पुरुष जननेन्द्रियाचे यशस्वी प्रत्यारोपण : अभिनंदन !

कुमार१'s picture
कुमार१ in जनातलं, मनातलं
30 Apr 2018 - 12:19 pm

गेल्या अर्धशतकात शरीरातील अनेक अवयवांचे प्रत्यारोपण यशस्वी करण्यात वैद्यकशास्त्राला यश आलेले आहे. हृदय, मूत्रपिंड, यकृत, नेत्रपटल, त्वचादि अवयवांची प्रत्यारोपणे आता नियमित होत असतात आणि सामान्यजनांना ती परिचित आहेत.

हृदय, मूत्रपिंड आणि यकृत यांचे प्रत्यारोपण हे एखाद्या रोग्याच्या जीवनमरणाशी थेट संबंधित असते. या दृष्टीकोनातून आता पुरुषाच्या जननेंद्रियाकडे बघूया. त्या अवयवाचा गंभीर कर्करोग झाल्यास अथवा ते एखाद्या गंभीर अपघातात नष्ट झाल्यास तो त्या पुरुषासाठी फार मोठा धक्का असतो. संबंधित भागाच्या डागडुजीनंतर तो रुग्ण जिवंत राहू शकतो पण त्याच्या पुढील आयुष्यातील ‘पुरुषार्थ’ संपलेला असतो. अशा या जिवंत ‘जखमी’ अवस्थेत आयुष्य कंठणे किती वेदनादायक असते याची कल्पनाच केलेली बरी.

त्यामुळे या महत्वाच्या अवयवाचे देखील प्रत्यारोपण करता येईल का यावर गेले दशकभर प्रयत्न वैद्यकविश्वात चालू आहेत. नुकतेच अशा एका भगीरथ प्रयत्नाला यश आलेले आहे. याच आठवड्यात याची बातमी आपल्यातील अनेकांनी वृत्तमाध्यमात वाचली असेल. २६/४/२०१८ ला ही बातमी प्रसृत झाली आहे. Reuters या वृत्तसंस्थेकडून ती जाहीर झाली आहे. माझ्या मोबाईलवर ती येऊन धडकली होती. बातमीचा तपशील, संबंधित डॉक्टरांच्या चमूचा फोटो आणि अमेरिकेतील रुग्णालयाचे नाव हे सर्व पाहता ती विश्वासार्ह वाटली होती. आज मी तिची अधिकृत वैद्यकीय संस्थळावरून खातरजमा केली आहे आणि त्यानंतरच इथे लिहीत आहे. सामान्यजनांच्या माहितीसाठी त्याचा वृतांत सादर करतो.

अमेरिकेतील बाल्टीमोर येथील Johns Hopkins Hospital मध्ये केलेली ही शस्त्रक्रिया आहे.

अफगाणिस्तानात तैनात केलेला एक सैनिक हा या घटनेतील रुग्ण आहे. त्याचा एका अत्याधुनिक स्फोटक उपकरणाशी संपर्क येऊन तो जखमी झाला होता. त्यात त्याचा जननेन्द्रियाचा भाग नष्ट झाला होता. संबंधित डॉक्टरांनी या प्रत्यारोपणाची शक्यता आजमावली होती. आता ते एखाद्या मृत दात्याची वाट पाहत होते.

अखेर २६/३/२०१८ रोजी असा दाता मिळाला. मग त्याच्या शरीरातून शिस्न (penis), वृषण(scrotum) आणि पोटाच्या त्वचेचा काही भाग काढण्यात आला. नंतर वृषणातून अंडाशये( testes) काढून टाकण्यात आली. मग शिस्न आणि अंडाशय-विरहित वृषण यांचे प्रत्यारोपण रुग्णावर केले गेले. ९ प्लास्टिक सर्जन्स आणि २ मूत्रशल्यविशारद यांच्या १४ तासांच्या अथक परिश्रमानंतर हे काम यशस्वी झाले. मोठ्या अवयवांच्या प्रत्यारोपणाशी तुलना करता ही अतिसूक्ष्म प्रकारची नाजूक शस्त्रक्रिया आहे. ती यशस्वी केल्याबद्दल संबंधित चमू खचितच अभिनंदनास पात्र आहे. वैद्यकविश्वातील एक अभूतपूर्व अशी ही घटना आहे.

प्रत्यारोपण केलेल्या या रुग्णाला त्याची मूत्र आणि लैंगिक कार्ये ही जवळपास ‘नॉर्मल’ प्रकारे करता येतील असा विश्वास त्या डॉक्टरांनी व्यक्त केला आहे. अर्थात लैंगिक उद्दीपन होण्यासाठी रुग्णास testosterone हे पुरुष हॉर्मोन बाहेरून द्यावे लागेल.
शस्त्रक्रियेपूर्वी मोठ्या धक्क्याने ग्रासलेला हा रुग्ण निराश झालेला होता. शस्त्रक्रियेने केलेल्या या किमयेनंतरचा त्याचा आनंद काय वर्णावा? “Now, I am OK”, हे त्याचे उद्गार किती बोलके आहेत.

आज या डॉक्टरांच्या चमूचे जगभरातून अभिनंदन होत आहे. एक डॉक्टर आणि मिपासदस्य म्हणून मीही त्यात सहभागी आहे. वैद्यकविश्वात याबाबतच्या चर्चेला उधाण आले आहे. भविष्यात तो रुग्ण जेव्हा सर्वार्थाने ‘कार्यरत’ होईल तेव्हा या शस्त्रक्रियेचे यशापयश पूर्णपणे स्पष्ट होईल.

आता भविष्यत अशा प्रकारच्या प्रत्यारोपणासाठी मृत दात्याच्या अवयवाऐवजी 3D design organ तयार करता येईल का, यावर संशोधकांमध्ये विचारविनिमय चालू झाला आहे. रुग्णहितासंबंधीच्या अशा सर्व संशोधनांचे मी स्वागत करतो आणि संशोधकांना सुयश चिंतितो.
******************************************

जीवनमान

प्रतिक्रिया

manguu@mail.com's picture

30 Apr 2018 - 12:24 pm | manguu@mail.com

छान

या विषयावर तज्ज्ञ डॉक्टरांनीच धागा काढला हे उत्तम झाले. अशा स्वरूपाची अत्यंत गुंतागुंतीची शल्यक्रिया यशस्वीपणे पार पडली ह्याबाबत संबंधित डॉक्टरांचे आणि रुग्णालयाचे अभिनंदन! तुम्ही धाग्यात म्हटल्याप्रमाणे पुढील काही कालावधीपर्यंत रुग्णाचे दैनंदिन जीवन कितपत सामान्य चालते आहे यावर या शस्त्रक्रियेची यशस्विता ठरेल.

खटपट्या's picture

30 Apr 2018 - 1:42 pm | खटपट्या

खूप चांगली बातमी. याला अनुसरुन आता बर्‍याच शस्रक्रिया करता येतील...

Nitin Palkar's picture

30 Apr 2018 - 1:51 pm | Nitin Palkar

वैद्यकीय शास्त्राची ही रॉकेट झेप माणसाला अचंबित करणारी आहे. संबंधित डॉक्टरांचे आणि रुग्णालयाचे अभिनंदन!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

30 Apr 2018 - 3:55 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

रुग्णाचं आणि डॉक्टरांच्या टीमचंही मन:पूर्वक अभिनंदन..!!

-दिलीप बिरूटे

कुमार१'s picture

30 Apr 2018 - 6:49 pm | कुमार१

आभार आणि सहमती

गामा पैलवान's picture

30 Apr 2018 - 8:09 pm | गामा पैलवान

कुमार१,

हे तसं कठीण काम आहे (श्लेष अभिप्रेत ;-)). म्हणतात ना It's easier to dig a hole than build a pole.

अभिनंदन!

आ.न.,
-गा.पै.

डॉ सुहास म्हात्रे's picture

30 Apr 2018 - 8:38 pm | डॉ सुहास म्हात्रे

छान बातमी !

हा प्रयोग संपूर्ण यशस्वी झाला तर तो प्रत्यारोपणाच्या इतिहासात एक मैलाचा दगड ठरेल !

कुमार१'s picture

30 Apr 2018 - 9:11 pm | कुमार१

सहमत आणि आभार
हे तसं कठीण काम आहे >>>>> + ११

नाखु's picture

30 Apr 2018 - 11:09 pm | नाखु

क्षेत्रात मोलाची भर टाकली आहे या यशस्वी कामगिरीने!!!

अपघाती जखमी व जन्मजात व्यंग असलेल्या व्यक्तीच्या जीवनात अनेक आशादायक क्षण यामुळे येतील हे नक्की

अनिंद्य's picture

1 May 2018 - 10:45 am | अनिंद्य

अमेझिंग.
आता हा सगळा खटाटोप 'कामी' आला म्हणजे झाले ;-)

कुमार१'s picture

1 May 2018 - 11:34 am | कुमार१

अशी आपण कामना करुयात !

सचिन काळे's picture

3 May 2018 - 6:51 pm | सचिन काळे

खूप चांगली बातमी.

जेम्स वांड's picture

6 May 2018 - 5:31 pm | जेम्स वांड

एक प्रचंड मोठा स्नायू असावा, प्रसंगानुरुप मूत्रविसर्जन अथवा संभोगक्रिया उपयोगी एक स्नायू, अवयव उद्दीपित होणे म्हणजे शिश्नात असलेल्या कोट्यवधी धमनीत एकदम रक्तसंचार वाढणे, हाच नेमका शिश्न प्रत्यारोपणात सगळ्यात किचकट भाग असावा. नसेला नस बरोबर जोडली जाणे, त्यासाठी बरोबर नसांच्या पुंजक्याला पुंजका मॅच होईल हे पाहायला अन साधायला अतुल्य वैद्यकीय कौशल्य हवे, इतके करूनही जोडलेल्या शिश्नाला रुग्णाच्या शरीराने स्वीकारले पाहिजे अश्याप्रकारे (डोनर-होस्ट डिसीज न होईल अन बाकी नाजूक सिस्टिम पण कार्यरत राहतील) अशी अँटीबायोटिक उपाययोजना करणे म्हणजे चॅलेंजच असावी. इतके सगळे लागणाऱ्या प्रोफेशन मध्ये काही लोक 'डॉक्टर फार महान असतात असे काही नाही' वगैरे अकला पाजळतात तेव्हा हसावे का रडावे कळेना, असो! हॉपकिन्स सारख्या जागतिक कीर्तीच्या महाविद्यालय-रुग्णालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा लागला त्याबद्दल अभिनंदन, संबंधित डॉक्टर्सचे कौतुक अन इथे मांडल्याबद्दल डॉक्टर कुमार ह्यांचे असंख्य आभार.

जेम्स वांड , आभार ! या अतिसूक्ष्म सर्जरी चे खरंच कौतुक वाटते.
लेखात उल्लेख केलेल्या 3D design organ बद्दल कोणी तंत्रज्ञ लिहील का?

कसा डिझाईन होईल ह्याबद्दल साशंकता वाटते, मी काही वैद्यकीय किंवा त्रिमितीय छपाईचा एक्स्पर्ट नाही पण काही शंका मनात आल्या त्या खालीलप्रमाणे

१. वरच्या प्रतिसादात म्हणल्याप्रमाणे लिंग संभोगक्रिया करण्यास वापरावयाचे असल्यास त्यात विलक्षण गतीने रक्तसंचार होऊन तो 'काहीवेळ' पर्यंत तिथेच राहायला हवा, हा वाढीव रक्तपुरवठा तिथे थांबायचा म्हणजे त्या धमनीत आकुंचन अन प्रसरण ह्या दोन्ही क्षमता हव्यात, त्यातही प्रचंड प्रमाणात रक्तप्रवाह हाताळायची क्षमता म्हणजे त्रिमितीय अवयव ज्या मटेरियलचा बनवलेला असेल त्याचे मोलेक्युलर स्ट्रक्चर तितका ताण अन विसर्ग झेलणारे हवे, असे मटेरियल उपलब्ध आहे का नाही कल्पना नाही, माझ्यामते सध्या त्रिमितीय छपाई तंत्रज्ञानाद्वारे स्टॅटिक अवयव पक्षी एखादे हाड इतकेच काय ते छापले जाऊ शकावे.

बाकी ओव्हर टू एक्स्पर्ट पीपल.

अति जबरदस्त प्रकार आहे सगळा. स्तुती करावी तेवढी थोडी. फक्त एक टिपिकल शंकेखोर विचार मनात आला म्हणजे असे तंत्रज्ञान पुढे एकदम साधेसोपे झाले तर "लिंग कापून टाका" वगैरे शिक्षा देऊनही काही फायदा नाही ;)

जेम्स वांड's picture

7 May 2018 - 9:02 am | जेम्स वांड

राजे दंडवत घेणे!
Crying with Laughter

कुमार१'s picture

7 May 2018 - 10:10 am | कुमार१

म्हणेन की शरीरातील कोणताही नैसर्गिक अवयव जाऊन तिथे कृत्रिम बसवल्यावर मूळची मजा येत नाही राव ! ☺

प्रसाद गोडबोले's picture

7 May 2018 - 3:03 am | प्रसाद गोडबोले

सदर लेखावरुन शिप ऑफ थेसियस किंव्वा विक्रम और वेताल मधील पहिली कथा आठवली =))))

कुमार१'s picture

7 May 2018 - 7:37 am | कुमार१

सर्व नवीन प्रतिसादकांचे आभार.
लिंग कापून टाका" वगैरे शिक्षा देऊनही काही फायदा नाही ;)>>>>>
हा विचार अंमळ मजेदार वाटला. ☺

पुंबा's picture

7 May 2018 - 3:07 pm | पुंबा

होमो ड्युस पुस्तकात वाचल्याप्रमाणे मानव देव होण्याच्या मार्गावर आहे याची खात्री पटवणारे संशोधन. जीवशास्त्र, जैव अभियाम्त्रिकी, जनुकशास्त्र यात झपाट्याने होत असलेल्या प्रगतीने काही दशकातच दीर्घायुषी, सदानिरामयी, सर्व शारिरिक सुखे आकंठ भोगू शकणारा, प्रचंड ताकद, शारिरिक तसेच मानसीक बळ यांनी परीपूर्ण मानव प्रत्यक्षात येइल जो देव या संकल्पनेत जे अभिप्रेत असते त्याहून वेगला नसेल.
संबंधीत संशोधनात भाग घेतलेल्या सर्व शास्त्रज्ञ- वैद्यकांचे हार्दिक अभिनंदन.

कुमार१'s picture

7 May 2018 - 3:24 pm | कुमार१

पुंबा, आपण या पुस्तकाचा परिचय सवडीने लिहा ही विनंती.

कुमार१'s picture

27 Mar 2019 - 1:31 pm | कुमार१

या लेखातील रुग्णाची पुढील प्रगती जाहीर न केल्याने समजलेली नाही. पण, अन्य एकाचे बाबतीत त्याचा पूर्ण वृत्तांत (प्रगतीसह) उपलब्ध आहे. सर्वांनाच तो रोचक वाटेल म्हणून सादर करतो.

१. या रुग्णाने वयाच्या १८व्या वर्षी सुंता केली.
२. ती शस्त्रक्रिया नीट न झाल्याने त्याला लिंगाचा gangrene झाला. पुढे लिंग कामातून गेले व काढावे लागले.
३. आता तो २१ वर्षांचा झाला. एके दिवशी त्याला ३६ वर्षीय मृतमेंदू दाता मिळाला.

४. आता त्याच्यावर रोपण शस्त्रक्रिया झाली.
५. त्यानंतर अवघ्या ३ आठवड्यात त्याला पहिली ताठरता जाणवली. तो त्याने इतका खूश झाला की त्याने चक्क त्या स्थितीतील फोटो काढून डॉक्टरांना दाखवला !!

६. चौथ्या आठवड्यात त्याला घरी पाठवले गेले.
७. ५व्या आठवड्यात त्याने समागम केला.

८. रोपणाला २ वर्षे पूर्णे झाल्यावर स्थिती : तो आता नियमित लैंगिक सुख घेत आहे. स्खलन आणि उत्कटबिंदूचा आनंद त्याला व्यवस्थित मिळत आहे.

( American council on science & health मधून साभार !)

चौथा कोनाडा's picture

27 Mar 2019 - 5:33 pm | चौथा कोनाडा

हे ही थक्क करणारे ! धन्य ते डॉकटर आणि नशिबवान तो रुग्ण !

अवयव रोपण करण्याचा मैलाचा दगड !
आफ्रिकन दात्यांना डिमांड येणार ! :)))

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- लख मेरा टुनू टुनू करता है... ;) :- Sherlyn Chopra feat. Vicky & Hardik | Sukriti Kakar |4K |