सध्या मात्र दगडावर आलेल्या बुरशी सारखा दिसत असल्याने याला ब्लॅक पिरॅमिड असं म्हणतात. 

5 Terre

वाकडा पिरॅमिड आणि मागल्या बाजूस काळा पिरॅमिड


इथून निघालो सक्काराला. इजिप्त मधील पहिला पिरॅमिड बघायला. इथेपण तिकीटबारीवर तसंच स्वागत झालं. "हिंदी", "शारुक" "अमिताबच्चन".  आणि "वेलकम टू इजिप्त""Thank  you, शुक्रन" म्हणत पुढे सरकलो. इमहोटेप या वास्तूविशारदाने फेरो झोसेरसाठी बांधलेला स्टेप पिरॅमिड हा इजिप्त मधील पहिला हे मी तुम्हाला आधी सांगितलंच. ख्रिस्त पूर्व २७०० मध्ये सहा मस्तबा एकावर एक रचून बांधलेला. इथे फक्त पिरॅमिड नसून कुंपणाची भिंत, खंदक, उंच खांबांमधून जाणारा मार्ग,  प्रवेश कक्ष (हॉल), आणि चौक अशा अनेकाविध गोष्टी आहेत. खांबांवर बांबूसारखी घडण दिसते आणि अप्पर इजिप्त चा प्रभाव जाणवतो. या बद्दल पुढील एका भागात येईलच. पण सक्काराच्या पिरॅमिड कॉम्प्लेक्सला बघून इमहोटेपच्या कौशल्याबद्दल आणि नंतर त्याला मिळत गेलेल्या बढत्यांबद्दल जराही शंका रहात नाही. पिरॅमिड च्या पायथ्याशी इमहोटेप म्युसिअम आहे. ते बघून आम्ही गिझा कडे परत फिरलो. 

5 Terre

पिरॅमिडच्या बाहेरील भिंत

5 Terre

बांबू सारखे काम असलेले खांब

5 Terre

स्टेप पिरॅमिड

5 Terre

पिरॅमिडचे आवार. मागील बाजूला दुरवर दिसतोय तो रेड आणि वाकडा पिरॅमिड

5 Terre

इमहोटेप म्युसिअम


रस्त्यात अशुरने जेवायला एका फार छान हॉटेल मध्ये नेलं. हम्मुस, आईश बलादी*, वांग्याचे तळलेले काप आणि त्यावर लिंबू, मुरवलेले ऑलिव्ह, ३ प्रकारचे कबाब आणि शेवया मिश्रित भात आणि बटाट्याचा रस्सा असा भरगच्चं आणि स्वादिष्ट मेनू समोर आला. या सगळ्यावर ताव मारल्यावर आलेले रसाळ खजूर सुद्धा पोटात मावले. 

5 Terre

जेवण

😍

*( पिटा ब्रेड सारखाच दिसायला मात्र चव फार वेगळी. गाव-शहरांतून जागोजागी याचे स्टॉल असतात. हा इजिप्तच्या रोजच्या जेवणातील मुख्य पदार्थ कोणी घरी बनवत नाही. सरकार तर्फे १ पौन्ड ला ५ आईश इतक्या वाजवी दरात उपलब्ध करुन दिले जातात)


अर्ध्या तासात आम्ही गिझाला पोहोचलो आणि गिझाच्या गल्यांमधून हळूच त्याने दर्शन दिले. लांबून जेवढा रुबाबदार आणि सुरेख दिसतो तो, जवळूनही तेवढाच देखणा आणि भव्य दिव्य भासतो. "द ग्रेट पिरॅमिड ऑफ गिझा"बघताक्षणी प्रेमात पडावं अशी वास्तू. वास्तुशात्रातील गूढ. शब्दांत मांडता येण्याच्या पलिकडचा. हजारो वर्षांपासून मनुष्याला भुरळ घालत आलेला तो जेव्हा प्रत्यक्ष समोर आला तेव्हा हृदयाचे ठोके वाढलेले अंगावर काटा आलेला. You don't always feel that way, you know. "कसं करू शकले असतील ते लोक?" या जगाला सतावणाऱ्या प्रश्नाची खरी खोली तेव्हा जाणवली. मशीन आणि रोबोटिक्स च्या जगात वावरत आहे मी, त्यामुळे कदाचित जरा जास्तचं जाणवतंय त्यांचं कसब, त्यांची मेहनत आणि हुशारी. गेल्या पाच हजार वर्षांपासून तो उभा आहे, ऊन-वारा-वाळू यांचा सामना करत आणि पुढील पाच हजार वर्ष सुद्धा असाच उभा असेल मनुष्याचं अनोखं कर्तृत्व बनून. गाईडने स्वतःची कॅसेट सुरु केलीये पण माझी नजरच हटत नाहीये त्याच्यावरून. आजूबाजूच्या ३-४ गोष्टी पाहून आल्यावर आम्ही दोघं त्याच्यापायथ्याशी येऊन बसलो. थंड वारं आणि उतरतीचा सूर्य झेलत. दोघंही शांत. मनाने त्याच्या काळात पोहोचलेलो. आमच्या शेजारी कामगारांची लगबग लगबग सुरू आहे. मोठाले दोरखंड, मोठी मोठी चाकं आणि भल्या मोठ्या शिळा दिसत आहेत आजूबाजूला. खालच्या बाजूला कामगारांची वस्ती आहे. त्यांचे सफेद कपडे वाळू आणि धुळीमुळे मळकट झालेत. त्यांच्या पेक्षा वरच्या अधिकाऱ्यांच्या हातात पपायरस वर काढलेल्या आकृत्या आहे, ज्याचा बोध त्यांनाच होत आहे. बघता बघता तो बांधला जात आहे. आता चुनकळीचा थर मारणं सुरु आहे. त्यानंतर सोन्याची टोपी चढवली कि झालं. लाडक्या फेरो साठी अतिप्रचंड असं वास्तूकौशल्य घडवल्याचं समाधान त्यांच्या चेहऱ्यांवरून झळकत आहे. 

.
.
.
.
.
आता चुना गळून पडलाय. टोपी तर कधीच गेली. पण तो मात्र मोठ्या ऐटीत उभा आहे. आजही. 


क्रमशः

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

25 Sep 2019 - 12:07 am | पद्मावति

वाह...सुरेख. पु.भा.प्र.

कंजूस's picture

25 Sep 2019 - 5:37 am | कंजूस

आवडलं. फोटोही छान. जेवण चांगलं दिसतय.

सुधीर कांदळकर's picture

25 Sep 2019 - 7:15 am | सुधीर कांदळकर

वर्णन आणि प्रचि: अतिशय सुंदर आणि छान जमलीत. दोहोतील समन्वय पण सुरेख आहे. बांबूचा आभास चित्रात छान टिपला आहे. स्फिंक्सचे चित्र सर्वात जास्त आवडले. त्यातला सूर्य आणि छायाप्रकाश मस्त. जेवण छान दिसते आहे. पिटा ब्रेड वेगळा म्हणजे कसा लागत असेल याची कल्पना अरतो आहे.

धन्यवाद. पुलेशु

यशोधरा's picture

25 Sep 2019 - 7:46 am | यशोधरा

सुरेख जमला आहे हा भाग.

प्रचेतस's picture

25 Sep 2019 - 9:23 am | प्रचेतस

क्या बात है...!

इजिप्तला जाण्याचा विचार दिवसेंदिवस बळकट होत चाललाय.

कोमल's picture

25 Sep 2019 - 5:17 pm | कोमल

खरंच जा अरे.

मी काय म्हणते, मिपामुर्तीआणिस्थापत्यकलाआवड असे मंडळ चालू करुन, तुझा गाशा इथुन गुंडाळून ६ महिन्यांसाठी तुला सक्तीच्या इजिप्तवारीवर पाठवावे.
म्हणजे आम्ही ६ महिने रसग्रहण करायला मोकळे.

रच्याक, खरंच डिटेलवारी इजिप्त पहायचा तर ३-४ महिने सहज लागतील इतकी ठिकाणे आहेत. घे मनावर बाबा.

प्रचेतस's picture

25 Sep 2019 - 5:42 pm | प्रचेतस

=))

दहा/बारा दिवस तरी टूअर करणारच आहे. कंबोडिया आणि इजिप्त दोन्ही करायचे आहे, पहिले काय होतेय ते बघू :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

25 Sep 2019 - 10:05 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सध्या फक्त फोटो पाहिले. जेवणाचाही फोटो आवडला.
वृतांत निवांत वाचेन. केवळ पोच.

-दिलीप बिरुटे

जगप्रवासी's picture

25 Sep 2019 - 11:07 am | जगप्रवासी

उत्तम लिखाण आणि त्याला पूरक असे फोटो. पु ले शु.

जॉनविक्क's picture

25 Sep 2019 - 11:47 am | जॉनविक्क
राजे १०७'s picture

25 Sep 2019 - 1:30 pm | राजे १०७

सुंदर लेख. आवडला.

सगळ्यांचे मनापासून आभार.
_/\_

जॉनविक्क's picture

25 Sep 2019 - 9:39 pm | जॉनविक्क

लकी अलीचे गाणेच मनात तरळलं.

उपेक्षित's picture

26 Sep 2019 - 3:06 pm | उपेक्षित

वाचत आहे...

श्वेता२४'s picture

26 Sep 2019 - 6:26 pm | श्वेता२४

इजिप्त मध्ये जसा ब्रेड सरकारतर्फे कमी किंमतीत उपलब्ध करुन दिला जातो तसं या देशात पोळ्या उपलब्ध करुन दिल्या तर किती वेळ वाचेल असं उगीचच वाटून गेलं ;)

कोमल's picture

27 Sep 2019 - 7:44 pm | कोमल

आयडिया चांगली आहे,
पण मऊसुत, पदर सुटणार्‍या, घडीच्या पोळ्या अशा कमी दरात मिळण्याची शक्यता कितपत आहे??

😜

राजे १०७'s picture

26 Sep 2019 - 7:33 pm | राजे १०७

विकतच्या पोळ्या गृहिणींना आवडेल काय?

जालिम लोशन's picture

26 Sep 2019 - 11:16 pm | जालिम लोशन

आवडले लिखाण.

कोमल's picture

27 Sep 2019 - 7:44 pm | कोमल

धन्यवाद _/\_

सुंदर वर्णन केलंय. अगदी तेथे नेऊन दाखवल्यासारखे

कोमल's picture

27 Sep 2019 - 7:45 pm | कोमल

अनेक आभार विजुभौ _/\_

भटक्या फोटोग्राफर's picture

27 Sep 2019 - 10:04 am | भटक्या फोटोग्राफर

मझ्या नोवेम्बर ट्रिपची आठवण झाली,

प्रचेतस's picture

27 Sep 2019 - 10:30 am | प्रचेतस

फोटो आणि वृत्तांत टाका भो.

कोमल's picture

27 Sep 2019 - 7:45 pm | कोमल

असेच म्हणेन