लाखाची गादी .

Primary tabs

Sanjay Uwach's picture
Sanjay Uwach in जनातलं, मनातलं
3 Sep 2019 - 9:27 pm

लाखाची गादी .
( कृपया वाचकानी लेखाच्या तांत्रीक बाबी कडे न पहाता, निव्वळ एक काल्पनिक विनोदी किस्सा म्हणून हा लेख वाचावा ही विंनती आहे. )
आज रविवारचा दिवस, म्हणजे सुट्टीचा दिवस. सकाळी उठून बायकोच्या हातचा गरमागरम चहा पीत बसलो होतो . इतक्यातच माझ्या भ्रमणध्वनीतुन पोपट शिळा घालू लागला . मनांत म्हटले आता सकाळी सकाळी कोण हा पोपत आहे कुणास ठाऊक ?
हॅलो बोला , कोण बोलताय !!
"आरे , संजू काय ? गुडमार्निंग ss ,गुडमार्निंग ss आरे!! मी सुरेश बोलतोय ,तुझा शाळेतील बालमित्र" .
"सुरेश ss , कोण?" माझ्या एकदम लक्षात येईना . "आरे ! सुरेशss कोण, लक्षात येईना , कदाचीत समोर समोर आल्यावर माझ्या लक्षात येईल" .
आरे ! असे काय करतोस मर्दा ,"पाचवीत असताना, परीक्षेच्या वेळी उत्तर पत्रिकेतील उत्तरे एकमेकांना दाखवताना, जोशी बाईंनी आपल्या दोघांना पकडले नव्हते का !! लक्षात आले ना .
हां ! हां ! आले लक्षात , आता त्यांनी सांगितलेली माझी ही ओळख माझ्या साठी पुरे होती.
"बर मी आज तुला तुझ्या घरी भेटायला आलो तर चालेल का ?"
"ये ये ,घरी ये, मी तुझी वाट पाहीन,भेटल्यावर बोलू" म्हणत मी फोन ठेवला . हे खरे आहे कि सुरेश माझ्या वर्गात होता . लहान पणी शाळेत शिकत असताना अनेक माझ्या वयाची मुले माझ्या बरोबर शिकत होती, तर यातील कांही मुले खरोखरच माझ्या जिवाभावाचे मित्र झाले होते .त्य़ा वेळी मला असे का वाटत होते कुणास ठाऊक, कि या माझ्या मित्रांच्या शिवाय मी राहूच शकणार नाही. पण वेळ हा असा कांही चमत्कारिक जादूगार आहे कि त्याचा नूर कायम बदलत असतो . शाळेतील हे मित्र काळाच्या ओघात कुठे हरवले कुणास ठाऊक, आणि त्यांची जागा कॉलेजच्या मित्रांनी घेतली ,ते मित्र पण कालानुसार कुठे हरवले आणि त्यांची जाग नविन मित्रांनी घेतली ,पुढे मात्र हे असेच चालू राहिले .असो !!
कांही वेळातच सुरेश मला भेटायला घरी आला . मी पण त्याचे आनंदाने स्वागत केले .जुन्या ओळखी ,आठवणी या वर गप्पा चालू झाल्या . "चंब्या (आमचा आणखीन एक वर्ग मित्र .चंद्रकांत बाबुराव उर्फ चंब्या) कडून तुझा पत्ता व फोन मिळाला , आली आठवण म्हटले आज भेटावेच . नाहीतरी आपण डियर आणि नियर लोकांनी वास्तविक वारंवार भेटायलाच हवे ! "
"बोल सुरेश , आणखीन काय खबरबात ."सद्या तू आता काय करतोस ? "
"कॉलेज झाल्यावर मी मार्केटिंग लाईन पकडली . बाजारात लोकांच्या उपयोगाचे अनेक प्रॉडक्ट मी लोकांच्या साठी घेऊन येतो आणि निःस्वार्थी पणाने त्यांना विकत असतो. परवा चंब्या कडे गेलो होतो आणि तुझा विषय निघाला, चंब्या सांगत होता , तू आता फार मोठा माणूस झाला आहेस म्हणे , व्यवसायात भरपूर पैसे कमवतो आहेस म्हणे ." तसे लगेचच तुझ्या साठी एक मस्त प्रॉडक्ट माझ्या डोळ्या समोर उभा राहिला . तो प्रॉडक्ट तू बघितलास ना ,तर जन्मभर तू माझे आभार मानशील . फारच अभूतपूर्व अशी ती वस्तू आहे . तुला जिवनात नवीन संजीवनी मिळाल्या शिवाय राहणार नाही. "
आरे !! सांगतरी असा कोणती संजिवनी तू माझ्या साठी घेऊन आला आहेस ?"
मी आज तुझ्या साठी एक अभूतपूर्व अशी गादी आणली आहे . हि कांही साधीसुधी गादी नाही बर ! तू या गादी वर फक्त वीस मिनीटे रोज झोपायचे . या गादीत बसवलेल्या चुबकीय चकत्या ,तुझ्या शरीरातील सर्वच्या सर्व रोग शोषून घेतील . परदेशातील फार मोठ्या शास्त्रज्ञानी ह्या गादीवर संशोधन करून हि गादी बनवली आहे . कँन्सर असो ,डायबिटीस असो ,ब्लडप्रेशर असो ,किंवा इतर कोणताही रोग असो फक्त आणि फक्त वीस मिनीटे यावर रोज झोपले, म्हणजे झाले . यात असे कांही चुंबकीय सेन्सर बसवले आहेत कि त्याच्या आकर्षणाने माणसाचे निगेटीव्ह विचार नष्ट होतील व पॉसिटीव्ह विचार शक्ती वाहू लागते . तुम्ही कधी वृद्ध होणार नाही .एवढेच नाही तर पती पत्नी मधील संबध देखील या गादी मुळे मधुर राहतीत . केस कधीही पांढरे होणार नाहीत किंव्हा डोक्याला टक्कल देखील पडणार नाही .डोळ्याला चष्मा लागणार नाही .फार मोठे संशोधन आहे बरे या गादी मागे . नाहीतर रोज पहाटे उठा, कसल्या कसल्या दाडीवाल्या बाबांची टीव्ही वरील प्रवचने ऐका, ते नाकाने घ्यायचे मोठे श्वास नाहीत कि उश्वास नाहीत .पोट फुगवण्याचे कींव्हा आत ओढण्याचे प्रकार नाहीत कि त्या मुळे सुटणारे गॅस नाहीत .एक सत्तर वर्षांच्या वृद्ध गृहस्थानी हि गादी माझ्या कडून आवर्जून मागून घेतली होती .ते रोज तास भर या गादी वर झोपतात . म्हातारा कसा आगदी टणटणीत खारके सारखा झालाय . मोठं मोठ्या लोकांनी तर हि गादी घेण्या साठी झुंबड उड्वली होती . यात मोठे डाँक्टर होते ,वकील होते ,राजकीय मंडळींनी तर गादी मिळण्या साठी वरून वशिला आणला होता . हि गादी पाहिल्या पाहिल्या ,एकदम तू माझ्या डोळ्या समोर आलास . मुख्य अधिकाऱ्यांच्या कडे माझा चांगलाच वशिला असल्या मुळे मी भांडून भांडून तुझ्या साठी हि एक गादी मी माझ्या गाडीतून घेऊन आलोय बघ .
बऱ्याच कालावधी नंतर भेटलेला माणूस आपल्या बद्दल इतक्या आपुलकीने,मोठ्या सलगीने बोलू लागल्या मुळे ,मला देखील हा प्रकार कांहीसा विचीत्रच वाटला . हे त्याचे लांब सडक प्रवचन ऐकल्या नंतर ,मी त्याला मोठ्या कुतूहलाने विचारले की "आरे ! तुझ्या या अभूतपूर्व गादीची किंमत किती आहे ते तरी सांग ?''
"किंमतीचे काय घेऊन बसला आहेस मित्रा ,यातून आपल्याला मिळणारे फायदे बघ . या गादीची तसे म्हंटले तर किंमत एक लाख पंचवीस हजार इतकी आहे पण मी आमच्या साहेबांच्या बरोबर हुज्जत घालून, तुझ्या साठी मुद्दाम ,ना नफा ना तोटा या तत्वावर एक लाख रुपयाला मागून आणली आहे . आता आपल्या जवळच्या मित्रा साठी एवढं करायला नको काय ?अरे ,मला तुला कायम अरोग्य संपन्न बघायचे आहे .
त्यानें सांगीतलेली गादीची किंमत ऐकून मी टssण करून उडालो . एक लाख रुपयाची गाssदी . चांगला शेवरीचा कापूस घालून दहा वेळेस पिंजून त्याची पंचवीस किलोची जरी गादी केली तर फार फार सात ते आठ हजार रुपये होतील, मग हि असली कसली लाख रुपयाची गादी. एवढी महागडी गादी मला कशी काय परवडेल .परवा कसल्या काचेच्या कोकरी साठी बायकोने पंधरा हजार रुपये मागितले होते .मी नाही म्हणालो .चांगले चार दिवस चहा घेताना चहाचा कप आणि जेवताना जेवणाचे ताट ,ती माझ्या समोर आणून आपटत होती .तिला हे जर का कळले कि मी हि महागडी लाख रुपयाची गादी घेतली आहे, तर माझी काय खैर नाही.पण नाण्याला देखील दुसरी बाजू असतेच ना !! माझ्या मनात असा दुसरा विचार आला, कि हि गादी आपण घ्यायला काय हरकत आहे,याचे इतर अनेक फायदे देखील आपल्याला आहेतच ना . नाहीतरी आईची गुढघे दुखी,माझी कंबर दुखी या वर इलाज करण्या साठी आजपर्यंत हजारो रुपये खर्च झालेच आहेत आणि सुरेश म्हणतो त्या प्रमाणे पती -पत्नीतील सबंध मधूर राहणार असतील, तर हि किंमत कांही सुद्धा नाही .
मी त्याला असे सांगितले, मित्रा !मी तुला आज एक लाख रुपयाचा चेक देतो, पण याची किंमत तू आमच्या घरातल्याना सांगू नकोस .कुणी तुला या संबधी विचारले कि तू सांग, मी याला प्रायोगिक तत्त्वावर ही गादी फुकट दिली आहे आणि त्याने हे मान्य देखील केले . चेक घेतल्या नंतर त्याने आपल्या गाडीतून हि गादी आमच्या ड्रॉईंग हॉल मध्ये आणून ठेवली आणि बाय बाय म्हणत तो निघून गेला .
हि गादी पाहून घरातील सर्व मंडळीना अश्चर्य वाटले . सर्वात प्रथम आईच्या हस्ते या गादीचे उदघाट्न करावे असे मला फार वाटले . ती हि गुढगा दुखणे ,रक्तदाब या सारख्या अनेक व्याधी मुळे फार त्रस्थ होती . सगळ्यांना मी या गादी विषई माहिती दिली व आईला त्यावर वीस मिनीटे झोपण्यास सांगीतले, पण ती कांही केल्या तयार होईना . मग पत्नीला त्यावर झोपण्यास सांगितले ,तसे ती म्हणाली "आपल्या घरातील सर्व मंडळी जहागीरदार आहेत. सकाळी पाच वाजल्या पासून ते रात्री झोपे पर्यंत तुमच्या घरातील सर्वांची कामे करता करता मला भरपूर व्यायाम होतो .या मुळेच माझी तब्येत अगदी ठणठणीत राहते .मला असल्या गादीची फिदीची मुळीच गरज नाही आणी मी पाच मिनीटे या गादीवर झोपले तर ते तुम्हांला बघवणार आहे का ?" असे म्हणून तिने देखील यातून आपले अंग काढून घेतले . मग इरूनफिरून मी आणी माझी लहान मुले एवढेच लोक राहिले . सगळ्यांनी मला झोपायचा अग्रह केला .तो पर्यंत माझी लहान मुले सोनू आणि चिमणीने या गादी वर जोर जोरात उड्या मारायलाच सुरवात केली . नंतर नंतर तर कोच वर चढून ती गादीवर उड्या मारु लागली . मला भीती वाटू लागली ,यांच्या ह्या असल्या जोर जोरात उड्या मारण्याने यातील चुंबकीय शक्ती संपुष्टात येते कि काय. मग मला राहवेना . "अरे! हि काय तुमची ज्यूडो कराटे खेळायची गादी नाही . हि औषधी गादी आहे .फार फार तर यावर शांत झोपा व मनाचा आनंद घ्या" असे म्हटंल्या वर मुलांनी छातीवर झोपून गादीवर पोहण्याचे प्रात्यक्षिक चालू केले .या सर्व कसरतीने त्यांचे कपडे देखील घामाने ओलेचिंब झाले . ह्या मुलांचा हा सर्व प्रकार पाहून एक गोष्ट माझ्या लक्षात आली कि सुरेशने सांगितल्या प्रमाणे या गादीत निश्चितच कांहीतरी जादू असणार ,त्या शिवाय हि मुले एखाद्या भूता प्रमाणे इतकी उत्साहीत होणार नाहीत . हि गादी कुणाला का नाही आवडेना ,माझ्या छोट्या मुलांना मात्र खुप आवडली .
आता या गादीवर झोपून पहाण्याचा माझा नंबर होता . हळूच हात पाय लांब करून मी या गादीवर थोडा विसावलो .अग्नी दिव्यातून बाहेर पडलेला धन्वंतरी मला खुणावतो आहे, असे मला उगीचच वाटू लादले . आज मी माझ्या सर्व नातेवाईकांच्यात श्रीमंत असल्यासारखे मला वाटू लागले . पण या गादी बद्दल इतक्यात कुणाला सांगायला नको ,याचे परिणाम सुरु झाले कि मग सांगू . मी हात पाय वर करून हलवल्या मुळे मला जरा बरे वाटू लागले, तसे आई नाकाला पदर लावून आतल्या आत हसू लागली . मला राग आला . "आई हसायला काय झाले ग ?"
"कांही नाही रे ,तुझे हे स्वछंदी पणाने हात पाय हलवणे पाहून , मला लहानपणी पाळण्यात झोपलेले कुकुले बाळ आठवले .अंगावर फक्त धुपटे नाही एवढाच काय तो फरक . "
आता मी काय बोलणार ?
ह्या गादी बद्दल आजूबाजूंच्या लोकांना किंव्हा शेजारच्यांना अजिबात सांगू नका असे मी बजावून सांगितले होते. पण आमच्या बायकोच्या तोंडात कुठलीही गोष्ट गुप्त राहील तर शप्पत . तिने सगळ्यांना किंमती सगट या गादीचे वर्णन ऐकवले . शेजारी पाजारी सर्व लोक हि गादी बघायला येऊ लागले . एकदा तर रविवारी दुपारी दोन वाजता बेल वाजली तसा मी दरवाजा उघडला बघतो तर शेजारचे वसंतराव . "'काय हो वसंतराव ,कसे काय येणे केलेत ? त्यावर ते म्हणाले
"नाही म्हटंल कंबर लई दुखायला लागलिया . म्हंटल तुम्हच्या गादीवर तास भर झोपून जावं . सगळं उपाय करून बघितल ,आता या गादीचा तरी गुण येतोय का ते बघावं म्हंटल .
कालांतराने या गादीवर कोणी झोपायला तयार होईना .कधीतरी मीच या गादीवर हात पाय लांब करून, शवासन घातल्या प्रमाणे डोळे झाकुन, सकाळी झोपून उठल्यावर परत झोपत असे . हळूहळू मला जाणवू लागले, या स्पंजच्या कमी जास्त जाडीच्या गादी मुळे माझी कंबरदुखी कमी होण्या ऐवजी वाढू लागली आहे . या बिन कामाच्या गादीवर मला झोपलेला पाहून पत्नी पण नाराज होऊ लागली . आईने तर सुरेशच्या नावाने लाखोल्या चालू केल्या . "त्या मेल्याला सांग हि गादी घेऊन जा म्हणून .घरात काय आधीच अडचण कमी आहे होय ?"हळू हळू या गादीचे महत्व कमी होऊ लागले .सुरेश राव आऊट ऑफ रीच . आपण चांगलेच गंडलो याची मनाला सारखी खंत वाटू लागली .
मी कांही चांगला सेल्समन नाही, पण म्हंटल एखादा प्रयत्न करून बघावा, हि गादी कोणी विकत घेतो का ते पहावे. मी माझ्या दुसऱ्या एका मित्राला फोन केला .त्याची आर्थिक परिस्थीती चांगली होती आणि असल्या नवनवीन गोष्टी घेण्याची त्याला आवड हि होती .सुरेशने सांगितलेले सर्व फायदे मी त्याला सविस्तर पणे समजावून सांगितले व गादी घेण्याची विनंती केली .इतकेच काय पण, एक लाख रुपयाची गादी मी फक्त पन्नास हजार रुपयाला द्ययला तयार आहे ,हे पण सांगितले . त्याने माझे हे बोलणे निमूट पणे ऐकले व तो म्हणाला "काय सांगू संजू ,तुझ्या सारखे मी पण हि गादी घेऊन फसलो आहे . वास्तविक मी हि गादी माझ्या वडिलांच्या साठी घेतली होती ,पण बिचारे फक्त महिना भरच यावर झोपले असतील "
"मग आता त्यांची तब्येत कशी आहे ?'' मी
आठ दिवसा पूर्वी त्यांना देवाज्ञा झाली . मी पण माझी गादी खपवण्याचा प्रयत्न करणार आहे .तुझ्या कडे कोणी गिराईक असेल तर मला सांग .मी माझी हि गादी फ़्क्त दहा हजार रुपयाला देखील द्ययला तयार आहे.
एक दिवस हि गादी मला नेहमीच्या ठिकाणी दिसेना म्हणून मी आईला विचारले "आई गादी कुठे आहे ?"त्यावर ति म्हणाली "आरे ,आज मी टेरस वर सांडगे घालणार होते ना ,पण मला प्लॅस्टीकचा मोठा कागद कांही मिळेना . म्हटलं या गादीचा निदान एवढा तरी उपयोग करून घ्यावा "
मला पण क्षणभर बरे वाटले .माझी आई खरोखरच किती दुरदर्शी व चौकस आहे याचा मला प्रत्येय आला . चला कांही का असेना निदान या गादीचा इतका तरी उपयोग झाला हे पाहून माझे मन भरून आले

विनोदलेख

प्रतिक्रिया

महासंग्राम's picture

4 Sep 2019 - 11:23 am | महासंग्राम

भारी

प्रकाश घाटपांडे's picture

4 Sep 2019 - 4:34 pm | प्रकाश घाटपांडे

मला एक असा विज्ञान महापदवीधर मित्र भेटला होता. कंपल्सरी ते अरोरा टॉवरचे ब्रेन वॉशिंग सेशन अटेंड करायला भाग पाडले. माझ्यावर त्याचा ढिम्म परिणाम झाला नाही. फुकट दिली तरी घेणार नाही म्हटल.

सुबोध खरे's picture

5 Sep 2019 - 11:57 am | सुबोध खरे

माझ्याकडे पण एक ओळखीचा माणूस या गादीबद्दल जोरदार तारीफ( विक्रीसाठी) करत होता.

मी त्याला विचारले या गादीतील चुंबके किती गॉस शक्तीची आहेत आणि त्यांच्या चुंबकीय ध्रुव वृत्तांची रचना कशा तर्हेने केली आहे ते जरा सांगता का?

यावर त्याला झीट आली.

माझ्या एका मित्राने तर अशाच एका शहाण्याला हि चुंबके वापरल्याने लिंग उत्थानात अडथळा( ERECTILE DYSFUNCTION) येतो असा रिपोर्ट आला आहे असे सांगून चक्रावले होते.

जॉनविक्क's picture

5 Sep 2019 - 12:20 pm | जॉनविक्क

ही लाखाची गादी प्रकरण किमान 20वर्षे जुने आहे. MLM आहे.

चामुंडराय's picture

6 Sep 2019 - 5:15 am | चामुंडराय

हो, हे २० वर्षे जुने मलम आहे.
मला एक नातेवाईक गळ घालत होता. ह्या गादीवर झोप खूप छान येते वगैरे. गादीसाठी एक लाख घातले तर मला झोपच येणार नाही म्हटल्यावर चेहरा पडला बिचाऱ्याचा कि हा मासा काही गळाला लागणार नाही.

हो, वीस वर्षे जुने प्रकरण.
"मानसिक रोग बरे होतात का यावर झोपून?"
"नाही."
"मग उपयोग नाही. "
"तुमचं फार नेगटीव थिंकिंग आहे" सांगत तो निघून गेला.

प्रकाश घाटपांडे's picture

6 Sep 2019 - 10:55 am | प्रकाश घाटपांडे

"तुमचं फार नेगटीव थिंकिंग आहे" हे अगदी टिपिकल वाक्य असत त्यांच.

हि घटना जुनी आहे हे मान्य, म्हणुनच आधी तांत्रिक बाबी कडे दुर्लक्ष करण्याची विनंती केली आहे. शहरी लोक चौकस असल्या मुळे,या लोकांनी आता निमशहरी किंव्हा ग्रामीण भाग पकडला आहे. गादीच्या ठिकाणी अन्य गोष्टी आल्या आहेत. सागवानी झाडे, भरमसाठ व्याज देतो म्हणुन सांगणा री भिशी मंडळ, जुन्या मोटारसायकल वगैरे वगैरे. वर्तमानपत्र उघडले तर रोज अशी एक तरी घटना आहेच.