भानुमामी

चुकलामाकला's picture
चुकलामाकला in जनातलं, मनातलं
18 Mar 2018 - 6:57 am

"बेबी डॉल मैं सोने दी"..... मोबाईलचा गजर वाजू लागतो आणि भानुमामीला जाग येते. गाणं पूर्ण होईपर्यंत ती तशीच पडून राहते. गेल्या महिन्यात तिच्या नातीने, रमेने मोबाईलमध्ये हे गाणं टाकलेलं असतं. भानुमामीला तो प्रसंग आठवतो आणि खुद्कन हसू येतं. "भानुमामी, कुठली गाणी टाकू तुझ्या फोनमध्ये?" रमा तिला नवा फोन वापरायला शिकवत असते. भानुमामीला तिचं आजी न म्हणता भानुमामी म्हणणं काही आवडत नसतं. रमेला ती तसं अनेकदा सुचवून बघते. मग एकदा रमा तिला म्हणते "आई रागवेल मला. तिनं सांगितलय आज्जी नाय म्हणायचं. ती काही आपली आज्जी नाहीय." भानुमामीला धुसफुसत गप्प बसावं लागतं.

"गणपतीच्या आरत्या, भजनं घाल त्यात." रमाची आई, मामीची भाचेसून सुचवते. "शी! आरत्या बिरत्या काय ऐकायच्या? त्यापेक्षा पिक्चरची गाणी घाल मस्त. ते बेबी डॉल छान आहे बघ. चांगली नाचलीये ती." सुनेच्या चेहऱ्यावरचे भाव बघून मामीला सूड उगवल्याचा आनंद होतो.

गजराचं गाणं संपल्यावर मामी उठते. मोरीपाशी जाऊन खसाखसा दात घासते. गॅसवर दूध तापवायला ठेवते. मामीला संपूर्ण दुधाचा चहा आवडतो. चांगला दोन कप चहा आणि त्यावर घट्ट साय. मामा असताना सगळी साय विरजणात जायची. रोज देवाला तुपाचे दिवे लागत म्हणून. आजकाल देव वरती ट्रंकेत बंद असतात. फक्त गणपतीच्या वेळीच बाहेर येतात. चहा आणि जीरा बटर पोटभर खाल्ल्यावर मामीचा दिवस चालू होतो.

मामी न्हाणी पेटवते आणि परड्यात चक्कर मारायला निघते. रात्री दोन नारळ पडलेले असतात. ते उचलते. विहिरीकडच्या केळीचं केळफूल उतरवायला झालेलं असतं. उद्या केळफुलाची भाजी म्हणजे रात्री काळे वाटणे भिजत घालायला हवेत अस मनाशी ठरवत ती केळफूल तोडते. केळी गोणपाटात झाकून ठेवते. "उगा मेल्या वानरांची नजर जायला नको. सत्यानाश करून ठेवतील." काही दिवसांपूर्वीच वानरांनी पपईचं आणि अननसं उमळवून टाकलेली असतात. मामीला वानरांचा खूप राग येतो. तिला वाटतं बंदूक घ्यावी आणो ठो ठो करत सगळ्या वानरांना मारून टाकावं. मामीला तसं तर सगळ्यांचाच राग येतो.

वाकड्या आंब्याला मोहोर आलेला असतो. त्याच्या वासाने भानू मामी जरा थंड होते. महिन्या दोन महिन्यांत कैऱ्या लागतील. मग पन्ह आणि वाटली डाळ. मामीच्या तोंडाला पाणी सुटतं. मांगे-याने मामी पतेरा गोळा करते. आणि न्हाणीपाशी नेऊन टाकते.

न्हाणीतलं पाणी कडकडीत तापलेलं असतं. भानुमामी पिअर्सचा नवा कोरा साबण काढते. आधी त्याचा मन भरून वास घेते. तिला उगाच जुनं काहीतरी आठवतं. नणंद माहेरपणाला आलेली असते. तिनं तिच्या मुलासाठी मुंबईहून येताना पिअर्स आणलेला असतो. मामीला तो आरपार दिसणारा साबू आवडतो. ती तो नाकापाशी नेऊन वास घेऊ लागते. "राजूसाठी आणलाय तो." म्हणत नणंद हात पुढे करते. मामीला राग येतो. ती बोलत नाही पण आतल्या आत धुमसत राहते. आपल्याला मूल नाही म्हणून ती मुद्दाम बोलली असं तिला वाटत राहातं. रात्री मामांना सांगितल्यावर ते नेहमीसारखं हसण्यावारी नेतात. "तुला उगाचच वाटतं तसं. तिच्या मनात काही नसणार असं." त्यांच्या या वाक्याने तर ती अजूनच भडकते. "इतके संत कसे हे? लोकांच्या वागण्या बोलण्यातले छुपे अर्थ यांना कधी कळतच नाहीत." पण मामी सगळ्याना ओळखून असते. नणंदेला तर चांगलंच. पुन्हा कधी मामी तिच्या त्या साबणाला हात लावत नाही.

पण भानूमामा गेल्यापासून मात्र ती नेहमी पिअर्सच वापरते. बाबल्याच्या दुकानातून महिन्याच्या सामानात पिअर्सचे दोन साबण असतातच. ऊन ऊन पाण्यानं अंघोळ करताना तिच्या मनावरचं मळभ पण निघून जातं.

आंघोळीनंतर मामी स्वयंपाकघरात जाते. आज ती सरंग्याची रसाची आमटी करणार असते. ती नारळ खवायला घेते. कुठूनतरी तुपावर बेसन भाजल्याचा खमंग वास येतो. बेसनाचे लाडू करून खूप दिवस झाले, लवकरच करायला हवेत मामीला वाटतं. मामीचं नाक खूप तिक्ष्ण असतं. असले खाण्यापिण्याचे वास तिला पटकन येतात. बाजारातून येताना भगवानचे वडे , बाणावलकराची जिलबी तिला नेहमी खुणावते. खूपच लहर आली की कधीमधी ती हॉटेलात डोकावते. पण ते कसलं हॉटेल ? चार प्लास्टिकची टेबलं नी बाकडे. खरी मजा मुंबईच्या हॉटेलाची. स्वच्छ चकचकीत. तिथं खूप काही छान छान मिळतं. मामी नेहमी टीव्हीवर ते पहात बसते.

खाण्यापिण्याच्या सिरीयली तिला विशेष आवडतात. त्यातलं इंग्रजीत बोललेलं फार काही कळलं नाही तरी ती त्या बघणं सोडत नाही. कारण रात्री तिला त्या पदार्थाची चमचमीत स्वप्न पडतात. कधीतरी मुंबईला जाऊन ते सगळं खायची तिची खूप इच्छा असते. पण भानुमामीला मुंबईला कोण नेणार? घरी कुणी मुंबईहूून मिठाई, खासकरूून सूतरफेणी आणली की आई नेहमी मामीकडे पाठवते. मामीचा खायचा सोस सा-या गावाचा चेष्टेचा विषय असतो. पण आई म्हणते, "कधी कुणाची कसली भूक मारू नये. केव्हा नी कुठल्या स्वरुपाात बाहेर पडेल साांगता येत नाही."

मामीला वाटतं पैसा असून उपयोग काय? आपलं म्हणावं असं कुणी माणूसच नाही. तिला तिचं बाळ आठवतं. सहा महिन्यांचा होऊन गेला बिचारा. जगला असता तर आता रमेएवढीच नात असती. नशीबच फुटकं माझं मेलीच.. म्हणत ती रागारागाने पाट्यावर खोबरं वाटायला घेते.

एकेकाळी तिच्या नशिबाचा लोक हेवा करतात. जेव्हा हे स्थळ सांगून येतं तेव्हा सगळे म्हणतात, "नशीब काढलंस गो पोरी, देवमाणूस नवरा म्हणून मिळाला." भानुमामा तसे खरंच सज्जन. निर्व्यसनी ,साधे सरळ. खाऊन पिऊन सुखी. एवढा पंचेचाळीस वर्षांचा संसार पण कधी तिला एका शब्दाने रागावलेले नसतात. पण मूल गेल्यानंतर सगळं चित्र बदलतं. दोघं नवरा बायको त्या दु:खाला वेगवेगळ्या पद्धतीने सामोरं जातात. एक दिवस मामा ,"आजपासून माऊली गो तू माझी" म्हणत देवांबरोबर मामीला सुद्धा लोटांगण घालतात. रोजची पूजा ,गुरूपाठ, उपास तापास नैवेद्य यात मामा स्वत:ला गुुंतवून घेतात. घराचं देऊळ बनतं. मामी चिडचिडी बनते.

मामांच्या पाया पडायला, सल्ला घ्यायला किंवा मदत मागायला सतत कोणी ना कोणी येत रहातं. त्यातच सख्ख्या चुलत मावस अशा नातेवाईकांची ये-जा असतेच. मामीच्या भाषेत "पाव्हणे पावसासारखे धो धो कोसळतात." मामीच्या हातचं जेवण मिटक्या मारत खातात. मामी त्यांचं करता करता थकून जाते. "आपल्याला कधी कुणी चार दिवस विश्रांतीला बोलवत नाही. आणि इथे मात्र महिना महिना माहेरपणाला येतात." क्वचित मामी मामांकडे चिडून बोलते. "राहूदे ग, मुंबईच्या दोन खोल्यांत दोन दिवसांत कंटाळून जाशील तूच." मामा तिची नेहमीप्रमाणे समजूत घालतात. मामांच्या सज्जनपणाचा लोक फायदा घेत रहातात‌ आणि मामी अजून अजून चिडत रहाते.

मऊ लोण्यासारखं वाटंप बघून मामी खूष होते. मामीकडे मिक्सर असतो पण मामी कधी तो वापरत नाही. त्यात बारीक वाटंप होत नाही असं मामी म्हणते. पण नणंदेने स्वत:ला नवीन घेतला आणि जुना इथे आणून टाकला हे कारण मनात कुठेतरी दडून असतं. इतर बायका एकटीसाठी जेवण बनवायला कंटाळतात. पण मामी मात्र रोज साग्रसंगीत स्वयंपाक करते. सणावाराला पक्वान्न करते. भरपूर चवीनं जेवते. सुदैवानं मामीला शूगर बीगर बीपी डीपी काय नसतं. तेवढं एक देवानं बरं केलं म्हणत मामी गॅसवर कुकर चढवते आणि आमटीत वाटप घालते.

गेल्या काही वर्षांत मामीचा दिनक्रम ठरून गेलेला असतो. सकाळी परड्यातलं काम, आठवड्यातून दोनदा बाजार, दुपारचं जेवण आणि मग तासभर मस्त झोप. संध्याकाळी मामी माझ्या आईबरोबर धक्क्यावर फिरायला जाते. तिथं कोणकोण भेटतात. गप्पा होतात. गावातली खबर कळते. रात्री मामी आणि टीव्ही एकमेकांना बघत बसतात. मामी मनातल्या मनात टिव्हीतल्या सगळ्या जागी जाऊन येतात.

मामा गेल्यानंतर मामीला वाटतं, इतके नातेवाईक इतक्यांदा राहून -जेवून गेले. कुणीतरी काही दिवस रहायला बोलवेल. पण सगळे काढत्या पायांनी येऊन जातात. भाच्याच्या लग्नाचं ठरतं तेव्हाही मामीला वाटतं, नणंद फोन करेल, लग्नाला यायचा आग्रह करेल. फोन येतो पण आग्रह काही होत नाही. मामीला आधी वाईट वाटतं.‌ मग राग येतो. "मी बरोबर ओळखलेलं मेलीला. पण यांचा माझ्यावर कधी विश्वास बसला नाही. आत्ता असते तर दिसला असता बहिणीचा खरा रंग." मामी आदळ आपटकरते.‌ पण तिला शांत करणारं कोणी नसतं.

जेव्हा दुस-या भाच्याचं लग्न ठरतंय असं कळतं तेव्हा मात्र मामी सावध होते. काहीही करून याखेपेला मुंबई गाठायचीच असं पक्क ठरवते. ही संधी तिला हातची घालवायची नसते. नणंदेचा, लग्न ठरल्याचा फोन येतो. तेव्हा मामी हलकेच बोलून जाते, "आईंचा तन्मणी, नथ वगैरे दागिने सुनांच्या अंगावर घालायची इच्छा आहे गं. मी मेली किती आणि कुठे मिरवणारे ते दागिने? गेल्यावेळी काही लग्नात येणं झालं नाही. यावेळी बघू." उतारा बरोबर लागू पडतो. पत्रिका द्यायला नणंद, दोन्ही भाचे, सून गाडी घेऊन येतात. लग्नाला यायचा भरभरून आग्रह होतो. भाचा लग्नाच्या आठ दिवस आधीचं तिकीट काढून फोन करणार असतो. मामी खूष होते.

डोळे मिटू लागतात तशी मामी टिव्ही बंद करते. आजही भाच्याचा फोन आलेला नसतो. पण न करून तो जाणार कुठे, आज ना उद्या तो येणारच. मामीला पक्की खात्री असते. मामी झोपायला जाणार इतक्यात तिला वाटाणे भिजत घालायची आठवण होते. तेवढं करून मामी दिवा विझवते. मुंबईचं स्वप्न बघत भानुमामी झोपायला जाते.

कथालेख

प्रतिक्रिया

प्रचेतस's picture

18 Mar 2018 - 9:40 am | प्रचेतस

खूप छान लिहिलंय, लेखनशैली आवडली.
कथा इथेच संपली नसेल तर पुढचा भाग येऊ द्यात.

manguu@mail.com's picture

18 Mar 2018 - 10:17 am | manguu@mail.com

छान

बबन ताम्बे's picture

18 Mar 2018 - 1:14 pm | बबन ताम्बे

भानुमामी छान रंगवल्यात !

भानू मामीच्या जगण्याच्या तीव्र आसुसा मस्त टिपल्या आहेत. कथा म्हणा, व्यक्तिचित्र म्हणा, आवडलं.

चौथा कोनाडा's picture

18 Mar 2018 - 5:51 pm | चौथा कोनाडा

वा, किती सुरेख भानूमामी !
खुप सुंदर लेखनशैली !
डोळ्यांच्या कडा ओलवता ओलवता ओठांवर स्मित उमटवून गेली मामी.

माझी चुलत मावशी आठवली अन बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या !

चुमासाहेब, या सुंदर व्यक्तिचित्रासाठी तुम्हाला माझा पेशल चुम्मा !

अभिजीत अवलिया's picture

18 Mar 2018 - 6:52 pm | अभिजीत अवलिया

छान लिहिलंय ...

अमरेंद्र बाहुबली's picture

19 Mar 2018 - 1:23 am | अमरेंद्र बाहुबली

मस्त.

सालदार's picture

19 Mar 2018 - 1:34 pm | सालदार

एकटेपणा खुप भयाणक असतो. भानुमामी त्याला धैर्यानं सामोर्‍या तर जातातच पण जगण्याचा आनंदही यथेच्च घेताना दिसतात. आवडले.

अनिंद्य's picture

19 Mar 2018 - 2:27 pm | अनिंद्य

@ चुकलामाकला,

भानू मामीचे व्यक्तिचित्रण खासच.
स्वतःच्या दाबून ठेवलेल्या, राहून गेलेल्या इच्छा पुरवून घेण्याची तिची धडपड योग्य वाटली, भावली.

लेखन क्रमशः असावे ही अपेक्षा.
तसे असेल तर पु. भा. प्र .

एक पृच्छा: -
मांगे-याने मामी पतेरा गोळा करते... म्हणजे काय?
झाडू / स्वच्छता असा अर्थ असावा का?

अनिंद्य

चुकलामाकला's picture

20 Mar 2018 - 2:30 pm | चुकलामाकला

धन्यवाद, पण अजून पुढच्या भागाचा विचार केला नाही. :)
मांगेरा म्हणजे दंताळं किंवा rake.

सस्नेह's picture

19 Mar 2018 - 3:21 pm | सस्नेह

अगदी कोरीव व्यक्तिचित्र !

मराठी कथालेखक's picture

19 Mar 2018 - 7:53 pm | मराठी कथालेखक

व्यक्तीचित्रण चांगलं आहे.
पण सगळीच क्रियापदं वर्तमानकाळातली का आहेत ? व्यक्तीचित्रण कथा न वाटता जिवंत वाटावं म्हणून वर्तमानकाळ रंगवला हे मी समजू शकतो. पण निदान भूतकाळातले प्रसंगांचे कथन करताना वर्तमानकाळ दर्शवणारे क्रियापद नसावेत असे मला वाटते.

नणंद माहेरपणाला आलेली असते. तिनं तिच्या मुलासाठी मुंबईहून येताना पिअर्स आणलेला असतो. मामीला तो आरपार दिसणारा साबू आवडतो. ती तो नाकापाशी नेऊन वास घेऊ लागते. "राजूसाठी आणलाय तो." म्हणत नणंद हात पुढे करते. मामीला राग येतो. ती बोलत नाही पण आतल्या आत धुमसत राहते.

चुकलामाकला's picture

20 Mar 2018 - 2:31 pm | चुकलामाकला

घटना जरी भूतकाळात घडली असली तरी भानुमामीच्या मनात ती अजूनही ताजी आहे. आजही तिला तेवढचं ठसठसतं. काळानं ते दुखणं कमी नाही केलेलं. म्हणून वर्तमानकाळात लिहिलं.

खूप खूप सुंदर लिहिलंय. साध्या साध्या वाक्यांमधून सुद्धा मामीचं एकटेपण मनाला जाणवतं. लेखनशैली सुरेख.

कपिलमुनी's picture

19 Mar 2018 - 9:01 pm | कपिलमुनी

एकदम खासच !!
अपुऱ्या ईच्छा आणि त्या पूर्ण करायची हौस मस्त टिपली आहे

निशाचर's picture

20 Mar 2018 - 5:15 am | निशाचर

सुंदर लिहिलं आहे. परिस्थितीमुळे मिळालेलं स्वातंत्र्य उपभोगणारी भानुमामी आवडली.

वनफॉरटॅन's picture

20 Mar 2018 - 8:52 am | वनफॉरटॅन

पडघवली किंवा तांबडफुटीसारख्या पुस्तकांची आठवण झाली नसती तरच नवल. मुख्य म्हणजे ह्यामुळे लँडस्केपिंग तुम्ही कथेत फार केलं नसलं तरीही तो प्रदेश डोळ्यांसमोर उभा राहतो.
पण, मला सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट म्हणजे पीअर्स साबणइ.च्या निमित्ताने गेल्या पिढीत थोडासा डोकं वर काढू लागलेला 'चंगळवाद'(!) ह्याने कथेला छान अलिकडच्या काळातली बाजू आलेली आहे. तुमचे अजून लिखाण वाचायला नक्की आवडेल.

चुकलामाकला's picture

20 Mar 2018 - 2:38 pm | चुकलामाकला

जे काही लिहिलेय ते मिपावरच ़

चुकलामाकला's picture

20 Mar 2018 - 2:32 pm | चुकलामाकला

सर्वांना धन्यवाद!_/\_

किसन शिंदे's picture

20 Mar 2018 - 6:03 pm | किसन शिंदे

सुरेख लिहीलंय अगदी. पुढचा भागही वाचायला आवडेल नक्की.

सुरेख आहे, कोकणातलं वर्णन असल्याने आणखी आवडलं.

पिलीयन रायडर's picture

20 Mar 2018 - 7:33 pm | पिलीयन रायडर

लेखन आवडले.

फक्त भूतकाळातले वर्णन खटकले. काळ चुकलाय असं वाटलं.

--एकेकाळी तिच्या नशिबाचा लोक हेवा करतात. जेव्हा हे स्थळ सांगून येतं तेव्हा सगळे म्हणतात--

हे भानुमामीं साठी अगदी अजूनही वर्तमानासारखं असलं तरीही ते चूकच वाटलं. शिवाय ज्या कारणांनी तुम्ही असं लिहिलंय ते ही पोहचत नाही हे वेगळंच. हवं तर ते तुम्ही त्यांच्या तोंडी स्वगत म्हणून घाला.

इतक्या छान लेखात ते उगाच खटकतं आहे.

पिवळा डांबिस's picture

20 Mar 2018 - 11:20 pm | पिवळा डांबिस

भानुमामीचं व्यक्तिचित्र आवडलं.