प्रेम 1

Primary tabs

लाल गेंडा's picture
लाल गेंडा in जनातलं, मनातलं
19 Jul 2019 - 5:37 pm

त्याच तिच्यावर खूप प्रेम होतं. ती छान, छोटीशी, त्यांच्यासारखी न फुगलेली, पण कणखर. तिचा तो मोहक तेजस्वीपणा, डौलदार चाल. तिची बाबांभोवतीची प्रदक्षिणा त्याच्या आधी पूर्ण व्हायची. कस जमायचं तिला कोणास ठाऊक.

पण बाबांनी मर्यादा घालून दिल्या होत्या सगळ्यांना. आणि बाबाविरुद्ध जायची कोणाचीच हिंमत नव्हती. तो सगळ्यात मोठा तर ती शेवटच्या भावंडांपैकी. अधून मधून तो भांडायचा बाबांशी, पण तेवढ्यापुरते.

एकेदिवशी बाबांनी त्याला त्याचे काम सांगितले. ती आता नवनिर्मिती करणार होती. तिच्या त्या नवनिर्मितीमध्ये अडथळा न येऊ देण्याची जबाबदारी त्याची होती.
त्याचे उरलेले लहान भाऊ आणि बहिणी तिच्या आजूबाजूला पसरल्या. तो सगळ्यात मोठा आणि आडदांड, बाबांची जणू प्रतिकृती. त्याच काम होत की त्याच्या मर्यादेबाहेर असणाऱ्या भावांना मदत करणं आणि त्यांच्यावर लक्ष ठेवणे. त्यांच्या कचाट्यातून सुटणारे शत्रू तिच्यापर्यंत न पोचू देणें. त्याचवेळेला बाबांबरोबर सगळ्यांचा समतोल राखणे. कुटुंब वाढत होत आणि वाढणार होत. त्याने बाबांकडे ताठ मानेने बघितलं. बाबांच्या त्या कठोर नजरेत त्याला पहिल्यांदा एक माया आणि क्लेश जाणवला. त्याला आज बापाचं हृदय कळलं जणू.

त्याने आपल्या त्या नवनिर्मितीत गुंग असणाऱ्या छोट्या बहिणीकडे बघितलं, तिचे प्रयोग चुकत होते. त्याला हसायला आलं. हुशार लोकं जरा तिरसट असतात हे त्याने ऐकलं होतं, ते त्याला आठवलं. त्याने डोळेभरुन तिच्याकडे पाहिलं आणि तो त्याच्या जागी गेला.

सगळे आपापल्या जागी रुजू झाले.
तिची नवनिर्मिती सफल होऊ लागली होती.
शत्रू भोवताली जमू लागले होते.

पहिला वार भयानक होता.
तो त्यावेळेस विरुद्ध बाजूला होता. पण त्याच्या नंतर आत असणाऱ्या भावानी तो हसत हसत अंगावर झेलला. ती सगळ्यांचीच लाडकी होती.
त्या घावानी तो छिन्नविच्छिन्न झाला पण त्याने कडं तुटू दिलं नाही.
त्याने स्वतःला सावरलं आणि तो सिद्ध झाला. आता खरा हल्ला होणार होता. आणि तसा तो झाला. त्याच दुःख, त्याचा राग, त्याने सगळा समोरच्या युद्धात ओतला.

ते धूर सोडत येणारे अग्निगोल, ते दिसायलाही छोटे असणारे विषगोळे, आडदांड, महाकाय अस्त्र, त्याने लीलया झेलली आणि परतावली. काहींना त्याने स्वतःशी गुंतवून ठेवायचं कसब शोधलं आणि ते बाहेरच्या भावाना पण शिकवलं. त्याच्या कचाट्यातून सुटणाऱ्याना मार्गविचलीत कसं करायचं हे तो बाबांकडून शिकला. बाबा होतेच बघत लांबून.

नवनिर्मितीचा तिचा तो ध्यास फळाला आला. छोट्या छोट्या बीजांकुरांनी रुजवात घेतली.

त्यांचं बाहेर युद्ध अविरत चालूच होत.

अंकुर वाढले आणि नवनिर्मिती सफल झाली.

पण यांना कोणालाच शांतता नव्हती. शत्रू अनंत होते. तिच्यासाठी सगळ्यांनी ते युद्ध स्वीकारले होते.

या सगळ्या विचारात असताना एक कपटी अग्निगोल त्याला चुकवून निसटायचा प्रयत्न करत होता. त्याने हलकेच ,आळसटपणे हात हलवला. इतक्या वर्षांनी त्याला कसब अंगभूत झाली होती. तो निसटू पाहणारा आता त्याचा गुलाम होता. त्याने परत एकदा डोळेभरून आपल्या त्या गुंग बहिणीकडे बघितलं आणि लक्ष दुसरीकडे वळवलं.

इकडे पृथ्वीवर, वर्तमानपत्राच्या दुसऱ्या पानावर बातमी झळकली.

"गुरूच्या कक्षेत अजून एका धुमकेतूचा शोध".
"हा धूमकेतू पृथ्वीच्या जवळून जाणार".
"शतकातला सगळ्यात तेजस्वी धूमकेतू".

कथालेख

प्रतिक्रिया

आनन्दा's picture

19 Jul 2019 - 7:32 pm | आनन्दा

वा वा.. मस्त

डॉ सुहास म्हात्रे's picture

19 Jul 2019 - 8:00 pm | डॉ सुहास म्हात्रे

मस्तं कल्पना !

इरामयी's picture

19 Jul 2019 - 11:19 pm | इरामयी

+१

पद्मावति's picture

20 Jul 2019 - 1:52 am | पद्मावति

मस्तंच.

मनिम्याऊ's picture

20 Jul 2019 - 3:55 pm | मनिम्याऊ

मस्त कल्पना

जॉनविक्क's picture

20 Jul 2019 - 4:30 pm | जॉनविक्क

जालिम लोशन's picture

24 Jul 2019 - 11:58 am | जालिम लोशन

छान

विनिता००२'s picture

24 Jul 2019 - 4:16 pm | विनिता००२

सुरेख!!

उपेक्षित's picture

24 Jul 2019 - 5:56 pm | उपेक्षित

लय भारि दादा

Namokar's picture

24 Jul 2019 - 7:19 pm | Namokar

छान

नाखु's picture

24 Jul 2019 - 8:27 pm | नाखु

कल्पना विस्तार