फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : ३

रा.म.पाटील's picture
रा.म.पाटील in जनातलं, मनातलं
18 Mar 2018 - 9:18 pm

फेस्टिव्हल डायरीज..!!
(Decorate Your Love..)
कथा – ३
गुढीपाडवा..
(प्रेमाचा शुभारंभ..)

ब्रेकअप.. हा शब्द ऐकताच तो म्हणाला..

' आजपर्यंत हा शब्द मुलंच वापरत होते.., आता मुलीही बिनधास्त ब्रेकअप करू लागल्यात..'

ती- ' का नाही मुलीही आजकाल जास्त व्यावहारिक झाल्या आहेत..'

तो- ' मग हा व्यवहारीकपणा हॉटेलचे बिल देताना किंवा बॉयफ्रेंडचे पैसे स्वतःवर खर्च करताना नाही दिसत, इतर गोष्टीप्रमाणे प्रेमाचाही खरंतर विमा उतरवता आला पाहिजे, निदान ब्रेकअप किंवा घटस्फोटामुळे होणारे आर्थिक नुकसान तरी टाळता येईल.'

ती- ' पण तुम्हीपण हा खर्च काही अपेक्षा ठेवूनच करता ना?, मग तुम्ही व्यवहारिक वागत नाही का?'

तो- ' असेलही.. पण आमचा व्यवहारीकपणा प्रेमातील गोडवा वाढवण्याचे काम करतो, पण तुमचं व्यावहारिक वागणे त्याच प्रेमाला तिलांजलीच देते'

ती- ' पण आयुष्यात स्थैर्य पण पाहिजे ना, मग त्यासाठी व्यावहारिक झालो तर कुठे चुकले, चिमणी पण घरटे बांधताना फांदी मजबूत आहे की नाही ह्याचा विचार करतेच ना..!'

तो क्षणभर विचारात पडतो- ' तुझा मुद्दा बरोबर आहे' 'पण वादळात तेच घरटे उद्धवस्त झाले तर चिमणा चिमणी एकमेकाला सोडून जात नाहीत, पुन्हा नव्या जोमाने नवीन घरटे बांधायला सुरुवात करतात..'

ती पटल्यासारखे मान हलवत -' अगदी बरोबर, पण दोघांच्या वाटाच वेगळ्या असतील तर प्रवास एकत्र कसा होईल.?'

तो- ' मग हा विचार प्रेमात पडण्याआधीच का केला जात नाही.?'

ती- ' कदाचित प्रियकर आपल्यासाठी त्याची वाट बदलेल ह्या अपेक्षेने प्रवास सुरु केला जात असेल, पण एखाद्या वळणावर प्रेयसीला हतबल व्हावे लागते, न वेगळी वाट धरावी लागते'

तो- ' मग आपणच वाट बदलावी समोरच्या माणसासाठी!'

ती- ' पण ज्या वाटेवर आपणच आनंदी राहणार नाही, तर समोरच्या माणसाला तरी आनंद कसा देणार?'

तो- ' पटतंय तुझे म्हणणे, पण प्रेमातील जास्त व्यवहारीकपणा त्या प्रेमाचा टवटवीतपणा कमी नाही का करत?'

ती- ' होत असेलही, पण आज गुढीपाडवा, चैत्रारंभ, वसंतोत्सवाची सुरुवात, शिशिर ऋतुत पान गळती झालेल्या झाडांना पालवी फुटण्याचा दिवस, मग असेच व्यवहरिकपणाने होरपळून निघालेल्या प्रेमाला प्रेमळ पालवी फुटली तर ते प्रेमही टवटवीत होईलच की..'

तो- ' पण ती पालवी फुटणार कशी? इथे सकाळी उभारलेली गुढी पण संध्याकाळी उतरवली जाते, तसेच आहे प्रेमाचे, तेही कधी न कधी ओसरतेच ना?'

ती- ' हे पण मान्य, पण प्रेम करण्याची कारणे शोधली पाहिजेत, नाहीतर तिरस्कार करायला भरपूर कारणे आहेतच की'

तो- ' लग्न झाल्यावर सर्वजण सुरुवातीला हेच प्रयत्न करतात, पण नव्याचे नऊ दिवस नंतर मात्र नात्यात ते प्रेम राहत नाही.. असे कुठे बिनसते नक्की..?'

ती- ' कदाचित नंतर त्या दोघांच्या प्रायोरिटीज बदलतात ना.. तिच्यासाठी मूल, त्यांची देखभाल, त्याच्यासाठी कुटुंबाचा वाढता खर्च.. मग दोघांची धावपळ.. पण ती एकमेकासाठीच असते ना.. फक्त यावेळी प्रेम व्यक्त प्रेमापेक्षा अव्यक्त जास्त असते.. आणि ते जर त्या दोघांना ओळखता आले तर त्यांचे प्रेम टिकते..'

तो- ' पण मुलीना एका बाजूला खूप सारा पैसा पाहिजे असतो आणि दुसऱ्या बाजूला त्यांना वेळ देत नाही म्हणून त्या नाराजही होतात.. हेच कळत नाही की त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात की आपल्याला वेळ कमी पडत असतो ते..'

ती- ' अशा वेळी दोघांनी खासकरून मुलींनी छोट्या छोट्या गोष्टीत आंनद शोधला पाहिजे, तुम्हाला प्रेम हवे असेल तर तुम्ही त्यांना प्रेम द्या..'

तो- ' मग काही प्रेमी असे पण आहेत की चार पाच वर्ष रिलेशनशिप मध्ये असूनही नंतर ब्रेकअप करतात.. ती चार पाच वर्ष त्यांनी काय प्रेम केलेले नसते का..?'

ती- ' मला वाटते प्रेमात ब्रेकअप गरजेचे आहेत, त्याशिवाय समोरच्या व्यक्तीला जाणीव होत नाही की त्याचे किंवा तिचे आपल्यावर किती प्रेम होते ते..'

तो- ' आणि त्याला ती जाणीव झालीच नाही तर.?'

ती- ' समजून जायचे की आपल्या प्रेमाच्या व्याख्येत ती व्यक्ती बसलीच नाही..'

तो- ' पण असे कुठपर्यंत..?'

ती- ' प्रेमाला पून्हा पालवी फुटेपर्यंत.. कसे आहे ना पानगळ ही होतच असते पण नवी पालवीही फुटत असते, निसर्गातही आणि प्रेमातही..'

त्यांचा मित्र- ' अरे तुम्ही तर असे मुद्दे मांडत आहात की तुम्हीच प्रेमात आहात आणि तुमचेच ब्रेकअप होत आहे.'

गेट टूगेदर साठी सर्व मित्र मैत्रिणी आज भेटत असतात सर्वांची सुट्टी जुळून आल्यामुळे.. आणि विषयवार विषय निघत एका मैत्रिणीच्या ब्रेकअप पर्यंत विषय आलेला असतो..

अजून एक मैत्रीण - ' पण तुमचा संवाद ऐकून असे वाटले की तुम्हाला असेच बुद्धीचा किस पाडणारे जोडीदार भेटले पाहिजेत'

मैत्रीणीच्या त्या वाक्याने अगोदर नजरेत नजर घालून बोलणारे ती दोघे आता नजरेला नजर भिडवेनात..असे म्हणतात माणूस प्रेमात पडला की समोरच्या माणसाशी नजर भिडवू शकत नाही..

मैत्रिणीच्या ब्रेकअप मुळे सुरू झालेल्या त्यांच्या संवादाने आता त्यांच्यातील प्रेमाला पालवी फुटली होती.
बाहेर गुढ्या उभारल्या गेल्या होत्या, नवीन वर्षाचा आरंभ झाला होता आणि इथे प्रेमाचा शुभारंभ..

***
राही..
***
सूचना - वरील लेखाचे सर्व हक्क लेखकाकडे आहेत. वरील लेख किंवा त्याचा कोणताही भाग लेखकाच्या पूर्वपरवानगीशिवाय प्रकाशित किंवा मुद्रित किंवा कोणत्याही स्वरूपात वापरता येणार नाही. तसेच परवानगी घेऊन वरील लेखाचा वापर करताना त्यात लेखकाच्या नावाचा आणि मोबाइल नंबरचा उल्लेख करावा.

संपर्क : ८३७८ ०४५१४५ (राही..)

8378 045145 (Rahi..)

कथालेख

प्रतिक्रिया

फेस्टिव्हल डायरीज..!!: कथा - १ ची लिंक

https://www.misalpav.com/node/41841

फेस्टिव्हल डायरीज..!!: कथा - २ ची लिंक

https://www.misalpav.com/node/42046

रा.म.पाटील's picture

25 Mar 2018 - 9:37 am | रा.म.पाटील

फेस्टिव्हल डायरीज..!!: कथा - ४ ची लिंक

https://www.misalpav.com/node/42507