जावे फेरोंच्या देशा - भाग ५ : बहारिया

Primary tabs

कोमल's picture
कोमल in भटकंती
29 Sep 2019 - 10:13 pm

भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५ भाग ६ भाग ७ भाग ८ भाग ९ भाग १० भाग ११ भाग १२ भाग १३ भाग १४


२० सप्टेंबर २०१८ 

आज भल्या पहाटे बहारियाला जायला निघालो. इथे पोहोचायला तुम्हाला बस घेता येते किंवा शेअर टॅक्सी करता येते. महमूद ने आमच्यासाठी टॅक्सी ठरवून दिली होती. सकाळी ७:३० वाजता आम्हाला हॉटेल मधून गिझा स्टॅन्ड वर एक गाडी सोडून गेली. दुसरी गाडी तिथे वाट पाहात थांबली होतीच. त्यात आधीच एक स्पॅनिश जोडपे आणि त्यांचा गाईड बसला होता. आम्हाला घेतल्यावर गाडी गिझाच्या चिंचोळ्या गल्ल्यांमधून फिरत एका घराजवळ थांबली. तिथे बरंच सामान गाडीत चढवल्यावर ड्राइव्हरची बायको आणि मुलगा पण गाडीत येऊन बसले आणि एकदाचा आमचा बहारियाच्या दिशेने प्रवास सुरु झाला. 

बहारिया हे एक सहारा वाळवंटातील मरुद्यान अर्थात ओऍसिस. फाराफ्रा आणि सिवा हि इतर काही मरूद्याने. 

बहारिया आणि फाराफ्रा च्या मध्ये पांढरे वाळवंट(white desert), काळे वाळवंट (black desert), स्फटिकांचा डोंगर(क्ट्रिस्टल माउंटन) या ३ सुंदर जागा लागतात. त्याशिवाय गरम पाण्याचा झरा, गार पाण्याचा झरा या गोष्टी पण आहेतच. हे सगळं बघायचं, १ रात्र पांढऱ्या वाळवंटात मुक्काम करायचा आणि दुसऱ्या दिवशी परत असा प्लॅन होता. या २ दिवसांच्या प्लॅन साठी reviews फार छान होते म्हणून मी हि ट्रिप नवऱ्याला लग्नाच्या वाढदिवसाची भेट म्हणून दिली होती. म्हणजे नक्की काय तर, जो ट्रिपचा खर्च येईल तो दोघात विभागला जाईल त्यातून बहारियाला वगळायचे एवढंच. पण anniversary gift असल्याने ती चांगली व्हायलाच हवी हा मात्र माझा आग्रह होता. 

सहारा वाळवंट कापत सुमारे ५ तासांनी आम्ही बहारिया गाठलं. इथे आम्हाला घ्यायला मुस्तफा ४ x ४ गाडी घेऊन तयार होता. वाळवंटात प्रत्येक "पार्टी"ची स्वतंत्र सोय असते. स्वतंत्र गाडी असते. दुबईच्या डेझर्ट सफारीला डोक्यात घेऊन काहीश्या सांशक मनाने आलेल्या नवऱ्याचे पूर्वग्रह इथेच गळून पडले. मुस्तफा आम्हाला छानश्या ठिकाणी जेवायला घेऊन गेला. एक अरेबिक घर, ज्यातून खमंग वास येत आहे. त्याच्या शेजारील जागेत खजुराच्या झाडाखाली मातीने सारवलेल्या भिंती आणि खजुराच्या झावळ्यांचे झप्पर बनवून, गाद्या गिरद्या टाकून जेवायची सोय केलेली. भिंतींवरून हाताने बनवलेल्या काही वस्तू आणि चित्रे टांगून ठेवली आहेत. भर दुपारी सुद्धा थंड निवांत वाटत होतं. आम्ही जागा घेताच समोर विविध पदार्थ हजर झाले. फ़ुल*, शाकशुका**, उकडलेला बटाटा वर शेपूची सजावट, तळलेले वांग्याचे काप त्यावर लिंबू पिळलेलं, चिप्स, सलाद आणि अनलिमिटेड आईश. 
* म्हणजेच उकडलेल्या राजम्याला बारीक वाटून केलेली भाजी
** या लेबनीज पदार्थात टोमॅटोच्या घट्ट ग्रेव्ही मध्ये अंडी फोडून तशीच शिजवतात, पोर्चड एग्ग्स सारखी. वाळवंटात मात्र त्याच वेगळं रुपडं समोर आलं, आपल्या भुर्जी सारखं काहीस, फक्त कांद्याशिवाय

5 Terre

जेवण केलं ते घर वजा रेस्टाँरंट

5 Terre

जेवण

जेवून थोडा वेळ आराम केला आणि निघालो. तापलेल्या वाळवंटातून आमचा प्रवास सुरु झाला. सोबतीला होता अबोल मुस्तफा आणि त्याची मोठ्याने वाजणारी अरेबिक गाणी. यातलं एक गाणं मला जाम आवडलं. साद लॅमजार्ड याचं माल्लेम.  

जरा वेळातच आजूबाजूला छोट्या मोठ्या काळ्या टेकड्या दिसत होत्या. जणू रणरणत्या उन्हाने रापलेल्या.साधारण अर्ध्या तासाने मुस्तफाने गाडी थांबवली आणि सांगू लागला, 
मुस्तफा: आपण पोहोचलो आहोत ब्लॅक डेझर्ट मध्ये. या भागातील सगळ्या टेकड्यांवर असा काळा रंग दिसेल.
मी: हो. पण ते कशामुळे?
मुस्तफा: खूप खूप पूर्वी इथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला होता. त्यामुळे वाळूच्या टेकड्यांवर लाव्हाचा थर जमा झाला आणि थंड होऊन तो दगड बनला. तुम्हाला सगळ्या काळ्या वाळवंटाचा नजारा या मोठ्या टेकडीवर चढून गेल्यावर दिसेल. अर्ध्या तासात परत या. 

जवळच्याच टेकडीवर १०० -१५० फूट चढून गेल्यावर विस्तीर्ण काळं वाळवंट दिसलं. खाली वाकून एक दगड हातात घेतला. नक्कीच बॅसाल्ट होता. मुस्तफाची ज्वालामुखीची थेअरी मला तेव्हा अतिशयोक्ती वाटली कारण एवढ्या विस्तीर्ण प्रदेशावर लाव्हा सांडला असेल असं म्हंटल तर तो उद्रेक किती मोठा असायला हवा. पण नंतर गूगल वर पाहिलं आणि बऱ्याच ठिकाणी तेच वाचायला मिळालं जे मुस्तफाने सांगितलं होतं. 

5 Terre

ब्लॅक डेझर्ट

5 Terre

ब्लॅक डेझर्ट टेकडी वरुन

5 Terre

ब्लॅक डेझर्ट

टेकाड उतरून खाली आलो आणि पुढे निघालो. २०-२५ मिनिटांत मुख्य रस्ता सोडून गाडी माळावर शिरली आणि मिनिटभरातच आम्ही क्रिस्टल माउंटन वर पोहोचलो. विविध आकारातील गारगोटीचे दगड संपूर्ण डोंगरावर पसरले होते. आणि कललेल्या उन्हांत ते विलक्षण चमकत होते. इजिप्त मध्ये मुन स्टोन पण सापडतात म्हणे, आणि हे रात्रीच्या अंधारात हिरवा प्रकाश देतात. पूर्वीच्या काळी वाळवंटातील लोक त्याचा वापर रात्रीच्या प्रवासात करायचे. आम्ही शोधलं पण आम्हाला तो काही सापडला नाही. त्यामुळे थोडे आकर्षक क्रिस्टल आठवण म्हणून सोबत घेतले.

आता आम्ही मोठा रस्ता सोडून एका गावात शिरलो. थोडी शेती आणि गुरु ढोर दिसली आणि गाडी एका खोपट्या समोर थांबली. इथे गरम पाण्याचा झरा होता. त्याचं पाणी एका हौदात गोळा करून जास्तीचं पाणी पुढे सोडून दिलं जात होते. थोडा वेळ तिथे घालवला पण तो हॉट स्प्रिंग फारसा काही आवडला नाही. कोकणातील गरम पाण्याचे झरे त्या झऱ्याहून जास्त छान आहेत. झऱ्यापाशी जास्त वेळ न थांबता मी शेजारच्याच शेतात गेले. ज्वारी सारखं पीक दुरून दिसत होत, जवळ जाऊन पाहिलं तर खरंच ज्वारी होती. आणि सोबतीला गावरान भेंडी पण. थोडे फोटो काढून तिथून निघालो.  

5 Terre

ब्लॅक डेझर्ट

अर्ध्या पाऊण तासाने परत मुख्य रस्ता सोडून आम्ही वाळवंटात शिरलो. गाडी थांबवून मुस्तफाने टायर मधली हवा कमी केली. आणि मग कळालं कि आता मज्जा येणार आहे. एकापाठोपाठ वाळूच्या टेकड्यांवरून सॅण्ड ड्यून बॅशिंग करत निघालो. कधी वेगाने टेकडी चढून जायची आणि कधी दुप्पट वेगानी खाली उतरायची असं करत एक खिंडीत येऊन पोहोचलो. इथून दिसणारा नजारा फारच छान होता. उंचावर आम्ही, दोन्ही बाजूंना उंच भिंतींसारखे डोंगर आणि वाळूची घसरगुंडी. मऊसूत वाळू हातातून भुरुभुरु निसटून जायची. शूज आणि सॉक्स काढून तिथेच फतकल मारून बसलो. थंड वारा, उतरतीच्या उन्हाची उब, मऊशार वाळू सगळंच फार सुंदर होतं, आणि मुस्तफाने बोलावलं नसतं तर कदाचीत आम्ही तिथून हललोच नसतो. पण त्याच्याकडे दाखवण्यासारखं अजून बरंच होतं, आणि आम्ही बघण्यासाठी भुकेले होतो.

सूर्रर्रर्र करत गाडी त्या उतारावरून खाली आली आणि परत ड्यून बॅशिंग चालू झालं. आता सोबतीला बाकी पार्टीजच्या गाड्या पण होत्या. मुस्तफा आम्हाला एका उंच टेकडीवर घेऊन गेला. गाडीतून सॅण्ड बोर्ड काढला आणि त्याला साबणाने पॉलिश करून दिलं. म्हणाला तुम्ही खेळा, मी तोवर चहा बनवतो. सॅण्ड बोर्डिंग मध्ये घसरतांना जेवढी मजा येते, त्याहून जास्त वाट लागते तो बोर्ड घेऊन परत वर चढून यायला. मी कतार मधील Singing Sand Dunes वर याचा अनुभव घेतला होताच त्यामुळे मी यावेळी त्याच्या फंदात पडले नाही. पण नवरोबाने मात्र बऱ्याच वेळा ही चढाई केली. शेवटी थकलो आणि मुस्तफाने स्टोव्हवर बनवलेला चहा पिऊन गाडीत जाऊन बसलो. 

वाळवंटातून हेलकावे खात थोड्याच वेळात ओल्ड व्हाईट डेझर्ट मध्ये पोहोचलो. चुनखडीचे काही दगड इथे होते. थोडे फोटो काढले तोवर White Desert National Parkचे लोक तिकीट देण्यासाठी आले. हे स्वतः ४x४ मध्ये फिरत तिकिटे वाटत असतात. 

मुस्तफा आता घाई करू लागला होता, "लवकर चला नाहीतर इथेच मुक्काम करायला लागेल."अजूनही आमची गाडी वाळवंटातूनच चालली होती, पण आता वाळूच्या जागी कठीण खडक लागत होता. अजून एक टेकडी चढून गेलो. मुस्तफाने म्हणाला, "फ्लॉवर स्टोन. फ्लॉवर स्टोन". मी मनातल्या मनात भाषांतर केलं दगडफूल. पण तिथे दगडफूलासारखं काहीच नव्हतं. पण फुलांच्या आकाराचे छोटे छोटे काळे असंख्य दगड होते. इतके छान कि कोणी कारागिरी करून तसेच सोडून गेला असावा. आमच्या दगडं गोळा करण्याच्या सवयीला ओळखून यावेळी मुस्तफाने स्वतः पण मदत केली आणि तो कार्यक्रम अवघ्या दोन मिनिटात आटपला.

वेगात ती टेकडी उतरून खाली आलो ते थेट व्हाईट डेझर्ट मध्ये. जमिनीतून उगवून आल्यासारखे वाटणारे विविध आकारांचे चुनखडक दूरवर पर्यंत दिसत होते. कुठे ससा, कुठे कोंबडी, कुठे चेहरा तर कुठे आईस्क्रीम. आणि काही खडक एका बाजून पहाल तर बास्केट सारखे आणि दुसऱ्या बाजूने पाहाल तर अननसासारखे. शोधावं तेवढं कमी, बघावं तेवढं थोडं. आता सूर्यास्त झाला होता, आणि अंधार पडायला फार काही वेळ नव्हता. तरी तेवढ्यात मुस्तफाचं आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी दाखवणं चालूच होत. तो वाळवंटाच्या प्रेमात होता आणि आम्हालाही त्याच्या नजरेतून पाहतांना वाळवंट आवडू लागलं होतं. 

अंधार पडला आणि एका भागात त्याने गाडी थांबवली. "आपण आज इथेच मुक्काम करूया. मी कॅम्प लावतो तोवर तुम्ही फिरून या."
चहुबाजूने चुनखडक, मध्यभागी वाळवंटाचा छोटासा तुकडा आणि वर अथांग आकाश. कॅम्पिंग साठी परफेक्ट जागा निवडली होती मुस्तफाने. अंधुक प्रकाशात दिसणाऱ्या खडकांच्या आकाराचे अंदाज बांधत थोडावेळ फिरून परत येई पर्यंत, मुस्तफाचा सेटअप तयार होता. गाडीच्या शेजारी जेवणासाठी सतरंजी - गाद्या - छोटासा टेबल. त्यावर फळांचं ताट. एका बाजूला मस्त शेकोटी पेटवलेली होती आणि त्याच्या विस्तवावर जाळी घालून त्यावर मॅरिनेटेड चिकन भाजलं जात होतं, स्टोव्ह वर त्याने भात चढवला होता आणि भाज्या कापत बसला होता. त्याचा सगळा स्पीड पाहून आश्चर्यचं वाटलं. आम्ही फळं खात त्याच्या बाजूला बसलो. काही बाही विषय काढत त्याला बोलत करायचा प्रयत्न सुरु होता. पण तो कामात इतका गर्क होता कि आमच्या प्रश्नांना थोडक्यात उत्तरे देऊन तो शांत व्हायचा. भात उतरवून त्याने भाजीला फोडणी दिली. हे सगळं करतांना मात्र सिगारेट फुंकणं काही बंद नव्हतं केलं त्याने. एका मागोमाग एक अशा दिवसभरात किती शिलगावल्या असतील याचा हिशोब नाही. 

चिकन शिजलं आणि मुस्तफाने ताटं वाढली. 
मी: तू पण बैस ना आमच्या सोबत. 
मुस्तफा: नाही तुम्ही दोघे जेवा . मी करेन नंतर. 
नवरा: अरे ये रे. इथे बैस. आणि जेव आमच्या सोबत. 

मुस्तफाने पण वाढून घेतलं. जेवण खरंच खूप चविष्ट होतं. भात भाजी तर अप्रतिम लागतं होतं. 

मी: खूप छान बनवलं आहेस सगळं. चव आहे तुझ्या हाताला. 
मुस्तफा: थँक्स. १-२ वर्षचं झाली मी बनवतो आहे. नाही तर त्या आधी आई यायची सोबत जेवण बनवायला. 
मी: लग्न झालंय तुझं? 
मुस्तफा: हो. २ वर्षांपूर्वी. मुलगा पण आहे १ वर्षाचा. 
नवरा: अरे वा! आणि डेझर्ट कॅम्पिंग किती वर्षांपासून करतोयस?
मुस्तफा: १७ वर्ष होतील आता. 
नवरा: क्काय? म्हणजे १३-१४ वर्षाचा असल्यापासून येतोस पर्यटकांना घेऊन?
मुस्तफा: १२ वर्षाचा होतो तेव्हा पासून. सोबत आई असायचीच. मग आता मीच तिला म्हणालो कि तू घरी थांबत जा. मी बघेन. 
मी: छानच की!! मग तू बायको कडून शिकलास जेवण बनवायला कि आई कडून?
मुस्तफा: छे. बायकोला काही येत नाही माझ्या. आई खूप छान स्वयंपाक करते. तू माझ्या आईच्या हातचं जेवण चाखून पाहिलंस तर बाकी इजिप्त मधली जेवणं विसरून जाशील. 

मुस्तफा आता बोलू लागला होता. 
मी: मुलाचं नाव काय ठेवलंस?
मुस्तफा: अशुर. 
नवरा: ओह. आमच्या गिझा टूर साठी ज्याची गाडी केली होती त्याचं पण नाव अशुरच होत. चांगला माणूस आहे तो पण.

जेवण झालं आणि आम्ही शेकोटीच्या आजूबाजूला येऊन बसलो. गार वाऱ्याच्या झुळुका सुरु झाल्या होत्या त्यामुळे मुस्तफाने चहा बनवायला घेतला. आमच्या मध्येच बंद पडलेल्या गप्पा परत सुरु झाल्या. 

मी: तुझी वाळवंटातली एखादी आठवण सांग ना. 
मुस्तफा: आठवण अशी नाही काही. खूप वेगवेगळी माणसं घेऊन आलोय आजवर इथे. एक जण भारतीय पण होता. मला तसा तुमचा देश आवडतो, पण मी बरंच ऐकलं आहे तुमच्या देशाबद्दल. 
मी: जसं की?
मुस्तफा: स्त्रियांसाठी तुमचा देश अजिबात सुरक्षित नाहीये. मी बऱ्याच महिला पर्यटकांना इथे डेझर्ट मध्ये फिरायला आणलंय. त्यांतल्या बऱ्याच जणी हेच सांगत होत्या. तिथली माणसं एकटक बघत असतात. उगीच स्पर्श करायचा प्रयत्न करतात. 
मी: कधी होत असेल असं पण सगळीकडे अशी परिस्थिती नाहीये. (फार वाद नाही घालू शकले या मुद्द्यावर कारण कितीही नाही म्हणालात तरी हे होतच भारतात हे मी सुद्धा जाणून आहे). 

थोड्या शांततेनंतर मुस्तफानेच विषयाला सुरवात केली. 
मुस्तफा: पूर्वी युरोपातील खूप बायका यायच्या इकडे वाळवंटात. फक्त फिरायला नाही तर शरीरसुखासाठी. असं म्हणतात कि याबाबतीत इजिप्ती पुरुषाला कोणी मात देऊ शकत नाही (तो हसत हसत म्हणाला). मी स्वतः लग्नाच्या आधी हे सगळं करायचो, फार चांगले पैसेही मिळायचे मला. पण लग्नानंतर मात्र सगळं बंद करून टाकलं. आणि २०११ नंतर पर्यटकांचा ओघ आटला आणि सगळीकडूनच हे बंद झालं. 
नवरा: इस रेगिस्तान में काफी राज दफ़न है।
मी: याव्यतिरिक्त सत्तापालटाचा वाळवंटावर काय परिणाम झाला?
मुस्तफा: मुबारक फार चांगला माणूस होता. शहरापासून दूर राहणाऱ्यांसाठी फार चांगली काम करायचा. कैरो मध्ये फक्त काही लोकांना तो आवडत नव्हता. त्याच्यानंतर वाळवंटाकडे दुर्लक्षच झालं सगळ्यांचं. वाईट झालं २०११ नंतर सगळं. आमचे पर्यटक तर गेलेच, बाकी उरला रिकामटेकडेपणा. त्यामुळेच अशा सिगरेट मागून सिगरेट ओढायची सवय लागली. सोडायची आहे पण होत नाही. 
मी: पण हे तुझ्या आरोग्यासाठी नाहीये चांगलं. 
मुस्तफा: हो. सगळं माहित आहे. पण असंख्य प्रश्न आहेत समोर आणि उत्तरं कोणाकडेच नाहीत. रिकाम्या डोक्यात मग नाही ते विचार येतात. त्यावर मात करायला फक्त हिचा उपयोग होतो. आज इजिप्तमधील सगळे लोक याच एका कारणामुळे सिगारेटच्या आहारी गेलेत. असो, मी चहा बनवून ठेवलाय तुमच्यासाठी, लागेल तसा घ्या. मी जातो झोपायला. 
नवरा: तू नाही घेणार चहा?
मुस्तफा: नाही, झोपायच्या आधीची सिगारेट घ्यायची आहे मला आता. 

**********************************************************************************
बराच वेळ मोकळ्या आभाळाखाली निवांत पडून होतो. मुस्तफाने सांगितलं होत कि कोल्हे येतात रात्री त्यांच्या भीतीने नवऱ्याने शेकोटीचं विझत आलेलं एक लाकूड जवळ घेऊन ठेवलं. हळू हळू रात्रीची गुंगी चढू लागली आणि आम्ही टेन्ट मध्ये जाऊन पडलो.
रात्री अडीचच्या सुमारास नवऱ्याने 'ए उठ ना पटकन' म्हणत जागं केलं. मला वाटलं कोल्हा आला असेल पण कोल्हा तर नव्हता आला पण आकाशने रुपडेच पालटले होते. आकाशगंगा डोक्यावर आली होती. चंद्र कधीच मावळला होता त्यामुळे तारे अधिकच प्रखर भासत होते. हजारो लाखो दिवे पेटलेले जणू. एक एक नक्षत्र ओळख दाखवू लागले. उत्तरेला वृश्चिकाचा आकडा दिसू लागला होता तर कुठे कृतिकेचा पुंजका दिसत होता. अधूनमधून उल्का पडत होत्या. आकाशात जणू जल्लोष सुरु होता. आपल्या आजूबाजूच्या बऱ्याच गोष्टींना आपण कायम गृहीत धरतो आकाश हे त्यापैकीच एक याची जाणीव तेव्हा झाली.   

पहाटे ५:३० वाजता सूर्योदयाच्या थोडावेळ आधी जाग आली. आकाश गुलाबी झाले होते. काल सूर्यास्ताच्या वेळी पाहिलेलं व्हाईट डेझर्ट आता अजूनच कमाल दिसत होतं. जणू सहारा वाळवंटाच्या मधोमध बर्फवृष्टी झाली आहे. किंवा थेट चंद्रावर पोहोचलो आहोत आम्ही. सूर्योदय पाहत पाहतच नाश्ता उरकला. ब्रेड, बटर, जॅम आणि मस्त पुदिना घातलेला चहा. 

दीड तासाचा परतीचा प्रवास करून बहारियाला पोहोचलो. कैरोला जाणारी बस उभी होतीच. आमचं तिकीट काढून सामान लावून मुस्तफा निघायच्या तयारीत होता. त्याच्या सोबत फार छान वेळ गेला होता. मस्त गप्पा पण झाल्या होत्या. "तुझ्या मुलासाठी ठेव" असं सांगत बळंच त्याच्या हातात काही नोटा कोंबल्या. तोही जातांना समाधानी होता आणि आम्हीही. मरूद्यानातील हि सफर सार्थकी लागली होती. 


क्रमशः

प्रतिक्रिया

पद्मावति's picture

30 Sep 2019 - 2:14 am | पद्मावति

वाह...फारच सुरेख सफर आणि वर्णन.

कोमल's picture

30 Sep 2019 - 8:18 pm | कोमल

धन्यवाद पद्मावती

आवडला हा भाग. वाळवंटाचं दर्शन आवडलं.

कोमल's picture

30 Sep 2019 - 8:18 pm | कोमल

धन्यवाद यशो

अनिंद्य's picture

30 Sep 2019 - 10:25 am | अनिंद्य

खूबाँ है ये सफर !
हा भागही आवडला.
फोटो फक्त मलाच दिसत नाहीत की काही प्रॉब्लेम आहे ?

कोमल's picture

30 Sep 2019 - 8:20 pm | कोमल

अनेक धन्यवाद!
मी इनकोग्निटो मध्ये तपासून पाहिलेले सगळे फोटो आणि धागा पण.
मला तर नीट दिसले होते.

एकही फोटो दिसेना का?

यशोधरा's picture

30 Sep 2019 - 8:25 pm | यशोधरा

दिसतायत.

सुधीर कांदळकर's picture

30 Sep 2019 - 11:05 am | सुधीर कांदळकर

जेवण पाहूनच भूक लागली. काळे, पांढरे दोन्ही वाळवंटे सुंदर. गाणेही आवडले. सॅण्ड ड्यून बॅशिंग चा व्हीडीओ पाहावासा वाटला. पुलेशु. धन्यवाद.

कोमल's picture

30 Sep 2019 - 8:22 pm | कोमल
कोमल's picture

30 Sep 2019 - 8:23 pm | कोमल

अनेक आभार!

काही व्हिडीओ आहेत. मी एडिट करून टाकायचा प्रयत्न करत आहेच.
पण फोन वर काढलेले असल्याने क्वालिटी फार चांगली नाहीये.

Missed GoPro

श्वेता२४'s picture

30 Sep 2019 - 11:22 am | श्वेता२४

खुप छान चालली आहे लेखमाला.

कोमल's picture

30 Sep 2019 - 8:24 pm | कोमल

धन्यवाद श्वेता _/\_

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Sep 2019 - 2:35 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर सफर ! मस्तं फोटो !

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Sep 2019 - 2:36 pm | डॉ सुहास म्हात्रे

सुंदर सफर ! मस्तं फोटो !

कोमल's picture

30 Sep 2019 - 8:26 pm | कोमल

आभारी आहे _/\_

जालिम लोशन's picture

30 Sep 2019 - 5:45 pm | जालिम लोशन

लेबलमुळे फोटो झाकले गेलेत.

ओह. पुढल्या धाग्याच्यावेळी लक्षात घेते.
प्रतिसादाबद्दल आभार

प्रचेतस's picture

1 Oct 2019 - 8:33 am | प्रचेतस

हा भाग खूपच जबरदस्त झालाय. बहारियाबद्द्ल ह्याआधी फारसं ऐकलं नव्हतं. वर्णन आणि फोटो सुरेख.

कोमल's picture

1 Oct 2019 - 9:11 pm | कोमल

धन्स वल्ल्या.
वेळ काढून नक्की बघावं असं ठिकाण आहे. तिथला अनुभव वेगळाच आहे.

उपेक्षित's picture

1 Oct 2019 - 2:08 pm | उपेक्षित

मालिकेच्या शेवटी सविस्तर प्रतिसाद देणार होतो पण हा भाग वाचून राहवलेच नाही, अत्यंत सुंदर लिहिले आहे या भागात खास करून मुस्तफा बद्दल.

कोमल's picture

1 Oct 2019 - 9:14 pm | कोमल

अनेक आभार उपेक्षित.
इजिप्त मध्ये भेटलेल्या 3 मुस्तफांपैकी हा एक. बाकी दोघे भेटतीलच पुढील भागात.

सोन्या बागलाणकर's picture

4 Oct 2019 - 4:22 am | सोन्या बागलाणकर

निव्वळ अप्रतिम!
सुरेख चाललीये लेखमाला. अजून येऊ द्या.